Showing posts with label प्रवासवर्णन. Show all posts
Showing posts with label प्रवासवर्णन. Show all posts

Wednesday, July 23, 2025

*प्रयागराज महाकुंभ 2025...अनुभव*

 *प्रयागराज महाकुंभ 2025...अनुभव*



प्रयागराज महाकुंभ ला जायचं ठरलं तेव्हा खरंतर मनात संमिश्र भावना होत्या. कशाला जायचंय एवढ्या गर्दीत ? आधीच इतके लोक येतायत, प्रशासनावर ताण आहे, आपण त्यांचा भार का बनायचं ?
पण कसं असतं की Eveything is Planned... आपल्या बाबतीत कधी काय घडणार हे ठरलेलं असतं आणि ते कोणीच बदलू शकत नाही.अशी अनपेक्षित पणे ही संधी आली आणि पोचलो.प्रत्येकवेळी व्यावहारिक होऊन चालत नाही.. Just go with the flow...
प्रयागराज बद्दल आणि कुंभ च्या अनुभवांबद्दल आधी बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल पण माझे अनुभव नोंद करून ठेवावेसे वाटले म्हणून हा तिसरा लेख. अजूनही जायची इच्छा असलेल्याना काही मदत झाली तर बरंच होईल.
प्रयागराज पर्यंत प्रवास कसा केला ? -
आम्ही मुंबई ते प्रयागराज थेट विमानसेवा घेतली होती.विमानाने साधारण दोन तास लागतात. प्रयागराज विमानतळ शहराच्या बाहेर आहे. तिथून गावात जाण्यासाठी उबर टॅक्सी बुकिंग विमानतळावर मिळू शकते किंवा बाहेर ऑटो रिक्षा वाले उभे असतात त्यांच्यासोबत भाव ठरवून जाता येते. सध्या कोणताच फिक्स रेट नाही पण साधारण 500-800 रुपयात शहरात जाता येईल.
विमानाशिवाय, बस, रेल्वे, खाजगी गाड्या असे अनेक पर्याय आहेत.
राहण्याची व्यवस्था -
सध्या संपूर्ण शहरच जणू हाऊसफुल बुक झालेले आहे. अगदी होम स्टे पासून मोठ्या हॉटेल्स पर्यंत. आम्ही बुकिंग डॉट कॉम वरून सुपर कलेक्शन ओयो रूम बुक केली होती. मीरपूर अटला भागात हे हॉटेल होते. अतिशय बेसिक रूम होती पण पर्याय नसल्याने आणि दिवसभर फिरून झोपण्यापुरते इथे यायचे म्हणून जास्त चिकित्सा केली नाही. दुसरे म्हणजे इथून किडगंज बोट क्लब जवळ होता.या प्रवासात कंफर्ट हा मुद्दा नसल्याने काही गैरसोयी चालवून घेतल्या.
सिव्हिल लाईन परिसरात जास्तीत जास्त हॉटेल्स आहेत पण तिथे कधीही वाहनांसाठी रस्ते बंद केले जातात त्यामुळे जास्त चालावे लागते. ते बघता आम्ही घेतलेली रूम लगेच रिक्षा मिळण्याच्या दृष्टीने अतिशय सोयीची निघाली.
शहरात कसे फिरलो -
प्रयागराज मध्ये सगळीकडे e-रिक्षा आहेत.काही अतिशय सज्जन रिक्षावाले भेटले तर काही मनाला येईल तो दर सांगणारे भेटले. या रिक्षावाल्याना सगळे गल्ली बोळ अत्यंत व्यवस्थित माहिती असतात त्यामुळे मुख्य रस्ते बंद झाले तरी गल्ली बोळातून मार्ग काढत त्यातल्या त्यात आपल्याला जिथे जायचंय तिथे जवळ ते नेऊन सोडतात.त्यांच्याशी दर ठरवताना जरा घासाघीस करावी लागली.काहींनी खूप मदत केली तर काहींनी लहान अंतरासाठी अव्वाच्या सव्वा दर घेऊन फसवलं. अशा लोकांशी परक्या गावात आपण जास्त वाद न घालणे उत्तम हे तत्व आम्ही पाळलं. एकटे असाल तर फिरण्यासाठी उबर बाईक असा पण पर्याय आहे. हे बाईक वाले लोक पण सध्या खूप पैसे मागत आहेत असे कळले. आम्ही तिघे असल्याने हा पर्याय आम्हाला शक्य नव्हता.शेवटचा पर्याय म्हणजे सरळ चालत सुटणे 😃
काय खाल्ले-
या शहरातले लोक खूप कमी हॉटेलिंग करतात असे एकंदर वाटले. मनकामेश्वर घाट, बोट क्लब या ठिकाणी अतिशय कमी खाण्याच्या जागा होत्या. एखादं बरं, शांतपणे बसून जेवता येईल असं उपहारगृह नव्हतंच. पण रस्त्यांवर चाट चे ठेले प्रचंड प्रमाणात होते. कचौडी सब्जी, आलू टिक्की, टमाटर चाट, पाणीपुरी याचे भरपूर गाडे. लिट्टी चोखा चे पण काही गाडे दिसले. विशेष म्हणजे डोसा आणि चायनीज विकणारे पण बरेच स्टॉल होते. तब्बेतीचा विचार करत करत सुरुवातीला हे खायला आम्हाला भीती वाटली पण तरी मोह न आवरल्याने कचोरी, आलू टिक्की चाट, सुखी भेळ, पाणीपुरी, सब्जी कचौडी एवढ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. सगळेच चाट पदार्थ चवदार होते. विशेषतः बोट क्लब जवळ रगडा आणि मिठी चटणी घातलेली कचोरी आणि सकाळी नाश्ता म्हणून खाल्लेली सब्जी कचौडी अफलातून होती.बोट क्लब वर लेझर शो बघताना पिलेला चहा गोड, आंबट, जराश्या खारट अशा वेगळीच चवीचा काळा चहा होता. त्या थंड वातावरणात मस्त रिफ्रेशिंग लागला.
रस्त्यांवर ठिकठिकाणी लोखंडी कढया ठेवून दूध घोटून खवा बनवणारी दुकानं, लोणी, पनीर विकणारी दुकानं पण भरपूर होती. इस्कॉन मंदिरात अप्रतिम पेढे आणि कलाकंद मिळाला. उत्तर प्रदेश चे लोक चाट आणि दूधदुभत्यावर जगतात असं वाटलं.
एके ठिकाणी जाताना MG रोड असा एक रस्ता लागला तिथे KFC, मॅकडॉनल्ड्स , BBQ नेशन्स पण दिसले.
पण साधी राईस प्लेट मिळणारी दुकानं आम्ही फिरलो त्या भागात कमीच होती.त्यामुळे तिथे जाताना सोबत फळं, बिस्किटं, थोडा कोरडा खाऊ सोबत असलेला उत्तम.
त्रिवेणी संगमावर कसं जायचं -
संगमावर जाण्यासाठी बरेच मार्ग आहेत. संगम रोडवरून चालत सुटलं कि संगम घाट मार्गे पोचता येतं पण हा रस्ता प्रचंड गर्दीचा आहे आणि संपूर्ण चालत पार करावा लागतो.
अरेल घाटावरून संगमावर जाण्यासाठी बोटी सुटतात असे पण कळले.
आम्ही किडगंज भागातल्या बोट क्लब चा पर्याय निवडला. बोटीचा सरकारने ठरवलेला दर माणशी 450-500 आहे पण मी आधी लिहिलं तसं संगमावर जाऊन यायला 3 तास लागतात. 3 तास नाव वल्हवत आपल्याला संगमावर नेऊन आणायचे 500 रुपये ही खूप कमी रक्कम आहे.त्यांची शारीरिक मेहेनत बघता त्याने जास्त रक्कम मागणं स्वाभाविक वाटलं.त्यामुळे त्याने मागितलेली रक्कम आम्ही फारशी घासाघीस न करता दिली. किती दिली हे इथे सांगणं योग्य वाटत नाही. वैयक्तिक संपर्क साधावा.
या पॉईंटवरून मोटार बोट पण दिसत होत्या पण त्यांची संख्या कमी होती. एक अतिशय आवडलेली गोष्ट म्हणजे लाईफ जॅकेट्स घालणे बंधनकारक होते आणि सर्वजण हा नियम पाळत होते. चुकून माकून जॅकेट काढून फोटो काढायला बोट वर उभे राहणाऱ्या हौशी कलाकारांना नावाडी दादा जोरदार ओरडत होते. नदीतून फिरणाऱ्या पेट्रोलिंग करणाऱ्या लाईफ गार्डस च्या बोटी सुद्धा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होत्या.
गर्दी आणि इतर व्यवस्थापन -
गर्दी बद्दल उदंड बातम्या आणि रील येत आहेत आणि ते सगळे अगदी खरे आहेत. विशेषतः प्रयागराज मधलं प्रयागराज_ऑफिशिअल असं हॅन्डल असलेलं इंस्टाग्राम अकाउंट ज्या बातम्या देतं त्या जास्त रिलायबल वाटल्या.महाकुंभ चं जोरदार ब्रॅण्डिंग आणि सोशल मीडिया कृपेने तिथे भरपूर भाविक सध्या येत आहेत. स्वतः च्या गाड्या घेऊन बाहेरून आलेल्या लोकांनी जमेल तिथे जमेल तसं पार्किंग केलं कि रस्ते ब्लॉक होतात. शहराबाहेर स्वतंत्र पार्किंग स्लॉट्स आहेत तिथं गाड्या लावून मग पब्लिक ट्रान्सपोर्ट ने आत येणं अपेक्षित आहे पण हा नियम पाळला गेलेला दिसला नाही.
गर्दी आणि ट्राफिक जॅम चं दुसरं कारण म्हणजे VIP मंडळींचे लाड. देशासाठी महत्वाच्या व्यक्तींना VIP म्हणणं समजू शकतं पण तिथं VIP म्हणजे नक्की कोण हे ठरवण्यात गल्लत झालेली असावी.
म्हणजे एखादा रस्ता चालू असतो. गर्दी असली तरी गाड्यांची ये जा सुरळीत सुरु असते आणि अचानक पॉ पॉ करत पोलीस एस्कॉर्ट वॅन, त्याच्या मागे पुढे गाड्यांचा ताफा आणि मध्ये VIP लिहिलेली गाडी असा ताफा येतो आणि सगळ्या गाडयांना ओव्हरटेक करत रॉंग साईड ने पुढे घुसतो. झालं सगळं ठप्प, लगेच ट्राफिक पोलीस पुढे येतात, VIP ला जागा देतात आणि मग रस्ता बंद करून टाकतात. दोन दिवसात सगळ्यात जास्त राग आला तो या VIP management चा. यावर काही उपाय काढला तरी अंतर्गत वाहतुकीत बराच फरक पडेल असं वाटलं.असो. प्रशासनाचे प्रॉब्लेम्स त्यांना माहिती. हे फक्त माझं निरीक्षण झालं.
साधूंचे आखाडे:-
साधूंचे आखाडे असलेल्या जागी आम्ही जाऊ शकलो नाही. एकतर ते संगमाच्या पलीकडे होते. संगम घाट मार्गे जायचं असेल तर तिथे जाण्यासाठी 8-10 किलोमीटर तरी चालत जावं लागत होतं. दुसऱ्या कुठल्या बाजूने तिथे थेट गाडी जात असेल तर माहिती नाही.
एकंदर या दोन दिवसात अनेक अनुभव आले.
कुंभ हे एक वेगळंच जग होतं. हे जग सर्वांना सामावून घेतं.
8-9 महिन्याच्या बाळापासून ते पार 80 वर्षांच्या आज्जीपर्यंत सर्वांना गंगास्नानासाठी घेऊन आलेलं श्रद्धाळू कुटुंब, उत्तर प्रदेशच्या खेड्यापाड्यातून काम मिळवायला आलेले आणि इथे येऊन होड्या चालवणारे तरुण, कुठल्याशा खेड्यातून गंगाजलाचे मोकळे कॅन विकायला आलेली तरुणी, रुद्राक्ष, कस्तुरी विकणाऱ्या मुली, थेट इटलीहून भारतात कुंभमेळा बघायला आलेले पर्यटक सर्वांना तिथे काही ना काही सापडतच.
गंगा आहे तिथेच आहे.. अविरत वाहते आहे.. तिच्या काठावर चाललेली हि सगळी उलाढाल ..भावनांची, पैशाची, परंपरेची, धर्माची .. हे सगळं तटस्थपणे बघत या सगळ्यांना सामावून घेत पुढे वाहते आहे...तिच्याकडून शांतपणा शिकायचा..प्रवाहीपणा शिकायचा..अविरत पुढे जात राहणे एवढंच शिकायचं...
हेच या महाकुंभ चं फलित...
नमामि गंगे 🙏🏻
हर हर महादेव 🙏🏻
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 🙏🏻
समाप्त
-©️स्मिता श्रीपाद
12 फेब्रुवारी 2025


