Monday, July 11, 2022

काश्मीर डायरीज - 4

काश्मीर डायरीज - 4

17 मे 2022
रात्रभर अरु, बेताब, बैसरन व्हॅली ची स्वप्नं बघत बघत मस्त झोप झाली.😊 सकाळी 5.30 लाच बाहेर लख्ख उजाडलं होतं. पटकन आवरून परत एकदा बाहेर नदीवर जाऊन आले. पहलगाम ला आज निरोप द्यायचा होता. परत एकदा लीडर नदी चा खळखळाट कानात साठवून घेतला. भरपूर शुद्ध हवा छातीत भरून घेतली.
रूम वर येऊन पटापट आवरून चेकआउट करून निघालो...
आजचा मुक्काम होता.. दल लेक, श्रीनगर🏞️
वाटेत ओळीने सफरचंदाच्या बागा लागत होत्या...🍎🍎
सध्या सिझन नाही पण तरी छोटी छोटी हिरवी सफरचंद लागली होती झाडांना.. एका बागेपाशी गाडी थांबवली.
बाहेर सफरचंदाचा ताजा ज्यूस आणि इतर बरेच प्रॉडक्ट्स विक्री चालू होती..
आत बागेत एक फेरफटका मारला..
पहिल्याच झाडाला 3-4 छोटीशी थोडी लालसर सफारचंदे लटकली होती. पुढे जाऊन सगळी बाग पहिली. सगळ्या झाडांना लहान लहान हिरवी सफरचंद लागली होती. अगदी आपल्या पेरू सारखी दिसत होती.. पहिल्याच झाडाला लाल सफरचंद कशी काय बुवा म्हणून मागे येऊन बघतो तर तारेने बेमालूम पणे झाडाला बांधलेली ती सफरचंदे बघून हासू आवरेना..🤣🤣 मार्केटिंग गिमिक्स साठी काय काय करतील लोक.. धन्यवादच..
पण काही का असेना...निदान झाडाला आलेली सफरचंदे कशी दिसत असतील याचा अंदाज आला.
बाहेर चवीला म्हणून 1 ग्लास ताज्या सफारचंदांचा ज्यूस घेतला तर मस्त गोड होता... तिथे मग मनसोक्त ताजा ज्यूस पिला... सोबत सफरचंदाचे लोणचे, चटणी, जॅम, सॉस अशा अनेक गोष्टी चव घेऊन पाहिल्या... सर्व वस्तू अप्रतिम चवदार. Apple cyder vinegar पण मस्तच होते. भरपूर खरेदी करून तिथून निघालो...
पुढचे ठिकाण होते "मार्तंड सूर्य मंदिर"
आमच्या itinerary मध्ये नसलेले हे ठिकाण, पण इनायत भाईंनी आग्रह करून आम्हाला इथे नेले. तुम्हाला खूप आवडेल असे म्हणत वाटेतले हे एक अनवट फारसे टुरिस्ट लोकांना नाहीत नसलेले हे एक सुंदर मंदिर आहे.
शेजारी एक गुरुद्वारा सुद्धा आहे.
शंकर पार्वती, गणपती अशी छोटी छोटी मंदिरे आणि पूर्वी कधीच ना बघितलेले असे सूर्याचे मंदिर इथे आहे. समोर मोठा चौकोनी तलाव आणि त्यात भरपूर मासे. शांत स्वच्छ असा परिसर आहे हा.खुप प्रसन्न वाटले तिथे.🙏
तिथून पुढचे ठिकाण होते "अवंतीपुरा मंदिर"
अनंतनाग जिल्ह्यातील अतिशय सुंदर असे हे ठिकाण.
अवंतीवर्मन राजा ने 9 व्या शतकात झेलम नदीच्या काठी बांधलेल्या विष्णु मंदिराचे हे अवशेष आहेत. संपूर्ण दगडातील हे मंदिर वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे.
आम्ही पोचलो तेव्हा भर दुपार होती पण तरी मंदिराच्या आवरातली बाग, आजूबाजूचे डोंगर आणि झाडांमुळे मस्त गार वारा येत होता.
