Wednesday, July 23, 2025

*अग्निशिखा*


 

*अग्निशिखा*

काळोख्या संध्याकाळी
अंधार पसरतो जेव्हा
उजळते दिशा या साऱ्या
मी होऊन पणती तेव्हा
हृदयाच्या खोल तळाशी
पसरतो तिमिर दुःखाचा
मी शांत तेवती समई
जणू किरण तुला आशेचा
दाटती मेघ अवकाशी
तम कवेत घेतो अवनी
नभ तेजाळून टाकाया
मी वीज चमकते गगनी
कधी असेन साधी ठिणगी
कधी ज्योत शांत तेवती
पण ठाऊक माझे मजला
मी अग्निशिखा तळपती
-©️स्मिता श्रीपाद
दीप अमावस्या 2025

आषाढी वारी


 

सावळा विठोबा, साजिरी रखुमाई |

बाप आणि आई, आले घरा ||
देखणे ते रूप, पाहुनिया डोळा |
प्रेमाचा उमाळा, दाटे मनी ||
सुंदर ते ध्यान, घेता डोईवर |
संसाराचा भार, उतरला ||
-©️स्मिता श्रीपाद
आषाढी वारी 2025

युद्ध

 अंगावरची ओली हळद वाळायच्या आधीच

नव्या नवरीला निरोप देउन एक जवान लढायला जातो..
तो सीमेवर तुमच्या आमच्यासाठी लढतो तेव्हा
त्याच्या सुरक्षेसाठी इथे लढत असतं कोणीतरी...नियतीशी
लेकाच्या कानशिलावर बोटं मोडुन
त्याला युद्धावर पाठवणारी म्हातारी आई,
मनावरचा अदृश्य दगड सांभाळत बघत बसते
"मदर्स डे" चे फोटो,रील्स आणि स्टेटस
आपल्या बाळासोबत फोटोत हसणारा जवान,
परत कधीही न येण्यासाठी निघुन जातो.
आपल्या आत कितीही काहीही हललं तरी
त्या दु:खाचं ओझं नाहीच पेलु शकणार आपण
समाजमाध्यमांवर तावातावाने एकमेकांशी "चर्चा करणारे"
राजकीय, शाब्दीक युद्ध खेळणारे
युद्धाचा इव्हेंट बनवून ब्रेकिंग न्यूज वगैरे बनवणारे
काही दिवस फक्त शांत बसुन
प्रार्थना का नाही करु शकत ? ..आपल्याच सैनिकांसाठी ?
युद्ध करणं ही आपली निवड नाही, नाईलाज आहे.
आपल्या धर्माच्या अस्तित्वासाठी उचललेलं पाउल आहे.
हे कधी आणि कसं समजावणार आपण
फटाके उडवुन "सेलिब्रेट" करणार्या ‘देशभक्त’ लोकांना ?
सात आठ वर्षांच्या निरागस लेकीचा
प्रेमळ निरोप घेउन सीमेवर गेलेला एक बाप,
आज तिरंग्यात लपेटुन परत आलाय...
लेकीच्या गालावर अखंड अश्रु होउन बरसतोय...
युद्ध कशाला ? म्हणुन आधी गळे काढणारे
आणि आता युद्ध का थांबवलं ? म्हणत परत गळे काढणारे
या सगळ्यांना त्या लेकीचं सांत्वन करता येईल ?
युद्ध म्हणजे काय ? ते तिला विचारुयात....
-©️स्मिता श्रीपाद
बुद्धपौर्णिमा 2025

आनंदाचे झाड


 

सुखदुःखाच्या चक्रामधुनी उलगडते जगण्याचे कोडे

पळता पळता पाऊल थकले ? वळणावरती थांबू थोडे
नवी पालवी जपता जपता पानगळीला अलगद झेलू
नात्यांमधले नाजूक गुंते साऱ्या गाठी हळूच उकलू
मुक्त मानाने अनुभवताना ऋतुचक्राचे येणे जाणे
सदा अंगणी बहरत राहो “आनंदाचे झाड" देखणे
-स्मिता श्रीपाद
19 एप्रिल 2025

कौसल्येचा राम


 

"कबीराचे विणतो शेले,कौसल्येचा राम बाई

भाबड्या या भक्तासाठी देव करी काम"
तो आलाय स्वतः..
तुमच्यासमोर बसलाय..
तुमच्या आयुष्याचा एक एक धागा विणतोय..
प्रत्येक श्वासाचा नवा धागा
प्रत्येक दिवसाचा नवा धागा..
"एक एकतारी हाती भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी जानकीचा नाथ...राजा घनश्याम"
तुम्ही डोळे मिटून त्याचा धावा करण्यात मग्न..
आणि तो.. ?
तुमच्या संचिताचे धागे जोडायच्या प्रयत्नात..
जे काही विणलं जातंय ते सुंदरच दिसावं
असा त्याचा प्रयत्न...
"विणुनी सर्व झाला शेला पूर्ण होई काम
ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम"
तुमच्या नकळत त्याने घेतलीये काळजी..
सुख, दुःख, राग, लोभ, प्रेम, द्वेष, आनंद, चिंता
असे सगळे धागे जोडून..
तुमच्या आयुष्याचा शेला विणलाय त्याने...
धागे कसेही असो..कोणतेही असो...
अंती दिसतंय ते फक्त "रामनाम" 🙏🏻
"हळू हळू उघडी डोळे पाही जो कबीर
विणूनिया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम ? कुठे म्हणे राम ? कुठे म्हणे राम ?"
डोळे उघडायला जरा उशीर झाला का ?
अखंड आयुष्याचा शेला सुरेख धाग्यात गुंफून
तो श्रीराम गेलाय कुठे ?
कुठे शोधू ? कसं शोधू ?
आणि मग अचानक लख्ख दिसला..
सावळी, सुंदर, तेजाळ, आश्वासक मूर्ती...
इथेच आहे तो... कायम सोबत..
तुमच्या आमच्या अंतरंगात...
श्रीराम श्रीराम श्रीराम 🙏🏻
-©️स्मिता श्रीपाद
रामनवमी 2025

आपलीच कविता

 "मनू, मराठीच्या पेपर चा अभ्यास झाला का ? "

