Tuesday, July 22, 2025

माझ्या "चाफ्याच्या झाडा"

 24 जुलै 2020 ला आईचा पहिला स्मृतीदिन होता. तिच्यासाठी ही शब्दरूपी आदरांजली

🙏
-----------------------------------------
माझ्या "चाफ्याच्या झाडा"
चाफा या फुलाचं आणि माझं लहानपणापासुन काय नातं होतं कोण जाणे पण बाकी सगळ्या फुलात तो सोनचाफा एकदम राजस फुल वाटायचं.मी लहान असताना आमच्या एका नातेवाईकांकडे कसल्यातरी द्रवपदार्थात काचेच्या बाटलीत ठेवलेली चाफ्याची फुलं होती. ती बारा महिते तशीच ताजी टवतवीत दिसायची. मी जेव्हा जेव्हा आईसोबत त्यांच्याकडे जायचे तेव्हा तेव्हा पुर्ण वेळ ती फुलच बघत बसायचे. आई च्या गप्पा संपेपर्यंत हा कार्यक्रम चालु असायचा. थोडं मोठं झाल्यावर असं लक्षात आलं की त्या बाटलीत चाफ्याची नुसती सुंदर फुलच जपुन ठेवता येतात पण बाहेरुन बघणार्याला त्याचा वास येत नाही.
मग काय फायदा ना..?
उलट सुकलेलं आणि पुस्तकात जपुन ठेवलेलं चाफ्याचं फुल सुद्धा , पुस्तकाचं ते पान उघडलं की सुंदर दरवळ आजुबाजुला पसरवत असतं. मग त्या बाटलीतल्या फुलाचं कौतुक तिथेच संपुन गेलं.
आई नेहेमी सांगायची की चाफ्याचं एक फुल देवाला वाहिलं की सोन्याचं फुल वाहिल्यासारखं असतं म्हणे.मग कधी कोणाकडे श्रावणात सत्यनारायणाला बोलवलं की देवाला नमस्कार करताना फुलाच्या परडीत तुळस, झेंडु,तगर ईत्यादी सोबत चाफा दिसला तर मी आवर्जुन तेच उचलुन देवावर वाहायचे. माझ्या परीने देवाला एक सोन्याचं फुल 🙂
मोगरा,सायली,जुई,सोनचाफा या सगळ्या फुलांचं माझ्या आईला अतोनात वेड. तिच्या फुलाच्या वेडाचे किस्से अगदी लहानपणापासुन आम्ही ऐकत आलो आहोत. आईच्या सगळ्या मावशा, मामा , भाउ, बहिणी कुठल्याही निमित्ताने एकत्र जमले की एकदातरी हा विषय निघायचाच आणि आम्ही सगळे जण हे किस्से ऐकुन पोट धरुन हसायचो.
गेल्या वर्षी चाफ्याची फुलं तोडायचं निमित्त झालं आणि एका क्षणात आई अचानक आम्हाला सोडुन निघुनच गेली....कायमची....
इतके वर्ष ज्या वेडाची हसुन हसुन चर्चा केली ते वेड असं रुप घेउन समोर येइल असा कधी विचारच केला नव्हता.
त्या दिवसापासुन ,त्या क्षणापासुन चाफ्याचा एकदम रागच यायला लागला.आई गेली तेव्हा तिने आदल्या दिवशीच तोडलेली डबाभर चाफ्याची फुलं फ्रीज मधे पडुन होती.तरीपण तिला अजुन नवीन ताज्या फुलांनी खुणावलं म्हणजे ही चाफ्याची फुलं किती कपटी,मायावी असतील असा मी माझ्यापुरता समज करुन घेतला.
त्या दिवसापासुन चाफा काही कारणाने समोर आला तरी मनात राग आणि डोळ्यात झरकन पाणी उभं रहायचं ते अगदी आता आता पर्यंत...
मग मी ठरवुन चाफ्याकडे बघणच टाळायचे. फुलवाल्याकडे फुलं घेताना, सिग्नल वर चाफ्याच्या माळा विकणारी मुलं दिसली तरी मान दुसरीकडेच वळवायची...मुद्दाम..ठरवुन...
माझ्यासाठी चाफा नावचं फुलं या पृथ्वीवर अस्तित्वातच नव्हतं.
लॉकडाउन च्या काळात आमच्या कराड च्या घरात दोन महिने रहायला होतो आम्ही. रोज संध्याकाळ झाली की गच्चीवर चक्कर मारायला जायचे.असेच एकदा गच्चीवर चक्कर मारताना गच्चीच्या दुसर्या टोकाकडे गेले तेव्हा गेली अनेक महिने न घेतलेला पण तरीही खुप परिचित असा सुवास आलाच...
