Monday, March 12, 2012
सिझलर्स....स्स्स
झणझणीत वरणफळं उर्फ चकोल्या
माझ्या लहानपणी वरणफळे करणे आणि खाणे हा एक सोहळा असायचा...सोहळा अशासाठी म्हटलं कारण हा पदार्थ करायचा म्हणजे त्याची तयारी २-३ दिवस चालायची...आता तुम्ही म्हणाल की हा इतका सोपा पदार्थ आहे..तर त्याची काय तयारी करायची..तर तयारी पदार्थ करण्यासाठी नसुन तो कधी करायचा हा "बेत" करण्यासाठी असायची....
त्याचं काय होतं..की माझ्या आई आणि बाबांना हा प्रकार अजिबात म्हणजे अजिबात आवडायचा नाही..."आमटी आणि पोळीचा काला काय खायचा नुसता..त्यापेक्षा भाज्या खाव्यात भरपुर.." ईति आमच्या मातोश्री..चकोल्या भुरकण्यातलं सुख हिला कधी कळणार,म्हणुन मी हळहळायचे ......मग एखाद्या दिवशी आमची लाडकी आज्जी हा बेत ठरवायची ( आजोळ गावात असल्याचे बरेच फायदे होतात..त्यातलाच हा एक..) मग परत आज्जीकडे जायचं म्हटल्यावर लगेच वरणफळं खाउन हातावर पाणी पडल्यावर लगेच कोण आपापल्या घरी जातंय...शाळेची सुट्टी विचारात घेउन २-४ दिवस तिथेच राहायच्या बेताने ( आणि अजुन २-३ चविष्ट बेत जोडीला ठरवुन..) चकोल्या चा प्रोग्रॅम ठरायचा...
वरणफळं म्हणजे आमटी आणि पोळी यांचा काला नसतो...हे तु आईला पूर्वी का शिकवले नाहीस असं आज्जीला विचारलं की ती म्हणायची..अगं तुझ्या आईला सगळ शिकवलं असतं तर आपल्या या चकोल्या पार्ट्या कशा झाल्या असत्या...? हे ही खरंच होतं बरका....आज्जी,आजोबा,मी आणि माझी धाकटी बहीण आमची मस्त पार्टी असायची...झणझणीत आज्जीस्टाईल चकोल्या,त्यावर भरपूर साजुक तूप,दाण्याची किंवा लसणीची चटणी,पापड-कुर्डया,आणि ताजं ताक असा मेन्यु असायचा....कोण किती मोठयांदा भुरका मारुन चकोल्या हाणु शकतो अशी जणु चढाओढच असायची...चकोल्यांचं भलं मोठं पातेलं बघता बघता खाली जायचं..
आणि या सगळ्या सरंजामाला बाहेर धो धो पडणारर्या पावसाचं बॅगराउंड म्युझिक मिळालं तर आहाहा.....
अजुनही आज्जीचा फोन आला की ती विचारते,कराड ला कधी येणार आहेस? एकदा चकोल्यांचा बेत करुयात...माझा मन लगेच माग पोचतं.चकोल्या पार्ट्यांसोबतच इतरही अनेक आठवणी मनात फेर धरुन नाचु लागतात....आणि मग मी लगेच चकोल्या करायचा "बेत" करते..आज्ज्जी नं शिकवल्यात तश्शाच
तर अशा या माझ्या आज्जी फेम चकोल्या....
१.कणीक भिजवताना त्यात मीठ,तिखट,हळद,आणि थोडे गुळाचे पाणी घालवे.तेलाचा हात लावुन कणीक भिजवावी.
आमटीची कॄती:
१. १/२ छोटा कांदा,१/२ टोमॅटो,४-५ काळी मिरी,२ लवंगा,१ तमालपत्र,थोडी दालचिनी,४ चमचे ओलं खोबरं,भरपूर लसूण,कोथिंबीर हे सगळं छान बारीक वाटुन घ्यायचं
२.मग थोड्या तेलात मोहरी,जिरे,मेथ्या,हिंग,हळद,कढिपत्ता याची फोडणी करुन त्यात वरील वाटण नीट परतून घ्यावे.त्यात २ वाट्या शिजवलेली तूरडाळ घालावी.भरपूर पाणी घालावे ( वरणफळांना पोहता आले पाहिजे).गुळ,चिंच,मीठ,तिखट,आणि गोडा मसाला घालावा...व उकळी येउ द्यावी...
