Monday, December 14, 2015

"स्वर कट्यार" काळजात घुसली

पुन्हा जन्मण्यासाठी द्यावा सूरसुधारस हो
सूर निरागस हो....

सदाशिव चा आर्त स्वर कानावर पडला आणि अचानक मला समोरचा पडदा दिसेनासा झाला....डोळ्यातुन घळाघळा पाणी यायला लागलं...संगीताच्या साधनेसाठी तळमळणारा सदाशिव गुरु ला आर्त साद घालतोय आणि एका क्षणापूर्वी आपल्या घराण्याची गायकी चोरली म्हणुन सदाशिवाला मारायला निघालेला खासाहेबांसारखा एक सच्चा कलाकार त्याचे सच्चे सूर ऐकुन अक्षरश: विरघळुन गेलेत.
इथे गुरु मोठा ? की शिष्य मोठा ? की घराणं मोठं ? असे प्रश्ण गौण आहेत....एका कलाकारासाठी सप्तसूर हेच अंतिम सत्य....मग त्यापुढे ईतके दिवस पांघरलेला खासाहेबांचा अहंकाराचा मुखवटा एका क्षणात गळुन पडतो...आणि खासाहेबांबद्दलचा सदाशिवाचा राग देखिल त्या सुरांच्या वर्षावात वाहुन जातो....
समोर पडद्यावर जे दिसतंय ती केवळ एक कथा आहे यावर कसा आणि का विश्वास ठेवायचा....राग, लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार या सगळ्या भावना त्या एका संगीतकलेपुढे नतमस्तक होउन जातात. "कट्यार काळजात घुसली" हा फक्त एक चित्रपट न राहाता ती एक अनुभूती होउन बसते.
आपल्या संगीत घराण्याचा अतिशय अभिमान बाळगणारे खासाहेब माझ्यासाठी तरी या कथेचे व्हिलन नाहीत....सलग १४ वर्षे पंडीतजींकडुन झालेला त्यांचा पराभव त्यांना सहन होत नाही याचे कारण वैयक्तीक नाहीये. हा विजय त्यांना स्वतःसाठी नकोच आहे. तो त्यांना हवा आहे त्यांच्या घराण्यासाठी, त्यांच्या घराण्याच्या संगीतासाठी.ईतकं पराकोटीचं प्रेम आपल्या कलेवर फक्त एक सच्चा कलावंतच करु जाणे.केवळ पत्नीने केलेल्या कपटामुळे पंडीतजींचा आवाज गेला आणि आपण जिंकलो आहोत ही बोच त्यांच्या डोळ्यात आणि वागण्यात सतत दिसत राहाते.सदाशिवाच्या येणामुळे त्याचे रुपांतर भितीत होते.
संगीताप्रती जी निष्ठा खासाहेबांची तीच सदाशिवची.गुरुंकडुन विद्या मिळवण्यासाठी आलेला सदाशिव गुरुंचा आवाज गेल्याचं कळल्याने सैरभैर झालाय.शिकण्याची तळमळ तर आहे. पण गुरुच नाहीत. जमतील ते सर्व मार्ग अवलंबले पण गुरु नाही त्यामुळे आपण अपूर्ण आहोत ही भावना त्याला त्रास देतेय.खासाहेबांचा कितीही राग आला तरी त्यांच्याकडुन अनेक गोष्टी त्याला शिकायला मिळत आहेत याची त्याला जाणीव आहे.आणि म्हणुनच गुलाम बनुन त्यांची सेवा करायची वेळ आली तरी तो त्याकडे सकारात्मक भावनेने पाहातो.
अखेरच्या द्रुष्यात कट्यार चालवण्यापूर्वी कला सादर करायची संधी मिळाल्यावर दोन्ही गुरुंकडुन मिळालेली गायकी सादर करतो आणि त्या दोन्हीचा मिलाफ करुन स्वतःची अशी शैली देखील सादर करुन दाद मिळवतो.
अंधकार गुरुविण जगी भासे
कंठी स्वर उरलेत जरासे
किरण बनुनी क्षितीजी प्रगटावे
वरुण बनुनी ह्रदयी बरसावे
गुरुवर चरणि शरण मज द्यावे
वा तव स्मरणि मरण मज यावे

वा वा वा....शब्द स्वर सारेच उत्तम....जिते रहो....गाते रहो...

मूळ नाटकाची तोडफोड केली, मूळ ढाचा बदलला...असं कोणीही कीतीही म्हणाले तरी या "कट्यार.." ची धार अज्जिबात कमी होत नाही. जुनं ते सोनं हे कीतीही खरं असलं तरी नवे बदल, जर ते चांगल्या हेतूने केले असतील तर आपलेसे करायला काय हरकत आहे. आमच्या पिढीला आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना ज्याना जुनं नाटक आता पाहाणं शक्य नाही त्यांच्या साठी सुबोध भावे नी दिलेली ही "कट्यार.." खरच अनमोल आहे.त्याबद्दल त्यांचे मनापासुन आभार.
जुन्या कट्यार च्या गीतांच्या तोडीस तोड नवीन सर्व गीते पुढील अनेकानेक वर्ष आमच्या मनात घर करुन राहातील हे निश्चित....
चित्रपट पाहुन बाहेर पडताना नक्कीच म्हणावसं वाटतं...
जिते रहो....!!! गाते रहो...!!!



