Saturday, October 1, 2022

गळाभेट

 दोन वर्षांनी वारी होतेय, देवाच्या ओढीने लाखो वारकऱ्यांचा समुदाय पंढरपूर कडे निघालाय.

दोन वर्षात खूप काही घडलंय. देवाला भेटायचंय, बरंच काही सांगायचंय, मन शांत करायचंय अशी सगळ्याच माऊलींची मनस्थिती असेल. तिकडे मंदिरात देवाची अवस्था काही वेगळी नसणार.

मंदिरात विठुरायाची अस्वस्थ लगबग रखुमाई बघतेय.माऊलींचा जयघोष करत आज सगळ्या दिंड्या, पालख्या पंढरपूर च्या वेशी ला पोचल्यात.

विठ्ठल आणि रखुमाई मध्ये काय संवाद होत असेल याक्षणी ? 

आज सकाळी माउलींनी हे लिहून घेतलं.

ते त्यांच्या चरणी अर्पण 🙏


पुंडलीक वरदा हरी विठ्ठल

श्री ज्ञानदेव तुकाराम

पंढरीनाथ महाराज की जय 


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


"काय हो विठुराया

गालातल्या गालात हसताय !

काय चाललंय मनात तुमच्या

आज मोठे खुशीत दिसताय !"


सगळं माहीत असूनही

रखुमाई देवाला म्हणाली,

स्वारीची जरा मजा करू

मनातल्या मनात हसली


काय सांगू रखुमाई तुला

आजचा दिवस आहे खास,

दोन वर्षांनी सुटणार आहे

आज माझ्या लेकरांचा उपवास 


वेशीवर आलेत म्हणे

दिंड्या आणि पालख्या घेऊन,

त्यांचं स्वागत कर बरका

गूळ आणि शेंगा देऊन


दोन वर्षे झाली गं

बाप लेकरांची भेट नाही,

मधली पोकळी भरून काढेन 

देतो बघ तुला ग्वाही


एवढ्या मोठ्या संकटा समोर

उभी राहिली धीराने

दमली असतील मंडळी आता,

शरीराने आणि मनाने


कोरोना राक्षसामुळे

घर दार कोलमडले,

डोळ्यामध्ये पाणी देऊन

सगे सोयरे सोडून गेले


संकटांवर मात करत

नव्या वाटा शोधत आहेत,

माझ्यावर भरोसा ठेवून

पुन्हा उभी राहत आहेत


एकदा गळाभेट झाली की

दिसू लागेल पुढची वाट,

नव्याने लढण्यासाठी

बळ येईल मनगटात


मी कधीचा आवरून बसलोय

तू पण तयार हो पटकन

दमून आलीत लेकरं माझी

त्यांचं करायचंय ना माहेरपण


मंदिराचा कळस बघून

कसे धावत सुटलेत थेट

मला तर असं झालंय

कधी एकदा होईल गळाभेट

कधी एकदा होईल गळाभेट


- स्मिता श्रीपाद

आषाढी एकादशी, 2022


#चैतन्यवारी #विठ्ठलविठ्ठल

No comments:

Post a Comment