"हो, झाला. एक धडा आणि एक कविता आहे. धड्याच्या नोट्स मी आधीच काढल्यात आणि अगं 'आपलीच कविता' आहे.
"मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी.."
"हो का ? "
"ती तर मला लहानपणापासूनच पाठ आहे "
आपलीच कविता🤗..इतकं सहज बोलून गेली लेक...
मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी
माझे नि तुझे व्हायचे हे सूर कसे संवादी
अंदमान च्या तुरुंगात असताना सावरकरांना लेखन करण्यासाठी तुरुंगाच्या दगडी भिंतीने कशी मदत केली असेल अशी कल्पना करून लिहिलेली ही कविता, मी आणि माझी बहीण खूप लहान असल्यापासून आई झोपताना आम्हाला म्हणून दाखवायची.
अगदी सातवी आठवीत असेपर्यंत आम्हा दोघीना झोपताना आई खूप कविता आणि गाणी म्हणून दाखवायची.
"रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा"
असं गाताना हिरवीगार गवताची कुरणं आणि त्यावर डोलणारी चिमुकली फुलं दिसायची डोळ्यासमोर
"ऐलतटावर पैलतटावर हिरवाई घेऊनि
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुनी"
या कवितेत शेवटी
"पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबरं"
असं म्हणालं कि मला डोळ्यासमोर एक पांढरी दाढी असलेला म्हातारा औदुंबर बाबा दिसायचा. तो दिवसभर त्या छोट्याश्या गावातून, शेतांमधून, पायवाटांवरून फिरत फिरत पाण्याशी पोचलाय आणि मस्त पाण्यात पाय टाकून पाणी उडवत बसलाय असं काहीसं चित्र दिसायचं.
पुढे एकदा औदुंबर ला गेल्यावर तिथली नदी, नदीच्या दोन्ही बाजूला असलेली गर्द हिरवाई, नदीतल्या छोट्या होड्या, त्यात बसून नदीच्या पलीकडे देवीच्या दर्शनासाठी आई आजीसोबत जाताना ती कविता समोर प्रकट झाली.
"लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी ना शोधूनि दुसऱ्या लाख"
हे आईचं फार आवडतं गाणं. मला कधी कधी ते ऐकायला नको वाटायचं कारण,
"कुणी गेली होती गाय तुडवुनी तिजला
पाहुनि दशा ती रडूच आले मजला"
अशा ओळी ऐकताना घशात दुखायला लागायचं उगीचच.
पण मग कवितेतली मुलगी ती फाटकी मळकी बाहुली घरी घेऊन यायची तेव्हा बरं वाटायचं.
"मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान
केसांच्या झिपऱ्या रंगही गेला उडूनं
पण आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी"
असा त्याचा शेवट ऐकून त्या मुलीबद्दल प्रेम,आदर वाटायचा.
"या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार
नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार"
"दीपका मांडिले तुला सोनीयाचे ताट
जडविला घडविला चंदनाचा पाट"
"राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या"
"गाई पाण्यावर काय म्हणूनि आल्या"
"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे"
अशा अनेक सुरेख कविता आणि गाणी ऐकून ऐकून आपोआप तोंडपाठ झाली होती. त्यावेळी त्याचे अर्थ नीटसे कळले नव्हते.
इयत्ता पाचवी ते दहावी दरवर्षी जून महिन्यात नवीन पुस्तकं आणली की आई बालभारतीचं पुस्तक हातात घेऊन बसायची. त्यातल्या सगळ्या कविता आणि धडे वाचून काढायची. आवडलेल्या कविता 'किती सुंदर कविता आहे ऐक' असं म्हणत मोठ्यांदा वाचायची.
एके वर्षी असंच शांता शेळकेंची पैठणी कविता आईनं आम्हाला वाचून दाखवली आणि त्यातलं शेवटचं कडवं वाचताना तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं.
"अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले"
आईच्या आजीचं म्हणजे माझ्या पणजीचं नुकतंच निधन झालं होतं त्यावर्षी. तिच्या आठवणीने आई हळवी झाली होती.आईचं हे कविताप्रेम हळूहळू नकळत माझ्यात झिरपत गेलं.
पुढे मग कॉलेज, लग्न, संसार या धावपळीत नवीन कविता सापडल्या आणि त्या बालपणीच्या कविता जरा मागे पडल्या. तरी अधूनमधून कुठल्यातरी मासिकात आलेली किंवा नंतर whatsapp वर आलेली सुरेख कविता आई पाठवत राहिली.
पुढे मला बाळ झाल्यावर परत एकदा आईच्या कवितांना श्रोता मिळाला 😃. मधुजा अगदी लहान असल्यापासून तिला मांडीवर झुलवताना आईच्या कविता सुरु झाल्या आणि त्याचबरोबर माझी उजळणी.आता सगळ्या कवितांचे अर्थ नव्याने कळायला लागले.
"मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहुनही लहान रे
तुझ्यासंगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे
तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुजला सांगाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुजला शिकवाव्या"
असं माझ्या 3-4 महिन्यांच्या बाळाला थोपटताना तल्लीन होऊन आई गायची तेव्हा त्या चित्राची दृष्ट काढून ठेवावी असं वाटायचं.
"गा रे राघू गा गं मैने बाळाच्या या ओळी
मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी
गुणी माझा बाळ कसा मटा मटा जेवी
आयुष्याने थोर कर माये कुलदेवी"
असं तिनं म्हटलं कि माझ्या डोळ्यात टचकन पाणी यायचं.
"पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या"
या कवितेतलं वर्णन ऐकलं की हे अगदी आईच्याच घराचं वर्णन वाटायचं.
झोपताना गाणी ऐकायची सवय लेकीला पटकन जडली आणि पुढे मीसुद्धा हि पद्धत चालू ठेवली. मनू लहान असताना तिचे एका एका गाण्यांचे दिवस असायचे. त्या दिवशी एकच गाणं लूप मध्ये परत परत गायचं. 'रंगरंगुल्या सानसानुल्या' हि कविता एके दिवशी तरी मी तब्बल 15-20 वेळा गायली होती 😃. नंतर नंतर झोपेमुळे शब्द गडबडायला लागले तरी कन्या जागीच 😂
हळूहळू ती मोठी व्हायला लागल्यावर "कवितेतला अमुक एक शब्द म्हणजे काय ?" असे प्रश्न पडायला लागले.
मग समजेल तसा अर्थ सांगायचं प्रयत्न केला.
आज सकाळी जेव्हा तिनं "आपलीच कविता" असा उल्लेख केला तेव्हा मनापासून आनंद झाला मला. आणि मग ती कविता म्हणता म्हणता आईच्या आठवणी दाटून आल्या.आई कितीतरी रुपाने आमच्यात आत आत खोलवर अशी रुजली आहे ते जाणवलं. हि "आपलीच कविता" अशीच पुढे पुढे पोचत राहील याची खात्री आहे.
आज आईचा वाढदिवस, तिची आठवण सदैव मनात असतेच पण आजच्या दिवसाच्या निमित्ताने या कवितांच्या आणि अंगाईच्या आठवणी जागवाव्याशा वाटल्या.
प्रिय आई, जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🤗🤗
-तुझीच ताई
27 मार्च 2025

