Saturday, March 13, 2021

चिकन सुके/मसाला + रस्सा




मी ही रेसिपी जशी शिकले तशी स्टेप बाय स्टेप देते आहे.

मला अशी करायला आणि सांगायला पण सोपे वाटतेय.
त्यामुळे त्या त्या स्टेप मध्ये साहित्य लिहिलेले आहे

क्रमवार पाककृती: 

चिकन मॅरीनेशन -
चिकन 1/2 kg छोटे तुकडे
आले लसूण पेस्ट 2 चमचे
हळद 1/2 चमचा
लाल तिखट एक चमचा
मीठ 1/2 चमचा

चिकन ला सर्व मसाला चोळून 1 तास मॅरीनेट करून ठेवावे.

चिकन रस्सा -
1 मध्यम कांदा बारीक चिरलेला
खडा मसाला ( 2-3 लवंगा, 4 काळीमिरी , 1 तुकडा दालचिनी, 1 चक्रफुल , शाहाजीरे, 1 तमालपत्र )
सुके खोबरे खिसून भाजून 1/2 वाटी
कांदा लसूण मसाला 1 ते 1.5 चमचा
संडे मसाला / चिकन मसाला 1 चमचा
तेल 2-3 चमचे
मीठ
तिखट गरजेनुसार (मॅरीनेट करताना आधी घातलं आहे हे लक्षात ठेवून)
गरम पाणी

पातेल्यात तेल तापवून खडा मसाला आणि कांदा परतावा.
त्यात मॅरीनेट केलेले चिकन घालून मोठ्या आचेवर 2 मिनिटे परतावे.
चिकन बुडेल आणि वर एक पेर राहील इतके गरम पाणी घालून बारीक गॅस वर चिकन शिजवायला ठेवावे.
20-25 मिनिटात चिकन शिजते.
गॅस बंद करून झाकण घालून 10-15 मिनिटे मुरायला ठेवावे.
आता चिकन चे तुकडे बाजूला काढून घ्यावेत. ( हे आपल्याला चिकन मसाला करताना वापरायचे आहेत )
एखादा बोनी पीस रस्स्यात तसाच राहुद्यावा.

आता हा रस्सा परत बारीक गॅस वर उकळायला ठेवावा. त्यात कांदा लसूण मसाला, चिकन मसाला आणि लागेल तसे मीठ घालावे.
यामध्ये भाजलेले खोबरे हाताने कुस्करून घालावे.

(खोबरे खमंग भाजून गार झाले की हाताने एकदम बारीक कुस्करता येते. मिक्सर ची गरज नाही. यामुळे रस्सा मध्ये इतर कोणतेही वाटण घालावे लागत नाही. )

व्यवस्थित उकळू द्यावे.
रस्सा तयार आहे.
वरून कोथिंबीर पेरावी ई ई ..

चिकन मसाला बनवता बनवता 1 वाटी भर रस्सा पिऊन घ्यावा. मसाला बनवायला अजून उत्साह येतो Wink

चिकन मसाला -
2 कांदे उभे चिरून
1 टोमॅटो
2 चमचे सुके खोबरे
5-6 लसूण पाकळ्या
1/2 इंच आले
कांदा लसूण मसाला 1-1.5 चमचा
संडे मसाला / चिकन मसाला 1 चमचा
हळद
धने जिरे पूड 1 चमचा
मीठ,तिखट चवी प्रमाणे
तेल पाव ते अर्धी वाटी

कांदा, खोबरे, टोमॅटो 1 चमचा तेलावर खमंग परतून घ्यावेत.त्यात आले लसूण घालून बारीक वाटण करून घ्यावे.
तेल तापवून त्यात वाटण घालावे.
त्यात मसाले आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
मसाल्याला तेल सुटले की शिजवलेले चिकन चे पिसेस त्यात घालावे. त्यात एक डाव तयार रस्सा घालून 2/3 मिनिटे परतावे.चिकन मसाला तयार आहे.

चिकन मसाला, रस्सा , गरम पोळी, आणि तूप घातलेला इंद्रायणी भात अशा छान मेनू वर ताव मारावा.

आमच्याकडे सगळ्यांना हा गरम गरम रस्सा प्यायला फार आवडते.
चिकन चा सगळा अर्क उतरलेला हा गरमागरम रस्सा आणि भात म्हणजे सुख..

वाढणी/प्रमाण: 
2 जणांसाठी

रेसिपी by माझी मुग्धा काकू

No comments:

Post a Comment