शेजारचं चाफ्याचं झाड आमच्या गच्चीपर्यंत पोचलं होतं आणि भरभरुन फुललं होतं.तडक तिकडे पाठ फिरवुन मी घरी निघुन आले.दुसर्या दिवशी उठले तर देवासमोर ताटभरुन फुलं दिसली. आमच्या अंगणातली जास्वंदी, शेजारच्या काकुंकडचा मोगरा आणि त्याच्या मध्यभागी चाफा. माझ्या सासुबाईंनी एकदम सुरेख रचुन ठेवली होती ती फुलं.चाफा बघुन परत एकदा जखमेची खपली निघाली. ज्या गोष्टीपासुन पळायचा प्रयत्न करतेय तीच का सारखी पुढे येते आहे कळेना.ते दोन-तीन दिवस एकदम अस्वस्थ होते मी.
आणि मग एक दिवस सोशल साईट्स बघताना अचानक
सुनीताबाई देशपांडे नी वाचलेली कवयित्री पद्मा गोळे यांची कविता सापडली
"चाफ्याच्या झाडा".
आधी तर धो धो रडले. यावेळी खपली पडुन जखम भळाभळा वाहायला लागली होती.गेल्या दोन तीन दिवसांची अस्वस्थता सगळी वाहुन गेली डोळ्यावाटे. आणि मग एकदा, दोनदा, दहादा...अक्षरश: शंभरदा ऐकली ती कविता मी...प्रत्येक वेळी नवा अर्थ लागत गेला....
इतके दिवस मनात जो राग होता तो फक्त चाफ्यासाठी नव्हता, त्यातला थोडा आईसाठी पण होता हे त्या दिवशी नव्याने कळलं मला.काय नडलं होतं तिला, हे असं वेडं धाडस करायचं असं हज्जारदा म्हणालो होतो...मी आणि श्वेतु ...
त्या दिवशी ती कविता ऐकताना तो सगळा राग वाहुन गेला.मन एकदम स्वच्छ झालं. आई गेली त्या दिवशी तिला शेवटचा निरोप देताना माझ्या मनात पराकोटीचं दु:ख आणि राग पण होता.पण ही कविता ऐकली आणि मी एकदम शांत होउन गेले आत कुठेतरी. आता शांत मनाने सगळ्या घटनांचा तटस्थपणे विचार करता येतोय.
आई गेली तेव्हा मला भेटायला माझ्या मैत्रिणी येत होत्या. त्यातलीच एक सायली, माझी मैत्रिण, मला म्हणाली होती,
"स्मिता तुझी आई तिचं सगळ्यात आवडतं काम करताना गेली.सगळ्यांच्या नशिबी हे सुख येत नाही......"
खरच असेल का हे ? जे घडलं ते आता घडुन गेलं. त्यात उगीचअडकुन पडण्यापेक्षा पुढे जाण्यासाठी असा काहीतरी दिलासा मनाला देणं आवश्यक असत बहुतेक.
ही कविता सादर करताना सुनीताबाई म्हणतात की ही कविता पद्माबाईं गोळे नी लिहिली आहे..पण तरी ती माझी कविता आहे
ज्या दिवशी ही कविता ऐकली त्या दिवशी मला पण हेच वाटलं सेम...की ही माझी कविता आहे...माझी आणि श्वेतु ची.....
चाफ्याच्या झाडा ….चाफ्याच्या झाडा,
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु: ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….चाफ्याच्या झाडा
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर तुझ्याच
फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय …. कळतंय ना ….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना
आई आमची ओंजळ किती काठोकाठ भरुन गेली आहे ते ती गेल्यावर कळलं.तिच्या कृतीतुन तिनं कितीतरी गोष्टी आम्हाला शिकवल्या ते आत्ता जाणवतय.
वाचनाची आवड आणि सवय तिच्यामुळे आम्हाला लागली. ती स्वतः प्रचंड वाचन करायची तिचं बघुन बघुनच आम्ही वाचायला शिकलो. टाउन हॉल ला वेळोवेळी लगणार्या पुस्तक प्रदर्शनात ती आवर्जुन आम्हाला घेउन जायची आणि हवं ते पुस्तक घेउन द्यायची.पेपर मद्धे येणारे सुंदर लेख आवर्जुन वाचायला सांगायची ती.
तिनं आम्हाला छान नीटनेटकं रहायला शिकवलं.मला अजुनही आठवतय ती जेव्हा ऑफिस साठी साडी नेसत असायची तेव्हा मी रोज तिचं निरीक्षण करत असायचे.सुरेख नीट्नेटक्या निर्या आणि पिनअप करुन छान तयार व्हायची ती. केसात एखादं फुल किंवा गजरा ठरलेला. ते रोजचं साडी नेसण बघुन मग मी आणि श्वेतु "घरघर" खेळताना साड्या नेसायचा प्रयत्न करायचो. आम्हा दोघीनाही शाळेत असतानाच खुप लवकर साडी नेसता यायला लागली होती.