काश्मीर ची हीच मजा आहे.. वर डोक्यावर कितीही उन्ह असुदेत, अजिबात गरमी होत नाही. हवा सतत थंड, आल्हाददायक असते.
या ठिकाणी सुप्रसिद्ध आंधी चित्रपटातील "तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नाही" या गाण्याचे शूटिंग झाले होते.. मग आमच्या "संजीव कुमार" सोबत तिथे जोरदार फोटोसेशन आणि व्हिडीओ शूटिंग करून घेतले.. सोडते का काय 😉
पुढचा सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे केशर खरेदी..
वाटेत पम्पोर गावाजवळ केशराची शेते आणि दुकाने आहेत.तिथे मनसोक्त खरेदी केली. केशर, अक्रोड, बदाम, केशर क्रीम, अत्तर असे अनेक उत्तम प्रकार तिथे होते. खिसा फारच हलका झाला. काश्मीर मध्ये कितीही ठरवलं तरी खरेदीचा मोह टाळूच शकत नाही. 😎
आता मात्र मंडळी दमली आणि गाडी थेट श्रीनगर च्या दिशेने धावू लागली.
आज चे लंच जरा खास होते. प्रसिद्ध "काश्मिरी वाझवान" चाखायला जायचे होते आज.🍛
श्रीनगर मधील त्यासाठी खास असलेल्या "मुघल दरबार" या हॉटेल मध्ये पोचलो.
वाझवान म्हणजे काश्मिरी मेजवानी. काश्मीर मध्ये लग्न समारंभात खास आचारी बोलावून हे बनवले जाते.
तिथले लोक पक्के भातखाऊ..
त्यामुळे भात आणि वेगवेगळे मांसाचे प्रकार म्हणजेच रोगनजोश, तबकमाझ, रीस्ता,गुश्टाबा, कबाब अशा भारीपैकी नावांचे वेगवेगळे रस्से म्हणजे वाझवान..
भरपेट खाऊन आता डोळ्यावर झोप यायला लागली होती.. 3.30 वाजून गेले होते..थोडी पावसाची भुरभुर सुरू झाली होती.. हवा जरा अजूनच गार झाली होती...
आता थेट हाऊसबोट वर जाऊन जरा आराम करू म्हणून थेट दल गेट No 8 ला पोचलो..
समोर दिसत होती आमची हाऊसबोट..
The Royal Sovereign...
दल लेक ला पोचलो आणि एकदम वेगळ्याच जगात पोचल्यासारखं वाटलं..
आमच्यासाठी शिकारा तयार होता.. त्यात बॅग्स चढवल्या, आम्ही पण चढलो आणि आमच्या हाऊसबोट कडे निघालो.. मस्त गार वारा येत होता. ढग आल्यामुळे उन्ह गायब झालं होतं. 5 मिनिटात आमच्या हाऊसबोट मध्ये पोचलो सुद्धा. तिथल्या गुलजार भाईंनी छानपैकी हसून स्वागत केलं..
आमच्या तरंगत्या राजेशाही घरात आम्ही प्रवेश केला..
किती सुंदर सजवली होती ती हाऊसबोट.. संपूर्ण लाकडात बनवलेली, उंची पडदे, गालिचे, झुंबर, शिसवी मोठे नक्षीदार डायनिंग टेबल आणि 4 बेडरूम्स.. तरंगता महालच...🏰
बाहेर डेक वरच बसून राहवेसे वाटत होते.. शिकारे येत जात होते.. हलका पाऊस सुरू झालेला..
झोपायचा बेत रजईत गुंडाळला आणि पुढच्या अर्ध्या तासात आमच्या शिकारा राईड साठी आम्ही बाहेर पडलो सुदधा...
पाऊस थांबला होता पण अजून हवा ढगाळ होती. दल लेक ची आणि तिथल्या तरंगत्या मार्केट ची सफर करायला आम्ही शिकारा मध्ये स्थानापन्न झालो..