 


*प्रयागराज महाकुंभ 2025...अनुभव*

 *प्रयागराज महाकुंभ 2025...अनुभव*



प्रयागराज महाकुंभ ला जायचं ठरलं तेव्हा खरंतर मनात संमिश्र भावना होत्या. कशाला जायचंय एवढ्या गर्दीत ? आधीच इतके लोक येतायत, प्रशासनावर ताण आहे, आपण त्यांचा भार का बनायचं ?
पण कसं असतं की Eveything is Planned... आपल्या बाबतीत कधी काय घडणार हे ठरलेलं असतं आणि ते कोणीच बदलू शकत नाही.अशी अनपेक्षित पणे ही संधी आली आणि पोचलो.प्रत्येकवेळी व्यावहारिक होऊन चालत नाही.. Just go with the flow...
प्रयागराज बद्दल आणि कुंभ च्या अनुभवांबद्दल आधी बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल पण माझे अनुभव नोंद करून ठेवावेसे वाटले म्हणून हा तिसरा लेख. अजूनही जायची इच्छा असलेल्याना काही मदत झाली तर बरंच होईल.
प्रयागराज पर्यंत प्रवास कसा केला ? -
आम्ही मुंबई ते प्रयागराज थेट विमानसेवा घेतली होती.विमानाने साधारण दोन तास लागतात. प्रयागराज विमानतळ शहराच्या बाहेर आहे. तिथून गावात जाण्यासाठी उबर टॅक्सी बुकिंग विमानतळावर मिळू शकते किंवा बाहेर ऑटो रिक्षा वाले उभे असतात त्यांच्यासोबत भाव ठरवून जाता येते. सध्या कोणताच फिक्स रेट नाही पण साधारण 500-800 रुपयात शहरात जाता येईल.
विमानाशिवाय, बस, रेल्वे, खाजगी गाड्या असे अनेक पर्याय आहेत.
राहण्याची व्यवस्था -
सध्या संपूर्ण शहरच जणू हाऊसफुल बुक झालेले आहे. अगदी होम स्टे पासून मोठ्या हॉटेल्स पर्यंत. आम्ही बुकिंग डॉट कॉम वरून सुपर कलेक्शन ओयो रूम बुक केली होती. मीरपूर अटला भागात हे हॉटेल होते. अतिशय बेसिक रूम होती पण पर्याय नसल्याने आणि दिवसभर फिरून झोपण्यापुरते इथे यायचे म्हणून जास्त चिकित्सा केली नाही. दुसरे म्हणजे इथून किडगंज बोट क्लब जवळ होता.या प्रवासात कंफर्ट हा मुद्दा नसल्याने काही गैरसोयी चालवून घेतल्या.
सिव्हिल लाईन परिसरात जास्तीत जास्त हॉटेल्स आहेत पण तिथे कधीही वाहनांसाठी रस्ते बंद केले जातात त्यामुळे जास्त चालावे लागते. ते बघता आम्ही घेतलेली रूम लगेच रिक्षा मिळण्याच्या दृष्टीने अतिशय सोयीची निघाली.
शहरात कसे फिरलो -
प्रयागराज मध्ये सगळीकडे e-रिक्षा आहेत.काही अतिशय सज्जन रिक्षावाले भेटले तर काही मनाला येईल तो दर सांगणारे भेटले. या रिक्षावाल्याना सगळे गल्ली बोळ अत्यंत व्यवस्थित माहिती असतात त्यामुळे मुख्य रस्ते बंद झाले तरी गल्ली बोळातून मार्ग काढत त्यातल्या त्यात आपल्याला जिथे जायचंय तिथे जवळ ते नेऊन सोडतात.त्यांच्याशी दर ठरवताना जरा घासाघीस करावी लागली.काहींनी खूप मदत केली तर काहींनी लहान अंतरासाठी अव्वाच्या सव्वा दर घेऊन फसवलं. अशा लोकांशी परक्या गावात आपण जास्त वाद न घालणे उत्तम हे तत्व आम्ही पाळलं. एकटे असाल तर फिरण्यासाठी उबर बाईक असा पण पर्याय आहे. हे बाईक वाले लोक पण सध्या खूप पैसे मागत आहेत असे कळले. आम्ही तिघे असल्याने हा पर्याय आम्हाला शक्य नव्हता.शेवटचा पर्याय म्हणजे सरळ चालत सुटणे 😃
काय खाल्ले-
या शहरातले लोक खूप कमी हॉटेलिंग करतात असे एकंदर वाटले. मनकामेश्वर घाट, बोट क्लब या ठिकाणी अतिशय कमी खाण्याच्या जागा होत्या. एखादं बरं, शांतपणे बसून जेवता येईल असं उपहारगृह नव्हतंच. पण रस्त्यांवर चाट चे ठेले प्रचंड प्रमाणात होते. कचौडी सब्जी, आलू टिक्की, टमाटर चाट, पाणीपुरी याचे भरपूर गाडे. लिट्टी चोखा चे पण काही गाडे दिसले. विशेष म्हणजे डोसा आणि चायनीज विकणारे पण बरेच स्टॉल होते. तब्बेतीचा विचार करत करत सुरुवातीला हे खायला आम्हाला भीती वाटली पण तरी मोह न आवरल्याने कचोरी, आलू टिक्की चाट, सुखी भेळ, पाणीपुरी, सब्जी कचौडी एवढ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. सगळेच चाट पदार्थ चवदार होते. विशेषतः बोट क्लब जवळ रगडा आणि मिठी चटणी घातलेली कचोरी आणि सकाळी नाश्ता म्हणून खाल्लेली सब्जी कचौडी अफलातून होती.बोट क्लब वर लेझर शो बघताना पिलेला चहा गोड, आंबट, जराश्या खारट अशा वेगळीच चवीचा काळा चहा होता. त्या थंड वातावरणात मस्त रिफ्रेशिंग लागला.
रस्त्यांवर ठिकठिकाणी लोखंडी कढया ठेवून दूध घोटून खवा बनवणारी दुकानं, लोणी, पनीर विकणारी दुकानं पण भरपूर होती. इस्कॉन मंदिरात अप्रतिम पेढे आणि कलाकंद मिळाला. उत्तर प्रदेश चे लोक चाट आणि दूधदुभत्यावर जगतात असं वाटलं.
एके ठिकाणी जाताना MG रोड असा एक रस्ता लागला तिथे KFC, मॅकडॉनल्ड्स , BBQ नेशन्स पण दिसले.
