Monday, July 11, 2022

काश्मीर डायरीज - 7

 काश्मीर डायरीज - 7

काश्मीर मध्ये आल्यापासून आज पहिल्यांदाच उशीरा म्हणजे 8 वाजता जाग आली. कालचा गुलमर्ग चा हँगओव्हर अजूनही गेला नव्हता. शरीर थकलं होतं.
आजचा आमचा दिवस ऑप्शनल होता, दुधपथरी किंवा सोनमर्ग..
चाय पे चर्चा करून आम्ही सर्वांनीच या दोन्ही वर काट मारली.दोन्हीकडे जाण्यासाठी कमीत कमी 2 तास प्रवास म्हणजे जाऊन येऊन 4 तास प्रवास करावा लागणार होता आणि अजून आम्हाला शंकराचार्य मंदिर आणि लाल चौक भेट आणि खरेदी अशा दोन गोष्टी करायच्या होत्या.
ही ट्रिप ठरवतानाच असे मनातून ठरवले होते की जास्त दगदग करून प्रत्येक गोष्ट बघायचा अट्टाहास करायचा नाही.जिथे आहोत ते ठिकाण एन्जॉय करायचे.
पहाटे 5 - 5.30 ला उठवून, ट्रिप मधले प्रत्येक ठिकाण टिक मार्क करत दाखवणाऱ्या ट्रॅव्हल कंपन्यांची आणि आमची कुंडली कधी जुळू शकेल असे आम्हाला वाटत नाही ( एकवेळ मी करू शकेन मॅनेज.. तशी मी समजूतदार आहे 😆 ) पण नवरा आणि मुलगी अशा ट्रिप ला नेलं तर एकाच दिवसात पळून जातील 🤣
त्यामुळे आम्ही अशा customized टूर चा पर्याय निवडला होता.
पटापट आवरून शंकराचार्य मंदिरात जायला निघालो.
शंकराचार्य मंदिर एका टेकडी वर आहे त्याला शंकराचार्य टेकडी म्हणतात. अर्धी टेकडी चढून गेलो तर ट्राफिक जाम सुरू.
यंदा आम्ही काश्मीर ट्रिप बुक केल्यापासून अचानक सगळे ओळखीपाळखी चे लोक, मित्र मैत्रिणी या सगळ्यांच्या स्टेटस वर काश्मीर चेच फोटो दिसायला लागले होते.😆 सगळेच अचानक काश्मीर ला जात होते.वर्तमानपत्रात काश्मीर मधील रेकॉर्ड ब्रेक गर्दी वगैरे बातम्या येऊ लागल्या. हे सगळं सगळं खरंच होतं कारण काश्मीर मध्ये कुठेही जा, लांबलचक लाईन आणि गर्दी असायचीच. आणि सगळ्यात गम्मत म्हणजे आम्हाला पहलगाम आणि गुलमर्ग च्या ऐन बर्फ़ात अगदी पुण्यातले ओळखीचे लोक सुद्धा भेटले. ( सारसबागेत सुद्धा ओळखीचे लोक भेटत नाहीत राव कधी पण काश्मीर ला भेटले 😆) फारच विषयांतर झालं असो.
तर शंकराचार्य टेकडी चढायला ट्राफिक जाम मुळे वेळ गेला. मंदिराच्या पायथ्याशी चेकिंग वगैरे झाल्यावर पायऱ्या चढायला सुरू केले. सुमारे 200-250 पायऱ्या चढून वर पोचलो. सुंदर असं दगडात बांधलेलं हे शिवमंदिर आहे.
हे मंदिर सम्राट अशोकाच्या मुलाने बांधले असे मानले जाते.
मंदिरात अत्यंत सुंदर असे चमकदार काळ्या पाषाणातले सुमारे 4 फूट उंचीचे भव्य शिवलिंग आहे.
मंदिराच्या आवारातून संपूर्ण श्रीनगराचे अप्रतिम दृश्य दिसते.विस्तीर्ण पसरलेला दल लेक, शिकारे, हाऊसबोटी, सुंदर रंगीत घरे, शहरात फिरून वाहणारी झेलम नदी,हिरवेगार डोंगर असे अप्रतिम दृश्य वरून दिसते. 🏞️