कराड सोडुन इथे पुण्यात आल्यावर सुद्धा साडी शिवाय सलवार कुर्ता, लेग इनटॉप आणि मग जीन्स असे बदल सुद्धा सहज आत्मसात केले तिने. देश तसा वेश.
अजुन एक हाताला धरुन न शिकवता पण तिनं कृतीतुन शिकवलेली गोष्ट म्हणजे स्वयंपाक. चांगलं चुंगलं करणं आणि खाणं हे दोन्ही तिला आवडायचं.अनेक नवे नवे पदार्थ आम्ही घरी करायचो.पुढे मी स्वयंपाकात पडल्यावर दहावी आणि बारावी च्या सुट्टी मधे मी रोज संध्याकाळी एक मस्त पदार्थ आई ऑफिस मधुन यायच्या वेळी करायचे. १०० पाककृती असं काहीतरी एक पुस्तक आम्ही आणलं होतं त्यात बघुन मी रोज काहीबाही करायचे आणि आई ऑफिसमधुन घरी आली की तिला तो पदार्थ खाउ घालायचा असा नियमच ठरुन गेला होता.
आई बाबांनी आम्हाला खुप फिरवलं. आमच्या सगळ्या सुट्ट्यांमधे ट्रीप ठरलेलीच असायची.त्या ट्रीपची आखणी आई स्वतः करायची. अगदी नकाशा समोर मांडुन, अंतरं पाहुन त्याची आताच्या भाषेत आयटेनेरेरी प्लॅन केलेली असायची. गुगल नसताना ठरवलेली ती ट्रीप नेहेमीच मस्त व्हायची.
बाबा नोकरी निमित्तानं परगावी असल्यामुळे घरच्या सगळ्या जबाबदार्या आई च एकाहाती पार पाडायची. बॅकेची कामं, किराणा भाजी आणणं, अगदी सायकल वरुन सिलिंडर आणणे अशी सगळी कामं अगदी शाळेत असतानाच तिला बघत अगदी सहजगत्या शिकलो आम्ही.
अत्यंक चौकस स्वभाव आणि दूरदृष्टी असलेल्या आमच्या आई ने एकदा बाजारातुन मेथी ची भाजी आणावी इतक्या सहजतेने आमच्या शेजारच्या गल्लीतला नवीन कंस्ट्र्क्शन मधला एक छोटासा फ्लॅट पण बुक केला होता आमच्या आज्जी आजोबांसाठी. बाबा यायची वाट बघत बसले तर तोवर फ्लॅट हातचा जाईल तसे नको व्हायला हा त्यामागे विचार होता. बाबा शनिवारी घरी आल्यावर त्याना तिने नेउन दाखवला फ्लॅट. बाबा ना पण तिच्या निर्णायावर पुर्ण विश्वास असायचाच आणि तो सार्थ पण असायचा.
तिनं आम्हाला सर्वर्थानं सक्षम बनवलं.
आमच्यावर आमच्या संदर्भातले कुठलेही निर्णय तिनं कधीही लादले नाहीत.मग तो आमच्या शिक्षणाचा असो की लग्नाचा.
सावध राहुन माणसं ओळखायला तिनं शिकवलं. कोणतीही जबाबदारी अंगावर घेतली की कितीही अडचणी आल्या तरी तडीस न्यायला शिकवलं. माणसं जपायला शिकवलं पण त्याचवेळी कोणी आपला गैरफायदा घेउ नये यासाठी सावध रहायलाशिकवलं.
निर्णयक्षमता शिकवली. आणि त्या निर्णयाची जबाबदारी सुद्धा घ्यायला शिकवलं.
कोणत्याही गोष्टीसाठी कोणावरही अवलंबुन राहायचं नाही हे शिकवलं.
कोणतीही पुर्वसुचना न देता असं अचानक नाहिसं होउन
शिकवायच्या राहिलेल्या उरलेल्या गोष्टीसुद्धा शिकवल्या तिनं गेल्या वर्षभरात....
कितीही संकटं आली तरी आपले पाय घट्ट रोवुन उभं रहायला शिकतोय सद्ध्या...
काही नाती नव्याने समजली, काही माणसं आणि काही स्वभावनव्याने कळले.
ती होती तोवर फक्त स्वतः पुरताच विचार करायचो.स्वतः चे खुप छोटे त्रास आभाळाएवढे मोठी वाटायचे.आता सगळ्या प्रसंगांकडे तटस्थपणे बघायला शिकतोय आम्ही...हे ही दिवस जातील इतकच पक्क ठावुन आहे....
आईच्या अनेक सुंदर आठवणी, तिचं प्रेम, तिचा आशीर्वाद कायम आहेच आमच्या सोबत....
आमची ओंजळ अशी फुलांनी काठोकाठ भरलेली आहे.....
कधीही न कोमेजणारी कायम सुवास देणारी फुलं....
आईने दिलेली ही शिदोरी कधीच संपणार नाहिये....
आता चाफ्याबद्दल कसला राग.... 😊
माझं प्रिय चाफ्याचं झाड...माझी आई.....🤗😘
( सुनीताबाई नी वाचलेली हीच ती कविता https://youtu.be/i5_jgK1ggkM )

