Friday, August 28, 2009

ये गं गौराबाई...

ये गं गौराबाई...सुख देउन जाई....
वाट तुझी बघतुया..शंकर भोळा गं..
अन कपाळाला शोभतुया..कुंकवाचा टिळा गं...

दरवर्षी गौर सजवताना हमखास आठवतच हे गाणं....माझ्या आईकडच्या गौरी म्हणजे खड्याच्या..गंगागौरी.....त्यावेळेस उभ्या गौरींबद्दल फारसं माहितीच नव्हतं कधी....एक छोटा हळद-कुंकवाची बोटे माखलेला कलश,त्यात कसली कसली तरी गौरीची पानं,फुलं,पूजेचं सगळं सामान..म्हणजे हळद-कुंकु,अक्षता,गेजवस्त्र,खिरापत असं सगळं घेउन मी आणि श्वेतु नदीवर जायचो...तिथे मग सोबतच्या ताया,काकवा,मावश्या सांगतील तशी पूजा करायची...नदीपात्रातले दोन खडे घ्यायचे...एक जेष्ठा..एक कनिष्ठा....त्यांची पूजा करुन कलशात ठेवायची...मग आरती,नैवेद्य...असं सगळं करुन नदीतल्या पाण्यानेच तोंडात चूळ घ्यायची...आणि कोणाशीही न बोलता घरापर्यंत ती चूळ तशीच तोंडात धरुन यायचं....

यामागचे शास्त्र मला कधी कळले नाही..पण आता असे वाटते की गौरीला घरी घेउन येताना आजुबाजुच्या लोकांशी न बोलता फक्त तिच्याशीच एकरूप होउन यावं असा काहीसा हेतु त्यात असेल...म्हणजे कसं की तोंडातलं पाणी बाहेर पडु नये म्हणुन कोणाशी बोलायचं पण नाही आणि चुकुन ते पाणी गिळलं जाउ नये म्हणुन सगळं मन स्वत: कडे एकाग्र करायचं....थोडक्यात काय तर स्वतः गौरीस्वरूप व्हायचं...पण त्यातही एकमेकींना खाणाखुणा करुन गप्पा सुरुच असायच्या म्हणा....असो...लहानपण किती निरागसं,गोड असतं....

मग घरापाशी आलं की आई तयारचं असायची औक्षणासाठी...इतका वेळ चालुन दमलेल्या पायांवर छान गरम गरम पाणी,मग गरम दुध..आहाहा..सगळा शिणवठा सेकंदात गायब व्हायचा...मग गौरीला..आणि गौर आणणार्‍या आम्हा दोघीना ओवाळणं व्हायचं...
मगं आम्ही म्हणायचं.. "गौर आली गौर...."
मग आई विचारणार..."कशाकशाच्या पावलांनी आली..?"
मग तिच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची...."सोन्यामोत्याच्या पावलांनी आली...."
मग सगळ्या घरभर फिरुन गौर..म्हणजे आम्ही दोघी विचारणार्..."ईकडे काय...?"

मग आई उत्तर देणार्...."ईकडे दिवाणखाना..ईकडे दूधदुभते...ईकडे तिजोरी....ईकडे देवघर....ईकडे बागबगीचा...."
गौर नक्की कोण आहे? माझ्या हातातल्या कलशात ठेवलेले ते दोन खडे...की मी आणि माझी छोटी बहीण...?

मग सगळ घरदार फिरुन गौराबाई बाप्पांशेजारी विराजमान व्हायच्या....शेपू भाजी-भाकरी चा आस्वाद घ्यायच्या...तिला आल्यावर भाजी भाकरी का लागत असेल या प्रश्नाचं उत्तर लग्नं झाल्यावर कळलं....

माहेरी आल्यावर "तायडु भाकरी झाली बघ गरम...सुरुवात कर तु खायला...असं म्हणत..ताव्यावरुन थेट ताटात येणारी भाकरी पूरणपोळी पेक्षा जास्त गोड वाटते..." (माझ्या सुदैवाने सासरी पण मला ही चैन असते)
गौर म्हणजे काय शेवटी "माहेरवाशीण"च की....
दुसर्‍या दिवशी मात्र भरपूर तूप सोडलेली पूरणपोळी..... :-)

पुढे मोठी झाल्यावर कर्‍हाड सोडुन शिकायला पूण्यात आले...ईथे आल्यावर पहिल्यांदाच उभ्या गौरींचा अनुभव घेतला तो अंजली आज्जीच्या घरी...अंजली आज्जी म्हणजे आईची सगळ्यात धाकटी मामी....आणि आता माझी सासु ;-)...

"मलापण उभ्या गौरी बसवणारे सासर पाहिजे आहे" असं एके वर्षी तिच्या घरच्या गौरी बसवताना सहज तोंडुन निघुन गेलं...आणि माझी गौराबाई "तथास्तु" कधी म्हणाली ते कळलंच नाही.... तेच घर सासर म्हणुन लाभलं..:-)

माझ्या सासरच्या गौरींचा थाट निराळाच....माझ्या पणजीपासून ( म्हणजेच आज्जेसासुबाईंपासुन..) चालत आलेले सुरेख पितळी मुखवटे...१ दिवस आधी या मुखवट्यांना छान घासुन-पुसुन लखलखीत करायचं....मग त्यांचे भुवया,डोळे,ओठ,कुंकु, केस रंगवायचे...लोखंडी स्टॅडला साड्या नेसवायच्या...या साड्या नेसवताना कोण धांदल उडते....एकीची साडी पटकन मनासारखी नसवुन होणार्...आणि दुसरीची साडी ३-४ वेळा सोडुन परत परत नेसवायला लागयाची....आपल्या मनासारखी जमेपर्यंत...

मगं आज्जीचं नेहेमीचं वाक्या..."अगं जेष्ठा साडी नेसवायला फार त्रास देत नाही....पण कनिष्ठा म्हणजे लहान ना.....जरा त्रास देणारच..":-)....

आणि खरच...दोन्ही मुखवटे कितीही सारखे रंगवले तरी आज्जी म्हणते तसं...एक मोठी आणि एक लहान जाणवत राहाते...असं कसं होत असेल गं आज्जी ....असं म्हणलं...की आज्जी हसुन म्हणते..."अगं म्हणुनचं त्या जेष्ठा-कनिष्ठा आहेत ना " ..:-)

मग त्यांना दोघींना दागिने घालायचे...मुकुट,चिंचपेटी,कानात कुड्या,हातात बांगड्या,कंबरपट्टा,कोल्हापूरी साज,श्रीमंत हार्,मंगळसूत्र...आणि सगळ्यात शेवटी नथ....हे सगळ करायला इतकं छान वाटतं ना....आपलं आपल्यातच असणं...साड्या नेसवलेल्या स्टॅडवर मुखवटे बसवले की पाहात रहावं असं वाटतं....ते तेजस्वी ,सोज्वळ,शांत मुखवटे आश्वासन देत असतात..."आम्ही आहोत ना आता...सगळ्या काळज्या आमच्यावर सोडा आणि निर्धास्त व्हा..."

1 comment:

  1. सुंदर लिहिलयं.. आवडलं.

    ReplyDelete