Monday, July 11, 2022

काश्मीर डायरीज - 8

 काश्मीर डायरीज - 8

आमचे परतीचे विमान 11 वाजता होते पण श्रीनगर विमानतळावर आर्मी तर्फे कडेकोट चेकिंग असते त्यामुळे सकाळी 7.30 लाच हॉटेल सोडले. वाटेत चहा नाश्ता करून विमानतळावर वेळेत पोचलो. सर्व चेकिंग च्या चक्रातून जाऊन 9 वाजता बोर्डिंग गेट पाशी पोचलो होतो. बरोबर 11 वाजता विमान आकाशात झेपावले. श्रीनगर शहराला मनातल्या मनात "येतो रे" असे म्हणत टाटा केले.
खरंतर ही डायरी कालच संपली असती. पण तरी काश्मीर बद्दल मला जाणवलेल्या आणि आधीच्या कोणत्याही लेखात उल्लेख न केलेल्या काही सुटलेल्या गोष्टी लिहून ठेवाव्यात असे वाटले म्हणून हे अजून एक पान.
श्रीनगर विमानतळावर उतरलो की एकदम वेगळी जाणवणारी गोष्ट म्हणजे सर्व ठिकाणी दिसणारे इंडियन आर्मी आणि CRPF चे सज्ज जवान.
डोळ्यात तेल घालून प्राणपणाने सर्व ठिकाणी लक्ष द्यायला ते सज्ज आहेत. विमानतळावर आणि विमानतळाच्या बाहेर पडलो की दर 10-15 फुटावर बंदूकधारी जवान दिसतोच.सतत पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस गाड्यांचे आवाज येत जात असतात.
सुरवातीला जरा दचकायला होतं पण नंतर सवय होते आणि मग काही वेळाने त्यांच्यामुळे सुरक्षित वाटायला लागतं.
रस्त्याच्या कडेला भरगच्च फुललेला गुलाबाचा ताटवा आणि त्याच्या मध्यभागी उभा असलेला बंदूकधारी जवान बघून एक क्षणी खुदकन हसू आणि दुसऱ्या क्षणी त्यातला विरोधाभास जाणवतो.
लहान लहान मुलांच्या शाळेबाहेर आणि शाळेच्या आत सुद्धा जवानांची फौज राखण करत असलेली बघुन नक्की काय भावना मनात आहेत ते कळतच नाही. बाग असुदेत की मंदिर सर्व ठिकाणी आर्मी आणि CRPF सज्ज आहे.
काश्मीर इतकं इतकं सुंदर आहे, त्यामुळेच की काय, आपल्या सर्वात देखण्या लेकीचं वाईट लोकांपासून डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या बापाची भूमिका भारतीय सेना पार पाडते आहे कदाचित.
एरव्ही वर्तमानपत्रात येणारे राजौरी, पुलावामा, उरी अशा
गावांच्या नावांचे बोर्ड रस्त्यात दिसतात आणि क्षणभर काळजाचा ठोका चुकतोच.पण हे सगळं असलं तरी तिथल्या लोकांचं वागणं बोलणं अत्यंत नॉर्मल असल्याने पेपर मध्ये येणारं काश्मीर वेगळंच वाटतं आणि प्रत्यक्षात एक सुंदर पर्यंटनस्थळच वाटतं.
काश्मिरी लोकांशी अवघड विषयांबाबत बोलायचे आम्ही कटाक्षाने टाळले. मुळातच हे सर्व काश्मिरी लोक पर्यटकांशी अत्यंत प्रेमाने, आदराने, आपुलकीने वागतात.उगीच नको ते विषय काढण्यात आम्हाला पण रस नव्हता.
श्रीनगर बद्दल पेपर मध्ये वाचून जी प्रतिमा मनात होती त्याच्या एकदम वेगळंच श्रीनगर आहे. आपल्या पुण्यासारखच मोठं शहर, सर्व मोठ्या ब्रँड्स ची दुकानं, हॉटेल सर्व एकदम नॉर्मल. अर्थात ही परिस्थिती राखण्यात आर्मी चा हात असणारच पण त्यावर भाष्य करणे हा या लेखाचा विषय नाही.
श्रीनगर मध्ये NIT, NIFT सारखी टॉप रेटेड कॉलेजेस आहेत.आम्हाला एकदा चक्क नागपूर हुन श्रीनगर NIFT ला शिकायला आलेला एक मुलगा भेटला.महाराष्ट्रातून आणि संपूर्ण देशातून भरपूर विद्यार्थी तिथे येतात असे त्या मुलाने सांगितले.
