Saturday, October 1, 2022

गळाभेट

 दोन वर्षांनी वारी होतेय, देवाच्या ओढीने लाखो वारकऱ्यांचा समुदाय पंढरपूर कडे निघालाय.

दोन वर्षात खूप काही घडलंय. देवाला भेटायचंय, बरंच काही सांगायचंय, मन शांत करायचंय अशी सगळ्याच माऊलींची मनस्थिती असेल. तिकडे मंदिरात देवाची अवस्था काही वेगळी नसणार.

मंदिरात विठुरायाची अस्वस्थ लगबग रखुमाई बघतेय.माऊलींचा जयघोष करत आज सगळ्या दिंड्या, पालख्या पंढरपूर च्या वेशी ला पोचल्यात.

विठ्ठल आणि रखुमाई मध्ये काय संवाद होत असेल याक्षणी ? 

आज सकाळी माउलींनी हे लिहून घेतलं.

ते त्यांच्या चरणी अर्पण 🙏


पुंडलीक वरदा हरी विठ्ठल

श्री ज्ञानदेव तुकाराम

पंढरीनाथ महाराज की जय 


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


"काय हो विठुराया

गालातल्या गालात हसताय !

काय चाललंय मनात तुमच्या

आज मोठे खुशीत दिसताय !"


सगळं माहीत असूनही

रखुमाई देवाला म्हणाली,

स्वारीची जरा मजा करू

मनातल्या मनात हसली


काय सांगू रखुमाई तुला

आजचा दिवस आहे खास,

दोन वर्षांनी सुटणार आहे

आज माझ्या लेकरांचा उपवास 


वेशीवर आलेत म्हणे

दिंड्या आणि पालख्या घेऊन,

त्यांचं स्वागत कर बरका

गूळ आणि शेंगा देऊन


दोन वर्षे झाली गं

बाप लेकरांची भेट नाही,

मधली पोकळी भरून काढेन 

देतो बघ तुला ग्वाही


एवढ्या मोठ्या संकटा समोर

उभी राहिली धीराने

दमली असतील मंडळी आता,

शरीराने आणि मनाने


कोरोना राक्षसामुळे

घर दार कोलमडले,

डोळ्यामध्ये पाणी देऊन

सगे सोयरे सोडून गेले


संकटांवर मात करत

नव्या वाटा शोधत आहेत,

माझ्यावर भरोसा ठेवून

पुन्हा उभी राहत आहेत


एकदा गळाभेट झाली की

दिसू लागेल पुढची वाट,

नव्याने लढण्यासाठी

बळ येईल मनगटात


मी कधीचा आवरून बसलोय

तू पण तयार हो पटकन

दमून आलीत लेकरं माझी

त्यांचं करायचंय ना माहेरपण


मंदिराचा कळस बघून

कसे धावत सुटलेत थेट

मला तर असं झालंय

कधी एकदा होईल गळाभेट

कधी एकदा होईल गळाभेट


- स्मिता श्रीपाद

आषाढी एकादशी, 2022


#चैतन्यवारी #विठ्ठलविठ्ठल

गावाला वळसा

मे आणि जून महिन्यातले सगळे शनिवार रविवार एकदम happening आणि गडबडीचे गेले. प्रत्येक वीकेंड ला काही काही चालू च होतं.. 

काश्मीर ला जायच्या आधीच्या आठवड्यात ट्रिप ची तयारी, मग पुढचे 2 वीकेंड काश्मीर, त्यानंतर कराड भेट, सुट्टी संपत आली तशी उरलीसुरली get-togethers मग शाळेची तयारी एक ना दोन अनेक कारणं .. शेवटी शेवटी तर इतकं दमायला झालं की "जब वुई मेट" मधल्या गीत सारखं मी म्हणून टाकलं, "भगवानजी ये happening विकेन्ड्स बोहोत हो गए , अब बिलकुल बोरिंग बना दो जी आगे आने वाले विकेन्ड्स को" आणि काय आश्चर्य भगवानजी नी पण एकदम ऐकलंच आमचं.. 

जून चे शेवटचे दोन शनिवार रविवार 'तसे' शांततेत गेले. फार काही हेक्टिक नव्हतं. 

आणि जुलै चा पहिला वीकेंड उजाडला तसं चुकल्याचुकल्या सारखं वाटायला लागलं.🙄

काहीच म्हणजे काहीच प्लॅन कसा काय नाही बनला बुवा ? 

कायतरी चुकतंय असं मन म्हणायला लागलं.

त्यात आणि सोशल मीडिया वर पब्लिक ने " काय झाडी, काय डोंगार,काय हाटील.." करत पावसाळी सहलीचे फोटो टाकायला सुरू केले होते... 

टी व्ही बघायचा पण वैताग आला.. तिकडचं राजकारणचं गुर्हाळ काही संपेनाच.. सारख्याच ब्रेकिंग न्युज आणि भूकंप..

रविवारी शेवटी कंटाळून लेक म्हणाली, "आई चल की कुठंतरी फिरायला जाऊ.. लॉंग ड्राइव्ह ला जाऊन येऊ"

बासच... तूच ग ..तूच माझी लाडकी लेक..टुणकन उडी मारून उठलेच..

मी आशेने नवऱ्याकडे पाहिलं पण तो बिचारा 4 दिवसाच्या viral fever मधून आज कुठे जरा बरा दिसत होता. आणि नुकतंच रविवार चा भक्कम नाश्ता करून पेंगायला लागला होता. त्याची दया आली.. त्यामुळे त्याला जास्त कटकट केली नाही.. (किती चांगली बायको आहे बघा मी 😉)

पटकन आवरून आम्ही दोघी बाहेर पडलो.. काहीही न ठरवता पुण्यात फिरून येऊ असा प्लॅन होता.. मनू ला म्हणलं, चल तू भी क्या याद रखेगी.. तुला आज पुणे दाखवते 🤗🤗

संतोष हॉल वरून सरळ जात थेट सारसबागेच्या दिशेने निघालो. बाहेर रस्त्यावर उभे राहूनच बाप्पा ला नमस्कार घातला. लक्ष्मी रोड ला जाऊ आणि भटकू असं डोक्यात होतं म्हणून बाजीराव रोड वर गाडी घेतली.. आणि महापालिकेचा निळा बोर्ड दिसला.. "शनिवारवाडा"

युरेका झालं एकदम.. थेट शनिवार वाड्याच्या पार्किंग मध्ये जाऊनच थांबलो.

रविवार असल्यामुळे बरीच गर्दी होती. पुण्यात येऊन मला इतकी वर्षे झाली पण शनिवार वाडा कधीच आतून पाहिला नव्हता. पूर्वी गुडीपाडवा ते रामनवमी दरम्यान दगडूशेठ गणपती महोत्सव शनिवारवाड्यासमोरच्या प्रांगणात होत असे.तेव्हा 9 दिवस न चुकता आम्ही हजेरी लावायचो. श्रीधर फडके, अरुण दाते, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांचे कार्यक्रम तिथे पाहिले आहेत. पण वाडा आतून कसा आहे हे कधी पाहिलेच नव्हते. तिथे पोचल्यावर त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि थोडं नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. 😊

उन्हाळ्याच्या सुरुवातीचे दिवस, संध्याकाळी थंडगार वारं सुटलेलं असायचं, आजूबाजूला रसिक गर्दी असायची , मोगऱ्याचा वास सुटलेला असायचा आणि समोर शनिवार वाड्याच्या साक्षीने मोठे मोठे कलाकार कला सादर करायचे. आम्ही चक्क छोटी डायरी आणि पेन घेऊन जायचो तिथे.. एखादी नवीन आवडलेली कविता, गाण्याचे शब्द लगेच उतरवून घ्यायचो. शेवटच्या दिवशी पंडितजींची मैफल "भावसरगम" म्हणजे कळसाध्याय. आहाहा.. किती सुंदर दिवस होते ते.. 😍

आजूबाजूच्या गर्दीने परत वर्तमानात आणलं.

