Saturday, October 1, 2022

गळाभेट

 दोन वर्षांनी वारी होतेय, देवाच्या ओढीने लाखो वारकऱ्यांचा समुदाय पंढरपूर कडे निघालाय.

दोन वर्षात खूप काही घडलंय. देवाला भेटायचंय, बरंच काही सांगायचंय, मन शांत करायचंय अशी सगळ्याच माऊलींची मनस्थिती असेल. तिकडे मंदिरात देवाची अवस्था काही वेगळी नसणार.

मंदिरात विठुरायाची अस्वस्थ लगबग रखुमाई बघतेय.माऊलींचा जयघोष करत आज सगळ्या दिंड्या, पालख्या पंढरपूर च्या वेशी ला पोचल्यात.

विठ्ठल आणि रखुमाई मध्ये काय संवाद होत असेल याक्षणी ? 

आज सकाळी माउलींनी हे लिहून घेतलं.

ते त्यांच्या चरणी अर्पण 🙏


पुंडलीक वरदा हरी विठ्ठल

श्री ज्ञानदेव तुकाराम

पंढरीनाथ महाराज की जय 


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


"काय हो विठुराया

गालातल्या गालात हसताय !

काय चाललंय मनात तुमच्या

आज मोठे खुशीत दिसताय !"


सगळं माहीत असूनही

रखुमाई देवाला म्हणाली,

स्वारीची जरा मजा करू

मनातल्या मनात हसली


काय सांगू रखुमाई तुला

आजचा दिवस आहे खास,

दोन वर्षांनी सुटणार आहे

आज माझ्या लेकरांचा उपवास 


वेशीवर आलेत म्हणे

दिंड्या आणि पालख्या घेऊन,

त्यांचं स्वागत कर बरका

गूळ आणि शेंगा देऊन


दोन वर्षे झाली गं

बाप लेकरांची भेट नाही,

मधली पोकळी भरून काढेन 

देतो बघ तुला ग्वाही


एवढ्या मोठ्या संकटा समोर

उभी राहिली धीराने

दमली असतील मंडळी आता,

शरीराने आणि मनाने


कोरोना राक्षसामुळे

घर दार कोलमडले,

डोळ्यामध्ये पाणी देऊन

सगे सोयरे सोडून गेले


संकटांवर मात करत

नव्या वाटा शोधत आहेत,

माझ्यावर भरोसा ठेवून

पुन्हा उभी राहत आहेत


एकदा गळाभेट झाली की

दिसू लागेल पुढची वाट,

नव्याने लढण्यासाठी

बळ येईल मनगटात


मी कधीचा आवरून बसलोय

तू पण तयार हो पटकन

दमून आलीत लेकरं माझी

त्यांचं करायचंय ना माहेरपण


मंदिराचा कळस बघून

कसे धावत सुटलेत थेट

मला तर असं झालंय

कधी एकदा होईल गळाभेट

कधी एकदा होईल गळाभेट


- स्मिता श्रीपाद

आषाढी एकादशी, 2022


#चैतन्यवारी #विठ्ठलविठ्ठल

गावाला वळसा

मे आणि जून महिन्यातले सगळे शनिवार रविवार एकदम happening आणि गडबडीचे गेले. प्रत्येक वीकेंड ला काही काही चालू च होतं.. 

काश्मीर ला जायच्या आधीच्या आठवड्यात ट्रिप ची तयारी, मग पुढचे 2 वीकेंड काश्मीर, त्यानंतर कराड भेट, सुट्टी संपत आली तशी उरलीसुरली get-togethers मग शाळेची तयारी एक ना दोन अनेक कारणं .. शेवटी शेवटी तर इतकं दमायला झालं की "जब वुई मेट" मधल्या गीत सारखं मी म्हणून टाकलं, "भगवानजी ये happening विकेन्ड्स बोहोत हो गए , अब बिलकुल बोरिंग बना दो जी आगे आने वाले विकेन्ड्स को" आणि काय आश्चर्य भगवानजी नी पण एकदम ऐकलंच आमचं.. 

जून चे शेवटचे दोन शनिवार रविवार 'तसे' शांततेत गेले. फार काही हेक्टिक नव्हतं. 