गाद्या, उशा, पडदे असलेल्या त्या शिकारामध्ये मस्त पाय पसरून बसलो.. शिकारावाला अखंड बडबड करत लेक बद्दल सांगत होता..
थोडं पुढे गेलो तर मस्त पाऊस सुरू झाला.. दल च्या मध्यभागी एक तरंगते हॉटेल होते. तिथे स्टॉप घेऊन लगेच मॅगी आणि भजी ऑर्डर केली. शिकारा मध्ये बसून बाहेर चा पाऊस बघत भजी खाणं म्हणजे सुख...
पुढे जाऊन तरंगणारी शेती बघितली, मीनाबाजार म्हणून दल मध्ये मार्केट आहे.. तिथे एक चक्कर मारून आलो.. पण मुलखाचा महाग..
परत येता येता पाऊस थांबला, जोरदार वारा सुटला आणि समोरचे सगळे ढग बाजूला सरले.. आता समोर थेट दिसत होते गुलमर्ग चे बर्फ़ाचे डोंगर...
आत्ता लिहिता लिहिता सुद्धा ते दृश्य आठवून काटा आला अंगावर.. काश्मीर ला किती प्रकारचं सौंदर्य लाभलंय..पहलगाम मधून दिसणारे बर्फ़ाचे डोंगर आणि आत्ता दल लेक मधून दिसणारे डोंगर यात किती तरी वेगळेपण होतं.. दोन्ही तितकंच सुंदर.. तुलनाच करता येणार नाही..
शरीर आणि मन दोन्ही तरंगतच परत बोट वर आलो.
घरगुती गरम जेवण जेऊन दुलई मध्ये कधी झोप लागली कळलेच नाही...
-- क्रमशः







काश्मीर डायरीज - 3

 काश्मीर डायरीज - 3

16 मे 2022
सकाळी जाग आली तर दूरवर पावसाचा आवाज येत होता.. 6.15 ला उठले तेव्हा बाहेर व्यवस्थित पाऊस.. गोंधळ क्रमांक 2...🙄
मनात म्हणलं...झालं आता कल्याण.. कसलं काय मिनी स्वित्झर्लंड न काय.. बसा गुपचूप खोलीत टीव्ही बघत..
पण...
"अगर किसी चीज को आप शिद्दत से चाहो.. तो पूरी कायनात.. " वगैरे वगैरे.. असं खुद्द शाहरुख खानने आपल्याला सांगितलंय.. ते खरंच आहे बरका..😉
8 वाजता जादू झाल्याप्रमाणे पाऊस बंद....
एकदम स्वच्छ निळं आकाश आणि सूर्य महाराज नोकरीवर हजर...
सोमवार होता त्यामुळे बहुतेक लेट आले साहेब.. Monday Blues काय फक्त आपल्या सामान्य माणसालाच व्हावेत की काय ..😂
ते उन्ह बघून आमच्या गोटात एकदम आनंद पसरला आणि पटापट सगळं आवरून 6 मराठी वीर पहलगाम च्या घोड्यांवर बसायला तय्यार... 😎
वर पहलगाम चा घाट चढायला सुरू केले तसा रस्ता अधिकाधिक सुंदर होत होता. इनायत भाईंनी सगळ्या सूचना देऊन ठेवल्या होत्या.पोनी/घोडा स्टँड वर पोचून जमेल तितकं बर्गेनिंग स्किल वापरून ( तुळशीबाग ट्रेनिंग कामी आलं ) शिवाजीराजांचं नाव घेऊन आम्ही 6 जण घोड्यावर स्वार झालो.. "बैसरन" म्हणजेच मिनी स्वित्झर्लंड च्या दिशेने कूच केले...
प्रत्येकी 2 घोड्या सोबत 1 हेल्पर असे सोबत चालू लागले.. या पहाडात राहणाऱ्या लोकांचा स्टॅमिना बघून आश्चर्य आणि लाज वाटते राव.. पूर्ण 40-45 मिनिटांचा 6 किमी चा चढ असलेला डोंगर घोड्यांसोबत अगदी आरामात चढत होते ते लोक..आम्हाला घोड्यावर बसून घाम फुटला होता पण हे लोक अखंड गप्पा मारत चालत होते..
