Tuesday, July 22, 2025

कुमाऊंच्या प्रदेशात - १.......नैनिताल कडे

 कुमाऊंच्या प्रदेशात - १.......नैनिताल कडे

“नेमेचि येतो मग उन्हाळा आणि उन्हाळ्याची सुट्टी”
('नेमेचि येतो मग पावसाळा' असं आजकाल आपण म्हणू शकत नाहीये कारण सध्या पावसाचा काहीच नेम नाहिये.. मनात येइल तेव्हा सुरु.....)
कुठे जायचं या सुट्टीत ? असं विचारमंथन फेब्रुवारी पासून सुरु झालं. गेल्या वर्षी काश्मिर झाल्यामुळे परत एकदा हिमालयाच्या जरा जवळ जाउन येउ असं वाटायला लागलं होतंच. आमच्या सुट्ट्या मे मधे. अगदी ऐन उन्हाळा असल्यामुळे थंड ठिकाणी जायचं हे ठरलंच होतं.पण कमीतकमी दगदग, सोपा प्रवास, निसर्गरम्य असणारं ठिकाण पाहिजे, खिशाला पण झेपलं पाहिजे अशी अखूडशिंगी बहुगुणी गाय कशी शोधायची बुवा?
मग पार सिक्कीम, दार्जिलिंग पासून सुरु करून धर्मशाळा, डलहौसी याव नि त्याव असे सगळे पर्याय शोधत खूप अभ्यास करून एकमताने(माझ्या) यावर्षीचा प्लॅन ठरला.
"नैनिताल,रानीखेत, जिम कॉर्बेट". ब्लॉग आणि इंटरनेट शोधून मला हवी तशी आयटीनेररी बनवली.
कोण येतंय का सोबत ? अशी मित्रमंडळींना हाळी घालून झाली पण यंदा आमच्या आणि त्यांच्या तारखा जुळेनात. मग अचानक एक नवीन प्रयोग जो इतके वर्ष टाळत होतो तो करायचा विचार सुरु केला. तो म्हणजे एखाद्या ट्रॅवल कंपनी सोबत ग्रुप टुर.
मग वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपनी चे ब्रोशर गोळा केले आणि मग मला मी बनवलेला प्लॅन जास्तच भारी वाटायला लागला 😜. ( कोणाला हवा असेल तर नक्की सांगा.I will be happy to share)
पण मग 'स्वतः ला हवा तास प्लॅन पण आम्ही तिघेच' की 'विमान तिकिट्स,हॉटेल बुकींग्स्,फिरायला कार ई सकट सगळं तय्यार असणारी ग्रुप टूर' यात निवड करावीच लागणार होती. शेवटी यावेळी सर्वानुमते दुसरा पर्याय ठरवला. आम्हाला हव्या असणाऱ्या तारखांना उपलब्ध असलेली केसरी ची टूर बुक करून मोकळे झालो.
गेल्या वर्षीचा काश्मीर चा अनुभव गाठीशी होता त्यामुळे यावेळी शॉपिंग आणि पॅकिंग थोडं सोपं झालं. उत्तरेकडे उन्हाळा असं गुगलबाबा दाखवत असले तरी आपल्या साठी त्यांचा उन्हाळा म्हणजे थंडी च असते याचा जुना अनुभव होताच त्यामुळे गरम कपडे, कधी पण पडणाऱ्या पावसासाठी छत्री असा सगळा जामानिमा तयार होता.
हव्या त्या तारखेला कमी पैशातलं विमान शोधा, बुक करा, हॉटेल्स चे रिव्यु बघा आणि बुकिंग करा, तिथे फिरायला गाडी शोधा, रोजचा फिरायचा प्लॅन बनवा असं काही म्हणजे काहीच काम यावेळी नव्हतं त्यामुळे मला चुकल्याचुकल्यासारखं व्हायला लागलं होतं खरतर.
टूर च्या 8 दिवस आधी व्हाट्स अप ग्रुप तयार होईल आणि विमानाची तिकिटे आणि बाकी सुचना तिथेच मिळतील असं बुकिंग च्या वेळी सांगण्यात आलं होतं.पण ट्रीप चार दिवसांवर आली तरी केसरी ऑफिस कडुन एक पण फोन नाही. म्हणलं कॅन्सल झालं की काय सगळंच ? त्यांच्या कस्ट्मर केअर ला फोन केला तर ते 'तुम्हाला २ दिवस आधी येइल फोन. वाट बघा' असं म्हणत होते. केसरी ची सगळी बुकींग डॉक्युमेंट्स काढुन वाचली. त्यात एके ठिकाणी एक अशा अर्थाचं वाक्य लिहिलेलं होतं की "No phone means all is well" म्हणलं ओके. बघु वाट. बॅग तर तयार आहेत पण हातात विमान तिकीट्स, हॉटेल बुकींग काहीच नाही त्यामुळे माझ्या मधल्या प्लॅनर ला जरा अस्वस्थ झालं होतं. आणि खरंच आदल्या दिवशी २ फोन आले. एक केसरी ऑफिस मधुन विमानासंदर्भात आणि एक आमच्या टुर मॅनेजर्/गाईड/केसरीचा आपला माणुस अभिषेक चा दिल्ली मधुन. आता ट्रीप चे खरे वेध लागले आणि....
२ मे पहाटे ४:४० ला पुणे विमानतळावरुन दिल्ली च्या दिशेने आम्ही उड्डाण केलं....
दिल्ली मधे पोचता पोचता अभिषेक चा मेसेज येउन पडला होता की आमच्या सोबत मुंबई चे पण लोक आहेत आणि त्यांचं विमान आमच्या नंतर एक तासाने पोचेल. तोवर बाहेर दिल्ली च्या गरमीत येण्यापेक्षा आतच थांबा.मग दिल्ली विमानतळावर थोडं फ्रेश झालो, खाऊन घेतलं.तिथेच मस्त ऐसपैस लाउंज चेअर पकडुन त्यावर जरा पाठ सरळ करुन घेतली.बरोबर ९ वाजता अभिषेक चा फोन आला की मुंबई वाले पोचले आहेत. आता तुम्ही सगळेजण बाहेर पार्किंग पाशी येउन मला भेटा. बाहेर पडलो तर अभिषेक केसरी चा झेंडा घेउन आमचे स्वागत करायला तयार होताच.त्यांच्या कडुन आमच्या नावचे टॅगस घेउन बॅगांना लावुन टाकले आणि बस ची वाट पाहात बसलो.