आता भिजवुन ठेवलेल्या कणकीची तेल लावुन (पीठी लावु नये नाहीतर चाकोल्या फारच गिजगोळा होतात) पोळी लाटावी...आणि कातण्याने मोठया शंकरपाळ्या कापुन उकळणार्या आमटीत सोडाव्यात...मस्त शिजु द्याव्यात ..आणि गरमगरम वरपाव्यात
टीपः या चित्रात जरी चकोल्या बाऊलमद्धे दिसत असल्या आणि शेजारी चमचा वगैरे दिसत असला तरी हे प्रकरण चमच्याने वगैरे खाण्याची चुक अजिबात करु नये...पाप लागेल ...हे सगळं मस्तपैकी ताटात ओतायचं,ताटाला गरज असल्यास टेकण वगैरे लावायचं ( त्यासाठी मी त्या चमच्याचा वापर केला ) आणि हातने भुरकायचं....मग कोपरपर्यंत ओघळ आला तरी चालेल
आईपण
Wednesday, January 27, 2010
झिंग... नटरंग ची...
ईश्वरा, जन्म हा दिला, प्रसवली कला थोर उपकार...
तुज चरणी, लागली वर्णी,कशी ही करणी करु साकार..
मांडला नवा संसार,अता घरदार तुझा दरबार...
पेटला, असा अंगार,कलेचा ज्वार,चढवितो झिंग....
नटरंग उभा,ललकारी नभा,स्वरताल जाहले दंग....
कलेचं वेड काय असतं हे अनुभवायचं असेल तर जरुर पहावी अशी ही कलाकृती " नटरंग".गेले काही दिवस वर्तमानपत्रातून,वेगवेगळ्या टिव्ही चनेल्स वरुन आणि चित्रपट पाहुन आलेल्या मित्रमंडळींकडुन या चित्रपटाविषयी ऐकत होते...अजय-अतुल चे संगीत असलेली या चित्रपटाची गाणी ऐकून आधीच वेड लागलं होतं....अक्षरशः ही गाणी सगळीच्या सगळी पाठ झाली आहेत मला...अधले मधले संगीताचे तुकडे सुद्धा डोक्यात इतके फिट बसले आहेत कि सतत कुठेही ते माझ्या पाठलाग करत असतात....
सलग ३ आठवडे दर शनिवार रविवारी "सिटी प्राईड" ला जात होतो आम्ही हा चित्रपट पाहायला...प्रत्येक वेळी शो "हाउसफुल" चा बोर्ड.....मनातुन कुठेतरी बरंही वाटत होतं म्हणा...एक मराठी चित्रपट लोक इतका डोक्यावर घेतात हे पाहुन अभिमान वाटला..पण प्रत्येक वेळेस हाउसफुल ची पाटी पाहुन,आता कधी पाहायला मिळणार हा चित्रपट असं वाटायचं...अखेर परवा २६ जान.ला तिकिट मिळालं बाबा एकदाचं....आणि तेव्हा पासुन डोक्यात नटरंग ची जी "झिंग" चढली आहे ती अजुनही उतरायला तयार नाहिये....
कथा,पटकथा,दिग्दर्शन,संगीत,अभिनय सगळ्याच आघाडीवर चित्रपट इतका अप्रतिम आहे की क्या केहेने....अतुल कुलकर्णी या माणसाची खरचं कमाल आहे....दोन अतिशय वेगळ्या व्यक्तिरेखा....फक्त स्वभावच नव्हे तर वागण्या,बोलण्या,दिसण्यात वेगळ्या व्यक्ती त्याने इतक्या कमलीच्या साकारल्या आहेत....अतुल ला खरच दंडवत घालावासा वाटला...एकाच चित्रपटासाठी वजन वाढवणं आणि परत कमी करणं या गोष्टी फार फार अवघड आहेत्....आणि त्यानं ते आव्हान अनिशय लीलया पेललंय.....त्याला पाहुन,माझ्या कुलकर्णी आडनावाचा मला परत एकदा अभिमान वाटला मला :-)...( शेवटी काय आडनाव बंधु ना तो आमचा ;-).....अख्खा पिक्चर यानं नुसता खाउन टाकलाय्....खरं सांगते..अप्सरा आली गाण्यामधे सुद्धा...अतुल पडद्यावर कधी येतो आणि कधी जातो याकडे माझं जास्त लक्ष होतं....एक पुरुष इतक्या सहजपणे बाईसारख्या हालचाली कशा काय करु शकतो....ते फक्त अतुल कुलकर्णीच करु जाणे...
