Friday, November 23, 2018

जाणता राजा


निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।।

नरपती, हयपती, गजपती,
गडपती, भूपती, जळपती।
पुरंदर आणि
शक्ति, पृष्ठभागी।।

यशवंत, कीर्तीवंत,
सामर्थ्यवंत वरदवंत।
पुण्यवंत, नीतीवंत
जाणता राजा।।

लहानपणापासून वेळोवेळी शाळेत इतिहासातून भेटत गेले महाराज.तेव्हा ते फक्त मार्कांपुरते माहिती होते. मग काही दिवसांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकातून खरी ओळख झाली. हे पुस्तक वाचताना अनेकदा मी रडले असेन. महाराज आणि त्यांना जीव लावणारे त्यांचे सहकारी जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहायचे.कोणत्या मातीची बनली असतील ही वेडी माणसं असं नेहेमी मनात यायचं.

महाराजांची ती माझ्या मनातली प्रतिमा जशीच्या तशी प्रत्यक्षात आणली श्री. शंतनू मोघे  यांच्या शिवरायांनी. "स्वराज्य रक्षक संभाजी" या झी च्या मालिकेत त्यांना शिवरायांच्या भूमिकेत बघून हेच ते महाराज जे मी पुस्तकात "पाहिले" होते असं झालं माझं. अत्यंत उत्तम संवाद त्यांनी अगदी जिवंत केले. राजा कसा असावा हा महाराज आणि शंभूराजे यांच्यातला संवाद अगदी आमचे खरे महाराज बोलत आहेत की काय असे वाटावे.

गेले आठवडा भर सगळा इतिहास अक्षरशः जगले मी. असं वाटत होतं की तिकडे रायगडावर मी होते कुठेतरी महाराज बरे होतील अशी आशा मनात ठेवुन. काल शिवपर्व संपताना बघणं अशक्य झालं. समोर जे चाललंय ते खरंच चालू आहे असं वाटत होतं. काहीतरी चमत्कार व्हावा आणि राजे बरे व्हावेत अशी मनात प्रार्थना चालू होती.डोळ्यातल्या अश्रूंना बांध घालणं खरच अशक्य होतं.

 350 वर्षे मागे जाऊन इतिहास बदलता आला असता तर ?

सीरिअल मद्धे इतकं गुंतण्याची पहिलीच वेळ असेल ही.
शंतनू मोघे, अमोल कोल्हे आणि संभाजी ची सगळी टीम, तुम्ही स्वतः पण सगळा इतिहास जगलात आणि आम्हाला पण त्याचा भाग होता आलं. खूप आभार तुम्हा सगळ्यांचे. __/\__
- स्मिता श्रीपाद