Monday, August 31, 2009

स्वप्नं

कॉलेज चे दिवस म्हणजे खरोखरच इतके सुंदर,अलवार..जणु रंगीबेरंगी नाजुक फुलपाखरुच...सगळ जगं खुप खुप सुंदर आहे असा विश्वास देणारे...शाळेपर्यंत आपल्याच कोषात मग्न असलेल्या माझ्यासारख्यांना तर अचानक बर्‍याच गोष्टींचा साक्षात्कार होतो....अचानक सगळं बदलून जातं..कुठल्याही छोट्या मोठ्या प्रसंगावर कवीता वगैरे सुचु लागतात...अशीच फुलपंखी दिवसात केलेली ही कवीता...

चांदण्यातली रात्र असावी,डोळ्यांमद्धे स्वप्नं असावे,

अशा क्षणाला ओठी माझ्या,तुझेच केवळ नाव असावे......

दुरुन कुठुनसा ओळखीतला,निशिगंधाचा सुगंध यावा,

वार्‍यावरती वाहत अलगद,माझ्या श्वासामधे भिनावा......

अशा क्षणाला मनात माझ्या,तुझेच केवळ गीत घुमावे,

तुझ्या स्मॄतीने डोळ्यांमद्धे,माझ्या नकळत अश्रु जमावे...........

पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे,

स्वप्न असे की सत्य असे हे,माझिया मना मीच पुसावे...........

तुझ्या रेशमी स्पर्शाने मग,स्वप्नातुन मी जागे व्हावे,

वास्तव सुद्धा असते सुंदर,हे माझ्या प्रत्ययास यावे..........

मग वाटावे,आपण आता,काळावरही मात करावी,

इथेच थांबू द्यावा हा क्षण,फक्त तुझीच साथ असावी... फक्त तुझीच साथ असावी...

बी.जे. मेडीकल कॉलेज मद्धे दरवर्षी गणेशोत्सवात आंतरमहाविद्याययीन स्पर्धा चालु असायच्या...अशाच एका वर्षी बी.जे. च्या "वेदांत" मद्धे "काव्यवाचन" स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झाले होते...पुण्यात ते सुद्धा आंतरमहाविद्याययीन स्पर्धेत सहभागी व्हायचा पहिलाच प्रसंग होता....तिथे ही कवीता सादर केली होती...आणि पाडगांवकरांची "चिउताई"... निकाल जाहीर होताना एकदम आरामात होते कारण आपल्याला काही बक्षिस मिळणार नाहीच हे गृहीत धरलं होतं...ईतक्या विविध कॉलेजेस मधुन सहभागी झालेल्या मुलांनी ईतक्या भारी भारी कविता सादर केल्या होत्या..की त्यापुढे माझी कविता म्हणजे उगीच आपलं..."र" ला "र" आणि "ट" ला "ट" जुळवलेलं आहे असं वाटलं होतं... आणि बक्षिस जाहीर झालं...उलट्या क्रमाने...
तृतीय क्रमांक : अमुक
द्वितीय क्रमांकः तमुक
आणि
प्रथम : चक्क त्यांनी माझं नाव पुकारलं......आणि मिनलने त्याचक्षणी घट्ट मिठी मारली मला....:-) इतकं मस्त वाटत होतं ना तेव्हा....आपण आपल्या कॉलेज साठी बक्षिस मिळवुन आणलं आहे याची जाणीव झाली एकदम..सोबतच्या सगळ्यांनी "एम्.आय्.टी." चा नुसता गजर केला होता आख्या सभागृहात... :-)

आणि नंतर लगेचच तिथे कँप मधेच "मार्जोरीन" ला पार्टी ...खिशात पैसे नसताना एका मित्राकडुन उधार घेउन केलेली ती पार्टी आठवुन आता हसायला येतं...खरतर आता ही कवीता वाचुनच फार हसायला येतं.....:-)ईतकी साधीसुधी कविता तर कोणीपण लिहु शकेल असं वाटतं आता :-)..

आज अचानक त्या ५-६ वर्षापुर्वीच्या गणेशोत्सवाच्या आठवणी आल्या....आणि "वेदांत" च्या सुद्धा...
पण कशीही असली तरी ही कविता मला अतिशय प्रिय आहे...कारण ती मला आठवण करुन देते...सायनाकर कडुन उधार घेउन दिलेल्या त्या "पार्टीची" आणि
बक्षिस जाहीर होताच मिनलने मारलेल्या त्या मिठीची ... ...
खरचं....Those were the Best Days of My Life...

Saturday, August 29, 2009

घेता घेता एक दिवस...देणार्‍याचे हात घ्यावेत....