*प्रयागराज महाकुंभ 2025...अनुभूती*

 *प्रयागराज महाकुंभ 2025...अनुभूती*



प्रयागराज त्रिवेणी संगमावर जायचे बरेच पर्याय आहेत. त्यापैकी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे किडगंज बोट क्लब वरून बोट पकडणे आणि पाण्यातून थेट संगमावर जाणे असा अभ्यास आम्ही करून गेलो होतो. त्यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 9 वाजता e-रिक्षा ने बोट क्लब च्या दिशेने निघालो.आज कालच्या पेक्षा जास्त गर्दी जाणवत होती. जागोजागी पोलीस बॅरिकेडींग मधून मार्ग काढत गल्ली बोळ फिरवत रिक्षा काकांनी एका जागी उतरवलं. रस्ता जाम होता त्यामुळे आता पुढे चालत.तिथून बोट क्लब 1.5-2 किमी वर होता म्हणे.
आता भूक पण लागली होती.त्यामुळे उतरून आधी थोडी फळं घेतली.नाश्ता काय ते शोधतोय तोवर एका गाडीवर कचौडी सब्जी असा बोर्ड दिसला.आजूबाजूला भरपूर गर्दी. लगेच जाऊन एक प्लेट ऑर्डर केली.5 कचौडी म्हणजे (बहुतेक उडदाच्या) खुसखुशीत पुऱ्या, बटाटा रस्सा भाजी, पनीर सब्जी, बुंदी रायता अशी भक्कम थाळी हातात आली. गरमगरम खुसखुशीत पुऱ्या, चवदार भाज्या तिथल्या थंडीत मस्तच लागल्या. पोटभर नाश्ता/जेवण झालं.
आजूबाजूला चर्चा चालू होती की बोट क्लब कसा फुल आहे, तीन तास वेटिंग आहे, त्रिवेणी संगम वर बोटी सोडणं थांबवलंय, आम्ही दीड तास थांबून आत्ता परत आलो वगैरे वगैरे. हे सगळं ऐकून शांतपणे बोट क्लब चा रस्ता धरला. जे होईल ते पाहू. महादेव बघून घेतील. ज्याने इथवर यायची बुद्धी दिली त्यावर भार टाकून बोट क्लब गाठला. तिथे प्रचंड गर्दी होती. बऱ्याच बोटींमध्ये लोकांना बसवून ठेवलं होतं पण बोटी जागेवरच.
गर्दीमध्ये शिरून बोट वाल्यांशी वाटाघाटी सुरु केल्या. काहींनी थेट नाही असं सांगितलं. 10 मिनिटे थांबलो आणि तेवढ्यात दोन तरुण त्यांची लहानशी होडी घेऊन काठाला लागले. थोडं पुढे होऊन त्यांच्याशी बोलायला लागलो. बोलून भाव ठरवला. पुढच्या मिनिटाला आम्ही होडीत होतो. हर हर महादेव 🙏🏻. तीव्र इच्छाशक्ती आणि परमेश्वरी कृपा एवढं एकच उत्तर असू शकतं. बोट क्लब ते संगम अंतर 3-4 किलोमीटर आणि परत येताना तेवढंच म्हणजे एकूण 6-7 किलोमीटर होडीतून जायचं होतं. ही मोटार बोट नसून साधी वल्हवायची होडी होती. तरुणांची किती मेहेनत होती ते दिसत होतं. त्यामुळे पैशासाठी जास्त घासाघीस केली नाही.
यमुनेच्या शांत थंड प्रवाहातून होडी सुरु झाली. सोबतचे तरुण मस्त गप्पा मारायला लागले.त्यांनी जाता जाता मनकामेश्वर मंदिर आणि घाट, सरस्वती घाट, अकबराचा किल्ला अशी ठिकाणं दाखवली आणि सोबत सगळी माहिती मिळत होती. मोदीजी आणि योगी सरकारने केलेल्या व्यवस्थेवर दोघे खुश होते.सरकारने प्रचंड सोयी केल्यात पण अपेक्षेपेक्षा खूप जास्त लोक आलेत.त्यामुळे गैरसोय होते आहे असे त्यांनी बोलून दाखवले.
आजूबाजूला विहरणाऱ्या बोटी, नदीतून उडणारे पांढरेशुभ्र पक्षी, सुंदर स्वच्छ पाणी असा प्रवास करत सुमारे दिड तासाने संगमावर पोचलो. नदीच्या मध्यात एक लष्कराचं केंद्र आणि शस्त्रसज्ज सैनिक सुद्धा आहेत. लाईफ गार्डस च्या बोटी सतत आजूबाजूला फिरत होत्या.
संगमावर बोटींचा एक प्रचंड जथ्था होता. आमच्या नावाडीदादांनी त्यातून सावकाश वाट काढत आम्हाला संगमावर वाळूत नेलं. नदीच्या प्रचंड पात्राच्या मध्यभागी जिथे गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम होतो तिथे एक वाळूचे बेट वर आलेले आहे त्यामुळे या संगमाच्या ठिकाणी पात्र उथळ आहे आणि साधारण कमरेएवढे पाणी आहे.इथेच स्नानाची सोय आहे. कपडे बदलायला आडोसे केलेलं आहेत.
आमच्या नावडीदादाने सामान सांभाळायची तयारी दाखवली आणि आम्ही पाण्यात उतरलो तेव्हा सुमारे 11:30-11:45 वाजले होते.हवा थंड होती पण डोक्यावर सूर्यमहाराज असल्याने आता पाण्यापेक्षा हवा उबदार वाटत होती. पाणी थंड असले तरी छानच वाटत होतं.आजूबाजूला भाबड्या श्रद्धाळू भाविकांचं गंगास्नान, कोणी पाण्यात अर्ध्य देतंय, कोणी आचमन करतंय, कोणी नुसतंच डोळे मिटून हात जोडून उभे, कोणी मोठ्यांदा जयजयकार करतंय असं भारलेलं वातावरण होतं.
पाण्यात जाऊन शांतपणे उभं राहिलो. आपण फार जास्त कष्ट न करता इथवर पोचलो आहोत यामागे आपल्या आजी, आजोबा, आई, वडिलांचा आशीर्वाद आणि आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे हा भाव त्याक्षणी मनात दाटून आला. "आम्ही स्वतःहून इथे पोचलो नाही तर कोणत्यातरी अज्ञात शक्तीने हे घडवून आणलं" याची प्रकर्षानं जाणीव झाली आणि आपोआप त्या अज्ञात शक्तीपुढे हात जोडले गेले.
आजूबाजूला लोकांची प्रचंड गर्दी होती तरीसुद्धा निरंतर वाहणारा तो गंगेचा प्रचंड प्रवाह सगळ्या गर्दीला पुरून उरला होता.पुढच्या महाकुंभ ला म्हणजे अजून 144 वर्षांनी आज इथे असलेल्या लोकांपैकी कोणीच नसेल पण या नद्या तरीही इथेच असतील.144 वर्षांपूर्वी देखील त्या होत्या आणि पुढेही अनंतकाळ त्याच असतील हेच एकमेव सत्य आहे.
हेच अमरत्व..हेच अमृत.. हेच अमृतस्नान..
अमृतस्नान चा अर्थ त्याक्षणी समजल्यासारखा झाला. खरं अमृत अस्तित्वात असेल नसेल पण गेली हजारो वर्ष अविरत वाहणाऱ्या, आपल्या आजुबाजुची जमीन आणि त्याचबरोबर समस्त मानवजातीला पोसणाऱ्या या जीवनदायिनी, अमृतवाहिनी नद्या हेच अंतिम सत्य.
त्या आजूबाजूच्या प्रचंड गर्दीत आणि कोलाहलात सुद्धा आम्हाला आमच्यापुरती स्नान आणि प्रार्थना करण्यासाठी निवांत जागा मिळाली. शांतपणे आचमन करून गंगामाई च्या प्रवाहात डुबकी मारली. पाण्याचा थंडपणा आणि शांतपणा शरीरभर पसरला.सगळे विचार क्षणभर का होईना थांबले.
नमामि गंगे 🙏🏻 हर हर महादेव 🙏🏻
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 🙏🏻
असा जोरदार जयजयकार केला.
गेली अनेक वर्ष अशी कोणती शक्ती असेल जी या सगळ्या परंपरा पुढे नेत असेल ? कोण कुठले ते साधू, दर वेळी कुंभ मध्ये कुठून येतात ? नंतर कुठे जातात ? सगळंच बुद्धीच्या पलीकडचं.
पुढची 10-15 मिनिटे तिथे मनसोक्त वेळ घालवला. भरपूर फोटो काढले. आठवणी साठवून घेतल्या आणि मग बाहेर पडलो. कपडे बदलून परत एकदा होडीतून प्रवास करून परत किनाऱ्यावर आलो.
आता गर्दीचा ओघ अजूनच वाढलेला जाणवला. तिथून बाहेर पडलो तर आजूबाजूचे सगळे रस्ते वाहनांसाठी बंद झालेले दिसले.जमेल तेवढं चालत आणि जमेल तिथून रिक्षा मिळवून वाटेत एका ठिकाणी जेवण केलं तेव्हा 4 वाजले होते. आता यापुढे आखाडे बघायला जायचं तर किमान 8-10 किलोमीटर चालत जावं लागलं असतं आणि रूमवर परत यायचं तर परत तेवढंच अंतर. प्रचंड वाढणारी गर्दी आणि लोकांचे लोंढे बघून तो विचार सोडून दिला. सगळ्या गोष्टींचा अट्टाहास नको कारण आपण सुरक्षित राहणं पण महत्वाचं आहे, त्यासाठी काही गोष्टींवर पाणी सोडावं लागलं तरी चालेल असं आधीच ठरवलं होतं. 6 च्या आसपास रूम वर परत आलो.
थोडावेळ आराम करून आमच्या हॉटेल जवळ असलेल्या इस्कॉन मंदिराला भेट दिली. तिथं भजन आणि सत्संग चालू होता.थोडावेळ तिथला उत्साह बघून परत फिरलो. वाटेत आलू टिक्की चाट चा आस्वाद घेतला. रात्री जवळच असलेल्या एका टपरीवजा ढाब्यात जेवण केलं. फारसा त्रास न होता ज्यासाठी आलो होतो ते गंगास्नान अविस्मरणीय अनुभूती देऊन गेलं.रात्री अतिशय शांत झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 चं परतीचं विमान होतं पण गर्दीचा अनुभव बघता आम्ही 6:30 ला रूम सोडायचं ठरवलं. हा निर्णय अतिशय योग्य ठरला कारण भरपूर गर्दीतून आणि ट्राफिक जाम मधून विमानतळावर पोचायला जवळजवळ 8:45 वाजले. ठरल्याप्रमाणे वेळेत विमान सुटलं आणि दुपारी 2 वाजता मुंबई मध्ये पोचून संध्याकाळी 6 वाजता पुण्यात घरी सुखरूप पोचलो.
त्रिवेणी संगम स्नान ही एक अनुभूती होती. जमेल तसं शब्दात मांडायचा प्रयत्न केला.प्रयागराज कुंभमेळा अनुभवताना आलेले काही अनुभव (चांगले वाईट दोन्ही) पुढच्या शेवटच्या भागात मांडायचा प्रयत्न करेन.
हर हर महादेव 🙏🏻
नमामि गंगे 🙏🏻
क्रमश:
-©️स्मिता श्रीपाद
11 फेब्रुवारी 2025