मंदिराचे आवारात चिनार ची सुंदर झाडे आहेत. संपूर्ण परिसर प्लॅस्टिकमुक्त ठेवला आहे. खाली चेक पॉईंट पाशी सर्वांच्या सामानाची कसून तपासणी होते आणि प्लॅस्टिक वस्तू तिथेच ठेवून यावे लागते.
आद्य शंकराचार्य हिंदू धर्माच्या प्रचारासाठी पूर्ण भारतभर पायी फिरले होते. तेव्हा फिरत फिरत काश्मीर ला पोचले होते. या ठिकाणी त्यांनी तप केला होता असे मानले जाते. जिथे त्यांनी तप केला ती दगडात कोरलेली गुहा सुद्धा आहे.
या मंदिराच्या परिसरातून जाऊच नये असे वाटत होते.आम्ही तिथे बराच वेळ रेंगाळलो. संपूर्ण श्रीनगर पुन्हा पुन्हा डोळ्यात आणि कॅमेरा मध्ये साठवून ठेवले. आणि मग मंदिराच्या पायऱ्या उतरायला सुरू केले. तोवर छान भुरभुर पाऊस सुरू झालाच होता.
खूप भूक लागली होती.
"आज मी रोटी भाजी किंवा कुठलाच भारतीय पदार्थ खाणार नाही" असे मधुजा ने आधीच जाहीर केले होते.
त्यामुळे दल रोड वरती एक इटालियन पदार्थ मिळणाऱ्या हॉटेल मध्ये गेलो. पास्ता ,पिझ्झा खाऊन सर्वांनी पोट शांत केले.
आता मोर्चा वळवला लाल चौकाकडे..
लाल चौक, श्रीनगर .. अनेक कारणांनी वर्तमानपत्रात सतत चर्चेत असणारी जागा.. याला ऐतिहासिक महत्त्व आहे त्यामुळे इथे नक्की भेट द्यायलाच हवी होती.
आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे खरेदी.. लाल चौक आणि इथल्या सगळ्या गल्ल्या काश्मिरी वस्तूंनी ओसंडून वाहतात. 100 रुपयांच्या कलाकुसर केलेल्या पर्स पासून अगदी एक लाख रुपयांच्या अस्सल पष्मीना शालिपर्यंत इथे अनेक वस्तू मिळतात.
पर्स, नाजूक धाग्याने कशिदाकाम केलेले ड्रेस मटेरियल, साड्या, पडदे, बेडशीट, पाईन आणि अक्रोड लाकडाच्या वस्तू, सुकामेवा, केसर,स्वेटर, टोप्या, शाली अशा अनेक वस्तू इथे मिळतात. सुमारे 2 तास तिथे मनसोक्त शॉपिंग केले. शेवटी पायाने असहकार पुकारला तेव्हा हॉटेल चा रस्ता धरला.
आज श्रीनगर मधली शेवटची संध्याकाळ. उद्या सकाळी परत निघायचे होते. रुम वर जाऊन थोडा आराम केला. आता पाऊस जोरातच सुरू झाला होता.
संध्याकाळी हॉटेल च्या आसपास चक्कर मारली. आमच्या हॉटेल जवळ एक संपूर्ण लाकडात बांधलेला सुरेख पूल होता. तिकडे जाऊन आलो. हा फक्त पादचारी पूल होता, त्यावर सुरेख गझिबो आणि छानपैकी लायटिंग केलेले होते. नदीवरून गार वारा वाहत होता. सुरेख ट्रिप ची सुंदर सांगता होत होती..
हॉटेल वर परत येऊन सामानाची बांधाबांध केली.आणि झोपेच्या स्वाधीन झालो.
-- क्रमशः





No comments:

Post a Comment