आम्ही जिथे जिथे फिरत होतो त्या ठिकाणी स्थानिक काश्मिरी कुटुंबे मोठ्या संखेने दिसली.
आम्ही ज्या ज्या बागांमध्ये गेलो तिथे अनेक स्थानिक काश्मिरी कुटुंबे फिरायला, पिकनिक ला आलेली होती. ठळक लक्षात येणारी गोष्ट म्हणजे हे लोक सोबत खाण्यापिण्याचे सामान , अगदी छोटी पोर्टेबल गॅस शेगडी आणि कुकर घेऊन आलेले दिसले. तिथे हिरवळीवर मस्त स्वयंपाक करून जेवणे चालू होती. बेताब व्हॅली मध्ये आणि अरु व्हॅली ला जायच्या रस्त्यावर अशी अनेक कुटुंबे आम्हाला दिसली. स्थानिक काश्मिरी लोक हॉटेल मध्ये फारसे दिसत नव्हते त्यामुळे त्यांना बाहेर जेवायला विशेष आवडत नसावे.
काश्मीरी लोक आपल्या कोकणी लोकांपेक्षा जास्त भात खाऊ आहेत असे जाणवले. श्रीनगर मध्ये मुघल दरबार मध्ये आलेले काही जण नुसताच भात आणि रस्सा ओरपत होते. रोटी वगैरे खाणारे जास्त करून पर्यटकच पाहिले.
सगळे च्या सगळे काश्मिरी एकजात देखणे, लालसर गोरे आणि सरळसोट नाकाचे होते. इतके दिवसात नकट्या नाकाचा एकही काश्मिरी मलातरी दिसला नाही 😆. आणि काश्मिरी स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल तर काय बोलू. सगळ्याजणी इतक्या देखण्या होत्या की बस रे बस.काश्मीर चं सगळं सौंदर्य तिथल्या लोकांत पण उतरलं आहे.
काश्मीर पॅकेज निवडताना आम्ही जेव्हा सगळ्या फेमस ट्रॅव्हल कंपनीज चा अभ्यास केला तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही ग्रुप टूर करू शकणार नाही.त्यांच्या टूर आमच्यासाठी हेक्टिक कॅटेगरी च्या होत्या आणि आमच्या बजेट मध्ये पण नव्हत्या 😉
मग दुसरा पर्याय होता स्वतः सर्व प्लॅन करणे. पण काश्मीर सारख्या ठिकाणी स्वतःच्या प्लॅनिंग ने जाणे मनाला पटेना. कोणीतरी आपली काळजी घेणारे ,अडीअडचणीला मदत करणारे असणे गरजेचे आहे असे वाटले.
फेसबुक वर श्रीनगर मधील लोकल टूर कंपनी काश्मीर हेवन्स चा पर्याय मिळाला आणि त्यांच्याशी बोलले तेव्हा ते लोक खूप प्रोफेशनल आहेत हे जाणवले.Kashmir Heavens चे शाहिद वाणी आणि त्यांची टीम श्रीनगर मधीलच असल्याने पूर्ण itinerary बनवताना आम्हाला खूप मदत झाली. आम्ही अचानक केलेले सगळे बदल देखील त्यांनी शांतपणे मान्य केले.
KHAB ट्रॅव्हल्स च्या सर्वच टीम ने आमची अतिशय व्यवस्थित काळजी घेतली.
त्यांचे फेसबुक पेज
अनेक वर्षांपासून काश्मीर ला जायचे स्वप्न पूर्ण झाले.
अजूनही रात्री डोळे मिटले की पहलगाम ची हिरवीगार कुरणे दिसतात, लीडर नदीचा खळखळाट ऐकू येतो, गुलमर्ग चे शुभ्र बर्फ़ाचे डोंगर दिसतात, कहावा ची आठवण येते.
काश्मीर असं एका भेटीत कळणार नाही...तिथे परत परत जावंच लागणार...
अमीर खुसरो म्हणतो तसं...
आगर फिरदौस बार रू-ए-ज़मीन अस्त,
हमीन अस्त-ओ हमीन अस्त-ओ हमीन अस्त।
अगर धरती पर कहीं जन्नत है,
यही है, यही है, यही है
या सगळ्या लेखांच्या निमित्ताने परत एकदा मनाने तोच प्रवास करून आले. तुम्ही सर्वांनी माझ्या या नवीन प्रयत्नाचे खुप कौतुक केले त्याबद्दल ऋणी आहे.
असाच लोभ असू द्यावा.
-- इति लेखनसीमा

No comments:

Post a Comment