कधी कधी एखादी गोष्ट मनासारखी झाली की इतका आनंद होतो.. आणि मग कसा व्यक्त करायचा हा आनंद असा पूर्वी पडणारा प्रश्न आता नाही :-)..थँक्स टु ब्लॉगवर्ल्ड...:-)
यावर्षीचे मोदक फार छान साधले गेले...मनासारखी सुरेख उकड जमली...आणि सुरेख कळीदार एकसारखे मोदक करता आले...इतकं इतकं छान वाटलं ना....आईचं तर असं झालं होतं की लेकीचं किती कौतुक करु आणि किती नको...सगळ्या येणार्‍या जाणार्‍यांना ४-४ वेळा सांगुन झालं ...
"आज स्मिता ने इतके चुटचुटीत मोदक केले ना...मलापण जमत नाहीत इतके सुरेख....त्या कोणा अमुक-तमुक आत्याच्या घरात कोणालाही अजुनी करता येत नाहीत मोदक..तिचा आता ३२ वर्षाचा संसार झाला तरी तिचे मोदक चुकतात्...एक ना दोन..आईचं संपतच नव्हतं.... "
कसं असतं ना....आईनेच शिकवले मोदक मला....
जितकी तांदुळ पीठी तितकंच पाणी घ्यायचं...त्या पाण्यात थोडं तेलं किंवा लोणी..आणि मीठ घालायचं....आणि पाण्याला तळाशी बुडबुडे येताना दिसले की लगेच पीठी टाकुन भरभर हालवायचं...आणि झा़कण ठेवुन मस्त २-३ वाफा काढायच्या..मग तेलापाण्याचा हात घेउन उकड गरम असताना भराभर मळायची..हाताला न चिकटणारी उकड साधली की पुढचा सगळा कलाकुसरीचा मामला....उकडीचा छोटा गोळा घेउन पारी करायची..त्याला चुण्या काढायच्या..आणि मधे सारण ठेवुन चारी बाजुनी नाजुक हाताने चुण्यांना एकत्र आणायचे.....वरती छोटुसं टोक काढायचं...कसं सुचलं असेल ना हे सगळं कोणालातरी...
आणि माझ्यापर्यंत आईनेच तर पोचवलं हे सगळं...यावर्षी जरा चुकली असेल तिची उकड काढताना...पण म्हणुन लेकीचं किती कौतुक...पण तिला एक गोष्ट सांगावीशी वाटली मला...

"अगं माझे मोदक छान जमले हे तुझचं तर देणं आहे ना....शेवटी काय...
देणार्‍याने देत जावे...घेणार्‍याने घेत जावे..
घेता घेता एक दिवस...देणार्‍याचे हात घ्यावेत....
आज मी माझ्या आईचे हात घेतले होते...."
थँक्यु आई.."


Friday, August 28, 2009

ये गं गौराबाई...

ये गं गौराबाई...सुख देउन जाई....
वाट तुझी बघतुया..शंकर भोळा गं..
अन कपाळाला शोभतुया..कुंकवाचा टिळा गं...

दरवर्षी गौर सजवताना हमखास आठवतच हे गाणं....माझ्या आईकडच्या गौरी म्हणजे खड्याच्या..गंगागौरी.....त्यावेळेस उभ्या गौरींबद्दल फारसं माहितीच नव्हतं कधी....एक छोटा हळद-कुंकवाची बोटे माखलेला कलश,त्यात कसली कसली तरी गौरीची पानं,फुलं,पूजेचं सगळं सामान..म्हणजे हळद-कुंकु,अक्षता,गेजवस्त्र,खिरापत असं सगळं घेउन मी आणि श्वेतु नदीवर जायचो...तिथे मग सोबतच्या ताया,काकवा,मावश्या सांगतील तशी पूजा करायची...नदीपात्रातले दोन खडे घ्यायचे...एक जेष्ठा..एक कनिष्ठा....त्यांची पूजा करुन कलशात ठेवायची...मग आरती,नैवेद्य...असं सगळं करुन नदीतल्या पाण्यानेच तोंडात चूळ घ्यायची...आणि कोणाशीही न बोलता घरापर्यंत ती चूळ तशीच तोंडात धरुन यायचं....

यामागचे शास्त्र मला कधी कळले नाही..पण आता असे वाटते की गौरीला घरी घेउन येताना आजुबाजुच्या लोकांशी न बोलता फक्त तिच्याशीच एकरूप होउन यावं असा काहीसा हेतु त्यात असेल...म्हणजे कसं की तोंडातलं पाणी बाहेर पडु नये म्हणुन कोणाशी बोलायचं पण नाही आणि चुकुन ते पाणी गिळलं जाउ नये म्हणुन सगळं मन स्वत: कडे एकाग्र करायचं....थोडक्यात काय तर स्वतः गौरीस्वरूप व्हायचं...पण त्यातही एकमेकींना खाणाखुणा करुन गप्पा सुरुच असायच्या म्हणा....असो...लहानपण किती निरागसं,गोड असतं....

