*वाड्यातली आज्जी*
माझ्या लहानपणी दोन्ही आज्ज्या एकाच गावात राहत असल्याने त्यांना अमुक गावाची आज्जी असं संबोधता यायचं नाही. मग त्यांना आम्ही खास नावे ठेवली होती. आईची आई म्हणजे जिथे मामा असतो ती "मामाची आज्जी" आणि बाबांचे आई बाबा एका वाड्यात राहायचे म्हणून ती "वाड्यातली आज्जी"
माझ्या दोन्ही आज्ज्या म्हणजे दोन टोकं. मामाची आज्जी म्हणजे अती निगुतीनं वागणारी, कलाकार, शिस्तीची आणि दुसरी मस्तमौला, बऱ्यापैकी बेशिस्त पण निर्मळ मनाची अशी माझी वाड्यातली आज्जी. आमच्यावर संस्कार बिंस्कार करायचं कंत्राट आईच्या आई म्हणजे माझ्या मामाच्या आजीकडे होतं आणि आयुष्य मस्त भरभरून कसं जगायचं याचे धडे द्यायचे तितकेच महत्वाचे काम माझ्या वाड्यातल्या आज्जीने म्हणजे द्वारका आज्जी ने केले आणि अजूनही करते आहे.
आईची आई म्हणजे माझ्या विजू आज्जीबद्दल मी आजवर बरेच लेख लिहिले. आजचं हे पुष्प माझ्या दुसऱ्या आज्जीसाठी..वाड्यातली आज्जी उर्फ द्वारका...
नाव जरी द्वारका असलं तरी घरी सोन्याच्या विटा वगैरे नक्कीच नव्हत्या, आईच्या भाषेत, 'लग्न होऊन मी घरात आले तेव्हा तीन गोरी पोरं आणि चार काळी भांडी असा आजीचा संसार होता' पण सतत हसरा चेहेरा, तोंडात खडीसाखर अशी वृत्ती.कढईभर तर्री येणारी वांग्याची भाजी आणि चार भाकरी थापल्या की आजीबाई वाड्यात येणार जाणार्यांशी गप्पा मारायला मोकळ्या.गल्लीतल्या बायका गोळा करून गप्पा मारणे हा आवडता छंद, अगदी आजूबाजूचे व्यापारी असोत की रस्ता झाडायला येणारे स्वच्छता कर्मचारी असोत सगळ्यांची येताजाता विचारपूस करणार. आमच्या गल्लीत राहणाऱ्या नगरसेवकांशी पण ओळख. फलटण मधून कराड ला शिफ्ट झालो तेव्हा कराड मधल्या चांगल्या समजल्या जाणाऱ्या शाळेत म्हणजेच नूतन मराठी शाळेत माझी ऍडमिशन होऊ शकत नव्हती पण आज्जीनंच या नगरसेवकांच्या ओळखीतून ही ऍडमिशन करून दिली होती असं आई सांगायची. "घे रे माझ्या नातीला शाळेत, चांगली हुशार आहे" अशी गोड मखलाशी तिनं नक्की केली असणार याची मला खात्रीच आहे
आजीमुळे हि शाळा आणि या शाळेमुळे आयुष्यभरासाठी मला फार गोड मैत्रिणी मिळाल्या.

आजी म्हणे पूर्वी लहान मुलांच्या शिकवण्या घ्यायची, शिकवायचा कंटाळा आला कि लाईट्स बंद करून "लाईट गेले आता घरी जावा" असं मुलांना सांगायची. आज्जी गोष्ट सांग म्हणालं कि ही तिची अतिशय आवडती गंमत आम्हाला गोष्टीरुपात सांगायची आणि स्वतः च हसायची.
दिवाळीला किंवा रविवारी सुट्टीदिवशी तिच्याकडे राहायला गेलं की अगदी झोप येईपर्यंत अंग चोळचोळून तेल लावणे आणि कडकडीत गरम पाण्याने ( खास बंबातलं गरम पाणी ) आम्हाला शिकाकाईची अंघोळ घालायला तिला फार आवडायचं. आणि मग गरम गरम भात आणि कांद्याच्या फोडणीची आमटी खायला घालून झोपा झोपा म्हणून दामटवून झोपवायची.
वाडा सोडल्यावर पुढे दोन घरं आजीने बदलली. उत्तरालक्ष्मी च्या देवळात राहायला गेली तेव्हा तिथे दर रविवारी बालोपासनेला जायला लावायची.आम्ही आळस केला कि फार काहीतरी इंटरेस्टिंग प्रसाद आहे अशी आम्हाला फूस लावून का होईना जायला लावायची. बालोपासना केली कि परीक्षेत 100% मार्क मिळतात असा युक्तिवाद असायचा