*प्रयागराज महाकुंभ 2025...आरंभ*

 *प्रयागराज महाकुंभ 2025...आरंभ*



दर 3 वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या बातम्या गेली अनेक वर्षे मी बघते आहे. पण आवर्जून कधी तिथे जावं असं वाटलं नव्हतं.यावर्षीचा कुंभ खास आहे कारण तो महाकुंभ आहे.
144 वर्षांनी येणारा योग....
अमृतमंथनामधून मिळालेला अमृतकलश आकाशमार्गे नेताना त्याचे चार थेंब पृथ्वीवर ज्या ठिकाणी सांडले त्या ठिकाणी म्हणजेच नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि प्रयागराज या चार ठिकाणी साधारण दर 3 वर्षांनी कुंभमेळा भरतो. या चक्रामधून दर 12 वर्षांनी पूर्ण कुंभ प्रयागराज ला साजरा केला जातो आणि असे 12 कुंभ झाले कि दर 144 वर्षांनी ज्या नक्षत्रावर हे अमृताचे थेंब पृथ्वीवर सांडले त्याच नक्षत्रावर प्रयागराज इथं गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या त्रिवेणीसंगमावर महाकुंभ मेळा भरतो.या वर्षीच्या कुंभ चं हेच महत्व आणि आपल्या हयातीत हा योग पाहायला मिळातो आहे याचं लोकांना अप्रूप वाटलं नसतं तरंच नवल. हे तिथी आणि नक्षत्रांचं परफेक्ट गणित ऐकून मला जास्त आश्चर्य वाटलं होतं.
कुंभ ला होणारी गर्दी ही भाबड्या भाविकांची तर आहेच पण त्याचबरोबर महाकुंभ योग आणि कुंभ बद्दल एक कुतूहल असणाऱ्यांची सुद्धा आहे. तिथे येणारे साधू, त्यांचे चमत्कार, त्यांच्या पूजा विधी, अमृत स्नान, त्यांच्या कुंभ मध्ये प्रकट होऊन तिथूनच गायब होण्याच्या कथा अशा अनेक गोष्टी पूर्वी सुद्धा ऐकल्या होत्या. सध्या सोशल मीडिया मुळे कल्पनेत पाहिलेल्या काही गोष्टी प्रत्यक्ष बघता आल्या.कुंभ बद्दल कुतूहल वाढवण्यासाठी सोशल मीडिया हा अतिशय महत्वाचा घटक ठरला.माझ्या 14 वर्षांच्या लेकीला हेच कुतूहल वाटलं आणि तिच्या आग्रहामुळे आम्ही नुकतंच कुंभ ला जाऊन आलो.
साधू आणि त्यांचे आखाडे पाहणे, अनुभवणे हा कुंभ चा एक भाग आहे आणि त्रिवेणी संगम स्नान हा दुसरा.
दोन्ही गोष्टी साध्य करायच्या असतील तर हातात पुरेसा वेळ हवा आणि भरपूर चालायची इच्छा आणि शक्ती हवी.
आमच्या वेळापत्रकाप्रमाणे हातात 1.5 दिवस होता आणि त्यात गंगास्नान आणि जमलं तर एखादा आखाडा बघणं एवढंच डोक्यात होतं.
भरपूर गर्दी असणारी आणि त्याचसोबत अजिबात गर्दी नसणारी अशी दोन्ही प्रकारची रील्स सतत मोबाईल च्या फीड मध्ये येत होती. पण एकदा जायचं ठरवलं आणि बुकिंग केलंय तर आता आपलं आपण जाऊ आणि ठरवू असं म्हणून जायच्या दोन दिवस आधीपासून रील्स बघणं टाळायला सुरु केलं. तेवढीच जरा डोक्याला शांतता 😃
7 फेब्रुवारी सकाळी 7 वाजता मुंबईच्या दिशेने प्रयागराज साठी प्रवास सुरु केला. दुपारी 1:30 वाजता मुंबई प्रयागराज विमान अगदी वेळेत सुटलं...
"Hello ladies and gentleman.. हर हर महादेव.. We are about to land at Prayagraj in 30 minutes. Before landing we are going to witness areal view of Sangam Kshetra for all the devoties of Mahakumbh.Wish you all a very happy and safe stay at Prayagraj. हर हर महादेव"
विमानाच्या कॅप्टनच्या तोंडून हर हर महादेव ऐकताना फार फार भारी वाटलं.हे फार अनपेक्षित आणि सुखद होतं.कुंभ चा फील यायला लागला. खास कुंभ च्या निमित्ताने संगम क्षेत्रावरून विमानाने एक फेरी मारली आणि प्रयागराज चे पहिले दर्शन घडले. संगम क्षेत्राला फेरी मारताना सुद्धा कॅप्टन साहेब sangam to your right window वगैरे डिटेल्स देत होते.
विमानतळावरून शहरात शिरताना दोन्हीकडे सुशोभित केलेले रस्ते, जागोजागी काढलेली भित्तिचित्रे, चौकांमध्ये उभारलेले पुतळे असं दृश्य दिसत होतं. प्रयागराज छानच सजवलं होतं.हॉटेल बुकींग online केले होते. संपूर्ण शहरात हॉटेल्स फुल असल्याने अतिशय बेसिक असं एक त्यातल्या त्यात ठीकठाक वाटणारं आणि कीडगंज बोट क्लब पासून जवळ पडेल असं हॉटेल आम्ही निवडलं होतं.
रूमवर सामान ठेवून थोडं फ्रेश होऊन संध्याकाळी 6 वाजता बाहेर पडलो. सरस्वती घाटावर गंगा आरती बघू असं डोक्यात होतं. e-रिक्षाने घाटाच्या शक्य तितकं जवळ नेऊन सोडलं. शक्य तितकं म्हणतेय कारण संगम क्षेत्र जसजसं जवळ यायला लागलं तशी गर्दी वाढायला लागली आणि मग एका ठिकाणी रस्ता बंद. रिक्षाने उतरून चालत रस्ता शोधात मानकामेश्वर घाट अशी पाटी असलेल्या ठिकाणी पोचलो. तिथून पुढे सरस्वती घाट अजून 3 किलोमीटर तरी जावं लागेल आणि गंगा आरती सुरु असेल कि नाही ते गर्दीवर अवलंबून असतं असं तिथल्या एका ड्युटी वर असलेल्या पोलीस दादांनी सांगितलं. त्यापेक्षा तुम्ही विरुद्ध दिशेने बोट क्लब च्या जवळ काली घाटावर जा. तिथे लेझर शो बघायला मिळेल असं आम्हाला सुचवलं. त्याच्या म्हणण्यानुसार चालायला सुरुवात केली. एव्हाना त्या रस्त्यावर जाम लागला होता.
अजून कोणतीच नदी किंवा पाण्याचा मागमूस दिसेना. अजून किती चालावं लागतंय देव जाणे असं म्हणतोय तोवर समोर अचानक विस्तीर्ण पसरलेलं यमुना नदीचं पात्र आणि त्याच्या जवळचा रोषणाई केलेला नैनी ब्रिज दिसायला लागला.दुसऱ्या बाजूला लांबवर अजून एक पूल दिसायला लागला. गार वारा आणि हे सुखद दृश्य बघून एकदम दिवसभराचा शीण गेला.