मग घरापाशी आलं की आई तयारचं असायची औक्षणासाठी...इतका वेळ चालुन दमलेल्या पायांवर छान गरम गरम पाणी,मग गरम दुध..आहाहा..सगळा शिणवठा सेकंदात गायब व्हायचा...मग गौरीला..आणि गौर आणणार्‍या आम्हा दोघीना ओवाळणं व्हायचं...
मगं आम्ही म्हणायचं.. "गौर आली गौर...."
मग आई विचारणार..."कशाकशाच्या पावलांनी आली..?"
मग तिच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची...."सोन्यामोत्याच्या पावलांनी आली...."
मग सगळ्या घरभर फिरुन गौर..म्हणजे आम्ही दोघी विचारणार्..."ईकडे काय...?"

मग आई उत्तर देणार्...."ईकडे दिवाणखाना..ईकडे दूधदुभते...ईकडे तिजोरी....ईकडे देवघर....ईकडे बागबगीचा...."
गौर नक्की कोण आहे? माझ्या हातातल्या कलशात ठेवलेले ते दोन खडे...की मी आणि माझी छोटी बहीण...?

मग सगळ घरदार फिरुन गौराबाई बाप्पांशेजारी विराजमान व्हायच्या....शेपू भाजी-भाकरी चा आस्वाद घ्यायच्या...तिला आल्यावर भाजी भाकरी का लागत असेल या प्रश्नाचं उत्तर लग्नं झाल्यावर कळलं....

माहेरी आल्यावर "तायडु भाकरी झाली बघ गरम...सुरुवात कर तु खायला...असं म्हणत..ताव्यावरुन थेट ताटात येणारी भाकरी पूरणपोळी पेक्षा जास्त गोड वाटते..." (माझ्या सुदैवाने सासरी पण मला ही चैन असते)
गौर म्हणजे काय शेवटी "माहेरवाशीण"च की....
दुसर्‍या दिवशी मात्र भरपूर तूप सोडलेली पूरणपोळी..... :-)

पुढे मोठी झाल्यावर कर्‍हाड सोडुन शिकायला पूण्यात आले...ईथे आल्यावर पहिल्यांदाच उभ्या गौरींचा अनुभव घेतला तो अंजली आज्जीच्या घरी...अंजली आज्जी म्हणजे आईची सगळ्यात धाकटी मामी....आणि आता माझी सासु ;-)...

"मलापण उभ्या गौरी बसवणारे सासर पाहिजे आहे" असं एके वर्षी तिच्या घरच्या गौरी बसवताना सहज तोंडुन निघुन गेलं...आणि माझी गौराबाई "तथास्तु" कधी म्हणाली ते कळलंच नाही.... तेच घर सासर म्हणुन लाभलं..:-)

माझ्या सासरच्या गौरींचा थाट निराळाच....माझ्या पणजीपासून ( म्हणजेच आज्जेसासुबाईंपासुन..) चालत आलेले सुरेख पितळी मुखवटे...१ दिवस आधी या मुखवट्यांना छान घासुन-पुसुन लखलखीत करायचं....मग त्यांचे भुवया,डोळे,ओठ,कुंकु, केस रंगवायचे...लोखंडी स्टॅडला साड्या नेसवायच्या...या साड्या नेसवताना कोण धांदल उडते....एकीची साडी पटकन मनासारखी नसवुन होणार्...आणि दुसरीची साडी ३-४ वेळा सोडुन परत परत नेसवायला लागयाची....आपल्या मनासारखी जमेपर्यंत...

मगं आज्जीचं नेहेमीचं वाक्या..."अगं जेष्ठा साडी नेसवायला फार त्रास देत नाही....पण कनिष्ठा म्हणजे लहान ना.....जरा त्रास देणारच..":-)....

आणि खरच...दोन्ही मुखवटे कितीही सारखे रंगवले तरी आज्जी म्हणते तसं...एक मोठी आणि एक लहान जाणवत राहाते...असं कसं होत असेल गं आज्जी ....असं म्हणलं...की आज्जी हसुन म्हणते..."अगं म्हणुनचं त्या जेष्ठा-कनिष्ठा आहेत ना " ..:-)

मग त्यांना दोघींना दागिने घालायचे...मुकुट,चिंचपेटी,कानात कुड्या,हातात बांगड्या,कंबरपट्टा,कोल्हापूरी साज,श्रीमंत हार्,मंगळसूत्र...आणि सगळ्यात शेवटी नथ....हे सगळ करायला इतकं छान वाटतं ना....आपलं आपल्यातच असणं...साड्या नेसवलेल्या स्टॅडवर मुखवटे बसवले की पाहात रहावं असं वाटतं....ते तेजस्वी ,सोज्वळ,शांत मुखवटे आश्वासन देत असतात..."आम्ही आहोत ना आता...सगळ्या काळज्या आमच्यावर सोडा आणि निर्धास्त व्हा..."