अभिलाषा च्या वेळी आत्याची डिलिव्हरी झाली तेव्हा आजीच्या हाताखाली मी होते. अभि मे महिन्यातली त्यामुळे लवकरच जून चा पाऊस सुरु झाला. पावसात ती शेकशेगडी, गुटी असं सगळं वातावरण अजूनही आठवतं. आत्यासाठी केलेली खीर किंवा वरण भात तिला तिच्या खोलीत देऊन येणे अशी माझी कामं असायची. मला अजूनही ते वातावरण आणि हिरवी खणाची कुंची आणि डोळाभर काजळ घातलेली अभी आठवते 



उत्तरालक्ष्मी च्या गल्लीत उन्हाळी सुट्टीत वाचलेली पुस्तकं, आजीने केलेली चिंच गुळाची वरणफळं, पनवेल हुन काकू आणि छोटी मनू यायची तेव्हाची मजा अजूनही आठवते. एकदा आजी स्टो वर वरणफळं करत होती, जुन्या लोखंडी कॉट च्या पायाशी स्टो होता आणि त्यावर आमटी उकळत होती. मी कॉटवर पालथी पडून पुस्तक वाचत, उकळत्या आमटीच्या वासाचा आनंद घेत लोळत होते. अचानक काही कारणाने उठायला गेले आणि माझ्या पायाशी असलेल्या उकळत्या आमटीच्या पातेल्यात पाय जाऊन पूर्ण पातेलं लवंडलं. पाऊल जोरदार भाजलं. त्यानंतर ची आजीची धावपळ आणि तगमग अजूनही आठवते.

पुढे आजी आजोबाना त्यांच्या हक्काच्या घरात राहायला मिळालं. माझ्या 10 वी /12 वी च्या अभ्यासात आज्जीने फार मोलाची भूमिका बजावली. पहाटे उठून अभ्यास करायचा असेल तर आज्जीचे घर गाठणे हा सगळ्यात बेस्ट मार्ग होता. "आज्जी मला उद्या 5 ला उठव हा" असं म्हणून झोपलं कि आज्जी पहाटे 4 पासूनच हाका मारायला सुरु करायची
. मग उठवून चहा बिस्कीट, थोड्या वेळाने फळं, मग 8-8:30 ला पोहे असं सगळं जागेवर पोचायचं. दुपार असली तर सरबतं, आजोबांना सांगून दिवेकरचा वडा आणणे असे लाड असायचे. माझ्या मार्कांमध्ये आज्जीचा फार मोठा वाटा आहे.

आजीचं स्वयंपाकघर हि माझ्या स्वयंपाकाची प्रयोगशाळा होती. तिथं मला सगळे नवे प्रयोग करायला परवानगी होती आणि हाताखाली आजी आजोबा दोघे
. बाबा चिपळूण ला असताना बरेचदा शनी रवी सुट्ट्या आल्या कि आई आणि श्वेतु दोघीच तिकडे जायच्या आणि मग माझा मुक्काम आज्जीकडे. तेव्हा आजोबाना डोसा, पावभाजी, मिसळ, सँडविच असे पदार्थ करून घालणे मी करायचे. सगळी छान पूर्वतयारी आजोबा करून द्यायचे आणि मागची आवराआवर आज्जी करायची. कौतुक तेवढं माझ्या वाट्याला 