घोडा जरा डोंगराच्या टोकाला जायला लागला की आमची पाचावर धारण...पण ते भाईलोक एकदम निवांत
"अरे भाई इसको धरो, उसका पाय सटकेगा" भीतीमुळे हिंदी ची चिंधी होत होती...
"डरो मत दीदी, घोडेको भी उसकी जान प्यारी है" भाई एकदम निवांत..😄😄
माझ्या घोड्याचं नाव तर "सलमान".. त्याने भाईजान चे बरेच पिक्चर पण पाहिले असावेत.. सरळ चालायचं नावच घेत नव्हता भाऊ.. खड्डा दिसला की गेलाच तिकडे.... 😨😆
40 मिनिटे ही कसरत केल्यावर एक दगडी कमान आणि गेट दिसले.. तिकिटं काढून आत शिरलो आणि...
आहाहा.. सगळ्यांच्या तोंडून एकदम उद्गार निघाला...
विस्तीर्ण पसरलेलं हिरवगार पठार आणि त्याच्या चारही बाजूने बर्फ़ाचे डोंगर...
लहान मुलांसारखे पळत सुटावेसे वाटत होते... 🥰🥰
फोटो चा पहिला भर ओसरला.. मग जरा निवांत हिरवळीवर बसून आराम केला..
इतक्यात तिथे काश्मीरी कपड्याचे स्टॉल दिसले..
समस्त महिला वर्गाने "काश्मीर च्या कळ्या(?)" बनून मनसोक्त फोटो काढले.. 😍
पुरुष वर्गाला तसले कपडे न आवडल्याने त्यांनी स्वतःचे असे फोटो काढायला नकार दिला. ( शेजारीच एक काकु आणि काकांचे या विषयावर भांडण चालू होते.. काकांना अजिबात न आवडलेले कपडे त्यांनी घालावे म्हणून काकु मागे लागल्या होत्या.. तो सीन रिपीट होऊ नये म्हणून मग मी पण गप्प बसले..) 😉😆
रंगीत अल्युमिनियम टमरेल cum मटका, फुलांचा फ्लॉवरपॉट यासोबतच ससे, मेंढ्या असे जिवंत props हातात घेऊन आम्ही मनसोक्त फोटो काढले.. ( एकदा वेडेपणा करायचा ठरवला की पुरेपूर करावा नाही का..)
मग भुका लागल्यावर चहा, भजी, मॅगी खाऊन परतीचा रस्ता धरला..
उतरताना अजून जास्त मजा ( आमची मजा आणि घोडेवाल्यांची करमणूक ) करत खाली पोचलो..😇
त्या घोड्यावर तोल सांभाळत बसायचं, शिवाय आणि ढाल तलवार हातात धरायची आणि शत्रूला कापायचा ते पण अवघड अशा दऱ्याखोऱ्यात... इतके उद्योग महाराज आणि मावळे कसे करत असतील या विचाराने मनोमन एकदा शिवरायांना मुजरा घातला...🙏
पहलगाम मार्केट मध्ये एका बऱ्या हॉटेल मध्ये जेवण करून थोडीफार शॉपिंग केली ***.
आता पुढचे ठिकाण होते "बेताब व्हॅली" आणि "अरु व्हॅली"
इथे जाण्यासाठी लोकल टॅक्सी करावी लागते ती इनायत भाईंनी बघून दिली आणि बेताब ला निघालो...
टॅक्सी वाला फॉर्म्युला 1 रेस चा चाहता होता त्यामुळे भयानक वेगात "बेताब" होऊन गाडी चालवत होता.. 🙈
तिथे पोचलो तर भयंकर ट्राफिक जाम..
गाडीतून उतरून चालत चालत उतार उतरून खाली व्हॅली पर्यंत जावे लागले ( ट्रॅफिक जॅम नसता तर खालपर्यंत गाडी जाते) आणि तिथेच सगळा स्टॅमिना खलास झाला..
