Monday, April 13, 2009

मनातला चैत्रं...!!!

उन्हाळा सुरु झाला...कडक उन्हं पडायला लागली..मोगर्‍याचे गजरे...कैरीची डाळं-पन्हं या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली की माझं मन १०-१२ वर्ष मागं धावतं...दरवर्षी एप्रिल मे च्या सुमारास मला माझी उन्हाळ्याची सुट्टी आठवते..माझं कर्‍हाड आठवतं..कृष्णाबाईचं देउळ आठवतं...आमचा लाडका घाट आठवतो..आणि सगळ्यात तीव्रतेने आठवतो,तो म्हणजे चैत्रातला कृष्णाबाईचा उत्सव...!!!
आमचं कर्‍हाड हे तसं छोटंसच गाव....(म्हणजे आता पुण्यात रहायला लागल्यापासुन मला कर्‍हाड छोटं वाटतं...:-) ) दोनचं मुख्य बाजारपेठा....आणि त्याच्या आजुबाजुला पसरलेली वसाहत....चावडी चौक ते दत्त चौक आणि चावडी चौक ते पांढरीचा मारुती ईतपतच आमचं विश्वं पसरलं होतं....आजकाल विकसित झालेला विद्यानगर हा भाग, त्यावेळी मुख्य भागापासुन फार फार दूर वाटायचा....कृष्णा नदीच्या पलिकडचे विद्यानगर म्हणजे कर्‍हाडच्या शेजारचं दुसरं गावच आहे की काय असं वाटायचं मला लहानपणी...सोमवार पेठ,कन्या शाळेचा परिसर,पंतांचा कोट..आणि सर्वात महत्वाचं म्हणजे "प्रितीसंगम" आणि कॄष्णाबाईचा घाट एवढचं माझं वर्तुळ होतं.
आमच्या घरापासुन अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर "प्रितीसंगम" होता.कॄष्णा आणि कोयना नदीचा सुरेख संगम प्रितीसंगम म्हणुन प्रसिद्ध आहे.या दोन्ही नद्या समोरासमोरुन येतात आणि एकमेकींना भेटतात...आणि मग या दोन मैत्रिणी एकमेकींच्या गळ्यात गळे घालुन,एकरुप होवुन,पुढच्या जगाला प्रसन्न,पवित्र करण्यासाठी,मैत्रिच्या संदेश सगळ्यांपर्यंत पोचवण्यासाठी पुढे जातात्..."कॄष्णा" असं एकचं नाव धारण करुन.....!
अथांग पसरलेलं नदीचं पात्रं... नदीशेजारचं विस्तिर्ण वाळवंट.. नदीकडे तोंड करुन उभं राहिलं की डावीकडे स्वर्गीय श्री.यशवंतरावजी चव्हाण यांची सुरेख बांधलेली संगमरवरी समाधी..आणि नगरपालिकेने फुलवलेली सुरेख बाग आहे.समाधीच्या आजुबाजुला छोटी छोटी रेखीव मंदीरे आहेत. ही सगळी मंदिरे १९६७ साली आलेल्या प्रचंड मोठ्या पुरातुन वर आली असं लोक सांगतात. उजवीकडे ग्रामदेवता कॄष्णाबाईचे मंदीर आहे..या देवळासमोरुन थेट नदीच्या वाळवंटापर्यंत उतरत जाणार्‍या घाटाच्या पायर्‍या आहेत. काळ्याभोर दगडातुन या विस्तीर्ण पायर्‍या बांधल्या आहेत....पायर्‍या जिथे संपतात तिथे मोठे दगडी बुरुज आहेत.. कृष्णाबाईच्या देवळाच्या आजुबाजुला गणपती,शंकर,कृष्ण अशी विविध मंदीरे आहेत.