Monday, October 26, 2015

माझी आज्जी..माझा आदर्श...

खाणं आणि खिलवणं हे माझे अतिशय जिव्हाळ्याचे विषय.नक्की कुठुन सुरुवात झाली याची ते माहित नाही.पण कदाचित ते माझ्या रक्तातच असावं.माझी आज्जी अतिशय सुगरण आहे.कुठलाही पदार्थ अतिशय प्रेमाने आणि निगुतिने करणारी आणि तेवढ्याच प्रेमाने समोरच्याला खाउ घालणारी.आज्जीच घर स्टँड च्या अगदी जवळ त्यामुळे गावात कोणाकडेही आलेला कोणीही पाहुणा आधी आज्जीकडे जाणार. चहा, नाष्ता, जेवण ज्या वेळी जे योग्य असेल ते तिच्या हातचं खाणार , तृप्त होणार आणि मगच पुढे जाणार.गेली कित्येक वर्ष अनेक लोक या अन्नपूर्णेच्या हातचं जेवुन तृप्त झालेत आणि अजुनही होत आहेत.

मी शाळेत असताना सुट्ट्या लागल्या की लगेच आज्जीकडे पळायचे.माझी आज्जी मूकबधीर शाळेत कला आणि शिवण विषय शिकवायची.ती सुगरण तर आहेच पण एक अप्रतिम कलाकार पण आहे.आम्ही सुट्टीला येणार म्हणुन आमच्यासाठी तिचे अनेक बेत ठरलेले असायचे.काय काय खाउ करायचा आणि काय काय कलाकुसरीच्या वस्तु करायच्या हे सगळं ठरलेलं असे.

मला अजुनही आज्जीच्या घरचं सुट्टीतलं वातावरण आठवतं.आज्जी आणि आजोबा भल्या सकाळी ५:३० लाच उठायचे. उठलं की बारीक आवाजात स्वयंपाकघरात रेडीओ लागायचा. त्या रेडीओ ची गुणगुण ऐकत ऐकत आज्जीची कामं चालायची. दारात सडा टाकायचा. रांगोळी काढायची. पाण्याची सगळी भांङी घासुन पुसुन लख्ख करायची.प्यायच्या पाण्याची घागर वेगळी. देवाची घागर वेगळी. घासायच्या भांड्याचं सॉर्टींग करायचं. म्हणजे भांडीवाल्या बाईंना सरसकट सगळीच भांडी द्यायची नाहीत. चमचे, पाणी प्यायचे तांबे भांडी, छोट्या वाट्या,ताटल्या आणि काही खास भांडी आपणच घासायची. उरलेल्या भांड्यातले पण सर्व खरकटे काढुन ती भांडी पाण्याखाली धरुन मगच बाईला भांडी द्यायची.सकाळची सगळी पारोशी कामं आणि चहा झाली की आज्जी आधी आंघोळ करी.रोजच्या रोज अंघोळ करण्यापुर्वी केसांना तेल लावुन त्याची सुरेख वेणी घालायची आणि हातापायांनाही तेल लावायचं असा तिचा नियम. त्यामुळे अजुनही आज्जीची त्वचा सुरेख तुकतुकीत आणि तेजस्वी दिसते.अजुनही तिची हीच सवय कायम आहे.अंघोळ करुन शुचिर्भूत झाल्याशिवाय स्वयंपाकाला सुरुवात नाही.आजोबांची पूजा आणि आज्जीचा स्वयंपाक एकत्र चालु असतो. एखादं सुरेल गाणं गुणगुणावं तसं मऊसुत आवाजात सगळी देवांची स्त्रोत्र म्हणत म्हणत नाश्ता आणि स्वयंपाक बनवायला सुरुवात होते.त्यांचं ते एका लयित प्रार्थना गात गात चालु असलेलं काम बघायला मला अजुनही खुप खुप आवडतं.

माझ्या बाळंतपणात आज्जी आजोबा आईकडे रहायला आलेले होते. रोज सकाळी बाळाला आणि मला मालिश करुन झोपवुन बाई निघुन गेल्या की मधल्या खोलीत आजोबांची साग्रसंगीत पूजा चालु होई. तिथेच आज्जी कुठे ताक कर, कुठे भाजी निवड अशी कामं करत बसलेली असे. दोघांची एका सुरात सगळी स्त्रोत्र आरत्या आणि मग रामनाम जप सुरु असे. गोंदावलेकर महाराजांची अनेक पद ते म्हणत असतं. आणि शेवटी महाराजांचं दैनंदीन प्रवचन वाचत असत. आधीच मालिशमुळे आलेली गुंगी आणि त्यात त्या दोघांचं असं गोड आवाजात गुणगुणत प्रार्थना म्हणण यामुळे मला ईतकी छान गुंगी येत असे की असं वाटायचं " जगी सर्व सुखी " फक्त आणि फक्त मीच आहे. ते दिवस कधी संपूच नये असे वाटे.