फक्त 25 रुपये तिकीट (परदेशी लोकांना 300 रुपये फक्त 🤔) काढून आत शिरलो. शनिवारवाड्याचे सुंदर भव्य प्रांगण, उत्तम राखलेले लॉन, जागोजागी माहितीफलक असं चित्र समोर आलं. आत भरपूर मोठं आवार, वाड्याचं मूळ दगडी जोतं आहे. 9 बुरुज आणि 5 दरवाजे असलेली भक्कम दगडी तटबंदी आहे. मूळ वाडा जळून गेला तरी अजूनही जे शिल्लक आहे तेसुद्धा सुंदरच आहे. 

भन्साळी कृपेने मुलांना श्रीमंत बाजीराव पेशवे, महाराणी काशीबाई आणि मस्तानीबाई माहिती आहेत पण बाकी नावे तिकडे गेल्यावर लेकीला कळली, "काका मला वाचवा" ची गोष्ट उत्सुकतेने ऐकली. प्रत्येक महालाचे अवशेष बघून खरा महाल कसा असेल त्याची कल्पना करून झाली. महालाच्या आत 2-3 फूट खोल चौकोनी दगडी बांधीव असे खड्डे बघून याचं काय प्रयोजन असेल अशी चर्चा करून झाली.नहाणीघरासारखी दगडांनी बांधीव अशी ती जागा बघून, अगं बहुतेक ही त्यांची बाथरूम असेल असं मी बोलून गेले तर "अंघोळीला रोज अशी खड्ड्यात उडी मारेल का कोणी?" असं म्हणून भरपूर हसून झालं.एकंदर लेक खूप खुश झाली. प्रत्येक खड्ड्यात उतरून चढून झालं. तटबंदीवरुन चालत चालत मुख्य बुरुज आणि इमारतीच्या वरच्या मजल्यावर गेलो. तिथून भव्य पसरलेलं प्रांगण दिसत होतं. ऐन भरात असताना ची पेशवाई ची श्रीमंती काय असेल असं वाटून गेलं.

माझ्या मते खरा शनिवार वाडा हा अजून जास्त पसरलेला असणार आहे कारण सदाशिवराव भाऊंचा महाल म्हणून जेमतेम 15 x 25 ची जागा असूच शकत नाही. पण असुदेत. जे गेलं ते गेलं.. जे उरलं आहे ते छान जपलं आहे पालिकेने. ही जागा एखाद्या माहितगार इतिहासतज्ञ व्यक्तीसोबत परत बघायला मला फार आवडेल. 

या वाड्याने किती आनंद आणि दुःखाचे प्रसंग सहन केले असतील. किती घाव सोसले असतील. जुनी जाणती माणसं गेली आणि आता वाडा एकटा पडला.

वाड्याच्या प्रांगणात "भावसरगम" कार्यक्रम करताना जेव्हा हृदयनाथ मंगेशकर "दयाघना.." किंवा "घर थकलेले संन्यासी.." म्हणत असतील तेव्हा हा वाडा रडत असेल का ? 

या कवितांचे/गाण्यांचे अर्थ तेव्हा कळत नव्हते तेच बरं होतं नाहीतर वाड्याच्या समोर ही गाणी ऐकवली नसती मला.

चालून चालून पाय थकल्यावर बाहेर पडलो. अजून फिरायचा उत्साह आहे का विचारलं तर पोरगी हो म्हणाली.. तिकडून बाहेर पडून सरळ जंगली महाराज मठासमोर गाडी नेली. दुपारच्या शांत वेळी दर्शन घेऊन तिकडून थेट पाताळेश्वर लेणी गाठली. शंकराचं दर्शन घेऊन दगडी सभामंडपात थोडावेळ शांत बसलो. त्रिपुरी पौर्णिमेच्या वेळी इथे परत यायचं ठरवलं आम्ही. आता भूक आणि कंटाळा सगळंच जाणवायला लागलं. 

समोरच पुण्यातलं आणखी एक आद्य प्राचीन ठिकाण दिसलं आणि "हॉटेल पांचाली" मध्ये पोचलो.😄 पोटपूजा करून घर गाठलं.

लॉंग ड्राइव्ह साठी मुळशी, लोणावळा किंवा खडकवासला सोडून आपल्या पुण्यात अजून खूप गोष्टी आहेत हे इतक्या दिवसात का बरं लक्षात आलं नाही आपल्या असं घरी आल्यावर वाटून गेलं. 

