Monday, July 11, 2022
काश्मीर डायरीज - 4
काश्मीर डायरीज - 3
काश्मीर डायरीज - 3
काश्मीर डायरीज - 2
काश्मीर डायरीज - 2
काश्मीर डायरीज - 1
काश्मीर डायरीज - 1
Tuesday, June 22, 2021
दाल बाटी
दाल बाटी
हा खास राजस्थानी प्रकार. खरतर ऑथेंटीक दालबाटी कशी लागते हे मी कधीच खाउन बघितलं नाहिये. पण दालबाटी आवडणारे लोक त्याचं कौतुक करताना थकत नाहीत म्हणुन बरेच दिवसांपासुन या प्रकार खाउन बघायची उत्सुकता होती.राजस्थान ची दाल बाटी, मध्यप्रदेश चे दाल बाफले, विदर्भातली वरण बट्टी हे सगळे भाउबंदच असं रेसिपी वाचताना लक्षात आलं.पण एकंदर कृती बघाता निखार्यावर भाजल्या जाणार्या या बाटी बद्दल जास्त उत्सुकता होती.
गेल्या लॉकडाउन मधे कराड मधे असताना आमच्याकडे पोळ्या करायला अनुराधा ताई नावाच्या एक गुजराथी मावशी यायच्या. कराड मधे खरतर खुप कडक लॉकडाउन चालु होता आणि ब्रेड,लादीपाव, पिझ्झा बेस,पाणीपुरीच्या पुर्या,भेळेच्या चटण्या, यीस्ट, क्रीम, चीज असे लक्झरी पदार्थ त्यावेळी तिथे अजिबात मिळत नव्हते.रोज रोज पोळी भाजी खाउन खाउन कंटाळा आलेला. फार फार तर इडली डोसे, भजी किंवा वडे.आणि इकडे पुण्यात लोक केक, बिस्किट, पाणीपुर्या, डाल्गोना कॉफ्या वगैरे चे फोटो रोज स्टेट्स ला टाकुन काव आणत होते.
तर या अनुराधा ताईंना एक दिवस सहज म्हटलं की वैताग आलाय पोळी भाजी खाउन काहीतरी वेगळं खायचय. त्यांनी विचारलं की मी तुम्हाला दालबाटी करुन देउ का ? कशी लागते माहित नाही पण थोड्या साशंक मनाने होकार दिला. त्यांच्या नॉनस्टॉप कॉमेंटरी सोबत ती दाल बाटी कशी बनते हे पाहिलं. त्यांनी बाट्या आप्पे पात्रात बनवल्या होत्या.
" तुम्ही किती नशीबवान बघा की ताई, तुम्हाला मी भेटले आता या लॉकडाउन मधे कामाला" असं त्यांच एक बेस्ट वाक्य मी आयुष्यात विसरणार नाही. अशी स्वत: वर खुश असलेली माणसं आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स असले तरी समाधानी असतात.
तर या दाल बाटी ची प्रेरणा अनुराधा ताई आहेत. रेसिपी मी अनुराधा ताई + इंटरनेट वरच्या काही अजुन रेसिपी अशी मिक्स केली आहे.
साहित्यः
बाटी:
२ वाट्या कणीक
३/४ वाटी रवा
१ चमचा दही
१/२ वाटी तुप ( हो वाटीच )
१ चिमुट सोडा
१ चमचा ओवा
चवीनुसार मीठ
दाल:
१ वाटी तूरडाळ
१/४ वाटी मूगडाळ
१/४ वाटी मसुरडाळ
१/४ वाटी हरभराडाळ
१ उभा चिरुन कांदा
१ छोटा चिरलेला टोमॅटो
१ तमालपत्र
२ लवंगा
३-४ मिरे
२ चमचे बारीक चिरलेला लसुण
१ चमचा खिसलेलं आलं
२ उभ्या चिरुन हिरव्या मिरच्या
जिरे, कढिपत्ता, हिंग, हळद,मीठ, लाल तिखट्,कोथिंबीर
तेल्/तूप मिक्स ( संपुर्ण तूप पण छानच लागेल :-) )
गरम मसाला १/२ टीस्पुन
कृती :
बाटी -
बाटी साठी दिलेले सर्व साहित्य हाताने व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. सर्व एकत्र केले की या पिठाचा मुटका झाला पाहिजे इतके तूप लागेल.(दिवाळीतल्या करंजीचे पीठ भिजवताना करतो तसे. ज्यांनी कधी करंज्या केल्या नाहियेत त्यांनी आपापल्या आई-आजी ला मुटका म्हणजे काय ते विचारा ) तूपात कंजुषी करु नये नाहितर बाटी चा अपेक्षित खुसखुशीतपणा साधला जात नाही.गरजेपुरते पाणी घालुन घट्ट मळुन घ्यावे आणि अर्धा तास झाकुन ठेवावे.
( रवा जाड असेल तर किंचीत जास्त पाणी घालुन मळावे आणि तासभर मुरु द्यावे.)