आज्जीला स्वयंपाकघरात काम करताना बघुन बघुन मी मल्टीटास्कींग कसं करायचं ते शिकले. सगळी कच्ची तयारी एकदम नीट करुन घ्यायची. उदा.पोहे नाष्टयाला आणि आमटी, भात, भाजी, कोशींबीर, आणि खीर असा स्वयंपाक असेल तर पोह्यासाठी आधी कांदा, टोमॅटो, चिरुन घ्यायचा. मिरच्या ,कढिपत्ता ,कोथींबीर ,खोबरं ,लिंबु सगळं नीट ताटात काढुन ठेवायचं. पोहे चाळणीत काढुन धुवुन घ्यायचे. तोवर एकीकडे कुकर लावण्यासाठी डाळ, भात, बटाटे असतील तर ते असं सगळं वेगवेगळ्या पातेल्यात काढुन पाण्याने घुवुन निथळुन घ्यायचं.एका गॅसवर कढई तापायला ठेवायची आणि एका गॅस वर कूकर चढवायचा. पोह्याची फोडणी करुन त्यात कांदा टोमॅटो घालुन परतुन होईपर्यंत जेवणात काकडी कोशींबीर करायची असेल तर काकडी कोचवुन/ खिसुन घ्यायची.तोवर पोह्यासाठीचे कांदा टोमॅटो परतुन झाले की धुवुन निथळलेले पोहे त्यात टाकुन हलवुन झाकण लावुन घ्यायचं. पोह्यांना वाफ येतेय तोवर कणीक मळुन झाकुन ठेवायची. हे होईतोवर कूकरच्या शिट्ट्या झाल्या की गॅस बंद.सगळ्यांना बशीत नाष्टा वाढुन दिला की पुढची कामे सुरु.एकीकडे भाजी साठी कढई तापवायला ठेवायची. तोवर एका पातेल्यात आमटीसाठी शिजलेली डाळ काढुन घेउन त्यात मीठ, तिखट, मसाला, चिंच, गुळ घालुन बारीक गॅस वर उकळायला ठेवायची. बटाट्याची सालं काढुन त्याच्या फोडी करुन घ्यायच्या. भाजीसाठी फोडणी करायच्या आधी आमटीसाठी फोडणी करुन ती फोडणी आमटीवर ओतुन घ्यायची. मग भाजीसाठी फोडंणी करुन त्यात बटाट्याच्या फोडी घालुन मीठ साखर घालुन ठेवायची. कोशींबीरीसाठी खिसलेल्या काकडीचं पाणी काढुन ते आमटीमद्धे घालुन टाकायचं आणि काकडीच्या खिसावर मीठ साखर दाणे कूट घालुन तयार ठेवायचं.आता राहिल्या पोळ्या आणि खीर.पोळ्यांसाठी तवा तापत ठेवायचा आणि दुसर्या गॅसवर दुध साखर मिसळुन तव्यात शेवया परतुन घेउन त्या दुधात घालुन ठेवायच्या.आता पोळ्या झाल्या की संपला सगळा स्वयंपाक. अगदी पापड वगैरे तळायचे असतील तर पानं घेता घेता जेवायच्या वेळी ती पापड कुरवड्या तळुन घ्यायची.तिचं ते काम बघत बसणं हा सुद्धा एक मस्त सोहळा असायचा माझ्यासाठी. आणि हे सगळं चालु असताना मुखाने अखंड देवाचं नाव.कांदा लसुण काहीही न घालता ईतका रुचकर स्वयंपाक व्हायचा ना तिचा.मी किती नशीबवान मला ईतकी सुगरण आणि निगुतीनं स्वयंपाक करणारी आज्जी लाभली आहे :-)

उसळी, भरली वांगी कींवा दोडका अशा वेळखाउ भाज्या करायची पण तिची एक स्वतंत्र पद्धत आहे. या भाज्या आधी फोडणीला टाकुन घ्यायच्या म्हणजे मटकी, मूग, चवळी हे सुद्धा आधी न शिजवता डायरेक्ट फोडणी करुन घ्यायची आणि जे काही मीठ गुळ मसाला सगळं हवं ते घालुन आणि जितका रस हवा तेवढ पाणी घालुन वरण भातासोबत कूकरला लावायचं.वेळ आणि गॅस दोन्हीची बचत.
साठवणीचे पदार्थ म्हणजे तर आज्जीची एकदम खासियत. म्हणजे रोजच्या स्वयंपाकात लागणारे पदार्थ सुद्धा फ्रिज मद्धे एकदम नीट ठेवलेले असतात. खोबर खोवुन घट्ट झाकणाच्या डब्यात, कोथिंबीर निवडुन पेपर मद्धे गुंडाळुन ठेवलेली असणार. मिरच्या देठ काढुन जाळीच्या डब्यात या बेसिक गोष्टी तर कायम असतातच. पण बरेच प्रकारच्या चटण्या लोणची कायम तयार. उडीद डाळ, चणा डाळ, भरपूर कढीपत्ता, चिंच, गुळ घालुन एक प्रकारची चटणी पूड नेहेमी असते तिच्याकडे. उसळी आमरट्या ई मद्धे एखादा चमचा घातला की आफलातुन चव आणि अपेक्षित दाटपणा येतो. एरवीपण नुसतं तोंडीलावण म्हणुन बेस्ट. मी कितीही प्रयत्न केला तरी तिच्यासारखं सेम प्रमाण घेउनसुद्धा मला अजुनही तशी चटणी बनवता येत नाही. कैरीच्या दिवसात कैरीच्या लोणच्याचे अनेक प्रकार ती करते. गुळांबा, साखरांबा, मेतकूट ईतक्या चवी अजुनही जिभेवर आहेत ना. आता या वयात सुद्धा उन्हाळ्यातली वाळवणं उडीद पापड, साबुदाण्याच्या पापड्या आवर्जुन करत असते ती.

