Monday, March 12, 2012

सिझलर्स....स्स्स




काही दिवसांपूर्वी फेसबुक च्या अल्बम मद्धे घरी केलेल्या सिझलर चा फोटो टाकला होता...आणि मला बरेच जणांनी पाककॄती विचारली....त्या सगळ्यांसाठी खास आज ही पोस्ट...

याना किंवा कोबे मद्धे मिळणारं सिझलर माझ्या अत्यंत आवडीचं.....चुर्र चुर्र असा आवाज करत]टेबल वर येणारं ते अन्नब्रम्ह पाहुनच निम्मी भूक भागते....चायनिज,पंजाबी, चाट असे पदार्थ सहज घरी करुन पाहता येतात...या सगळ्या रेसिपीज नेटवर आरामात सापडतात...पण या सिझलर्स ची रेसिपी मला कित्येक दिवस सापडत नव्हती...शिवाय ते सर्व्ह करायची पद्दत पण वेगळी....ते सगळं कसं जमणार....?

अखेर मायबोली.कॉम मदतीला धावलं....एक दिवस अचानक मायबोली वर घरच्या घरी सिझलर्स करायची कॄती सापडली मला...आणि अनायसेच आलेल्या व्हॅलेंटाईन डे चं निमित्त साधुन नवरोबांना खायला घातली....आणी रेसिपी आवडल्याची पावती रीकाम्या झालेल्या सिझलर प्लेट ने दिली.....

अगदी हॉटेल सारखी नसली तरी ८५% त्याच्या आसपास जाणारी चव आली होती असं मला तरी वाटलं...पाहा तुम्हाला आवडते का ते....मूळ रेसिपीमद्धे मी थोडेफार बदल केले आहेत...

प्रमाण : २ माणसांसाठी....

साहित्यः

मोकळा शिजवलेला भात : १.५ वाटी
हव्या त्या (फ्लॉवर्,मटार्,गाजर्,बीन्स,बेबी कॉर्न्,स्वीट कॉर्न्,ब्रोकोली ई) भाज्या बेताचे तुकडे करुन : १.५ वाटी
१ मोठा किवा २ छोटे बटाटे
१ कांदा
पनीर : १५० ग्रॅम
ढबु मिरची १
अननस : २ चकत्या
कोबी
शिजवलेला आवडीचा कोणताही पास्ता १ वाटी

सॉससाठी:

४ मोठे दळदार टोमॅटो
१ बारीक चिरलेला कांदा
१ टी स्पून लसूण बारीक चिरुन'
१ टी स्पून आलं बारीक चिरुन (ऑप्शनल)
१/२ ते १ टी स्पून तिखट ( आवडीनुसार)
मिरीपूड १ टी स्पून
मीठ
ड्राय ईटालियन हर्बज ( घातले नाही तरी चालेल..मला आवडतात म्हणुन मी घातले..)
टोमॅटो सॉस १-२ टी स्पून
चवीपुरती साखर,
चिली फ्लेक्स
व्हिनेगर
रेड चिली सॉस
सोया सॉस

ईतर साहित्यः

१ जाड लोखंडी तवा किंवा असल्यास सिझलर प्लेट
लोणी/तूप
तवा ज्यावर ठेवायचा आहे स्टँड व त्याखाली एखादा टॉवेल (सिझलर प्लेट असेल तर त्याचा लाकडी साचा असतो)
गरम तवा पकडायला चिमटा किंवा अवन ग्लोव्ज तयार ठेवा.

कॄती:

१.बटाट्याचे फ्रेंच फ्राईज प्रमाणे तुकडे करुन घ्या आणी मीठ घाललेल्या पाण्यात १/२ तास ठेउन द्या.
पनीर चे सुद्धा उभे लांबट तुकडे करुन घ्या.
बटाट्याच्या सळ्या थोड्या पेपर वर पसरुन कोरड्या करुन घ्या....नंतर तेलात तळुन घ्या किंवा ओव्हन मद्धे बेक करुन घ्या.त्यावर थोडी मिरेपूड व गरज असेल तर मीठ भुर्भुरा...
पनीर चे तुकडे ओव्हन मद्धे थोडे ग्रील करुन किंवा तव्यावर परतून घ्या.त्यावर सुद्धा मीठ आणी मिरेपूड पसरा.

