Showing posts with label ललित. Show all posts
Showing posts with label ललित. Show all posts

Wednesday, July 23, 2025

आपलीच कविता

 "मनू, मराठीच्या पेपर चा अभ्यास झाला का ? "

"हो, झाला. एक धडा आणि एक कविता आहे. धड्याच्या नोट्स मी आधीच काढल्यात आणि अगं 'आपलीच कविता' आहे.
"मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी.."
"हो का ? "
"ती तर मला लहानपणापासूनच पाठ आहे "
आपलीच कविता🤗..इतकं सहज बोलून गेली लेक...
मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी
माझे नि तुझे व्हायचे हे सूर कसे संवादी
अंदमान च्या तुरुंगात असताना सावरकरांना लेखन करण्यासाठी तुरुंगाच्या दगडी भिंतीने कशी मदत केली असेल अशी कल्पना करून लिहिलेली ही कविता, मी आणि माझी बहीण खूप लहान असल्यापासून आई झोपताना आम्हाला म्हणून दाखवायची.
अगदी सातवी आठवीत असेपर्यंत आम्हा दोघीना झोपताना आई खूप कविता आणि गाणी म्हणून दाखवायची.
"रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा"
असं गाताना हिरवीगार गवताची कुरणं आणि त्यावर डोलणारी चिमुकली फुलं दिसायची डोळ्यासमोर
"ऐलतटावर पैलतटावर हिरवाई घेऊनि
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुनी"
या कवितेत शेवटी
"पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबरं"
असं म्हणालं कि मला डोळ्यासमोर एक पांढरी दाढी असलेला म्हातारा औदुंबर बाबा दिसायचा. तो दिवसभर त्या छोट्याश्या गावातून, शेतांमधून, पायवाटांवरून फिरत फिरत पाण्याशी पोचलाय आणि मस्त पाण्यात पाय टाकून पाणी उडवत बसलाय असं काहीसं चित्र दिसायचं.
पुढे एकदा औदुंबर ला गेल्यावर तिथली नदी, नदीच्या दोन्ही बाजूला असलेली गर्द हिरवाई, नदीतल्या छोट्या होड्या, त्यात बसून नदीच्या पलीकडे देवीच्या दर्शनासाठी आई आजीसोबत जाताना ती कविता समोर प्रकट झाली.
"लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी ना शोधूनि दुसऱ्या लाख"
हे आईचं फार आवडतं गाणं. मला कधी कधी ते ऐकायला नको वाटायचं कारण,
"कुणी गेली होती गाय तुडवुनी तिजला
पाहुनि दशा ती रडूच आले मजला"
अशा ओळी ऐकताना घशात दुखायला लागायचं उगीचच.
पण मग कवितेतली मुलगी ती फाटकी मळकी बाहुली घरी घेऊन यायची तेव्हा बरं वाटायचं.
"मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान
केसांच्या झिपऱ्या रंगही गेला उडूनं
पण आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी"
असा त्याचा शेवट ऐकून त्या मुलीबद्दल प्रेम,आदर वाटायचा.
"या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार
नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार"
"दीपका मांडिले तुला सोनीयाचे ताट
जडविला घडविला चंदनाचा पाट"
"राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या"
"गाई पाण्यावर काय म्हणूनि आल्या"
"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे"
अशा अनेक सुरेख कविता आणि गाणी ऐकून ऐकून आपोआप तोंडपाठ झाली होती. त्यावेळी त्याचे अर्थ नीटसे कळले नव्हते.
इयत्ता पाचवी ते दहावी दरवर्षी जून महिन्यात नवीन पुस्तकं आणली की आई बालभारतीचं पुस्तक हातात घेऊन बसायची. त्यातल्या सगळ्या कविता आणि धडे वाचून काढायची. आवडलेल्या कविता 'किती सुंदर कविता आहे ऐक' असं म्हणत मोठ्यांदा वाचायची.
एके वर्षी असंच शांता शेळकेंची पैठणी कविता आईनं आम्हाला वाचून दाखवली आणि त्यातलं शेवटचं कडवं वाचताना तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं.
"अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले"
आईच्या आजीचं म्हणजे माझ्या पणजीचं नुकतंच निधन झालं होतं त्यावर्षी. तिच्या आठवणीने आई हळवी झाली होती.आईचं हे कविताप्रेम हळूहळू नकळत माझ्यात झिरपत गेलं.
पुढे मग कॉलेज, लग्न, संसार या धावपळीत नवीन कविता सापडल्या आणि त्या बालपणीच्या कविता जरा मागे पडल्या. तरी अधूनमधून कुठल्यातरी मासिकात आलेली किंवा नंतर whatsapp वर आलेली सुरेख कविता आई पाठवत राहिली.
पुढे मला बाळ झाल्यावर परत एकदा आईच्या कवितांना श्रोता मिळाला 😃. मधुजा अगदी लहान असल्यापासून तिला मांडीवर झुलवताना आईच्या कविता सुरु झाल्या आणि त्याचबरोबर माझी उजळणी.आता सगळ्या कवितांचे अर्थ नव्याने कळायला लागले.
"मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहुनही लहान रे
तुझ्यासंगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे
तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुजला सांगाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुजला शिकवाव्या"
असं माझ्या 3-4 महिन्यांच्या बाळाला थोपटताना तल्लीन होऊन आई गायची तेव्हा त्या चित्राची दृष्ट काढून ठेवावी असं वाटायचं.
"गा रे राघू गा गं मैने बाळाच्या या ओळी
मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी
गुणी माझा बाळ कसा मटा मटा जेवी
आयुष्याने थोर कर माये कुलदेवी"
असं तिनं म्हटलं कि माझ्या डोळ्यात टचकन पाणी यायचं.
"पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या"
या कवितेतलं वर्णन ऐकलं की हे अगदी आईच्याच घराचं वर्णन वाटायचं.
झोपताना गाणी ऐकायची सवय लेकीला पटकन जडली आणि पुढे मीसुद्धा हि पद्धत चालू ठेवली. मनू लहान असताना तिचे एका एका गाण्यांचे दिवस असायचे. त्या दिवशी एकच गाणं लूप मध्ये परत परत गायचं. 'रंगरंगुल्या सानसानुल्या' हि कविता एके दिवशी तरी मी तब्बल 15-20 वेळा गायली होती 😃. नंतर नंतर झोपेमुळे शब्द गडबडायला लागले तरी कन्या जागीच 😂
हळूहळू ती मोठी व्हायला लागल्यावर "कवितेतला अमुक एक शब्द म्हणजे काय ?" असे प्रश्न पडायला लागले.
मग समजेल तसा अर्थ सांगायचं प्रयत्न केला.
आज सकाळी जेव्हा तिनं "आपलीच कविता" असा उल्लेख केला तेव्हा मनापासून आनंद झाला मला. आणि मग ती कविता म्हणता म्हणता आईच्या आठवणी दाटून आल्या.आई कितीतरी रुपाने आमच्यात आत आत खोलवर अशी रुजली आहे ते जाणवलं. हि "आपलीच कविता" अशीच पुढे पुढे पोचत राहील याची खात्री आहे.
आज आईचा वाढदिवस, तिची आठवण सदैव मनात असतेच पण आजच्या दिवसाच्या निमित्ताने या कवितांच्या आणि अंगाईच्या आठवणी जागवाव्याशा वाटल्या.
प्रिय आई, जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🤗🤗
-तुझीच ताई
27 मार्च 2025

