Tuesday, July 22, 2025

ओपनहायमर...चेन रिअक्शन...

ओपनहायमर...चेन रिअक्शन...
10.9.8.7.6......पडद्यावर जगातल्या पहिल्या अणुबॉम्ब चाचणी साठी काऊंटडाऊन सुरु होतो... श्वास रोखून आपण खुर्चीत बसतो. डॉल्बी डिजिटल मुळे आता कानठळ्या बसणारा आवाज आणि हादरे ऐकायची मानसिक तयारी होते आणि अचानक पडद्यावर नुसताच आगीचा लोळ दिसतोय. लख्ख प्रकाश आणि आवाज गायब... ते दृश्य डोळे विस्फारून बघणारा ओपनहायमर आणि त्याचे साथीदार...त्याक्षणी ओपी ला गीता आठवते
Now I am become death…The destroyer of worlds…
काय वाटलं असेल त्याक्षणी त्याला ? काय केलंय हे आपण ? का केलंय ? त्याचा चेहेरा आणि डोळे बघून आपण पण एक क्षण थिजून जातो..आकाशातला आगीचा लोळ पडदा व्यापून घेतो आणि आपल्याला आपल्याच भावना समजून घेता येत नाहीयेत तोपर्यंत कानठळ्या बसणारा आवाज आणि हादरे जाणवतात.... अरेच्चा खरंच की ....प्रकाशाचा वेग ध्वनीपेक्षा जास्त...शाळेत शिकलेलं विज्ञान....
इतकं परिणामकारक चित्रण...
हा संहार समोर दिसतोय आणि लोक टाळ्या वाजवतात...
हिरोशिमा आणि नागासाकी साठी बॉम्ब रवाना होतात तेव्हा ओपनहायमर हताश नजरेने बघतोय... त्याच्या हातून सुटलंय सगळं आता... राजकारणी बघून घेतील इथून पुढे ....निदान मला एक फोन करून कळवा तरी... त्याची विनंती... 5 ऑगस्ट च्या रात्री तो झोपू शकत नाहीये... आणि त्याला कोणी काही कळवायचे कष्ट पण घेतले नाहीयेत.... कळतं ते थेट 16 तासांनी...थेट तो प्रसंग न दाखवता सुदधा ओपी च्या डोळ्यातून त्याची भयानकता पोचतेच.
हिरोशिमा आणि नागासाकी मध्ये लाखो लोक मेले आणि तरीही इथे अमेरिकेत लोक टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात... बुद्धीच्या पलीकडंच सगळं... ओपेनहायमर ला या 'विजयाचं' भाषण करता करता दिसणारा डोळे दिपवणारा प्रकाश... लोंबणारी त्वचा....विलाप करणारे लोक...
श्या यार... लिहिताच येत नाहीये मला आज काही सुसंगत...
ओपेनहायमर चे विस्फारलेले डोळे आणि त्याच्या चेहेऱ्यावर असलेले भाव....पूर्ण पडदा व्यापणारा तो अग्निकल्लोळ..मृत्यू चं विश्वरूपदर्शन बघून थिजलेले ते डोळे...
अर्जुनाचं असंच झालं असेल का ?...पण मग भगवान काय म्हणाले ?
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो
लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः।�ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे
येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः||
मी काळ आहे, विनाशाचा स्त्रोत....जगाचा नाश करण्यासाठी धारण केलेलं हे विश्वरूप....तु नसतास तरी काहीच अडलं नसतं...तुझ्या सहभागाशिवायही, काहीच अस्तित्वात राहणार नाही...
ओपी ने हे केलं नसतं तरी मृत्यू अटळ होताच का ?
प्रेसिडेंट ट्रुमन त्याला म्हणतात, बॉम्ब कोणी बनवला याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही... कोणी टाकला हेच ते बघतील...
तरीसुद्ध या नरसंहारासाठी त्याला असं वाटतंय की तो स्वतः च जबाबदार आहे...
पुढे त्याचा सिक्युरिटी क्लीअरन्स काढून घेणे आणि त्याला कम्युनिस्ट, रशियाधार्जिण ठरवणे, त्याच्यावरचा खटला असं बरंच काही अजून आहेच चित्रपटात.
किलियन मर्फी.... जबरदस्त अभिनय... दंडवत...
सिनेमात सतत येणारे वेगवेगळे आवाज... ओपनहायमार च्या स्वप्नांमधले आवाज, लाकडी पायऱ्यांवर वाजणाऱ्या बुटांचे आवाज, टाळ्यांचा आवाज, ट्रिनिटी टेस्ट नंतर चा कानठळ्या बसवणारा आवाज... जबरदस्त परिणाम करून जातात...
कृष्णधवल आणि रंगीत काळातल्या उड्या हळूहळू कळतात...अणुचाचणी च्या आधीचं जग रंगीत आणि आता सगळंच काळं पांढरं असं काही आहे का ? काय माहित. आपण लावू तो अर्थ....
अजून काही दिवस तरी चित्रपटाचा हँगओव्हर राहील असं वाटतंय. काही सुटलेल्या जागा, प्रसंग पुन्हा बघावे लागतील कदाचित...
ओपेनहायमार शेवटी म्हणतो तसं... चेन रिअक्शन सुरु झाली आहे...
ओपी, नोलान, गीता, कृष्ण, अर्जुन, काळ......विचारांची साखळी....चेन रिअक्शन....
-©️स्मिता श्रीपाद
30 जुलै 2023
10.9.8.7.6......पडद्यावर जगातल्या पहिल्या अणुबॉम्ब चाचणी साठी काऊंटडाऊन सुरु होतो... श्वास रोखून आपण खुर्चीत बसतो. डॉल्बी डिजिटल मुळे आता कानठळ्या बसणारा आवाज आणि हादरे ऐकायची मानसिक तयारी होते आणि अचानक पडद्यावर नुसताच आगीचा लोळ दिसतोय. लख्ख प्रकाश आणि आवाज गायब... ते दृश्य डोळे विस्फारून बघणारा ओपनहायमर आणि त्याचे साथीदार...त्याक्षणी ओपी ला गीता आठवते
Now I am become death…The destroyer of worlds…
काय वाटलं असेल त्याक्षणी त्याला ? काय केलंय हे आपण ? का केलंय ? त्याचा चेहेरा आणि डोळे बघून आपण पण एक क्षण थिजून जातो..आकाशातला आगीचा लोळ पडदा व्यापून घेतो आणि आपल्याला आपल्याच भावना समजून घेता येत नाहीयेत तोपर्यंत कानठळ्या बसणारा आवाज आणि हादरे जाणवतात.... अरेच्चा खरंच की ....प्रकाशाचा वेग ध्वनीपेक्षा जास्त...शाळेत शिकलेलं विज्ञान....
इतकं परिणामकारक चित्रण...
हा संहार समोर दिसतोय आणि लोक टाळ्या वाजवतात...
हिरोशिमा आणि नागासाकी साठी बॉम्ब रवाना होतात तेव्हा ओपनहायमर हताश नजरेने बघतोय... त्याच्या हातून सुटलंय सगळं आता... राजकारणी बघून घेतील इथून पुढे ....निदान मला एक फोन करून कळवा तरी... त्याची विनंती... 5 ऑगस्ट च्या रात्री तो झोपू शकत नाहीये... आणि त्याला कोणी काही कळवायचे कष्ट पण घेतले नाहीयेत.... कळतं ते थेट 16 तासांनी...थेट तो प्रसंग न दाखवता सुदधा ओपी च्या डोळ्यातून त्याची भयानकता पोचतेच.
हिरोशिमा आणि नागासाकी मध्ये लाखो लोक मेले आणि तरीही इथे अमेरिकेत लोक टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात... बुद्धीच्या पलीकडंच सगळं... ओपेनहायमर ला या 'विजयाचं' भाषण करता करता दिसणारा डोळे दिपवणारा प्रकाश... लोंबणारी त्वचा....विलाप करणारे लोक...
श्या यार... लिहिताच येत नाहीये मला आज काही सुसंगत...
ओपेनहायमर चे विस्फारलेले डोळे आणि त्याच्या चेहेऱ्यावर असलेले भाव....पूर्ण पडदा व्यापणारा तो अग्निकल्लोळ..मृत्यू चं विश्वरूपदर्शन बघून थिजलेले ते डोळे...
अर्जुनाचं असंच झालं असेल का ?...पण मग भगवान काय म्हणाले ?
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो
लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः।�ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे
येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः||
मी काळ आहे, विनाशाचा स्त्रोत....जगाचा नाश करण्यासाठी धारण केलेलं हे विश्वरूप....तु नसतास तरी काहीच अडलं नसतं...तुझ्या सहभागाशिवायही, काहीच अस्तित्वात राहणार नाही...
ओपी ने हे केलं नसतं तरी मृत्यू अटळ होताच का ?
प्रेसिडेंट ट्रुमन त्याला म्हणतात, बॉम्ब कोणी बनवला याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही... कोणी टाकला हेच ते बघतील...
तरीसुद्ध या नरसंहारासाठी त्याला असं वाटतंय की तो स्वतः च जबाबदार आहे...
पुढे त्याचा सिक्युरिटी क्लीअरन्स काढून घेणे आणि त्याला कम्युनिस्ट, रशियाधार्जिण ठरवणे, त्याच्यावरचा खटला असं बरंच काही अजून आहेच चित्रपटात.
किलियन मर्फी.... जबरदस्त अभिनय... दंडवत...
सिनेमात सतत येणारे वेगवेगळे आवाज... ओपनहायमार च्या स्वप्नांमधले आवाज, लाकडी पायऱ्यांवर वाजणाऱ्या बुटांचे आवाज, टाळ्यांचा आवाज, ट्रिनिटी टेस्ट नंतर चा कानठळ्या बसवणारा आवाज... जबरदस्त परिणाम करून जातात...
कृष्णधवल आणि रंगीत काळातल्या उड्या हळूहळू कळतात...अणुचाचणी च्या आधीचं जग रंगीत आणि आता सगळंच काळं पांढरं असं काही आहे का ? काय माहित. आपण लावू तो अर्थ....
अजून काही दिवस तरी चित्रपटाचा हँगओव्हर राहील असं वाटतंय. काही सुटलेल्या जागा, प्रसंग पुन्हा बघावे लागतील कदाचित...
ओपेनहायमार शेवटी म्हणतो तसं... चेन रिअक्शन सुरु झाली आहे...
ओपी, नोलान, गीता, कृष्ण, अर्जुन, काळ......विचारांची साखळी....चेन रिअक्शन....
-©️स्मिता श्रीपाद
30 जुलै 2023