सगळ्या भाज्या (फ्लॉवर्,मटार्,गाजर्,बीन्स,बेबी कॉर्न्,स्वीट कॉर्न्,ब्रोकोली ) मीठ घातलेल्या पाण्यात उकडुन घ्या ...खुप जास्त उकडायच्या नाहित..टचटचीतच राहिल्या पाहिजेत.
कांदा आणी ढबु मिरचिचे मोठे चौकोनी तुकडे करुन लोण्यावर थोडे परतून घ्या...




२.टोमॅटो ब्लांच करुन मग मिक्सर वर फिरवून घ्या.तेलात वा बटरमधे बारीक चिरलेला लसूण
व कांदा परता, मग त्यात टोमॅटोचे पेस्ट मिसळा व शिजवा. आवडीप्रमाणे मीठ, मिरपूड,
हर्ब्ज मिसळा. चवीप्रमाणे सोयासॉस, चिलीसॉस, चिलीफ्लेक्स,साखर ई घाला व नीट शिजु द्या...हा झाला सॉस तयार

३.कोबीची पाने सुटी करुन घ्या.

आता र्व्हिंग ची तयारी :

४.लोखंडी तव्याला तेलाचा किंवा लोण्याचा पुसटसा हात लावून त्यावर आधी कोबीच्या पानाचे तूकडे मध्यभागी गोलाकार रचा, त्यावर कडेने भाज्या रचा. शक्यतो भाज्यांखाली कोबीची पाने ठेवु नका त्या जराशा करपलेल्या छान लागतात.अननसाच्या चकत्या कडेने रचा. कोबीच्या पानांवर शिजवलेला भात रचा..भाताच्या मध्यभागी छोटा खळगा करा...फोटो पहा...
५.सॉस मद्धे पास्ता मिसळुन जरा शिजवा.हे सगळं गरम असु द्या...



६.अंदाजे १ ते १.५ चमचा व्हिनेगर एका छोट्या वाटित तयार ठेवा...

६. तवा मध्यम आचेवर गरम करत ठेवा.

७. तवा छान तापुन तव्याच्या मधली कोबीची पाने करपू लागली, की
पटकन तवा टेवलवर न्या आणि मधोमध पास्ता ओता. व्हिनेगर सगळीकडुन पसरुन ओता..यावेळी चरचर आवाज येऊन धूर होईल.


८.व्हिनेगर ऐवजी भाज्यांवर लिंबाचा रस ओतता येइल.पण व्हिनेगर ची चव वेगळी लागते

९. प्रत्येकाने आपल्या डिशमधे भाज्या घेऊन, त्यावर आवडीप्रमाणे जास्तीचे सॉसेस घालून खाउ शकता.

टिपः यात वरुन घेण्यासाठी वेगवेगळे सॉस (उदा. चिली सॉस, मस्टर्ड सॉस, बार्बेक्यू सॉस, वुस्टरशायर सॉस वगैरे) वापरु शकतो...."याना सिझलर्स" मद्धे सॉस चे बरेच ऑप्शन आहेत..ते सगळे कधीतरी ट्राय करेन आणि इथे अपडेट करेन...
सध्यातरी हे बेसिक सिझलर गोड मानुन घ्या :-)

झणझणीत वरणफळं उर्फ चकोल्या


DSC06780.jpg

माझ्या लहानपणी वरणफळे करणे आणि खाणे हा एक सोहळा असायचा...सोहळा अशासाठी म्हटलं कारण हा पदार्थ करायचा म्हणजे त्याची तयारी २-३ दिवस चालायची...आता तुम्ही म्हणाल की हा इतका सोपा पदार्थ आहे..तर त्याची काय तयारी करायची..तर तयारी पदार्थ करण्यासाठी नसुन तो कधी करायचा हा "बेत" करण्यासाठी असायची....