अवघ्या १ किलोमीटर अंतरावर असलेली आमची बस दिल्ली च्या दिव्य ट्रॅफिक मुळे अर्धा तासाने पोचली. तोवर आमच्या सोबत कोण कोण मंडळी आहेत, त्यांची आणि आमची कुंडली जुळू शकेल की नाही याची चाचपणी सुरु केली 😉. केसरी ने दिलेली ३० सीटर बस मस्त वातानुकुलीत होती. पुणे आणि मुंबई चे मिळुन आम्ही २० जण या बस मधे बसुन नैनिताल च्या दिशेने रवाना झालो. दिल्लीतुन बाहेर पडता पडता जमेल तेवढे दिल्ली दर्शन झाले. ईंडीया गेट आणि राष्ट्रपती भवन दर्शन बसमधुन करुन झालं आणि हायवे ला लागता लागता रात्री १ पासुन जागे असलेले आम्ही सर्वजण "ये ग गाई गोठ्यात" करत कधी झोपलो समजलं सुद्धा नाही.
१२ वाजता "गजरौला" इथं जेवण्यासाठी बस थांबली तेव्हाच जाग आली.डोळे उघडले तेव्हा " मै कौन हु ? मै कहां हु ?" मोड मधे सगळेजण होतो. "बिकानेरवाला" नावाच्या हॉटेल मधे जेवणाचा पहिला ब्रेक होता. व्यवस्थित जाग आल्यावर भुकेची जाणीव झाली. केसरी मधे टुर बुक केली तेव्हा केसरी सोबत आधी जाउन आलेले लोक म्हणायचे की केसरी मधे खाण्यापिण्याची खुप रेलचेल असते. त्याची प्रचिती पहिल्याच जेवणाला येत होती.त्यांनी निवडलेलं हॉटेल आणि तिथलं जेवण दोन्ही मस्तच होतं. बिकानेरवाला मधली भरगच्च पंजाबी थाळी जेवुन उरलेली झोप पुर्ण करायला परत एकदा गाडीमधे बसलो.आता भरल्या पोटी अजुनच मस्त झोप लागली ते थेट चहा साठी गाडी थांबली तेव्हा जाग आली. खाली उतरुन पाहिलं तर मुख्य हायवे सोडुन गाडी पहाडाच्या दिशेने निघाली होती. काठगोदाम च्या अलिकडे कुठेतरी आम्ही थांबलो होतो.
आतापर्यंत झोप पुर्ण झाली होती पण आता गाडीत बसुन सगळेच कंटाळलो होतो. काठगोदाम च्या जवळ जबरदस्त ट्रॅफिक जाम मुळे खुप वेळ गेला. आता अरुंद रस्ते आणि डोंगर सुरु झाला होता. एकिकडे डोंगर आणि दुसरीकडे दरी, दरीमद्धे सुकलेल्या नद्या आणि त्यामुळे उघडे पडलेले पांढरेशुभ्र दगड्गोटे दिसत होते. दूरवर डोंगरांच्या रेषा दिसत होत्या. तिथला निसर्ग एकाच वेळी सुंदर आणि भीतीदायक वाटतो. चारधाम ला जाणारी वाट हीच आहे आणि पुढे यापेक्षा अवघड आहे म्हणे. हे ऐकल्यावर तिथुनच चारी धाम ना हात जोडले.
इकडे पाउस पडुन गेल्याच्या खुणा दिसत होत्या त्यामुळे हवा चांगलीच गार लागत होती. डोंगर संपतच नव्हते. एक उतरला की पुढचा. नैनिताल च्या येण्याकडे एकुण ४० जण त्यांचे 'नैन' लावुन बसले होते. अखेर संध्याकाळी ६-६:६० च्या दरम्यान आमच्या हॉटेल मधे पोचलो.
आजचा पहिला दिवस प्रवासात गेला होता. आमचं हॉटेल खुद्द नैनिताल मधे नव्हतं तर नैनिताल जवळ भवाली नावचं एक दुसरं ठिकाण आहे ( आपल्या महाबळेश्वर-पाचगणी सारखंच) तिथे होतं.
आमच्या बॅग्स त्यांना लावलेल्या टॅग्स वरुन आमच्या रुम मधे पोचत्या केल्या गेल्या. काल रात्री १२ नंतर तब्बल १८-१९ तासांनी आता संध्याकाळी ७ वाजता गादीला पाठ टेकवली. नैनिताल मधे गेले ३ दिवस भरपुर पाउस पडुन गेला होता त्यामुळे हवा प्रचंड गार होती. उद्या पण 'बारीश की आशंका' व्यक्त केली होती. थंड हवेसाठी आलो होतो तर पाउस पण फ्री मधे मिळणार होता बहुतेक 😉
थोडा आराम करुन, फ्रेश होउन डायनिंग रुम मधे जेवायला गेलो. सुंदर वास सुटले होते. थंड हवे मुळे कडकडुन भुक पण लागली होती. अप्रतिम चवदार जेवणाचा बुफे तयार होता.अर्धं जेवण झाल्यावर शेफ महाराज त्या रुम मधे प्रकटले.त्यांच्याशी हिंदी मधे 'खाना अच्छा है' वगैरे सुरु केलं तर ते अभिषेक सोबत मस्तपैकी मराठीत गप्पा मारायला लागले. केसरी सोबत नेहेमी स्वत: चा शेफ असतो असं कळलं होतं पण आमच्या बस मधे अभिषेक सोडुन कोणी शेफ वगैरे दिसलं नव्हतं.तर हे शेफ बुवा केसरी चेच निघाले आणि मुंबईहुन आले होते असं कळलं. सिझन मधे ३ महिने ते तिथेच रहातात असे त्यांनी सांगितले. त्यांच्या हातच्या जेवणासाठी आणि एकंदरच केसरी च्या सगळ्याच जेवणांसाठी वेगळी पोस्ट टाकावीच लागेल. असं एका वाक्यात सांगता यायचं नाही.
जेवण करता करता उद्याच्या प्लॅन बद्दल अभिषेक ने सुचना दिल्या. ७ वाजता वेकअप कॉल, ८ ला नाष्टा, ९ ला फिरायला बाहेर असं फिक्स टाईमटेबल सांगितलं.
गरम गरम सुग्रास जेवण जेवुन शेफ ना धन्यवाद देत रुमवर परत आलो.
उद्या पाउस येइल का ? स्नो व्यु पॉईंट वरुन हिमालय रांगा दिसतील का ? नैनी लेक मधे फिरायला मिळेल का ? असे प्रश्ण सध्यासाठी बाजुला ठेवुन, रुम मधला हीटर चालु करुन गुडुप झालो.

