"मनू, मला आज जरा बरं वाटत नाहीये. उद्या मी उशिरा उठले तर चालेल का गं. तू बुट्टी मार उद्या शाळेला. तू पण झोप मस्त "
शुक्रवारी रात्री झोपताना लेकीला विचारलं. शनिवार सकाळ ची शाळा, डबा, गडबड सगळं डोळ्यासमोर नाचत होतं खरंतर.
"झोप आई तू. मी माझ्यासाठी पॅनकेक्स बनवून घेईन.जाताना तुला हाक मारते" तिनं आश्वस्त केलं.
तिला पण खरंतर 2 दिवस बरं नाही म्हणून शाळा बुडवायचा प्रस्ताव दिलेला पण तिनं तो नाकारला
.

बघू उद्या. होईल ते होईल म्हणत,गोळ्या घेऊन जास्त विचार न करता झोपून टाकलं.
सकाळी 6:20 वाजता दचकून जाग आली. घरात एकदम सामसूम. म्हणलं पिल्लू उठलं नाही वाटतं. आता व्हॅन वाल्या दादाला येऊ नको असा फोन तरी करू म्हणून तिच्या रूम मध्ये गेले तर समोर गणवेश घालून नट्टापट्टा करत लेक उभी होती. आश्चर्य, आनंद आणि कौतुक यातलं नक्की काय वाटलं ते कळलंच नाही.
किचन मध्ये गेले तर मी नेहेमी ठेवते त्याच जागी तिचा डबा पॅनकेक भरून ( झाकण पूर्ण न लावता थोडं तिरकं) गार होण्यासाठी ठेवलेला दिसला.सोबत छोट्या डबीत मेपल सिरप वेगळं. पॅनकेक केलेला तवा वगैरे सगळं सिंक मध्ये, ओटा नुकताच पुसून स्वच्छ. उरलेलं पॅनकेक मिक्स चं पॅक सील करून कोपऱ्यात ठेवलं होतं. परत एकदा कौतुक आणि यावेळी डोळ्यात टचकन पाणीच.
"कधी उठलीस मनू ?"
" 5:20 ला"
कधी मोठी झाली हि एवढी ?
रोज बेडवर पुस्तक वह्या पसरून ठेवणारी, रोज पसाऱ्याच्या नावावर माझा ओरडा खाणारी हीच का ? कप/भांडं जागेवर ठेवण्यावरून बोलणी खाणारी पोरगी आईला बरं नाही हे जाणून पहाटे उठून आवाज न करता आवरते. इतकंच नाही आपला डबा पण स्वतः बनवते.
मी अजूनही विचारात मग्न असेपर्यंत व्हॅन चा आवाज आला आणि लेक बॅग घेऊन खाली पळाली सुद्धा.
तेरा वर्षांपूर्वी लाल दुपट्यात गुंडाळलेलं गोरं गुलाबी गाठोडं माझ्या हातात होतं आणि आज हे असं थोडं शहाणं आणि अजून बरंचसं वेडं बाळ माझ्यासमोर आहे.
हे शहाणपण आणि वेडेपण दोन्ही मला अतिशय प्रिय आहेत.
तर अशा या माझ्या लाडक्या लेकीला,
वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा आणि भरभरून आशीर्वाद















|| जीवेत शरद: शतम ||
No comments:
Post a Comment