त्याचं काय होतं..की माझ्या आई आणि बाबांना हा प्रकार अजिबात म्हणजे अजिबात आवडायचा नाही..."आमटी आणि पोळीचा काला काय खायचा नुसता..त्यापेक्षा भाज्या खाव्यात भरपुर.." ईति आमच्या मातोश्री..चकोल्या भुरकण्यातलं सुख हिला कधी कळणार,म्हणुन मी हळहळायचे Smile......मग एखाद्या दिवशी आमची लाडकी आज्जी हा बेत ठरवायची ( आजोळ गावात असल्याचे बरेच फायदे होतात..त्यातलाच हा एक..) मग परत आज्जीकडे जायचं म्हटल्यावर लगेच वरणफळं खाउन हातावर पाणी पडल्यावर लगेच कोण आपापल्या घरी जातंय...शाळेची सुट्टी विचारात घेउन २-४ दिवस तिथेच राहायच्या बेताने ( आणि अजुन २-३ चविष्ट बेत जोडीला ठरवुन..) चकोल्या चा प्रोग्रॅम ठरायचा...

वरणफळं म्हणजे आमटी आणि पोळी यांचा काला नसतो...हे तु आईला पूर्वी का शिकवले नाहीस असं आज्जीला विचारलं की ती म्हणायची..अगं तुझ्या आईला सगळ शिकवलं असतं तर आपल्या या चकोल्या पार्ट्या कशा झाल्या असत्या...? Smile हे ही खरंच होतं बरका....आज्जी,आजोबा,मी आणि माझी धाकटी बहीण आमची मस्त पार्टी असायची...झणझणीत आज्जीस्टाईल चकोल्या,त्यावर भरपूर साजुक तूप,दाण्याची किंवा लसणीची चटणी,पापड-कुर्डया,आणि ताजं ताक असा मेन्यु असायचा....कोण किती मोठयांदा भुरका मारुन चकोल्या हाणु शकतो अशी जणु चढाओढच असायची...चकोल्यांचं भलं मोठं पातेलं बघता बघता खाली जायचं..
आणि या सगळ्या सरंजामाला बाहेर धो धो पडणारर्‍या पावसाचं बॅगराउंड म्युझिक मिळालं तर आहाहा.....

अजुनही आज्जीचा फोन आला की ती विचारते,कराड ला कधी येणार आहेस? एकदा चकोल्यांचा बेत करुयात...माझा मन लगेच माग पोचतं.चकोल्या पार्ट्यांसोबतच इतरही अनेक आठवणी मनात फेर धरुन नाचु लागतात....आणि मग मी लगेच चकोल्या करायचा "बेत" करते..आज्ज्जी नं शिकवल्यात तश्शाच Smile

तर अशा या माझ्या आज्जी फेम चकोल्या....

१.कणीक भिजवताना त्यात मीठ,तिखट,हळद,आणि थोडे गुळाचे पाणी घालवे.तेलाचा हात लावुन कणीक भिजवावी.

आमटीची कॄती:
१. १/२ छोटा कांदा,१/२ टोमॅटो,४-५ काळी मिरी,२ लवंगा,१ तमालपत्र,थोडी दालचिनी,४ चमचे ओलं खोबरं,भरपूर लसूण,कोथिंबीर हे सगळं छान बारीक वाटुन घ्यायचं
DSC06769_n.jpg

२.मग थोड्या तेलात मोहरी,जिरे,मेथ्या,हिंग,हळद,कढिपत्ता याची फोडणी करुन त्यात वरील वाटण नीट परतून घ्यावे.त्यात २ वाट्या शिजवलेली तूरडाळ घालावी.भरपूर पाणी घालावे ( वरणफळांना पोहता आले पाहिजे).गुळ,चिंच,मीठ,तिखट,आणि गोडा मसाला घालावा...व उकळी येउ द्यावी...