आणि चित्रपटाची सर्वात महत्वाची बाजु म्हणजे संगीत्....अजय-अतुल हे दोघं अक्षरशः वेडे लोकं आहेत्....इतकं भन्नाट संगीत दिलंय या दोघांनी....सगळी गाणी अप्रतिम झाली आहेत.... माणसाला जगायला काय लागतं असं कोणी विचारलं तर आपण अन्न्,वस्त्र,निवारा,ई,ई अशी यादी देउ..पण अशा काही कलाकृती पाहिल्या की वाटतं...फक्त पैसा,उत्तम जेवण,छानसं घरं,दारात गाडी या सगळ्या गोष्टींपेक्ष्याही आपलं जगणं समृद्ध करणार्या इतर अनेक गोष्टी आहेत्....आणि आपल्याला त्याचा आनंद घेता येतो हे आपलं भाग्य....मला मराठी म्हणुन जन्म मिळाल्याबद्दल अशावेळी मी देवाचे आभार मानते....
नटरंगच्या शेवटच्या सीन मद्धे गुणा त्याला मिळालेलं पारितोषिक उंच धरुन समोर पसरलेल्या प्रचंड जनसमुदायाला नमस्कार करतो तेव्हा मी क्षणभर विसरुनच गेले की हा एक चित्रपट आहे...आधीच्या २ तासात पाहिलेले सगळे प्रसंग डोळ्यापुढे एका क्षणात सरकून गेले आणि डोळ्यातलं पाणि गालावर कधी आलं ते कळंलच नाही....
चित्रपटातील एकच गोष्ट खटकली...सुरवातीला दिली गेलेली सुचना..... "या चित्रपटातील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत्..त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही" ..
नटरंग सारख्या चित्रपटांच्या सुरुवातीला तरी निदान असल्या सुचना नसाव्यात असं वाटतं.....कोण जाणे हा चित्रपट पाहणार्या कोणा एखाद्या "गुणा" ला यापासुन प्रेरणा मिळेलं... आणि आपल्याला ....अजुन एक कलाकार....
Monday, August 31, 2009
स्वप्नं
चांदण्यातली रात्र असावी,डोळ्यांमद्धे स्वप्नं असावे,
अशा क्षणाला ओठी माझ्या,तुझेच केवळ नाव असावे......
दुरुन कुठुनसा ओळखीतला,निशिगंधाचा सुगंध यावा,
वार्यावरती वाहत अलगद,माझ्या श्वासामधे भिनावा......
अशा क्षणाला मनात माझ्या,तुझेच केवळ गीत घुमावे,
तुझ्या स्मॄतीने डोळ्यांमद्धे,माझ्या नकळत अश्रु जमावे...........
पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे,
स्वप्न असे की सत्य असे हे,माझिया मना मीच पुसावे...........
तुझ्या रेशमी स्पर्शाने मग,स्वप्नातुन मी जागे व्हावे,
वास्तव सुद्धा असते सुंदर,हे माझ्या प्रत्ययास यावे..........
मग वाटावे,आपण आता,काळावरही मात करावी,
इथेच थांबू द्यावा हा क्षण,फक्त तुझीच साथ असावी... फक्त तुझीच साथ असावी...
बी.जे. मेडीकल कॉलेज मद्धे दरवर्षी गणेशोत्सवात आंतरमहाविद्याययीन स्पर्धा चालु असायच्या...अशाच एका वर्षी बी.जे. च्या "वेदांत" मद्धे "काव्यवाचन" स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झाले होते...पुण्यात ते सुद्धा आंतरमहाविद्याययीन स्पर्धेत सहभागी व्हायचा पहिलाच प्रसंग होता....तिथे ही कवीता सादर केली होती...आणि पाडगांवकरांची "चिउताई"... निकाल जाहीर होताना एकदम आरामात होते कारण आपल्याला काही बक्षिस मिळणार नाहीच हे गृहीत धरलं होतं...ईतक्या विविध कॉलेजेस मधुन सहभागी झालेल्या मुलांनी ईतक्या भारी भारी कविता सादर केल्या होत्या..की त्यापुढे माझी कविता म्हणजे उगीच आपलं..."र" ला "र" आणि "ट" ला "ट" जुळवलेलं आहे असं वाटलं होतं... आणि बक्षिस जाहीर झालं...उलट्या क्रमाने...