मी बारावीत असताना आजोबा गेले तेव्हा मी पहिल्यांदा आजीला रडताना पाहिलं.माझा बारावीचा निकाल लागला तेव्हा आजोबांच्या आठवणीनं आम्ही दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडलो होतो. आजोबा फार खुश झाले असते तुझे मार्क बघून असं ती सारखी म्हणत होती.
आम्हा नातींचं शिक्षण तिला अत्यंत महत्वाचं होतं आणि अजूनही आम्ही सगळ्याजणी छान शिकून आपल्या पायांवर उभ्या आहोत याचा तिला फार आनंद आणि अभिमान आहे. "हरितालिका म्हणून उपास बिपास करत बसू नका, त्यापेक्षा अभ्यास करा मग चांगला नवरा तुम्हाला शोधत येईल" इयत्ता 4 थी शिकलेल्या माझ्या आज्जीनं त्यावेळी दिलेलं हे ज्ञान. व्रत वैकल्याचा फार उदो उदो किंवा अति सोवळं वगैरे तिच्या घरात कधीच नव्हता. कलावती आई आणि कृष्ण हि तिची दोन दैवतं.तिचं अध्यात्म सोपं सुटसुटीत होतं आणि अजूनही आहे.
कलावती आईचं चरित्र, त्यांची सगळी पुस्तकं तिनं आवर्जून मला वाचायला आणून दिलेली आठवतात.
आजीने कधीच कुठल्या नियमात किंवा चौकटीत स्वतः ला बांधून घेतलं नाही. कुठल्याही गोष्टीचा अट्टाहास नाही. खाणे पिणे आणि मस्त मजेत राहणे हा एकच मंत्र. आपल्या घरी आलेला मनुष्य हा अगदी दुष्काळातूनच आलाय असं गृहीत धरून त्याला जमेल तेवढं खाण्या पिण्याचा आग्रह करणे हा अतिशय आवडता छंद. खाण्याचा इतका आग्रह करायचा कि आम्ही नाती कधीमधी वैतागतो. आजीचा एक खास शब्दकोश आहे. पुलावा, फरसाणा, किचडी असे शब्द ती बोलायला लागली कि माझी चुलत बहीण मनू आधी वैतागते आणि मग हसायला लागते.
आपला एखादा मुद्दा समोरच्याला पटवून द्यायचा असेल तर "घाटावर अमुक अमुक माणूस असं असं म्हणत होता" असं म्हणत दुसऱ्याच्या नावावर बिल फाडणे हि एक मजेशीर युक्ती ती नेहेमी वापरते.
काहीतर गमती जमती करत दुसऱ्याला हसवणं तिला फार छान जमत आणि आवडतं. तिच्या भोळेपणामुळे कधी कधी प्रासंगिक विनोदही घडतात.
कराडचे कोणीतरी एक व्यक्ती देवाघरी गेले तेव्हा तिला सांगितलं. आज्जी म्हणाली "अइ अइ, गेले का ? फार म्हातारे झाले होते गं" "आज्जी तुझ्यापेक्षा तरुणचं होते. तू 90 वर्षांची आहेस
”

" अग्गोबाई, 90 ?" असं म्हणत स्वतः च खो खो हसत सुटली.
एका स्थळाबद्दल सांगताना आज्जी चं वाक्य होतं, "मुलगा चांगला आहे गं, दिवसभर घरीच असतो" आणि मग एक मोठा पॉज घेऊन "ते तुमचं आयटी का फायटी मध्ये आहे, घरातूनच काम करतो" अगं मग घरीच असतो काय ? चांगलं कमावतो म्हण कि. ते स्थळ रागावेल तुझ्यावर 

आम्हा नातवंडांच्या बरोबरीने तिच्या सगळ्या परतवंडांवर पण फार माया करते अजूनही. आमची पोरं नशीबवान आहेत कारण त्यांना अशी मस्त उत्साही पणजी मिळाली.
गेल्या महिन्यात माझ्याकडे 2/3 दिवस राहायला आली होती. रोज खाली जाऊन सोसायटीला 3-4 चकरा मारून आल्यागेल्यांशी ओळख काढून गप्पा मारून यायची. तुझ्या हातची (किचडी ) खिचडी मला आवडते तेवढी कर असं म्हणून मला फर्माईश सांगून झाली. गरम खिचडी खाताना "इतकी सुंदर खिचडी मी आयुष्यात कधी खाल्ली नाही" असं पोटभरून कौतुक केलं तेव्हा माझे डोळेच भरून आले.
वयाच्या 15-16 व्या वर्षी लग्न होऊन अत्यंत गरिबीतही आनंदाने दिवस काढून इथवर आलेली माझी आजी, आयुष्यात आलेली वेगवेगळी संकटं बघूनही खचली नाही, हरली नाही, स्वतः च्या दुःखाची काही आठवण किंवा रडगाणं नाही.अजूनही रोजचा दिवस उत्साहात घालवते, फिरायला जाते, नवीन कपडे मिळाले कि लहान मुलीच्या आनंदात ते घालून मिरवते, वाढदिवसाला केक कापणार आहे असं फोनवर उत्साहाने सांगते.तिचा हा उत्साह असाच अखंड राहो. तिला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळो अशी कलावती आईंच्या चरणी प्रार्थना.
प्रिय आजी,
आज तुझा 92 वा वाढदिवस. तू आम्हाला आयुष्याचा आनंद घ्यायला शिकवलास, स्वतः वर प्रेम करायला शिकवलंस आणि दुसर्यांना हसवायला शिकवलंस. अशीच कायम आनंदी राहा 

जीवेत शरद: शतम
-
स्मिता श्रीपाद

9 सप्टेंबर 2025