थोडं पुढे एक कुलूपबंद रोडसाईड गार्डन होतं. बागेच्या आत थेट नदीपात्राला लागून काही कट्टे दिसत होते. त्यावर लोक पण दिसले. दाराला कुलूप आहे तर हे लोक आत कसे गेले त्याचं लगेच उत्तर मिळालं. रस्त्याच्या साईडला असलेल्या छोट्या कंपाउंड वरून सहज उडी मारून आम्ही पण आत शिरलो.यमुनेचं भव्य शांत पात्र आणि आजूबाजूची रोषणाई बघायला डोळे पुरेनात.इथे अजिबात गर्दी किंवा कोलाहल नव्हता. नदीवरून येणारं गार वारं आणि क्षणोक्षणी रंग बदलणारा नैनी पूल.नदीतून अजूनही विहरणाऱ्या काही बोटी असं सुरेख दृश्य डोळ्यात साठवलं.
तिथून थोडं पुढे जाऊन लगेच काली घाट सापडला. सुंदर बांधीव पायऱ्या आणि त्यावर लेजर शो साठी वाट पाहणारे लोक दिसले. घाटाजवळ अप्रतिम कचोरी, चना जोर भेल, आणि लेमन टी अशी मेजवानीच मिळाली.मस्त जागा पकडून बसलो. बरोबर 7:15 ला शो सुरु झाला. यमुना नदीच्या पात्रात बांधलेली कारंजी वापरून कुंभमेळ्याचा इतिहास, त्यातलं प्रयागराजचं महत्व त्यासोबत काही गाणी असा सुरेख शो होता.समोर पसरलेली भव्य यमुना नदी, दोन्ही बाजूला रोषणाई केलेलं पूल, आणि नदीपात्रात चालू असलेला तो दृकश्राव्य कार्यक्रम अशी सुंदर संध्याकाळ पदरात पडली. सुरुवात तर मस्तच झाली.


तिथून बाहेर पडून थोडं चालत थोडं रिक्षा असं करत एक चांगलं हॉटेल शोधलं. दिवसभर प्रवासात नीट जेवण झालंच नव्हतं. आता शांतपणे जेवण करून परत एकदा चाली चाली करत आणि मिळेल तिथं रिक्षा घेऊन हॉटेल गाठलं. पाठ टेकवतात झोप लागली.उद्या त्रिवेणी संगम
क्रमश:
-©️स्मिता श्रीपाद
10 फेब्रुवारी 2025

दक्षिणवारी - समारोप

 दक्षिणवारी - समारोप



( T20 वर्ल्ड कप मधला भारताचा विजय आणि मग पालखी सोहळा या सगळ्या गडबडीत शेवटचा भाग मागे पडला.त्यामुळे थोडा उशिरा हा शेवटचा भाग टाकते आहे.)
काल कूर्ग मध्ये फिरताना कुशलनगर मधील गोल्डन मॉनेस्ट्री चा विषय निघाला होता. आमच्या रिसॉर्ट वरून कुशलनगर ला जाऊन मग पुढे बेंगलोर ला जायचं म्हणजे जरा वाट वाकडी करून जावं लागणार होतं आणि त्यात बराच वेळ गेला असता असं लक्षात आलं. कूर्ग ते बेंगलोर अंतर आणि बेंगलोर मध्ये पोचलं कि तिथलं दिव्य ट्राफिक पार करून विमानतळावर पोचणे याचा विचार करून मॉनेस्ट्री ला भेट द्यायला परत कधी जाऊ असं ठरलं. नाही म्हटलं तरी जरा वाईट वाटलं कारण इतक्या दूर येऊन जमणार नाही म्हणजे काय ? पण आमची इच्छा शक्ती आणि सध्या एकंदरीतच सर्व विमान कंपन्यांचा चालू असलेला सावळा गोंधळ यामुळे कूर्ग फिरून परत जाताना एक सुवार्ता घेऊन एक मेसेज इनबॉक्स मध्ये येऊन पडला. "विमान नियोजित वेळेच्या 2 तास उशीराने सुटेल" हेच जर इतर वेळी घडलं असतं तर चिडचिड झाली असती पण आता हाच मेसेज भयंकर आनंददायक वाटला. कुशलनगर मॉनेस्ट्री भेट द्यायला मिळणार होती.
सकाळी लवकर उठून यावरून वेळेत बाहेर पडलो. कूर्ग चा असा एका दिवसात निरोप घ्यायचं जीवावर आलं होतं. 3-4 दिवस इथे येऊन निवांत राहायला हवंय खरंतर. हिरवाईतून गाडी पळत होती. साधारण 1-1:30 तासात कुशलनगरला पोचलो. या भागात शिरल्यावर लाल कपड्यातले बौद्ध साधू दिसायला लागले. पार्किंग पाशी उतरलो आणि आजूबाजूला वेगळीच दुकानं, हॉटेल्स दिसायला लागले. कर्नाटकात आहोत कि तिबेट मध्ये कळेना. विंड चाइम्स,रंगीत मण्यांच्या माळा, कपडे, पर्सेस आणि विविध तिबेटियन वस्तूंची दुकानं, मोमो, थुकपा असे पदार्थ विकणारे हॉटेल्स मस्त परिसर होता तो.


कुशलनगरची मॉनेस्ट्री अतिशय सुंदर भव्य अशी आहे. सोनेरी कळस असल्याने गोल्डन मॉनेस्ट्री म्हणत असावेत.मंदिर प्रचंड मोठे आहे. इथे सुमारे 16000 monks राहतात असे कळले. बौद्ध साधुंचे हे प्रशिक्षण केंद्र आहे. लाल कपडे घातलेले, गोरे पण छोटे छोटे monks बघून मजा वाटत होती. स्माइलींग बुद्ध मूर्ती असतात तसे गोड दिसत होते सगळे. आम्ही गेलो त्याच्या आदल्या दिवशी तिथे काही तरी मोठा कार्यक्रम झाला असावा. मोठ्या मोठ्या यज्ञवेदी दिसत होत्या. आत मंदिरात प्रचंड आकाराच्या तीन सोनेरी मूर्ती आहेत. मध्ये बुद्ध आहे पण त्याच्या उजवी डावीकडे कोणाच्या मूर्ती आहेत कळले नाही. त्या मंदिराचं छत प्रचंड उंच होतं. लोकं भरपूर होती आणि त्यांचा प्रचंड कलकलाट चालू होता. खरंतर इथं सायलेन्स झोन केला पाहिजे. शांत बसून मेडिटेशन करायला छान वाटलं असतं. आजूबाजूच्या परिसरात एक फेरफटका मारला, तिथल्याच एका कॅफेमध्ये मस्त कॉफी घेऊन पुढे निघालो.
आता थेट बेंगलोर गाठायचं होतं. चार वाजता बेंगलोर मध्ये शिरलो पण ट्राफिक मधून विमानतळावर पोचायला 7 वाजलेच. बेंगलोर चं नवीन टर्मिनल 2 अप्रतिम सुंदर बनवलेलं आहे. डिजियात्रा ऍप मुळे 15 मिनिटात चेकिन करून नंतर एअरपोर्ट वर टाईमपास केला. विमानाला अजून थोडा उशीर झाला पण त्यांच्यामुळे कुशलनगर पदरात पडलं म्हणून राग राग न करता विमान कंपनीचे आभार मानले 😜. रात्री 1 वाजता सुखरूप घरी पोचलो.
तटी:- या संपूर्ण प्रवासाचं नियोजन म्हणजे हॉटेल बुकिंग, बेंगलोर ते बेंगलोर गाडी बुकिंग दीप्ती गावित यांच्या Always on the Go कंपनी कडून करून घेतलं होतं. सर्व हॉटेल्स
मध्ये व्यवस्था उत्तम होती.त्याबद्दल दीप्ती चे मनापासून आभार. माझ्या सर्व शंकाना तिने शांतपणे उत्तरं दिली, हॉटेल्स ची बुकिंग बदलायला खूप मदत केली.Thank you dear Dipti Gavit . प्रत्येक दिवसाची इटिनेररी मी स्वतः ठरवली होती आणि वेळोवेळी त्यात गरजेनुसार बदल केले.
-©️स्मिता श्रीपाद