बाईपण भारी ?

 बाईपण भारी ?

चिक्कार हाइप केलेला "बाईपण..." चित्रपट आज बघून आले. माझी जुनी कॉलेज मैत्रीण मिनल सोबत गेले होते. तिला आम्ही कॉलेज मध्ये असताना मिनल"भाई" म्हणायचो कारण ती एकदम टॉमबॉय होती. (अजूनही भाईसारखीच वागते जराजरा ) त्यामुळे तिच्यासोबत हा चित्रपट बघणं म्हणजे जरा गंमतच होती 😀. जाऊदे मुद्द्यावर येते.
तर गेले काही दिवस हा चित्रपट बघायला मस्त मोठा इव्हेंट करून, साड्या, नथी वगैरे घालून बायका जात आहेत. म्हणून शास्त्र पाळण्यासाठी आम्ही पण गेलो. ( मिनल ला रात्री मेसेज केला कि बाई गं जरा बायकांसारखे कपडे घालून ये नाहीतर तू एकदम ऑड मॅन आऊट दिसशील त्यावर तिचा 'उगाच काहीपण' असा शेरा आलाच 😜)
एवढी तयारी करून गेलो पण चित्रपट ठीकठाक च निघाला. म्हणजे पठाण सारखा पिसं काढण्याएवढा वाईट नाही (इच्छुकांनी पठाण ची जुनी पोस्ट शोधून लाभ घ्यावा). खूप काही क्रांतिकारी असायला पाहिजे होता अशीपण माझी अपेक्षा नाही पण मला वैयक्तिक पातळीवर हा चित्रपट रिलेट करताच नाही आला. माझं बाईपण कुठे सापडलंच नाही. वर्षानुवर्षे गैरसमज आणि इगो कुरवाळत बसणाऱ्या बहिणी माझ्या आजूबाजूला नाहीत म्हणून असेल कदाचित. चित्रपट प्रत्येक वेळी रिलेट व्हायलाच हवा असं नसतं खरंतर पण त्यातला एखादा मुद्दा तरी पटायला हवा. माझ्यासाठी यातलं सगळ्यात पटलेलं आणि आवडलेलं कॅरॅक्टर म्हणजे रोहिणी हट्टंगडी चा नवरा. बायको ला मानसिक त्रास आहे हे समजून उमजून, तिला न दुखावता, तिची मदत करायचा प्रयत्न करणारा, तिला कौन्सेलर कडे घेऊन जाणारा, तिची दुखरी नस म्हणजे तिची बहीण आहे हे बरोब्बर ओळखलेला. दुसरं त्यातल्या त्यात सहज आजूबाजूला दिसणारं पात्र म्हणजे पल्लवी. नवऱ्याने केलेली प्रतारणा तिला मान्य नाहीये, अजूनही धडपड चालू आहे तिची जुन्या गोष्टी सुरळीत व्हाव्यात म्हणून. केतकी आणि पल्लवी मधला या संदर्भातला प्रसंग मस्त. 'किती दिवस हात धरून ठेवशील सोडून दे' असं केतकी सांगते तेव्हा पल्लवी मधला बदल तिचं मोकळं होणं छान दाखवलंय.
बाकी चारू च 8-10 वर्षांच्या पोरांच्या वाढदिवसांमधलं भाषण, शशी चं स्टेशन वर बहिणीचा गळा धरणं असे प्रसंग म्हणजे अ आणि अ (अतर्क्य आणि अतिशयोक्ती).
सुकन्या चा अभिनय अप्रतिम. काय भाव बदलतात या बाईच्या चेहेऱ्यावरचे. मस्त. पण तिच्या घरातलं वातावरण आजकाल च्या काळात मी तरी बघितलं नाहीये.अजूनही असं घडत असेल तर हे भयंकर आहे.
कदाचित 20-25 वर्षांपूर्वी असं चित्र होतं का माहित नाही. कारण एका घरात अशा 6-7 बहिणी तेव्हा असायच्या. आता नसतात. असतील त्या 2-3 च आणि अगदी जिवाभावाच्या असतात. आपल्या बहिणीसाठी हळव्या असतात. भांडल्या तरी लगेच गळ्यात पडणाऱ्या असतात. निदान परमेश्वराच्या कृपेने मी तरी नशीबवान आहे या बाबतीत. माझी सख्खी बहीण तर माझा जीव आहेच पण माझ्या चुलत, मावस, आत्ये बहिणी सुद्धा अगदीच प्रेमळ आणि जीव लावणाऱ्या आहेत 🧿.
बाकी चित्रपटातली मंगळागौर, जुनी आणि नवी मस्त घेतली आहे.आवडली. 'उघड्या पुन्हा जहाल्या' अप्रतिम गायलंय. वंदना गुप्ते च्या साड्या आणि दीपा परब चे कुर्ते आवडले. चित्रपटाचा लूक फ्रेश आहे.
चित्रपट बघून बाहेर पडले तेव्हा दोन चित्रं दिसली. नऊवारी साडी नेसून अगदी वाकून चाललेल्या आजीबाई आपल्या जीन्स घातलेल्या नातीसोबत चित्रपटाला आलेली होती आणि तिथल्या एका लॉन वर वय वर्षे साधारण 20 ते 60 असा एक आजूबाजूची पर्वा न करता रील बनवणारा बायकांचा ग्रुप. मला आतल्या पेक्षा हे बाहेर दिसलेलं बाईपण जास्त आवडलं. माझ्या आणि प्रत्येकीच्या आयुष्यात असा मोकळेपणा असावा ही मनापासून प्रार्थना.
तर सांगायचा मुद्दा हा कि मला हा चित्रपट रिलेट करता आला नाही म्हणून विशेष आवडला नाही. तुमचं तुम्ही बघा आणि ठरवा.
- ©️स्मिता श्रीपाद