ज्ञान प्रबोधिनी युवती विभाग क्रीडा प्रात्यक्षिक

 *"अभिमानाने, अनासक्तीने, विश्वासाने, विनयवृत्तीने, एकविचारे, एकमताने एक आम्ही होऊ"*

या पद्याची प्रचिती काल *ज्ञान प्रबोधिनी युवती विभाग क्रीडा प्रात्यक्षिकांच्या* निमित्ताने आम्ही घेतली.धाडस, चिकाटी आणि मेहेनत याचा त्रिवेणीसंगम काल 26 जानेवारी ला झालेल्या क्रीडा प्रात्यक्षिकात दिसून आला.
इयत्ता पाचवी ते दहावी च्या प्रशालेतील मुली, माजी विद्यार्थिनींचा महाविद्यालयीन गट, प्रशालेची इतर ठिकाणी जी दले भरतात तिथला प्रबोध शालेय गट आणि आजी-माजी माता पालकांचा अतिशय उत्साही असा प्रौढ युवती गट अशा साधारण 300 युवतींनी संपूर्ण 1:30 तास आम्हा प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
लंगडी, लगोरी, कबड्डी, खो-खो अशा खेळाच्या सादरीकरणातून आम्हाला थेट बालपणात फिरवून आणले. कराटे,अमेरिकन डॉजबॉल अशा परदेशी खेळांची सुद्धा ओळख झाली.
माता पालकांच्या प्रौढ युवती गटाचे उत्साही सादरीकरण सुंदर झाले. त्यांचा उत्साह बघून त्यांच्या गटाचे नाव आता *तरुण युवती गट* करायला हरकत नाही😃. आपापले उद्योग सांभाळून त्यातूनही वेळ काढत त्यांनी केलेला सराव जवळून पाहिल्याने जास्त कौतुक.
लहान मुलींचं कराटे सादरीकरण आणि त्याला जोड द्यायला महाविद्यालयीन गटाने केलेली हॅन्ड ब्रेक, एल्बो ब्रेक, किक ब्रेक,जम्प ब्रेक अशी थरारक प्रात्यक्षिके म्हणजे निव्वळ अप्रतिम..एक घाव दोन तुकडे 😃..
सायकल आणि मोटारसायकलवरची चित्तथरारक प्रात्यक्षिकं बघताना एक क्षण श्वास रोखले जात होते आणि पुढच्याच क्षणी टाळ्या आणि आनंदोद्गार बाहेर पडत होते.
अकॉस्टिक योगा च्या गटाने तर कमाल केली. *"तुला तोलुनि धरते मी अन तू ही मजला सावर सावर"* अशी अवस्था.. एकमेकींवरचा विश्वास आणि धाडस याचा उत्तम अविष्कार होता तो. त्याला जोड द्यायला रोप मल्लखांब सादरीकरण अप्रतिम झाले.
या सगळ्या खेळांमध्ये शिवकालीन पारंपरीक लाठीकाठी आणि भाला सादरीकरण आणि त्याच्या जोडीला *"इंद्र जिमी जंभ पर... सेर सिवराज है"* सुरु झालं तेव्हा अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी होतं... आनंदाचं..अभिमानाचं..
पेटते पलिते घेऊन मैदानात उतरलेल्या महाविद्यालयीन गटानं डोळ्यांचं पारणं फेडलं. जणू त्यांना सांगायचं होतं..
*"कधी असेन साधी ठिणगी*
*वा ज्योत शांत तेवती*
*पण ठाऊक माझे मजला*
*मी अग्निशिखा तळपती"*
या सगळ्यावर कळस चढला तो बर्ची प्रात्यक्षिकाने.. पंचप्राण तल्लीन झाले आणि फक्त *"प्रबोधिनीचा ललकार"* उरला...
एक आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. सुरुवातील ध्वज नमस्ते झाल्यावर पुढचे संपूर्ण दोन तास, युवतींचा एक गट ध्वज पूर्णवेळ हातात धरून उभा होता. *"तेजाळून अग्नीने गर्जातोचि मंत्र हा, हृदयाग्नि प्रज्वलीत भगवा स्वतंत्र हा"* ही या युवतींसाठी निव्वळ घोषणाच नाही तर त्या ध्वजाचा मान कसा ठेवायचा ते त्यांना माहिती आहे.
1:30 तास कधी उडून गेला कळलंच नाही. नियोजनात कुठेही बारीकशी चूक नाही की गडबड नाही. गेले दोन महिने प्रज्ञा ताई, दलावरच्या सगळ्या ताया आणि मुलींची मेहेनत आम्ही ऐकत होतो, बघत होतो. त्या सगळ्या प्रयत्नांचा उत्कट अविष्कार काल बघायला मिळाला. बैठक व्यवस्था, ध्वनी, प्रकाश, नावनोंदणी आणि इतर सर्व नियोजन अगदी बिनचूक.
*युवती विभाग सचिव प्रज्ञा ताई, क्रीडा प्रात्यक्षिक प्रमुख निवेदिता ताई, गार्गी ताई, पालवी ताई, अन्विता ताई, श्रद्धा दांडेकर ताई, श्रद्धा भट ताई, हर्षाली ताई आणि बाकी सर्व युवती तायांचे मनापासून आभार, अभिनंदन आणि कौतुक 💐🙌*
तुम्हा सर्वांमुळे आमच्या मुलींना हा अप्रतिम अनुभव घेता आला 🙏🏻
-©️स्मिता श्रीपाद
27 जानेवारी 2025