दक्षिणवारी - मसाले खरेदी आणि झऱ्याकाठची पिकनिक

 दक्षिणवारी - मसाले खरेदी आणि झऱ्याकाठची पिकनिक



कूर्ग मध्ये असताना सुमारे 65 एकर जागेत असलेल्या कॉफी च्या मळ्यात आमचा मुक्काम होता. काल पोचेपर्यंत अंधार झाला होता त्यामुळे फारसं काही दिसलं नाही.सकाळी लवकर जाग आली आणि रिसॉर्ट च्या सभोवती एक फेरफटका मारला. साधारण 1 एकर मध्ये बांधलेलं रिसॉर्ट आणि बाकी पसरलेली कॉफी इस्टेट. ही कॉफी इस्टेट म्हणजे जंगलाचाच भाग होता. इथे 2 तलाव आणि एक छोटासा झरा आहे. तिथे आपण पॅक फूड घेऊन पिकनिक ला जाऊ शकतो. आजूबाजूला जंगल असल्याने जंगली हत्ती आणि प्राण्यांची भेट कधीही होऊ शकते त्यामुळे कॉफी इस्टेट बघायची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 5 अशी मर्यादित आहे. रिसॉर्ट च्या आजूबाजूला सुंदर फुलझाडं दिसली. इथे आवारात लवंग, मिरी चे वेल, आंबा, अवोकाडो ची झाडं होती. बसायला मस्त व्हरांडे होते, बदकं होती आणि लेकीसाठी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे एक बोका होता. सकाळी उठल्यापासून लेक त्या मांजराच्या मागेच होती.
कूर्ग मध्ये सर्व पर्यटन ठिकाणे एकमेकांपासून बरीच लांब आहेत. आमचे रिसॉर्ट मडिकेरी पासून बऱ्यापैकी लांब असल्याने आणि आज एकच दिवस हातात असल्याने खूप फिरता येणार नव्हते. आवरून नाष्टा करून बाहेर पडलो.
सुमारे तासभर प्रवास करून मडिकेरी ला पोचलो. इथले सुंदर रस्ते आणि दोन्ही बाजूनी भरपूर झाडी, त्यातून डोकावणारे होम स्टे असा सुंदर प्रवास झाला. मडिकेरी मध्ये आधी पोचलो ओंकारेश्वर मंदिरात. दगडी बांधणीचं सुंदर मंदिर आणि समोर तळं असं याचं स्वरूप आहे. तेलाच्या प्रकाशात उजळून निघालेला गाभारा आणि तिथलं प्रसन्न वातावरण खूप आवडलं.मंदिरात स्त्री आणि पुरुष सर्वांसाठीच पोशाखाचे काही नियम आहेत आणि ते काटेकोर पणे पाळले जातात.
आता राजाज सीट नावाच्या एका बागेत गेलो.कूर्ग चे राजे रोज संध्याकाळी जिथून सूर्यास्त बघायचे ती जागा म्हणजे राजाज सीट. इथे अप्रतिम बाग तयार केली आहे. आत शिरताच झिपलाईन दिसली त्यामुळे लेक खुश.इथे अनेक प्रकारची सुंदर फुलझाडं दिसली. समोर दिसणारी हिरवीगार दरी बघत तासभर तिथेच वेळ घालवला.
आता अतिशय महत्वाचं काम म्हणजे शॉपिंग राहिलं होतं.
कूर्ग कॉफी आणि मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. वसंत कुमार आम्हाला एका मसाल्यांच्या दुकानात घेऊन गेले. सहकार तत्वावर चालणाऱ्या या दुकानात चांगला आणि स्वस्त माल मिळेल असं त्याने सांगितलं. आत शिरताच काय घेऊ न काय नको असं झालं. लवंग, वेलदोडे, दालचिनी, मिरी, हिंग, तमालपत्र नाव घेऊ ते खडे मसाले त्यांच्या प्रतवारी नुसार मांडले होते. याशिवाय सांबर मसाला, रसम मसाला, इतर भाज्यांचे मसाले, हळद, लाल तिखट, चटण्या, लोणची असे असंख्य प्रकार होते. हॅन्डमेड चॉकलेट्स, सौंदर्यप्रसाधने होती. सगळ्यात भारी म्हणजे कॉफी सेक्शन आणि कॉफी टेस्टिंग सेशन. छोटा पोर्टेबल फिल्टर वापरून कॉफी कशी बनवायची याचं प्रात्यक्षिक दाखवलं. मस्त तरतरीत वासाची कॉफ़ी मस्तच होती. तो फिल्टर पण फार आवडला त्यामुळे लगेच खरेदी केला. भरपूर खरेदी करून खिसा हलका केला आणि पुढे वळलो साडी च्या दुकानात.
अप्रतिम साऊथ इंडियन सिल्क च्या सुरेख साड्या खरेदी झाली. मैसूर मध्ये साड्या घ्यायला वेळ नव्हता पण इथे सुद्धा सुंदर मैसूर सिल्क मिळाल्या.
आज जेवण्यासाठी खास कुर्गी पद्धतीचे जेवण देणारे हॉटेल शोधलं होतं. रेनट्री नावाचं हे हॉटेल म्हणजे एक छान बंगलाच होता. जुन्या बंगल्याचं रूपांतर हॉटेल मध्ये केलं होतं. छान जागा होती. अप्पम, कुर्गी चिकन करी, घी रोस्ट असं मस्त जेवलो. निघताना कळलं कि फार वर्षांपूर्वी जेव्हा महात्मा गांधी कूर्ग भेटीसाठी आले होते तेव्हा त्यांचा मुक्काम या वास्तू मध्ये होता.
जेवण करून आता परत थेट रिसॉर्ट वर गेलो.थोडा वेळ आराम केला आणि कॉफी इस्टेट मध्ये पिकनिक करायला निघालो. हॉटेल स्टाफ ने एक मस्त पिकनिक बास्केट दिली होती. त्यात चहा, मॅगी, चमचे, कप, नॅपकिन्स असं सगळं होतं. कॉफी ईस्टेट प्रचंड मोठी आहे. जागोजागी साइन बोर्ड्स लावलेले होते. इथे 2 तलाव आणि एक पाण्याचा झरा आहे. तलाव आणि झऱ्याकाठी टेबल्स खुर्च्या वगैरे ठेवल्या आहेत. रमत गमत फोटो काढत झऱ्याजवळ पोचलो. तिथं आमच्या शिवाय कोणीच नव्हतं. पाण्याचा आवाज, पक्षांचा आवाज आणि बाकी जंगलाची शांतता. त्या वातावरणात कडक चहा ... अहाहा...काही वेळ एकमेकांशी काही न बोलता नुसता अनुभव घेतला त्या जागेचा. मेडिटेशन साठी आदर्श जागा असल्याने नवऱ्याने लगेच ध्यान लावलं. अंधाराच्या आत परतायला हवं म्हणून नाईलाजानं परत फिरलो. रिसॉर्ट जवळ पोचतोय तोवर धो धो पाऊस सुरु झाला आणि चिंब भिजलो. सुंदर प्रवासाची सांगता पावसानं झाली होती.
आता उद्या परतीचा प्रवास.
-©️स्मिता श्रीपाद


