काश्मीर डायरीज - 2
15 मे 2022..
सकाळी 11 वाजता श्रीनगर मध्ये पोचलो.विमान उतरतानाचे दृश्य बघूनच शब्दशः "दिल गार्डन गार्डन" असं झालं... विमानतळावर पण जिथे जागा मिळेल तिथे हिरवळीचे तुकडे आणि त्यातून डोकावणारी गुलाबाची फुलं..
पुणे 34 डिग्री >> दिल्ली 40 डिग्री >> श्रीनगर 18 डिग्री असा टप्पा सुमारे बारा-तेरा तासात पार केला होता..
विमानतळावर उतरताच पहिल्यांदा जॅकेट चढवलं.
बाहेर आलो तर ट्रॅव्हल कंपनीचा माणूस हातात माझ्या नावाचा वेलकम बोर्ड घेऊन उभा होता...आपल्या नावाचा बोर्ड घेऊन माणूस उभा असायचा हा पहिलाच प्रसंग .. मज्जाच वाटली...
हा माणूस म्हणजे इनायत भाई.. पुढचे 6 दिवस आमच्या सोबत असणार होता...
सगळं सामान पटापट गाडीत भरून आमचा प्रवास सुरु झाला तो पहलगाम च्या दिशेने..
"मंजिल से बेहेतर रास्ते" चा प्रत्यय काश्मीर मध्ये कुठेही प्रवास करताना येतो तसाच किंबहुना त्याहून सुंदर असा हा प्रवास होता..... रास्ते तर सुंदर होतेच पण मंजिल सुद्धा तितकीच सुंदर ...
पहलगाम ला जाताना वाटेत केशराची शेते दिसली. म्हणजे सध्या केशराची फुलं नव्हती पण तरी दूरवर पसरलेल्या त्या विस्तीर्ण शेतात जेव्हा केशराची जांभळी फुलं फुलत असतील तेव्हा किती सुरेख दृश्य दिसत असेल याची कल्पना करूनच मस्त वाटलं..
वाटेत जेवण आणि काश्मिरी कहावा चा आस्वाद घेऊन पहलगाम च्या दिशेने निघालो..
Welcome to Pahalgam ची कमान लागली आणि किती पाहू आणि किती नको अशी अवस्था झाली..
डावीकडे अखंड खळाळत वाहणारी लीडर नदी, आभाळाशी स्पर्धा करणारे पाईन चे वृक्ष, हिरवेगार डोंगर,चिनार आणि अक्रोडची झाडं असं सुरेख चित्र समोर उभं होतं... सुरवातीला उत्साहात दाणादण फोटो काढत सुटलो पण नंतर लक्षात आलं की हे दृश्य फोटोत मावणारच नाही.. मग गपचूप कॅमेरा आत टाकला आणि डोळ्यात साठवून घ्यायला सुरुवात केली..
साधारण 3 वाजता आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो..
Hotel Pahalgam Retreat..
लीडर नदीच्या काठी असलेले आणि हिरव्या डोंगरांचा नजारा दाखवणारे हे सुरेख टुमदार हॉटेल बघून प्रवासाचा सगळा शीण गायब...
लीडर च्या पाण्याचा खळखळाट अखंड ऐकू येत होता.. शुद्ध स्वच्छ हवा,हॉटेल समोर राखलेली सुरेख हिरवळ आणि त्यात फुलांचा उत्सव मांडला होता..
" किती रे तुझे रंग, किती तुझ्या छाया,
दोनच डोळे माझे, उत्सव जातो वाया"
अशी अवस्था..
दमून भागून आलेलो, जेवणामुळे पोट जड झालेलं पण खोलीत जाऊन झोपायची इच्छा होईना..
बाहेर बागेत रेंगाळत बसलो..
थोडा वेळाने समोर नदीवर जाऊन भरपूर फोटो काढले..
थोडेसे ढग होते ते बाजूला सरले आणि समोर थेट बर्फ़ाचे शुभ्र डोंगर दर्शन देऊ लागले.. आहाहा.. अजूनही डोळ्यासमोरून चित्र जात नाहीये...
सगळी संध्याकाळ तिथे घालवून मग रात्री हॉटेल मध्ये जेवण करून बाहेर आलो तर पौर्णिमेचा चंद्र समोर दिसत होता..
एखादा दिवस किती सुंदर असावा..
हा दिवस दाखवल्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार मानत आणि उद्याची सुंदर स्वप्नं बघत मऊ दुलईत शिरलो..
Travel tips -
-- पहलगाम अतिशय सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही काश्मीर ट्रिप प्लॅन करताना यासाठी किमान 2 दिवस जरूर बाजूला ठेवा.
-- आमचे हॉटेल मूळ पहलगाम गाव/मार्केट च्या 12-13 किमी अलीकडेच पायथ्याला होते. वर मार्केट आणि गावात खूप गर्दी आहे. त्यापेक्षा खाली जास्त सुंदर शांत वाटले.
No comments:
Post a Comment