Tuesday, July 22, 2025

आठवणींचा भोंडला ..... to be continued

 आठवणींचा भोंडला ..... to be continued

😊
गेल्या आठवड्यात "आठवणींचा भोंडला" लिहिताना मनोमन फेर धरला होता, त्यावेळी अजिबात कल्पना केली नव्हती की या लेखामुळे पुढच्याच आठवड्यात खरोखरीचा फेर धरायला मिळेल.
नवरात्रीत भोंडल्या बद्दल माझ्या लहानपणीच्या आठवणी असा एक लेख लिहिला होता तो वाचून घरच्या व्हाट्सअप ग्रुप वर आणि माझ्या फेसबुक पेज वर खूप मैत्रिणींचे आणि नातेवाईकांचे कौतुकाचे मेसेज आले. पण ही सगळी मंडळी मला ओळखणारी, माझ्या आठवणींचा भाग असलेली आणि त्या लेखातील संदर्भ माहीत असलेली होती. माझ्या आठवणी मला अजिबात न ओळखणाऱ्या लोकांना वाचायला आवडतील का ? अशी मनात शंका होती त्यामुळे जरा साशंक मनाने तोच लेख मी आमच्या (लेकीच्या) शाळेच्या 'प्रबोधिनी पालक लेखन गटावर' पाठवला.पण तिथे सुद्धा त्या लेखाला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला.
तो लेख वाचून सर्वांना आपापले लहानपणीचे दिवस आठवले.
आपण सुद्धा भोंडला करूयात अशी कल्पना पुढे आली आणि आसावरी ताई आणि रेवती ने लगेच ही कल्पना उचलुन धरली. लगेच त्याच दिवशी " भोंडला नियोजन गट" तयार झाला सुद्धा.पाचवी ते दहावी मधील आम्ही प्रत्येकी 1-2 प्रतिनिधी या गटात सहभागी झाले. सर्वात मोठे काम होते ते म्हणजे तारीख,वेळ आणि जागा ठरवणे. आमच्या शाळेच्या सहामाही परीक्षा शनिवार 8 ऑक्टोबर पासून सुरू होत होत्या त्यामुळे मुलांचे वेळापत्रक बिघडू न देता तारीख आणि वेळ ठरवायला लागणार होती. म्हणून मग सर्वानुमते शनिवार 8 तारीख संध्याकाळी ५ ते ७ असे ठरले.
पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जागा. शाळेत भोंडला करता येईल का ते अजून माहिती नव्हतं पण भोंडला करायचाच हे नक्की होतं. त्यामुळे काही उत्साही सदस्यांनी आपापल्या घराच्या आजूबाजूचे हॉल वगैरे बघायची सुद्धा तयारी दाखवली. शाळेत जागा शोधण्यासाठी आणि परवानगी घेण्यासाठी दुहिता ताई आणि प्रत्युमा ताई ने पुढाकार घेतला आणि गच्ची किंवा वरचे उपासना मंदीर मिळु शकेल हे नक्की केले. आता भोंडल्याचे निमंत्रण सर्व पालक गटांवर पाठवण्यात आले. नोंदणी साठी साधारण दोन दिवस दिले होते.माता पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बघता बघता ६०-७० जणी तयार झाल्या.
हा आमचा पहिलाच अनुभव असल्यामुळे आम्हाला येणाऱ्यांचा नक्की आकडा कळणे अत्यंत गरजेचे होते कारण त्यावर पुढील सर्व नियोजन अवलंबून होते. त्यामुळे नोंदणी ची मुदत कटाक्षाने पाळावी लावली.
एकदा येणाऱ्यांची संख्या कळल्यावर पुढील चर्चा सुरू झाली. नियोजन गटाने झूम मीटिंग घेऊन पुढचे सगळे मुद्दे ठरवले. इतका मोठा आकडा बघून खरंतर आम्ही काही जणी घाबरलो होतो आणि सरळ सरसकट वर्गणी जमा करून एकत्र खिरापत आणू असं आम्ही म्हणायला लागलो. पण आसावरी ताई आणि सुखदा ने समजावलं की आपण सर्वांना खिरापत ठरवायची संधी देऊ आणि त्यामुळे ओळखायची गम्मत पण येईल. आणि आज खरच खिरापत ओळखायला खूप मजा आली. त्या त्या ग्रुप ला खिरापत ठरवायला पण तेवढीच मजा आली असणार हे नक्की. त्याबद्दल सुखदा आणि आसावरी ताई ला खूप धन्यवाद.
इयत्तांनुसार गट करून गोड की तिखट एवढा चॉईस आम्ही त्या त्या गटांना दिला आणि खिरापतीचा निर्णय त्यांच्यावर सोडून दिला. प्रत्येक गटाला एक एक रंग पण वाटून दिला म्हणजे कलर कोड मुळे अजून मज्जा येईल. हत्ती कोणी काढायचा किंवा आणायचा, फुलं कोणी आणायची असं सगळं ठरलं आणि आम्ही ८ तारखेची वाट बघायला लागलो.
