Saturday, August 29, 2009

घेता घेता एक दिवस...देणार्‍याचे हात घ्यावेत....







कधी कधी एखादी गोष्ट मनासारखी झाली की इतका आनंद होतो.. आणि मग कसा व्यक्त करायचा हा आनंद असा पूर्वी पडणारा प्रश्न आता नाही :-)..थँक्स टु ब्लॉगवर्ल्ड...:-)
यावर्षीचे मोदक फार छान साधले गेले...मनासारखी सुरेख उकड जमली...आणि सुरेख कळीदार एकसारखे मोदक करता आले...इतकं इतकं छान वाटलं ना....आईचं तर असं झालं होतं की लेकीचं किती कौतुक करु आणि किती नको...सगळ्या येणार्‍या जाणार्‍यांना ४-४ वेळा सांगुन झालं ...
"आज स्मिता ने इतके चुटचुटीत मोदक केले ना...मलापण जमत नाहीत इतके सुरेख....त्या कोणा अमुक-तमुक आत्याच्या घरात कोणालाही अजुनी करता येत नाहीत मोदक..तिचा आता ३२ वर्षाचा संसार झाला तरी तिचे मोदक चुकतात्...एक ना दोन..आईचं संपतच नव्हतं.... "
कसं असतं ना....आईनेच शिकवले मोदक मला....
जितकी तांदुळ पीठी तितकंच पाणी घ्यायचं...त्या पाण्यात थोडं तेलं किंवा लोणी..आणि मीठ घालायचं....आणि पाण्याला तळाशी बुडबुडे येताना दिसले की लगेच पीठी टाकुन भरभर हालवायचं...आणि झा़कण ठेवुन मस्त २-३ वाफा काढायच्या..मग तेलापाण्याचा हात घेउन उकड गरम असताना भराभर मळायची..हाताला न चिकटणारी उकड साधली की पुढचा सगळा कलाकुसरीचा मामला....उकडीचा छोटा गोळा घेउन पारी करायची..त्याला चुण्या काढायच्या..आणि मधे सारण ठेवुन चारी बाजुनी नाजुक हाताने चुण्यांना एकत्र आणायचे.....वरती छोटुसं टोक काढायचं...कसं सुचलं असेल ना हे सगळं कोणालातरी...
आणि माझ्यापर्यंत आईनेच तर पोचवलं हे सगळं...यावर्षी जरा चुकली असेल तिची उकड काढताना...पण म्हणुन लेकीचं किती कौतुक...पण तिला एक गोष्ट सांगावीशी वाटली मला...

"अगं माझे मोदक छान जमले हे तुझचं तर देणं आहे ना....शेवटी काय...
देणार्‍याने देत जावे...घेणार्‍याने घेत जावे..
घेता घेता एक दिवस...देणार्‍याचे हात घ्यावेत....
आज मी माझ्या आईचे हात घेतले होते...."
थँक्यु आई.."


2 comments:

  1. Mast disat ahet modak, tondala pani sutale

    ReplyDelete
  2. लेकीचे कौतुक आहेच ... ;) पण आईचे खास अभिनंदन ... :) मोदक फक्कड़ झालेत हो ... गणपती बाप्पा पण खुश दिसत आहेत फोटोमध्ये. "चला लवकर लवकर आरती उरका मला मोदक खायचे आहेत" असे तर बोलत नाही आहेत ना ते ??? हाहा..

    ReplyDelete