कुमाऊंच्या प्रदेशात - 6...समारोप

 कुमाऊंच्या प्रदेशात - 6...समारोप

(कुमांऊ भटकंती चा समारोप करायला यावेळी काही ना काही कारणाने वेळ लागला त्यामुळे क्षमस्व. आज मुहूर्त मिळालाय त्यामुळे शेवटचा भाग लिहितेय.)
जंगलाची शांतता रात्रभर मनात झिरपत राहिली त्यामुळे झोप पण मस्त झाली. सकाळी लवकर चेक आऊट करून दिल्लीच्या दिशेने निघालो. मुंबईकरांचं विमान 8 वाजता आणि आमचं 9 वाजता होतं.दिल्ली च्या ट्राफिक पासून सुटका करून घेत वेळेत विमानतळावर पोचलो. परत एकदा सगळ्यांचा निरोप घेतला.
दिल्ली ट्राफिक च्या भीतीने खुप लवकर निघालो होतो त्यामुळे खूपच लवकर विमानतळावर पोचलो होतो. बॅग्स चेक-इन करायला गेलो तेव्हा एक गम्मतच झाली. आम्ही नैनिताल मध्ये पावसासाठी एक फोल्डिंग न होणारी सप्तरंगी छत्री घेतली होती. ती कोणत्याच बॅग मध्ये बसेना.चेक-इन काउंटर वर ती छत्री केबिन मध्ये नेऊ शकतो कि नाही यावर एक प्रदीर्ध चर्चासत्र पार पडलं.तिथल्या कोणालाच आजवर बहुतेक असे प्रवासी भेटलेले नसावेत. काउंटर स्टाफ ने आपल्या सिनिअर ना फोनाफोनी करायला सुरुवात केली. तोवर मागे लाईन वाढून लोक वैतागले.अखेर वरून निर्णय मिळाला आणि आमची ती मौल्यवान छत्री चेक-इन च्या सामानात पोचली. विस्तारा चा स्टाफ, आणि आमच्या मागे उभ्या समस्त जनतेने सुटकेचा निश्वास टाकला असावा 😜.
ठरलेल्या वेळी विमान उडालं आणि (छत्रीसह) आम्ही पुणे मुक्कामी पोचलो.
पहिल्यांदाच अशा एखाद्या कंपनी सोबत ग्रुप टूर ला गेलो होतो.ग्रुप टूर चे फायदे तोटे सगळे अनुभवून झाले. पण एकंदरीतच "साखरेची साल काढत बसायचं नाही" हे माझ्या सासर्यांचं लाडकं वाक्य मला अतिशय आवडतं आणि ते लक्षात ठेवलं कि वाईट गोष्टी जास्त वेळ लक्षात राहत नाहीत हे मी अनुभवलंय. त्यामुळे आत्ता याक्षणी ट्रिप मधले चांगले क्षण च लक्षात आहेत. अनुभवी, कायम मदतीला तत्पर टूर लीडर, आरामदायक बस, व्यवस्थित प्लॅन केलेली इटिनेररी, मस्त सहप्रवासी आणि उत्कृष्ट जेवण असा एकंदरीत छान अनुभव मिळाला.
(न आवडलेल्या गोष्टी थेट केसरी ला लिहून पाठवल्या आहेत त्यामुळे त्या इथे सांगत बसायची गरज वाटत नाहीये 😂)
जेवणाबद्दल स्वतंत्र लिहीन असं पहिल्या भागात म्हणाले होते. तर आता थोडं त्याबद्दल. आपण जिथे जाऊ तिथलं जेवण जेवून बघायला हवं असं पूर्वी मला वाटायचं. कश्मीर ला गेलो तेव्हा पहिले दोन दिवस तिथलं जेवण बरं वाटलं. नवेनवे प्रयोग केले पोटावर.पण नंतर नंतर तिथले वास, चवी नकोशा वाटायला लागल्या.आपल्या ओळखीचं काहीतरी खायला मिळावं असं वाटायला लागलं. नवीन ठिकाणी आणि लांबच्या प्रवासात अनोळखी चवी पोटाला झेपतीलच असं नाही.
यावेळी केसरी चा स्वतः चा शेफ सोबत होता त्यामुळे दिवसभर फिरून संध्याकाळी दमून जेव्हा आपण हॉटेल वर पोचतो तेव्हा आपल्या साधारण ओळखीचं आणि सवयीचं जेवण मिळालं कि पोट आणि मन दोन्ही तृप्त होतं असा अनुभव आला.त्यांच्या बुफे मध्ये शेव टोमॅटो भाजी, पालक पनीर असे आमच्या ओळखीचे पदार्थ असायचेच शिवाय तिथले काही खास लोकल पदार्थ जसं कि पहाडी रायता, त्यांची स्पेशल पहाडी आलू भाजी असे पण पदार्थ खायला मिळाले. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे नैनिताल मध्ये रोज रात्री गरमागरम फुलके मिळाले.दुपारचं जेवण बाहेर पहाडी पद्धतीचं आणि रात्री शेफ च्या हातचं. याशिवाय बसमध्ये बसलं कि रोज एक कोरड्या खाऊ चा पुडा, ड्राय फ्रुट्स, चिप्स असं रोज काही ना काही असायचंच. दिवसभर फिरताना जेवण सोडून अधेमधे भेळ, मोमोज, शिकंजी असे काही ना काही केसरी च्या भाषेत extra toppings पण असायचे. एकूणच खाण्यापिण्याची चंगळ होती.
अजून एक नवा अनुभव गाठीशी मिळाला. काही नवीन मित्रमंडळी भेटली.सुंदर आठवणी जमा केल्या.या सगळ्या लेखांच्या निमित्ताने परत एकदा फिरून आले.आता पुढचं लिखाण लवकरच करायला मिळो 😜.
तोवर... इति लेखनसीमा
-©️स्मिता श्रीपाद

