Wednesday, January 27, 2010

झिंग... नटरंग ची...

ईश्वरा, जन्म हा दिला, प्रसवली कला थोर उपकार...

तुज चरणी, लागली वर्णी,कशी ही करणी करु साकार..

मांडला नवा संसार,अता घरदार तुझा दरबार...

पेटला, असा अंगार,कलेचा ज्वार,चढवितो झिंग....
नटरंग उभा,ललकारी नभा,स्वरताल जाहले दंग....

कलेचं वेड काय असतं हे अनुभवायचं असेल तर जरुर पहावी अशी ही कलाकृती " नटरंग".गेले काही दिवस वर्तमानपत्रातून,वेगवेगळ्या टिव्ही चनेल्स वरुन आणि चित्रपट पाहुन आलेल्या मित्रमंडळींकडुन या चित्रपटाविषयी ऐकत होते...अजय-अतुल चे संगीत असलेली या चित्रपटाची गाणी ऐकून आधीच वेड लागलं होतं....अक्षरशः ही गाणी सगळीच्या सगळी पाठ झाली आहेत मला...अधले मधले संगीताचे तुकडे सुद्धा डोक्यात इतके फिट बसले आहेत कि सतत कुठेही ते माझ्या पाठलाग करत असतात....

सलग ३ आठवडे दर शनिवार रविवारी "सिटी प्राईड" ला जात होतो आम्ही हा चित्रपट पाहायला...प्रत्येक वेळी शो "हाउसफुल" चा बोर्ड.....मनातुन कुठेतरी बरंही वाटत होतं म्हणा...एक मराठी चित्रपट लोक इतका डोक्यावर घेतात हे पाहुन अभिमान वाटला..पण प्रत्येक वेळेस हाउसफुल ची पाटी पाहुन,आता कधी पाहायला मिळणार हा चित्रपट असं वाटायचं...अखेर परवा २६ जान.ला तिकिट मिळालं बाबा एकदाचं....आणि तेव्हा पासुन डोक्यात नटरंग ची जी "झिंग" चढली आहे ती अजुनही उतरायला तयार नाहिये....

कथा,पटकथा,दिग्दर्शन,संगीत,अभिनय सगळ्याच आघाडीवर चित्रपट इतका अप्रतिम आहे की क्या केहेने....अतुल कुलकर्णी या माणसाची खरचं कमाल आहे....दोन अतिशय वेगळ्या व्यक्तिरेखा....फक्त स्वभावच नव्हे तर वागण्या,बोलण्या,दिसण्यात वेगळ्या व्यक्ती त्याने इतक्या कमलीच्या साकारल्या आहेत....अतुल ला खरच दंडवत घालावासा वाटला...एकाच चित्रपटासाठी वजन वाढवणं आणि परत कमी करणं या गोष्टी फार फार अवघड आहेत्....आणि त्यानं ते आव्हान अनिशय लीलया पेललंय.....त्याला पाहुन,माझ्या कुलकर्णी आडनावाचा मला परत एकदा अभिमान वाटला मला :-)...( शेवटी काय आडनाव बंधु ना तो आमचा ;-).....अख्खा पिक्चर यानं नुसता खाउन टाकलाय्....खरं सांगते..अप्सरा आली गाण्यामधे सुद्धा...अतुल पडद्यावर कधी येतो आणि कधी जातो याकडे माझं जास्त लक्ष होतं....एक पुरुष इतक्या सहजपणे बाईसारख्या हालचाली कशा काय करु शकतो....ते फक्त अतुल कुलकर्णीच करु जाणे...

आणि चित्रपटाची सर्वात महत्वाची बाजु म्हणजे संगीत्....अजय-अतुल हे दोघं अक्षरशः वेडे लोकं आहेत्....इतकं भन्नाट संगीत दिलंय या दोघांनी....सगळी गाणी अप्रतिम झाली आहेत.... माणसाला जगायला काय लागतं असं कोणी विचारलं तर आपण अन्न्,वस्त्र,निवारा,ई,ई अशी यादी देउ..पण अशा काही कलाकृती पाहिल्या की वाटतं...फक्त पैसा,उत्तम जेवण,छानसं घरं,दारात गाडी या सगळ्या गोष्टींपेक्ष्याही आपलं जगणं समृद्ध करणार्‍या इतर अनेक गोष्टी आहेत्....आणि आपल्याला त्याचा आनंद घेता येतो हे आपलं भाग्य....मला मराठी म्हणुन जन्म मिळाल्याबद्दल अशावेळी मी देवाचे आभार मानते....

नटरंगच्या शेवटच्या सीन मद्धे गुणा त्याला मिळालेलं पारितोषिक उंच धरुन समोर पसरलेल्या प्रचंड जनसमुदायाला नमस्कार करतो तेव्हा मी क्षणभर विसरुनच गेले की हा एक चित्रपट आहे...आधीच्या २ तासात पाहिलेले सगळे प्रसंग डोळ्यापुढे एका क्षणात सरकून गेले आणि डोळ्यातलं पाणि गालावर कधी आलं ते कळंलच नाही....
चित्रपटातील एकच गोष्ट खटकली...सुरवातीला दिली गेलेली सुचना..... "या चित्रपटातील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत्..त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही" ..

नटरंग सारख्या चित्रपटांच्या सुरुवातीला तरी निदान असल्या सुचना नसाव्यात असं वाटतं.....कोण जाणे हा चित्रपट पाहणार्‍या कोणा एखाद्या "गुणा" ला यापासुन प्रेरणा मिळेलं... आणि आपल्याला ....अजुन एक कलाकार....