"आजीची कढई आणि हमखास जमणारे पदार्थ"

 "आजीची कढई आणि हमखास जमणारे पदार्थ"



2020 सालच्या मे महिन्यात कोविड ऐन भरात असताना मी एक आठवडा कराड ला आज्जीकडं राहायला होते. तिला मदत म्हणून गेले होते. आज्जी खूप आजारी होती तेव्हा. सतत ताप यायचा, तपासण्या चालू होत्या. पण तरी त्यातूनही माझे लाड चालू होते. तिच्या मदतीला म्हणून मी जाऊन राहिले होते तरी स्वयंपाकघरात खुर्चीवर बसून माझ्याकडून तिच्या पद्धतीचे पदार्थ बनवून घेऊन मला खाऊ घालायची. मी तिच्यासाठी बनवलेले सूप वगैरे आवडीनं खायची.
"तुझ्या कढयांमुळे पदार्थ छान बनतात" असं म्हणालं कि हसायची.
तिला जो काही आजार झालेला तो गंभीर आहे हे बहुतेक डॉक्टरांनी सांगायच्या आधीच तिच्या लक्षात आलं होतं त्यामुळे थोडीफार निरवानिरवीची भाषा करायची.
तिची हि मोठी कढई त्यावेळी परत घरी जाताना आवर्जून तिनं मला दिली. "याचा आता मला फारसा काही उपयोग नाही. तुला घेऊन जा" असं म्हणून न विसरता माझ्या सामानात ठेवली होती.
अखंड माणसं येणारं जाणारं असं आमच्या आज्जीचं घर असूनही त्या कढईचा आता उपयोग नाही असं तिनं म्हटल्यावर मला आत कुठंतरी तुटलं खरंतर.आजीची आठवण आली कि हे असं होतं. डोळे भरून येतात टचकन.असो.
तर तीच ही कढई... आज्जीने स्वतः च्या हाताने मला दिलेली तिची शेवटची भेट... तिची लीगसी... तिचा सुगरणीचा हात...🙌🤗
हि कढई अगदी खास वस्तू बनवण्यासाठी मी वापरते. आणि माझी भाबडी समजूत म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा पण यात कोणताही पदार्थ केला तरी तो कधीही चुकत नाही उलट मस्त चवदार होतो.
अगदी रोजच्या कढईत केलेले पोहे आणि या कढईत केलेले पोहे सुद्धा वेगळे लागतात. पाहुणे आलेले असतील तर आवर्जून यातच पोहे करायचे असं माझं शास्त्र आहे 😜. दिवाळीचा चिवडा, सांबर, मिसळ, पुरण, जास्त लोक असतील तेव्हा भाज्या आमट्या असे अनेक पदार्थ या कढईत घडतात.
अजून एक म्हणजे माझ्या घरी अंड्याचे पदार्थ किंवा तत्सम नॉन व्हेज बनणार असेल तर या कढईला अज्जीबात हात लावायचा नाही असा माझा मीच नियम केलाय. आज्जीनं आयुष्यभर जो स्वयंपाक केला तो देवाचा नैवेद्य समजून केला त्यामुळे तिची भांडी अशा कारणांसाठी वापरली तर तिला वाईट वाटेल असं मला नेहेमी वाटतं.
गेली अनेक वर्ष आजी, आई, सासूबाई यांच्या हातचे मऊसूत रवा लाडू खात आले आहे. मागे अनेक वर्षांपूर्वी एकदा स्वतः करायचा प्रयत्न केलेला पण एकतारी पाकाचे तीनतेरा वाजले त्यामुळे तो विषय option ला टाकला. सासूबाई झक्कास लाडू करतात मग कशाला कष्ट. पण या दिवाळीत धीर करून आजीच्या याच कढईत रवा नारळ लाडू करायला घेतले. 'सांभाळून घे गं आज्जी' असं म्हणून पाकात रवा घातला आणि मस्त खुटखुटीत लाडू तयार. माझी मीच खुश. लेकीने आवडीने खाल्ले आणि परत लाडू ची फर्माईश आली. सासूबाईंनी पण दिवाळीत शाब्बासकी दिली.
आज परत एकदा रवा खवा लाडू करून झालेत.आता पाकाची भीती गेलीच. आजीची कढई असताना कसली भीती? अनेक वर्ष निगुतीनं वापरलेली अन्नपूर्णेची ही वस्तू... निर्जीव म्हणायला नुसतं...पण कोण जाणे आजीच्या हातची जादू आणि आशीर्वाद तिच्यात असणारच असणार असा माझा ठाम विश्वास आहे.
अशी हि माझ्या आजीची जादूची कढई...
काय मग येताय का मस्त ताजा लाडू खायला ? 😀
-©️स्मिता श्रीपाद

आदिमाया आदिशक्ती



गेल्या वर्षी नवदुर्गांच्या नावांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. रोज एक नवदुर्गा, तिची माहिती, स्तोत्र असं सगळं शोधायचा प्रयत्न केला होता. यंदा काय नवीन करावं सुचत नव्हतं. घटस्थापनेची घाटाची रांगोळी काढली आणि विचार सुरु केला. उद्यापासून काय ?

महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांच्या रांगोळ्या काढू असं ठरवलं. तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुकामाता, सप्तश्रुंगी चार देवी तर आहेतच. अजून विचार करता करता यमाईदेवी हे मूळपीठ आणि एकविरा आई पण आठवली. सातव्या माळेपर्यंत महाराष्ट्रातली देवी पीठं मिळाली. पुढचं सुचेना. तशा तर बऱ्याच देवी आहेत पण शक्यतो शक्तिपीठं, मूळपीठं काढायचा प्रयत्न होता. मनात म्हणलं उद्याचं उद्या बघू. देवीच बघून घेईल.
अष्टमी दिवशी सकाळी महालक्ष्मी काढूयात असं म्हणून रांगोळीचा डबा घेऊन बाहेर गेले पण मनात सतत कुठेतरी वाटत होतं कि अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी आणि ती आपण काढली आहे आधीच. पण आता अजून कुठली देवी सापडेना. इतक्यात समोर राहणारे काका बाहेर आले. कुठेतरी दुकानात निघाले होते.
"रोज बघतोय मी रांगोळ्या. छान येतायत. आमची देवी कधी काढणार ?"
"तुमची देवी कोणती काका ?"
"अंबेजोगाईची देवी. ती एकच कुमारिका आहे."
चला देवीनेच कोडं सोडवलं. गुगल बाबांनी पुढची मदत केली आणि अंबेजोगाईची योगेश्वरी साकार झाली. रांगोळी काढताना त्या दिवशी डोळेच वाहायला लागले.किती लक्ष आहे तिचं माझ्यावर. माझ्या साध्यासुध्या प्रश्नाला इतक्या सहजतेने ती उत्तरं शोधून देते तर आयुष्यात कुठल्याही अवघड प्रसंगाला ती असणारच आहे.
आज नवमीला जगाची आई जगदंबा साकारली आणि या नवरात्रीचा संकल्प देवी आईनेच पूर्ण करून घेतला.
रोज रांगोळी काढताना देवीचं रूप डोळ्यासमोर येत होतं. मानसपूजा होत होती.या नऊ दिवसांच्या नऊ रांगोळ्या त्या आदिशक्तीला अर्पण 🙏🏻
चराचरात भरून राहिलेल्या या शक्तीचा आशीर्वाद असाच कायम तुमच्या आमच्या पाठीशी राहो.
देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवि परं सुखम्
विद्यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीवन्तञ्च मां कुरु
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि
-स्मिता श्रीपाद
नवरात्र 2024

प्रबोधिनीत यायचे समर्थ व्हावया...

 प्रबोधिनीत यायचे समर्थ व्हावया...



'समर्थ' व्हायचे म्हणजे नक्की काय ? आणि ते ठरवायचं कसं ?
आमच्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतल्या नुकत्याच नववी मध्ये गेलेल्या 13-14 वर्षांच्या मुली जेव्हा आपल्यापेक्षा लहान (इयत्ता तिसरी ते पाचवी) अशा सुमारे वीसपेक्षा जास्त मुलींचं 4 दिवसाचं शिबीर आयोजित करतात आणि उत्तमपणे पार पडतात तेव्हा या मुलींचं मनापासून कौतुक वाटतं. समर्थ होण्याच्या दिशेने छोटंसं पाऊल म्हणूयात का ?
आज शिबिराचा शेवटचा दिवस म्हणून मुद्दाम शाळेत गेले होते. शिबीर संपल्यावर शिबिरार्थींना घ्यायला आलेले पालक या सगळ्या तायांचं मनापासून कौतुक करत होते. छोट्या छोट्या मुलींनी तायांसाठी भेटवस्तू आणल्या होत्या ( विशेष म्हणजे तायांनी भेटवस्तू घ्यायला नकार दिला. असं वस्तू घेणं आम्हाला योग्य वाटत नाही म्हणाल्या 🤗) आणि पुढचं शिबीर पुढच्या सुट्टीत नक्की घ्या असं पालक आणि छोट्या मुली आवर्जून सांगून गेल्या.
एखादी कल्पना सुचणे, ती सर्वांनी उचलून धरणे आणि एकमेकींच्या सहकार्यांनी नीट पार पाडणे अशा बऱ्याच गोष्टी या मुली शिकल्या असतील. अगदी गुगल फॉर्म वापरून शिबिराची नोंदणी घेणे, चार दिवसांचे सर्व नियोजन, नोंदणी शुल्काचा हिशोब असं सगळं मुलींना शिकायला मिळालं. या शिबिराचे संपूर्ण नियोजन जरी मुलींचे असले तरी अर्थातच ज्ञान प्रबोधिनी युवती विभागातल्या तायांचे आत्तापर्यंत मिळालेले मार्गदर्शन, दलावर चालणारे उपक्रम आणि त्यात शिकलेल्या गोष्टींची सांगड घालूनच मुली हे करू शकल्या.
फूल फूल गुंफुनीच माळ होतसे
थेंब थेंब झेलुनी, झरा वहातसे
मोकळ्या मनी, प्रेम फुलवुनी
माळा गुंफू या, या साखळी जोडूया
आपण जे शिकलोय ते पुढे पोचवण्यासाठी विचारांची आणि कृतीची साखळी कशी जोडायची हे या मुलींना छान कळायला लागलंय याचा आनंद आहे.असे उपक्रम करण्यासाठी मुलींना नेहेमी प्रोत्साहन देणाऱ्या युवती विभागाचे आणि प्रशालेचे खूप खूप आभार.
-स्मिता श्रीपाद