पण साधी राईस प्लेट मिळणारी दुकानं आम्ही फिरलो त्या भागात कमीच होती.त्यामुळे तिथे जाताना सोबत फळं, बिस्किटं, थोडा कोरडा खाऊ सोबत असलेला उत्तम.
त्रिवेणी संगमावर कसं जायचं -
संगमावर जाण्यासाठी बरेच मार्ग आहेत. संगम रोडवरून चालत सुटलं कि संगम घाट मार्गे पोचता येतं पण हा रस्ता प्रचंड गर्दीचा आहे आणि संपूर्ण चालत पार करावा लागतो.
अरेल घाटावरून संगमावर जाण्यासाठी बोटी सुटतात असे पण कळले.
आम्ही किडगंज भागातल्या बोट क्लब चा पर्याय निवडला. बोटीचा सरकारने ठरवलेला दर माणशी 450-500 आहे पण मी आधी लिहिलं तसं संगमावर जाऊन यायला 3 तास लागतात. 3 तास नाव वल्हवत आपल्याला संगमावर नेऊन आणायचे 500 रुपये ही खूप कमी रक्कम आहे.त्यांची शारीरिक मेहेनत बघता त्याने जास्त रक्कम मागणं स्वाभाविक वाटलं.त्यामुळे त्याने मागितलेली रक्कम आम्ही फारशी घासाघीस न करता दिली. किती दिली हे इथे सांगणं योग्य वाटत नाही. वैयक्तिक संपर्क साधावा.
या पॉईंटवरून मोटार बोट पण दिसत होत्या पण त्यांची संख्या कमी होती. एक अतिशय आवडलेली गोष्ट म्हणजे लाईफ जॅकेट्स घालणे बंधनकारक होते आणि सर्वजण हा नियम पाळत होते. चुकून माकून जॅकेट काढून फोटो काढायला बोट वर उभे राहणाऱ्या हौशी कलाकारांना नावाडी दादा जोरदार ओरडत होते. नदीतून फिरणाऱ्या पेट्रोलिंग करणाऱ्या लाईफ गार्डस च्या बोटी सुद्धा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होत्या.
गर्दी आणि इतर व्यवस्थापन -
गर्दी बद्दल उदंड बातम्या आणि रील येत आहेत आणि ते सगळे अगदी खरे आहेत. विशेषतः प्रयागराज मधलं प्रयागराज_ऑफिशिअल असं हॅन्डल असलेलं इंस्टाग्राम अकाउंट ज्या बातम्या देतं त्या जास्त रिलायबल वाटल्या.महाकुंभ चं जोरदार ब्रॅण्डिंग आणि सोशल मीडिया कृपेने तिथे भरपूर भाविक सध्या येत आहेत. स्वतः च्या गाड्या घेऊन बाहेरून आलेल्या लोकांनी जमेल तिथे जमेल तसं पार्किंग केलं कि रस्ते ब्लॉक होतात. शहराबाहेर स्वतंत्र पार्किंग स्लॉट्स आहेत तिथं गाड्या लावून मग पब्लिक ट्रान्सपोर्ट ने आत येणं अपेक्षित आहे पण हा नियम पाळला गेलेला दिसला नाही.
गर्दी आणि ट्राफिक जॅम चं दुसरं कारण म्हणजे VIP मंडळींचे लाड. देशासाठी महत्वाच्या व्यक्तींना VIP म्हणणं समजू शकतं पण तिथं VIP म्हणजे नक्की कोण हे ठरवण्यात गल्लत झालेली असावी.
म्हणजे एखादा रस्ता चालू असतो. गर्दी असली तरी गाड्यांची ये जा सुरळीत सुरु असते आणि अचानक पॉ पॉ करत पोलीस एस्कॉर्ट वॅन, त्याच्या मागे पुढे गाड्यांचा ताफा आणि मध्ये VIP लिहिलेली गाडी असा ताफा येतो आणि सगळ्या गाडयांना ओव्हरटेक करत रॉंग साईड ने पुढे घुसतो. झालं सगळं ठप्प, लगेच ट्राफिक पोलीस पुढे येतात, VIP ला जागा देतात आणि मग रस्ता बंद करून टाकतात. दोन दिवसात सगळ्यात जास्त राग आला तो या VIP management चा. यावर काही उपाय काढला तरी अंतर्गत वाहतुकीत बराच फरक पडेल असं वाटलं.असो. प्रशासनाचे प्रॉब्लेम्स त्यांना माहिती. हे फक्त माझं निरीक्षण झालं.
साधूंचे आखाडे:-
साधूंचे आखाडे असलेल्या जागी आम्ही जाऊ शकलो नाही. एकतर ते संगमाच्या पलीकडे होते. संगम घाट मार्गे जायचं असेल तर तिथे जाण्यासाठी 8-10 किलोमीटर तरी चालत जावं लागत होतं. दुसऱ्या कुठल्या बाजूने तिथे थेट गाडी जात असेल तर माहिती नाही.
एकंदर या दोन दिवसात अनेक अनुभव आले.
कुंभ हे एक वेगळंच जग होतं. हे जग सर्वांना सामावून घेतं.
8-9 महिन्याच्या बाळापासून ते पार 80 वर्षांच्या आज्जीपर्यंत सर्वांना गंगास्नानासाठी घेऊन आलेलं श्रद्धाळू कुटुंब, उत्तर प्रदेशच्या खेड्यापाड्यातून काम मिळवायला आलेले आणि इथे येऊन होड्या चालवणारे तरुण, कुठल्याशा खेड्यातून गंगाजलाचे मोकळे कॅन विकायला आलेली तरुणी, रुद्राक्ष, कस्तुरी विकणाऱ्या मुली, थेट इटलीहून भारतात कुंभमेळा बघायला आलेले पर्यटक सर्वांना तिथे काही ना काही सापडतच.
गंगा आहे तिथेच आहे.. अविरत वाहते आहे.. तिच्या काठावर चाललेली हि सगळी उलाढाल ..भावनांची, पैशाची, परंपरेची, धर्माची .. हे सगळं तटस्थपणे बघत या सगळ्यांना सामावून घेत पुढे वाहते आहे...तिच्याकडून शांतपणा शिकायचा..प्रवाहीपणा शिकायचा..अविरत पुढे जात राहणे एवढंच शिकायचं...
हेच या महाकुंभ चं फलित...
नमामि गंगे 🙏🏻
हर हर महादेव 🙏🏻
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 🙏🏻
समाप्त
-©️स्मिता श्रीपाद
12 फेब्रुवारी 2025


