Monday, October 26, 2015

माझी आज्जी..माझा आदर्श...

खाणं आणि खिलवणं हे माझे अतिशय जिव्हाळ्याचे विषय.नक्की कुठुन सुरुवात झाली याची ते माहित नाही.पण कदाचित ते माझ्या रक्तातच असावं.माझी आज्जी अतिशय सुगरण आहे.कुठलाही पदार्थ अतिशय प्रेमाने आणि निगुतिने करणारी आणि तेवढ्याच प्रेमाने समोरच्याला खाउ घालणारी.आज्जीच घर स्टँड च्या अगदी जवळ त्यामुळे गावात कोणाकडेही आलेला कोणीही पाहुणा आधी आज्जीकडे जाणार. चहा, नाष्ता, जेवण ज्या वेळी जे योग्य असेल ते तिच्या हातचं खाणार , तृप्त होणार आणि मगच पुढे जाणार.गेली कित्येक वर्ष अनेक लोक या अन्नपूर्णेच्या हातचं जेवुन तृप्त झालेत आणि अजुनही होत आहेत.

मी शाळेत असताना सुट्ट्या लागल्या की लगेच आज्जीकडे पळायचे.माझी आज्जी मूकबधीर शाळेत कला आणि शिवण विषय शिकवायची.ती सुगरण तर आहेच पण एक अप्रतिम कलाकार पण आहे.आम्ही सुट्टीला येणार म्हणुन आमच्यासाठी तिचे अनेक बेत ठरलेले असायचे.काय काय खाउ करायचा आणि काय काय कलाकुसरीच्या वस्तु करायच्या हे सगळं ठरलेलं असे.

मला अजुनही आज्जीच्या घरचं सुट्टीतलं वातावरण आठवतं.आज्जी आणि आजोबा भल्या सकाळी ५:३० लाच उठायचे. उठलं की बारीक आवाजात स्वयंपाकघरात रेडीओ लागायचा. त्या रेडीओ ची गुणगुण ऐकत ऐकत आज्जीची कामं चालायची. दारात सडा टाकायचा. रांगोळी काढायची. पाण्याची सगळी भांङी घासुन पुसुन लख्ख करायची.प्यायच्या पाण्याची घागर वेगळी. देवाची घागर वेगळी. घासायच्या भांड्याचं सॉर्टींग करायचं. म्हणजे भांडीवाल्या बाईंना सरसकट सगळीच भांडी द्यायची नाहीत. चमचे, पाणी प्यायचे तांबे भांडी, छोट्या वाट्या,ताटल्या आणि काही खास भांडी आपणच घासायची. उरलेल्या भांड्यातले पण सर्व खरकटे काढुन ती भांडी पाण्याखाली धरुन मगच बाईला भांडी द्यायची.सकाळची सगळी पारोशी कामं आणि चहा झाली की आज्जी आधी आंघोळ करी.रोजच्या रोज अंघोळ करण्यापुर्वी केसांना तेल लावुन त्याची सुरेख वेणी घालायची आणि हातापायांनाही तेल लावायचं असा तिचा नियम. त्यामुळे अजुनही आज्जीची त्वचा सुरेख तुकतुकीत आणि तेजस्वी दिसते.अजुनही तिची हीच सवय कायम आहे.अंघोळ करुन शुचिर्भूत झाल्याशिवाय स्वयंपाकाला सुरुवात नाही.आजोबांची पूजा आणि आज्जीचा स्वयंपाक एकत्र चालु असतो. एखादं सुरेल गाणं गुणगुणावं तसं मऊसुत आवाजात सगळी देवांची स्त्रोत्र म्हणत म्हणत नाश्ता आणि स्वयंपाक बनवायला सुरुवात होते.त्यांचं ते एका लयित प्रार्थना गात गात चालु असलेलं काम बघायला मला अजुनही खुप खुप आवडतं.