वर्तुळ

 वर्तुळ


"गायक मंडळी तयार ना ? आपापल्या जागा घेउन बसा."
"साउंड चेक करा रे.. डाव्या मॉनिटर मधून आवाज येतोय ना व्यवस्थित ?"
"पाहुणे दीपप्रज्वलनासाठी गेले आहेत. २ मिनिटात पडदा वर घेतोच आहोत"
"रेवती आणि श्रद्धा ताई आल्या का? नांदी सुरु होतेय म्हणाव त्यांना"
"आसावरी ताई, मला प्रत्येक गाण्याच्या आधी चा क्लु सांगा बरं का"
"पण मी कसं सांगणार? माईक आहे माझ्या समोर"
"अहो सोपं आहे.. लहानपणी आपण कॉपी करताना कसं पेपर तिरका धरुन उत्तरावर हळूच बोट ठेवायचो तसं त्या प्रिंटआउट वर गाण्याच्या नावापुढे बोट ठेवुन दाखवा"
"पण मी केलीच नाहीये कॉपी कधी"
"काळी ५ असेल तेव्हा मी पाच बोटं धरुन केसांकडे हात दाखवेन चालेल ना? पण माझे काही केस पांढरे आहेत त्यामुळे काळी की पांढरी ५ कसं कळणार?"
हे आणि असे अनेक संवाद मोजुन शेवटच्या साठ सेकंदात घडत होते. पोटात आलेला मोठ्ठा गोळा मधेच घडणार्या विनोदामुळे इकडे तिकडे पळत होता.
" ज्ञानप्रबोधिनी प्रशाला पालक अभिव्यक्ती गट सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे..." असे शब्द कानावर पडले आणि मी शांतपणे डोळे मिटुन एक दीर्घ श्वास घेतला.
प्रांजल दादा च्या सिंथेसायझर वर नांदी ची पहिली लकेर उमटली आणि गेल्या २ महिन्यातली सगळी धावपळ शांत करणारा पहिला स्वर सुरु झाला....
"जाणुनिया अवसान नसोनि,
महत्कृत्य भर शिरी घेतो"
चा खराखुरा अर्थ त्याक्षणी कळत होता.आत आत झिरपत होता. नकळत एक चुकार अश्रु ओघळलाच आणि हात जोडले गेले.सांभाळुन घे रे बाबा.
पुढं काय झालं काही आठवत नाही. पुढचे दोन अडीच तास कापरासारखे उडुन गेले.शनिवार संध्याकाळपासुन आजुबाजुला पसरलेली जादु अजुन कमी झाली नाहिये.
रात्री डोळे मिटले तरी स्टेज वरचे सुंदर क्षण डोळ्यासमोर येतायत आणि कानात टाळ्या घुमतायत. मोबाईल उघडला की अजुनही कौतुकाचे संदेश डोकावतायत.
गेल्या वर्षी ज्ञानप्रबोधिनी च्या पालक अभिव्यक्ती चे गायन, वादन, लेखन, चित्रकला, नृत्य असे अनेक गट तयार झाले होते. कलेचा समान धागा सर्वांना एकत्र घेउन आला. गेल्यावर्षीच्या एप्रिल मध्ये एक आणि गणेशोत्सवात एक असे लहान प्रमाणावर दोन कार्यक्रम या गटाने केले होते आणि कदाचित तिथुनच या प्रवासाची सुरुवात झाली. सर्व अभिव्यक्ती प्रमुखांनी बैठक घेउन सर्वानुमते यावर्षीचा विषय ठरवला "शोध महाराष्ट्राचा" आणि सगळे गट कामाला लागले. डिसेंबर महिन्यात सर्वात आधी काम सुरु झालं ते लेखन गटाचं. आमच्या लेखन गटाची म्होरक्या आसावरी ताई ने सर्व लेखकांना प्रोत्साहन देउन त्यांच्याकडुन उत्तम साहित्य जमा केलं. महाराष्ट्राशी संबंधीत लेख, कविता, नाटिका मागवल्या गेल्या आणि हळुहळु कार्यक्रमाला मूर्त रुप यायला लागलं. जेवढं शक्य होईल तेवढं सगळं साहित्य आपण स्वतः लिहायचं असं आधीच ठरलं होतं.
लेखन गटावर ऋचा ने 'महाराष्ट्रातील नद्या' असा विषय घेउन कविता लिहिल्या तेव्हा त्यांची सुंदर गाणी तयार होतील अशी कल्पना आम्ही कोणीच केली नव्हती. पण आमच्या गुणी गायन अभिव्यक्ती प्रमुख सायली आणि दीपाली ताईंनी त्यांना सुंदर चाली लावल्या आणि त्यांची गाणी बनली. ती गाणी इतकी सुरेख होती की नृत्य अभिव्यक्ती प्रमुख श्रद्धा ताई ला त्यात सुंदर नृत्य सापडलं नसतं तरच नवल. महाराष्ट्रातल्या अवखळ नद्या स्टेज वर अवतरल्या आणि सगळ्या प्रेक्षकांना त्यांनी ठेका धरायला भाग पाडलं. गायन गटावर हौशी गायकांना साद घातली आणि त्याला मस्त प्रतिसाद मिळाला. फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात साधारण आराखडा तयार होउन गायन आणि नृत्य गटाच्या सरावाची सुरुवात झाली सुद्धा.तबला, हार्मोनियम च्या जोडीला सिंथेसायझर ची साथ देण्यासाठी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून खास आमच्या साठी वेळ काढून प्रांजल दादा पण तयार झाले. रेवतीच्या छोट्या निनाद ने सर्व सरावांच्या वेळी हार्मोनियम ची उत्तम साथ दिली.
या सगळ्याला समांतर नाटिका लेखन देखिल चालु होतंच.मार्च उजाडला तसं अनेक नवनवीन गोष्टी आकार घेउ लागल्या.इतिहास, शेती, भाषा, खाद्यसंस्कृती, क्रीडासंस्कृती अशा विविध विषयांना स्पर्श करणारं लिखाण जमा झालं आणि अमेय दादांच्या मार्गदर्शनाखाली नाटिका आणि अभिवाचन सराव सुरु झाला.सर्व लिखाणाला एकत्र जोडून देणारं सुंदर निवेदन हेमांगिनी ने तयार केलं आणि दोन तासाचा एकसंध कार्यक्रम तयार झाला.
हॉल बुक करणे, आपल्या कार्यक्रमाचे फ्लायर बनवणे, स्टेज वर मागे PPT स्वरुपात काही फोटो/प्रसंग दाखवणे ही सगळी कामे आणि दर शनिवार रविवार चा जोरदार सराव सुरु झाला.
कधी एखाद्या सोसायटीच्या हॉल मधे तर कधी कोणाच्या घरी सराव पार पडले. या सगळ्या प्रवासात अतिशय गोड मैत्रिणी भेटल्या आणि आपापले रोजचे पोटापाण्यासाठी करावे लागणारे व्याप सांभाळुन सोबत एखादी कला नुसती जोपासली असं नाही तर त्यात प्राविण्य प्राप्त केलेली अत्यंत गुणी मंडळी भेटली.गायन आणि लेखनाव्यतिरिक्त PPT आणि फ्लायर च्या निमित्ताने काही नवीन तांत्रिक गोष्टी देखिल मला शिकता आल्या.( Canva शिकवणारे माझे गुरु मिलिंद दादा यांना अजुनही चहारुपी दक्षिणा बाकी आहे हे माझ्या लक्षात आहे 😉. आनंद दादांसोबत PPT आणि फ्लायर चे काम करताना ते किती मोठे कलाकार आहेत हे त्यांनी कधीही जाणवुन दिले नाही. त्यांची कमाल लाइव्ह पेंटींग द्वारे कार्यक्रमादिवशी पाहिली तेव्हा थक्क झाले.स्वत: मोठे कलाकार असुनही पाय जमिनीवर घट्ट रोवुन उभं राहणं सगळ्यांनाच जमत नाही. जास्त गाजावाजा न करता मोजक्या स्वयंसेवकांना हाताशी धरून चोख नियोजन कसं करायचं याचं प्रात्यक्षिक दुहिता ताई ने दाखवून दिलं. अगदी समई, तांब्याभांड्यापासून प्रत्येक गरजेची वस्तू बॅकस्टेज ला हजर होती आणि वेळेत सापडत सुद्धा होती.
आत्तापर्यंत सगळं छान लिहिलंय म्हणजे सगळं सोप्प होतं असं नव्हे. अडचणी पण भरपूर आल्या पण आशुतोष दादा, मिलिंद दादा, प्रसाद दादा, अमेय दादा, आनंद दादांसारखे लोक सदैव तत्पर राहून त्यावर मार्ग काढायचं काम चोख करत होते.
कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन, संगीत, नृत्य असं सबकुछ प्रबोधिनी असलेल्या या कार्यक्रमाची सगळी निर्मिती प्रक्रिया मला जवळून बघता आली. खूप काही नवीन शिकता आलं. आसावरी ताईचं बोट धरुन मी इथे सामिल झाले आणि या सगळ्या सुंदर प्रक्रीयेचा भाग झाले त्यासाठी मी तिची कायम ऋणी राहीन.
अजून उत्तम करायला भरपूर वाव आहे. अजूनही सुधारणा करत पुढचे कार्यक्रम करत राहूच पण पहिलं वहिलं अगदी खास असतं आणि ते कायम स्मरणात राहावं म्हणून लेखणीतुन व्यक्त झालंच पाहिजे. लिखाणामुळे मी या सगळ्याशी जोडले गेले होते ते 'वर्तुळ' पूर्ण करायला नको का !!
©️स्मिता श्रीपाद
18 एप्रिल 2023