कृष्ण, द्रौपदी, सुभद्रा आणि चिन्धी

 कृष्ण, द्रौपदी, सुभद्रा आणि चिन्धी

©️स्मिता श्रीपाद
( पुढील लेख सहज गंमत म्हणुन लिहिला आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा वगैरे हेतु अजिबात नाही.कृपया निषेध वगैरे व्यक्त करु नये. तो गंमत म्हणुन वाचावा ही विनंती.गीतकार, संगीतकार,गायक यांच्याबद्दल अत्यंत आदर आहेच.🙏🏻)
नुकतेच रक्षाबंधन साजरे झाले.
त्यानिमित्ताने माझ्या ७ वर्षांच्या पुतणीने "भरजरी ग पितांबर दिला फाडुन" हे गाणं पाठ केलं होतं. माझे सगळे मामे,मावस दीर, नणंदा असे एकत्र जमुन यंदाची राखी साजरी केली. (हो..हो... कोवीड आहे हे माहिती आहे...आम्ही सर्व नियम पाळुन एकत्र आलो होतो..लगेच भुवया उंवावु नका 😉..)
तर त्या दिवशी राखी बांधताना मृदुला हे गाणं गात होती...आम्ही सगळ्यांनी हे गाणं खुप मज्जा करत तिच्यासोबत गायलं आणि त्या दिवसांपासुन हे गाणं जे काही तोंडात बसलंय की बस रे बस...
येताजाता जो तो घरात हेच गाणं गातोय.. कपड्यांच्या घड्या करताना, स्वयंपाक करताना, झाडांना पाणी घालताना,अंघोळ करताना जिकडे तिकडे चिंध्याच चिंध्या... 🙂
परवा रात्री ११ वाजता बेडशीट नीट करता करता नवरा हे गाणं गायला लागला आणि मग घरात फुटल्यासारखे हासलो आम्ही.
आज सकाळी राखी चे व्हिडीओ पाहाताना परत एकदा हे गाणं कानावर पडलं..म्हटलं आता काही खरच नाही....या गाण्यासाठी आता लेखाची एक चिंधी फाडलीच पाहिजे ...😀
आज गूगल उघडुन या गाण्याचे शब्द पाहिले आणि एकदम बेसिक प्रश्ण पडले.
ज्यांना हे गाणं अजिबात च माहिती नाही त्यांच्यासाठी एकदम थोडक्यात सारांश...
कृष्णाने सुभद्रा आणि द्रौपदीच्या भक्तीची परीक्षा बघण्यासाठी स्वतः चं बोट कापल्याचं सांगितलं म्हणे नारदमुनींना.मग काय आपले नारदमुनी गेले आधी सुभद्रेकडे की बाई ग तुझ्या भावाचं बोट कापलंय तर त्याला बांधायला एखादी चिंधी देतेस का ?
तिने सरळ सांगितलं की नाही बुवा. माझ्याकडे फक्त भरजरी साड्या आहेत शालु पैठण्या ई ई..याची कशी चिंधी देउ.मग नारद गेले द्रौपदी कडे तर तिने म्हणे अंगावरचा भरजरी पितांबर काहीही विचार न करता टरकन फाडला आणि दिला. तर त्यावरुन कवीने असे ठरवले आहे की कृष्णा ची स्वतःची पाठची बहीण वैरिणी सारखी वागली आणि मानलेली बहीण हाकेला धावुन गेली..हुश्श..
कृष्णदेवांना तरी काय अगदी बोट कापलय वगैरे खोडी काढायची गरज ना......बर राजमहालात इतके एक्सपर्ट राज वैद्य असताना काही दुखलं, खुपल,पड्लं,झडलं, कापलं की आधी ते लोक येतील ना...म्हणजे यायचे म्हणे....(हे म्हणजे ...चार चार घरं, घरात २४ तासाचे डॉक्टर असताना आणि मिनी आय सी यु पण असताना बच्चन लोक कोविड झाला म्हणुन नानावटी मधे दाखलं झाले म्हणतात...तसचं काहीसं...तर ते असो..loackdown कृपा..अशीच उदाहरणं सुचणार..) असं असताना काहितरी दुसरी युक्ती करायची ना..हे म्हणजे अगदीच कल्पनादारिद्रं...
आधी च खोड्या काढायची हौस त्यात आणि बहिणीची खोडी काढणे हा सगळ्या भावांचा लाडका विषय..म्हणुन काढली खोडी असं म्हणु आपण...
बरं आता महाभारत आणि रामायण बघुन (परत एकदा loackdown कृपा) आपल्या सर्वांना एव्हाना कळलेच असेल की त्या काळच्या बायांकडे नुसत्या भरजरी साड्याच असायच्या की नाई...शालु,पैठण्या,कांजीवरम्,नारायणपेठ ई ई....जेव्हा बघावं तेव्हा सगळ्या जणी आपल्या भरजरी साड्या, दागदागिने आणि फुल मेकअप मद्धे...सुभद्रा आणि द्रौपदी बाईंकडे काय हो नुस्त्या कपाट भरुन भरजरी साड्या च असणार...
मलमल कॉटन किंवा गेला बजार मउसुत इचलकरंजी कॉटन साड्या तेव्हा कुठुन असणार...?
आणि जखम बांधायची म्हणजे कसं मऊसुत कापड हवं, रेशमी जरी असलं तरी ते टोचणार च ना... सुभद्रेचा मुद्दा एकदम बरोबर आहे....जखम बांधायला रेशमाची चिंधी कशी काय उपयोगी पडेल ? तिच्या लहानपणी औषधशास्त्रा चा अभ्यास तिने नीट केलेला असणार नक्की...
आणि मला तर वाटतंय नारदांना सुभद्रेने सुचवलं पण असणारे हे सगळं आणि राज वैद्यांकडे जायचा सल्ला पण दिला असणारे..पण आपले नारद कसे आहेत माहिती आहे ना....मुद्दाम त्यांनी हा तपशील गाळला ..उगीच नाही त्यांना कळीचे नारद म्हणत...
द्रौपदी ने दिला आपला भरजरी पितांबर फाडुन कारण तिला हे सगळं औषधशास्त्र वगैरे लक्षात नसेल इतकं ( किंवा लहानपणी ऑपश ला टाकलं असेल...)...पाच पाच नवर्यांना सांभाळायचं म्हणजे काय खाउ आहे का....? ..आले नारद...लागलय म्हणाले असतील कृष्णाला...दिली आपली एक चिंधी फाडुन..घरात इतकी कामं आहेत...कुठे शोधाशोध करायची....हाय काय नाय काय...
नारदांनी आपलं एकाचं दोन करुन सांगितलं देवांना.....
आधी भावा बहिणींत तु तु मी मी चालु असतेच..त्यात परत आणि भांडणं लावायचं काही कारण आहे का...?
मृदुलाच्या त्या एका गाण्याने डोक्यातली चक्र अशी गरागरा फिरली आणि हे सगळं कागदावर उतरलं.
आता पुढच्या राखीपर्यंत या मजेशीर आठवणी राहतील इतकच.
बाकी असे कितीही नारद येवोत, भावाबहिणींचं गोड नातं अशा छोट्या चिंध्यांना भिक घालत नाही हे नक्की..🤗😀
- ©️स्मिता श्रीपाद