*मतदान दिनाच्या नोंदी*

 *मतदान दिनाच्या नोंदी*

7 मे 2024 रोजी सकाळी लवकर उठून यावरून अंघोळ करून मतदानाला पोचलो. फक्त दोन तास लाईनमध्ये उभं राहायला लागलं. नुसतंच उभं राहून काय करायचं म्हणून हुशारी करून वाट्टेल ती कारणं ( माझा नंबर घरच्यांनी धरून ठेवला आहे, मी इथेच होते xerox काढायला गेले होते ई ई ) देत लाईन च्या मध्ये घुसणाऱ्या 2-4 जणांशी भांडून घेतलं. तेवढाच जरा वेळ गेला.
या लोकांच्या जोडीला सिनिअर सिटीझन थेट प्रवेश मिळवत होते त्यामुळे आम्ही उभे राहिलेली लाईन जागची हलतच नव्हती. रोज सकाळी मस्त टुणटुणीत 4-5 किमी फिरणारे, मित्र मौत्रिणींसोबत हास्य क्लबमध्ये उड्या मारणारे असे तंदुरुस्त जेष्ठ थेट आत जाऊन मतदान करून मग बाहेर येऊन सेल्फी काढत बसलेले बघून पुढच्या वेळी 40 + ला पण सिनिअर म्हणून मान्यता द्यावी असे येणाऱ्या सरकारकडे खास अपील करण्यात येत आहे 😜.
सिनिअर सिटीझन साठी पुढच्या वेळेपासून स्वतंत्र बूथ करा असा एक महत्वाचा सल्ला माझ्या पुढच्या ताईंनी वैतागून बूथ ऑफिसरला दिला.
अखेर 2 तासांनी बूथ मध्ये पोचले. तिथे मात्र 2 मिनिटात काम झालं. तत्परतेने नाव शोधणे, ओळखपत्र तपासून बघणे हि कामे व्यवस्थित पार पडली. ओळखपत्रावरचा फोटो बघून माझ्याकडे 2 वेळा संशयाने पाहणाऱ्या साहेबांना "काळजी करू नका मीच आहे" असे आश्वासन दिले.
बोटावर शाई लावणाऱ्या काकांना नीट नाजूकपणे शाई लावा नाहीतर पसरते आणि फोटो मध्ये चांगली दिसत नाही असं आवर्जून सांगितलं.त्यांनी लगेच "गेल्यावेळची शाई पातळ होती म्हणून पसरली, यावेळची घट्ट आहे. दर्जा चांगला आहे" असे म्हणून खरंच नीट शाई लावली.
अखेर हव्या त्या (?) चिन्हावर बोट ठेवून माझे "मौल्यवान" मत (या आठवड्यातली नियोजित सहल मतदानासाठी पुढे ढकलली त्यामुळे बुकिंग बदलायला 10k चा फटका बसला. मी मत दिलेली व्यक्ती जिंकली तर त्यांना न विसरता बिल पाठवणार आहे.) नोंदवले आहे. बीप चा आवाज ऐकला, शेजारच्या यंत्रातुन मी दिलेल्या मताचीच पावती दिसते का हे नीट पाहिले आहे.
अशा रीतीने मतदान राष्ट्रकर्तव्य सुफळ संपूर्ण
( सुफळ आहे कि नाही ते 4 जून ला कळेल पण मनात आशा धरायला काय हरकत आहे )
भारत माता की जय !!!
त.टी. - नवऱ्याचं आणि माझं नाव वेगवेगळ्या बूथ मध्ये आलं होतं. तो पंधरा मिनिटात बाहेर आला आणि मग माझी लाईन बघून बिचारा एकट्याचा फोटो काढून निघून गेला. नवराबायकोला मुद्दाम वेगळे बूथ दिले म्हणजे नवर्यांना निर्धास्तपणे 'स्वतःचं' मत देता यावं हा यामागे छुपा हेतु असू शकतो काय ? असो. देशासाठी कायपण 😀
-©️स्मिता श्रीपाद
7 मे 2024

हेचि_दान_देगा_देवा



 "आजी(सासूबाई), शुक्रवारी हळदीकुंकू करूयात का ? तू पुण्यात आलीस कि करायचं मी ठरवलं होतं. आता करून घेऊ"