असुदेत.. देर आए दुरुस्त आए... 😄

अशा रीतीने एक रविवार सार्थकी लागला 🥰

- स्मिता श्रीपाद


Monday, July 11, 2022

काश्मीर डायरीज - 8

 काश्मीर डायरीज - 8

आमचे परतीचे विमान 11 वाजता होते पण श्रीनगर विमानतळावर आर्मी तर्फे कडेकोट चेकिंग असते त्यामुळे सकाळी 7.30 लाच हॉटेल सोडले. वाटेत चहा नाश्ता करून विमानतळावर वेळेत पोचलो. सर्व चेकिंग च्या चक्रातून जाऊन 9 वाजता बोर्डिंग गेट पाशी पोचलो होतो. बरोबर 11 वाजता विमान आकाशात झेपावले. श्रीनगर शहराला मनातल्या मनात "येतो रे" असे म्हणत टाटा केले.
खरंतर ही डायरी कालच संपली असती. पण तरी काश्मीर बद्दल मला जाणवलेल्या आणि आधीच्या कोणत्याही लेखात उल्लेख न केलेल्या काही सुटलेल्या गोष्टी लिहून ठेवाव्यात असे वाटले म्हणून हे अजून एक पान.
श्रीनगर विमानतळावर उतरलो की एकदम वेगळी जाणवणारी गोष्ट म्हणजे सर्व ठिकाणी दिसणारे इंडियन आर्मी आणि CRPF चे सज्ज जवान.
डोळ्यात तेल घालून प्राणपणाने सर्व ठिकाणी लक्ष द्यायला ते सज्ज आहेत. विमानतळावर आणि विमानतळाच्या बाहेर पडलो की दर 10-15 फुटावर बंदूकधारी जवान दिसतोच.सतत पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस गाड्यांचे आवाज येत जात असतात.
सुरवातीला जरा दचकायला होतं पण नंतर सवय होते आणि मग काही वेळाने त्यांच्यामुळे सुरक्षित वाटायला लागतं.
रस्त्याच्या कडेला भरगच्च फुललेला गुलाबाचा ताटवा आणि त्याच्या मध्यभागी उभा असलेला बंदूकधारी जवान बघून एक क्षणी खुदकन हसू आणि दुसऱ्या क्षणी त्यातला विरोधाभास जाणवतो.
लहान लहान मुलांच्या शाळेबाहेर आणि शाळेच्या आत सुद्धा जवानांची फौज राखण करत असलेली बघुन नक्की काय भावना मनात आहेत ते कळतच नाही. बाग असुदेत की मंदिर सर्व ठिकाणी आर्मी आणि CRPF सज्ज आहे.
काश्मीर इतकं इतकं सुंदर आहे, त्यामुळेच की काय, आपल्या सर्वात देखण्या लेकीचं वाईट लोकांपासून डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या बापाची भूमिका भारतीय सेना पार पाडते आहे कदाचित.
एरव्ही वर्तमानपत्रात येणारे राजौरी, पुलावामा, उरी अशा
गावांच्या नावांचे बोर्ड रस्त्यात दिसतात आणि क्षणभर काळजाचा ठोका चुकतोच.पण हे सगळं असलं तरी तिथल्या लोकांचं वागणं बोलणं अत्यंत नॉर्मल असल्याने पेपर मध्ये येणारं काश्मीर वेगळंच वाटतं आणि प्रत्यक्षात एक सुंदर पर्यंटनस्थळच वाटतं.
काश्मिरी लोकांशी अवघड विषयांबाबत बोलायचे आम्ही कटाक्षाने टाळले. मुळातच हे सर्व काश्मिरी लोक पर्यटकांशी अत्यंत प्रेमाने, आदराने, आपुलकीने वागतात.उगीच नको ते विषय काढण्यात आम्हाला पण रस नव्हता.
श्रीनगर बद्दल पेपर मध्ये वाचून जी प्रतिमा मनात होती त्याच्या एकदम वेगळंच श्रीनगर आहे. आपल्या पुण्यासारखच मोठं शहर, सर्व मोठ्या ब्रँड्स ची दुकानं, हॉटेल सर्व एकदम नॉर्मल. अर्थात ही परिस्थिती राखण्यात आर्मी चा हात असणारच पण त्यावर भाष्य करणे हा या लेखाचा विषय नाही.
श्रीनगर मध्ये NIT, NIFT सारखी टॉप रेटेड कॉलेजेस आहेत.आम्हाला एकदा चक्क नागपूर हुन श्रीनगर NIFT ला शिकायला आलेला एक मुलगा भेटला.महाराष्ट्रातून आणि संपूर्ण देशातून भरपूर विद्यार्थी तिथे येतात असे त्या मुलाने सांगितले.
आम्ही जिथे जिथे फिरत होतो त्या ठिकाणी स्थानिक काश्मिरी कुटुंबे मोठ्या संखेने दिसली.
आम्ही ज्या ज्या बागांमध्ये गेलो तिथे अनेक स्थानिक काश्मिरी कुटुंबे फिरायला, पिकनिक ला आलेली होती. ठळक लक्षात येणारी गोष्ट म्हणजे हे लोक सोबत खाण्यापिण्याचे सामान , अगदी छोटी पोर्टेबल गॅस शेगडी आणि कुकर घेऊन आलेले दिसले. तिथे हिरवळीवर मस्त स्वयंपाक करून जेवणे चालू होती. बेताब व्हॅली मध्ये आणि अरु व्हॅली ला जायच्या रस्त्यावर अशी अनेक कुटुंबे आम्हाला दिसली. स्थानिक काश्मिरी लोक हॉटेल मध्ये फारसे दिसत नव्हते त्यामुळे त्यांना बाहेर जेवायला विशेष आवडत नसावे.
काश्मीरी लोक आपल्या कोकणी लोकांपेक्षा जास्त भात खाऊ आहेत असे जाणवले. श्रीनगर मध्ये मुघल दरबार मध्ये आलेले काही जण नुसताच भात आणि रस्सा ओरपत होते. रोटी वगैरे खाणारे जास्त करून पर्यटकच पाहिले.
सगळे च्या सगळे काश्मिरी एकजात देखणे, लालसर गोरे आणि सरळसोट नाकाचे होते. इतके दिवसात नकट्या नाकाचा एकही काश्मिरी मलातरी दिसला नाही 😆. आणि काश्मिरी स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल तर काय बोलू. सगळ्याजणी इतक्या देखण्या होत्या की बस रे बस.काश्मीर चं सगळं सौंदर्य तिथल्या लोकांत पण उतरलं आहे.
काश्मीर पॅकेज निवडताना आम्ही जेव्हा सगळ्या फेमस ट्रॅव्हल कंपनीज चा अभ्यास केला तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही ग्रुप टूर करू शकणार नाही.त्यांच्या टूर आमच्यासाठी हेक्टिक कॅटेगरी च्या होत्या आणि आमच्या बजेट मध्ये पण नव्हत्या 😉
मग दुसरा पर्याय होता स्वतः सर्व प्लॅन करणे. पण काश्मीर सारख्या ठिकाणी स्वतःच्या प्लॅनिंग ने जाणे मनाला पटेना. कोणीतरी आपली काळजी घेणारे ,अडीअडचणीला मदत करणारे असणे गरजेचे आहे असे वाटले.
फेसबुक वर श्रीनगर मधील लोकल टूर कंपनी काश्मीर हेवन्स चा पर्याय मिळाला आणि त्यांच्याशी बोलले तेव्हा ते लोक खूप प्रोफेशनल आहेत हे जाणवले.Kashmir Heavens चे शाहिद वाणी आणि त्यांची टीम श्रीनगर मधीलच असल्याने पूर्ण itinerary बनवताना आम्हाला खूप मदत झाली. आम्ही अचानक केलेले सगळे बदल देखील त्यांनी शांतपणे मान्य केले.
KHAB ट्रॅव्हल्स च्या सर्वच टीम ने आमची अतिशय व्यवस्थित काळजी घेतली.
त्यांचे फेसबुक पेज
अनेक वर्षांपासून काश्मीर ला जायचे स्वप्न पूर्ण झाले.
अजूनही रात्री डोळे मिटले की पहलगाम ची हिरवीगार कुरणे दिसतात, लीडर नदीचा खळखळाट ऐकू येतो, गुलमर्ग चे शुभ्र बर्फ़ाचे डोंगर दिसतात, कहावा ची आठवण येते.
काश्मीर असं एका भेटीत कळणार नाही...तिथे परत परत जावंच लागणार...
अमीर खुसरो म्हणतो तसं...
आगर फिरदौस बार रू-ए-ज़मीन अस्त,
हमीन अस्त-ओ हमीन अस्त-ओ हमीन अस्त।
अगर धरती पर कहीं जन्नत है,
यही है, यही है, यही है
या सगळ्या लेखांच्या निमित्ताने परत एकदा मनाने तोच प्रवास करून आले. तुम्ही सर्वांनी माझ्या या नवीन प्रयत्नाचे खुप कौतुक केले त्याबद्दल ऋणी आहे.
असाच लोभ असू द्यावा.
-- इति लेखनसीमा

