"मनू, मराठीच्या पेपर चा अभ्यास झाला का ? "
"हो, झाला. एक धडा आणि एक कविता आहे. धड्याच्या नोट्स मी आधीच काढल्यात आणि अगं 'आपलीच कविता' आहे.
"मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी.."
"हो का ? "
"ती तर मला लहानपणापासूनच पाठ आहे "
मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी
माझे नि तुझे व्हायचे हे सूर कसे संवादी
अंदमान च्या तुरुंगात असताना सावरकरांना लेखन करण्यासाठी तुरुंगाच्या दगडी भिंतीने कशी मदत केली असेल अशी कल्पना करून लिहिलेली ही कविता, मी आणि माझी बहीण खूप लहान असल्यापासून आई झोपताना आम्हाला म्हणून दाखवायची.
अगदी सातवी आठवीत असेपर्यंत आम्हा दोघीना झोपताना आई खूप कविता आणि गाणी म्हणून दाखवायची.
"रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा"
असं गाताना हिरवीगार गवताची कुरणं आणि त्यावर डोलणारी चिमुकली फुलं दिसायची डोळ्यासमोर
"ऐलतटावर पैलतटावर हिरवाई घेऊनि
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुनी"
या कवितेत शेवटी
"पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबरं"
असं म्हणालं कि मला डोळ्यासमोर एक पांढरी दाढी असलेला म्हातारा औदुंबर बाबा दिसायचा. तो दिवसभर त्या छोट्याश्या गावातून, शेतांमधून, पायवाटांवरून फिरत फिरत पाण्याशी पोचलाय आणि मस्त पाण्यात पाय टाकून पाणी उडवत बसलाय असं काहीसं चित्र दिसायचं.
पुढे एकदा औदुंबर ला गेल्यावर तिथली नदी, नदीच्या दोन्ही बाजूला असलेली गर्द हिरवाई, नदीतल्या छोट्या होड्या, त्यात बसून नदीच्या पलीकडे देवीच्या दर्शनासाठी आई आजीसोबत जाताना ती कविता समोर प्रकट झाली.
"लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी ना शोधूनि दुसऱ्या लाख"
हे आईचं फार आवडतं गाणं. मला कधी कधी ते ऐकायला नको वाटायचं कारण,
"कुणी गेली होती गाय तुडवुनी तिजला
पाहुनि दशा ती रडूच आले मजला"
अशा ओळी ऐकताना घशात दुखायला लागायचं उगीचच.
पण मग कवितेतली मुलगी ती फाटकी मळकी बाहुली घरी घेऊन यायची तेव्हा बरं वाटायचं.
"मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान
केसांच्या झिपऱ्या रंगही गेला उडूनं
पण आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी"
असा त्याचा शेवट ऐकून त्या मुलीबद्दल प्रेम,आदर वाटायचा.
"या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार
नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार"
"दीपका मांडिले तुला सोनीयाचे ताट
जडविला घडविला चंदनाचा पाट"
"राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या"
"गाई पाण्यावर काय म्हणूनि आल्या"
"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे"
अशा अनेक सुरेख कविता आणि गाणी ऐकून ऐकून आपोआप तोंडपाठ झाली होती. त्यावेळी त्याचे अर्थ नीटसे कळले नव्हते.
इयत्ता पाचवी ते दहावी दरवर्षी जून महिन्यात नवीन पुस्तकं आणली की आई बालभारतीचं पुस्तक हातात घेऊन बसायची. त्यातल्या सगळ्या कविता आणि धडे वाचून काढायची. आवडलेल्या कविता 'किती सुंदर कविता आहे ऐक' असं म्हणत मोठ्यांदा वाचायची.
एके वर्षी असंच शांता शेळकेंची पैठणी कविता आईनं आम्हाला वाचून दाखवली आणि त्यातलं शेवटचं कडवं वाचताना तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं.
"अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले"
आईच्या आजीचं म्हणजे माझ्या पणजीचं नुकतंच निधन झालं होतं त्यावर्षी. तिच्या आठवणीने आई हळवी झाली होती.आईचं हे कविताप्रेम हळूहळू नकळत माझ्यात झिरपत गेलं.
पुढे मग कॉलेज, लग्न, संसार या धावपळीत नवीन कविता सापडल्या आणि त्या बालपणीच्या कविता जरा मागे पडल्या. तरी अधूनमधून कुठल्यातरी मासिकात आलेली किंवा नंतर whatsapp वर आलेली सुरेख कविता आई पाठवत राहिली.
पुढे मला बाळ झाल्यावर परत एकदा आईच्या कवितांना श्रोता मिळाला
. मधुजा अगदी लहान असल्यापासून तिला मांडीवर झुलवताना आईच्या कविता सुरु झाल्या आणि त्याचबरोबर माझी उजळणी.आता सगळ्या कवितांचे अर्थ नव्याने कळायला लागले.

"मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहुनही लहान रे
तुझ्यासंगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे
तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुजला सांगाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुजला शिकवाव्या"
असं माझ्या 3-4 महिन्यांच्या बाळाला थोपटताना तल्लीन होऊन आई गायची तेव्हा त्या चित्राची दृष्ट काढून ठेवावी असं वाटायचं.
"गा रे राघू गा गं मैने बाळाच्या या ओळी
मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी
गुणी माझा बाळ कसा मटा मटा जेवी
आयुष्याने थोर कर माये कुलदेवी"
असं तिनं म्हटलं कि माझ्या डोळ्यात टचकन पाणी यायचं.
"पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या"
या कवितेतलं वर्णन ऐकलं की हे अगदी आईच्याच घराचं वर्णन वाटायचं.
झोपताना गाणी ऐकायची सवय लेकीला पटकन जडली आणि पुढे मीसुद्धा हि पद्धत चालू ठेवली. मनू लहान असताना तिचे एका एका गाण्यांचे दिवस असायचे. त्या दिवशी एकच गाणं लूप मध्ये परत परत गायचं. 'रंगरंगुल्या सानसानुल्या' हि कविता एके दिवशी तरी मी तब्बल 15-20 वेळा गायली होती
. नंतर नंतर झोपेमुळे शब्द गडबडायला लागले तरी कन्या जागीच 


हळूहळू ती मोठी व्हायला लागल्यावर "कवितेतला अमुक एक शब्द म्हणजे काय ?" असे प्रश्न पडायला लागले.
मग समजेल तसा अर्थ सांगायचं प्रयत्न केला.
आज सकाळी जेव्हा तिनं "आपलीच कविता" असा उल्लेख केला तेव्हा मनापासून आनंद झाला मला. आणि मग ती कविता म्हणता म्हणता आईच्या आठवणी दाटून आल्या.आई कितीतरी रुपाने आमच्यात आत आत खोलवर अशी रुजली आहे ते जाणवलं. हि "आपलीच कविता" अशीच पुढे पुढे पोचत राहील याची खात्री आहे.
आज आईचा वाढदिवस, तिची आठवण सदैव मनात असतेच पण आजच्या दिवसाच्या निमित्ताने या कवितांच्या आणि अंगाईच्या आठवणी जागवाव्याशा वाटल्या.
प्रिय आई, जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 



-तुझीच ताई
27 मार्च 2025
No comments:
Post a Comment