माझ्या घरापासुन ते घाटापर्यंत संपूर्ण उताराचा रस्ता होता.ज्या दिवशी परीक्षा संपेल त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांच्या सायकली त्या उतारावरुन सुसाट सुटायच्या...ते थेट घाटावर . मग आम्ही सगळ्याजणी नदीपात्रात जायचो.नदीत मोठे मोठे दगड होते..खोल पाण्यात असलेला सगळ्यात मोठा दगड पकडण्यासाठी आमची शर्यत लागायची.दगडावर बसुन पाण्यात पाय सोडुन गप्पा चालायच्या...पाण्यातले छोटे छोटे मासे पायावरुन सुळकन फिरायचे...पायाला गुदगुल्या करायचे..पाण्यात हात घालुन मासा पकडायचा असफल प्रयत्न करायचो ...पण ते कुठले हातात यायला...आता आठवुन लिहितानाही पायाला गुदगुल्या होतायतं :-)..पाण्यात पाउल गोरेदिसते आणि पाण्याबाहेर काढलं की कमी गोरं दिसतं..असं का?..यावर चर्चा व्हायची.मग कोणाचे पाउल जास्त गोरं आहे यावर दंगा ... एकमेकींच्या अंगावर पाणी उडवायचा खेळ व्हायचा ...पाण्यात बुडणारे केशरी सूर्यबिंब पाहत अचानक सगळ्याजणी स्तब्ध व्हायच्या...आणि मग झुपकन कोणी अंगावर पाणी उडवायची...आणि परत दंगा सुरु...मग वरती बागेत येउन पळापळी,लंगडीपळती,आंधळी कोशींबीर असे खेळ व्हायचे.खळुन खेळुन दमलो की मग मोर्चा खाउकडे...भेळ,पाणीपुरी,पावभाजी ,बटाटेवडा..अशा पदार्थांचा फाडशा पडायचा.
आमच्या शि़क्षण संस्थेच्या दोन्ही शांळांची परीक्षा एकच दिवशी संपायची.त्यामुळे त्या दिवशी घाटावर सगळीकडे मुलामुलींची गर्दीच गर्दी दिसायची..अचानक अमच्या शाळेतल्या सगळ्या भिंती गायब झाल्या आहेत...बेंच काढुन टाकले आहेत आणि त्याऐवजी सगळीकडे हिरवळं पसरली आहे...शाळेच्या वरचे छतं अचानक उडुन गेले आहे...आणि खांबांची मोठमोठी झाडे झाली आहेत...असं काहीतरी वाटायला लागयचं...घाट म्हणजे जणु दुसरी शाळाच...:-)
गुढीपाडवा नेहेमी परिक्षेच्या काळात यायचा..त्यामुळे मग मस्त आम्रखंड खाउन झोपावं म्हटलं तर अभ्यासाचं भूत डोळ्यासमोर नाचायचं...पण रामनवमी होता होता परिक्षा संपलेली असायची आणि चैत्रोत्सवाची चाहुल लागायची...तिजे दिवशी गौरीचे देव्हार्‍यात आगमन व्हायचे..आता पुढचा एक महीना गौराबाई देव्हार्‍यात पेश्शल आसनावर विराजमान व्हायची..आई दारात चैत्रांगण काढायची...तिजे दिवशीच गौरीसाठी अंब्याची डाळं आणि पन्हे असा नैवेद्य व्हायचा...आणि मग कृष्णाबाईच्या उत्सवाची वाट पाहणं सुरु व्हायचं...
गौरीच्या पहिल्या तिजेपासुन ते थेट अक्षयतृतीये पर्यंत रोज कुठे ना कुठे हळदीकुंकु व्हायचं...आणि याच काळात हनुमान जयंतीपासुन पुढे चार दिवस घाटावर चैत्रातला कृष्णाबाईचा मोठा उत्सव व्हायचा. नदीच्या वाळवंटात मोठा मंडप उभा रहायचा.आणि बुरुजावरती एक मोठं स्टेज बनवलं जायचं.विविध कलाकार चार दिवस तिथे आपली कला रसिकांसमोर सादर करायचे.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीची पालखीतुन मिरवणुक निघायची.देवी वाजत गाजत मिरवत नगरप्रदक्षीणा करायची....रस्तोरस्ती तिच्या स्वागतासाठी मोठमोठ्या रांगोळ्या रेखलेल्या असायच्या... चौकाचौकात पालखी थांबायची.. सुवासिनी देवीला ओवाळायच्या...ओटी भरायच्या...आणि मग देवी आता चार दिवस देउळ सोडुन नदीच्या शेजारी,खर्‍या कृष्णेला भेटायला,तिची विचारपूस करायला ,वाळवंटातल्या मंडपात जायची आणि उत्सवाला सुरुवात व्हायची.मग रोज दिवसभर भजन,किर्तन,प्रवचन असा भरगच्च कार्यक्रम मंडपात व्हायचा...आणि संध्याकाळी उन्हं उतरली की मग स्टेज वर विविध कलाकार कार्यक्रम सादर करायचे.मराठी गीतांचा वाद्यवॄंद,कथाकथन,एकपात्री प्रयोग,नाटके असे विविध कार्यक्रम पहायला लोकांची झुंबड उडायची...