*MH370*

 *MH370*

काही वर्षांपुर्वी आकाशातुन अचानक गायब झालेल्या विमानाबद्दल आपण सगळ्यांनी वाचलंय. फक्त गोष्टीत किंवा चित्रपटात घडणारी गोष्ट २०१४ साली मलेशिया एअरलाईन च्या एका विमानाबाबत प्रत्यक्षात आली.....
MH370 ....Boeing777
मुळात विमानप्रवासाचा मला फोबिया आहे. पण नाईलाजाने करावा लागतो तेव्हा पुर्णवेळ रामरक्षा म्हणतच प्रवास चालु असतो.त्यात अधे मधे टर्ब्युलन्स वगैरे आला तर झालंच मग.आजुबाजुचे प्रवासी, हवाईसुंदर्या निवांत फिरत असले तरी माझी घाबरगुंडी उडालेली असते. पण ज्या गोष्टीचा फोबिया/भिती असते त्याबद्दल उत्सुकता पण असते आणि त्यामुळेच ही संपुर्ण घटना, त्याच्या बातम्या हे सगळं मी तेव्हा पण फॉलो केलं होतं.
मलेशिया च्या क्वालालंपुर वरुन चीन च्या बीजींग च्या दिशेने उडालेलं विमान उड्डाण केल्यावर सुमारे ३० मिनिटांनी रडारवरुन गायब झालं आणि आजपर्यंत सापडलेलं नाहिये.कोणी पळवुन नेलं की समुद्रात बुडालं कोणीच शोधु शकलेलं नाही.काही वर्षांनी दक्षिण भारतीय समुद्रात (म्हणजे विमानाच्या नियोजित मार्गाच्या विरुद्ध दिशेला) कुठेतरी एका विमानाचा पंखासारखा भाग सापडला.तो भाग Boeing777 चाच आहे आणि मलेशियाच्या त्याच MH370 चा आहे असा निष्कर्ष काढला गेला आणि या शोधावर पडदा पडला(पाडला)
आता नुकतीच Netflix वर याच घटनेवर आधारीत एक तीन भागाची वेबसिरीज आली आहे....
"MH370"
बघावं का नाही असा विचार करत होते पण रहावेना आणि पाहिलीच ही सिरीज.
पण बघताना खुप अस्वस्थ व्हायला झालं त्यामुळे एक ही भाग सलग बघु शकले नाही. मधे मधे थांबुन, आधीची माहिती डायजेस्ट करुन झाल्यावर पुढे असं करत बघितलं.
MH370 गायब होण्यामागे नक्की काय असावं याबद्दल गोळा केलेल्या माहितीनुसार ३ शक्यता यात मांडल्या आहेत.
खरतर यात स्पॉईलर असं काही नाहिये पण तरी ज्यांना कोर्या पाटीने सिरीज बघायची आहे त्यांनी पुढे वाचु नका:
MH370 हे मलेशिया वरुन चीन ला जाणारे विमान. रात्री साधारण १२:45 ला क्वालालंपुर वरुन विमानाचे उड्डाण झाले. सुमारे १:२० च्या दरम्यान हे विमान मलेशिया एअरझोन मधुन व्हिएतनाम च्या एअरझोन भागात ट्रान्स्फर होणार होते, त्यावेळी कोणत्याही एअरझोन चा कंट्रोल नसलेल्या भागातुन जाताना अचानक हे विमान रडार वरुन नाहिसे झाले आणि त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. पण पुढे काही वेळ ते मिलिटरी रडार वर दिसत होते आणि तसा डाटा नंतर Inmarsat या सॅटेलाईट सर्विस प्रोव्हायडर ने दिला. या दिलेल्या डेटा नुसार ज्या वेळी विमान एका झोन मधुन दुसर्या झोन मधे जाणार होते तेव्हा अचानक विमानाने यु टर्न मारला आणि ते परत मलेशिया वरुन प्रवास करुन ईंडियन ओशन च्या दिशेने सरळ पुढे आले आणि साउन ईडियन ओशन च्या दिशेने डाविकडे वळले होते.या समुद्रात कुठेतरी ते कोसळले असावे असा त्यावरुन निष्कर्ष काढला गेला. या विमानाचे काही अवशेष पण या महासागरात सापडल्याचा दावा आहे पण काही स्वतंत्रपणे तपास करणार्या मंडळींना हे मान्य नाही आणि या सगळ्या अभ्यासातुन तीन शक्यता या सिरीज मधे मांडण्यात आल्या आहेत.
१. विमान जेव्हा मलेशिया एअरझोन मधुन व्हिएतनाम च्या एअरझोन भागात ट्रान्स्फर होणार होते तेव्हा विमानाच्या मुख्य पायलट ने जाणून बुजुन सर्व संपर्क यंत्रणा बंद केली आणि विमान यु टर्न मधे वळवले.केबिन मधला ऑक्सिजन पुरवठा बंद केला आणि शांतपणे दक्षिण हिंदी महासागरात विमान बुडवले.पण मग को-पायलट आणि इतर स्टाफ ने काहिच हालचाल केली नसेल का ?
२. विमानात असलेल्या काही रशियन व्यक्तींनी विमानाच्या पोटात असलेल्या ईलेक्ट्रॉनिक बे मधे जाउन कॉकपिट मधील सर्व यंत्रणेचा ताबा घेतला. कम्युनिकेशन बंद केले. केबिन मधील ऑक्सिजन सप्लाय बंद केले आणि स्वत: विमानाचा ताबा घेतला. यु टर्न घेतलेले विमान साउथ ईंडियन ओशन कडे न वळवता नॉर्थ ला वळवुन पुढे कझाकस्तान च्या दिशेने नेले असावे.तसे असेल तर मग Inmarsat ने दिलेला डाटा चुकिचा होता का ?