*प्रयागराज महाकुंभ 2025...अनुभूती*

 *प्रयागराज महाकुंभ 2025...अनुभूती*



प्रयागराज त्रिवेणी संगमावर जायचे बरेच पर्याय आहेत. त्यापैकी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे किडगंज बोट क्लब वरून बोट पकडणे आणि पाण्यातून थेट संगमावर जाणे असा अभ्यास आम्ही करून गेलो होतो. त्यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 9 वाजता e-रिक्षा ने बोट क्लब च्या दिशेने निघालो.आज कालच्या पेक्षा जास्त गर्दी जाणवत होती. जागोजागी पोलीस बॅरिकेडींग मधून मार्ग काढत गल्ली बोळ फिरवत रिक्षा काकांनी एका जागी उतरवलं. रस्ता जाम होता त्यामुळे आता पुढे चालत.तिथून बोट क्लब 1.5-2 किमी वर होता म्हणे.
आता भूक पण लागली होती.त्यामुळे उतरून आधी थोडी फळं घेतली.नाश्ता काय ते शोधतोय तोवर एका गाडीवर कचौडी सब्जी असा बोर्ड दिसला.आजूबाजूला भरपूर गर्दी. लगेच जाऊन एक प्लेट ऑर्डर केली.5 कचौडी म्हणजे (बहुतेक उडदाच्या) खुसखुशीत पुऱ्या, बटाटा रस्सा भाजी, पनीर सब्जी, बुंदी रायता अशी भक्कम थाळी हातात आली. गरमगरम खुसखुशीत पुऱ्या, चवदार भाज्या तिथल्या थंडीत मस्तच लागल्या. पोटभर नाश्ता/जेवण झालं.
आजूबाजूला चर्चा चालू होती की बोट क्लब कसा फुल आहे, तीन तास वेटिंग आहे, त्रिवेणी संगम वर बोटी सोडणं थांबवलंय, आम्ही दीड तास थांबून आत्ता परत आलो वगैरे वगैरे. हे सगळं ऐकून शांतपणे बोट क्लब चा रस्ता धरला. जे होईल ते पाहू. महादेव बघून घेतील. ज्याने इथवर यायची बुद्धी दिली त्यावर भार टाकून बोट क्लब गाठला. तिथे प्रचंड गर्दी होती. बऱ्याच बोटींमध्ये लोकांना बसवून ठेवलं होतं पण बोटी जागेवरच.
गर्दीमध्ये शिरून बोट वाल्यांशी वाटाघाटी सुरु केल्या. काहींनी थेट नाही असं सांगितलं. 10 मिनिटे थांबलो आणि तेवढ्यात दोन तरुण त्यांची लहानशी होडी घेऊन काठाला लागले. थोडं पुढे होऊन त्यांच्याशी बोलायला लागलो. बोलून भाव ठरवला. पुढच्या मिनिटाला आम्ही होडीत होतो. हर हर महादेव 🙏🏻. तीव्र इच्छाशक्ती आणि परमेश्वरी कृपा एवढं एकच उत्तर असू शकतं. बोट क्लब ते संगम अंतर 3-4 किलोमीटर आणि परत येताना तेवढंच म्हणजे एकूण 6-7 किलोमीटर होडीतून जायचं होतं. ही मोटार बोट नसून साधी वल्हवायची होडी होती. तरुणांची किती मेहेनत होती ते दिसत होतं. त्यामुळे पैशासाठी जास्त घासाघीस केली नाही.
यमुनेच्या शांत थंड प्रवाहातून होडी सुरु झाली. सोबतचे तरुण मस्त गप्पा मारायला लागले.त्यांनी जाता जाता मनकामेश्वर मंदिर आणि घाट, सरस्वती घाट, अकबराचा किल्ला अशी ठिकाणं दाखवली आणि सोबत सगळी माहिती मिळत होती. मोदीजी आणि योगी सरकारने केलेल्या व्यवस्थेवर दोघे खुश होते.सरकारने प्रचंड सोयी केल्यात पण अपेक्षेपेक्षा खूप जास्त लोक आलेत.त्यामुळे गैरसोय होते आहे असे त्यांनी बोलून दाखवले.
आजूबाजूला विहरणाऱ्या बोटी, नदीतून उडणारे पांढरेशुभ्र पक्षी, सुंदर स्वच्छ पाणी असा प्रवास करत सुमारे दिड तासाने संगमावर पोचलो. नदीच्या मध्यात एक लष्कराचं केंद्र आणि शस्त्रसज्ज सैनिक सुद्धा आहेत. लाईफ गार्डस च्या बोटी सतत आजूबाजूला फिरत होत्या.
संगमावर बोटींचा एक प्रचंड जथ्था होता. आमच्या नावाडीदादांनी त्यातून सावकाश वाट काढत आम्हाला संगमावर वाळूत नेलं. नदीच्या प्रचंड पात्राच्या मध्यभागी जिथे गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम होतो तिथे एक वाळूचे बेट वर आलेले आहे त्यामुळे या संगमाच्या ठिकाणी पात्र उथळ आहे आणि साधारण कमरेएवढे पाणी आहे.इथेच स्नानाची सोय आहे. कपडे बदलायला आडोसे केलेलं आहेत.
आमच्या नावडीदादाने सामान सांभाळायची तयारी दाखवली आणि आम्ही पाण्यात उतरलो तेव्हा सुमारे 11:30-11:45 वाजले होते.हवा थंड होती पण डोक्यावर सूर्यमहाराज असल्याने आता पाण्यापेक्षा हवा उबदार वाटत होती. पाणी थंड असले तरी छानच वाटत होतं.आजूबाजूला भाबड्या श्रद्धाळू भाविकांचं गंगास्नान, कोणी पाण्यात अर्ध्य देतंय, कोणी आचमन करतंय, कोणी नुसतंच डोळे मिटून हात जोडून उभे, कोणी मोठ्यांदा जयजयकार करतंय असं भारलेलं वातावरण होतं.