आजी

 आजी

आजीच्या बटव्यात असतो
अनेक गोष्टींचा खजिना
डोळ्यांना दिसला नाही तरी
जाणवतो फक्त तिच्या नातवंडांना
तिच्या साडीचा मऊसूत पदर..
तिच्या भोवती फिरणारा वास..गोडसर
तिचा सायी सारखा स्निग्ध तळहात..
आणि तिची मिठी..घट्ट..उबदार
ताक घुसळताना होणारा नाद..
लोणी साखरेची इवलीशी वाटी..
स्वयंपाक घरातली गोड गुणगुण..
आणि देवघरातली फुलांची दाटी
रात्री कुशीत घेऊन मारलेल्या गप्पा,
परी, चिमणी आणि राजाची गोष्ट..
पत्ते, काचाकवड्या चा तासनतास खेळ,
आणि चेहेऱ्यावर हात फिरवून काढलेली दृष्ट
औक्षण करताना टाकलेल्या अक्षता
तिच्या डोळ्यात लुकलुकणारे दिवे
पाठीवर थाप मारत दिलेला आशीर्वाद
यशवंत ,औक्षवंत, सुखी व्हावे
वाळवण आणि उन्हाळ्याची सुट्टी,
भेळ, आंबे , पन्ह आणि कैरी
तिच्या हाताचा दैवी आमटी भात
पापड मसाल्याची बांधून दिलेली शिदोरी
पण मग... एक आजी जाते तेव्हा..
ती तिच्यासोबत घेऊन जाते का?
हा सगळा खजिना ?
मुळीच नाही..
ती खरंतर देऊन जाते तिच्यातल बरंचस काही
आपल्या ओटीत..खण नारळाच्या सोबतीने...
तिच्यातलं आज्जीपण
सापडतं मग आपल्याला हळूहळू...
कधी आमटीच्या खमंग फोडणीत,
कधी शांत तेवणाऱ्या निरंजनात
तर कधी ताकावर आलेल्या लोण्यात..
- स्मिता श्रीपाद
( आज जागतिक कविता दिन. हे खास माझ्या आजी साठी 🙏🙏 )