आज्जीची आमटी या पदार्थाच्या उल्लेखाशिवाय हे लेखन अपूर्ण आहे.आज्जीची खासियत म्हणजे तिनं केलेली आमटी. उद्या जर कोणी मला अमृत आणि आज्जीची आमटी असे दोन पदार्थ आणून दिले तर मी आधी आमटीची निवड करेन. मला आठवतं लहान असताना दर शनिवारी संध्याकाळी आम्ही फिरत फिरत मारुतीच्या देवळात जायचो. तिथुन आजीचं घर अगदी जवळ होतं. त्यामुळे तिच्याकडे चक्कर नक्कीच व्हायची. आम्ही घरी गेलो की तिचं सुरु व्हायचं काय करु ? चहा पोहे करु की जेवुन जाताय.पाउस वगैरे असेल तर हमखास शिरा आणि भजी असा मेनु तिचा असायचाच. पण मी आणि माझी बहिण नेहेमी विचारायचो आमटी आहे का शिल्लक सकाळची. मग आम्ही आमटी भात खातो. नसेल तर ताबडतोप कूकर लावुन गरम गरम आमटी भात १५-२० मिनिटात बनवुन वाढायची आज्जी.गोंदवल्याला मंदिरात प्रसाद म्हणुन मिळणारा आमटी-भात किंवा सज्जनगड वर मिळणारा आमटी-भात यातल्या आमटीला जी अवीट गोडी असते तीच माझ्या आजीनं केलेल्या आमटीला आहे. अजुनही कधी कराड ला जायचं असेल तर सका़ळी पुण्यातुन निघताना मी आज्जीला फोन करते " जेवायला येते आहे. जास्त काही करु नकोस. पातेलभंर भात आणि आमटी तेवढी कर. मला तेवढच पुरे " :-)

वरणफळं ही अजुन एक तिची खासियत. तिची वरणफळं करायची पद्धत वेगळीच आहे. आमटीला कांदा, खोबरं, आलं, लसुण असं सगळं वाट्ण लावुन मस्त झणझणीत आमटी ती करते. कणीक भिजवताना त्यात गुळाचं पाणी घालते. ईतकी भारी चव येते ना त्या वरणफळांना की बस्स..अत्तासुद्धा लिहिताना पाणी सुटलं तोंडाला. पातळ पोह्याचा चिवडा, खोबरा वड्या, वेगवेगळे लाडु, धपाटी आणि दही, साधी खिचडी कढी किंवा पिठलं भाकरी. यादी खुप मोठी आहे तिच्या हातच्या स्पेशल पदार्थांची. साध्या पाण्यालाही फोडणी दिली ना तिने तरी ते पाणी सुद्धा चवदार लागेल. :-)


आज्जी खुप सुंदर शिवणकाम करायची आणि शिकवायची. गावातल्या आणि तिच्या शाळेतल्या बर्याच मुलींना तिनं शिवण शिकवलं.पण मी तिच्याकडुन का नाही शिकले बेसिक शिवण याची मला आज खुप चुट्पुट वाटते.माझ्या मुलीसाठी तिनं खुप सुरेख दुपटी बनवली होती. पॅचवर्क केलेलं पिंपळपान, स्वस्तिकाचं डीझाईन असलेलं दुपट अतिशय सफाईदार पणे बनवलं होतं.तिने बनवलेल्या दुपट्यांची उब माझ्या मुलीला मिळाली हे तिचं भाग्यच.


ज्यावेळी आपलं मन अतिशय संवेदनशील असतं, आजुबाजुचे सगळे चांगले वाईट गुण टिपून घेण्यासाठी तयार असतं, त्या वयात मला माझ्या आज्जीचा खुप सहवास मिळाला. तिच्या वागण्यातुन आणि कृतीतून तिनं आमच्यासमोर अतिशय उत्तम आदर्श ठेवला.आवर्जुन काही गोष्टी अगदी मागे लागुन शिकवण्याचा अट्टाहास तिनं कधीही केला नाही. संस्कार हे कधी असे ठरवुन करता येतच नाहीत. ते कृतीतुन कळले पाहिजेत. सुसुत्रपणे पसारा न करता व्यवस्थीत नियोजन करुन स्वयंपाक कसा करायचा हे तिनं कृतीतुन दाखवुन दिलं. घरी आलेल्या पाहुण्याला, ,मग तो कोणीही असो, कधी विन्मुख पाठवु नये हे तिनं मनावर ठसवलं. एखाद्याचा कितीही राग आला तरी संयम पाळायचा कारण समोरची व्यक्ती कधीही वाईट नसते तर परिस्थीती तसं वागायला भाग पाडते हे तिनं तिच्या वागण्यातुन दाखवुन दिलं. माझा आदर्श कोण असं जर मला कोणी विचारलं तर मी माझ्या आजीकडे बोट दाखवेन.