काश्मीर डायरीज - 7

 काश्मीर डायरीज - 7

काश्मीर मध्ये आल्यापासून आज पहिल्यांदाच उशीरा म्हणजे 8 वाजता जाग आली. कालचा गुलमर्ग चा हँगओव्हर अजूनही गेला नव्हता. शरीर थकलं होतं.
आजचा आमचा दिवस ऑप्शनल होता, दुधपथरी किंवा सोनमर्ग..
चाय पे चर्चा करून आम्ही सर्वांनीच या दोन्ही वर काट मारली.दोन्हीकडे जाण्यासाठी कमीत कमी 2 तास प्रवास म्हणजे जाऊन येऊन 4 तास प्रवास करावा लागणार होता आणि अजून आम्हाला शंकराचार्य मंदिर आणि लाल चौक भेट आणि खरेदी अशा दोन गोष्टी करायच्या होत्या.
ही ट्रिप ठरवतानाच असे मनातून ठरवले होते की जास्त दगदग करून प्रत्येक गोष्ट बघायचा अट्टाहास करायचा नाही.जिथे आहोत ते ठिकाण एन्जॉय करायचे.
पहाटे 5 - 5.30 ला उठवून, ट्रिप मधले प्रत्येक ठिकाण टिक मार्क करत दाखवणाऱ्या ट्रॅव्हल कंपन्यांची आणि आमची कुंडली कधी जुळू शकेल असे आम्हाला वाटत नाही ( एकवेळ मी करू शकेन मॅनेज.. तशी मी समजूतदार आहे 😆 ) पण नवरा आणि मुलगी अशा ट्रिप ला नेलं तर एकाच दिवसात पळून जातील 🤣
त्यामुळे आम्ही अशा customized टूर चा पर्याय निवडला होता.
पटापट आवरून शंकराचार्य मंदिरात जायला निघालो.
शंकराचार्य मंदिर एका टेकडी वर आहे त्याला शंकराचार्य टेकडी म्हणतात. अर्धी टेकडी चढून गेलो तर ट्राफिक जाम सुरू.
यंदा आम्ही काश्मीर ट्रिप बुक केल्यापासून अचानक सगळे ओळखीपाळखी चे लोक, मित्र मैत्रिणी या सगळ्यांच्या स्टेटस वर काश्मीर चेच फोटो दिसायला लागले होते.😆 सगळेच अचानक काश्मीर ला जात होते.वर्तमानपत्रात काश्मीर मधील रेकॉर्ड ब्रेक गर्दी वगैरे बातम्या येऊ लागल्या. हे सगळं सगळं खरंच होतं कारण काश्मीर मध्ये कुठेही जा, लांबलचक लाईन आणि गर्दी असायचीच. आणि सगळ्यात गम्मत म्हणजे आम्हाला पहलगाम आणि गुलमर्ग च्या ऐन बर्फ़ात अगदी पुण्यातले ओळखीचे लोक सुद्धा भेटले. ( सारसबागेत सुद्धा ओळखीचे लोक भेटत नाहीत राव कधी पण काश्मीर ला भेटले 😆) फारच विषयांतर झालं असो.
तर शंकराचार्य टेकडी चढायला ट्राफिक जाम मुळे वेळ गेला. मंदिराच्या पायथ्याशी चेकिंग वगैरे झाल्यावर पायऱ्या चढायला सुरू केले. सुमारे 200-250 पायऱ्या चढून वर पोचलो. सुंदर असं दगडात बांधलेलं हे शिवमंदिर आहे.
हे मंदिर सम्राट अशोकाच्या मुलाने बांधले असे मानले जाते.
मंदिरात अत्यंत सुंदर असे चमकदार काळ्या पाषाणातले सुमारे 4 फूट उंचीचे भव्य शिवलिंग आहे.
मंदिराच्या आवारातून संपूर्ण श्रीनगराचे अप्रतिम दृश्य दिसते.विस्तीर्ण पसरलेला दल लेक, शिकारे, हाऊसबोटी, सुंदर रंगीत घरे, शहरात फिरून वाहणारी झेलम नदी,हिरवेगार डोंगर असे अप्रतिम दृश्य वरून दिसते. 🏞️
मंदिराचे आवारात चिनार ची सुंदर झाडे आहेत. संपूर्ण परिसर प्लॅस्टिकमुक्त ठेवला आहे. खाली चेक पॉईंट पाशी सर्वांच्या सामानाची कसून तपासणी होते आणि प्लॅस्टिक वस्तू तिथेच ठेवून यावे लागते.
आद्य शंकराचार्य हिंदू धर्माच्या प्रचारासाठी पूर्ण भारतभर पायी फिरले होते. तेव्हा फिरत फिरत काश्मीर ला पोचले होते. या ठिकाणी त्यांनी तप केला होता असे मानले जाते. जिथे त्यांनी तप केला ती दगडात कोरलेली गुहा सुद्धा आहे.
या मंदिराच्या परिसरातून जाऊच नये असे वाटत होते.आम्ही तिथे बराच वेळ रेंगाळलो. संपूर्ण श्रीनगर पुन्हा पुन्हा डोळ्यात आणि कॅमेरा मध्ये साठवून ठेवले. आणि मग मंदिराच्या पायऱ्या उतरायला सुरू केले. तोवर छान भुरभुर पाऊस सुरू झालाच होता.
खूप भूक लागली होती.
"आज मी रोटी भाजी किंवा कुठलाच भारतीय पदार्थ खाणार नाही" असे मधुजा ने आधीच जाहीर केले होते.
त्यामुळे दल रोड वरती एक इटालियन पदार्थ मिळणाऱ्या हॉटेल मध्ये गेलो. पास्ता ,पिझ्झा खाऊन सर्वांनी पोट शांत केले.
आता मोर्चा वळवला लाल चौकाकडे..
लाल चौक, श्रीनगर .. अनेक कारणांनी वर्तमानपत्रात सतत चर्चेत असणारी जागा.. याला ऐतिहासिक महत्त्व आहे त्यामुळे इथे नक्की भेट द्यायलाच हवी होती.
आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे खरेदी.. लाल चौक आणि इथल्या सगळ्या गल्ल्या काश्मिरी वस्तूंनी ओसंडून वाहतात. 100 रुपयांच्या कलाकुसर केलेल्या पर्स पासून अगदी एक लाख रुपयांच्या अस्सल पष्मीना शालिपर्यंत इथे अनेक वस्तू मिळतात.
पर्स, नाजूक धाग्याने कशिदाकाम केलेले ड्रेस मटेरियल, साड्या, पडदे, बेडशीट, पाईन आणि अक्रोड लाकडाच्या वस्तू, सुकामेवा, केसर,स्वेटर, टोप्या, शाली अशा अनेक वस्तू इथे मिळतात. सुमारे 2 तास तिथे मनसोक्त शॉपिंग केले. शेवटी पायाने असहकार पुकारला तेव्हा हॉटेल चा रस्ता धरला.
आज श्रीनगर मधली शेवटची संध्याकाळ. उद्या सकाळी परत निघायचे होते. रुम वर जाऊन थोडा आराम केला. आता पाऊस जोरातच सुरू झाला होता.
संध्याकाळी हॉटेल च्या आसपास चक्कर मारली. आमच्या हॉटेल जवळ एक संपूर्ण लाकडात बांधलेला सुरेख पूल होता. तिकडे जाऊन आलो. हा फक्त पादचारी पूल होता, त्यावर सुरेख गझिबो आणि छानपैकी लायटिंग केलेले होते. नदीवरून गार वारा वाहत होता. सुरेख ट्रिप ची सुंदर सांगता होत होती..
हॉटेल वर परत येऊन सामानाची बांधाबांध केली.आणि झोपेच्या स्वाधीन झालो.
-- क्रमशः