तेरा मुझसे है पेहेले का नाता कोई..Hemangi

 Dear Hemangi Chaudhary , this is my farewell gift to you...

😍😘
घरातली सगळी गडबड उरकून ऑफिस मध्ये पोचलं की तुम्ही सगळ्यात आधी काय करता ? (कोरोनापूर्व काळातला प्रश्ण )
डेस्क वर जाता, डेस्कटॉप/लॅपटॉप चालू करता , pantry मधून पाण्याची बाटली भरून आणता आणि मेल्स चेक करता.. मग वेळ मिळाला की कॉफी ब्रेक वगैरे.. बरोबर ना ?
पण तिचं तसं नसतं..
ती ऑफिसमध्ये पोचली की आधी थेट रेस्ट रूम गाठते.. तिथला १० फुटाचा भिंतभर आरसा तिची वाट बघत असतो.. मग आपला स्पेशल पाऊच उघडते आणि छानपैकी तिच्या भाषेत "तयार होते"... मनासारखं सगळं जमलं की मग पुढे काम....ती म्हणजे आमची *हेमांगी.. *हेम*...
हेम आणि माझी ओळख होऊन आता साधारण 9 वर्ष झाली ... मला अजूनही पहिल्यांदा ती भेटली तो दिवस आठवतोय.. मला persistent जॉईन करून साधारण 15 दिवस वगैरे झाले असतील.आल्या दिवसापासून नूर च्या सोबत तिच्या लंच ग्रुप मध्ये जायला मी सुरू केले होते.. अमृता, गीतांजली, विजयश्री, अर्चना, किरण...सगळ्यांशी हळूहळू ओळख होत होती. गप्पा मध्ये हेम असायचीच असायची.. कोण ही हेम अशी उत्सुकता होती मनात.. त्यावेळी ती onsite ला गेली होती. एक दिवस लंच चालु असताना एक हसर्या चेहेर्याची एकदम टकाटक कपड्यातली मुलगी मध्येच येऊन आम्हाला जॉईन झाली.. तिच्या येण्याने सगळ्या एकदम खुश झाल्या.. हीच ती हेम....आधीच हा ग्रुप एकदम happening त्यात आणि हेम आल्यावर दंगा च सुरू झाला.. माझी आणि तिची कोणीतरी ओळख करून दिली.. मला आवडलीच ती एकदम पहिल्या भेटीत.. तिने सगळ्यांसाठी गिफ्टस आणलेल्या आणि माझ्या पहिल्या भेटीत सुद्धा अनेक वर्षांची ओळख असल्यासारखे मला पण एक मस्त डेस्क वर ठेवायचा होल्डर आणि चॉकलेट्स दिले तिने.....
जेवण झाल्यावर आम्ही खुप गप्पा मारल्या आणि त्याक्षणी एकदम जाणवलं की काहीतरी वेगळच ट्युनिंग जमलय आपलं हिच्याशी.....
तेरा मुझसे है पेहेले का नाता कोई..
युही नही दिल लुभाता कोई....
असं फिल्मी च एकदम 🙂
रोज ऑफिस ला जायची ओढ लागायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे इथे मला मिळालेला ग्रुप. सगळ्या जणी एकसे बढकर एक वल्ली आहेत...."व्यक्ती आणि वल्ली" चं अजुन एक व्हर्जन पुलं ना नक्की काढता आलं असतं...जर ते आम्हा सगळ्याना भेटले असते तर... आणि या सगळ्या जणींना बांधुन ठेवणारा एक महत्वाचा धागा म्हणजे आमची हेम.माझा हा ग्रुप मला खुप जास्त जीवाभावाचा आहेच पण तरीसुद्धा एक कणभर जास्त प्रेम हेम वर आहे 🙂
VJ च्या भाषेत "लाडकी मैत्रीण" 😍
त्याचं खास असं कारण नाही सांगता येणार.पण हेम सोबत मनातलं कोणतही सीक्रेट शेअर करताना काहीही संकोच वाटत नाही हे ही खरं.
हेम म्हणजे एकाचवेळी practical person आणि sensitive girl असं एक मिश्रण आहे. तिचं स्वतः च असं आर्ट ऑफ लिव्हिंग आहे आणि त्याचे धडे ती वेळोवेळी आम्हाला देत असतेच. कधीकधी विनाकारण भावनेच्या भरात वाहुन जाणार्या आमच्या ग्रूप मधल्या माझ्यासकट काही काही मुलींसाठी हेम चे धडे नेहेमी उपयोगी पडतात.स्वतः साठी Me Time कसा काढायचा हे हेम कडे बघुन शिकु शकता तुम्ही.तिचे फंडे एकदम क्लीअर असतात.आपण दिवसभर ऑफिसमधे इतकं काम करतो तर घरी गेल्यावर आपल्याला पण आराम मिळालाच पहिजे. मग घरची कामं outsource करण्यात काहीच चुकिचं नाही.हेम च्या या परफेक्ट time management मुळेच ऑफिस सांभाळता सांभाळता ती तिचे सगळे छंद मस्त जोपासत असते. गेल्या काही दिवसात तिने योगा टिचर म्हणून पण कोर्स पूर्ण केला आणि आता योगा गुरू झाल्या आहेत मॅडम 🙏🏻