आज २६ ऑक्टोबर २०१५, कोजागिरी पौर्णिमा, माझ्या आजीचा वाढदिवस.....हा वरचा लेख मी कित्येक दिवस आधी लिहुन ठेवला होता..पण लेख संपवुन प्रकाशित करायला वेळंच मिळाला नाही...आजच्यापेक्षा अजुन चांगला मुहुर्त असुच शकत नाही हा लेख प्रकाशित करण्यासाठी....

प्रिय आज्जी, आज ही तुला तुझ्या वाढदिवशी माझ्याकडुन भेट...
तुला दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो हीच परमेश्वराला मनापासुन प्रार्थना....

- तुझीच नात,
सौ.स्मिता. 

Monday, June 22, 2015

मश्रुम आचारी टिक्का

मश्रुम आचारी टिक्का



साहित्यः

१२-१५ मध्यम आकाराचे बटन मश्रुम्स
१ कांदा चौकोनी चिरुन
१ ढ्बु मिरची चौकोनी चिरुन
१ टोमॅटो चौकोनी चिरुन
२-३ चमचे घट्ट दही
१-२ चमचे डाळीचे पीठ ( भाजलेले असेल तर उत्तम. मी तसेच वापरले )
२ चमचे आलं-लसुण पेस्ट
२ चमचे केप्र किंवा तत्सम लोणचे मसाला. ( मी केप्र चा वापरला होता )
१/२ चीज क्युब खिसुन ( ऐच्छीक - मी नव्हती घातली )
१/२ चमचा कसूरी मेथी
१/२ चमचा साखर
१ चमचा लाल तिखट
मीठ, हळद, तेल
बांबु स्क्युअर्स कींवा लोखंडी सळ्या ग्रील करण्यासाठी.
किंवा काहीच नसले तरी हरकत नाही. :-)

सॅलड साठी :
१ कांदा उभा पातळ चिरुन
१ टोमॅटो उभा पातळ चिरुन
मीठ, तिखट, लिंबूरस

कृती :

१. प्रथम मश्रुम्स स्वच्छ कापडाने नीट पुसुन घावेत. मश्रुम्स कधीही धुवुन घेउन नयेत त्यांना खुप पाणी सुटतं आणी ते मऊ पडतात.मश्रुम्स ना खुप माती असेल तर एखादा स्वच्छ न वापरलेल्या टूथब्रश ने हलक्या हाताने साफ करुन घ्यावेत.देठ तसेच राहु द्यावेत.
२. कांदा, आणि ढबु मिरचीचे मोठे चौकोनी तुकडे करुन घ्यावेत.टोमॅटो च्या मधल्या बिया काढुन त्याचे पण मोठे तुकडे करुन घ्यावेत.
३. एका बाउल मद्धे दही, डाळीचे पीठ, आलं-लसुण पेस्ट, लोणच्याचा मसाला, कसुरी मेथी, साखर, तिखट, मीठ, हळद, चीज ईत्यादी सर्व मॅरीनेशन चे साहित्य घेउन नीट एकत्र करावे.
४. हे मॅरीनेशन मश्रुम्स, कांदा आणि ढबु मिरची च्या तुकड्यांना सर्व बाजुनी लागेल असे चोळावे. २०-२५ मिनीट्स फ्रीज मद्धे.( फ्रीजर नव्हे) झाकून ठेवावे. ३० मिनिट्स पेक्षा जास्त वेळ ठेवु नये.



५. बांबु स्क्युअर्स किंवा लोखंडी सळी वर आधी कांद्याचा तुकडा, मग टोमॅटो तुकडा खुपसुन घ्यावा. मग त्यावर मश्रुम देठाकडुन खुपसावे. मग त्यावर ढबु चा तुकडा खुप्सुन घ्यावा. मग परत कांदा, टोमॅटो, मश्रुम आणि ढबु असे अल्टरनेट खुपसुन घ्यावे.
६. आता तवा गरम करुन त्यावर एक चमचा तेल सोडावे आणि त्यावर या सळ्या/स्क्युअर्स अलगद ठेवावे.गोल गोल फिरवत सगळीकडुन नीट भाजुन घ्यावे.गॅस ची आच मध्यम असावी म्हणजे करपणार नाही व नीट भाजले जातील.

७. तंदुर ईफेक्ट येण्यासाठी डायरेक्ट गॅस च्या फ्लेम वर काही मिनिटे भाजावे.
८. सॅलड साठी दिलेले साहित्य एकत्र करुन सॅलड करुन घ्यावे.
९ गरमगरम मश्रुम टीक्का, सॅलड आणि लिंबाच्या फोडीसोबत सादर करावे आणि घरच्याची शाबासकी मिळवावी :-)





टीपा :-
१. लोणचे मसाला घालायच्या ऐवाजी गरम मसाला/ तंदूर मसाला देखिल छान लागतो.सोबत धणे-जीरे पूड घालावी.
२. बांबु स्क्युअर्स कींवा लोखंडी सळ्या नसतील तर नॉनस्टील पॅन वर मश्रुन एकमेकांपासुन अंतर सोडुन मांडुन घ्यावे व शॅलो फ्राय करुन घ्यावे.
३. पनीर किंवा चिकन किंवा बटाटे वापरुन हीच कृती करता येइल पण बटाटे आधी थोडे शिजवुन घ्यावे लागतील


माहितीचा स्त्रोत :
आंतजालावरील ब्लॉग्स आणि काही रेसिपी बुक्स.