तासाभराने परत एक-दोन मिनिटे हे पीठ छानपैकी एकत्र मळुन घ्यावे आणि त्याचे लिंबाएकढे गोळे करावेत. गोळे करताना थोडे ओबडधोबड, चिरा राहतील असे करावे.
खुप गुळगुळीत नको. असे केल्याने बाटी आतपर्यंत मस्त बेक होते.
ओव्हन कन्व्हेक्शन मोड वर १८० डीग्री ला प्रीहीट करुन घ्यावा. आता सगळ्यात उंच रॅक अथवा बेकींग डीश मधे बाट्या मांडुन १८० डीग्रीवरती वरतीच २० मिनिटे बेक करावे. वरुन छान खरपुस तपकिरी रंग आला असेल. आता बाटी उलटुन परत १० मिनिटे सेम सेटींग वर बेक करावे.
बाट्या तयार.
दाल -
सर्व डाळी एकत्र करुन १/२ तास पाण्यात भिजवुन ठेवाव्यात. त्यात मीठ, हिंग, हळद, चिरलेला कांदा, टोमॅटो घालुन कुकर मधे मौसुत शिजवुन घ्यावे.
कढई मधे तूप्/तेल एकत्र करुन त्यात जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, लसुन, मिरच्या, कढिपत्ता ची फोडणी करुन डाळ त्यात ओतावी.
खुप दाट वाटत असेल तर थोडे पाणी घालुन उकळी काढावी.

आता सगळ्यात चवदार आणि महत्वाचा भाग -
तुपाचा तडका -
३-४ चमचे साजुक तूप गरम करुन त्यात १/२ चमचा लाल तिखट घालावे आणि लगेच गॅस बंद करावा.
वाढणी -
खरतर ही भाजलेली बाटी असते तिला खाली उतरल्यावर तुपात अंघोळ घालायची असते म्हणे. पण माझं काही एकढ धाडस नाही झालं :-)
तर बाउल मधे २ बाट्या घेऊन त्यावर पातळ केलेले साजुक तूप घालावे. त्यावर गरम डाळ आणि वरुन तुपाचा तडका २ चमचे घाला.
गरम गरम आस्वाद घ्यावा.
Saturday, March 13, 2021
चिकन सुके/मसाला + रस्सा
मी ही रेसिपी जशी शिकले तशी स्टेप बाय स्टेप देते आहे.
मला अशी करायला आणि सांगायला पण सोपे वाटतेय.
त्यामुळे त्या त्या स्टेप मध्ये साहित्य लिहिलेले आहे
चिकन मॅरीनेशन -
चिकन 1/2 kg छोटे तुकडे
आले लसूण पेस्ट 2 चमचे
हळद 1/2 चमचा
लाल तिखट एक चमचा
मीठ 1/2 चमचा
चिकन ला सर्व मसाला चोळून 1 तास मॅरीनेट करून ठेवावे.
चिकन रस्सा -
1 मध्यम कांदा बारीक चिरलेला
खडा मसाला ( 2-3 लवंगा, 4 काळीमिरी , 1 तुकडा दालचिनी, 1 चक्रफुल , शाहाजीरे, 1 तमालपत्र )
सुके खोबरे खिसून भाजून 1/2 वाटी
कांदा लसूण मसाला 1 ते 1.5 चमचा
संडे मसाला / चिकन मसाला 1 चमचा
तेल 2-3 चमचे
मीठ
तिखट गरजेनुसार (मॅरीनेट करताना आधी घातलं आहे हे लक्षात ठेवून)
गरम पाणी
पातेल्यात तेल तापवून खडा मसाला आणि कांदा परतावा.
त्यात मॅरीनेट केलेले चिकन घालून मोठ्या आचेवर 2 मिनिटे परतावे.
चिकन बुडेल आणि वर एक पेर राहील इतके गरम पाणी घालून बारीक गॅस वर चिकन शिजवायला ठेवावे.
20-25 मिनिटात चिकन शिजते.
गॅस बंद करून झाकण घालून 10-15 मिनिटे मुरायला ठेवावे.
आता चिकन चे तुकडे बाजूला काढून घ्यावेत. ( हे आपल्याला चिकन मसाला करताना वापरायचे आहेत )
एखादा बोनी पीस रस्स्यात तसाच राहुद्यावा.
आता हा रस्सा परत बारीक गॅस वर उकळायला ठेवावा. त्यात कांदा लसूण मसाला, चिकन मसाला आणि लागेल तसे मीठ घालावे.
यामध्ये भाजलेले खोबरे हाताने कुस्करून घालावे.
(खोबरे खमंग भाजून गार झाले की हाताने एकदम बारीक कुस्करता येते. मिक्सर ची गरज नाही. यामुळे रस्सा मध्ये इतर कोणतेही वाटण घालावे लागत नाही. )
व्यवस्थित उकळू द्यावे.
रस्सा तयार आहे.
वरून कोथिंबीर पेरावी ई ई ..