आता भिजवुन ठेवलेल्या कणकीची तेल लावुन (पीठी लावु नये नाहीतर चाकोल्या फारच गिजगोळा होतात) पोळी लाटावी...आणि कातण्याने मोठया शंकरपाळ्या कापुन उकळणार्‍या आमटीत सोडाव्यात...मस्त शिजु द्याव्यात ..आणि गरमगरम वरपाव्यात Smile

DSC06780.jpg


DSC06779.jpg

टीपः या चित्रात जरी चकोल्या बाऊलमद्धे दिसत असल्या आणि शेजारी चमचा वगैरे दिसत असला तरी हे प्रकरण चमच्याने वगैरे खाण्याची चुक अजिबात करु नये...पाप लागेल Smile...हे सगळं मस्तपैकी ताटात ओतायचं,ताटाला गरज असल्यास टेकण वगैरे लावायचं ( त्यासाठी मी त्या चमच्याचा वापर केला ) आणि हातने भुरकायचं....मग कोपरपर्यंत ओघळ आला तरी चालेल Smile

आईपण

आज खुप दिवसांनी..बहुदा वर्षभरानंतर काहीतरी लिहावसं वाटतय...पण काय लिहु मी...? कशी सुरुवात करु परत ?....गेले काही दिवस रोज ब्लॉग उघडते काहीतरी लिहिण्यासाठी... आणी तसाच बंद करते....पण आज ठरवलय मी..चार-दोन ओळी लिहिल्याशिवाय अज्जिबात झोपायचं नाहिये आज....

काहीच विषय का सुचत नाहिये आज याचा विचार करताना एक गोष्ट लक्षात आली माझ्या....की गेले एक-दीड वर्ष मी अशा एका गोंडस आणी गोड विषयात अडकले आहे की त्यापुढे बाकी सगळं सगळं गौण आहे माझ्यासाठी...."आईपण" असं असतं का ?
येताजाता कधीही भेटलं तरी आपल्या मुलांबद्दल बोलणार्‍या बायकांना मी एकेकाळी हसायचे...."मुलांशिवाय काहीच कसे विषय नसतात यांच्याकडे बोलायला? " असं वाटायचं मला...."मी नाही बाई अशी टिप्पीकल बायकांसारखी वागणार..." असं मनात ठरवायचे..किंवा स्वतःच्या मनाला अशी ताकीद द्यायचे...पण..आजकाल मी सुद्धा मैत्रिणीना भेटले की...."आमची पिल्लु ना सध्या काही खातच नाही गं..दाढा येतायत ना...." किंवा...."छकुली ना आजकाल खुप खुप दंगेखोर झालिये गं...फार लक्ष द्यावं लागतं...""हगीज पेक्षा ना तु पॅम्पर्स वापरुन बघ...तो जास्त छान आहे....ईत्यादी ईत्यादी...." ...

तर तात्पर्य काय की सगळ्या बायका आया झाल्या की त्यांचं असंच होत असावं....आणि ते स्वाभाविकच आहे....माझंच बघा ना...परत ब्लॉग लिहायला सुरुवात करताना सुद्धा काय लिहु काय लिहु करत करत मी परत लेकीकडेच वळले...असो...

आज रंगपंचमी...आज माझ्या आईचा वाढदिवस असतो....आणि ज्या माझ्या आईमुळे मलासुद्धा हे गोड नातं अनुभवायला मिळालं तिला शुभेच्छा देउन आजची पोस्ट थांबवते....

प्रिय आई,

मी तुला कोणत्या शब्दात सांगु,
माझ्या अयुष्यातलं तुझं स्थान....?
तुच माझ्या प्रत्येक कृतीमागची कल्पना..
तुच माझ्या जीवनाची प्रेरणा...
माझ्या गळ्यातला सुर तू...
माझ्या ओठातले गीत तू...
माझ्या पाठीवरची कौतुकाची थाप तू...
माझ्या चुकांना खडसावुन जाब तू...
तुझ्यामुळेच माझं अस्तित्वं...
नी तुझ्यामुळेच मला स्वत्वं...
सगळ्यांपेक्षा खुप खुप वेगळी तू...
आणि माझ्या गालावरची खळी सुद्धा तूच...

आज तुझ्या वाढदिवशी,
देवाजवळ एकच मागणं....
मला तुझा आशीर्वादाचा हात सतत हवा आहे...
तू माझ्यासाठी पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी....

तुला खुप खुप शुभेच्छा...
तु सतत आनंदी राहावीस म्हणुन....!!!