कुमाऊंच्या प्रदेशात - 5....वाघोबा वाघोबा काय म्हणता

 कुमाऊंच्या प्रदेशात - 5....वाघोबा वाघोबा काय म्हणता

आज एकदम निवांत वेळ होता पण तरीसुद्धा 6 लाच जाग आली. बाहेर बाल्कनी मध्ये येऊन बसले. मोराच्या ओरडण्याचा कुठेतरी आसपास आवाज येत होता.असंख्य वेगवेगळ्या पक्षांचे आवाज येत होते. खरंतर हे हॉटेल अगदी ऐन जंगलात नव्हतं तरीसुद्धा खूप खूप शांतता होती.काल मुख्य रस्ता सोडून आत वळलो तेव्हा उंचच उंच झाडांचं जंगल वाटेत लागलं होतं. आत शिरल्या शिरल्या उजवी कडे मोराने दर्शन दिलं होतं आणि त्यानंतर लगेच एक हरीण सुद्धा. 'या या ,जंगलात स्वागत आहे' असंच जणू म्हणत असावेत दोघे.आता आज कोण कोण भेटतंय बघूयात असा विचार आला डोक्यात.
हळूहळू आजूबाजूला हालचाल सुरु झाली. निवांत गप्पा मारत नाश्ता केला. आज मनुची तब्बेत जरा नरम वाटत होती. तिला पहाटे थोडा पित्ताचा त्रास झाला होता.त्यामुळे औषध खाऊन ती परत झोपून गेली.मी, मंजिरी आणि शुभांगी खालीच लॉन वर गप्पा मारत बसलो. आवरून जेवण करून 2 ला तयार राहायला सांगितलं. आम्हाला घ्यायला जिप्सी इथेच येणार होत्या.
ठरल्याप्रमाणे आवरून जेवायला गेलो तोवर गेट बाहेर जिप्सी येऊन थांबल्या होत्या. जिप्सी बुकिंग चे काटेकोर नियम आहेत. जसे स्लॉट्स मिळाले आहेत तसेच आणि त्याच जिप्सी मध्ये बसावं लागतं. आपले आयडी वगैरे व्यवस्थित तपासून च आत सोडतात. एका जिप्सी मध्ये 6 च लोक बसू शकतात. जंगलाच्या गेट जवळ गाईड भेटतो.
हॉटेल पासून आम्हाला मिळालेल्या गर्जिया गेट चं अंतर 10-12 किलोमीटर असेल. जिप्सी सोबत जोरदार फोटोसेशन केलं.'गणपती बाप्पा मोरया' सोबतच आज 'वाघोबा महाराज कि जय' अशा आरोळ्या देत आमच्या चार जीप्स सफारी साठी बाहेर पडल्या. वाघोबा महाराज प्रसन्न व्हावेत अशी सगळ्यांचीच इच्छा होती. ओपन जीप राईड मस्तच होती.
जंगलात गेलं कि तिथली एक भाषा असते. जी आपोआप यायला लागते. वाघ दिसला नाही म्हणायचं 'वाघाचं सायटींग झालं' म्हणायचं. माकडं किंवा सांबर ओरडले असं नाही म्हणायचं तर 'माकडाने कॉल दिला' असं म्हणायचं.सुळेवाल्या हत्तीला टस्कर म्हणायचं, हरणाला स्पॉटेड डिअर असं म्हणायचं. आणि सगळ्यात महत्वाचं.वाघाला वाघ नाही म्हणायचं 'बिग कॅट' म्हणायचं 😂. जसजसं जंगलात जाऊ तसं हि भाषा कळायला लागते 😜
मग परत घरी येऊन मित्रमंडळींना जंगलच्या गमती जमती सांगताना असे शब्द वापरले कि आपण आपलं सगळं आयुष्य मोगली सारखं जंगलात काढलंय कि काय असं त्यांना वाटलं पाहिजे 😜. (माझा शत्रुपक्ष: शिकारी आठवलाच पाहिजे ऐकणाऱ्याला. माफ करा पु.ल.)
असो. मुद्द्यावर येते.
अर्ध्या तासात गेटवर पोचलो. तिथे तपासण्या होऊन आम्हाला एक गाईड मिळाला. हे ड्राइवर आणि गाईड गेली अनेक वर्ष जंगलाचे सोबती असतात. त्यांना प्रत्येक वळण, प्रत्येक झाड पाठ असतं. जीप दाट जंगलात शिरली. आजूबाजूला उंचच उंच सागवानाची झाड दिसायला लागली.ऐन उन्हाळ्यात दुपारी 2:30-3 वाजता तिथे उन्हाचा पत्ता नव्हताच उलट मस्त गारवा होता. आणि सोबत होती जंगलातली सुंदर शांतता. आमची जंगलात जायची हि पहिलीच वेळ. पहिल्या साडेतीन मिनिटात मी या जंगलाच्या प्रेमात पडले. तिथे येणारा सुक्या पानांचा, झाडांचा, जंगलाचा तो खास वास, पक्षांचे आवाज, हलकं वारं आलं कि झाडाच्या पानांची सळसळ. आत्ता याक्षणी सगळं जग फ्रीज व्हावं असं वाटत होतं. आमच्या गाड्यांचे आवाज होते पण त्या धुळ-मातीच्या रस्त्यावर ते कर्कश्श वाटत नव्हते. आमचे गाईड कैलास एकदम हळूहळू आवाजात काहीकाही माहिती सांगत होते. पण खरंतर मला त्या क्षणी कोणी काहीच सांगू नये आणि कोणी काहीच बोलू नये असं वाटत होतं.मी आपली (कधी नव्हे ती) शांत बसून जमेल तितकं जंगल अनुभवायचा प्रयत्न करत होते.
थोडं पुढे गेल्यावर एका अर्धवट तुटलेल्या झाडाच्या खोबणीत एक घुबड दिसलं. हातात दुर्बीण नव्हती त्यामुळे खूप स्पष्ट दिसलं नाही पण तरी थेट डोळ्यांनी नीट दिसत होतं. पुढे जाऊन एका पाणवठ्याजवळ सगळ्या जीप्स थांबलेल्या दिसल्या. उन्हाळा असल्यामुळे तिकडे वाघ साहेब नेहेमी येतात म्हणे. सुमारे 10-15 मिनिट थांबल्यावर पुढे निघालो. असंख्य नवीन नवीन प्रकारचे पक्षी आजूबाजूला दिसत होते. एका ठिकाणी गाडी थांबवून एका झाडावर ओरखडे काढलेले गाईड नि दाखवले. कोणा वाघानं आपली टेरिटरी ठरवण्यासाठी या खुणा केल्या होत्या.थोडक्यात या भागाच्या सात-बारा वर वाघानं आपलं नाव चढवलं होतं.त्या खुणा इतक्या उंचीवर होत्या म्हणजे वाघ किती मोठा असेल असं वाटून गेलं. वाघाचा तो सात-बारा बघून पुढे झालो.
एका वळणावर गाईड ने गाडी थांबवायला सांगितली. त्याला सांबरचा कॉल ऐकू आला होता म्हणे. आम्हाला काहीच लक्षात आलं नाही. गाईड पुढच्या सीट वर उभं राहून पूर्ण एकाग्र होऊन ऐकत होता. परत एकदा एक वेगळाच आवाज आला तसं ड्रायवर आणि गाईड न गाडी एका रस्त्याला घातली. शुभांगी आणि मंजिरी ची जिप्सी तिथे होती आणि त्यांनी दबक्या आवाजात 'वाघ' असं म्हणून एका दिशेला बोट दाखवलं. (मघाशी आलेला वेगळा आवाज त्यांच्या जिप्सी च्या गाईड ने बाकीच्यांसाठी दिलेला कॉल होता हे नंतर कळलं ) समोर गवतात एक वाकडं वाढलेलं झाड होतं. त्याच्या बुंध्याखाली वाघोबा होते(म्हणे). गाईड ने दिशा दाखवून सुदधा मला तिथे पिवळ्या गवताशिवाय काहीच दिसेना. जिप्सी च्या सीटवर उभं राहून सुद्धा. कैलास कडे असलेली दुर्बीण त्याने हातात दिली आणि परत बघायला सांगितलं. आता अर्जुनाप्रमाणे झाडाच्या तिरक्या बुंध्याकडे लक्ष केंद्रित केलं आणि तेवढ्यात काहीतरी हाललं. बाब्बो. वाघाचे कान होते ते. आत्ता मला तो बसलेली जागा नीटच कळली. त्या पिवळ्या जर्द गवतात तो वाघ इतका बेमालूमपणे एकरूप झाला होता कि कोणी सांगितलं नसतं तर कळलं पण नसतं कि तिथे वाघ आहे.
एव्हाना तिथे अजून 7-8 जिप्सी पोचल्या. वाघ आमच्या पासून मोजून 10-12 फुटांवर होता आणि निवांत बसला होता. इतके लांबून लांबून आलेले बिचारे लोक त्याला बघायला जीवाचं रान करतायत तर याला काही पडलेली नव्हती. गाईड म्हणाला कि वाघ खूप आळशी असतात आणि खाऊ पिऊ झालं असेल तर एका जागेवरून 8-10 तास सुद्धा उठत नाहीत. झालं. मनात म्हणलं कि बहुतेक फक्त कान बघून समाधान मानावं लागणार. अजून 5-7 मिनिटे अशीच गेली. पण आमचं नशीब बहुदा जोरावर होतं. गवतात काहीतरी हललं आणि एक पिवळा पट्टा उठून उभा राहिला. व्यवस्थित स्पष्ट अख्खा वाघ दिसला.वरती लहान टेकडीच्या दिशेने त्याला जाताना याची देही याची डोळा पाहिलं. आता परत सगळ्या जिप्सी घाई करून टेकडीच्या विरुद्ध दिशेला जायला निघाल्या. तिकडून उतरताना वाघ परत दिसेल म्हणून. आम्ही सुद्धा तिकडे जाऊन थांबलो. 10 मिनिटे झाली तरी काही हालचाल दिसेना. गाईड म्हणाला आपण इथे असे अजून कितीही थांबू पण वाघाचा भरोसा नाही. तुम्हाला चालणार असेल तर आपण अजून दुसरी वाट पकडू आणि मी तुम्हाला अजून काही दाखवू शकेन. खरंतर एका सफरीत वाघ दिसेल अशी अजिबात अपेक्षा केली नसताना तो दिसला होता. त्यामुळे आता अजून मोह न करता जंगल बघू म्हणून पुढे निघालो.
हा वाघ कोणा 'नाककटी' नावाच्या वाघिणीचा बच्चा होता अशी माहिती ड्राइवर ने पुरवली.बच्चा एवढा मोठा तर वाघ अजून किती मोठा असेल.पुढच्या एका वळणावर सांबर दिसलं. मघाशी यानेच कॉल दिला असावा असं गाईड म्हणाले. अजून थोडं पुढे गेलो तर कान टवकारून आमच्या कडे एकटक बघणारी हरणं दिसली. रानडुक्कर फॅमिली रस्ता क्रॉस करताना दिसली. अनेक सुंदर पक्षी बघितले. तेंदू पत्ता ची पानं आणि फळं पाहिली.वडाच्या पारंब्यांनी केलेली कमान, मधमाशांच्या पोळ्यांनी भरलेलं झाड अशा खूप गमतीजमती पाहिल्या. आता गाडी एका सपाट गवताळ जागेवर पोचली. तिथं अक्षरश: शेकडो हरणं दिसली.(तिथेच हत्तीचं कुटुंब पण होतं असं आम्हाला हॉटेल वर पोचल्यावर कळलं. आम्हाला ते दिसलं नाही पण त्यांनी आम्हाला नक्की पाहिलं असणार आहे. कोणीतरी कोणालातरी पाहिलं हे महत्वाचं नाही का 😀) एव्हाना सफारी संपत आली होती. निसर्गानं भरभरून आनंद दिला होता. आणि वाघ दिसल्यामुळे तो द्विगुणित झाला होता.
या दोन तासात इतकंच कळलं कि जंगल म्हणजे खरंतर फक्त वाघ नसतोच. झाडांचे हिरवे वास, पक्षांचे आवाज, पानांची सळसळ, धुळीचे रस्ते, रोज प्राण्यांची तहान भागवणारे पाणवठे, हिरवाईच्या हजारो छटा, झाडं, झुडुपं, वेली, मुंगीपासून ते हत्तीपर्यंत एकमेकांवर अवलंबून असणारे प्राणी हे सगळं म्हणजे जंगल. "जीवो जीवस्य जीवनम्" हे नुसतं इतके वर्ष पुस्तकात वाचलं होतं पण या ओळींचं जिवंत रूप म्हणजे जंगल. वाघ हा त्यातला महत्वाचा भाग असं कसं म्हणायचं ? कारण या साखळीतले बाकी काही प्राणी नसतील तर वाघाचं काय होईल ? जंगलातले दोन तास भुर्रकन उडून गेले. परत नक्की भेटायचंच असं मनाशी पक्कं केलं आणि तृप्त मनानं तिथून बाहेर पडलो.
कालचा दिवस वैतागाचा होता तर आजचा समाधानाचा.नित्य नवा दिवस नित्य नवा अनुभव. आज ट्रिप ची शेवटची रात्र. उद्या निरोप घ्यायचा होता.आज केसरी तर्फे “गिटार शो” होता. बुद्ध पौर्णिमेचा चंद्र, जंगलाचा सुरेख अनुभव आणि समोर कराओके वर एक स्थानिक कलाकार जुनी हिंदी गाणी गात होते. कराओके वर आम्ही सुद्धा जरा घसे मोकळे करून घेतले. शेवटी आपल्या महाराष्ट्र राज्याचं नृत्यगीत सैराट वर नाचून घेतलं. 10 वाजता कार्यक्रम संपवावा लागला तेव्हा लक्षात आलं कि त्या माणसाने गिटार आणून नुसतीच बाजूला 'शो' म्हणून उभी केली होती. गाणी तर सगळी कराओके वर गायली.(त्यातली अर्धी आम्हीच गायली 😜). पण एकंदरीत मजा आली. जेवण करून रूम वर जाऊन सामान बांधलं. उद्या परतीचा प्रवास असणार होता.
-©️स्मिता श्रीपाद