३. या विमानात शेवट्च्या क्षणी काही मोठ्या कार्गो (२.५ ट्न लिथियम बॅटरीज, ईलेक्ट्रॉनिक्स ई) लोड केल्या गेल्या होत्या. या कार्गो स्कॅन केल्या गेल्या नव्हत्या त्यामुळे त्यामद्धे नक्की काय होते याबद्दल संदिग्धता आहे. संपुर्ण बंदोबस्तात या थेट विमानात चीन ला पाठवण्यासाठी चढवल्या गेल्या. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा अमेरिका चीन मधे युद्धसराव चालु होते. अमेरिकन यंत्रणांना या कार्गो चा सुगावा लागला आणि त्यांना चीन ला जाण्यापासुन रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ज्यावेळी विमान मलेशिया एअरझोन मधुन व्हिएतनाम च्या एअरझोन भागात ट्रान्स्फर होणार होते त्यावेळी (मधल्या नो मॅन्स लँड मधे) या विमानासोबत अमेरिकेची awacs (Airborne Warning And Control System) planes पण आकाशात होती.ही विमाने आकाशात टेहळणी आणि डीफेन्स साठी मिलिटरी तर्फे वापरली जातात. अमेरिकेच्या awacs planes नी MH370 चे सर्व कम्युनिकेशन्स बंद केले आणि कॅप्टन ला विमान लँड करायची आज्ञा दिली. पण कॅप्टन ने ऐकले नाही. त्यामुळे व्हिएतनाम एअरझोन मधे पोचायच्या आत शेवटचा पर्याय म्हणून हे विमान मिसाईल ने उडवण्यात आले असु शकते.
या सगळ्या थिअरीज मांडताना त्याच्या मागची कारणं/पुरावे दिले आहेत.
जे झाले असेल ते असेल पण सर्वात भयंकर हे आहे की MH370 चं जे काही झालं ते जगातील काही मोठ्या संघटना/शक्तींना, लोकांना माहिती आहे पण....
आपल्या प्रियजनांचे काय झाले हे त्यांच्या कुटुंबियांना अजुनही माहिती नाही.
सिरीज मधले कुटुंबियांचे फुटेज बघून जीव तुटतो आणि म्हणूनच सलग ही सीरिज मी बघूच शकले नाही.
प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो जसं मृत्यू हा माणसाच्या गोष्टीचा शेवट आहे पण आपली प्रिय व्यक्ती हवेत गायब झाली हा शेवट कोणीच मान्य करू शकत नाही.
अभ्यासपूर्ण आणि सर्व शक्यतांचा विचार करुन बनवलेली ही सिरीज ज्यांना ईंटरेस्ट असेल त्यांनी नक्की बघा.
विमानाचं काय झालं हा प्रश्ण आपल्यापुरता नक्की सुटेल.
-©️स्मिता श्रीपाद

*महिला दिन.... गाळलेल्या जागा*

 *महिला दिन.... गाळलेल्या जागा*

स्त्री मुक्तीची गीतं
तिचा आत्मसन्मान
तिची अस्मिता ....
इत्यादी इत्यादी
घरकाम सणवार पै पाहुणे
मुलांच्या क्लास शाळा
घरीच तर असतेस दिवसभर....
इत्यादी इत्यादी
समसमान हक्क, निर्णयस्वातंत्र्य
महिलांचा आदर सन्मान
गुलाब पुष्पगुच्छ....
इत्यादी इत्यादी
चारचौघात मस्करी, चेष्टा
कायम सेकंड प्रायोरिटी
शेवटची पंगत बायकांची....
इत्यादी इत्यादी
फेसबुक, व्हाट्सअँप, इंस्टाग्राम
शुभेच्छांचा पूर
जागतिक महिला दिन....
इत्यादी इत्यादी
ऑफिस मध्ये लेडी बॉस ? नको
प्रमोशन ? तिला नकोच
तिला काय कळतंय ?....
इत्यादी इत्यादी
ती दया क्षमा शांती
ती अन्नपूर्णा,लक्ष्मी, सरस्वती
ती दुर्गा काली रणचंडी ....
इत्यादी इत्यादी
ती सीता, द्रौपदी, निर्भया
ती मीरा, राधा, अनुसूया
ती गार्गी, मैत्रेयी, शकुंतला....
इत्यादी इत्यादी
'व्यक्ती' म्हणून आदर
भावनिक आणि शारीरिक सुरक्षितता
महिला दिन सुफळ संपूर्ण....
इत्यादी इत्यादी
©️स्मिता श्रीपाद
8 मार्च 2023

निळा तुकडा

 फेसबुक च्या जुन्या फोटो मधुन दिसणारा,

माझ्याच घराचा निळा तुकडा बघुन,
परत एकदा दिसायला लागलं,
सगळं लख्ख......तसंच्या तसं.......
जे जिथं सोडलंय,
ते अजुनही तिथेच आहे......
रात्री जागुन मारलेल्या गप्पा,
लटकी भांडणं आणि रुसवे फुगवे,
आरड्याओरड्याचे आवाज,
हास्यविनोदाचे फवारे,
खमंग थालिपीटाचे वास,
वाफाळलेला भात आणि गरम भाकरी
कपडे,खेळणी,पुस्तकांचा अद्रुश्य पसारा,
आईचा स्पर्श,
मनात खोल पुरुन ठेवलेल्या जखमा
आणि
चाफ्याचा वास.