माझ्या बाळंतपणात आज्जी आजोबा आईकडे रहायला आलेले होते. रोज सकाळी बाळाला आणि मला मालिश करुन झोपवुन बाई निघुन गेल्या की मधल्या खोलीत आजोबांची साग्रसंगीत पूजा चालु होई. तिथेच आज्जी कुठे ताक कर, कुठे भाजी निवड अशी कामं करत बसलेली असे. दोघांची एका सुरात सगळी स्त्रोत्र आरत्या आणि मग रामनाम जप सुरु असे. गोंदावलेकर महाराजांची अनेक पद ते म्हणत असतं. आणि शेवटी महाराजांचं दैनंदीन प्रवचन वाचत असत. आधीच मालिशमुळे आलेली गुंगी आणि त्यात त्या दोघांचं असं गोड आवाजात गुणगुणत प्रार्थना म्हणण यामुळे मला ईतकी छान गुंगी येत असे की असं वाटायचं " जगी सर्व सुखी " फक्त आणि फक्त मीच आहे. ते दिवस कधी संपूच नये असे वाटे.

आज्जीला स्वयंपाकघरात काम करताना बघुन बघुन मी मल्टीटास्कींग कसं करायचं ते शिकले. सगळी कच्ची तयारी एकदम नीट करुन घ्यायची. उदा.पोहे नाष्टयाला आणि आमटी, भात, भाजी, कोशींबीर, आणि खीर असा स्वयंपाक असेल तर पोह्यासाठी आधी कांदा, टोमॅटो, चिरुन घ्यायचा. मिरच्या ,कढिपत्ता ,कोथींबीर ,खोबरं ,लिंबु सगळं नीट ताटात काढुन ठेवायचं. पोहे चाळणीत काढुन धुवुन घ्यायचे. तोवर एकीकडे कुकर लावण्यासाठी डाळ, भात, बटाटे असतील तर ते असं सगळं वेगवेगळ्या पातेल्यात काढुन पाण्याने घुवुन निथळुन घ्यायचं.एका गॅसवर कढई तापायला ठेवायची आणि एका गॅस वर कूकर चढवायचा. पोह्याची फोडणी करुन त्यात कांदा टोमॅटो घालुन परतुन होईपर्यंत जेवणात काकडी कोशींबीर करायची असेल तर काकडी कोचवुन/ खिसुन घ्यायची.तोवर पोह्यासाठीचे कांदा टोमॅटो परतुन झाले की धुवुन निथळलेले पोहे त्यात टाकुन हलवुन झाकण लावुन घ्यायचं. पोह्यांना वाफ येतेय तोवर कणीक मळुन झाकुन ठेवायची. हे होईतोवर कूकरच्या शिट्ट्या झाल्या की गॅस बंद.सगळ्यांना बशीत नाष्टा वाढुन दिला की पुढची कामे सुरु.एकीकडे भाजी साठी कढई तापवायला ठेवायची. तोवर एका पातेल्यात आमटीसाठी शिजलेली डाळ काढुन घेउन त्यात मीठ, तिखट, मसाला, चिंच, गुळ घालुन बारीक गॅस वर उकळायला ठेवायची. बटाट्याची सालं काढुन त्याच्या फोडी करुन घ्यायच्या. भाजीसाठी फोडणी करायच्या आधी आमटीसाठी फोडणी करुन ती फोडणी आमटीवर ओतुन घ्यायची. मग भाजीसाठी फोडंणी करुन त्यात बटाट्याच्या फोडी घालुन मीठ साखर घालुन ठेवायची. कोशींबीरीसाठी खिसलेल्या काकडीचं पाणी काढुन ते आमटीमद्धे घालुन टाकायचं आणि काकडीच्या खिसावर मीठ साखर दाणे कूट घालुन तयार ठेवायचं.आता राहिल्या पोळ्या आणि खीर.पोळ्यांसाठी तवा तापत ठेवायचा आणि दुसर्या गॅसवर दुध साखर मिसळुन तव्यात शेवया परतुन घेउन त्या दुधात घालुन ठेवायच्या.आता पोळ्या झाल्या की संपला सगळा स्वयंपाक. अगदी पापड वगैरे तळायचे असतील तर पानं घेता घेता जेवायच्या वेळी ती पापड कुरवड्या तळुन घ्यायची.तिचं ते काम बघत बसणं हा सुद्धा एक मस्त सोहळा असायचा माझ्यासाठी. आणि हे सगळं चालु असताना मुखाने अखंड देवाचं नाव.कांदा लसुण काहीही न घालता ईतका रुचकर स्वयंपाक व्हायचा ना तिचा.मी किती नशीबवान मला ईतकी सुगरण आणि निगुतीनं स्वयंपाक करणारी आज्जी लाभली आहे :-)