पाण्यात जाऊन शांतपणे उभं राहिलो. आपण फार जास्त कष्ट न करता इथवर पोचलो आहोत यामागे आपल्या आजी, आजोबा, आई, वडिलांचा आशीर्वाद आणि आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे हा भाव त्याक्षणी मनात दाटून आला. "आम्ही स्वतःहून इथे पोचलो नाही तर कोणत्यातरी अज्ञात शक्तीने हे घडवून आणलं" याची प्रकर्षानं जाणीव झाली आणि आपोआप त्या अज्ञात शक्तीपुढे हात जोडले गेले.
आजूबाजूला लोकांची प्रचंड गर्दी होती तरीसुद्धा निरंतर वाहणारा तो गंगेचा प्रचंड प्रवाह सगळ्या गर्दीला पुरून उरला होता.पुढच्या महाकुंभ ला म्हणजे अजून 144 वर्षांनी आज इथे असलेल्या लोकांपैकी कोणीच नसेल पण या नद्या तरीही इथेच असतील.144 वर्षांपूर्वी देखील त्या होत्या आणि पुढेही अनंतकाळ त्याच असतील हेच एकमेव सत्य आहे.
हेच अमरत्व..हेच अमृत.. हेच अमृतस्नान..
अमृतस्नान चा अर्थ त्याक्षणी समजल्यासारखा झाला. खरं अमृत अस्तित्वात असेल नसेल पण गेली हजारो वर्ष अविरत वाहणाऱ्या, आपल्या आजुबाजुची जमीन आणि त्याचबरोबर समस्त मानवजातीला पोसणाऱ्या या जीवनदायिनी, अमृतवाहिनी नद्या हेच अंतिम सत्य.
त्या आजूबाजूच्या प्रचंड गर्दीत आणि कोलाहलात सुद्धा आम्हाला आमच्यापुरती स्नान आणि प्रार्थना करण्यासाठी निवांत जागा मिळाली. शांतपणे आचमन करून गंगामाई च्या प्रवाहात डुबकी मारली. पाण्याचा थंडपणा आणि शांतपणा शरीरभर पसरला.सगळे विचार क्षणभर का होईना थांबले.
नमामि गंगे 🙏🏻 हर हर महादेव 🙏🏻
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 🙏🏻
असा जोरदार जयजयकार केला.
गेली अनेक वर्ष अशी कोणती शक्ती असेल जी या सगळ्या परंपरा पुढे नेत असेल ? कोण कुठले ते साधू, दर वेळी कुंभ मध्ये कुठून येतात ? नंतर कुठे जातात ? सगळंच बुद्धीच्या पलीकडचं.
पुढची 10-15 मिनिटे तिथे मनसोक्त वेळ घालवला. भरपूर फोटो काढले. आठवणी साठवून घेतल्या आणि मग बाहेर पडलो. कपडे बदलून परत एकदा होडीतून प्रवास करून परत किनाऱ्यावर आलो.
आता गर्दीचा ओघ अजूनच वाढलेला जाणवला. तिथून बाहेर पडलो तर आजूबाजूचे सगळे रस्ते वाहनांसाठी बंद झालेले दिसले.जमेल तेवढं चालत आणि जमेल तिथून रिक्षा मिळवून वाटेत एका ठिकाणी जेवण केलं तेव्हा 4 वाजले होते. आता यापुढे आखाडे बघायला जायचं तर किमान 8-10 किलोमीटर चालत जावं लागलं असतं आणि रूमवर परत यायचं तर परत तेवढंच अंतर. प्रचंड वाढणारी गर्दी आणि लोकांचे लोंढे बघून तो विचार सोडून दिला. सगळ्या गोष्टींचा अट्टाहास नको कारण आपण सुरक्षित राहणं पण महत्वाचं आहे, त्यासाठी काही गोष्टींवर पाणी सोडावं लागलं तरी चालेल असं आधीच ठरवलं होतं. 6 च्या आसपास रूम वर परत आलो.
थोडावेळ आराम करून आमच्या हॉटेल जवळ असलेल्या इस्कॉन मंदिराला भेट दिली. तिथं भजन आणि सत्संग चालू होता.थोडावेळ तिथला उत्साह बघून परत फिरलो. वाटेत आलू टिक्की चाट चा आस्वाद घेतला. रात्री जवळच असलेल्या एका टपरीवजा ढाब्यात जेवण केलं. फारसा त्रास न होता ज्यासाठी आलो होतो ते गंगास्नान अविस्मरणीय अनुभूती देऊन गेलं.रात्री अतिशय शांत झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 चं परतीचं विमान होतं पण गर्दीचा अनुभव बघता आम्ही 6:30 ला रूम सोडायचं ठरवलं. हा निर्णय अतिशय योग्य ठरला कारण भरपूर गर्दीतून आणि ट्राफिक जाम मधून विमानतळावर पोचायला जवळजवळ 8:45 वाजले. ठरल्याप्रमाणे वेळेत विमान सुटलं आणि दुपारी 2 वाजता मुंबई मध्ये पोचून संध्याकाळी 6 वाजता पुण्यात घरी सुखरूप पोचलो.
त्रिवेणी संगम स्नान ही एक अनुभूती होती. जमेल तसं शब्दात मांडायचा प्रयत्न केला.प्रयागराज कुंभमेळा अनुभवताना आलेले काही अनुभव (चांगले वाईट दोन्ही) पुढच्या शेवटच्या भागात मांडायचा प्रयत्न करेन.
हर हर महादेव 🙏🏻
नमामि गंगे 🙏🏻
क्रमश:
-©️स्मिता श्रीपाद
11 फेब्रुवारी 2025