Thursday, May 28, 2015

सुखी माणसाचा सदरा

"ताई जरा एक काम होतं."
"आज मला ३०० रु द्याल का उसने ? पुढच्या महिन्याच्या पगारात कापुन घ्या" कामवाल्या मावशी मला म्हणाल्या....

"काय झालं मावशी ? काही प्रॉब्लेम आहे का ? घरी सगळं ठीक ना ?"
मी असं म्हणताच हसुन म्हणाल्या की " आज मुलीचा वाढदिवस आहे.बरेच दिवसांपासुन मागे मागली आहे की मैत्रिणींना घरी बोलव आणि माझा पण वाढदिवस केक कापुन करायचा.ती पण ३-४ मैत्रिणींकडे जाउन आली वाढदिवसाला तेव्हापासुन डोक्यात हे खुळ घेतलय.आता आम्हाला कसं काय परवडायचं हो ताई पण पोरीचा हट्ट पण नाही ना मोडवत."

मला माझ्या लेकीचा धुमधडाक्यात केलेला वाढदिवस आठवला.शेवटी मुलं ती मुलंच. त्याना काय कळणार आर्थिक ओढाताण वगैरे.मी त्याना ४०० रु दिले.पण मग मलाच चिंता पडली की ४०० रु मद्धे त्या काय काय करणार.

" मावशी काय करायचं ठरवलयं." मी
" ताई तुम्हीच सुचवा ना काहितरी. मला तर काहिच सुचत नाहिये."

मी त्याना म्हटलं, मावशी तुम्ही मस्त भेळ बनवा आणि केक आणा. अय्यंगार बेकरीत छान बटर केक मिळतात तिथे चौकशी करा.भेळीच सामान कुठे मिळेल ? किती लागेल सगळं त्याना सांगितलं. चटणी कशी करायची ते पण नीट समजावलं.माझाकडे केसांना लावायचा एक नवीन आणलेला खडे असलेला रबर बँड होता तो त्यांच्या लेकीला माझ्यातर्फे एक छोटंसं गिफ्ट म्हणुन दिला.घरी जाताना खुश होत्या.

पण तरी माझ्या मनात रुखरुख लागुन राहिली. मी दिलेले एवढेसे पैसे पुरतील का त्याना ? अजुन थोडे द्यायला हवे होते.की चटणी तरी मीच करुन द्यायला हवी होती ? काल बोलल्या असत्या तर रात्री करुन ठेवुन आज दिली असती.पण आता आयत्यावेळी मला सुचलच नाही काही आणि वेळही नव्हता.असो.दिवसभर कामाच्या गडबडीत मी विसरुन पण गेले हे सगळं.दुसर्या दिवशी सकाळी मावशी आल्या.एकदम खुश होत्या.

" काय मावशी पुरले का पैसे " झालं का सगळं व्यवस्थित ?"
" ताई खुप मस्त केला मी पोरीचा वाढदिवस. तिच्या सगळ्या मैत्रिणीं खुश झाल्या. बर झालं तुम्ही भेळेचं सांगितलं मला. १५० रु चा केक आणला "गणराज" मधुन. १०० रु चे चुरमुरे आणि फरसाण आणले.५० रु चे कांदे, टमाटे कोथिंबीर हे सगळं आणंलं.तरी १०० रु उरले म्हणुन मग पोरीसाठी नवीन बांगड्या माळ आणि कानातलं आणलं. पोरगी फार फार खुश झाली बघा.
मला म्हणाली माझ्या सगळ्या मैत्रिणींपेक्षा मोठा झाला माझा वाढदिवस."

खुप भरभरुन बोलत होत्या मावशी. मला खुप बरं वाटलं.
"चला पोरगी खुश तर आपण खुश अजुन काय पाहिजे" मी.


मनात विचार करत राहिले मी. नकळत माझी आणि त्यांची तुलना सुरु झाली मनात.
माझ्या लेकीच्या हौसेपायी १०००० रु खर्चुन हॉल घेउन मी तिचा वाढदिवस साजरा केला होता. ६०-७० लोक, मोठा बार्बीचा केक, डेकोरेशन, १००-२०० फुगे. नवीन कपडे, रीटर्न गिफ्ट्स, काय नी काय....मला समाधान मिळालं नाही असं नाही. पण तरी जेवढा पैसा मी खर्च केला तो एखाद्या गरीबाला किती उपयोगी पडला असता.

आणि फक्त ४०० रुपयात मावशींनी किती मनापासुन लेकीचा आनंद साजरा केला. ईतक्या कमी पैशात उद्या मी असच समाधानाने वाढदिवस करु शकेन का ? पैसा वाढला तशा अनावश्यक गरजा पण वाढल्या हेही तितकच खरं आहे. आत्ता मी हा सगळा विचार करते आहे पण उद्या माझ्या लेकीचा पुढचा वाढदिवस आला की मी नवीन उत्साहानं परत नवीन प्लॅनिंग करेन कदाचित."कळतय पण वळत नाही" अशी आमच्या सध्याच्या पिढीची अवस्था आहे. माणसाकडे जितका पैसा वाढतो तितका तो असमाधानी बनत जातो का?