काश्मीर डायरीज - 6

काश्मीर डायरीज - 6
"गुलमर्ग ला जायला पहाटे 6 वाजता निघा."
"सकाळी 8:30 च्या आत तिथे पोचा"
असे बरेच जणांनी आधीच सांगितले होते पण आमच्या इनायत भाईंना विचारलं तर ते म्हणाले,काही गरज नाही, तिथे आपला गाईड असतो, तो लाईन मध्ये नंबर लावून देतो. आपण 8.30 वाजता निघू.
त्या दिवशी हाऊसबोट वरून चेकआउट करून आम्हाला श्रीनगर मधेच दुसऱ्या एका हॉटेल मध्ये शिफ्ट व्हायचे होते. त्यामुळे आम्ही सकाळी 7.30 लाच निघायचे ठरवले.म्हणजे नवीन हॉटेल वर बॅग्स टाकून पुढे निघता येईल अशा अंदाजाने.
पण आमचे वेळेच्या बाबतीतले जुने रेकॉर्ड लक्षात घेता आम्ही काही 7.30 AM ला तयार होऊ शकणार नाही अशी इनायत भाईंना पक्की खात्री असावी.🙈 त्यामुळे ते नेमके त्या दिवशी उशीरा आले.
पण बर्फ हा शब्दच जादुई असल्याने तमाम जनता खरोखरच 7.30 ला तय्यार होती.😎 मग वाट बघण्यात 1 तास गेला. शेवटी सामान तसेच गाडीच्या टपावर घेऊन 8.30 ला आम्ही श्रीनगर सोडले.
वाटेत टंगमर्ग जवळ आमचा गाईड आम्हाला भेटला. मसरूफ भाई.तिथेच एका दुकानात बर्फात घालायचे गम बूट,जॅकेट ई घेतले.
गुलमर्ग ला 10 ला पोचलो.गुलमर्ग वाहनतळ ते केबल कार स्टेशन 2 km अंतर आहे. तिथे जायला घोड्याचा पर्याय होता. वरती बर्फात खेळायला उत्साह टिकून राहावा म्हणून आम्ही घोडा करायचे ठरवले. केबल कार स्टेशन जवळ जायला अजून अर्धा तास गेला. अखेर 10:45 ला लाईन मध्ये उभे राहिलो. ती लाईन म्हणजे मारुतीची शेपटीच होती.. पण आमच्या गाईड ने योग्य जागी आधीच नंबर लावून आम्हाला शक्य तितक्या पुढे पर्यंत नेले. तरीही 2 तास लागलेच.
गुलमर्ग केबल कार च्या दोन फेजेस आहेत.त्यातल्या दुसऱ्या फेज वर म्हणजे अफारवत पर्वतावर बर्फ आहे. पहिली फेज पण अतिशय सुंदर आहे. दूरवर पसरलेली हिरवी कुरणे आणि चाहुबाजूने बर्फ़ाचे डोंगर.🏕️
आम्ही पहिल्या फेज साठीच्या च्या रांगेत उभे होतो. जवळजवळ 2 तासाने केबल कार जवळ पोचलो. आता 10 मिनिटात पहिल्या फेज च्या केबल कार मध्ये बसणार आणि मग वर जाऊन लगेच दुसऱ्या फेज ची केबल कार.. की लगेच बर्फ..
इतक्यात..
"महा"गोंधळ क्रमांक 4..
"कृपया ध्यान दिजीए, उपर मौसम खराब होने के कारण फेज 2 केबल कार पुरे दिन के लिये बंद कर दिया है. असुविधा के लिये खेद है "
😔😔
एका क्षणात सर्वांचे मूड बदलले.डोळे भरून आले.ज्यासाठी इतका अट्टाहास केला ती गोष्ट अशी समोर दिसत असताना निसटून चालली होती. आमचं एकवेळ जाऊदे पण आमच्या लेकीला बर्फ दाखवायचाच होता.. ती तर किती नाराज होईल. खूप खूप वाईट वाटायला लागलं. आता पहिल्या फेज पर्यंत तरी कशाला जा.. चला इथूनच जाऊ परत असे विचार मनात यायला लागले. मसरूफ भाई म्हणाले वर जाऊन तर बघू काही होतं का. मौसम ठीक झाला तर 1 तासाने सुरू होईल परत.
आशा ही चिवट गोष्ट आहे. स्वामींचं नाव घेतलं..मनात म्हणलं,"महाराज, बाकी काही असो , आज माझ्या लेकीला बर्फ दिसलाच पाहिजे."
केबल कार ला इथे गंडोला म्हणतात. पहिल्या फेज च्या गंडोला मध्ये बसलो आणि आजूबाजूचा निसर्ग बघून मघाशी मनात आलेले सगळे विचार पळून गेले. निसर्गात किती ताकद असते ना.सगळ्या नकारात्मक भावना आपोआप निघून जातात.
गुलमर्ग बेस पासून 10 मिनिटात पहिल्या फेज वर पोचलो. समोरच वरती अफारवत पर्वत आणि बर्फ दिसत होता. तिथेच आम्हाला जायचे होते. पण डोंगरावर खरच खूप दाट काळे ढग आले होते आणि तिथे खूप जास्त वारा होता. फेज 2 गंडोला सुरू व्हायची शक्यता धूसर होती तरी पोचताक्षणी फेज 2 च्या स्टेशन कडे धाव घेतली. पण केबल कार आज सुरू होणार नव्हती हे पक्के होते.
आता काय ? कसा बघणार बर्फ ? 😥😥
पण जेव्हा इच्छा प्रबळ असते तेव्हा मार्ग निघतोच.दूर डोंगरात ग्लेशियर सारखी जागा दिसत होती. तिथे भरपूर बर्फ दिसत होता.मसरूफ भाईंनी सांगितलं की तिथे बर्फ़ापर्यंत जाता येत पण 30-40 मिनिटे घोड्यावरून जावे लागेल. त्या सेकंदात कुठलाही विचार न करता हो म्हणून मोकळे झालो.
पुढच्या पाचव्या मिनिटात आम्ही घोड्यावर बसून वरती जायला निघालो होतो..