दक्षिणवारी - कूर्ग आणि हारांगीचे हत्तीदादा

 दक्षिणवारी - कूर्ग आणि हारांगीचे हत्तीदादा



उटी ला निरोप देऊन आज कूर्ग कडे जायचं होतं. तामिळनाडूमधून...कर्नाटकात... पुण्यातून जाताना मी लेकीला एकदम उत्साहात सांगितलं होतं की "आता बघ तुला कन्नड, तामिळ अशा वेगळ्या भाषा ऐकायला मिळतील हं" पण जिथे जाऊ तिथे कानावर मराठीच भाषा ऐकायला येत होती किंवा गुजराथी तरी 😀. दुकानं किंवा हॉटेल मध्ये हिंदी आणि इंग्रजीच जास्त. नाही म्हणायला आमचे ड्रायव्हर दादा अधून मधून फोन वर कन्नड बोलायचे तेवढंच.तर ते असो.
उटी ते कूर्ग परत एकदा बंदीपूर मदुमलाई आणि मैसूर मार्गेच रस्ता होता. परत प्राणी दिसण्याची शक्यता. या रस्त्यावर वाटेत पाईन फॉरेस्ट लागतं तसंच बऱ्याच हिंदी चित्रपटात दिसलेला एक शूटिंग पॉईंट पण लागतो. पण आज पाऊस महाराज सकाळपासूनच पडत होते त्यामुळे या दोन्ही ठिकाणी व्यवस्थित चिखल होता. लांबूनच हे पॉईंट्स बघितले आणि आजचा प्रवास जास्त असल्याने कुठे न रेंगाळता पुढे निघालो.
वाटेत नीलगिरी चं जंगल लागलं. प्रचंड मोठे नीलगिरी वृक्ष दिसायला लागले. पाऊस आणि धुक्यामुळे भर दिवसा इथे अंधारून आलेलं होतं.
'नीलगिरी' नावाची एक गंमत 'एका रानवेड्याची शोधयात्रा' पुस्तकात मी वाचली होती ती सांगते. नीलगिरी पर्वतरांगांना "नीलगिरी" हे नाव का आहे तर तिथे प्रचंड प्रमाणात असलेल्या नीलगिरी च्या झाडांमुळे असं बरेच जणांना वाटत असेल किंवा काही ठिकाणी तसे उल्लेख पण आहेत. पण ते तसं नाही. या नावामागचं कारण वेगळंच आहे. या सगळ्या पर्वतरांगांवर कुरुंजी नावाचं एक झुडूप उगवतं. साधारण गुडघ्या एवढ्या उंचीचं हे झाड. महाराष्ट्रात सुद्धा भीमाशंकर च्या आसपास हे झाड उगवतं. हे झाड रुजल्यापासून बरोब्बर बारा वर्षांनी याला फुलांचा बहर येतो. निळ्या रंगाची ही फुलं अतिशय सुंदर असतात म्हणे. तर या निळ्या फुलांनी आच्छादलेले डोंगर म्हणून या डोंगरांना नीलगिरी असं नाव पडलं म्हणे. नीलगिरी नावानं जे झाड आपण ओळखतो (ज्याच्यापासून तेल मिळतं) त्याचं इंग्रजी नाव Eucalyptus ( यूकेलिप्टस ) हे मूळ झाड ब्रिटिशांनी भारतात आणलं आणि इथल्या उघड्या डोंगरांवर लावलं. या झाडाला मराठी नावच नव्हतं पण नीलगिरी डोंगरांवर उगवलेलं झाड म्हणून त्याचं नाव 'नीलगिरी' असं ठेवलं गेलं. आहे कि नाही गम्मत.
थोडक्यात काय तर झाडामुळे पर्वतरांगांना नीलगिरी असं म्हणत नाहीत तर पर्वतरांगांच्या नावामुळे झाडाला ते नाव आहे.कृष्णमेघ कुंटेंच्या पुस्तकात हे वाचायला मिळालं.
मैसूर मधून उटी ला येताना घाटात 36 हेअरपिन बेन्डस लागले होते पण त्यावेळी ते उत्साहाच्या भरात लवकर संपले. उटीहून परत जाताना वेगळ्याच घाट रस्त्याने आज आम्ही निघालो होतो. उटी ला यायचा आणि जायचा रस्ता वेगळा आहे असं वसंत कुमार म्हणाला. या दुसऱ्या घाटातली वळणं जास्त भयानक होती. खरंतर मला घाटात कधीच विशेष त्रास होत नाही पण आज प्रचंड गरगरायला लागलं.कधी एकदा घाट संपेल असं झालं. घाट उतरून खालच्या एका गावात थोडा ब्रेक घेतला. डोकं शांत केलं आणि पुढे निघालो.
आता परत जंगलाचे रस्ते. आज कोणते प्राणी दिसणार बरं ? आज आधी लागलं मदुमलाई. सकाळची फ्रेश वेळ आणि पाऊसामुळं धुवून निघालेलं ताजं ताजं जंगल. इथे जंगल सफारी करायची अशी लेकीची फार इच्छा होती पण प्लॅन बनवताना जिप्सी चे बुकिंग मिळाले नव्हते आणि मिळाले असते तरी पावसामुळे कितपत जमलं असतं देव जाणे.
आज सगळ्यात आधी दर्शन दिलं मोराने. सकाळच्या कोवळ्या उन्हात एका तुटलेल्या झाडावर मस्त ऐटदार पणे बसला होता. गर्द निळी मान डौलदार पणे हलवत इकडे तिकडे बघत होता. तिथून पुढे आलो तर मसिनागुडी, थेप्पाकडू, सिल्वन लॉज अशी नाव असलेले बोर्ड दिसायला लागले. हे सगळं मी "एका रानवेड्याची शोधयात्रा" पुस्तकात वाचलेले शब्द होते. एकदम ओळखीचं काहीतरी भेटल्यासारखं वाटलं. इथे जंगलात एक रात्र राहायचा प्लॅन करायलाच हवा होता असं राहून राहून वाटलं. ( इथे परत येण्यासाठी कारण हवंच कि ) थोडं पुढे गेलो तर परत हरणांचे कळप, माकडं हे नेहेमीचे यशस्वी कलाकार दिसलेच. माझी नजर हत्तींना शोधात होती पण ते काही दिसेनात. परत एकदा अजून 1-2 मोर दिसले. आता बंदीपूर ची पण हद्द संपत आली. जंगलाचा रस्ता संपणार म्हणून मला वाईट वाटायला लागलं.शेवटच्या टप्प्यात काही दिसतंय का म्हणून सगळा जीव डोळ्यात आणून मी पाहत होते आणि इतक्यात...
डावीकडच्या झुडपात ...चक्क अस्वल...
अस्वल जंगलात दिसणं अगदी वाघाइतकंच दुर्मिळ असतं कारण अस्वल हा खूप लाजाळू प्राणी आहे असं म्हणतात. जंगल सफारी मध्ये पण सहज दिसत नाही.पण आमची इच्छाशक्ती आणि नशीब जोरावर होतं. गाडी स्लो करून आम्ही अस्वल बघायला लागलो. रस्त्याच्या अगदी कडेलाच आलं होतं. बहुतेक त्याला रस्ता क्रॉस करायचा असावा. तेवढ्यात पुढच्या कार वाल्याने मूर्खासारखा हॉर्न वाजवला आणि त्याक्षणी उलटं वळून दाट जंगलात ते पळून गेलं. माणसं शहाण्यासारखी का वागत नाहीत ? असो.
जंगल रस्त्याची सांगता मस्त झाली होती. सफारी बुकिंग न करता येता जाताना भरपूर प्राणी बघायला मिळाले होते. आता जंगल संपलं आणि मी जे डोळे मिटले ते थेट जेवायला हॉटेल आल्यावरच उठले. मस्त झोप झाली होती.
छानपैकी साऊथ इंडियन थाळीवर ताव मारला आणि कूर्ग च्या रस्त्याला लागलो.
आपल्याकडे अजून वेळ आहे तर आज तुम्हाला हत्तींच्या कॅम्प वर घेऊन जातो असं वसंत कुमार जेवण झाल्यावर म्हणाला. त्यानुसार कूर्ग मधल्या प्रसिद्ध दुबारे कॅम्प ला जायचं असं आम्हाला वाटलं. पण साधारण दीड-दोन तासांनी त्याने आम्हाला एका वेगळ्याच कॅम्प वर नेलं. दुबारे कॅम्प खूप गर्दीचा आहे. मी तुम्हाला दुसऱ्या छान जागी घेऊन जातो असं म्हणून तो आम्हाला घेऊन पोचला "हारांगी एलिफन्ट कॅम्प" ला. पार्किंग पासून साधारण 500-800 मीटर चालत जायला लागणार होतं. पण आत जायचा रस्ता मस्त गर्द झाडातून होता. वाटेत एक छोटं तळं लागलं आणि एक ट्री हाऊस सुद्धा. चालत चालत 10-15 मिनिटात कॅम्प वर पोचलो आणि तिथला नजारा बघून आहाहा असं झालं. समोर विस्तीर्ण पसरलेला जलाशय होता आणि त्याच्या काठावर डावीकडे 7-8 हत्ती मस्त डुलत होते. हारांगी धरणाचं हे बॅकवॉटर होतं असं नंतर कळलं. पाण्यात बोटिंगची सोय होती त्यामुळे कन्या डबल खुश झाली. आधी हत्तीदादांकडे मोर्चा वळवला. संध्याकाळी 5 ते 6 ही हत्तीची खाण्याची वेळ होती म्हणे. तिथे मिळणार चारा घेऊन आपण हत्तींना खायला घालू शकतो. तो चारा विकत घेऊन आम्ही पण हत्तींना खाऊ घातला. हत्ती बघायला मला फार आवडतं. खूप उन्हाळे, पावसाळे बघून आयुष्याचा अनुभव घेतलेल्या, सगळे दात पडल्यामुळे तोंडचं बोळकं झालेल्या घरातल्या जेष्ठ आजोबांसारखे दिसतात काही हत्ती. आणि जे लहान पिल्लू हत्ती असतात ते अजून दात न आलेल्या छोट्या बाळांसारखे दिसतात. त्यांच्या सोंडेला किंवा पाठीला स्पर्श केल्यावर एक खरबरीतपणा किंवा सुरकुत्या जाणवतात. अशावेळी हत्ती अजूनच मायाळू वाटतात.मला हि जागा फार फार आवडली. हिरवंगार पठार, आजूबाजूला भरपूर झाडी, शेजारीच विस्तीर्ण जलाशय आणि वरती निळंभोर आकाश. या सगळया चित्रात करड्या काळ्या रंगांचे हत्ती अगदी शोभून दिसत होते.भरभराटीचे प्रतीक असलेले हे गजांतलक्ष्मी आणि आजूबाजूला पसरलेला निसर्गाचा खजिना. खूप वेळ तिकडे रेंगाळून मग बोटिंग करायला गेलो.