हमे तो लूट लिया मिलके इष्क वालो ने....

 हमे तो लूट लिया मिलके इष्क वालो ने....

अगदी तंतोतंत...
शारुक खान वर इष्क करणाऱ्या लोकांनी पिच्चर भारी आहे, 'बॉयकट' गॅंग च ऐकू नका, नक्की बघा, बॉलिवूड ला वाचवा असा गेले काही दिवस दंगा चालवलाय त्यावर भरोसा ठेवून आज पठाण पहिला. अजून डोकं गरगरतय....
थिएटर मध्ये पोचलो तर आम्ही तीन च लोक होतो आणि राष्ट्रगीत सुरु झालं. कमी संख्येमुळे शो रद्द करतात कि कसं ते माहित नव्हतं पण तेवढ्यात अजून 8-10 जण आले आणि पठाण सुरु झाला.
लाहोर मध्ये डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये पेशंट आणि डॉक्टर एका भयंकर आजाराबद्दल एकमेकांशी बोलत असताना अचानक टीव्ही वर बातम्या लागतात आणि डॉक्टर पेशंट दोघेही महत्वाच्या आजारावरची चर्चा सोडून टीव्ही बघत बसतात.हा एक नावाचा प्रकार पहिला.म्हणजे आजकाल डॉक्टरांच्या कडे वेटिंग रूम मध्ये असतात टीव्ही पण डायरेक्ट आत कधी पहिला नव्हता पण हे तर काहीच नाही...
तो तपासून घेणारा मेजर जनरल प्रकारचा माणूस असतो आणि ती बातमी भारताने काहीतरी पाक विरुद्ध केलं अशा प्रकारची असते . मग तो डॉक्टर "भारताला सबक सिखवावंच लागेल" असं मेजर ला च सांगतो त्यावर तो मेजर तिकडूनच कोणा शैतानाला फोन करुन जागा हो म्हणून सांगतो पण हे तर काहीच नाही...
मग आपल्या मेंदू ला अजून व्यायाम देण्यासाठी 3 साल पेहेले, आज, 2 साल पेहेले, मग 2 साल पेहेले मध्ये पण अजून 4-5 साल पेहेले, मग परत आज असे फ्लॅशबॅक च फ्लॅशबॅक होतात(हे 'आज' चाललंय का जुनं आहे नीट बघून ठेवावं लागतं, पॉपकॉर्न खाताना स्क्रीनवर डाव्या कोपऱ्यात नीट लक्ष द्या) पण हे तर काहीच नाही...
मग अशाच आज किंवा काही साल पहेले मध्ये अफगाणिस्तान की कुठेतरी पठाण ची एन्ट्री होते. खरंतर त्याच्या कनपट्टीवर बंदुक ठेवून त्याला संपवणं पहिल्या 15 मिनिटातच राफा की राफे की राफ नावाच्या एका माणसाला सहज शक्य होतं. पण तो उगीच गप्पा मारत बसतो तोवर पठाण खुर्ची चे स्क्रू वगैरे काढून बंदूक उडवून ग्रँड एन्ट्री करतो.एकावेळी एकाच गुंडाने हल्ला करायचा असा पूर्ण चित्रपटात करार झाला असल्याने लाईन लावून ओळीने हल्ला करणाऱ्या सगळ्यांचा पठाण खातमा करतो आणि एक हेलिकॉप्टर 90 अंशाच्या कोनात उडवून पळून पण जातो पण हे तर काहीच नाही...
तिकडे दिल्लीत डिम्पल एका कुठल्याश्या महत्वाच्या स्पायगिरी करणाऱ्या संस्थेची मुख्य आहे.ती काहीतरी फुटकळ गप्पा मारून परत कितीतरी साल पेहेले काय घडलं ते सांगते. या इथे मी विचार करणं सोडून दिलं आणि "जे जे होईल ते ते पाहावे" असं म्हणत शांत चित्ताने पॉपकॉर्न कडे लक्ष केंद्रित केलं. मग मधेच पठाण दुबई दौरा करून येतो तेव्हा जॉन अब्राहम भारताच्या एका शास्त्रज्ञाला पळवतो. जॉन ची एन्ट्री बेस्ट आहे. मागे धूम धूम धूम आणि त्याचं सिग्नेचर music मला ऐकू आलं मनातल्या मनात.मग मध्येच रुबिना की रुबाई नावाने दीपिका ची एन्ट्री होते. ती आय एस आय एजन्ट असून तिच्या मागावर जाणे पठाण ला भाग आहे मग तिच्या आणि त्याच्या आणि आपल्या नशिबाने ते स्पेन मध्ये भेटतात.. तेच ते जगप्रसिद्ध गाणं गात.. पण हे तर काहीच नाही...