त्या चार दिवसांपैकी सगळ्यात महत्वाचा दिवास म्हणजे "सार्वजनिक हळदीकुंकु".सगळ्या सुवासिनी देवीची ओटी भरण्यासाठी,तिला पन्हे आणि डाळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी यायच्या...आणि मग मंडपात भेटलेल्या ईतर स्त्रीयांना पण हळदीकुंकु द्यायच्या.अशा वेळी समोरची बाई ओळखीची नसली तरी चालायचं ... एकमेकींशी ओळख करुन घेणे एवढा एकच उद्देश असावा कदाचितं...आणि मग बोलताबोलता कुठुनतरी ओळख निघायचीच...."अगं बाई...तुमच्या जाउ बाई म्हणजे माझ्या मावशीच्या नणंदेची सूनच की हो...."असे संदर्भ सापडायचे...:-)
शेवटच्या दिवशी मोठी यात्रा भरायची फुगे,खेळणीवाले,बत्तासे,चुरमुरे,गाठी ची दुकाने सजायची....जिकडेतिकडे पिपाण्यांचे आवाज घुमायचे...आजुबाजुच्या खेड्यातले शेतकरी लोकं आपल्या बायकापोरांसोबत तालुक्याला फेरी मारायचे..देवीचा आशीर्वाद घ्यायचे...
घाटावरला कार्यंक्रम संपला की आमच्या घरातल्या हळदीकुंकवाचा दिवस ठरायचा.त्या दिवशी दिवसभर आईची धावपळ चालायची...गौरीसाठी मोठ्ठी आरास बनवायला मी आणि माझी बहिण आईला मदत करायचो.आमची लहानपणीची खळणी,बाहुल्या,घरातल्या शोभेच्या वस्तु बाहेर निघायच्या..गौरीची बैठक सजायची....तिच्या समोर लाडु,चकल्या,शेव,शंकरपाळे असा फराळ मांडला जायचा.कलिंगडाचे झिगझॅग त्रिकोण कापत आई सुरेख कमळं करायची....मोगर्‍याचा घमघमाट सुटायचा...अत्तरदाणी,गुलाबदाणी,पातेलेभर डाळं,पन्हे अशी जय्यत तयारी केली जायची....मग आई मला छान चापुनचोपुन साडी नेसवुन द्यायची...
आलेल्या सगळ्या बायकांना हळदीकुंकु लावणे,अत्तर लावणे,गुलाबपाणी शिंपडणे,डाळ-पन्हं आणुन देणे ही सगळी कामं मी आणि माझी बहीण वाटुन घ्यायचो...आणि मग सगळ्यात शेवटी आई त्यांची भिजवलेले हरभरे आणि काकडीने ओटी भरायची....
चैत्र आला की या सगळ्या आठवणी येतात..परत एकदा लहान व्हावसं वाटतं...कर्‍हाडच्या त्याच घरी जावंसं वाटतं..आता माझं माहेर कर्‍हाड हुन पुण्यात आलं...अजुनही माझ्या माहेरी आणि सासरी आम्ही चैत्रातलं हळदीकुंकु उत्साहनं साजरं करतो...पण कृष्णाबाईच्या छत्राखाली,तिच्या साक्षीनं केलेल्या "त्या" हळदीकुंकवांची सर ईथे पुण्यात नाही... अजुनही या सगळ्या जुन्या आठवणी मनाला हुरहुर लावतात..
माझ्या मनातला चैत्र अजुनही तिथेच फुलतो....घाटावर...कृष्णेच्या काठी...!!

No comments:

Post a Comment