आणि जुलै चा पहिला वीकेंड उजाडला तसं चुकल्याचुकल्या सारखं वाटायला लागलं.🙄

काहीच म्हणजे काहीच प्लॅन कसा काय नाही बनला बुवा ? 

कायतरी चुकतंय असं मन म्हणायला लागलं.

त्यात आणि सोशल मीडिया वर पब्लिक ने " काय झाडी, काय डोंगार,काय हाटील.." करत पावसाळी सहलीचे फोटो टाकायला सुरू केले होते... 

टी व्ही बघायचा पण वैताग आला.. तिकडचं राजकारणचं गुर्हाळ काही संपेनाच.. सारख्याच ब्रेकिंग न्युज आणि भूकंप..

रविवारी शेवटी कंटाळून लेक म्हणाली, "आई चल की कुठंतरी फिरायला जाऊ.. लॉंग ड्राइव्ह ला जाऊन येऊ"

बासच... तूच ग ..तूच माझी लाडकी लेक..टुणकन उडी मारून उठलेच..

मी आशेने नवऱ्याकडे पाहिलं पण तो बिचारा 4 दिवसाच्या viral fever मधून आज कुठे जरा बरा दिसत होता. आणि नुकतंच रविवार चा भक्कम नाश्ता करून पेंगायला लागला होता. त्याची दया आली.. त्यामुळे त्याला जास्त कटकट केली नाही.. (किती चांगली बायको आहे बघा मी 😉)

पटकन आवरून आम्ही दोघी बाहेर पडलो.. काहीही न ठरवता पुण्यात फिरून येऊ असा प्लॅन होता.. मनू ला म्हणलं, चल तू भी क्या याद रखेगी.. तुला आज पुणे दाखवते 🤗🤗

संतोष हॉल वरून सरळ जात थेट सारसबागेच्या दिशेने निघालो. बाहेर रस्त्यावर उभे राहूनच बाप्पा ला नमस्कार घातला. लक्ष्मी रोड ला जाऊ आणि भटकू असं डोक्यात होतं म्हणून बाजीराव रोड वर गाडी घेतली.. आणि महापालिकेचा निळा बोर्ड दिसला.. "शनिवारवाडा"

युरेका झालं एकदम.. थेट शनिवार वाड्याच्या पार्किंग मध्ये जाऊनच थांबलो.

रविवार असल्यामुळे बरीच गर्दी होती. पुण्यात येऊन मला इतकी वर्षे झाली पण शनिवार वाडा कधीच आतून पाहिला नव्हता. पूर्वी गुडीपाडवा ते रामनवमी दरम्यान दगडूशेठ गणपती महोत्सव शनिवारवाड्यासमोरच्या प्रांगणात होत असे.तेव्हा 9 दिवस न चुकता आम्ही हजेरी लावायचो. श्रीधर फडके, अरुण दाते, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांचे कार्यक्रम तिथे पाहिले आहेत. पण वाडा आतून कसा आहे हे कधी पाहिलेच नव्हते. तिथे पोचल्यावर त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि थोडं नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. 😊

उन्हाळ्याच्या सुरुवातीचे दिवस, संध्याकाळी थंडगार वारं सुटलेलं असायचं, आजूबाजूला रसिक गर्दी असायची , मोगऱ्याचा वास सुटलेला असायचा आणि समोर शनिवार वाड्याच्या साक्षीने मोठे मोठे कलाकार कला सादर करायचे. आम्ही चक्क छोटी डायरी आणि पेन घेऊन जायचो तिथे.. एखादी नवीन आवडलेली कविता, गाण्याचे शब्द लगेच उतरवून घ्यायचो. शेवटच्या दिवशी पंडितजींची मैफल "भावसरगम" म्हणजे कळसाध्याय. आहाहा.. किती सुंदर दिवस होते ते.. 😍

आजूबाजूच्या गर्दीने परत वर्तमानात आणलं.

फक्त 25 रुपये तिकीट (परदेशी लोकांना 300 रुपये फक्त 🤔) काढून आत शिरलो. शनिवारवाड्याचे सुंदर भव्य प्रांगण, उत्तम राखलेले लॉन, जागोजागी माहितीफलक असं चित्र समोर आलं. आत भरपूर मोठं आवार, वाड्याचं मूळ दगडी जोतं आहे. 9 बुरुज आणि 5 दरवाजे असलेली भक्कम दगडी तटबंदी आहे. मूळ वाडा जळून गेला तरी अजूनही जे शिल्लक आहे तेसुद्धा सुंदरच आहे. 