उपासना मंदिरासाठी प्रत्युमा ताईने अर्ज देउन ठेवला होता पण तिथे आधीच कोणाचा तरी कार्यक्रम असण्याची शक्यता होती. आणि तो रद्द होउ शकतो हे पण आम्हाला कळले होते. तिथे जागा नाही मिळाली तर गच्ची होतीच पण पावसाच्या शक्यतेमुळे उपासना मंदिर मिळालं तर बरं असं वाटत होतं सगळ्यांना.त्यामुळे प्रत्युमा ताई ला सगळे जण सारखं, "मिळतंय का ग उपासना मंदीर ? काही कळलं का त्यांच्या कार्यक्रमाचं ? झाला का रद्द ?" असं विचारत होतो. शेवटी ती म्हणाली की "सारखं सारखं त्यांना कसं विचारु मी की तुमचा कार्यक्रम रद्द झाला का म्हणुन ? कसंतरीच वाटतय .. हा हा हा" पण शेवटी एकदाचा त्यांचा कार्यक्रम ६ नंतर आहे त्यामुळे तोवर आम्हाला मिळेल जागा हे नक्की झालं. उपासना मंदिरात भोंडला झाला की गच्ची मधे जाऊ खिरापत खायला आणि पाउस आला तर एखाद्या वर्गात जाऊ असं ठरलं.
इकडे भोंडल्याच्या ६० जणींच्या गटावर नुसती गम्मत चालु होती. आपल्याला येत असलेली गाणी सगळ्याजणी सुचवत होत्या.गप्पागोष्टी सुरु झाल्या होत्या.साडी की ड्रेस असे प्रश्ण एकमेकींना विचारले जात होते. भोंडला झाला की फुगड्या पण खेळुयात का ? असे कोणीतरी सुचवले.
दोन तास नक्की पुरतील ना ? असा आसावरी ताई ला प्रश्ण पडला 🙂 मनात म्हणलं या पोरी आता मंगळागौरीचे खेळ पण खेळायचा प्रस्ताव द्यायच्या आत विषय बदलुयात.. हा हा हा... एकंदर सगळ्यांचा उत्साह बघुन मजा वाटत होती. पण त्याचवेळी मला आणि आसावरी ताई ला एकदम pre-event anxiety आली होती. उपासना मंदीर खरच मोकळं असेल ना ? नसेल तर गच्ची वर गेलं पाहिजे, कालसारखा धो धो पाउस तर नाही ना येणार. सगळ्या जणी येतील ना ? खिरापत नीट पुरेल ना ? आम्ही एकमेकींना होइल ग सगळं नीट असं दर ४-५ वाक्यांनंतर म्हणत होतो. शेवटी ३:३० वाजले तसं आता आवरायला पळा आणि वेळेत शाळेत पोचा असे निरोप ग्रुप वर दिले.
ठीक ४:४५ ला शाळेत पोचले तेव्हा सगळ्याजणी यायला सुरुवात झाली होती.रंगांनुसार इयत्ता कुठाल्या ते ओळखता येत होतं. "तु पाचवी ची का ? मी आठवी ची". असे संवाद वय वर्षे ३५-४५ च्या बायकांमद्धे घडत होते. ठीक ५ वाजता फेर धरुन आधी सगळ्यांनी ओळखी करुन घेतल्या. आणि आमचा भोंडला सुरु झाला. नुसता फेर न धरता, टाळ्या, झिम्मा सगळे प्रकार करत येतात नाहीत ती सगळी गाणी मनसोक्त गायली. कारल्याचा वेल, वेड्याचं गाणं, बिघडलेली जिलबी याशिवाय काही माहिती नसलेली अनवट गाणी सुद्धा म्हटली. शेवटी फिरुन फिरुन पाय दुखायला लागले. तेव्हा आड बाई आडोणी होउन आमचा भोंडला संपवला.
मग महत्वाचा कार्यक्रम म्हणजे फोटोसेशन पार पडले आणि सगळ्या जणी गच्ची मधे गेलो. इयत्तांनुसार खिरापत ओळखायचा खेळ चांगलाच रंगला. मग दमुन भागुन गेलेल्या सगळ्यानी मस्तपैकी ढोकळा, कचोरी, मटार करंजी, काजुकतली, बालुशाही, कॉर्न पॅटीस वर ताव मारला. तिकडे उरलेले फोटोसेशन पार पडले आणि हळुहळु एकमेकींचा निरोप घेउन सगळ्या निघालो.
जाताना काही जणी मला धन्यवाद म्हणत होत्या, का तर म्हणे मी लेख लिहिल्यामुळे भोंडल्याची मजा घेता आली. पण त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की खरतर मलाच त्यांना धन्यवाद म्हणायचे आहेत. खूप खूप मनापासुन धन्यवाद. भोंडला हा माझ्या मनातला अतिशय हळवा कोपरा आहे कारण त्याच्या सोबत माझ्या स्वर्गीय आईच्या आठवणी जोडलेल्या आहेत.तुम्हा सगळ्यांमुळे मला आज अनेक वर्षांनी मनासारखा अगदी लहानपणी सारखा भोंडला खेळायला मिळाला. मी पाटावर हत्ती काढुन नेलेला आणि त्यासोबतच माझ्या आईने काही वर्षांपुर्वी मला भेट दिलेली गजांतलक्ष्मी देखील आवर्जुन आणली होती.आठवणींचं एक वर्तुळ पूर्ण झालं.
या भोंडल्यामुळे खूप छान छान मैत्रिणी भेटल्या, नियोजन करतानाचे सुंदर अनुभव दिले आणि कायम स्मरणात राहातील अशा सुंदर नवीन आठवणी तयार करुन दिल्या.आपापल्या आयांनी दिलेला हा गजगौरीचा वसा आपण सगळ्या जणी अशा पद्धतीने पुढे नेऊ शकलो यातच आनंद आहे.
- ©️स्मिता श्रीपाद
8 ऑक्टोबर 2022




No comments:

Post a Comment