कुमाऊंच्या प्रदेशात - 4...कॉर्बेट च्या दिशेने

 कुमाऊंच्या प्रदेशात - 4...कॉर्बेट च्या दिशेने

आज नैनिताल ला निरोप द्यायचा होता. सामान बांधाबांध करून हॉटेलचा आणि शेफ साहेबांचा निरोप घेतला.आज नैनिताल मधले उरलेले काही तलाव आणि मंदिरे बघत संध्याकाळ पर्यंत कॉर्बेट मध्ये पोचायचे होते.आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आज खरेदी चा दिवस होता.त्यामुळे समस्त महिला मंडळ जरा जास्तच उत्साहात होतं.
सकाळी बाहेर पडल्या पडल्या पहिल्यांदा घोडाकाल उर्फ गोलू बाबा मंदिरात गेलो. एक उंच डोंगरावर थोड्या पायऱ्या चढून गेलं कि हे मंदिर होतं.वरून आजूबाजूला विस्तीर्ण पसरलेली पर्वतरांग दिसत होती. घोडकाल म्हणजे शंकराचा अवतार असलेलं हे मंदिर होतं.पण इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे बांधलेल्या अक्षरश: लाखो लहान मोठ्या घंटा.परवा नैना देवी मंदिरात एका कोपऱ्यात लहान मोठ्या घंटा बांधलेल्या दिसल्या. इथली नवस मागायची/ फेडायची पद्धत असेल असं वाटलं होतं. इथे गोलू बाबा मंदिर तर आख्ख घंटांनी भरलं होतं. अगदी चिमुकल्या घंटेपासून ते कित्येक टन वजनाच्या महाकाय घंटेपर्यंत विविध आकाराच्या घंटा मंदिर परिसरात बांधलेल्या दिसल्या.खाली पार्किंग जवळ दुकानात या घंटा विकायला होत्या.
इथे येऊन देवाकडं मागणं मागायचं आणि मग ती इच्छा पूर्ण झाली कि येऊन घंटा बांधायची अशी इथली रीत आहे म्हणे. देवावर भरोसा ठेवून मनातली इच्छा पूर्ण होणारच असा विश्वास ठेवून घंटा बांधली तरी चालते असं पण कळलं.दुसरा पर्याय निवडायला सोपा होता.इथे अजून एक गंमत म्हणजे लोकांनी देवासाठी पत्रं लिहून घंटेसोबत बांधली होती.आपली सगळी गाऱ्हाणी थेट देवाला लिहून पाठवायची पद्धत किती गोड आहे. खरंतर ती खूप वैयक्तिक पत्रं होती पण तरी रांगेतून जाताना काही ओळी नजरेस पडल्या. "भावाचं लग्न लवकर होऊदेत" पासून ते "कर्ज फिटूदेत" पर्यंत असा काहीबाही मजकूर नजरेस पडला. काही घंटांसोबत चक्क स्टॅम्प पेपर अडकवले होते. बँकेच्या पैसे भरलेल्या/काढलेल्या पावत्या पण होत्या.या भाबड्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊदेत अशी देवाला प्रार्थना केली. परमेश्वरानं आधीच उदंड दिलंय त्याबद्दल कृतज्ञता म्हणून आम्ही पण आमच्या तर्फे काही घंटा बांधल्या.
तिथून बाहेर पडून आता सर्वात महत्वाचं काम करायचं होतं ते म्हणजे खरेदी. उत्तराखंड एम्पोरियम च्या दुकानात गाडी शिरली. "अर्ध्या तासात खरेदी करून बाहेर या" असं अभिषेक ने सांगितलं त्यातला पहिला शब्द या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिला 😜. दुकानात खास त्या भागात मिळणाऱ्या विविध साड्यांचे प्रकार होते. या सगळ्या ऑरगॅनिक साड्या होत्या म्हणे.(आजकाल सगळं ऑरगॅनिक मिळतं) बांबू, बिच्छू काटा नावाची वनस्पती अजून बरीच नावं घेतली पण आता लक्षात नाहीत. तिथे आम्ही 10 बायकांनी मोजून 45 मिनिटात साड्या, चपला, ओढण्या, रजया, मेणबत्त्या अशी खरेदी उरकण्याचा विक्रम प्रस्थापित केला. लिम्का किंवा गिनीज बुक मध्ये कोणाची ओळख असेल तर मला कळवा😀.
खरेदी झाल्यावर नौकुचियाताल इथं बोटिंग साठी पोचलो. या तलावाला 9 कोन आहेत म्हणे. 9 राण्या असणाऱ्या कोणा राजानं हा तलाव बांधला. इथे फिरताना ज्याला 9 कोन मोजता येतील त्याला 9 राण्या मिळू शकतात. बघा बुवा कोण शोधून दाखवतं असं आव्हान अभिषेक ने केलं. एकुलत्या एक बायकोने नुकताच इतका खिसा रिकामा केलाय. 9 बायकांना कोण सांभाळेल ? असं म्हणत समस्त पुरुषवर्गाने लढाईच्या आधीच तालावर टाकली. तलावात फिरताना आजूबाजूला सुंदर हिरवेगार डोंगर दिसत होते. उन्ह असलं तरी हवा गार होती. नैनिताल पेक्षा इथे बोटिंग ला जास्त मजा आली. ते कोन वगैरे मोजायचं राहूनच गेलं 😂. किनाऱ्याकडे परत येताना काही लोक कायाकिंग करताना दिसले. मधुजा आणि श्री परत एकदा बोटी घेऊन कायाकिंग करायला पाण्यात शिरले. बोटिंगचा मनसोक्त आनंद घेऊन आता जेवायला पोचलो.
जेवण करून आता थेट कॉर्बेट गाठायचं होतं.जेवायला थांबलो तिथे नीलमोहोराची खूप झाडं दिसली. आपल्याकडे गुलमोहोर दिसतो पण नीलमोहोर दुर्मिळ. उन्हात फुललेला तो निळा जांभळा मोहोर सुंदर दिसत होता. आता जेवण करून गाडीत मस्त ताणून देणे असा पुढचा प्लॅन होता. पण सगळंच प्लॅन के मुताबिक होत नसता ना राव.जेवण होता होता केसरी च्या व्हाट्स अप ग्रुप वर एक बॉम्ब येऊन पडला होता.
आमची परतीची तिकिटं गो एअर ची होती आणि त्यांची काही भानगड झाल्यामुळे ती सगळी तिकिटं रद्द झाली होती. त्यामुळे आता पुण्याला परत जातानाची तिकिट्स आमची आम्ही काढावी किंवा केसरी कडून काढून घेण्यासाठी त्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागतील असं केसरी ने कळवलं होतं. आमचं केसरी बुकिंग विमान तिकीटासह होतं म्हणजे खरंतर आम्ही सगळे पैसे खूप आधीच त्यांना दिलेले होते. आता हा वरचा अजून खर्च करणं म्हणजे खिशाला चांगलाच मोठा फटका होता. GoAir कडून रिफंड मिळेल तेव्हा आम्हाला ते तिकिटांचे पैसे परत मिळतील असं सांगण्यात आलं. पण ती रक्कम आत्ता भराव्या लागणाऱ्या रकमेपेक्षा कमी होती त्यामुळे असं ना तसं आर्थिक नुकसान होतंच. हि सगळी चर्चा गाडीत सुरु झाली आणि सगळ्यांची झोप उडाली. केसरी ऑफिस ला फोनाफोनी करूनही त्यातून फार काही साध्य झालं नाही. स्वतः तिकीट काढायला गेलो तर ती रक्कम खूपच मोठी होती. त्यामानाने केसरी ने आधीच ब्लॉक करून ठेवलेली तिकिट्स खरेदी करून 'तुका म्हणे त्यातल्या त्यात' खिशाला थोडा कमी खड्डा पडून नवीन तिकिटं बुक केली.(केसरी कडून मिळणाऱ्या रिफंड ची अजून वाट पाहत आहोत) इतके दिवस सुंदर सर्व्हिस मिळाली म्हणून आम्ही खुश होतो पण यामुळे नाण्याची दुसरी बाजू पण कळली.आता जे झालं ते झालं. उरलेली ट्रिप तरी एन्जॉय करू असं ठरवलं.
या सगळ्या गोंधळात पुणेकरांच्या दुपारच्या झोपा बुडाल्या. मुंबईकर दुपारी झोपत नसल्यामुळे त्यांना बहुदा फार फरक पडला नसावा. जिम कॉर्बेट जंगलातल्या आमच्या हॉटेल मध्ये पोचलो तेव्हा 6 वाजले होते. जंगलाच्या outer zone मध्ये हे हॉटेल होते. आमची सफारी उद्या दुपारी 2 ला असणार होती त्यामुळे आज जागरण आणि उद्या उशिरा उठायला फुल परमिशन मिळाली. शिवाय तिथे एक मस्त स्विमिन्ग पूल होता त्यामुळे समस्त बच्चे कंपनी पाण्यात शिरली. उद्या पौर्णिमा असल्याने आकाशात सुरेख चंद्र दिसत होता. त्यामुळे जेवण करून निवांत गप्पा मारत बसलो. चर्चेला खमंग विषय होताच 😀. झोप आल्यावर शेवटी रूममध्ये येऊन झोपून गेलो.आजचा दिवस वादळी होता. आता उद्या काय? वाघ दिसणार का ?
©️स्मिता श्रीपाद