"टोवेबल बोट" अशी कोणतीशी राईड लेकीनं आणि नवऱ्यानं सिलेक्ट केली. ती बोट नक्की सेफ आहे ना असं मी तिथल्या बाईला किमान 10 वेळा तरी विचारलं. तिनं काही काळजी न करण्याचं आश्वासन दिल्यावर आम्ही पैसे भरले. मग एका कसल्यातरी कन्सेंट फॉर्मवर आमच्या सह्या घेतल्या. मग परत अजून एकदा सेफ्टी बद्दल तिचं डोकं खाल्लं तेव्हा ती म्हणाली, " गेल्या 2 वर्षात काही प्राब्लेम आलेला नाही पण फॉर्मॅलिटी म्हणून सह्या घेतोय" आता काय बोलणार.देवाचं नाव घेऊन लाईफ जॅकेट चढवले आणि बोटीत बसलो. सोफ्याच्या आकाराची बोट आणि त्यात धरायला हॅन्डल. बाकी सगळीकडून उघडीच. हात घट्ट धरून ठेवायचे. धाडस करून आत बसले. नवरा आणि लेक निवांत. हि बोट दुसऱ्या एका मोटारबोटला जोडून आम्ही निघालो. एकदा पाण्यात शिरल्यावर भीती कमी झाली कारण आजूबाजूचा नजारा अप्रतिम होता. पाण्याचे तुषार अंगावर उडत होते. पाण्यातून हारांगी धरणाची भिंत पण दिसली. फक्त हे सगळं कॅमेरा मध्ये साठवण्यासाठी जवळ मोबाईल घेता आला नव्हता. शेवटी परत आणताना बोट वाल्या दादांनी करामती सुरु केल्या आणि बोट हलायला डुलायला लागली. नवरा आणि लेक मजा करत होते पण माझा ओरडून किंचाळून घसा दुखायला लागला. शेवटी आलो बाबा किनाऱ्यावर. बोट वाल्या दादांना त्यांच्या मोबाईल मध्ये आमचा एक फोटो काढायची विनंती केली आणि त्यांनी खरंच फोटो काढून दोन दिवसांनी पाठवला.
एव्हाना सूर्यास्त व्हायला लागला होता. त्या जागेतून हलूच नये असं वाटत होतं पण अजून कूर्ग च्या हॉटेल वर जायला एक तासाचा रास्ता होता. अजून थोडं रेंगाळून हत्तींना टाटा करून परत फिरलो. येताना जोरदार पावसानं झोडपलं पण आमच्या कडच्या छत्री मुळे न भिजता पार्किंग ला पोचलो.
कूर्ग चे सुंदर रस्ते सुरु झाले. एक - दीड तासाचा प्रवास करून कॉफी मळ्यातल्या आमच्या हॉटेल वर पोचलो.
आज भरपुर दमलो होतो. हॉटेल वर पोचून फ्रेश होऊन जेवण केलं आणि गुडूप झालो.
-©️स्मिता श्रीपाद

दक्षिणवारी - टॉय ट्रेन आणि धुक्यात बुडालेलं कुन्नूर

 दक्षिणवारी - टॉय ट्रेन आणि धुक्यात बुडालेलं कुन्नूर



युनेस्को वर्ल्ड हेरिटेज म्हणून मान्यता मिळालेली उटीची टॉय ट्रेन ची सफर हे आजचं मुख्य आकर्षण होतं. या ट्रेन च आरक्षण सुमारे दोन महिने आधीपासूनच मी करून ठेवलं होतं. IRCTC च्या वेबसाईट वरून बुकिंग करता येतं.लवकर बुकिंग केलं तरच सीटस मिळतात.
उटी ते कुन्नूर असं आज आम्ही टॉय ट्रेन ने प्रवास करणार होतो. झटपट नाष्टा करून ट्रेन स्टेशन गाठलं. छोटंसं चिमुकलं स्टेशन आणि समोर उभी असलेली वाफेच्या इंजिनाची गाडी दिसली. पुलं देशपांडेंनी वर्णन केलेलं छोट्या गावातलं चिमुकलं रेल्वे स्टेशन आठवलं.आमची ट्रेन अजून यायची होती. मेट्टूपलायम स्टेशन वरून आलेली दुसरी टॉय ट्रेन समोर उभी होती आणि तिथे लोकांचं जोरदार फोटोसेशन चालू होतं. 10 मिनिटात अगदी वेळेवर आमची ट्रेन आली. उटी ते कुन्नूर आणि परत उटी अशा दिवसभरात चार ट्रेन्स धावतात. कोईम्बतूर जवळचं मेटुपलायम स्टेशन ते उटी अशी सुद्धा हि ट्रेन धावते. तो प्रवास साधारण 3.5 तासांचा आहे. आणि उटी कुन्नूर जेमतेम 1 तासाचा प्रवास. आमच्या आरक्षित जागांवर बसलो आणि प्रवास सुरु झाला. उटी आणि कुन्नूर ची हिरवाई, वाटेत लागणारे चहाचे मळे, निलगिरीची उंचच उंच झाडं असा सुंदर नजारा दाखवत ही ट्रेन जाते. वाटेत बरीच लहान लहान गावं लागतात. बोगदे लागतात. उटी ते कुन्नूर असा एक तासाचा प्रवास संपला आणि आम्ही कुन्नूर ला पोचलो.वसंत कुमार आधीच इथे येऊन आमची वाट बघत बसला होता.
कुन्नूर उटीपेक्षा एकदम छोटंसं आणि कमी गर्दीचं ठिकाण वाटलं. डॉल्फिन्स नोज नावाच्या पॉईंट कडे जायला निघालो आणि कुन्नूर ची जादू दिसायला लागली. तिथे जाणारा रस्ता संपूर्ण जंगलातून आणि चहाच्या मळ्यांमधून जातो. डोंगर उतारावर पसरलेले हिरवेगार चहाचे मळे आणि त्यातून जाणारा वळणावळणाचा रस्ता. पावसाचे ढग डोंगरावर उतरले होते. पाऊस नव्हता पण त्या ढगातला ओलावा अगदी जाणवत होता.बंदीपूर च्या जंगलापासूनच आम्ही गाडीच्या AC ला आराम दिला होता कारण एकूणच इथली हवा इतकी रिफ्रेशिंग होती कि गाडीच्या काचा बंद ठेवूच शकत नाही. अगदी 'मंजीलसे बेहेतर रास्ते' वाटावेत इतका सुंदर रस्ता. पॉईंटच्या थोडं अलिकडे गाडी थांबवावी लागली आणि चहाच्या मळ्यांमधून चालत चालत आम्ही पॉईंट पाशी पोचलो. प्रचंड धुकं असल्यामुळं खरंतर काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे डॉल्फिन चं नाक वगैरे काही दिसलं नाही. पण तिथे रेंगाळायला खूप मस्त वाटलं.


तिथे लहान लहान टपऱ्या होत्या बऱ्याच. खाण्याच्या वस्तू, फ्रिज मॅग्नेटस, खेळणी, सोवेनिअर्स, चहा, कॉफी, मसाले ई विकणारे लोक होते. थोडीफार खरेदी केली. रस्त्यात चहाच्या मळ्यात फोटो काढून देणारे लोक दिसले. लगेच हातोहात फोटो पण काढून घेतले.आणि परत फिरलो.
हे सगळं होईतो जेवायची वेळ झाली. परत जाताना वाटेत खूप जास्त ट्राफिक लागलं. पॉईंट कडे जाणारे लोक आता कधी पोचणार आणि कधी परत फिरणार अशी चिंता वाटायला लागली. जेवायला क्वालिटी नावाच्या हॉटेल मध्ये गेलो. फार वर्षांपूर्वी मिसळपाव.कॉम वर एका फेसबुक मैत्रिणीने लिहिलेलं कुन्नूर चं प्रवासवर्णन वाचलं होतं. त्यात या हॉटेल चा उल्लेख केलेला लक्षात होतं.मस्त साऊथ इंडियन बुफे होता. रस्सम, सांबर, 2 भाज्या, पेपर मुशरूमस, बिर्याणी, भात, गुलाबजाम पायसम आणि अजून बरंच काही. त्या थंड हवेत तो बुफे फारच आवडला. जेवण झाल्यावर एकदम गुंगायला झालं.
आता टी फॅक्टरी मध्ये जायचा प्लॅन होता पण लेकीला त्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. उटी मध्ये आमच्या हॉटेल च्या रस्त्यावर एक ऍडव्हेंचर पार्क होतं. तिथं जाऊ म्हणून पहिल्या दिवसापासून ती मागे लागली होती. पाऊसही सुरु झाला त्यामुळे इकडे तिकडे फिरण्यापेक्षा परत उटी मध्ये जाऊन 'थंडर वर्ल्ड' नावाच्या थीम पार्क मध्ये गेलो. तिथे हॉंटेड हाऊस, illumination room, 3D paintings, 5D थिएटर, डायनोसॉर पार्क आणि चक्क स्नो वर्ल्ड पण होतं. उटीत जाऊन बर्फ पण पाहिला 😀. 3D paintings मस्त होते. हॉंटेड हाऊस मी बाहेरूनच पाहिलं 😜. दोन तास लेकीनं तिथं खूप मज्जा केली. इथेच शेजारी एक वॅक्स म्युझियम पण होतं. तिथे लेकीच्या बाबांनी खूप मज्जा केली 😎. समोरच एक चॉकलेट फॅक्टरी आउटलेट होतं तिथं भरपूर शॉपिंग केली.
हॉटेल वर येऊन बॅग्स पॅक केल्या. उटीचा मुक्काम संपला होता. उद्या जाताना परत एकदा बंदीपूर आणि मदुमलाई भेट होतीच आणि कूर्ग आमची वाट बघत होतं.
-©️स्मिता श्रीपाद