सुमारे अर्धा-पाऊण तासात बर्फ़ाजवळ पोचलो. दोन डोंगरांच्या मध्ये वाहून आलेल्या बर्फ़ाचा तो एक लांब च्या लांब पट्टा होता. स्लेज गाड्या आणि स्कीइंग चे खेळ चालू होते.चहा मॅगी चे ठेले सजले होते.बऱ्यापैकी गर्दी होती. आम्हाला बर्फात पोचलो याचा अतिशय आनंद झाला.😄 खरंतर हा पांढरा भुसभुशीत असा बर्फ नव्हता. उन्हामुळे वितळायला लागलेला असाच होता. गमबूट घालून पण चालत येत नव्हते. पाय घसरत होते.पण तरी आम्ही तिथे खुप खुप मज्जा केली. मसरूफ भाई आमच्या घोड्यांसोबत चालत चालत वरतीपर्यंत आले होते. त्यांनी तिथल्या स्लेज वाल्यांसोबत घासाघीस करून आमच्या साठी दर ठरवला. स्लेज च्या गाडीवर बसून वरपर्यंत जायचे, तिथे टाईमपास करून मग त्याच गाडीवर ते आम्हाला घसरत खाली आणणार होते.वरती पोचलो तिथे एक छोटासा धबधबा पण होता. वरवरचा बर्फ काळा दिसत असला तरी बुटाच्या टोकाने थोडासा उकरला की आत शुभ्र पांढरा भुसभुशीत बर्फ होता. मी आणि मधुजा ने स्नो मॅन बनवायची मज्जा पण केली. मधुजा ने तर मनापासून धमाल केली तिथे.बर्फ़ाचे गोळे करून एकमेकांच्या अंगावर उडवून झाले.मनसोक्त फोटो, स्लो मो व्हिडीओ करून झाले,तिचं लाडकं मॅगी तिला बर्फात खायचं होतं ते खाऊन झालं. तिचा फुललेला चेहेरा बघून माझे डोळे वाहायला लागले.याचसाठी केला होता अट्टाहास.🤗🤗
मनातल्या मनात काश्मीर ला म्हणलं "आम्ही बर्फ बघायला हिवाळ्यात परत यावं अशी तुझी इच्छा आहे ना, मग आम्ही नक्कीच येणार 😊"
मसरूफ भाई गाईड कम फोटोग्राफर होते त्यांनी आमचे सुंदर फोटो काढले आणि स्लेज वरून घासरताना चे व्हिडीओ सुद्धा केले.मधुजा आणि सायली चे स्लेज राईड व्हिडीओ करायचे गडबड आणि गर्दी मुळे राहिले तर त्या भल्या माणसाने स्लेज वाल्याला परत एकदा वर अर्ध्या वाटेपर्यंत जायला लावले आणि परत स्लेज ची घसरगुंडी करून व्हिडीओ घेतला.आम्ही नको,जाऊदे म्हणत होतो तर तो म्हणे,
"दिदि, बादमे गुडीया बोलेगी उसका व्हिडीओ क्यू नाही लिया? नाराज हो जायेगी.उसको बुरा लागेगा ना"
स्लेज वरून घसरत येणं सोपं असलं तरी त्या तसल्या थंडीत स्लेज वर बसवून एखाद्याला ओढत वर नेणं खूप अवघड आहे त्यामुळे मला या कृती चं जास्त कौतुक वाटलं.🙏😊
आता तिथे पण वातावरण बदलायला लागलं होतं.पाऊस पडायची चिन्ह होती. आज लंच ला बुट्टी मारली होती पण आता पोटाने हाक द्यायला सुरू केले होते.अजून घोडा-गंडोला-घोडा-कार असा लांबलचक प्रवास बाकी होता. 3.30 - 4 च्या दरम्यान उतरायला सुरुवात केली.मग केबल कार ते बेस आणि मग पार्किंग ला पोचलो.
आता पोटात कावळे उड्या मारत होते. तिथल्या एका हॉटेल मध्ये "पावभाजी" असा शब्द दिसला आणि ताबडतोब ऑर्डर दिली. 🍛.जगात कुठेही गेलं तरी पावभाजी खाल्लीच पाहिजे असं "माझं शास्त्र असतंय" 😋
आता पोट आणि मन दोन्ही भरलं होतं.
हॉटेल मधून बाहेर आलो तर अजून एक सरप्राईज आमची वाट बघत होतं.
आम्ही ज्यांच्यातर्फे टूर पॅकेज बुक केलं होतं त्या Kashmir Heavens चे शाहिद भाई खास आम्हाला भेटायला पोचले होते. त्यांना भेटून छान वाटलं. गेले 2 महिने विविध शंका विचारून फोन वर त्यांना भरपूर त्रास दिला होता. आज प्रत्यक्ष भेटत होतो. 😊
त्यांनी ट्रिप कशी चालू आहे वगैरे आपुलकीने चौकशी केली. आम्हाला फेज 2 ला जाता आलं नाही म्हणून त्यांना पण वाईट वाटलं. सोनमर्ग ला झिरो पॉईंट चालू झाला आहे,उद्या तिथे जा असे त्यांनी सुचवले. उद्या चं उद्या ठरवू असे म्हणून त्यांचा निरोप घेतला.
आज पाहिला त्यापेक्षा जास्त बर्फ आम्हाला फेज 2 ला नक्कीच दिसला असता पण "जे होतं ते चांगल्यासाठीच" यावर माझा गाढ विश्वास आहे.आणि आम्हाला फ्रीज पेक्षा नक्कीच जास्त बर्फ मिळाला त्यातच आम्ही खुश होतो. अजून काय पाहिजे... 🤗😄
गुलमर्ग ते श्रीनगर परतीचा प्रवास सगळा झोपेतच झाला. श्रीनगर ला पोचून सकाळी राहिलेलं चेकइन केलं.
हॉटेल मध्ये लिफ्ट नव्हती आणि आमच्या रूम तिसऱ्या मजल्यावर होत्या असा अजून एक किरकोळ गोंधळ तिथे झाला.😆
सकाळी हातातून निसटता निसटता आनंदाचं दान पदरात पडलं होतं त्यापुढे हा गोंधळ म्हणजे किस झाड की पत्ती.😊
आजचा दिवस असा गेला होता की आता अशा लहान सहान गैरसोयी मन आपोआप स्वीकारत होतं.
रूम मध्ये पोचून मऊ बिछान्यावर अंग टाकताक्षणी गाढ झोप लागली.
अजून एक सुंदर दिवस संपला होता. 🙏😊