हेम एकदम स्पष्टवक्ती आहे.जे आहे ते तोंडावर. पोटात एक आणि ओठावर दुसरं असं काही तिला कधी जमत नाही. आणि हे फक्त मैत्रिणींसाठी नाही बरका. अगदी घरचे लोक सासु, सासरे, नवरा, आई , वडील सगळ्यांच्या बाततीत. मुली म्हणलं की टिपिकल घरगुती सासु-सुन गप्पा पण रंगतातच. या गप्पांमधे मला नेहेमी हेम आणि तिच्या सासु बाईंमधलं नातं खुप आवडतं. राग आला तरी मनात कुढत न बसता स्पष्ट्पणे दोघी व्यक्त होतात आणि जे झालं ते विसरुन पुढे जातात. हे नातं मला खरच खुप healthy वाटतं. राग, दु:ख अशी ओझी वर्षानुवर्षे मनात सांभाळण्यात काय अर्थ आहे ना.
हेम ची अजुन ची अजुन एक खास गोष्ट म्हणजे, आपल्या मैत्रिणींचे कौतुक करणे आणि त्यांना motivate करणे.कितीही छोट्यात छोटी गोष्ट असुदेत इतकं कौतुक करेल ना की बस.साधा वरण भात जरी डब्यात आणला तरी त्याचं पण कौतुक 😍
हेम अत्यंत organized मुलगी आहे. तिच्या ऑफिस च्या कामात ते दिसतच पण तीच घर कधी बघायला गेलात तरी आपल्याला complex येइल इतकं छान नीटनेटकं असतं. हेम चा जुना 1 BHK फ्लॅट असताना मी एकदा तिच्याकडे गेले होते. इतका छोटासा फ्लॅट आणि घरात इतकी माणसं असुनही तिने तो इतका छान ठेवला होता ना. मला फार फार कौतुक वाटलं तिचं कारण मी एक बर्यापैकी अव्यवस्थित मुलगी आहे 😆
कुठल्याही गोष्टीत पॉसिटीव्ह साइड शोधायची सवय मला आमच्या या लंच ग्रुप मधे लागली असं म्हणता येइल. नळ स्टॉप वरुन माझा प्रोजेक्ट भगीरथ ऑफिस ला शिफ्ट झाला आणि मला प्रचंड वाईट वाटायला लागलं की आता या पोरी रोज भेटणार नाहीत म्हणुन. तेव्हा हेम, किरण यांनी मला समजावलं की भगीरथ ऑफिस किती सुंदर आहे आणि तिथे काम करायला किती मजा येते वगैरे. आणि तसचं झालं. पुढची दोन वर्षे इतकी सुरेख गेली ना की बस...मी जेव्हा परत पीटी ला आले तोवर जुना लंच ग्रुप सगळा विखुरला होता. हेम एकटीच होती आणि सोबत होती नवीन गँग...वैशु, किरण, रामेश्वरी आणि माधुरी. मुली बदलल्या पण सगळी मजा तीच होती.त्यात आम्हाला अर्चना आणि दीपाली येउन जॉइन झाल्या आणि परत धमाल सुरु झाली. साधारण एकाच स्वभावाचे आणि तत्वांचे लोक अपोआप एकमेकांकडे ओढले जातात अस असावं बहुतेक कारण हा ग्रुप सुद्धा कधी जीवाभावाचा झाला कळलंच नाही. आणि इथे पण सगळ्यांना बांधुन ठेवणारा एक धागा होताच ना हेम नावाचा 😀
आणि आता हे सगळं असं चांगलं चालु असताना हेम persistent सोडुन जाणार म्हणतेय 😔
वाइटातलं चांगलं इतकच आहे की सध्या घरात बसुन काम करत आहोत त्यामुळे हेम चं रोज न भेटणं त्रास देणार नाहिये. पण आता जेव्हा ऑफिस सुरु होइल तेव्हा लंच ला हेम भेटणार नाही ही कल्पना अजुनही त्रास देतेय.
प्रिय हेम,
हे सगळे तुझ्या १५ वर्ष सत्कार वाल्या भाषणात बोलायचे मुद्दे होते. 😊
पण असो...
"Change is the only permanent thing in the world"
त्यामुळे हा बदल अपरीहार्य आहे हे माहित आहे. पण एक खात्री आहे. गेल्या ९ वर्षात जुळलेल मैत्रीचे हे धागे खुप चिवट आहेत.आणि अशा छोट्याशा बदलांमुळे त्यावर काही परीणाम होउ शकत नाहिये.
whatsapp, व्हिडीओ कॉल वर सतत भेट्णार आहोतच आपण आणि तुझं घर माझ्यासाठी १० मिनिटाच्या अंतरावर आहे हे एक महत्वाचं.
Wish you all the best dear for your new job and new role..
I know you will rock as always...😘😘
नवीन ऑफिस मधे काही वर्ष काढ आणी *पर्सी* ला परत ये. आपल्याला एकत्र रीटायर व्हायचंय 😊
तोवर....keep in touch
Love you to the moon and back
( असं म्हणायची पद्धत आहे 😄)
- स्मिता