कुमाऊंच्या प्रदेशात -3...लष्करी शिस्तीचं रानीखेत

 कुमाऊंच्या प्रदेशात -3...लष्करी शिस्तीचं रानीखेत

काल सगळे ऋतू एकाच दिवसात अनुभवल्यावर आज सकाळी अगदी लख्ख उन्ह आणि स्वच्छ आकाश दिसलं. परत एकदा नवीन उत्साहाने बाहेर पडलो. आज आधी कैची धाम आणि मग रानीखेत असा प्लॅन होता.
रानीखेत भवाली पासून 1:30 - 2 तासांवर आहे. गाडीत बसल्या बसल्या आज अंताक्षरी खेळायची टूम निघाली. ताबडतोब दोन गट करून अंताक्षरी सुरु झाली. सगळेच जण उत्साही त्यामुळे अंताक्षरी मस्त रंगली. गाण्यांच्या नादात कैची धाम कधी आलं समजलं पण नाही.
उत्तराखंड मध्ये निंब करोरी बाबा उर्फ कंबलवाले बाबा याना लोक खूप मानतात. त्यांना हनुमानाचा अवतार समजलं जातं. त्यांनी स्थापन केलेलं कैची धाम हे एक मंदिर आहे. दोन डोंगरांच्या खाचेत वसलेलं असल्याने याला कैची धाम असं म्हणतात.मंदिराच्या शेजारून एक नदी वहाते पण आता उन्हाळ्यामुळे ती पार कोरडी होती. आजूबाजूला हिरवेगार डोंगर आणि मध्ये हे मंदिर आहे. निंब करोरी बाबांच्या दर्शनाला खूप सेलिब्रिटी नेहेमी येतात. अगदी स्टिव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग पासून विराट कोहली, अनुष्का शर्मा पर्यंत मंडळींनी इथे हजेरी लावलेली आहे आणि बाबांना गुरु मानलेलं आहे असं समजलं.
मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आलो तर आमच्यासाठी इकडचं खास पेय शिकंजी तयार होती. मला अनेक वर्ष शिकंजी म्हणजे दूध आणि फळांचं पेय असेल असं वाटायचं पण हे वेगळंच होतं. लिंबू, तिकडे सध्या मिळणारे रसरशीत ईडलिंबू, पुदिना, जलजिरा, काळं मीठ असं सगळं घातलेलं हे अगदी मस्त रिफ्रेशिंग असं पेय होतं.शिकंजी घेऊन तरतरीत होऊन पुढे निघालो.
आता रानीखेत चा सुंदर रस्ता सुरु झाला. उंच कडे, खोल दऱ्या आणि त्यात सुकलेल्या नद्या असं चित्र दिसायला लागलं. या नद्यांची पात्रं प्रचंड होती. त्यामुळे पावसाळ्यात त्या जेव्हा भरून वाहत असतील तेव्हा काय सुंदर दिसत असतील असं वाटून गेलं. रानीखेत इथे कुमाऊं रेजिमेंट, नागा रेजिमेंट यांचं मुख्यालय आहे. हे गाव लष्कराच्या आखत्यारित येतं.आम्ही सगळ्यात आधी कुमाऊं रेजिमेंट च्या संग्रहालयाला भेट दिली. निसर्ग आणि शिस्त एकत्र आले कि काय जादू होते ते इथं गेल्यावर कळतं. लष्कराच्या टुमदार इमारती, आजूबाजूला पसरलेले डोंगर, भर उन्हाळ्यात पण भरपूर हिरवाई, उत्तमपणे राखलेलं लॉन असं देखणं चित्र दिसत होतं.
आम्ही पोचलो तेव्हा इथे थोडी गर्दी होती. आधीचा ग्रुप आत होता. त्यांचं होईपर्यंत आजूबाजूच्या सुंदर परिसरात फोटोसेशन करून घेतलं. तरी सुद्धा वेळ उरला म्हणून मग समस्त महिला वर्गानं सध्याचं लोकप्रिय रिल करायच्या निमित्तानं जरा हातपाय हलवले. आमचे उद्योग बघून एखादा सैनिक येऊन आम्हाला हाकलून लावतो कि काय अशी भीती वाटत होती पण तसं काही झालं नाही.
इथल्या संग्रहालयात कुमाऊं रेजिमेंट ने आत्तापर्यंत केलेल्या कामगिरी च्या आठवणी जपल्या आहेत. युद्धात वापरलेली शस्त्र, शत्रूंच्या पकडलेल्या वस्तू, कुमाऊं रेजिमेंट च्या पराक्रमी योध्यांबद्दल माहिती असं बरंच काही इथे आहे. एक रिटायर्ड मेजर हे सगळं आपल्याला दाखवतात. खरंतर बारकाईनं बघायला इथे खूप काही आहे पण तितका वेळ नव्हता. मेजरसाहेब पण प्रत्येक गोष्ट न दाखवता निवडक महत्वाच्या गोष्टी दाखवत होते.
रानीखेत मध्ये शिरल्यापासून आभाळाशी स्पर्धा करणारी उंचच उंच पाईन ची झाडं दिसत होती. हिंदी चित्रपटांमध्ये या अशा जंगलात चित्रित केलेली गाणी नेहेमी असतात. अशा एका जंगलात आता आमचा फोटो स्टॉप होता. तिथे जाताना रानीखेत मधलं प्रसिद्ध गोल्फ कोर्स दिसलं. पूर्वी तिथे जाता यायचं पण सध्या पर्यटकांसाठी ते बंद आहे. फोटो आणि रील बनवून जेवायला पोचलो.
एक छोटंसं टुमदार हॉटेल आणि त्याच्या गच्चीमधून दिसणारी विस्तीर्ण पर्वत रांग असा नजारा बघत आज स्थानिक पहाडी जेवण केलं. त्यातला मोहरी वाटून केलेला पहाडी रायता मस्त होता. तिथेच थोडावेळ आराम करून नैनिताल च्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला.
भरपुर फिरून आणि आता जेवण करून झोप आली होती. आमचं हॉटेल येईपर्यंत मस्त झोप झाली. आता चहाची फार गरज होती. हॉटेल वर उतरून थेट चहा साठी डायनिंग हॉल मध्ये गेलो तेव्हा गरम गरम बटाटे वडे आमची वाट बघत होते.थंडगार हवेत चहा आणि मुंबईकर शेफ ने बनवलेले वडे एकदम माहौल बनला.आज संध्याकाळी गेम्स नाईट होती. उद्या इथून चेकआऊट करायचं होतं. त्यामुळे रूममध्ये जाऊन सामान पॅक करून पटापट यावरून गेम्स खेळायला गेलो.
लहानपणी खेळलेले साधे सुधे गेम्स पण अभिषेक ज्या पद्धतीने ते करवून घेत होता, जबरदस्त मज्जा आली. सुरुवात 'कच्ची पपई पक्की पपई' पासून झाली. आधीच थंडी ने जीभ जड झालेली त्यामुळे हा खेळताना जबरदस्त त त प प होत होतं. त्यानंतर 'हनुमान कृष्ण नरसिंह' असा एक खेळ घेतला. सगळ्यांनी गोलात उभं राहायचं आणि मध्ये उभा असलेला माणूस गोलातल्या कोणाकडे हि बोट दाखवणार आणि एका देवाचं नाव घेणार कि लगेच त्यानं त्या त्या देवाची पोझ घेऊन उभं राहायचं असा खेळ होता. या खेळात तर हातात गदा घेतलेला कृष्ण किंवा नरसिंह सारखं पोट फाडणारा हनुमान असे बरेच नवे देव आम्ही शोधून काढले. हसून हसून पोट दुखायला लागलं. मंडळी पार जमिनीवर लोळायला लागली तेव्हा गेम संपवून जेवायला गेलो.
नेहेमीप्रमाणेच चवदार जेवून रूमवर पोचलो.उद्या कॉर्बेट ला जायचं होतं.
- ©️स्मिता श्रीपाद

