Wednesday, April 15, 2009

खमंग,खुसखुशीत,खुमासदार थालिपीट...आणि पौष्टिकसुद्धा...


प्रसंग १ :
पावसाळ्याचे दिवस आहेत....आपण मुसळधार पावसातुन भिजत भिजत नुकतेच घरी आणि त्यातही माहेरी...पोचलो आहोत...आता २ दिवस माहेरी आराम म्हणून आपण जाम म्हणजे जाम खुष आहोत ...कॄपया लग्न झालेल्या पुरुषांनी दातओठ खाउ नयेत बायकोला कधीकधी माहेरी जाउ द्यावे (ह.ध्या.)...आज शुक्रवार आहे ...म्हणजे आता २ दिवस मज्जा ..आपण घरात येतो..मस्त फ्रेश होउन कपडे बदलतो....आणि आई भूक असं ओरडत स्वयंपाकघरात घुसतो....आणि गरम गरम...वाफाळत्या..खमंग थालिपीटाची डिश हातात येते ...
प्रसंग २:
मस्त गुलाबी थंडीचे दिवस आहेत...आपण पहाटे पहाटे ( प्रत्येकाने स्वतःला झेपत असलेली वेळ वाचावी ..)मस्त फिरुन वगैरे आलेलो आहोत (कधी नव्हे ते ...)घरी पोचताच आपल्या लाडक्या "आई" (म्हणजे सासुबाई...सुज्ञांना कळलेच असेल म्हणा..) आपल्यासमोर गरम गरम..खुसखुशीत थालिपीट घेउन येतात...आहाहा..
प्रसंग ३:
उन्हाळ्याचे दिवस आहेत...आमरस-पुरी वरपुन ४-५ तास झालेले आहेत्..मस्त झोप झालेली आहे....५ वाजता जाग येते आणि आता काहितरी खमंग ,चमचमीत ,तिखटं खायची इच्छा होते....मग आपण मस्तपैकी थालिपीट बनवायला घेतो.. (आई झाली,सासुबाई झाल्या ..आता कोणाला आणायचं इथे, असा विचार करताना..आज्जी डोळ्यांपुढे आली...पण मग तुम्हाला वाटेल कि हि स्मिता स्वतः काही करते कि नाही..म्हणुन या स्टोरीत मीच घुसले )..त्या खमंग वासाने मन भरुन येते ( आणि थोड्यावेळाने पोटही..)
तर मंडळी ...सांगायचा मुद्दा हा..कि कुठल्याही ॠतुत फिट होणारं हे थालिपीट...
साहित्यः२ वाटी ज्वारीचे पीठ२ चमचे कणिक२ चमचे डाळीचे पीठ१/२ वाटी रवाथालिपीटाची भाजाणी असेल तर अजुनच उत्तम.....
३-४ हिरवी मिर्ची + ७-८ पाकळ्या लसुण याचे वाटणंचवीनुसार तिखट,मीठहळद,ओवा,हिंग..
आणि सगळ्यात महत्वाचे...भरपुर भाज्या..२ कांदे बारीक चिरुन,१ वाटी मेथी बारीक चिरुन,१ गाजर खिसुन,थोडा खिसलेला कोबी,मुळ्याची कोवळी पाने चिरुन,कोथिंबीर,
थोडक्यात काय तर शक्य होइल तेवढा पालापाचोळा.......अगदीच शेपु ,कारलं वगैरे नको बरका...असो..
आता कॄती: अगदीच शिंपल आहे हो....वरील सगळेच्या सगळे पदार्थ एकत्र करायचे...पाण्याचा वापर करुन ( किवा शिळी आमटी /वांग्याची भाजी अश्या गोष्टी पण खपुन जातात्.. नव्हे..मस्तच लागतात...)थालिपिटाचा गोळा भिजवायचा...आणि तव्यावर भरपुर तेल सोडुन खरपुस भजुन घ्यायचं...
आणि मग्.....लोणी,दही,लोणचं,चटणी,सॉस,तुप....जे आवडेल त्यासोबत खायला सुरुवात करावी.


1 comment:

  1. प्रसंग आणि वेळ कुठलेही असोत आपल्याला तर कायमच भूक लागलेली असते ... माझा सुद्धा एक छोटासा खाद्य ब्लॉग आहे... जमल तर चक्कर मारा तिकडे. :D

    ReplyDelete