उसळी, भरली वांगी कींवा दोडका अशा वेळखाउ भाज्या करायची पण तिची एक स्वतंत्र पद्धत आहे. या भाज्या आधी फोडणीला टाकुन घ्यायच्या म्हणजे मटकी, मूग, चवळी हे सुद्धा आधी न शिजवता डायरेक्ट फोडणी करुन घ्यायची आणि जे काही मीठ गुळ मसाला सगळं हवं ते घालुन आणि जितका रस हवा तेवढ पाणी घालुन वरण भातासोबत कूकरला लावायचं.वेळ आणि गॅस दोन्हीची बचत.
साठवणीचे पदार्थ म्हणजे तर आज्जीची एकदम खासियत. म्हणजे रोजच्या स्वयंपाकात लागणारे पदार्थ सुद्धा फ्रिज मद्धे एकदम नीट ठेवलेले असतात. खोबर खोवुन घट्ट झाकणाच्या डब्यात, कोथिंबीर निवडुन पेपर मद्धे गुंडाळुन ठेवलेली असणार. मिरच्या देठ काढुन जाळीच्या डब्यात या बेसिक गोष्टी तर कायम असतातच. पण बरेच प्रकारच्या चटण्या लोणची कायम तयार. उडीद डाळ, चणा डाळ, भरपूर कढीपत्ता, चिंच, गुळ घालुन एक प्रकारची चटणी पूड नेहेमी असते तिच्याकडे. उसळी आमरट्या ई मद्धे एखादा चमचा घातला की आफलातुन चव आणि अपेक्षित दाटपणा येतो. एरवीपण नुसतं तोंडीलावण म्हणुन बेस्ट. मी कितीही प्रयत्न केला तरी तिच्यासारखं सेम प्रमाण घेउनसुद्धा मला अजुनही तशी चटणी बनवता येत नाही. कैरीच्या दिवसात कैरीच्या लोणच्याचे अनेक प्रकार ती करते. गुळांबा, साखरांबा, मेतकूट ईतक्या चवी अजुनही जिभेवर आहेत ना. आता या वयात सुद्धा उन्हाळ्यातली वाळवणं उडीद पापड, साबुदाण्याच्या पापड्या आवर्जुन करत असते ती.

आज्जीची आमटी या पदार्थाच्या उल्लेखाशिवाय हे लेखन अपूर्ण आहे.आज्जीची खासियत म्हणजे तिनं केलेली आमटी. उद्या जर कोणी मला अमृत आणि आज्जीची आमटी असे दोन पदार्थ आणून दिले तर मी आधी आमटीची निवड करेन. मला आठवतं लहान असताना दर शनिवारी संध्याकाळी आम्ही फिरत फिरत मारुतीच्या देवळात जायचो. तिथुन आजीचं घर अगदी जवळ होतं. त्यामुळे तिच्याकडे चक्कर नक्कीच व्हायची. आम्ही घरी गेलो की तिचं सुरु व्हायचं काय करु ? चहा पोहे करु की जेवुन जाताय.पाउस वगैरे असेल तर हमखास शिरा आणि भजी असा मेनु तिचा असायचाच. पण मी आणि माझी बहिण नेहेमी विचारायचो आमटी आहे का शिल्लक सकाळची. मग आम्ही आमटी भात खातो. नसेल तर ताबडतोप कूकर लावुन गरम गरम आमटी भात १५-२० मिनिटात बनवुन वाढायची आज्जी.गोंदवल्याला मंदिरात प्रसाद म्हणुन मिळणारा आमटी-भात किंवा सज्जनगड वर मिळणारा आमटी-भात यातल्या आमटीला जी अवीट गोडी असते तीच माझ्या आजीनं केलेल्या आमटीला आहे. अजुनही कधी कराड ला जायचं असेल तर सका़ळी पुण्यातुन निघताना मी आज्जीला फोन करते " जेवायला येते आहे. जास्त काही करु नकोस. पातेलभंर भात आणि आमटी तेवढी कर. मला तेवढच पुरे " :-)