मग गाणं गाता गाता दीपिका पठाण ला परत एकदा जॉन च्या जाळ्यात अडकवते. जॉन हा खरंतर रॉ चा Ex एजन्ट आणि दीपिका आय एस आय ची Ex एजन्ट पण ज्याप्रकारे एकदा कंपनी सोडून गेलेले ex एम्प्लॉयी आपल्या जुन्या कंपनी बद्दल फारसं चांगलं बोलत नाहीत तसंच जॉन आणि डिप्स च पण रॉ आणि आय एस आय बद्दल मत बरं नाहीये त्यामुळे दोघेही शत्रुपक्षाला मिळतात.कोण कोणाचा शत्रू आणि कोण कोणाची संघटना ते काही वेळाने कळेनासं होतं त्यामुळे पहिल्या सीन मध्ये भेटलेला मेजर भारताचा शत्रू असं गणित मी मनात पकडलं आणि पुढचा चित्रपट जरा सोपा करायचा प्रयत्न केला पण हे काहीच नाही...
मग मधेच रक्तबीज नावाचा एक पदार्थ येतो म्हणजे साध्या भाषेत virus. आता कोविड मुळे सामान्य माणसाला एकंदरच व्हायरस, म्युटेशन, महामारी, वॅक्सीन ई चं इतकं ज्ञान असताना उगीच रक्तबीज असं म्हणून सस्पेन्स करायचं काही कारण नव्हतं पण मग जाऊदे झालं. तेवढंच काहीतरी भारदस्त प्लॉट बनवायचा दिग्दर्शकाचा प्रयत्न असं म्हणून सोडून देऊ.पण हे तर काहीच नाही...
तर ते रक्तबीज रशिया मध्ये एका फोडायला अत्यंत अवघड अशा लॉकर मध्ये आहे आणि पठाण च्या तेज दिमाग आणि दीपिका च्या साथीने पठाण ते मिळवतो (दीपिका तर जॉन सोबत होती मग पठाण सोबत कशी आली ? असे प्रश्न विचारू नका. सगळंच का मी सांगायचं. मग 100 कोटी कसे मिळवणार शारुक? ) पण मग बऱ्याच घटना घडून ते रक्तबीज जॉन च्या हाती पडतं आणि पठाण रशिया च्या हाती लागतो पण हे तर काहीच नाही...
मग पठाण ला वाचवायला येतो आपला भाईजान टायगर. ट्रेन मध्ये जबरदस्त मारामारी, समस्त साऊथ च्या दिग्दर्शकांना, रजनीकांत, प्रभास, आपला पुष्पराज सगळ्यांना कॉम्प्लेक्स येईल असे मारामारीचे प्रसंग घडतात. (कोण म्हणतं साऊथ च्या सिनेमांमुळे हिंदी चित्रपट सृष्टी धोक्यात आहे.. त्याने जाऊन बघा एकदा) अख्खा ग्रेनेड रेल्वे च्या डब्यात फुटतो पण भाईजान चा चौकड्या रुमाल जस्साच्या तस्सा, एक डाग नाही की सुरकुती नाही. पठाण आणि भाईजान हवापाण्याच्या गप्पा मारत रशियाच्या आर्मी ला धुवून काढतात, गुरुत्वाकर्षणाचे नियम धाब्यावर बसवून न्यूटन ला फेस आणतात, मधेच क्रोसिन पेनकिलर ची जाहिरात पण करतात. 'आता टायगर पठाण च्या मदतीला आला कि नई तसं पठाण पण टायगर च्या मदतीला ला आला पाहिजे बरका' असं साटंलोटं पण करतात.(येत्या ईद ला भाईजान च्या चित्रपटात पठाण असणार हे सिक्रेट सगळ्यांना सांगतात) पण हे तर काहीच नाही...
सगळे फ्लॅशबॅक एकदाचे संपून चित्रपट आजच्या जगात पोचतो तेव्हा आपण आता इथून बाहेर पडलं कि डायरेक्ट
मोक्ष प्राप्ती होऊ शकेल अशा लेव्हल ला पोचलेलो असतो.पण भोग अजून संपलेले नसतात. मग कधीतरी पळवलेल्या शास्त्रज्ञांनी म्यूटेत केलेला virus भारतावर सोडायची धमकी जॉन देतो. दीपिका ला उपरती होऊन ती पठाण आणि भारताला मदत करायला येते आणि परत एकदा भयंकर मारामारी होऊन एकदाचा चित्रपट संपतो. कष्टाने मिळवलेली virus ची बरणी कशी नष्ट केली ते दाखवतच नाहीत पण ते जाऊदेत.आता चित्रपट संपला या आनंदात आपण उठतो पण....शेवटी एक गाण्याचं शेपूट आहेच... आता पेशन्स संपलेले असतात त्यामुळे गाणं पूर्ण व्हायची वाट न बघता उरले सुरले बिचारे प्रेक्षक तडक घराचा रस्ता धरतात.
तरी बरं...रशिया चे लॉकर तोडायला मनी हाईस्ट चा प्रोफेसर आणला नाही किंवा virus म्यूटेट करण्यासाठी चीन ची मदत घेतलेली दाखवली नाही... आपण वाईटातून चांगलं शोधायचं... हे तर काहीच नाही 😀
- ©️स्मिता श्रीपाद