मागे अशाच एका आशयाची गोष्ट व्हॉट्स अ‍ॅप वर वाचनात आली होती. एका आज्जीबाईंनी ५०० रु. उसने घेउन त्यात सगळा खर्च बसवुन लेक, नात सगळ्यांची हौस भागवली होती. लेखकाने त्या लेखात उल्लेख केला होता की आजकाल एक पिज्झा घेतला तरी ५०० रुपये जातात पण त्या आज्जीनी खर्च केलेल्या ५०० रु चं मोल पिज्झा पेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे.

माझ्या मावशीनी त्या ३०० रु च्या बदल्यात मला बरचं काही शिकवलं. हाताच्या बोटावर मोजण्याईतके कपडे त्यांच्याकडे असतील पण सर्वात महत्वाचा असा "सुखी माणसाचा सदरा" त्यांच्याकडे आहे.
मला कधी मिळेल ?

 

(क्रीमशिवाय) क्रीम ऑफ पालक सुप ;-)

Popeye चं सुप या नावाने आमच्या घरात हे सुप लोकप्रिय झालय...हिरव्यागार रंगामुळे दिसायला अतिशय आकर्षक आणि चवीला सौम्य होत असल्याने लहान मुलांना अतिशय आवडते. आणि करायला एकदम झटपट...
फार पाल्हळ न लावता कृतीकडे वळतेच आता....

प्रमाण : २-३ माणसांसाठी
वेळ : १५-२० मिनिटे

साहित्य :

- पालक जुडी १/२ पेक्षा थोडी कमी
( पाने खुप नाजुन आणि छोटी असतील तर १/२ जुडी घ्या पण आजकाल पुण्यात मिळणारा पालक आळुशी स्पर्धा करत असल्याने फारच दांडगी पाने मिळतात )
- १/२ कांदा चिरुन
- ७-८ लसुण पाकळ्या
- १ कप दुध
- १ चमचा कणीक / कॉर्नफ्लोअर
- १ छोटी हिरवी मिरची
- मीठ, मिरीपुड चवीनुसार

कृती :

१. पालक पाने स्वच्छ धुवुन निथळुन घ्या. एका पसरट कढईत कांदा, ३-४ लसुण पाकळ्या आणि मिरची बुडतील एवढे पाणी घालुन शिजवायला ठेवा.
२. कांदा जरासा पारदर्शक झाला की त्यात पालक ची पाने हाताने तु़कडे करुन टाका.अजुन पाणी घालायची गरज नाही. पालकाला पाणी सुटेल.
३. पालक शिजला की गॅस बंद करा. (पालकाचे आकारमान एकदम कमी होउन कढईच्या तळाशी भाजीसारखे मिश्रण दिसु लागेल.तेव्हा झाला असं समजायचं )
४. मिश्रण जरा गार झाले की मिक्सर च्या भांड्यात काढुन घ्या आणि त्यात १ चमचा कणीक टाका.आणि बारीक पेस्ट करुन घ्या. छान गुळगुळीत पेस्ट झाली पाहिजे.
५. आता त्यात हळुहळु दुध घालुन एकजीव पेस्ट करुन घ्या.
६. हे मिश्रण पातेल्यात काढुन त्यात गरजेपुरत म्हणजे सुप जितकं पातळं हवं तितकं पाणी घालुन घ्या आणि चवीपुरते मीठ आणि मिरपुड घालुन एक उकळी काढा.
७. आता सगळ्यात चवदार भाग :
उरलेला ३-४ पाकळ्या लसुण एकदम बारीक चिरुन घ्या.
एका छोट्या कढल्यात १ चमचा तूप गरम करा आणि त्यात हा लसुण मस्त खरपूस तळुन घ्या आणि ही फोडणी सुपवर अगदी वाढायच्या वेळेस ओता...

तयार आहे गरमागरम (क्रीमशिवाय) क्रीम ऑफ पालक सुप ;-)

टीप :
१. डाएट साठी करताना शेवटची फोडणी वगळा.
२. मुलांना देताना यात ताजे घरचे लोणी कींवा चीज खिसुन टाका.
3.सुप मद्धे मीठ अगदी जपुन घाला कारण पालक अतिशय पटकन खारट होतो

Wednesday, May 27, 2015

केक पॉप्स

मागच्या आठवड्यात लेकीच्या शाळेतल्या सगळ्या पोरांना बोलवुन मस्त समर पार्टी केली.
तेव्हा खास म्हणुन हा पदार्थ करुन बघितला...बच्चे भी खुश बच्चो की मम्मी भी खुश.
लेकीलाच मदतिला घेतलं...तिला पण खुप मज्जा आली करताना....
त्याची ही रेसिपी...