"हो चालेल की. तसंही आता हनुमानजयंती पासून कृष्णाबाईचा उत्सव सुरु झालाच आहे तर करून घेऊ"
"कराडहून येताना देवांचे टाक आणलेस तसं पणजी ची गौर पण आणायला हवी होती नाई... तीच मांडली असती पूजेत"
"खरंच की.. पण आता कशी आणणार ? असू देत. कराड मध्ये मी पूजा केली आहे तिची. इथे तुझी देवघरातली अन्नपूर्णा आहेच की"
माझा आणि सासूबाईंचा हा संवाद झाला मंगळवारी आणि बुधवारी सकाळी अचानक भाऊ आजोबाचं(सासरे)परत कराड ला जायचं ठरलं आणि शुक्रवार संध्याकाळ किंवा शनिवारी सकाळी एका कार्यक्रमासाठी लगेच पुण्याला परत यायचं सुद्धा ठरलं.
"तुमची गौर आणायची असेल तर मी आणतो" असं आजोबानी म्हटल्यावर शुक्रवार चं हळदीकुंकू आम्ही ताबडतोब शनिवारी ढकललं.
ठरल्याप्रमाणे, शुक्रवारी रात्री गौराबाई घरी आल्या. आज मोगरा, गुलाब, चाफा आणि इतर भरपूर फुलं, अत्तर, कैरीचे पोपट, झाडांची हिरवी आरास, रवा खवा लाडू, आंबे, अत्तरदाणी, गुलाबदाणी, कैरी डाळ, पन्ह अशी साग्रसंगीत आरास मांडून दिमाखात बसल्या. हळदीकुंकू साजरं झालं...
आमच्यापेक्षा आमच्या गौराईला जास्त हौस 😍😍
ताक :- हि झोपाळ्यात बसलेली गौर माझी पणजी म्हणजेच माझ्या आज्जे सासूबाईंची सुमारे 80-90 वर्षे जुनी असावी. झोपाळा, त्याला भक्कम कड्या आत बसलेली गौर, तिच्यासमोर नंदी, गणपती आणि नागोबा अशी खणखणीत वजनदार मांडणी आहे. पणजीला कैरीची डाळ, पन्ह, आरास असं साग्रसंगीत चैत्रगौरीचं हळदीकुंकू करायला फार आवडायचं असं सासूबाई सांगतात. तिनं पुजलेली, तिचा हात लागलेली, माझी आजी, आई अशा सगळ्यांचा स्पर्श झालेली हि गौर आज पुजायला मिळाली तेव्हा शांताबाईंची "आज्जीची पैठणी" कविता आठवली. त्यातलं शेवटचं कडवं असं आहे...
मधली वर्षे गळून पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकडयांनो
आज्जीला माझे कुशल सांगा
हळदीकुंकवाची सगळी धावपळ संपल्यावर मघाशी गौराईला हात जोडून माझ्या पणजी, आजी आणि आईकडे असाच निरोप द्यायला सांगितला आहे 😊🤗
-©️स्मिता श्रीपाद
27 एप्रिल 2024

मन सुद्ध तुजं......

 


मन सुद्ध तुजं......

संकल्प आणि पूर्तता यामधला प्रवास सगळ्यात जास्त अस्वस्थ तरीही आनंददायी असतो... एखाद्या गोष्टीचा संकल्प केला जातो तेव्हा उत्साह असतो, काहीतरी भारी करुन दाखवण्याची उर्मी असते पण त्यासोबतच थोडी धाकधुक, थोडी भिती सुद्धा असते.
हा संकल्प जेव्हा एकट्या माणसाचा नव्हे तर समुहाने केला जातो तेव्हा त्याची ताकद अनेक पटीने वाढते.एक ध्येय समोर धरुन एकत्रित प्रयत्न केले जातात, अडल्यानडल्याला हात देउन एकमेकांच्या साथीने वाटेत आलेले अडथळे पार होतात आणि आकाराला येते एक सुरेख कलाकृती..
२१ एप्रिल २०२४ ला अशाच एका संकल्पपुर्तीचा आनंद आम्ही सगळ्या पालक अभिव्यक्ती गटाने आणि त्यासोबतच प्रेक्षकांनी सुद्धा घेतला.
"मराठी उद्योजकांच्या अनवट वाटा" असा विषय घेउन यावर्षी कार्यक्रम करायचा असं जेव्हा अभिव्यक्ती नियोजन गटावर ठरलं तेव्हा मनात कुठेतरी एक बारीकशी शंका होती की या विषयावर नृत्य, नाट्य, गायन असा १- १:३० तासाचा कार्यक्रम होउ शकेल ? पण आसावरी ताई ने सुचवलेला हा विषय खरोखरच वेगळा ठरला आणि आपल्या गुणी पालकांनी सगळ्या शंकांना छेद देत तब्बल २ तासाचा कार्यक्रम उभा केला. लेखन, नाट्य, गायन, वादन, चित्रकला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतर अभिव्यक्ती या गटांकडुन इतका भरभरुन प्रतिसाद मिळाला की वेळ वाढल्या कारणाने मध्यांतर घेउन कार्यक्रम दोन अंकी करावा लागला 😊
साधारण डिसेंबर महिन्यापासुन लेखन गटाचं काम सुरु झालं होतं आणि फेब्रुवारी पासुन पालक कलाकारांना आवाहन केलं गेलं. आपापल्या आवडीप्रमाणे अभिव्यक्ती निवडुन त्याप्रमाणे दर शनिवार रविवारी सरावांना सुरुवात झाली. हळुहळु एक एक कार्यक्रम आकार घेउ लागला. ऑडीटोरीयम बुकिंग, पाहुण्यांना निमंत्रणे, फ्लायर बनवणे, बॅकस्टेज गटाची बांधणी आणि कामेवाटप अशी लगबग सुरु झाली. सुमारे ५०-६० कलाकारांचा डोलारा यशस्वीपणे सांभाळणं सोपं काम नाही पण आमचे समन्वयक आसावरी ताई, अमित दादा आणि मिलिंद दादा अर्थात सुकाणु समिती यांनी उत्तम नेतृत्व आणि नियोजन कौशल्याच्या जोरावर हे काम लीलया पार पाडलं.
यावर्षी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी कलाप्रदर्शन भरवण्याची आनंद दादांची कल्पना सर्वांना खुप आवडली. चित्रकला आणि इतर अभिव्यक्ती गटाने बनवलेल्या विविध वस्तुंचे कलाप्रदर्शन खालच्या उपासना मंदिरात भरवले त्याला सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला.
गायन, वादन, नृत्य, नाटुकली यासह यावर्षी आम्ही अभिवाचन, पथनाट्य, पोवाडा, कीर्तन, वाद्यमेळ असे बरेच प्रकार हाताळायचा प्रयत्न केला आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादातुन असं अभिमानाने म्हणु शकतो की तो सगळ्यांना आवडला सुद्धा.
बारा बलुतेदार कविता रंगमंचावर सादर करताना त्यासोबत त्या त्या बलुतेदाराची उपकरणं बनवायची आणि त्यासोबत मूकाभिनय सुद्धा करायचा ही श्रद्धा ताई ची कल्पना जोरदार यशस्वी झाली. कुंभाराच्या चाकापासुन ते तेलाचा घाणा, चांभाराची उपकरणं, लोहाराचा भाता अशी पालकांनी हाताने बनवलेली उपकरणं स्टेज वर अवतरली तेव्हा बारा बलुतेदार कविता नुसती वाचनीय नव्हे तर प्रेक्षणीय झाली होती.
आसावरी ताईच्या लेखणीतुन उतरलेली गाणी, त्याला सायली ने लावलेल्या सुंदर चाली आणि श्रद्धा ताई ने बसवलेली उत्तम नृत्य यांनी प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडलं. पथनाट्य, कीर्तन, अभिवाचन अशा अनेक नवीन अभिव्यक्ती करुन बघता बघता आम्हीसुद्धा वेगळं काही शिकायचा प्रयत्न केला.
आमच्या या प्रयत्नाचं प्रशालेतल्या मान्यवरांनी, मित्रमंडळींनी, आमच्या घरच्यानी मनापासुन कौतुक केलं याचा खुप आनंद आहे. असाच लोभ असु द्यावा.या संपुर्ण प्रक्रियेत आमच्याकडुनही काही चुका झाल्या हे मान्यच आणि त्या सुधारण्याचा नक्की मनापासुन प्रयत्न करुच. या चुकाच अजुन उत्तम करण्याची आणि पुढं जाण्याची प्रेरणा देणार आहेत. स्वतः मधल्या क्षमतेला तपासुन बघणं आणि त्या क्षमता वाढवायचा प्रयत्न करणं हेच खरं.आणि शेवटी काय तर गेले दोन महिने आमचं आम्हीच स्वत: ला सांगतोय की...
मन सुद्ध तुजं गोष्ट हाये पृथ्वीमोलाची...
तु चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची...
पर्वा बी कुनाची... 🤗
-©️स्मिता श्रीपाद
23 एप्रिल 2024