चिकन मसाला बनवता बनवता 1 वाटी भर रस्सा पिऊन घ्यावा. मसाला बनवायला अजून उत्साह येतो 
चिकन मसाला -
2 कांदे उभे चिरून
1 टोमॅटो
2 चमचे सुके खोबरे
5-6 लसूण पाकळ्या
1/2 इंच आले
कांदा लसूण मसाला 1-1.5 चमचा
संडे मसाला / चिकन मसाला 1 चमचा
हळद
धने जिरे पूड 1 चमचा
मीठ,तिखट चवी प्रमाणे
तेल पाव ते अर्धी वाटी
कांदा, खोबरे, टोमॅटो 1 चमचा तेलावर खमंग परतून घ्यावेत.त्यात आले लसूण घालून बारीक वाटण करून घ्यावे.
तेल तापवून त्यात वाटण घालावे.
त्यात मसाले आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
मसाल्याला तेल सुटले की शिजवलेले चिकन चे पिसेस त्यात घालावे. त्यात एक डाव तयार रस्सा घालून 2/3 मिनिटे परतावे.चिकन मसाला तयार आहे.
चिकन मसाला, रस्सा , गरम पोळी, आणि तूप घातलेला इंद्रायणी भात अशा छान मेनू वर ताव मारावा.
आमच्याकडे सगळ्यांना हा गरम गरम रस्सा प्यायला फार आवडते.
चिकन चा सगळा अर्क उतरलेला हा गरमागरम रस्सा आणि भात म्हणजे सुख..
Thursday, May 16, 2019
आज तुमच्या लग्नाचा ६० वा वाढदिवस. ६० वर्ष हा खुप प्रदीर्घ काळ आहे.
एकमेकांना साथ देत, सांभाळत आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही पोचला आहात.
जेव्हापासुन मी तुम्हाला कळत्या वयात पाहात आले आहे तेव्हापासुनच कळत नकळत खुप सुंदर संस्कार तुम्ही आमच्यावर केलेत. एकाच गावात राहात असल्यामुळे तुमचा मनसोक्त सहवास मिळाला. आमच्या सगळ्या उन्हाळी आणि दिवाळी सुट्ट्या तुमच्या सहवासात अनेक नवीन गोष्टी शिकत गेल्या. तुमच्या दोघांच्या दिनचर्येचा जरी विचार केला तरी त्यातुन खुप काही शिकलो आम्ही. पहाटे उठुन फिरणं, सडा रांगोळी, देवाची भांडी घासायची, प्यायचं पाणी भरायचं, मग अंघोळ, अजोबांची देवपुजा आणि आजीचा स्वयंपाक एकत्र आणि मग दोघांनी मिळुन गोड आवाजात महाराजांची पद म्हणणं . "सहजीवन" म्हणजे काय हे कुठेही लिहिलेलं पाठ करुन समजलं नसतं ते तुमच्या कृतीतुन आम्हाला समजलं.
अर्थात त्या वयात हे सगळं कळलं नव्हतं. पण आज मागे वळुन बघताना याचं महत्व जाणवतं.
१९६७ च्या भयानक कोयना भुकंपात घरदार सगळं मातीमोल झालेलं असताना सुद्धा पुन्हा कराड मधे येउन शून्यातुन सुरुवात करणं हे किती अवघड असेल. त्या भुकंपाच्या कथा लहानपणी मी अनेक वर्ष ऐकल्या , तुम्ही सगळे कसे छोट्याशा दरवाजातुन रांगत बाहेर आलात ई ई. तेव्हा ते थ्रिलींग वाटलं होतं ऐकायला. पण आज जेव्हा आम्ही पै पै जोडुन स्वतः च घर घेतलय तेव्हा मला कळतय की एका रात्रीत अचानक घर नाहीसं झाल्याचं दु:ख आणी वेदना काय असतील. पण त्यातुन सुद्दा तुम्ही एकमेकांच्या साथीने बाहेर पडलात.कराड मधे नवीन घर बांधलत.
तुमच्या घरी आलेला पाहुणा कधीही विन्मुख गेला नाही आणी अजुनही जात नाही. "अतिथी देवो भव" हे पुस्तकात नुसतं वाचुन कधी समजलच नसतं. तुमच्या सहवासात ते नकळत अंगी भिनलंय. कष्ट, सचोटी आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर बेतलेले तुमचे सहजीवन बघुन आम्हा पुढच्या सर्व पिढ्यांना तुम्ही उत्तम वागणुकीचा आदर्श घालुन दिलाय. तुमचं न बोलता व्यक्त होणारं एकमेकांवरचं प्रेम आणि आदर आम्हाला नेहेमीच तुमच्याकडे बघताना जाणवतो.
श्री रामराया तुम्हा दोघांना उदंड आणि आरोग्यमय आयुष्य देवो
आणि आम्हाला असाच तुमचा भरभरुन सहवास मिळो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.
तुम्हा दोघाना ६० व्या वाढदिवसाच्या खुप खुप मनापासुन शुभेच्छा. __/\__

