साहित्यः

बेसिक वॅनिला केक ( घरी केलेला किंवा विकतचा) मी ग्रीन बेकरी चा प्लम केक वापरला
मोर्डे कंपनीचे किंवा ईतर चॉकलेट बार ( मिल्क, व्हाईट, डार्क सगळे मिक्स )
पॉप स्टिक्स
डेकोरेशन चे साहित्य ( स्प्रिंकल्स, चॉकलेट शेविंग्ज, क्रश्ड नट्स)

कृती:

  1. प्रथम तयार केक चे तुकडे करुन मस्त चुरा करुन घ्या. हे लेकीने केले.तिला फार मज्जा आली.
  2.  मावे मद्धे मिल्क आणि डार्क चॉकलेट विरघळुन घ्या आणि ते हळुहळु अंदाज घेत केक च्या चुर्यामद्धे मिसळा...गरज असेल तर थोडा दुधाचा हात लावुन घ्या....या मिश्रणाचे छोटे लाडु वळता आले पाहिजेत ईतपत घट्ट्/सैल करा
  3. आता या मिश्रणाचे छोटे छोटे लाडु वळुन घ्या आणि फ्रिज मद्धे ३० मि. साठी ठेवा ( फ्रिजर मद्धे नाही )
  4. तोवर आता दुसरीकडे ज्या रंगाचे पॉप्स बनवायचेत ते चॉकलेट वितळवुन घ्या.सजावटीचे सामान ई. तयार ठेवा.
  5. काही वेळाने यातील निम्मे गोळे/लाडु बाहेर काढा.वितळलेल्या चॉकलेट मद्धे पॉप स्टीक चे एक टोक बुडवुन घ्या आणि अलगद केक च्या लाडु मद्धे निम्म्यापर्यंत खुपसा..असे सगळे स्टीक करुन ते परत फ्रीज ला ठेवा...आणि उरलेले निम्मे बाहेर काढुन हीच कृती परत करा...असे केल्याने सगळे पॉपस व्यवस्थीत घट्ट राहतील नाहितर सगळ्या पॉपस ना स्टीक लावेपर्यंत सुरुवातीचे पॉप्स मऊ पडायला सुरुवात होईल.त्यामुळे बॅच प्रोसेसिंग महत्वाचे आहे :-)
  6. आता परत व्हाईट/मिल्क चॉकलेट वितळवुन घ्या.आधीची पॉप्स ची बॅच बाहेर काढुन घ्या. एक एक पॉप अलगद उचलुन चॉकलेट मद्धे घोळवा...जास्तीचे चॉकलेट बाउल च्या कडेवर अलगद टॅप करुन काढुन घ्या. आता लगेचच स्प्रिंकल्स इ इ त्यावर चिकटवा....हे लेकीने केले....:-)..तिच्यासाठी मस्त स्टार्स, हार्ट्स ई आणले होते मी...
  7. घरात थर्मोकॉल चा एखादा तुकडा असेल तर त्यात हे पॉप्स घुसवुन सुकायला ठेवा.
  8. अशाप्रकारे मस्त केक पॉपस बनवा आणि मस्त पार्टी करा...

टीप : पसारा बर्यापैकी होतो पण मजा पण येते करायला...पसारा आवरायला पोरांची मदत घ्या ;-)
माहितीचा स्त्रोत :
आंतरजाल

झटपट रवा डोसा..

साहित्यः
१.१वाटी मैदा
२.१वाटी रवा
३.२ चमचे दही(नसले तरी चालते)
४.३-४ हिरव्या मिरच्या(किती तिखट पचवु शकता त्यानुसार Smile )बारीक चिरुन
५.१-२ चमचे आलं-लसुण बारीक चिरलेला
६.भरपुर ताजा कढिपत्ता,बारीक चिरलेली कोथिंबीर
७.फोडणीचे साहित्य (जिरे,मोहरी,हिंग,हळद)
८.एक बारिक चिरलेला कांदा
९.मीठ
१०.१ चमचा साखर्(आवडत असल्यास)
कॄती:
रवा,मैदा,दही,मीठ,साखर आणि पाणी घालुन सारखे करावे आणि एक तास भिजवत ठेवावे...यात भरपुर पाणी लागते कारण रवा पाणी शोषुन घेतो...
आता तेलाची फोडणी करुन त्यात जिरे,मोहरी,हिंग,बारीक चुरलेला कढीपत्ता,बारीक चिरलेल्या मिरच्या,आले,लसुण,कोथिंबीर घालावे..
ही फोडणी आता डोश्याच्या पिठात ओतावी,कांदा घालावा आणि व्यवस्थीत हलवुन घ्यावे...गरजेनुसार पाणी आणि मीठ घालावे...
शेवटी जे पीठ तयार होइल ते खुप पातळ (आमटीसारखे पळीसांड झाले पाहिजे)
आता नॉनस्टीक तव्यावर थोडेसे तेल लावुन घ्यावे..आणि वाटीने पीठ पसरुन डोसा घालावा..
पीठ पसरताना आधी कडेने घालत घालत मग मध्यापर्यंत यावे...मधे मधे भोके ठेवावीत्...तसेच तवा तापलेला असताना पीठ घालावे...
एका बाजुन छान खरपूस भाजुन झाले की मग उलटुन टाकावे...मस्त कुरकुरीत डोसा तयार होईल....
आता नारळाच्या अथवा दाण्याच्या चटणी सोबत फस्त करावा Smile
चटणी ची कॄती
साहित्यः
शेंगदाणे मुठभर,२ पाकळी लसुण,२-४ लाल सुक्या मिरच्या,१ चिंचेचे बुटुक,मीठ्,साखर,
कॄती:
सर्व पदार्थ मिक्सरवरुन जरुरीप्रमाणे पाणी घालुन बारीक वाटणे...लाल मिरच्या नसल्यास लाल तिखट घालणे.
आवश्यक तेवढे पाणी घालुन सारखे करावे...
माहितीचा स्त्रोतः
आंतरजाल