Tuesday, June 22, 2021

दाल बाटी

 दाल बाटी


हा खास राजस्थानी प्रकार. खरतर ऑथेंटीक दालबाटी कशी लागते हे मी कधीच खाउन बघितलं नाहिये. पण दालबाटी आवडणारे लोक त्याचं कौतुक करताना थकत नाहीत म्हणुन बरेच दिवसांपासुन या प्रकार खाउन बघायची उत्सुकता होती.राजस्थान ची दाल बाटी, मध्यप्रदेश चे दाल बाफले, विदर्भातली वरण बट्टी हे सगळे भाउबंदच असं रेसिपी वाचताना लक्षात आलं.पण एकंदर कृती बघाता निखार्‍यावर भाजल्या जाणार्‍या या बाटी बद्दल जास्त उत्सुकता होती.
गेल्या लॉकडाउन मधे कराड मधे असताना आमच्याकडे पोळ्या करायला अनुराधा ताई नावाच्या एक गुजराथी मावशी यायच्या. कराड मधे खरतर खुप कडक लॉकडाउन चालु होता आणि ब्रेड,लादीपाव, पिझ्झा बेस,पाणीपुरीच्या पुर्‍या,भेळेच्या चटण्या, यीस्ट, क्रीम, चीज असे लक्झरी पदार्थ त्यावेळी तिथे अजिबात मिळत नव्हते.रोज रोज पोळी भाजी खाउन खाउन कंटाळा आलेला. फार फार तर इडली डोसे, भजी किंवा वडे.आणि इकडे पुण्यात लोक केक, बिस्किट, पाणीपुर्‍या, डाल्गोना कॉफ्या वगैरे चे फोटो रोज स्टेट्स ला टाकुन काव आणत होते.
तर या अनुराधा ताईंना एक दिवस सहज म्हटलं की वैताग आलाय पोळी भाजी खाउन काहीतरी वेगळं खायचय. त्यांनी विचारलं की मी तुम्हाला दालबाटी करुन देउ का ? कशी लागते माहित नाही पण थोड्या साशंक मनाने होकार दिला. त्यांच्या नॉनस्टॉप कॉमेंटरी सोबत ती दाल बाटी कशी बनते हे पाहिलं. त्यांनी बाट्या आप्पे पात्रात बनवल्या होत्या.
" तुम्ही किती नशीबवान बघा की ताई, तुम्हाला मी भेटले आता या लॉकडाउन मधे कामाला" असं त्यांच एक बेस्ट वाक्य मी आयुष्यात विसरणार नाही. अशी स्वत: वर खुश असलेली माणसं आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स असले तरी समाधानी असतात.
तर या दाल बाटी ची प्रेरणा अनुराधा ताई आहेत. रेसिपी मी अनुराधा ताई + इंटरनेट वरच्या काही अजुन रेसिपी अशी मिक्स केली आहे.

साहित्यः

बाटी:
२ वाट्या कणीक
३/४ वाटी रवा
१ चमचा दही
१/२ वाटी तुप ( हो वाटीच )
१ चिमुट सोडा
१ चमचा ओवा
चवीनुसार मीठ

दाल:
१ वाटी तूरडाळ
१/४ वाटी मूगडाळ
१/४ वाटी मसुरडाळ
१/४ वाटी हरभराडाळ
१ उभा चिरुन कांदा
१ छोटा चिरलेला टोमॅटो
१ तमालपत्र
२ लवंगा
३-४ मिरे
२ चमचे बारीक चिरलेला लसुण
१ चमचा खिसलेलं आलं
२ उभ्या चिरुन हिरव्या मिरच्या
जिरे, कढिपत्ता, हिंग, हळद,मीठ, लाल तिखट्,कोथिंबीर
तेल्/तूप मिक्स ( संपुर्ण तूप पण छानच लागेल :-) )
गरम मसाला १/२ टीस्पुन

कृती :

बाटी -
बाटी साठी दिलेले सर्व साहित्य हाताने व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. सर्व एकत्र केले की या पिठाचा मुटका झाला पाहिजे इतके तूप लागेल.(दिवाळीतल्या करंजीचे पीठ भिजवताना करतो तसे. ज्यांनी कधी करंज्या केल्या नाहियेत त्यांनी आपापल्या आई-आजी ला मुटका म्हणजे काय ते विचारा ) तूपात कंजुषी करु नये नाहितर बाटी चा अपेक्षित खुसखुशीतपणा साधला जात नाही.गरजेपुरते पाणी घालुन घट्ट मळुन घ्यावे आणि अर्धा तास झाकुन ठेवावे.
( रवा जाड असेल तर किंचीत जास्त पाणी घालुन मळावे आणि तासभर मुरु द्यावे.)
तासाभराने परत एक-दोन मिनिटे हे पीठ छानपैकी एकत्र मळुन घ्यावे आणि त्याचे लिंबाएकढे गोळे करावेत. गोळे करताना थोडे ओबडधोबड, चिरा राहतील असे करावे.
खुप गुळगुळीत नको. असे केल्याने बाटी आतपर्यंत मस्त बेक होते.
ओव्हन कन्व्हेक्शन मोड वर १८० डीग्री ला प्रीहीट करुन घ्यावा. आता सगळ्यात उंच रॅक अथवा बेकींग डीश मधे बाट्या मांडुन १८० डीग्रीवरती वरतीच २० मिनिटे बेक करावे. वरुन छान खरपुस तपकिरी रंग आला असेल. आता बाटी उलटुन परत १० मिनिटे सेम सेटींग वर बेक करावे.
बाट्या तयार.




दाल -
सर्व डाळी एकत्र करुन १/२ तास पाण्यात भिजवुन ठेवाव्यात. त्यात मीठ, हिंग, हळद, चिरलेला कांदा, टोमॅटो घालुन कुकर मधे मौसुत शिजवुन घ्यावे.
कढई मधे तूप्/तेल एकत्र करुन त्यात जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, लसुन, मिरच्या, कढिपत्ता ची फोडणी करुन डाळ त्यात ओतावी.
खुप दाट वाटत असेल तर थोडे पाणी घालुन उकळी काढावी.



आता सगळ्यात चवदार आणि महत्वाचा भाग -

तुपाचा तडका -
३-४ चमचे साजुक तूप गरम करुन त्यात १/२ चमचा लाल तिखट घालावे आणि लगेच गॅस बंद करावा.

वाढणी -

खरतर ही भाजलेली बाटी असते तिला खाली उतरल्यावर तुपात अंघोळ घालायची असते म्हणे. पण माझं काही एकढ धाडस नाही झालं :-)

तर बाउल मधे २ बाट्या घेऊन त्यावर पातळ केलेले साजुक तूप घालावे. त्यावर गरम डाळ आणि वरुन तुपाचा तडका २ चमचे घाला.
गरम गरम आस्वाद घ्यावा.





No comments:

Post a Comment