तृतीय क्रमांक : अमुक
द्वितीय क्रमांकः तमुक
आणि
प्रथम : चक्क त्यांनी माझं नाव पुकारलं......आणि मिनलने त्याचक्षणी घट्ट मिठी मारली मला....:-) इतकं मस्त वाटत होतं ना तेव्हा....आपण आपल्या कॉलेज साठी बक्षिस मिळवुन आणलं आहे याची जाणीव झाली एकदम..सोबतच्या सगळ्यांनी "एम्.आय्.टी." चा नुसता गजर केला होता आख्या सभागृहात... :-)
आणि नंतर लगेचच तिथे कँप मधेच "मार्जोरीन" ला पार्टी ...खिशात पैसे नसताना एका मित्राकडुन उधार घेउन केलेली ती पार्टी आठवुन आता हसायला येतं...खरतर आता ही कवीता वाचुनच फार हसायला येतं.....:-)ईतकी साधीसुधी कविता तर कोणीपण लिहु शकेल असं वाटतं आता :-)..
आज अचानक त्या ५-६ वर्षापुर्वीच्या गणेशोत्सवाच्या आठवणी आल्या....आणि "वेदांत" च्या सुद्धा...
पण कशीही असली तरी ही कविता मला अतिशय प्रिय आहे...कारण ती मला आठवण करुन देते...सायनाकर कडुन उधार घेउन दिलेल्या त्या "पार्टीची" आणि
बक्षिस जाहीर होताच मिनलने मारलेल्या त्या मिठीची ... ...
खरचं....Those were the Best Days of My Life...
Saturday, August 29, 2009
घेता घेता एक दिवस...देणार्याचे हात घ्यावेत....
कसं असतं ना....आईनेच शिकवले मोदक मला....
आणि माझ्यापर्यंत आईनेच तर पोचवलं हे सगळं...यावर्षी जरा चुकली असेल तिची उकड काढताना...पण म्हणुन लेकीचं किती कौतुक...पण तिला एक गोष्ट सांगावीशी वाटली मला...
आज मी माझ्या आईचे हात घेतले होते...."
थँक्यु आई.."
Friday, August 28, 2009
ये गं गौराबाई...
वाट तुझी बघतुया..शंकर भोळा गं..
अन कपाळाला शोभतुया..कुंकवाचा टिळा गं...
दरवर्षी गौर सजवताना हमखास आठवतच हे गाणं....माझ्या आईकडच्या गौरी म्हणजे खड्याच्या..गंगागौरी.....त्यावेळेस उभ्या गौरींबद्दल फारसं माहितीच नव्हतं कधी....एक छोटा हळद-कुंकवाची बोटे माखलेला कलश,त्यात कसली कसली तरी गौरीची पानं,फुलं,पूजेचं सगळं सामान..म्हणजे हळद-कुंकु,अक्षता,गेजवस्त्र,खिरापत असं सगळं घेउन मी आणि श्वेतु नदीवर जायचो...तिथे मग सोबतच्या ताया,काकवा,मावश्या सांगतील तशी पूजा करायची...नदीपात्रातले दोन खडे घ्यायचे...एक जेष्ठा..एक कनिष्ठा....त्यांची पूजा करुन कलशात ठेवायची...मग आरती,नैवेद्य...असं सगळं करुन नदीतल्या पाण्यानेच तोंडात चूळ घ्यायची...आणि कोणाशीही न बोलता घरापर्यंत ती चूळ तशीच तोंडात धरुन यायचं....
यामागचे शास्त्र मला कधी कळले नाही..पण आता असे वाटते की गौरीला घरी घेउन येताना आजुबाजुच्या लोकांशी न बोलता फक्त तिच्याशीच एकरूप होउन यावं असा काहीसा हेतु त्यात असेल...म्हणजे कसं की तोंडातलं पाणी बाहेर पडु नये म्हणुन कोणाशी बोलायचं पण नाही आणि चुकुन ते पाणी गिळलं जाउ नये म्हणुन सगळं मन स्वत: कडे एकाग्र करायचं....थोडक्यात काय तर स्वतः गौरीस्वरूप व्हायचं...पण त्यातही एकमेकींना खाणाखुणा करुन गप्पा सुरुच असायच्या म्हणा....असो...लहानपण किती निरागसं,गोड असतं....
मग घरापाशी आलं की आई तयारचं असायची औक्षणासाठी...इतका वेळ चालुन दमलेल्या पायांवर छान गरम गरम पाणी,मग गरम दुध..आहाहा..सगळा शिणवठा सेकंदात गायब व्हायचा...मग गौरीला..आणि गौर आणणार्या आम्हा दोघीना ओवाळणं व्हायचं...