"Secret Ingredient"

 "Secret Ingredient"

गेल्या आठवड्यात माझी लेक शाळेच्या कुठल्यातरी उपक्रमाअंतर्गत गुरुद्वारा मध्ये गेली होती. संध्याकाळी घरी आल्यावर ती मला तिकडचे अनुभव सांगत होती. त्यांना तिथे 'लंगर' मध्ये जेवण पण होतं.तिथली दाटसर डाळ तिला खुप आवडली. या डाळीला "लंगरवाली दाल" म्हणतात असं कुठंतरी वाचलं होतं मी एकदा.
त्यामुळे कुठल्याही गुणी आईप्रमाणे आपल्या लेकराला आवडलेला पदार्थ लगेच इंटरनेट वर शोधायला मी सुरुवात केली.
रेसिपी शोधताना मला सुप्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार चा व्हिडीओ सापडला. त्याच्या मते, या दालची खास अशी काही रेसिपी नाही. पंजाब मधले शेतकरी आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा गुरूद्वारा मध्ये द्यायचे.त्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी एकत्र शिजवल्या जायच्या.कांदा, टोमॅटो आणि उपलब्ध असतील ते पंजाबी मसाले यात घातले जायचे आणि हजारो लोक लंगर मध्ये एकत्र बसून याचा आस्वाद घ्यायचे. तो पुढे असंही म्हणतो की एक खास वस्तू यात नक्की असते ती म्हणजे खूप सारं "प्रेम आणि श्रद्धा".
हे सगळं ऐकून मला श्री क्ष्रेत्र गोंदावले इथला सुरेख चवीचा आमटी-भात, सज्जनगड ची गव्हाची खीर, पावसच्या मठात खाल्लेली खिचडी आणि आवळ्याचं लोणचं, पाली गणपती च्या मंदीरातला साधासुधा पोळी-भाजी-भात-आमटी चा प्रसाद, आमच्या कालवडे गावात विठठल मंदीराच्या कलशारोहण सोहळ्याच्या वेळेला खाल्लेला प्रसादाचा शाक-भात असे बरेच प्रसाद आठवले. या पदार्थांची तुलना जगातल्या कुठल्याही महागड्या पदार्थासोबत होउ शकत नाही. गोंदावले, शेगाव इथे हजारो लोकांसाठी प्रचंड प्रमाणात असे पदार्थ रोज केले जातात. तिथे सुद्धा भाविकांनी दिलेला शिधा वापरुनच हे पदार्थ बनतात आणि अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे गेली अनेक वर्षे या ठिकाणी प्रसाद घेतो आहे पण तरी सुद्धा या पदार्थांची चव कधीही बदललेली नाही. नेहेमी अप्रतिमच असते. या प्रसादांची खास अशी काही रेसिपी नाही पण या सर्व पदार्थांना अवीट गोडी असते. याचं खरं कारण म्हणजे करणार्याच्या मनात देवासाठी प्रेमभाव आणि खाणार्याच्या मनात प्रसाद घेतोय ही श्रद्धा हेच असावं. गोंदावल्यात "जय जय श्रीराम जय जय श्रीराम" च्या जयघोषात साधा सुधा आमटी-भात खाताना "तॄप्त" म्हणजे नक्की कसं ते कळतं.
गोंदावले प्रसादाची माझी एक आठवण आहे.मधुजा च्या वेळी मला पाचवा महिना चालु होता आणि गोंदावल्याची आमटी भात आणि ताक खायची फार ईच्छा झाली होती.जायच्या आधी २-३ आठवडे मी आमटी-भात-ताक असं घोकत होते. पुण्यातुन सकाळी निघायला थोडा उशीर झाला. गोंदावल्याला पोचुन महाराजांचं दर्शन घेतलं आणि थेट प्रसाद घ्यायला निघालो.तिथे पोचतो तोवर भोजनगृहाचा दरवाजा बंद झाला होता. आम्हाला उशीर झाला होता.थोडे नाराज होउनच आम्ही परत फिरलो. माझ्यापेक्षा घरच्यांनाच जास्त वाईट वाटायला लागलं की मला आमटी भात खायला मिळणार नाही. १०-१५ पावलं चालतो तोच मागुन एका सेवेकर्यांनी आवाज दिला. प्रसादाला या पण फक्त आमटी-भात-ताक च मिळेल आता असं ते म्हणाले. आम्हाला अत्यानंद झाला. आत जाउन मनसोक्त आमटी-भात-ताक असं पोटभर जेवलो. खरंतर त्या दिवशी पोळी, शिरा, भाजी असे बाकीचे पण पदार्थ प्रसादाला होते पण "मला आमटी-भात-ताक खायचंय" असं गेले अनेक दिवस मी घोकत होते त्यामुळे महाराजांनी माझी इच्छा पुर्ण करुन फक्त तेवढेच पदार्थ दिले असं गमतीनं सगळ्यांनी चिडवलं.
माझ्या बहिणीकडे दरवर्षी श्री अक्कलकोट स्वामींच्या पादुका पुजनाचा कार्यक्रम असतो. त्यावेळी तिच्याकडे सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी मिळुन ५०-६० लोक महाप्रसादाला येतात. आमच्या केटरर मैत्रिणी माधुरी आणि पल्लवी कडुन दरवर्षी महाप्रसादाचा स्वयंपाक ऑर्डर केला जातो. आपलं साधच जेवण म्हणजे वरण-भात, भरलं वांग, एखादी उसळ, कोशिंबीर आणि बहिणीच्या सासुबाईंनी घरी केलेला प्रसादाचा शिरा. माधुरी-पल्लवी कडुन आम्ही वर्षभर काही ना काही कारणाने पदार्थ घेतच असतो पण स्वामींच्या पादुकापुजना दिवशी कांदा लसुण अजिबात न घातलेला हा स्वयंपाक आणि प्रसादाचा शिरा इतका अप्रतिम लागतो ना की बस रे बस. एरव्ही पण त्या दोघींच्या हातचे पदार्थ उत्तमच असतात पण त्या दिवशी केले जाणारे पदार्थ स्वामींच्या साठी आहेत या भावनेने असतात त्यामुळे कदाचित अजुनच प्रेमाने केले जात असतील हे नक्की आणि खाणार्याच्या मनात पण स्वामींचा प्रसाद आहे ही श्रद्धेची भावना अपोआप येतेच.
पण एखाद्या पदार्थांच्या चवीचा संबंध फक्त देवापाशी आहे असेच नव्हे तर सर्वांसोबत एकत्र मिळुन वाटुन खाण्यात पण तितकाच आनंद मिळतो.एरवी घरी ३-४ लोकांसाठी केलेले पोहे किंवा आमटीपेक्षा घरी चार पाहुणे आलेले असताना केलेले कढईभर पोहे किंवा आमटी जास्त चवदार लागते असा माझा अनुभव आहे.याचं कारण कदाचित सर्वांनी मिळुन गप्पा मारत ते पदार्थ खाल्ले जातात असं असावं.
खरंतर सर्वांनी मिळुन एकत्र जेवण करणे ही कल्पनाच सुंदर आहे.माझ्या मुलीला एखाद्या पंगतीतला वरणभात खूप आवडतो.लग्नाच्या कार्यालयातली पंगत असो किंवा अगदी घरातली सत्यनारायण पुजेतली असो, ती नेहेमी बाकी पदार्थ बाजुला ठेवुन भरपुर वरणभात खाते.तिच्या मते एरवी घरी केलेला वरण-भात पंगतीतल्या वरण भातासारखा लागत नाही.खरतर मला पण कधीकधी हे पटतं. घरच्या एखाद्या कार्यात पहिल्या २-३ पंगती वाढुन कडकडुन भुक लागली की मग शेवटच्या पंगतीला आपण बसतो तेव्हा वरण भाताचा पहिला घास मन आणि पोट तृप्त करतो. खरतर त्यात काहीच वेगळं नसतं. पण रोजच्यासाठी घरी केलं जाणारं थोडसं वरण आणि त्या दिवशीपुरतं घरात २५ माणसांसाठी केलं जाणारं वरण यात फरक चवीचा नाही तर भावनेचा आहे. सर्वांनी मिळुन एकत्र गप्पा मारत स्वयंपाक करणे आणि सर्वांनी मिळुन एकत्र खाणे यामुळेच वरण-भातासारखा साधासुधा पदार्थ पण उत्तम लागतो.आपल्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांसोबत गप्पा मारत एकत्र स्वयंपाक करताना अपोआप आपल्यातली सकारात्मक उर्जा आणि प्रेम एकत्र येउन त्या पदार्थाला गोडवा येत असेल.
आजकाल कुठलीही रेसिपी वाचताना किंवा बघताना शेफ चा एक लाडका शब्द असतो "secret ingredient". हे घातलं की पदार्थ खुपच भारी होतो आणि त्याला ऑथेंटीक का काय ती चव येते म्हणे.पण रणवीर ब्रार चं वाक्य ऐकुन एक गोष्ट लक्षात आली की आपल्या सगळ्या पाककॄती मधला सगळ्यात महत्वाचा secret ingredient म्हणजे प्रेम.असे प्रेमाने शिजलेले अन्न रोज आपल्याला खायला मिळो. बाकी अजुन काय पाहिजे नाही का ?
अन्नदाता, अन्नकर्ता, अन्नभोक्ता सुखी भव.
तळटीप - फोटो मधे दिसतेय ती लंगरवाली दाल. लेकीसाठी ही रेसिपी करुन पाहिली 🙂
या लेखाची आणि रेसिपीची प्रेरणा : माननीय शेफ रणवीर ब्रार 😉
-©️स्मिता श्रीपाद