रागी व्होलव्हीट मफीन्स

 शाळा सुरू.. डब्बा सुरू..प्रयोग सुरू

अधून मधून मला आदर्श आई बनायची हुक्की येते. 😎 मग त्या आठवड्यात अचानक ब्रेड, मैदा ,जंक फूड बंद, भाज्या खा,सॅलड खा, फळं खा असा फतवा मी काढत असते. शक्यतो अशी हुक्की शाळा सुरू झाली की पाहिले 2 आठवडे टिकते.😝 मग मधुजा आणि मी दोघीपण वैतागतो आणि परत ये रे माझ्या मागल्या.
तर सध्या नुकतच शाळा सुरू झाल्यामुळे आदर्श आई चा अटॅक आलाय.चित्रात दिसेल असा सुंदर healthy and tasty डबा द्यायचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आज केलेला प्रयोग..
*रागी व्होलव्हीट मफीन्स*
( नाचणी आणि गव्हाचा केक असं म्हणलं की पोरगी भाव द्यायची नाही म्हणून काहीतरी भारी नाव द्यायचं 🤣)
*साहित्य* -
नाचणी पीठ 1 वाटी
(सुट्टी मध्ये वजन कमी करायचा किडा आलेला अंगात म्हणून भरपूर नाचणी चं पीठ आणलं होतं)
गहू पीठ 1 वाटी
पिठीसाखर 1.5 -2 वाटी
बेकिंग पावडर 1/2 चमचा
बेकिंग सोडा 1/4 चमचा
दही 1/2 वाटी
दूध 1.25 वाटी
तूप 4 चमचे
व्हॅनिला इसेन्स - 1/2 चमचा
कोको पावडर - 2 चमचे
डार्क चॉकलेट चे तुकडे
(चमचा म्हणजे आपला साधा पोह्याचा चमचा आणि वाटी म्हणजे मध्यम आकाराची आमटीची वाटी वापरली)
कृती -
ओव्हन 200℃ ला convection मोड ला प्री-हिट करायला लावायचा.
दोन्ही पिठं, बेकिंग पावडर आणि सोडा 2 वेळा चाळून घ्यायचं
तूप,साखर,दही,दूध एकत्र चांगलं फेटून घ्यायचं
त्यात चाळलेलं मिश्रण घालून हलक्या हाताने एकत्र करायचं.चॉकलेट तुकडे आणि व्हॅनिला इसेन्स शेवटी घालून अलगद मिक्स करायचं
मफिन च्या मोल्ड मध्ये घालून ओव्हन मध्ये 15 मिनिटे बेक करायचं
गरम गरम आधी स्वतः गट्टम करून मग फेसबुक वर फोटो टाकून मग घरच्यांना खायला द्यायचं
😜😜