वरणफळं ही अजुन एक तिची खासियत. तिची वरणफळं करायची पद्धत वेगळीच आहे. आमटीला कांदा, खोबरं, आलं, लसुण असं सगळं वाट्ण लावुन मस्त झणझणीत आमटी ती करते. कणीक भिजवताना त्यात गुळाचं पाणी घालते. ईतकी भारी चव येते ना त्या वरणफळांना की बस्स..अत्तासुद्धा लिहिताना पाणी सुटलं तोंडाला. पातळ पोह्याचा चिवडा, खोबरा वड्या, वेगवेगळे लाडु, धपाटी आणि दही, साधी खिचडी कढी किंवा पिठलं भाकरी. यादी खुप मोठी आहे तिच्या हातच्या स्पेशल पदार्थांची. साध्या पाण्यालाही फोडणी दिली ना तिने तरी ते पाणी सुद्धा चवदार लागेल. :-)


आज्जी खुप सुंदर शिवणकाम करायची आणि शिकवायची. गावातल्या आणि तिच्या शाळेतल्या बर्याच मुलींना तिनं शिवण शिकवलं.पण मी तिच्याकडुन का नाही शिकले बेसिक शिवण याची मला आज खुप चुट्पुट वाटते.माझ्या मुलीसाठी तिनं खुप सुरेख दुपटी बनवली होती. पॅचवर्क केलेलं पिंपळपान, स्वस्तिकाचं डीझाईन असलेलं दुपट अतिशय सफाईदार पणे बनवलं होतं.तिने बनवलेल्या दुपट्यांची उब माझ्या मुलीला मिळाली हे तिचं भाग्यच.


ज्यावेळी आपलं मन अतिशय संवेदनशील असतं, आजुबाजुचे सगळे चांगले वाईट गुण टिपून घेण्यासाठी तयार असतं, त्या वयात मला माझ्या आज्जीचा खुप सहवास मिळाला. तिच्या वागण्यातुन आणि कृतीतून तिनं आमच्यासमोर अतिशय उत्तम आदर्श ठेवला.आवर्जुन काही गोष्टी अगदी मागे लागुन शिकवण्याचा अट्टाहास तिनं कधीही केला नाही. संस्कार हे कधी असे ठरवुन करता येतच नाहीत. ते कृतीतुन कळले पाहिजेत. सुसुत्रपणे पसारा न करता व्यवस्थीत नियोजन करुन स्वयंपाक कसा करायचा हे तिनं कृतीतुन दाखवुन दिलं. घरी आलेल्या पाहुण्याला, ,मग तो कोणीही असो, कधी विन्मुख पाठवु नये हे तिनं मनावर ठसवलं. एखाद्याचा कितीही राग आला तरी संयम पाळायचा कारण समोरची व्यक्ती कधीही वाईट नसते तर परिस्थीती तसं वागायला भाग पाडते हे तिनं तिच्या वागण्यातुन दाखवुन दिलं. माझा आदर्श कोण असं जर मला कोणी विचारलं तर मी माझ्या आजीकडे बोट दाखवेन.

आज २६ ऑक्टोबर २०१५, कोजागिरी पौर्णिमा, माझ्या आजीचा वाढदिवस.....हा वरचा लेख मी कित्येक दिवस आधी लिहुन ठेवला होता..पण लेख संपवुन प्रकाशित करायला वेळंच मिळाला नाही...आजच्यापेक्षा अजुन चांगला मुहुर्त असुच शकत नाही हा लेख प्रकाशित करण्यासाठी....

प्रिय आज्जी, आज ही तुला तुझ्या वाढदिवशी माझ्याकडुन भेट...
तुला दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो हीच परमेश्वराला मनापासुन प्रार्थना....

- तुझीच नात,
सौ.स्मिता.