-- क्रमशः



 

काश्मीर डायरीज - 5

 काश्मीर डायरीज - 5

18 मे 2022
पहाटे 5.15 च्या दरम्यान अजान च्या आवाजाने जाग आली.लख्ख उजाडलं होतं. थोडा वेळ गादी मध्ये लोळून घालवला पण आता झोप लागेना. लगेच बाहेर डेक वर धाव घेतली.( खरंतर डेक म्हणणं अगदीच अरसिक वाटेल.. सज्जा हा जास्त सुंदर शब्द आहे.. लाकडी कमानी असलेला आणि बसायला गाद्या असलेला असा हा सज्जा होता )
दल चं पहाटेच सौंदर्य अजूनच खुललं होतं. काल पर्यटकांचे शिकारे फिरत होते. आज दिसणारे शिकारे वेगळेच होते. भाजी विक्रेते, फुलं विक्रेते, दैनंदिन गरजेच्या वस्तू जसं की पेस्ट, साबण, ब्रश ई विकणारे असे शिकारे फिरत होते. ताजी फुलं घेऊन जाणारा शिकारा अप्रतिम दिसत होता. शाळेत जाणारी मुलं युनिफॉर्म घालून शिकारा मध्ये बसून किनाऱ्यावर जात होती. त्यांच्या आया शिकारा चालवत त्यांना सोडायला निघाल्या होत्या. हे सगळं वेगळच जग होतं
काश्मिरी मध्ये दल म्हणजेच तलाव.. त्यामुळे दल लेक म्हणणं खरंतर चुकीचं.. पण आता सगळेच जण तेच म्हणतात..
दल म्हणजे 22 square km पसरलेलं एक तरंगत शहर.. इथे 1 लाख लोक राहतात..त्यांचे सगळे दैनंदिन व्यवहार शिकाऱ्यामधून चालतात. शाळेत,नोकरीला येणे जाणे, किराणा,भाजीपाला खरेदी सगळं शिकाऱ्यावरून.आम्ही तर एक भांडीकुंडी विकणारा शिकारा पण बघितला.
बोटीच्या सज्जा वरून समोर शंकराचार्य टेकडी आणि मंदिर दिसत होतं. 6.30 नंतर तिथुन पूजा आणि मंत्रोच्चार ऐकू येऊ लागले. सूर्योदयाची
सुंदर वेळ
आणि ते मंत्र असं एकदम भारलेलं वातावरण होतं ते..
हळू हळू आजूबाजूचे लोक जागे झाले.. चहा चे राउंडस झाले आणि फिरते विक्रेते आपल्या पोतड्या घेऊन बोटीवर दाखल होऊ लागले..
ही एक बेस्ट सिस्टीम होती. शाल,ड्रेस मटेरियल, स्टोल ई विकणारे लोक, इमिटेशन ज्वेलरी, केसर, ड्रायफ्रूटस विकणारे असे सगळे लोक एक एक करून आपल्या हाऊसबोट वर येतात. आपण निवांत मांडी ठोकून बसायचं, त्यांच्या वस्तू बघायच्या, दर जमला, पटला तर ठीक नाहीतर सोडून द्यायचं. फिरते शॉपिंग.. आम्ही पण खरेदी करून त्यांना नाराज केले नाही.
आजचा दिवस होता श्रीनगर दर्शन..
आज निवांत उठणे, खरेदी या सगळ्या मुळे बाहेर पडायला उशीर झाला त्यामुळे शंकराचार्य टेकडी 4 नंतर करू असे ठरवून आम्ही आधी आमचा मोर्चा बागांकडे वळवला.
आधी पोचलो बोटॅनिकल गार्डन ला..
विस्तीर्ण तलाव, त्यात जागोजागी कारंजे, सुंदर राखलेली हिरवळ आणि फुलच फुलं.. लहान मुलांच्या शाळेची ट्रिप आलेली बागेत.. ती गोरी गोबरी गोंडस मुलं आणि त्यासोबत फ़ुलं अशी डोळ्यांना एकदम मेजवानी बघायला मिळाली.
तिथून बाहेर पडून पोचलो "निशांत बाग" ला...
दल च्या समोरच्या डोंगरावर वेगवेगळ्या लेव्हल्स वर पसरलेली, प्रचंड मोठी अशी ही बाग...
जिथे नजर जाईल तिथे हिरवळ, मोठे वृक्ष, फुलांचे ताटवे, आणि बागेच्या मध्यातून पाणी खेळवलेले आहे.
ही बाग इतकी मोठी आहे की ती पूर्ण फिरून बघायला एक अख्ख्या दिवस जाईल. बागेतून दल चा सुंदर नजारा दिसतो.
इथे पण काश्मिरी ड्रेस घालून फोटो काढून देणाऱ्यांची फौज होती. पहलगाम मध्ये ड्रेस न आवडल्याने नवऱ्याने फोटो काढून घेतले नव्हते. इथले पुरुषांचे कपडे जरा वेगळे होते त्यामुळे आमच्या साहेबाना फोटो काढायला उत्साह आला. पटापट कपडे बदलून फोटोग्राफर समोर उभे राहिलो. त्याने अगम्य अशा पोझेस मध्ये दाणादण फोटो काढायला सुरुवात केली.
आम्ही आपले पब्लिक बघून जरा लाजत होतो तर हा "आपकी ही बीबी है ना, या दुसरे की लेके आये है" असा टिपिकल डायलॉग टाकून मोकळा.
आम्ही आपले 1-2 फोटो काढणार होतो पण हा बाबाजी थांबायला तयारच नव्हता. अखेर त्याचं मन आणि खिसा पुरेपूर भरेल अशी खात्री झाल्यावर तो थांबला. त्या फोटोचा अलबम आमच्या लग्नाच्या अलबम पेक्षा मोठा झालाय.. ( इच्छुकांनी फोटो बघायला घरी येणेचे करावे. फुल करमणुकीची गॅरंटी...सोबत चहा पोहे फ्री फ्री फ्री.. 😄😂 )
तिथून बाहेर पडून जेवण केले. आणि पुढच्या बागेत गेलो. "चष्मेशाही गार्डन"
एका टेकडीच्या पायथ्याशी असलेली ही अजून एक सुंदर बाग. साधारण निशांत बाग च्या पद्धतीचीच.. भरपूर फुलांचे ताटवे. इथे जरा कमी गर्दी होती.
जेवण झाल्यामुळे पोट जड झालं होतं. एका चिनार च्या दाट सावलीत सरळ आडवे झालो. आजूबाजूचा सुंदर नजारा, इकडे तिकडे पळणारी लहान मुले, बागेचे,घरच्यांचे फोटो घेणारे हौशी फोटोग्राफर अशी गंमत बघत
मस्त वेळ
गेला.
सकाळपासून फिरून फिरून पाय दुखायला लागले होते. अजून काही बागा शिल्लक होत्या पण आता कुठेतरी थांबणं गरजेचं होतं.
इनायत भाईंना गाडी सरळ हाऊसबोट कडे घ्यायला सांगितली. बोट वर जाऊन मस्त आराम केला.
संध्याकाळी 7 च्या दरम्यान दल लेक समोर च्या रोड वर एक फेरफटका मारला. श्रीनगर मधला सर्वात गर्दीचा असा हा रस्ता असावा कारण आम्ही जे 2 दिवस तिथे होतो तोवर सकाळी 10 ते थेट रात्री 9 पर्यंत इथे कायम ट्रॅफिक जाम असायचा.. फुटपाथवर कपडे, खेळणी विकणारे लोक होते. भेळ, पाणीपुरी,मोमो, आईस्कीम असे ठेले होते. तिथे अप्रतिम मोमो खायला मिळाले आम्हाला. काश्मीर ची पाणीपुरी खायचं तेवढं धाडस झालं नाही. 😋
तिथे अक्रोड आणि पाईन च्या लाकडापासून बनलेल्या वस्तू विकणारे काही विक्रेते होते. त्यांच्याकडे थोडी किरकोळ खरेदी केली. आता परत जाऊन लवकर झोपू असे ठरवले इतक्यात आम्हाला एक ओळखीचा बोर्ड दिसला.."सुखो थाई"
हे एकदम अनपेक्षित होतं.
आपसूक पावलं आत शिरली. 30 मिनिटांचा मस्त थाई फूट मसाज करून घेतला.आणि अक्षरशः तरंगतच परत आलो.
आणि हो.. अजून एक असेच अचानक सापडलेले ठिकाण म्हणजे दल लेक घाट #9 समोरची एक फ्रेंच बेकरी...आता नाव विसरले मी.... तिथे रेड वेलव्हेट, फ्रेश फ्रुट अशा अप्रतिम चवीच्या पेस्ट्री मिळाल्या.
परत येऊन गुलजार भाईंनी बनवलेली चवदार काश्मिरी बिर्याणी,रायता आणि वर पेस्ट्री खाऊन आजचा दिवस संपला. उद्याची स्वप्नं बघत अंथरुणात शिरलो..
उद्याचं ठिकाण होतं.. गुलमर्ग.. बर्फ..
ज्यासाठी हा सगळा अट्टाहास केला होता...
-- क्रमशः




