Tuesday, February 17, 2009

चौघीजणी : मुग्ध शैशवातली कोवळी सुखदु:खे ....एक साधे,सरळ,मनाला भिडणारे पुस्तक

पुस्तकाचं पहिलं पान उघडलं की आपण त्या दुनियेत हरवुन जातो....मेग,ज्यो,बेथ आणि ऍमि या चौघी बहिणी,त्यांचा मित्र लॉरी हे सगळे आपल्या जीवनाचा भाग वाटु लागतात..त्यांचं बालपण,त्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडणार्‍या घटना,या सगळ्यात आपण हरवुन जातो....
माझे शालेय जीवन समॄद्ध करणार्‍या काही पुस्तकांपैकी चौघीजणी या पुस्तकाचा पहिला क्रमांक लागतो...लुईसा मे अल्कॉट या लेखिकेच्या "लिटिल वुमेन" आणि "गुड वाईफस" या दोन पुस्तकांचा "चौघीजणी " हा अनुवाद,प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यानी केलेला हा अनुवाद अतिशय सुंदर आहे.
अमेरिकेत राहणार्‍या मार्च कुटुंबातल्या चार बहिणी आणि त्यांचे परोपकारी आई वडील,त्यांचा शेजारी आणि मित्रा लॉरी आणि त्याचे आजोबा,या सर्वांच्या भोवती हे कथानक गुन्तलेले आहे...मार्च बहिणींचे वडिल सैनिक आहेत आणि ते युद्धावर गेले आहेत.मिसेस मार्च या सैनिकांसाठी चालवल्या जाणार्‍या ईस्पितळात काम करतात.एकेकाळी अतिशय श्रीमंती अनुभवलेल्या या घराची सध्याची परिस्थिती फारशी चांगली नाही...त्यामुळे मोठ्या दोघी बहिणी (वय वर्षे १६ आणि १५) पण नोकरी करुन घराला हतभार लावत आहेत..पण अशा परिस्थितीत सुद्धा त्या अतिशय आनंदात आहेत..
या चौघींच्या आयुष्यात लॉरी हा शेजारी राहाणारा मित्र येतो..लॉरी त्याच्या अतिशय गर्भश्रीमंत अशा आजोबांजवळ राहातोय..त्याचे आई वडील देवाघरी गेलेत...आणि त्याचे आजोबा त्याच्या वर जरी निरतिशय प्रेम करीत असले तरी हे प्रेम ते व्यक्त करु शकत नहियेत...हे प्रेम त्याला या चार बहिणी आणि मिसेस मार्च च्या रुपाने मिळतं...
प्रत्येक व्यक्तिरेखेचे अतिशय चपखल शब्दात वर्णन केल्यामुळे त्या सगळ्या आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात...सुरेख देखणी खानदानी सौदर्य लाभलेली आणि मॄदु स्वभावाची मेग,काहिशी दांडगट आक्रमक आणि आपल्या बहिणींवर अतोनात प्रेम करणारी ज्यो,परोपकारी आणि लाजळू बेथ,बालिश असुनही मोठेपणाचा आव आणणारी छोटीशी गोडुली ऍमी,राजबिंडा दिलखुलास आणि या चारी मैत्रिणींवर जीव टाकणारा लॉरी....हे सगळे आपल्या आसपास वावरत आहेत असं आपल्याला वाटायला लागतं....
या सगळ्या लोकांच्या आयुष्यात घडणार्‍या छोट्या छोट्या घटना,बालपणातुन तारुण्यात जाताना घडणारी स्थित्यंतरे..अशी साधी सरळ अशी ही कथा...प्रसंगी हसवणारी,प्रसंगी रडवणारी आणि अनेकदा अंर्तमुख होउन विचार करायला लावणारी....कसलिही भाषणबाजी न करता अनेक गोष्टी शिकवणारी कथा शांताबाईंनी फार छान फुलविली आहे...बरेचदा तर ही कथा अनुवादित वाटतच नाही (अमेरिकन नावे सोडली तर)....इतकी ती आपल्यातली वाटते....
यातले अनेक प्रसंग आपल्यावर नकळत संस्कार करत जातात...आपला नाताळच्या दिवशीचा नाश्ता ह्युमेल्स कुटुम्बाला देउन स्वतं: दुध-पाव ची न्याहरी आनंदने करणार्‍या मार्च मुली,ऍमि वरचा राग विसरुन तिच्या आजारपणात रात्रंदिवस जागणारी ज्यो,मैत्रिणीच्या घरी रहायला गेलेली असताना अनेक चुकिच्या गोष्टी केल्याची मेगने आईला दिलेली कबुली,मुलींना सतत कार्यरत राहण्याचे महत्व पटावे यासाठी मिसेस मार्च ने केलेली युक्ती,वेळ वाया जाउ नये म्हणुन मुलिंनी स्थापन केलेला "मधमाशी क्लब",आनंदमेळ्यात ऍमि ने दाखवलेला दिलदारपणा,स्वत: आजारी असतानाही ह्युमेल्स कुटुंबाच्या मदतिला जाणारी बेथ...हे आणि असे किती प्रसंग सांगु ?
नातळ निमित्त बसवलेल्या नाटुकल्याच्या प्रसंगी मुलींची झालेली फजिती,लाजळु बेथ ला लॉरीच्या म्हातार्‍या आजोबांनी दिलेली भेट,मिस्टर मार्च च्या अचानक आगमनाचा ह्रदयस्पर्शी प्रसंग,मेग चे लग्न,पिकनिक्,ऍमिची युरोपवारी,मेगच्या संसारतील गमतिजमती, ज्यो ने रचलेल्या मजेदार कविताअसे कितितरी प्रसंग अतिशय आनंद देतात....तर बेथच्या आजारपणाचा भयानक प्रसंग,लॉरी चा प्रेमभंग,ज्यो चे अचानक आलेले एकटेपण हे सगळं वाचताना डोळ्यात पाणी कधी उभं राहतं कळंतच नाही...
काय काय सांगु आणि किति सांगु....सध्यातरी एवढंच म्हणेन कि तुमच्यापैकी ज्यांनी हे पुस्तक वाचलं नसेल त्यानी शक्य असेल तेव्हा जरुर वाचा..आणि ज्यांनी वाचलं असेल त्याच्या आठवणी जाग्या होवोत हिच ईच्छा ....
अजुनही कधी कधी ऑफिस च्या कामाचा ताण आला,एखाद्या गोष्टीमुळे मन अस्वस्थ झालं असेल,लाडक्या मैत्रिणींची आठवण आली ..किंवा ईतर काही ना काही कारण असो...मी हे पुस्तक उघडते...आणि क्षणभरासाठी सगळे ताण,सगळी दुखं दूर जातात...आणि मी या चौघींच्या जोडीला एक पाचवी होउन या पुस्तकात हरवुन जाते....
-स्मिता

No comments:

Post a Comment