प्रिय आई


 

प्रिय आई,

आज तुझा वाढदिवस...
'You are always with us…You are watching us…'
वगैरे वगैरे अजिबात लिहिणार नाहीये आज....
सारखे कसले शब्दांचे बुडबुडे नुसते...
हाडामासाचा माणूस...असतो किंवा नसतो
मधलं अधलं काहीच नाही...नाही म्हणजे नाही...
स्पर्श नाही... वास नाही... आवाज नाही... चाहूल नाही...
काही काही नाही....
काय अर्थ आहे ना याला ?
सारखी सारखी काय मनाची समजूत काढायची ?
"तू आहेस आमच्यासोबत... आमच्या आत" ई ई
हे सगळं ठीक आहे ...
पण ...
प्रत्येक वेळी तुला भेटून घराबाहेर पडतानाची तुझी मिठी
गालावर झालेला तुझ्या ओठांचा पुसटसा स्पर्श
तुझ्या साडीचा,ओढणीचा वास
तुझा आवाज तुझा स्पर्श
तुझ्या हातची चव उतरलेला खमंग आमटी भात
हे सगळं त्या 'तू आहेस कुठेतरी' मध्ये कुठून आणायचं ?
खूप गप्पा मारायच्या राहिल्या
माझं खूप सारं लिखाण तुला दाखवायचं राहिलं
तुझ्या 60 व्या वाढदिवशी तुला सरप्राईज द्यायचं राहिलं
माईनमूळ्याच्या लोणच्याची रेसिपी घ्यायची राहिलीच
मनाशी ठरवलेले सगळे बेत तसेच राहिले...
तुझ्याशी किती दिवसात भांडलेच नाही ना गं...
म्हणून हा आजचा रंग भांडणाचा....😊
हे असं अचानक लिहिलं म्हणून घाबरू नकोस...
खचले नाहीये... खंबीर आहे...तूच बनवलंयस...
सारखं समजूतदारपणा दाखवायचा कंटाळा आला...
तुझी आठवण येतेय गं...
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 😘😘😘
खूप प्रेम ❤️
तुझीच,
ताई

विद्याव्रत

 आज दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी इयत्ता 8वी मुलींचा अतिशय हृदय असा विद्याव्रत(उपनयन) समारंभ ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमध्ये साजरा झाला.याप्रसंगी पालक म्हणून विद्याव्रताच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल आणि प्रशालेबद्दल व्यक्त केलेले मनोगत


ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या वास्तु मधे आलं की मला नेहेमी आचार्य अत्रेंची एक कविता आठवते
ही आवडते मज मनापासुनि शाळा,
लाविते लळा ही जशी माउली बाळा
इथे मधल्या चौकात उभं राहिलं आणि वर शाळेकडं पाहिलं की असं वाटतं की आमची मुलं किती नशीबवान, कारण त्यांना आई बाबांसोबत इतकं प्रेम देणारी आणि त्यासोबत उत्तुंग ध्येय देणारी अशी शाळामाउली लाभली आहे. आम्ही आमच्या मुलींना घ्यायला कधीही शाळेत आलो की नेहेमी येणारा अनुभव असा आहे की या वास्तुतुन त्यांचा पाय निघतच नसतो.
आमच्या मुलींच्या आयुष्यातल्या सोळा संस्कारांमधला अतिशय महत्वाचा संस्कार आज आत्ता इथे नुकताच संपन्न झाला.
*"विद्याव्रत संस्कार सोहळा"*
आत्ता या घडीला आम्ही सगळे पालक, इथे मागे बसलेले आमच्या मुलांचे आज्जी आजोबा खरतर खुप भारावुन गेलो आहोत. गेल्या २ तासात इथे जो सुन्दर कार्यक्रम साजरा झाला त्याला 'सोहळा' हाच शब्द चपखल आहे. विद्याव्रत... विद्येचं व्रत... विद्या मिळवण्यासाठी केलेला संकल्प, प्रतिज्ञा आणि उपासना .....हे सगळं करण्यासाठी स्वतः ला ठरविक नियम घालुन घ्यायचे आणि तसं वागायचा प्रयत्न करायचं... आयुष्यातली पुढची काही वर्षे फक्त आणि फक्त विद्या मिळवुन स्वत: ला सक्षम करण्यासाठी वापरायची. किती सुरेख संस्कार आहे हा.
या विद्याव्रताच्या निमित्ताने गेले वर्षभर शारीरिक, मानसिक, बौधिक, सामाजिक विकसन, आत्मगुणांचे विकसन अशा विविध विषयांवर आधारित विद्याव्रत व्याख्यानमाला प्रशालेने मुलींसाठी अयोजित केलेली होती. पालक म्हणुन ज्या विषयाचा आम्ही कदाचित कधीच विचार करु शकलो नसतो उदारणार्थ राष्ट्रअर्चना अशा विषयांवरसुद्धा व्याख्यान आणि चर्चा यानिमित्तने मुलींनी केली. या सगळ्या व्याख्यानांमधे जे काही मुद्दे शिकवले ते कदाचित सगळेच या मुलींना कळले नसतील. पण कुठेतरी मेंदुने ती नोंद घेतली आहे. आपण म्हणतो तसं subconscious mind मधे एक विचार सुरु झाला आहे. लहानपणी वाचलेल्या, ऐकलेल्या कुठल्याशा कवितेचे किंवा गोष्टीचे अर्थ मोठेपणी अचानक उलगडतात. कविता तोंडपाठ असते, गोष्ट नीट लक्षात असते पण अर्थ सापडला की आनंद होतो, बरोबर संदर्भ लागतो आणि सगळे धागे उलगडत जातात, पुढचे मार्ग दिसायला लागतात. तसंच या सगळ्या व्याख्यानांमधे झालेल्या चर्चा कुठे ना कुठे पुढे जाउन नक्कीच तुम्हा सगळ्या मुलींना उपयोगी पडणार आहेत.
या सगळ्या वर्षभर चाललेल्या उपक्रमांचा कळसाध्याय म्हणजे सज्जनगड इथे झालेलं विद्याव्रत शिबीर. वर्षभर झालेल्या व्याख्यानांची उजळणी, श्रमकार्य, माननीय मिलिंद सर्, माननीय संचालक गिरीशराव यांची सत्रं,दलाच्या ताईंनी घेतलेले खेळ, रात्री गायलेली भजनं, पहाटे ५ वाजता गडाच्या पठारावर मुलींनी केलेली उपासना आणि समोर हळुहळु उगवणारा सहस्त्ररश्मी.
विश्वास या मनीचा सांगु उभ्या जगाला,
आम्ही रवी उद्याचे अंधार भेदण्याला
हे पद्य मुलींना प्रत्यक्षात जगायला मिळालं.
मी मघाशी म्हणाले तसं आमच्या मुली खरच नशीबवान आहेत. त्यांना हे अनुभवता आलं. हे आयुष्यभर त्यांच्या स्मरणात राहिल.
शाळेने खरतर आता आम्हा पालकांवर पण एक मोठी जबाबदारी दिली आहे. या व्रताची जोपासना करण्यासाठी घरी योग्य वातावरण कसे ठेवता येईल ही आमची जबाबदारी आहे. मला वाटतं की यासाठी आम्हा पालकांसाठी सुद्धा एखादं मार्गदर्शनपर व्याख्यान प्रशालेनं आयोजित करावं अशी मी विनंती करते.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे... आपण जे काही करतो आहोत, जे काही ज्ञान मिळवतो आहोत त्याचा मला पुढे जाउन उपयोग होणारच आहे पण त्याचप्रमाणे माझ्या देशाला त्याचा कसा उपयोग होइल हे पण मला बघायचं आहे.. हा विचार आमच्या मुलांमधे प्रशाला कायम रुजवत असते.दलांवरच्या पद्यातुन, विविध उपक्रमांमधुन
" भारतमाता एकच दैवत येत्या दिवसांचे" हाच विचार आमची मुलं शिकत आहे.देशप्रेम असं या वयापासुन अंगात मुरलं की आपल्याला मिळालेली विद्या योग्य ठिकाणी कशी वापरायची हे अपोआपच या सगळ्यांना नक्की समजेल याची खात्री वाटते.
आचार्य अत्रे कवितेत म्हणतात...
येथेच बंधुप्रेमाचे घ्या धडे,
मग देशकार्य करण्याला व्हा खडे
त्यांची माफी मागुन एकच शब्द बदलते...
येथेच 'विद्याव्रताचे' घ्या धडे,
मग देशकार्य करण्याला व्हा खडे
पसरवा नाव शाळेचे चहुकडे,
मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा
जी देशासाठी तयार करीते बाळा,
लाविते लळा ही जशी माउली बाळा,
ही आवडते मज मनापासुनि शाळा
या सुंदर अनुभवासाठी प्रशालेचे आभार मानणार नाही कारण आईचे आभार मानायचे नसतात.
आम्ही कायम शाळेच्या ऋणात राहु. आम्ही कृतज्ञ आहोत.
धन्यवाद.
-स्मिता श्रीपाद
पालक, ८ वी मुली
11 फेब्रुवारी 2024