दक्षिणवारी - उटीमधली भटकंती आणि EARL'S Secret

 दक्षिणवारी - उटीमधली भटकंती आणि EARL'S Secret



उटीमधली सकाळ उजाडली तेव्हा बाहेर पाउस थांबला होता. थोडंसं उन्ह होतं पण तरी आकाशात पावसाचे ढग अजुनही होतेच. आवरुन नाश्ता करायला गेलो तेव्हा इथला मॅनेजर म्हणाला की गेले काही दिवस रोज दुपारनंतर पाउस पडतो आहे.त्यामुळे तोवर शक्य तेवढं फिरुन या. या दर्शन हॉटेल मधे अप्रतिम असा साउथ इंडियन नाष्टा मिळाला. लुसलुशीत इडल्या, रोज दोन प्रकारच्या चटण्या, लाईव्ह डोसा काउंटर, मेदु वडे असा सुरेख नाष्टा इथे मिळायचा. त्यामुळे माझी फारच चंगळ होती. खाणं पिणं झाल्यावर उटी लेक गाठलं.
आमच्या हॉटेलच्या समोरच हा विस्तीर्ण तलाव होता. ठीक ९ वाजता गेट्स ओपन झाले आणि तिकिट काढुन आम्ही आत शिरलो. आत मधे पेडल बोट, मोटर बोट अशा बोटींच्या तिकिटांसाठी वेगळ्या रांगा होत्या आणि तिथलं तिकिट वितरण ९:४५ सुरु होतं म्हणे. हे वेळेचं गणित काही कळलंच नाही. मग ९ पासुन आत कशाला सोडलं कोण जाणे. असो.वेळेचं बंधन असल्याने मोटर बोट चं तिकिट काढलं आणि उटी तलावाला एक मस्त फेरफटका मारला. चहुबाजुनी हिरवाई आणि मधे तलाव. हा तलाव मानवनिर्मित आहे असं कळलं. तलावाचा विस्तार बघता तो नक्की कसा तयार केला असेल कोण जाणे.
बोटिंग आटोपुन निघालो रोझ गार्डन पहायला. उटी मधे आम्ही असताना नेमका त्यांचा वार्षिक फ्लॉवर शो चालु होता. रोझ गार्डन आणि बोटॅनिकल गार्डन मधे फुलांच्या सुंदर रचना बघायला मिळतील असं कळलं. रोझ गार्डन मधे पोचलो आणि गुलाबांपासुन बनवलेले हत्ती, फुलपाखरं असे विविध प्राणी आणि बाकी रचना दिसायला लागल्या पण पावसामुळे गुलाब खराब झालेले. दुरुन बघताना सुंदर दिसत होते पण जवळ गेलं की अतिपाण्यामुळे कुजलेले असे गुलाब होते. हलका पाऊस पण सुरु झाला त्यामुळे तिथे जास्त वेळ थांबलो नाही.
तिथुन बोटॅनिकल गार्डन ला पोचलो आणि समोरच फुलांच्या सुंदर कमानीने स्वागत केले. इथे सुद्धा फुलांच्या सुंदर रचना होत्या पण रोझ गार्डन इतक्या खराब झाल्या नव्हत्या. फुलांपासुन आख्खं डिस्ने चा कॅसल बनवला होता. हे बनवण्यासाठी किती मेहेनत घेतली असेल हे जाणवत होतं. विविधरंगी शोभेच्या फुलांचं सुंदर प्रदर्शन तिथे मांडलेलं होतं.शेकडो प्रकारची विविधरंगी फुलं तिथं पसरली होती. ती सगळी फुलं बघुन आईची खुप आठवणं आली. हे बघुन ती वेडीच झाली असती. बोटॅनिकल गार्डन चा पसारा प्रचंड आहे. तिथे बरेच ग्रीन हाउसेस पण दिसत होते पण पर्यटकांसाठी बंद होते. जमेल तितकं फिरलो. तिथला एक प्रचंड वृक्ष मला फार फार आवडला. किमान पाच-दहा लोकांनी एकमेकांचे हात धरुन गोल केला तरच त्या झाडाचं खोड कवेत घेता येईल इतकं प्रचंड खोड होतं ते. हा वृक्ष कितीशे वर्ष जुना असेल कोण जाणे. इथे सुद्धा फुलांपासुन बनवलेले सुंदर प्राणी आणि वस्तु होत्या.हे संपुर्ण गार्डन बघणं तर शक्यच नव्हतं आणि आता भुक सुद्धा प्रचंड लागली होती त्यामुळे तिथुन बाहेर पडलो.


आज जेवणासाठी एक खास जागा शोधुन काढली होती. उटी मधे बरेच ब्रिटीशकालीन बंगले आहेत. अशाच एका सुमारे १०० पेक्षा जास्त वर्ष जुन्या बंगल्याचं "किंग्स क्लिफ" नावाचं हॉटेल आहे आणि त्यांचं "EARL'S Secret" नावाचं रेस्टॉरंट खुप छान आहे असं कळलं होतं. तिकडे पोचलो.
आतमधे प्रवेश केला आणि एका वेगळ्याच कालखंडात शिरल्यासारखं वाटलं. समोर सुरेख कलोनियल स्टाईल बंगला ज्याचं आता हॉटेल केलेलं आहे, त्याच्या आजुबाजुला सुरेख राखलेली बाग आणि मागे हिरवेगार डोंगर, त्यावर उतरलेले ढग आणि पावसाची भुरभुर. बघताक्षणी या जागेच्या मी प्रेमात पडले. बंगल्याच्या बाजुलाच EARL'S Secret चा भाग असलेलं एक ओपन कॅफे आणि त्याच्या मागे एक मस्त ग्रीन हाउस होतं. या ग्रीन हाउस मधे आणि आत बंगल्यात दोन्हीकडं बसुन जेवायची व्यवस्था होती पण अर्थातच आम्ही ग्रीन हाउस ला पसंती दिली.मेनुकार्ड वर या हॉटेल चा सगळा इतिहास लिहिला होता. जेवणाची ऑर्डर देउन बंगल्यात एक फेरफटका मारला.
या आधी कधीही न बघितलेली सुंदर झाडं आणि त्याची वेगवेगळ्या आकाराची फुलं तिथं बघायला मिळाली.आत बंगल्यामधला हॉल आता रीसेप्शन लॉबी किंवा कॉमन सिटआउट साठी वापरलेला आहे. तिथे सुंदर जुन्या पद्धतीचे सोफे, झुंबरं, आरसे, घड्याळं, एक फायरप्लेस, त्याच्यावर जुन्या फोटो फ्रेम्स, फुलदाण्या, लाकडी जमीन, लाकडाचे भव्य दरवाजे आणि खिडक्या असं सगळं होतं. केवळ इंग्रजी चित्रपटात बघितलेलं किंवा पुस्तकांत वाचलेलं ब्रिटिश पद्धतीच्या घराचं वर्णन तिथे अगदी तंतोतंत जुळत होतं.( नाहितर आम्ही कशाला जातोय ईंग्रजांची घरं बघायला ) पण एकंदरीतच आजकालच्या भाषेत एकदम कोझी वाईब्स होत्या तिथे. जेवण सुद्धा अप्रतिम पण बुक्का महाग होतं 😝पण या वातावरणात आणि त्या जागेत चालतंय 😎अशा बंगल्यामद्धे काहीही काम न करता दोन दिवस निवांत रहायला काय मजा येईल. कधी उटीला जाणार असलात तर नक्की भेट देण्यासारखं ठिकाण.तिथे जेवण झाल्यावर सुद्धा आम्ही खुप वेळ रेंगाळलो.भरपुर फोटो काढले. आता पाऊस परत सुरु झाला. अजून कुठे फिरत येईल अशी शक्यता वाटेना.


ही सगळी ट्रीप ठरवताना मी खुप अभ्यास करुन रोजची आयटेनेररी ठरवली होती पण या पावसामुळे त्यातले काही बेत घडले, काही नाही. खरंतर आपण ठरवतो ते सगळच होत नसतं, जे आहे ते एंजॉय करायचं ही थीअरी मला माहिती आहे पण का कोण जाणे, माझी त्या दिवशी उगीचच अधुनमधुन चिडचिड होत होती आणि त्या पावसाचा राग नवर्यावर आणि लेकीवर निघत होता. आता लिहिताना त्या दिवसासाठी मनापासुन वाईट वाटतंय त्यामुळे नवऱ्याची आणि लेकीची जाहीर माफी मागण्यात येत आहे याठिकाणी 🤗 पाऊस, गर्दी हे सगळं जरी असलं तरी एकंदरीत आम्ही भरपुर मजा केलीच की. उन्हाळी आणि पावसाळी सहल एकत्र झाली म्हणायची. हाय काय न नाय काय.
एव्हाना ४ वाजत आले होते. त्यामुळे हॉटेल वर परत फिरलो. आणि पाउस परत दणादणा पडायला लागला. आणि मग उरलेली संध्याकाळ पांघरुणात बसुन हॉटेल मधेच घालवली. उद्यासाठी कुन्नुर आणि टॉय ट्रेन खुणावत होतं.
-©️स्मिता श्रीपाद