बेताब व्हॅली म्हणजे लीडर नदी जवळ पसरलेली एक सुरेख बाग आहे.. तिथे छोटे छोटे पूल आहेत, गझिबो आहेत, एक छोटा तलाव आहे, 2-3 गोड दिसणारी उतरत्या छपराची घरं आहेत,भरपूर फुलं आहेत.. ❤️
बेताब या हिंदी सिनेमा चं शूटिंग झालेलं ठिकाण म्हणून नाव बेताब व्हॅली...
तिथे पोचेपर्यंत बरेच चालावे लागल्यामुळे , आत गेल्यावर हिरवळीवर लोळायला सुरू केले.... पूर्ण व्हॅली बघायला 1-2 तास नक्कीच पुरणार नाहीत.. एक पूर्ण दिवस सुद्धा कमीच पडेल.. पण इतका वेळ आमच्या कडे नव्हता त्यामुळे जेवढं दिसलं त्यावर समाधान मानून तिथून बाहेर पडलो आणि काय..
गोंधळ क्रमांक 3..🙄
माननीय टॅक्सी चालकाने वर रस्त्यावर जिथे सोडले होते तिथे हाशहुश करत पोचलो तर महाराज गायब..त्याचा नंबर पण नाही जवळ.. मग इनायत भाईंच्या मदतीने त्याच्याशी संपर्क केला तर ट्रॅफिक क्लिअर झाले म्हणून साहेब सगळा उतार उतरून खाली जाऊन आमची वाट बघत बसले होते आणि आम्ही तोच सगळा चढ चढून वर येऊन त्यांची वाट बघत बसलो..
असो.... बडे बडे देशो मे छोटी छोटी गलतिया होती है ना.. ( रा. रा. शाहरुख खान परत एकदा .. बघा किती तत्वज्ञान असतं भारतीय सिनेमात..आणि लोक उगीच सिनेमाला नावं ठेवतात..) 😄
मग जरा गरमागरमी झाली ,आता थेट रूम वर जाऊ वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या.. पण पहलगाम च्या गार हवेने लगेच लोक शांत झाले आणि अरु व्हॅली ला एक चक्कर मारून येऊ असे ठरले...
अरु व्हॅली चा रस्ता म्हणजे रस्ताच होता...एकावेळी जेमतेम दोन लहान गाड्या जाऊ शकतील असा थोडा अरुंद रस्ता.. एकीकडे डोंगर, दुसरीकडे दरी आणि त्यातून वाहणारी लीडर.. पाईन ची झाडं, हिरवेगार डोंगर, मधून वाहणारे धबधबे, छोटी छोटी मातीची घरं,चरायला सोडलेल्या मेंढ्या, घोडे...नितांतसुंदर निसर्ग.... 🥰
त्या रस्त्यावरून अरु व्हॅली पर्यंत जाऊन परत येणे हा प्रवास अप्रतिम होता.. पण परत तेच.. वेळ कमी पडला.. असो..
आमच्या फॉर्म्युला 1 टॅक्सी वाल्याने सुखरूप पहलगाम टॅक्सी स्टँड ला आणले आणि इनायत भाईंच्या हाती सोपवले एकदाचे...
सुंदर आणि थकवणारा दिवस संपला होता..
हॉटेल वर जाऊन फ्रेश होऊन आणि अप्रतिम जेवण ( तिथं खाल्ली तशी फ्लॉवर ची भाजी मी आजवरच्या आयुष्यात कधीच खाल्ली नाहीये) जेऊन अंथरुणावर पाठ टेकली तरी घोड्यावर बसल्यासारखे वाटत होते...
***Travel tips -
-- काश्मीर स्पेशल खरेदीसाठी पहलगाम अतिशय स्वस्त आहे. पुढे श्रीनगर मध्ये बघू वगैरे अजिबात विचार न करता व्यवस्थित खरेदी करा.
"इधर डुप्लिकेट माल मिळता है याहा मत लो दीदी, मै आगे श्रीनगर मे आपको फॅक्टरी मे लेके जाता हु" असे कोणीही कितीही म्हणाले तरी कोणाचंही ऐकू नका.. बिनधास्त खरेदी करा.
