Tuesday, July 22, 2025

"Secret Ingredient"

 "Secret Ingredient"

गेल्या आठवड्यात माझी लेक शाळेच्या कुठल्यातरी उपक्रमाअंतर्गत गुरुद्वारा मध्ये गेली होती. संध्याकाळी घरी आल्यावर ती मला तिकडचे अनुभव सांगत होती. त्यांना तिथे 'लंगर' मध्ये जेवण पण होतं.तिथली दाटसर डाळ तिला खुप आवडली. या डाळीला "लंगरवाली दाल" म्हणतात असं कुठंतरी वाचलं होतं मी एकदा.
त्यामुळे कुठल्याही गुणी आईप्रमाणे आपल्या लेकराला आवडलेला पदार्थ लगेच इंटरनेट वर शोधायला मी सुरुवात केली.
रेसिपी शोधताना मला सुप्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार चा व्हिडीओ सापडला. त्याच्या मते, या दालची खास अशी काही रेसिपी नाही. पंजाब मधले शेतकरी आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा गुरूद्वारा मध्ये द्यायचे.त्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी एकत्र शिजवल्या जायच्या.कांदा, टोमॅटो आणि उपलब्ध असतील ते पंजाबी मसाले यात घातले जायचे आणि हजारो लोक लंगर मध्ये एकत्र बसून याचा आस्वाद घ्यायचे. तो पुढे असंही म्हणतो की एक खास वस्तू यात नक्की असते ती म्हणजे खूप सारं "प्रेम आणि श्रद्धा".
हे सगळं ऐकून मला श्री क्ष्रेत्र गोंदावले इथला सुरेख चवीचा आमटी-भात, सज्जनगड ची गव्हाची खीर, पावसच्या मठात खाल्लेली खिचडी आणि आवळ्याचं लोणचं, पाली गणपती च्या मंदीरातला साधासुधा पोळी-भाजी-भात-आमटी चा प्रसाद, आमच्या कालवडे गावात विठठल मंदीराच्या कलशारोहण सोहळ्याच्या वेळेला खाल्लेला प्रसादाचा शाक-भात असे बरेच प्रसाद आठवले. या पदार्थांची तुलना जगातल्या कुठल्याही महागड्या पदार्थासोबत होउ शकत नाही. गोंदावले, शेगाव इथे हजारो लोकांसाठी प्रचंड प्रमाणात असे पदार्थ रोज केले जातात. तिथे सुद्धा भाविकांनी दिलेला शिधा वापरुनच हे पदार्थ बनतात आणि अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे गेली अनेक वर्षे या ठिकाणी प्रसाद घेतो आहे पण तरी सुद्धा या पदार्थांची चव कधीही बदललेली नाही. नेहेमी अप्रतिमच असते. या प्रसादांची खास अशी काही रेसिपी नाही पण या सर्व पदार्थांना अवीट गोडी असते. याचं खरं कारण म्हणजे करणार्याच्या मनात देवासाठी प्रेमभाव आणि खाणार्याच्या मनात प्रसाद घेतोय ही श्रद्धा हेच असावं. गोंदावल्यात "जय जय श्रीराम जय जय श्रीराम" च्या जयघोषात साधा सुधा आमटी-भात खाताना "तॄप्त" म्हणजे नक्की कसं ते कळतं.
गोंदावले प्रसादाची माझी एक आठवण आहे.मधुजा च्या वेळी मला पाचवा महिना चालु होता आणि गोंदावल्याची आमटी भात आणि ताक खायची फार ईच्छा झाली होती.जायच्या आधी २-३ आठवडे मी आमटी-भात-ताक असं घोकत होते. पुण्यातुन सकाळी निघायला थोडा उशीर झाला. गोंदावल्याला पोचुन महाराजांचं दर्शन घेतलं आणि थेट प्रसाद घ्यायला निघालो.तिथे पोचतो तोवर भोजनगृहाचा दरवाजा बंद झाला होता. आम्हाला उशीर झाला होता.थोडे नाराज होउनच आम्ही परत फिरलो. माझ्यापेक्षा घरच्यांनाच जास्त वाईट वाटायला लागलं की मला आमटी भात खायला मिळणार नाही. १०-१५ पावलं चालतो तोच मागुन एका सेवेकर्यांनी आवाज दिला. प्रसादाला या पण फक्त आमटी-भात-ताक च मिळेल आता असं ते म्हणाले. आम्हाला अत्यानंद झाला. आत जाउन मनसोक्त आमटी-भात-ताक असं पोटभर जेवलो. खरंतर त्या दिवशी पोळी, शिरा, भाजी असे बाकीचे पण पदार्थ प्रसादाला होते पण "मला आमटी-भात-ताक खायचंय" असं गेले अनेक दिवस मी घोकत होते त्यामुळे महाराजांनी माझी इच्छा पुर्ण करुन फक्त तेवढेच पदार्थ दिले असं गमतीनं सगळ्यांनी चिडवलं.