मगं आम्ही म्हणायचं.. "गौर आली गौर...."
मग आई विचारणार..."कशाकशाच्या पावलांनी आली..?"
मग तिच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची...."सोन्यामोत्याच्या पावलांनी आली...."
मग सगळ्या घरभर फिरुन गौर..म्हणजे आम्ही दोघी विचारणार्..."ईकडे काय...?"
मग आई उत्तर देणार्...."ईकडे दिवाणखाना..ईकडे दूधदुभते...ईकडे तिजोरी....ईकडे देवघर....ईकडे बागबगीचा...."
गौर नक्की कोण आहे? माझ्या हातातल्या कलशात ठेवलेले ते दोन खडे...की मी आणि माझी छोटी बहीण...?
मग सगळ घरदार फिरुन गौराबाई बाप्पांशेजारी विराजमान व्हायच्या....शेपू भाजी-भाकरी चा आस्वाद घ्यायच्या...तिला आल्यावर भाजी भाकरी का लागत असेल या प्रश्नाचं उत्तर लग्नं झाल्यावर कळलं....
माहेरी आल्यावर "तायडु भाकरी झाली बघ गरम...सुरुवात कर तु खायला...असं म्हणत..ताव्यावरुन थेट ताटात येणारी भाकरी पूरणपोळी पेक्षा जास्त गोड वाटते..." (माझ्या सुदैवाने सासरी पण मला ही चैन असते)
गौर म्हणजे काय शेवटी "माहेरवाशीण"च की....
दुसर्या दिवशी मात्र भरपूर तूप सोडलेली पूरणपोळी..... :-)
पुढे मोठी झाल्यावर कर्हाड सोडुन शिकायला पूण्यात आले...ईथे आल्यावर पहिल्यांदाच उभ्या गौरींचा अनुभव घेतला तो अंजली आज्जीच्या घरी...अंजली आज्जी म्हणजे आईची सगळ्यात धाकटी मामी....आणि आता माझी सासु ;-)...
"मलापण उभ्या गौरी बसवणारे सासर पाहिजे आहे" असं एके वर्षी तिच्या घरच्या गौरी बसवताना सहज तोंडुन निघुन गेलं...आणि माझी गौराबाई "तथास्तु" कधी म्हणाली ते कळलंच नाही.... तेच घर सासर म्हणुन लाभलं..:-)
माझ्या सासरच्या गौरींचा थाट निराळाच....माझ्या पणजीपासून ( म्हणजेच आज्जेसासुबाईंपासुन..) चालत आलेले सुरेख पितळी मुखवटे...१ दिवस आधी या मुखवट्यांना छान घासुन-पुसुन लखलखीत करायचं....मग त्यांचे भुवया,डोळे,ओठ,कुंकु, केस रंगवायचे...लोखंडी स्टॅडला साड्या नेसवायच्या...या साड्या नेसवताना कोण धांदल उडते....एकीची साडी पटकन मनासारखी नसवुन होणार्...आणि दुसरीची साडी ३-४ वेळा सोडुन परत परत नेसवायला लागयाची....आपल्या मनासारखी जमेपर्यंत...
मगं आज्जीचं नेहेमीचं वाक्या..."अगं जेष्ठा साडी नेसवायला फार त्रास देत नाही....पण कनिष्ठा म्हणजे लहान ना.....जरा त्रास देणारच..":-)....
आणि खरच...दोन्ही मुखवटे कितीही सारखे रंगवले तरी आज्जी म्हणते तसं...एक मोठी आणि एक लहान जाणवत राहाते...असं कसं होत असेल गं आज्जी ....असं म्हणलं...की आज्जी हसुन म्हणते..."अगं म्हणुनचं त्या जेष्ठा-कनिष्ठा आहेत ना " ..:-)
मग त्यांना दोघींना दागिने घालायचे...मुकुट,चिंचपेटी,कानात कुड्या,हातात बांगड्या,कंबरपट्टा,कोल्हापूरी साज,श्रीमंत हार्,मंगळसूत्र...आणि सगळ्यात शेवटी नथ....हे सगळ करायला इतकं छान वाटतं ना....आपलं आपल्यातच असणं...साड्या नेसवलेल्या स्टॅडवर मुखवटे बसवले की पाहात रहावं असं वाटतं....ते तेजस्वी ,सोज्वळ,शांत मुखवटे आश्वासन देत असतात..."आम्ही आहोत ना आता...सगळ्या काळज्या आमच्यावर सोडा आणि निर्धास्त व्हा..."