भन्साळी कृपेने मुलांना श्रीमंत बाजीराव पेशवे, महाराणी काशीबाई आणि मस्तानीबाई माहिती आहेत पण बाकी नावे तिकडे गेल्यावर लेकीला कळली, "काका मला वाचवा" ची गोष्ट उत्सुकतेने ऐकली. प्रत्येक महालाचे अवशेष बघून खरा महाल कसा असेल त्याची कल्पना करून झाली. महालाच्या आत 2-3 फूट खोल चौकोनी दगडी बांधीव असे खड्डे बघून याचं काय प्रयोजन असेल अशी चर्चा करून झाली.नहाणीघरासारखी दगडांनी बांधीव अशी ती जागा बघून, अगं बहुतेक ही त्यांची बाथरूम असेल असं मी बोलून गेले तर "अंघोळीला रोज अशी खड्ड्यात उडी मारेल का कोणी?" असं म्हणून भरपूर हसून झालं.एकंदर लेक खूप खुश झाली. प्रत्येक खड्ड्यात उतरून चढून झालं. तटबंदीवरुन चालत चालत मुख्य बुरुज आणि इमारतीच्या वरच्या मजल्यावर गेलो. तिथून भव्य पसरलेलं प्रांगण दिसत होतं. ऐन भरात असताना ची पेशवाई ची श्रीमंती काय असेल असं वाटून गेलं.

माझ्या मते खरा शनिवार वाडा हा अजून जास्त पसरलेला असणार आहे कारण सदाशिवराव भाऊंचा महाल म्हणून जेमतेम 15 x 25 ची जागा असूच शकत नाही. पण असुदेत. जे गेलं ते गेलं.. जे उरलं आहे ते छान जपलं आहे पालिकेने. ही जागा एखाद्या माहितगार इतिहासतज्ञ व्यक्तीसोबत परत बघायला मला फार आवडेल. 

या वाड्याने किती आनंद आणि दुःखाचे प्रसंग सहन केले असतील. किती घाव सोसले असतील. जुनी जाणती माणसं गेली आणि आता वाडा एकटा पडला.

वाड्याच्या प्रांगणात "भावसरगम" कार्यक्रम करताना जेव्हा हृदयनाथ मंगेशकर "दयाघना.." किंवा "घर थकलेले संन्यासी.." म्हणत असतील तेव्हा हा वाडा रडत असेल का ? 

या कवितांचे/गाण्यांचे अर्थ तेव्हा कळत नव्हते तेच बरं होतं नाहीतर वाड्याच्या समोर ही गाणी ऐकवली नसती मला.

चालून चालून पाय थकल्यावर बाहेर पडलो. अजून फिरायचा उत्साह आहे का विचारलं तर पोरगी हो म्हणाली.. तिकडून बाहेर पडून सरळ जंगली महाराज मठासमोर गाडी नेली. दुपारच्या शांत वेळी दर्शन घेऊन तिकडून थेट पाताळेश्वर लेणी गाठली. शंकराचं दर्शन घेऊन दगडी सभामंडपात थोडावेळ शांत बसलो. त्रिपुरी पौर्णिमेच्या वेळी इथे परत यायचं ठरवलं आम्ही. आता भूक आणि कंटाळा सगळंच जाणवायला लागलं. 

समोरच पुण्यातलं आणखी एक आद्य प्राचीन ठिकाण दिसलं आणि "हॉटेल पांचाली" मध्ये पोचलो.😄 पोटपूजा करून घर गाठलं.

लॉंग ड्राइव्ह साठी मुळशी, लोणावळा किंवा खडकवासला सोडून आपल्या पुण्यात अजून खूप गोष्टी आहेत हे इतक्या दिवसात का बरं लक्षात आलं नाही आपल्या असं घरी आल्यावर वाटून गेलं. 

असुदेत.. देर आए दुरुस्त आए... 😄

अशा रीतीने एक रविवार सार्थकी लागला 🥰

- स्मिता श्रीपाद