माझ्या बहिणीकडे दरवर्षी श्री अक्कलकोट स्वामींच्या पादुका पुजनाचा कार्यक्रम असतो. त्यावेळी तिच्याकडे सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी मिळुन ५०-६० लोक महाप्रसादाला येतात. आमच्या केटरर मैत्रिणी माधुरी आणि पल्लवी कडुन दरवर्षी महाप्रसादाचा स्वयंपाक ऑर्डर केला जातो. आपलं साधच जेवण म्हणजे वरण-भात, भरलं वांग, एखादी उसळ, कोशिंबीर आणि बहिणीच्या सासुबाईंनी घरी केलेला प्रसादाचा शिरा. माधुरी-पल्लवी कडुन आम्ही वर्षभर काही ना काही कारणाने पदार्थ घेतच असतो पण स्वामींच्या पादुकापुजना दिवशी कांदा लसुण अजिबात न घातलेला हा स्वयंपाक आणि प्रसादाचा शिरा इतका अप्रतिम लागतो ना की बस रे बस. एरव्ही पण त्या दोघींच्या हातचे पदार्थ उत्तमच असतात पण त्या दिवशी केले जाणारे पदार्थ स्वामींच्या साठी आहेत या भावनेने असतात त्यामुळे कदाचित अजुनच प्रेमाने केले जात असतील हे नक्की आणि खाणार्याच्या मनात पण स्वामींचा प्रसाद आहे ही श्रद्धेची भावना अपोआप येतेच.
पण एखाद्या पदार्थांच्या चवीचा संबंध फक्त देवापाशी आहे असेच नव्हे तर सर्वांसोबत एकत्र मिळुन वाटुन खाण्यात पण तितकाच आनंद मिळतो.एरवी घरी ३-४ लोकांसाठी केलेले पोहे किंवा आमटीपेक्षा घरी चार पाहुणे आलेले असताना केलेले कढईभर पोहे किंवा आमटी जास्त चवदार लागते असा माझा अनुभव आहे.याचं कारण कदाचित सर्वांनी मिळुन गप्पा मारत ते पदार्थ खाल्ले जातात असं असावं.
खरंतर सर्वांनी मिळुन एकत्र जेवण करणे ही कल्पनाच सुंदर आहे.माझ्या मुलीला एखाद्या पंगतीतला वरणभात खूप आवडतो.लग्नाच्या कार्यालयातली पंगत असो किंवा अगदी घरातली सत्यनारायण पुजेतली असो, ती नेहेमी बाकी पदार्थ बाजुला ठेवुन भरपुर वरणभात खाते.तिच्या मते एरवी घरी केलेला वरण-भात पंगतीतल्या वरण भातासारखा लागत नाही.खरतर मला पण कधीकधी हे पटतं. घरच्या एखाद्या कार्यात पहिल्या २-३ पंगती वाढुन कडकडुन भुक लागली की मग शेवटच्या पंगतीला आपण बसतो तेव्हा वरण भाताचा पहिला घास मन आणि पोट तृप्त करतो. खरतर त्यात काहीच वेगळं नसतं. पण रोजच्यासाठी घरी केलं जाणारं थोडसं वरण आणि त्या दिवशीपुरतं घरात २५ माणसांसाठी केलं जाणारं वरण यात फरक चवीचा नाही तर भावनेचा आहे. सर्वांनी मिळुन एकत्र गप्पा मारत स्वयंपाक करणे आणि सर्वांनी मिळुन एकत्र खाणे यामुळेच वरण-भातासारखा साधासुधा पदार्थ पण उत्तम लागतो.आपल्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांसोबत गप्पा मारत एकत्र स्वयंपाक करताना अपोआप आपल्यातली सकारात्मक उर्जा आणि प्रेम एकत्र येउन त्या पदार्थाला गोडवा येत असेल.
आजकाल कुठलीही रेसिपी वाचताना किंवा बघताना शेफ चा एक लाडका शब्द असतो "secret ingredient". हे घातलं की पदार्थ खुपच भारी होतो आणि त्याला ऑथेंटीक का काय ती चव येते म्हणे.पण रणवीर ब्रार चं वाक्य ऐकुन एक गोष्ट लक्षात आली की आपल्या सगळ्या पाककॄती मधला सगळ्यात महत्वाचा secret ingredient म्हणजे प्रेम.असे प्रेमाने शिजलेले अन्न रोज आपल्याला खायला मिळो. बाकी अजुन काय पाहिजे नाही का ?
अन्नदाता, अन्नकर्ता, अन्नभोक्ता सुखी भव.
तळटीप - फोटो मधे दिसतेय ती लंगरवाली दाल. लेकीसाठी ही रेसिपी करुन पाहिली 🙂
या लेखाची आणि रेसिपीची प्रेरणा : माननीय शेफ रणवीर ब्रार 😉
-©️स्मिता श्रीपाद

No comments:

Post a Comment