-- मार्केट मध्ये पॅराडाइज हॉटेल च्या शेजारी गल्ली मध्ये सुंदर शाली,स्टोल आणि स्वेटर मिळाले. तेच पुढे श्रीनगर ला दुप्पट तिप्पट दरात होते.
-- क्रमशः






काश्मीर डायरीज - 2

 काश्मीर डायरीज - 2

15 मे 2022..
सकाळी 11 वाजता श्रीनगर मध्ये पोचलो.विमान उतरतानाचे दृश्य बघूनच शब्दशः "दिल गार्डन गार्डन" असं झालं... विमानतळावर पण जिथे जागा मिळेल तिथे हिरवळीचे तुकडे आणि त्यातून डोकावणारी गुलाबाची फुलं..
पुणे 34 डिग्री >> दिल्ली 40 डिग्री >> श्रीनगर 18 डिग्री असा टप्पा सुमारे बारा-तेरा तासात पार केला होता..
विमानतळावर उतरताच पहिल्यांदा जॅकेट चढवलं.
बाहेर आलो तर ट्रॅव्हल कंपनीचा माणूस हातात माझ्या नावाचा वेलकम बोर्ड घेऊन उभा होता...आपल्या नावाचा बोर्ड घेऊन माणूस उभा असायचा हा पहिलाच प्रसंग ☺️☺️.. मज्जाच वाटली...
हा माणूस म्हणजे इनायत भाई.. पुढचे 6 दिवस आमच्या सोबत असणार होता...
सगळं सामान पटापट गाडीत भरून आमचा प्रवास सुरु झाला तो पहलगाम च्या दिशेने..
"मंजिल से बेहेतर रास्ते" चा प्रत्यय काश्मीर मध्ये कुठेही प्रवास करताना येतो तसाच किंबहुना त्याहून सुंदर असा हा प्रवास होता..... रास्ते तर सुंदर होतेच पण मंजिल सुद्धा तितकीच सुंदर 🥰...
पहलगाम ला जाताना वाटेत केशराची शेते दिसली. म्हणजे सध्या केशराची फुलं नव्हती पण तरी दूरवर पसरलेल्या त्या विस्तीर्ण शेतात जेव्हा केशराची जांभळी फुलं फुलत असतील तेव्हा किती सुरेख दृश्य दिसत असेल याची कल्पना करूनच मस्त वाटलं..
वाटेत जेवण आणि काश्मिरी कहावा चा आस्वाद घेऊन पहलगाम च्या दिशेने निघालो..
Welcome to Pahalgam ची कमान लागली आणि किती पाहू आणि किती नको अशी अवस्था झाली..
डावीकडे अखंड खळाळत वाहणारी लीडर नदी, आभाळाशी स्पर्धा करणारे पाईन चे वृक्ष, हिरवेगार डोंगर,चिनार आणि अक्रोडची झाडं असं सुरेख चित्र समोर उभं होतं... सुरवातीला उत्साहात दाणादण फोटो काढत सुटलो पण नंतर लक्षात आलं की हे दृश्य फोटोत मावणारच नाही.. मग गपचूप कॅमेरा आत टाकला आणि डोळ्यात साठवून घ्यायला सुरुवात केली..
साधारण 3 वाजता आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो..
Hotel Pahalgam Retreat..
लीडर नदीच्या काठी असलेले आणि हिरव्या डोंगरांचा नजारा दाखवणारे हे सुरेख टुमदार हॉटेल बघून प्रवासाचा सगळा शीण गायब...
लीडर च्या पाण्याचा खळखळाट अखंड ऐकू येत होता.. शुद्ध स्वच्छ हवा,हॉटेल समोर राखलेली सुरेख हिरवळ आणि त्यात फुलांचा उत्सव मांडला होता..
" किती रे तुझे रंग, किती तुझ्या छाया,
दोनच डोळे माझे, उत्सव जातो वाया"
अशी अवस्था..