*प्रयागराज महाकुंभ 2025...आरंभ*

 *प्रयागराज महाकुंभ 2025...आरंभ*



दर 3 वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या बातम्या गेली अनेक वर्षे मी बघते आहे. पण आवर्जून कधी तिथे जावं असं वाटलं नव्हतं.यावर्षीचा कुंभ खास आहे कारण तो महाकुंभ आहे.
144 वर्षांनी येणारा योग....
अमृतमंथनामधून मिळालेला अमृतकलश आकाशमार्गे नेताना त्याचे चार थेंब पृथ्वीवर ज्या ठिकाणी सांडले त्या ठिकाणी म्हणजेच नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि प्रयागराज या चार ठिकाणी साधारण दर 3 वर्षांनी कुंभमेळा भरतो. या चक्रामधून दर 12 वर्षांनी पूर्ण कुंभ प्रयागराज ला साजरा केला जातो आणि असे 12 कुंभ झाले कि दर 144 वर्षांनी ज्या नक्षत्रावर हे अमृताचे थेंब पृथ्वीवर सांडले त्याच नक्षत्रावर प्रयागराज इथं गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या त्रिवेणीसंगमावर महाकुंभ मेळा भरतो.या वर्षीच्या कुंभ चं हेच महत्व आणि आपल्या हयातीत हा योग पाहायला मिळातो आहे याचं लोकांना अप्रूप वाटलं नसतं तरंच नवल. हे तिथी आणि नक्षत्रांचं परफेक्ट गणित ऐकून मला जास्त आश्चर्य वाटलं होतं.
कुंभ ला होणारी गर्दी ही भाबड्या भाविकांची तर आहेच पण त्याचबरोबर महाकुंभ योग आणि कुंभ बद्दल एक कुतूहल असणाऱ्यांची सुद्धा आहे. तिथे येणारे साधू, त्यांचे चमत्कार, त्यांच्या पूजा विधी, अमृत स्नान, त्यांच्या कुंभ मध्ये प्रकट होऊन तिथूनच गायब होण्याच्या कथा अशा अनेक गोष्टी पूर्वी सुद्धा ऐकल्या होत्या. सध्या सोशल मीडिया मुळे कल्पनेत पाहिलेल्या काही गोष्टी प्रत्यक्ष बघता आल्या.कुंभ बद्दल कुतूहल वाढवण्यासाठी सोशल मीडिया हा अतिशय महत्वाचा घटक ठरला.माझ्या 14 वर्षांच्या लेकीला हेच कुतूहल वाटलं आणि तिच्या आग्रहामुळे आम्ही नुकतंच कुंभ ला जाऊन आलो.
साधू आणि त्यांचे आखाडे पाहणे, अनुभवणे हा कुंभ चा एक भाग आहे आणि त्रिवेणी संगम स्नान हा दुसरा.
दोन्ही गोष्टी साध्य करायच्या असतील तर हातात पुरेसा वेळ हवा आणि भरपूर चालायची इच्छा आणि शक्ती हवी.
आमच्या वेळापत्रकाप्रमाणे हातात 1.5 दिवस होता आणि त्यात गंगास्नान आणि जमलं तर एखादा आखाडा बघणं एवढंच डोक्यात होतं.
भरपूर गर्दी असणारी आणि त्याचसोबत अजिबात गर्दी नसणारी अशी दोन्ही प्रकारची रील्स सतत मोबाईल च्या फीड मध्ये येत होती. पण एकदा जायचं ठरवलं आणि बुकिंग केलंय तर आता आपलं आपण जाऊ आणि ठरवू असं म्हणून जायच्या दोन दिवस आधीपासून रील्स बघणं टाळायला सुरु केलं. तेवढीच जरा डोक्याला शांतता 😃
7 फेब्रुवारी सकाळी 7 वाजता मुंबईच्या दिशेने प्रयागराज साठी प्रवास सुरु केला. दुपारी 1:30 वाजता मुंबई प्रयागराज विमान अगदी वेळेत सुटलं...
"Hello ladies and gentleman.. हर हर महादेव.. We are about to land at Prayagraj in 30 minutes. Before landing we are going to witness areal view of Sangam Kshetra for all the devoties of Mahakumbh.Wish you all a very happy and safe stay at Prayagraj. हर हर महादेव"
विमानाच्या कॅप्टनच्या तोंडून हर हर महादेव ऐकताना फार फार भारी वाटलं.हे फार अनपेक्षित आणि सुखद होतं.कुंभ चा फील यायला लागला. खास कुंभ च्या निमित्ताने संगम क्षेत्रावरून विमानाने एक फेरी मारली आणि प्रयागराज चे पहिले दर्शन घडले. संगम क्षेत्राला फेरी मारताना सुद्धा कॅप्टन साहेब sangam to your right window वगैरे डिटेल्स देत होते.
विमानतळावरून शहरात शिरताना दोन्हीकडे सुशोभित केलेले रस्ते, जागोजागी काढलेली भित्तिचित्रे, चौकांमध्ये उभारलेले पुतळे असं दृश्य दिसत होतं. प्रयागराज छानच सजवलं होतं.हॉटेल बुकींग online केले होते. संपूर्ण शहरात हॉटेल्स फुल असल्याने अतिशय बेसिक असं एक त्यातल्या त्यात ठीकठाक वाटणारं आणि कीडगंज बोट क्लब पासून जवळ पडेल असं हॉटेल आम्ही निवडलं होतं.
रूमवर सामान ठेवून थोडं फ्रेश होऊन संध्याकाळी 6 वाजता बाहेर पडलो. सरस्वती घाटावर गंगा आरती बघू असं डोक्यात होतं. e-रिक्षाने घाटाच्या शक्य तितकं जवळ नेऊन सोडलं. शक्य तितकं म्हणतेय कारण संगम क्षेत्र जसजसं जवळ यायला लागलं तशी गर्दी वाढायला लागली आणि मग एका ठिकाणी रस्ता बंद. रिक्षाने उतरून चालत रस्ता शोधात मानकामेश्वर घाट अशी पाटी असलेल्या ठिकाणी पोचलो. तिथून पुढे सरस्वती घाट अजून 3 किलोमीटर तरी जावं लागेल आणि गंगा आरती सुरु असेल कि नाही ते गर्दीवर अवलंबून असतं असं तिथल्या एका ड्युटी वर असलेल्या पोलीस दादांनी सांगितलं. त्यापेक्षा तुम्ही विरुद्ध दिशेने बोट क्लब च्या जवळ काली घाटावर जा. तिथे लेझर शो बघायला मिळेल असं आम्हाला सुचवलं. त्याच्या म्हणण्यानुसार चालायला सुरुवात केली. एव्हाना त्या रस्त्यावर जाम लागला होता.
अजून कोणतीच नदी किंवा पाण्याचा मागमूस दिसेना. अजून किती चालावं लागतंय देव जाणे असं म्हणतोय तोवर समोर अचानक विस्तीर्ण पसरलेलं यमुना नदीचं पात्र आणि त्याच्या जवळचा रोषणाई केलेला नैनी ब्रिज दिसायला लागला.दुसऱ्या बाजूला लांबवर अजून एक पूल दिसायला लागला. गार वारा आणि हे सुखद दृश्य बघून एकदम दिवसभराचा शीण गेला.
थोडं पुढे एक कुलूपबंद रोडसाईड गार्डन होतं. बागेच्या आत थेट नदीपात्राला लागून काही कट्टे दिसत होते. त्यावर लोक पण दिसले. दाराला कुलूप आहे तर हे लोक आत कसे गेले त्याचं लगेच उत्तर मिळालं. रस्त्याच्या साईडला असलेल्या छोट्या कंपाउंड वरून सहज उडी मारून आम्ही पण आत शिरलो.यमुनेचं भव्य शांत पात्र आणि आजूबाजूची रोषणाई बघायला डोळे पुरेनात.इथे अजिबात गर्दी किंवा कोलाहल नव्हता. नदीवरून येणारं गार वारं आणि क्षणोक्षणी रंग बदलणारा नैनी पूल.नदीतून अजूनही विहरणाऱ्या काही बोटी असं सुरेख दृश्य डोळ्यात साठवलं.
तिथून थोडं पुढे जाऊन लगेच काली घाट सापडला. सुंदर बांधीव पायऱ्या आणि त्यावर लेजर शो साठी वाट पाहणारे लोक दिसले. घाटाजवळ अप्रतिम कचोरी, चना जोर भेल, आणि लेमन टी अशी मेजवानीच मिळाली.मस्त जागा पकडून बसलो. बरोबर 7:15 ला शो सुरु झाला. यमुना नदीच्या पात्रात बांधलेली कारंजी वापरून कुंभमेळ्याचा इतिहास, त्यातलं प्रयागराजचं महत्व त्यासोबत काही गाणी असा सुरेख शो होता.समोर पसरलेली भव्य यमुना नदी, दोन्ही बाजूला रोषणाई केलेलं पूल, आणि नदीपात्रात चालू असलेला तो दृकश्राव्य कार्यक्रम अशी सुंदर संध्याकाळ पदरात पडली. सुरुवात तर मस्तच झाली.