काश्मीर डायरीज - 4

काश्मीर डायरीज - 4

17 मे 2022
रात्रभर अरु, बेताब, बैसरन व्हॅली ची स्वप्नं बघत बघत मस्त झोप झाली.😊 सकाळी 5.30 लाच बाहेर लख्ख उजाडलं होतं. पटकन आवरून परत एकदा बाहेर नदीवर जाऊन आले. पहलगाम ला आज निरोप द्यायचा होता. परत एकदा लीडर नदी चा खळखळाट कानात साठवून घेतला. भरपूर शुद्ध हवा छातीत भरून घेतली.
रूम वर येऊन पटापट आवरून चेकआउट करून निघालो...
आजचा मुक्काम होता.. दल लेक, श्रीनगर🏞️
वाटेत ओळीने सफरचंदाच्या बागा लागत होत्या...🍎🍎
सध्या सिझन नाही पण तरी छोटी छोटी हिरवी सफरचंद लागली होती झाडांना.. एका बागेपाशी गाडी थांबवली.
बाहेर सफरचंदाचा ताजा ज्यूस आणि इतर बरेच प्रॉडक्ट्स विक्री चालू होती..
आत बागेत एक फेरफटका मारला..
पहिल्याच झाडाला 3-4 छोटीशी थोडी लालसर सफारचंदे लटकली होती. पुढे जाऊन सगळी बाग पहिली. सगळ्या झाडांना लहान लहान हिरवी सफरचंद लागली होती. अगदी आपल्या पेरू सारखी दिसत होती.. पहिल्याच झाडाला लाल सफरचंद कशी काय बुवा म्हणून मागे येऊन बघतो तर तारेने बेमालूम पणे झाडाला बांधलेली ती सफरचंदे बघून हासू आवरेना..🤣🤣 मार्केटिंग गिमिक्स साठी काय काय करतील लोक.. धन्यवादच..
पण काही का असेना...निदान झाडाला आलेली सफरचंदे कशी दिसत असतील याचा अंदाज आला.
बाहेर चवीला म्हणून 1 ग्लास ताज्या सफारचंदांचा ज्यूस घेतला तर मस्त गोड होता... तिथे मग मनसोक्त ताजा ज्यूस पिला... सोबत सफरचंदाचे लोणचे, चटणी, जॅम, सॉस अशा अनेक गोष्टी चव घेऊन पाहिल्या... सर्व वस्तू अप्रतिम चवदार. Apple cyder vinegar पण मस्तच होते. भरपूर खरेदी करून तिथून निघालो...
पुढचे ठिकाण होते "मार्तंड सूर्य मंदिर"
आमच्या itinerary मध्ये नसलेले हे ठिकाण, पण इनायत भाईंनी आग्रह करून आम्हाला इथे नेले. तुम्हाला खूप आवडेल असे म्हणत वाटेतले हे एक अनवट फारसे टुरिस्ट लोकांना नाहीत नसलेले हे एक सुंदर मंदिर आहे.
शेजारी एक गुरुद्वारा सुद्धा आहे.
शंकर पार्वती, गणपती अशी छोटी छोटी मंदिरे आणि पूर्वी कधीच ना बघितलेले असे सूर्याचे मंदिर इथे आहे. समोर मोठा चौकोनी तलाव आणि त्यात भरपूर मासे. शांत स्वच्छ असा परिसर आहे हा.खुप प्रसन्न वाटले तिथे.🙏
तिथून पुढचे ठिकाण होते "अवंतीपुरा मंदिर"
अनंतनाग जिल्ह्यातील अतिशय सुंदर असे हे ठिकाण.
अवंतीवर्मन राजा ने 9 व्या शतकात झेलम नदीच्या काठी बांधलेल्या विष्णु मंदिराचे हे अवशेष आहेत. संपूर्ण दगडातील हे मंदिर वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे.
आम्ही पोचलो तेव्हा भर दुपार होती पण तरी मंदिराच्या आवरातली बाग, आजूबाजूचे डोंगर आणि झाडांमुळे मस्त गार वारा येत होता.
काश्मीर ची हीच मजा आहे.. वर डोक्यावर कितीही उन्ह असुदेत, अजिबात गरमी होत नाही. हवा सतत थंड, आल्हाददायक असते.
या ठिकाणी सुप्रसिद्ध आंधी चित्रपटातील "तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नाही" या गाण्याचे शूटिंग झाले होते.. मग आमच्या "संजीव कुमार" सोबत तिथे जोरदार फोटोसेशन आणि व्हिडीओ शूटिंग करून घेतले.. सोडते का काय 😉
पुढचा सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे केशर खरेदी..
वाटेत पम्पोर गावाजवळ केशराची शेते आणि दुकाने आहेत.तिथे मनसोक्त खरेदी केली. केशर, अक्रोड, बदाम, केशर क्रीम, अत्तर असे अनेक उत्तम प्रकार तिथे होते. खिसा फारच हलका झाला. काश्मीर मध्ये कितीही ठरवलं तरी खरेदीचा मोह टाळूच शकत नाही. 😎
आता मात्र मंडळी दमली आणि गाडी थेट श्रीनगर च्या दिशेने धावू लागली.
आज चे लंच जरा खास होते. प्रसिद्ध "काश्मिरी वाझवान" चाखायला जायचे होते आज.🍛
श्रीनगर मधील त्यासाठी खास असलेल्या "मुघल दरबार" या हॉटेल मध्ये पोचलो.
वाझवान म्हणजे काश्मिरी मेजवानी. काश्मीर मध्ये लग्न समारंभात खास आचारी बोलावून हे बनवले जाते.
तिथले लोक पक्के भातखाऊ..
त्यामुळे भात आणि वेगवेगळे मांसाचे प्रकार म्हणजेच रोगनजोश, तबकमाझ, रीस्ता,गुश्टाबा, कबाब अशा भारीपैकी नावांचे वेगवेगळे रस्से म्हणजे वाझवान..
भरपेट खाऊन आता डोळ्यावर झोप यायला लागली होती.. 3.30 वाजून गेले होते..थोडी पावसाची भुरभुर सुरू झाली होती.. हवा जरा अजूनच गार झाली होती...
आता थेट हाऊसबोट वर जाऊन जरा आराम करू म्हणून थेट दल गेट No 8 ला पोचलो..
समोर दिसत होती आमची हाऊसबोट..
The Royal Sovereign...
दल लेक ला पोचलो आणि एकदम वेगळ्याच जगात पोचल्यासारखं वाटलं..
आमच्यासाठी शिकारा तयार होता.. त्यात बॅग्स चढवल्या, आम्ही पण चढलो आणि आमच्या हाऊसबोट कडे निघालो.. मस्त गार वारा येत होता. ढग आल्यामुळे उन्ह गायब झालं होतं. 5 मिनिटात आमच्या हाऊसबोट मध्ये पोचलो सुद्धा. तिथल्या गुलजार भाईंनी छानपैकी हसून स्वागत केलं..
आमच्या तरंगत्या राजेशाही घरात आम्ही प्रवेश केला..
किती सुंदर सजवली होती ती हाऊसबोट.. संपूर्ण लाकडात बनवलेली, उंची पडदे, गालिचे, झुंबर, शिसवी मोठे नक्षीदार डायनिंग टेबल आणि 4 बेडरूम्स.. तरंगता महालच...🏰
बाहेर डेक वरच बसून राहवेसे वाटत होते.. शिकारे येत जात होते.. हलका पाऊस सुरू झालेला..
झोपायचा बेत रजईत गुंडाळला आणि पुढच्या अर्ध्या तासात आमच्या शिकारा राईड साठी आम्ही बाहेर पडलो सुदधा...
पाऊस थांबला होता पण अजून हवा ढगाळ होती. दल लेक ची आणि तिथल्या तरंगत्या मार्केट ची सफर करायला आम्ही शिकारा मध्ये स्थानापन्न झालो..
गाद्या, उशा, पडदे असलेल्या त्या शिकारामध्ये मस्त पाय पसरून बसलो.. शिकारावाला अखंड बडबड करत लेक बद्दल सांगत होता..
थोडं पुढे गेलो तर मस्त पाऊस सुरू झाला.. दल च्या मध्यभागी एक तरंगते हॉटेल होते. तिथे स्टॉप घेऊन लगेच मॅगी आणि भजी ऑर्डर केली. शिकारा मध्ये बसून बाहेर चा पाऊस बघत भजी खाणं म्हणजे सुख...
पुढे जाऊन तरंगणारी शेती बघितली, मीनाबाजार म्हणून दल मध्ये मार्केट आहे.. तिथे एक चक्कर मारून आलो.. पण मुलखाचा महाग..
परत येता येता पाऊस थांबला, जोरदार वारा सुटला आणि समोरचे सगळे ढग बाजूला सरले.. आता समोर थेट दिसत होते गुलमर्ग चे बर्फ़ाचे डोंगर...
आत्ता लिहिता लिहिता सुद्धा ते दृश्य आठवून काटा आला अंगावर.. काश्मीर ला किती प्रकारचं सौंदर्य लाभलंय..पहलगाम मधून दिसणारे बर्फ़ाचे डोंगर आणि आत्ता दल लेक मधून दिसणारे डोंगर यात किती तरी वेगळेपण होतं.. दोन्ही तितकंच सुंदर.. तुलनाच करता येणार नाही..
शरीर आणि मन दोन्ही तरंगतच परत बोट वर आलो.
घरगुती गरम जेवण जेऊन दुलई मध्ये कधी झोप लागली कळलेच नाही...
-- क्रमशः