कुमाउंच्या प्रदेशात - २.......तालों मे नैनिताल

 कुमाउंच्या प्रदेशात - २.......तालों मे नैनिताल

तालोंमे नैनिताल, बाकी सब तलैया
आजा मोहोब्बत मे नाचे ता ता थैया
हे अतिशय 'दर्जेदार' असं हिंदी सिनेमातलं एक गाणं प्रसिद्ध आहे त्यामुळे नैनिताल नावाचा एक तलाव आहे आणि तो सगळ्या तलावांमधे भारी आहे असं ज्ञान खुप लहानपणा पासुन आपल्या सगळ्यांना मिळालंय.पण पिच्चर मधलं सगळं खरं नसतं हे ज्ञान मोठं झालं की मिळतं.तसं ते आम्हाला नुकतंच मिळालं.
खरतर नैनिताल उत्तराखंड मधलं खुप प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे आणि तिथे नैनिताल सोबतच भीमताल, तल्लीताल, सातताल, नौकुचियाताल असे अनेक तलाव आहेत. असं म्हणतात की इथे साठ पेक्षा जास्त तलाव होते. काल हलद्वानी मार्गे भवाली ला येताना आम्ही वाटेत भीमताल पाहिला होता. आज आम्ही खुद्द नैनिताल बघणार होतो.
सकाळी उठुन आवरुन नाष्टा करायला आलो तेव्हा बाहेर पावसाळी हवा होती पण पाउस नव्हता. उलट कोवळं उन्ह च दिसत होतं. पण हवा अतिशय थंड होती. पावसाने आमची प्रार्थना ऐकली असं वाटलं आणि मंडळी उत्साहानं बाहेर पडली.आज आम्हाला टुटा पहाड या ठिकाणापर्यंत बस ने जायचं होतं आणि तिथुन पुढे नैनिताल मॉल
रोड वर बसला परवानगी नसल्यामुळे लहान गाड्यांमधुन नेणार होते.छत्री, स्वेटर असं सगळं सामान एका छोट्या बॅग मधे पॅक करुन बसमधे जाउन बसलो. मनात पावसाला साकडं घालणं चालुच होतं की बाबा रे जरा ४ दिवस थांब. हा पुर्ण पहाडी भाग असल्यामुळे एकदम अरुंद आणि वळणावळणाचे रस्ते होते. आज गाडीत बसल्याबसल्या अभिषेक ने एक खाऊ चा पुडा आणि एक प्लॅस्टीक ची पिशवी (घाट लागला तर असावी म्हणुन) हातात ठेवली. त्यावर घाटात लागणाऱ्या उलटया या विषयावर बसमध्ये एक छोटंसं चर्चासत्र पार पडलं.आमचा ड्रायव्हर काल एकदम शांतपणे गाडी चालवत होता पण रात्री काय 'जादु' झालेली देव जाणे. त्याच्या अंगात एकदम मायकेल शुमाकर संचारला. हॉटेल पासुन टुटा पहाड म्हणजे फारतर २०-२५ मिनिटांचा रस्ता पण तिथे जाईपर्यंत ड्रायव्हर साहेबांनी अशी काही झलक दाखवली की बस. एकंदरीतच चर्चेचा परिणाम म्हणा किंवा ड्राइवर साहेबांची करामत म्हणा, नाष्टा करुन बस मधे बसलेल्या लोकांना त्रास सुरु झाला.अभिषेक ला बहुतेक सवय असावी म्हणुन त्यांनी आधीच व्यवस्था करुन ठेवली होती.पण नशीबाने तो टुटा पहाड लवकर आला आणि आम्ही सुटलो.तिथे उतरलो तर मस्त उन्ह पडलेलं दिसलं आणि आमच्या गोटात एकदम आनंद पसरला. त्या उत्साहाच्या भरात सोबत घेतलेली छत्री, गरम कपडे असलेली बॅग बस मद्धे ठेवुन(विसरुन), तवेरा वगैरे अशा लहान गाड्यांनी आम्ही पुढे निघालो. १० मिनिटे गेली आणि डावीकडे नैनी लेक चं पहिलं दर्शन घडलं. डावीकडे पसरलेला विस्तीर्ण नैनीताल आणि उजवीकडे अप्पर मॉल रोड. तो संपुर्ण तलाव पार करुन मॉल रोड च्या दुसर्या टोकाला आम्ही उतरलो.आम्ही उतरलो तिथे लाकडी खांबांचा एक सुंदर बसस्टॉप होता आणि तिथे मॉल रोड वर फिरायला मस्त ईलेक्ट्रीक रिक्षा होत्या.
आज आम्ही पहिल्यांदा जाणार होतो स्नो व्ह्यु पॉईंट ला. तिथे जाण्यासाठी एक चिमुकली केबल कार आहे. भर वस्तीतुन, हॉटेल आणि घरांच्या दाटिवाटीतुन ही केबल कार नैनी तलावाचं संपूर्ण दर्शन घडवत आपल्याला अजुन उंचीवर घेउन जाते. या कार मधुन जाताना नैनीताल चा अंब्याच्या कोयीसारखा आकार व्यवस्थित दिसतो. केबल कार मधुन वर वर जाताना परत सुर्य देव गायब झाले आणि पावसाचे ढग दिसायला लागले.पण एकंदरच हवा इतकी मस्त होती की त्या वातावरणात पाऊस आला तर काय असला काही विचार डोक्यात आलाच नाही.केबल कार मधुन उतरुन अजुन थोडं पायी चढत स्नो व्ह्यु पॉईंट साठी वरती जायचं होतं.५-१० मिनिटात पॉईंट वर पोचलो. एकंदर ढगाळ वातावरणामुळे बर्फाचे डोंगर दिसणार नाहीत याची खात्री होती. इथे एक सिमेंट चा चौथरा उभा करुन वरती पत्र्याची शेड घातली होती. शेजारीच एक दुर्बीण वाले बाबा पण होते पण सध्याचं हवामान लक्षात घेता त्यांनी त्यांचं सगळं सामान गुंडाळुन ठेवलं होतं. आम्ही सगळेजण वरती पोचलो आणि.....
अचानक धो धो पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरु झाला.अगदी अनपेक्षित पणे १-२ मिनिटात पावसाचा जोर प्रचंड वाढला. प्रचंड थंडी वाजायला लागली. त्याक्षणी स्वेटर आणि छत्री ची बॅग आपण बसमधे कशी विसरलो हे आठवलं. आता थांबेल मग थांबेल म्हणणारा पाऊस १०-१५ मिनिटं झाली तरी थांबायचं नाव घेइना. आता कुठे काय डोंगर आणि बर्फ दिसतोय असं कोणीतरी म्हणालं आणि तेवढ्यात... ताड ताड गारा सुरु झाल्या.
दिसला की बर्फ 😀 या ना त्या प्रकारे बर्फ दिसलाच 😜त्या पावसामुळे आम्हा सगळ्या अनोळखी लोकांना कालपासुन पहिलांदाच निवांत बोलायला वेळ मिळाला आणि तिथंच एक "ice breaking session" पार पडलं. पुण्यातुन आमच्यासोबत आलेलं देशमुख आणि झगडे कुटूंब, मुंबई मधुन आलेले भट, नामजोशी, तोरस्कर, महाडीक या सगळ्यांशी ओळख झाली. ग्रुप तर मस्तच होता. सगळेजण समवयस्क आणि उत्साही होते. अशावेळी कसलीही परिस्थिती येवो.मज्जाच येते. त्यामुळे या अचानक आलेल्या पावसाचा पण आनंद घेता आला.
त्या गोंधळात सुद्धा शक्य त्या सगळ्या अँगल ने सेल्फ्या आणि ग्रुप फोटो काढुन वेळ सार्थकी लावला.तोवर पावसाचा जोर कमी झाला होता.
आमचा पॉईंट पाहुन झाल्यावर केबल कार स्टेशन जवळ चहा आणि भेळ खायला या असं अभिषेक ने मघाशीच सांगुन ठेवलं होतं. खाली उतरुन त्या हॉटेल मधे पोचलो. खरतर या पावसात आता गरम भजी ची ईच्छा होती पण तिथे पोचल्या पोचल्या भेळीचे द्रोण समोर आले. त्याचा खमंग वास नाकात शिरल्यावर खायला सुरुवार केली. आहाहा काय मस्त भेळ होती. बाहेर धुवांधार पाऊस आणि प्लास्टीक ताडपत्री लावलेल्या हॉटेल च्या आडोशाला बसुन आम्ही भेळ आणि चहा वर ताव मारला. पावसात भजी एवढीच भेळ सुद्धा चवदार लागते हे ज्ञान घेण्यासाठी लाखभर रुपये खर्च करुन नैनिताल गाठलं होतं. त्या हॉटेल च्या काउंटर वर जन्मसावित्री मॅगी ची पाकिटं दिसताच सगळ्या बच्चे कंपनीने भेळीसोबत गरमागरम मॅगी वर सुद्धा ताव मारला.
आता पाऊस थांबला होता पण "अ ती प्र चं ड" कुडकुडवणारी थंडी सुरु झाली होती. आणि आमचे सगळे स्वेटर बस मद्धे.
मग आता काय केलं असेल बरं आम्ही ?
बरोब्बर ओळखलंत... खरेदी...