दमून भागून आलेलो, जेवणामुळे पोट जड झालेलं पण खोलीत जाऊन झोपायची इच्छा होईना..
बाहेर बागेत रेंगाळत बसलो..
थोडा वेळाने समोर नदीवर जाऊन भरपूर फोटो काढले..
थोडेसे ढग होते ते बाजूला सरले आणि समोर थेट बर्फ़ाचे शुभ्र डोंगर दर्शन देऊ लागले.. आहाहा.. अजूनही डोळ्यासमोरून चित्र जात नाहीये...
सगळी संध्याकाळ तिथे घालवून मग रात्री हॉटेल मध्ये जेवण करून बाहेर आलो तर पौर्णिमेचा चंद्र समोर दिसत होता..
एखादा दिवस किती सुंदर असावा..
हा दिवस दाखवल्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार मानत आणि उद्याची सुंदर स्वप्नं बघत मऊ दुलईत शिरलो..
Travel tips -
-- पहलगाम अतिशय सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही काश्मीर ट्रिप प्लॅन करताना यासाठी किमान 2 दिवस जरूर बाजूला ठेवा.
-- आमचे हॉटेल मूळ पहलगाम गाव/मार्केट च्या 12-13 किमी अलीकडेच पायथ्याला होते. वर मार्केट आणि गावात खूप गर्दी आहे. त्यापेक्षा खाली जास्त सुंदर शांत वाटले.
-- क्रमशः





काश्मीर डायरीज - 1

 काश्मीर डायरीज - 1

"आई आपण बर्फात कधी जायचं ?"
अगदी 5-6 वर्षांची असल्या पासून मधुजा प्रत्येक सुट्टी जवळ आली की आम्हाला म्हणायची.. एकदा अगदी सगळं ठरवता ठरवता काश्मीर ट्रिप फिसकटली होती..
त्यानंतर लांबतच गेली..
गेल्या 2 वर्षानंतर यावर्षी नक्कीच कुठेतरी मोठी ट्रिप काढू असं ठरलं आणि काश्मीर ला जायचंच असं म्हणून जानेवारी पासूनच "अभ्यास" सुरू केला 😎
विमानाचे दर, ट्रॅव्हल कंपनी चे वेगवेगळे पर्याय बघायला सुरुवात केली....भाऊ-बहिणी, मित्र मंडळी सगळ्यांना हाक दिली..हो नाही करत आमच्या सहा जणांचे जायचे ठरले आणि आमचं विमान आणि KHAB travels तर्फे पॅकेज बुक करून झालं..
आता रोज रात्री डोळे मिटले की एकच स्वप्न डोळ्यासमोर दिसत होतं...
काश्मीर.. पृथ्वीवरचा स्वर्ग..🥰
शॉपिंग,बॅग्स वगैरे वगैरे तयारी सुरू झाली.
आमची customized tour असणार होती त्यामुळे तिथे गेलं की कधी कसं फिरायचं ते आमचं आम्ही ठरवणार होतो..
वेगवेगळे ब्लॉग वाचून itinerary बनवली आणि ती 4 वेळा बदलून पण झाली.. 😉
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे बर्फ दिसणार होता त्या गुलमर्ग केबल कार ची तिकीट्स बुक केली..
पण इतकं सगळं साधं सोपं नसतं देवा...
काहीतरी गोंधळ झाल्याशिवाय प्रवासाला कसली मजा..😆
पहिला गोंधळ पुण्यातच सुरू झाला...
जायच्या काही दिवस आधी आमच्या विमान कंपनी चा मेसेज आला की जायच्या दिवशीची flight cancelled..
सगळं प्लॅंनिंग चा बँडबाजा... रात्री अपरात्री च्या flights नको होत्या म्हणून मुद्दाम दिवसाची flight ठरवली होती तर नेमकी तीच कॅन्सल..
मग कस्टमर केअर ला 10 वेळा फोन.. विमानाचे नवे पर्याय असं करत करत दूसरे विमान बुक झालं...
आणि..
14 मे 2022...
Finally... आम्ही उडायला तयार होतो..
--- क्रमशः