तिथून बाहेर पडून थोडं चालत थोडं रिक्षा असं करत एक चांगलं हॉटेल शोधलं. दिवसभर प्रवासात नीट जेवण झालंच नव्हतं. आता शांतपणे जेवण करून परत एकदा चाली चाली करत आणि मिळेल तिथं रिक्षा घेऊन हॉटेल गाठलं. पाठ टेकवतात झोप लागली.उद्या त्रिवेणी संगम
क्रमश:
-©️स्मिता श्रीपाद
10 फेब्रुवारी 2025

ज्ञान प्रबोधिनी युवती विभाग क्रीडा प्रात्यक्षिक

 *"अभिमानाने, अनासक्तीने, विश्वासाने, विनयवृत्तीने, एकविचारे, एकमताने एक आम्ही होऊ"*

या पद्याची प्रचिती काल *ज्ञान प्रबोधिनी युवती विभाग क्रीडा प्रात्यक्षिकांच्या* निमित्ताने आम्ही घेतली.धाडस, चिकाटी आणि मेहेनत याचा त्रिवेणीसंगम काल 26 जानेवारी ला झालेल्या क्रीडा प्रात्यक्षिकात दिसून आला.
इयत्ता पाचवी ते दहावी च्या प्रशालेतील मुली, माजी विद्यार्थिनींचा महाविद्यालयीन गट, प्रशालेची इतर ठिकाणी जी दले भरतात तिथला प्रबोध शालेय गट आणि आजी-माजी माता पालकांचा अतिशय उत्साही असा प्रौढ युवती गट अशा साधारण 300 युवतींनी संपूर्ण 1:30 तास आम्हा प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
लंगडी, लगोरी, कबड्डी, खो-खो अशा खेळाच्या सादरीकरणातून आम्हाला थेट बालपणात फिरवून आणले. कराटे,अमेरिकन डॉजबॉल अशा परदेशी खेळांची सुद्धा ओळख झाली.
माता पालकांच्या प्रौढ युवती गटाचे उत्साही सादरीकरण सुंदर झाले. त्यांचा उत्साह बघून त्यांच्या गटाचे नाव आता *तरुण युवती गट* करायला हरकत नाही😃. आपापले उद्योग सांभाळून त्यातूनही वेळ काढत त्यांनी केलेला सराव जवळून पाहिल्याने जास्त कौतुक.
लहान मुलींचं कराटे सादरीकरण आणि त्याला जोड द्यायला महाविद्यालयीन गटाने केलेली हॅन्ड ब्रेक, एल्बो ब्रेक, किक ब्रेक,जम्प ब्रेक अशी थरारक प्रात्यक्षिके म्हणजे निव्वळ अप्रतिम..एक घाव दोन तुकडे 😃..
सायकल आणि मोटारसायकलवरची चित्तथरारक प्रात्यक्षिकं बघताना एक क्षण श्वास रोखले जात होते आणि पुढच्याच क्षणी टाळ्या आणि आनंदोद्गार बाहेर पडत होते.
अकॉस्टिक योगा च्या गटाने तर कमाल केली. *"तुला तोलुनि धरते मी अन तू ही मजला सावर सावर"* अशी अवस्था.. एकमेकींवरचा विश्वास आणि धाडस याचा उत्तम अविष्कार होता तो. त्याला जोड द्यायला रोप मल्लखांब सादरीकरण अप्रतिम झाले.
या सगळ्या खेळांमध्ये शिवकालीन पारंपरीक लाठीकाठी आणि भाला सादरीकरण आणि त्याच्या जोडीला *"इंद्र जिमी जंभ पर... सेर सिवराज है"* सुरु झालं तेव्हा अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी होतं... आनंदाचं..अभिमानाचं..
पेटते पलिते घेऊन मैदानात उतरलेल्या महाविद्यालयीन गटानं डोळ्यांचं पारणं फेडलं. जणू त्यांना सांगायचं होतं..
*"कधी असेन साधी ठिणगी*
*वा ज्योत शांत तेवती*
*पण ठाऊक माझे मजला*
*मी अग्निशिखा तळपती"*
या सगळ्यावर कळस चढला तो बर्ची प्रात्यक्षिकाने.. पंचप्राण तल्लीन झाले आणि फक्त *"प्रबोधिनीचा ललकार"* उरला...
एक आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. सुरुवातील ध्वज नमस्ते झाल्यावर पुढचे संपूर्ण दोन तास, युवतींचा एक गट ध्वज पूर्णवेळ हातात धरून उभा होता. *"तेजाळून अग्नीने गर्जातोचि मंत्र हा, हृदयाग्नि प्रज्वलीत भगवा स्वतंत्र हा"* ही या युवतींसाठी निव्वळ घोषणाच नाही तर त्या ध्वजाचा मान कसा ठेवायचा ते त्यांना माहिती आहे.
1:30 तास कधी उडून गेला कळलंच नाही. नियोजनात कुठेही बारीकशी चूक नाही की गडबड नाही. गेले दोन महिने प्रज्ञा ताई, दलावरच्या सगळ्या ताया आणि मुलींची मेहेनत आम्ही ऐकत होतो, बघत होतो. त्या सगळ्या प्रयत्नांचा उत्कट अविष्कार काल बघायला मिळाला. बैठक व्यवस्था, ध्वनी, प्रकाश, नावनोंदणी आणि इतर सर्व नियोजन अगदी बिनचूक.
*युवती विभाग सचिव प्रज्ञा ताई, क्रीडा प्रात्यक्षिक प्रमुख निवेदिता ताई, गार्गी ताई, पालवी ताई, अन्विता ताई, श्रद्धा दांडेकर ताई, श्रद्धा भट ताई, हर्षाली ताई आणि बाकी सर्व युवती तायांचे मनापासून आभार, अभिनंदन आणि कौतुक 💐🙌*
तुम्हा सर्वांमुळे आमच्या मुलींना हा अप्रतिम अनुभव घेता आला 🙏🏻
-©️स्मिता श्रीपाद
27 जानेवारी 2025