शेजारीच गरम शाली,स्वेटर्,पोंचो अशी गरम कपड्यांची दुकानं होतीच. आणि ते लोक आमची वाटच बघत होते.मग त्यांना नाराज कसं करणार ना. लगेच मस्तपैकी खरेदी करुन थंडी पळवली. तिथेच घावुक प्रमाणात सगळ्यांनीच छत्री खरेदी केली.आता पाऊस थांबला होता आणि केबल कार परत सुरु झाली होती. कार मधे बसुन खाली यायला निघालो. माघाशी यातुन दिसणारा नैनी तलाव आता पुर्णपणे ढग आणि धुक्यात हरवुन गेला होता. जणु काही ढग आणि धुक्यातुनच आम्ही खाली निघालो होतो.
खाली उतरुन लगेच बोटींग पॉईंट कडे गेलो. पाऊस थांबलाय तोवर बोटींग करुन घ्यायचं होतं. थंड हवा, बोचरं वारं अशा वातावरणात नैनिताल मधे बोटींग करायला गेलो.
आता आमच्या हातात छ्त्री दिसल्यामुळे पाऊस शहाण्यासारखा थांबला होता. त्यामुळे आम्ही निवांतपणे बोटींग करत तलावात एक फेरी मारली. चारी बाजुंनी डोंगरानी वेढलेला हा नैनी तलाव खरतर फार फार सुंदर आहे. ज्यावेळी इथे बेसुमार पसरलेली बांधकामं नसतील तेव्हा हा अजुनच सुंदर दिसत असेल. लख्ख उन्ह असताना इथे बोटींग करायला अजुनच मजा येत असणार.तर आमची फेरी तलावाच्या एका टोकाला सुरु होऊन नैना देवी मंदीर असलेल्या बाजुला संपली.इथे मस्त फोटो पॉईंट होता. त्यामुळे सगळ्यांच्या बोटी पोचेपर्यंत भरपुर फोटोसेशन झाले. फोटो काढता काढता अचानक समजलं की पुण्यातुन आलेले झगडे दादा स्वत: प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत.मग काय मंडळी सोडतात की काय त्यांना. पूर्ण ट्रीप संपेपर्यंत त्यांच्याकडुन भरपुर फोटो काढुन घेतले.नैनी देवीची पौराणिक कथा अभिषेक कडुन ऐकली आणि मग देवीच्या दर्शनाला गेलो.
पौराणिक कथेनुसार, राजा दक्ष ने एक मोठा यज्ञ करायचे ठरवले होते.त्यासाठी स्वतःचा जावई शिवशंकर आणि लेक उमा सोडुन सगळ्या देवांना आमंत्रण दिले होते. दक्षाला त्याचा जावई आवडायचा नाही म्हणे. कसा आवडणार ? हिमालयात बसणारा, अंगाला राख फासणारा, राग आला की तांडव करणारा नवरा मुलीला मिळावा असं कुठल्या बापाला वाटेल 😜. तर ते असो. बापाने बोलावले नाही तरी पार्वती हट्टाने गेली आणि तिथे नवर्याचा अपमान सहन न होउन तिने यज्ञात उडी मारली. हे कळल्यावर भगवान शंकरांनी तिथे धाव घेतली आणि उमा(सती) चे जळते शरीर यज्ञातुन काढुन आकाशमार्गे फिरु लागले. त्यावेळी तिच्या शरीराचे अवषेश जिथे पडले तिथे शक्तीपीठे तयार झाली. तिचा उजवा डोळा जिथे पडला तिथले ठिकाण म्हणजेच हे नैनिताल आणि म्हणुनच या देवी ला नयना देवी म्हणतात. तिच्या डोळ्यातुन वाहाणार्या अश्रुंमुळे तलाव बनला असं मानतात.
ही गोष्ट ऐकुन मग दर्शन घेण्यासाठी मंदीरात शिरलो.नुकताच पडुन गेलेल्या पावसामुळे आणि थंड हवेमुळे मंदीराची संगमरवरी फरशी बर्फापेक्षा गार झाली होती. तलावाच्या काठावर असलेलं हे मंदीर सुंदर आणि स्वच्छ आहे. इथुन तलावाचं आणि आजुबाजुच्या हिरवाई चं सुंदर दर्शन होतं. मंदीरात गाभार्यापाशी फोटो/व्हिडिओ ला मनाई चे बोर्ड आहेत तरी काही महान लोक फोटो काढत होतेच. एक भक्तीण तर थेट व्हिडिओ शुटींग करत होती बहुतेक.
"दीदी यहा फोटो निकालना मना है."
"पुजारीजी मै फोटो नही निकाल रही. व्हिडिओ कॉल लगाके घर पर मां का दर्शन करवां रही हुं"
ताई एकदम बरोबर होत्या 😆.
या सगळ्या गमतीजमती बघत दर्शन घेउन बाहेर आलो तर आज आम्हाला केसरी तर्फे मोमो ट्रीट मिळणार होती असं कळलं. मंदीरा शेजारी एका दुकानात गरमागरम चवदार मोमोज वर ताव मारला.आता काही वेळ तिथल्या तिबेटियन मार्केट मधे फिरुन मग थोडं उशीरा जेवण असणार होतं.सकाळपासुन भेळ, मोमो असं काय काय खाल्ल्यामुळे भुक विशेष नव्हतीच.
तिबेटीयन मार्केट मधे हाताने विणलेले लोकरीचे सॉक्स, टोप्या, नैनिताल च्या प्रसिद्ध मेणबत्त्या अशी किरकोळ खरेदी केली.रमत गमत चालत चालत परत एकदा मॉल रोड वर पोचलो आणि गाड्यांमद्धे बसुन जेवणासाठी "रॉयल हेरिटेज" हॉटेल ला पोचलो. नैनिताल च्या मॉल रोड जवळच ही एकदम सुंदर जुन्या पद्धतीचं बांधकाम असलेली प्रीमियम प्रॉपर्टी होती. आजची दुपारच्या जेवणाची सोय केसरीतर्फे इथं केलेली होती.उभ्या आयुष्यात माझ्या आई, आज्जी, सासुला सुद्धा जे जमलं नाही ते केसरी नं करुन दाखवलं. आजच्या जेवणात 'काजु करेला' अशा नावाची भाजी होती. पाहिल्यांदा पाहिलं तेव्हा वाटलं, काय राव किती काजु वाया घालवले यांनी कारल्यासोबत. पण अभिषेक ने आग्रह केला आणि शुभांगी ने शिक्कामोर्तब केलं म्हणुन घाबरत घाबरत थोडी भाजी खाल्ली. आहाहा.. कारलं चक्क मस्त लागत होतं. पहिल्यांदाच मी कारल्याची भाजी मनसोक्त खाल्ली. चक्क बाजुला ठेवलेल्या आमरसाकडे दुर्लक्ष करुन. केसरीच्या जेवणाचे वारंवार उल्लेख येणारच आहेत त्याला इलाज नाही 😉
जेवण झाल्यावरचा वेळ आमच्यासाठी मोकळा होता. आता आमचं फिरुन झाल्यामुळे शहाणा पाऊस परत पडायला लागला होता. जेवल्यावर त्या हॉटेल च्या व्हरांड्यात टाकलेल्या आरामखुर्च्यांवर मस्त पसरुन एक डुलकी काढली.नंतर मॉल रोड वर त्या ईलेक्ट्रीक रिक्षा मधुन एक चक्कर मारली. मॉल रोड वर फारसं काही शॉपिंग करायची ईच्छाच झाली नाही कारण तिथे सगळी ब्रँडेड दुकानच होती. लोकल शॉपिंग आम्ही मघाशी करुन घेतलंच होतं.६ नंतर मॉल रोड गाड्यांसाठी बंद होतो त्याच्या आधी आम्हाला टुटा पहाड जवळ जिथे आमची बस होती पोचायचं होतं. त्यामुळे ५:३०-५:४५ ला परत निघालो आणि आमच्या बस पाशी पोचलो.
आजचा दिवस पाऊस आणि थंडीमुळे थोडा दमवणारा गेला होता पण खुप मजा पण आली होती. हॉटेल वर पोचुन थोडा आराम करुन डायनिंग रुम मधे आलो. काल राहिलेली ओळख परेड आज चालु होती.सगळ्या मंडळींची अजुन थोडी ओळख झाली. शेफ साहेबांनी केलेलं सुग्रास भोजन घेतलं. उद्या चा प्लॅन समजुन घेतला आणि रुम मधे येउन झोपुन गेलो.
- ©️स्मिता श्रीपाद
तळटीपः नैनिताल खरतर पुर्वी खूप सुंदर असणार आहे असं खेदानं म्हणावं लागतंय कारण आता नैनिताल मधे जिथे आणि जशी जागा मिळेल तशी बेसुमार बांधकामं केलेली दिसली. डोंगर फोडुन वाट्टेल तशी घरं आणि हॉटेल्स बांधली आहेत.
इतकं सगळं असलं तरीसुद्धा तलावाच्या परिसरात गेलं की अप्रतिम नजारा दिसतो.माणसानं निसर्गाला कितीही ओरबाडून घेतलं तरी तो माणसाला भरभरून आनंद देतोच.
पाऊस नसताना मॉल रोड वर तलावाच्या काठाने फिरायला खूप मजा आली असती.
केसरी चं हॉटेल नैनिताल मधे असायला हवं होतं असं एका क्षणी वाटलं. पण असो. एकदा ग्रुप टुर ने जायचं मान्य केलं तेव्हाच जास्त चिकित्सा करत बसायचं नाही असं आधीच ठरवलं होतं. काही फायदे काही तोटे असणारंच.
- ©️स्मिता श्रीपाद