*मतदान दिनाच्या नोंदी*
7 मे 2024 रोजी सकाळी लवकर उठून यावरून अंघोळ करून मतदानाला पोचलो. फक्त दोन तास लाईनमध्ये उभं राहायला लागलं. नुसतंच उभं राहून काय करायचं म्हणून हुशारी करून वाट्टेल ती कारणं ( माझा नंबर घरच्यांनी धरून ठेवला आहे, मी इथेच होते xerox काढायला गेले होते ई ई ) देत लाईन च्या मध्ये घुसणाऱ्या 2-4 जणांशी भांडून घेतलं. तेवढाच जरा वेळ गेला.
या लोकांच्या जोडीला सिनिअर सिटीझन थेट प्रवेश मिळवत होते त्यामुळे आम्ही उभे राहिलेली लाईन जागची हलतच नव्हती. रोज सकाळी मस्त टुणटुणीत 4-5 किमी फिरणारे, मित्र मौत्रिणींसोबत हास्य क्लबमध्ये उड्या मारणारे असे तंदुरुस्त जेष्ठ थेट आत जाऊन मतदान करून मग बाहेर येऊन सेल्फी काढत बसलेले बघून पुढच्या वेळी 40 + ला पण सिनिअर म्हणून मान्यता द्यावी असे येणाऱ्या सरकारकडे खास अपील करण्यात येत आहे
.

सिनिअर सिटीझन साठी पुढच्या वेळेपासून स्वतंत्र बूथ करा असा एक महत्वाचा सल्ला माझ्या पुढच्या ताईंनी वैतागून बूथ ऑफिसरला दिला.
अखेर 2 तासांनी बूथ मध्ये पोचले. तिथे मात्र 2 मिनिटात काम झालं. तत्परतेने नाव शोधणे, ओळखपत्र तपासून बघणे हि कामे व्यवस्थित पार पडली. ओळखपत्रावरचा फोटो बघून माझ्याकडे 2 वेळा संशयाने पाहणाऱ्या साहेबांना "काळजी करू नका मीच आहे" असे आश्वासन दिले.
बोटावर शाई लावणाऱ्या काकांना नीट नाजूकपणे शाई लावा नाहीतर पसरते आणि फोटो मध्ये चांगली दिसत नाही असं आवर्जून सांगितलं.त्यांनी लगेच "गेल्यावेळची शाई पातळ होती म्हणून पसरली, यावेळची घट्ट आहे. दर्जा चांगला आहे" असे म्हणून खरंच नीट शाई लावली.
अखेर हव्या त्या (?) चिन्हावर बोट ठेवून माझे "मौल्यवान" मत (या आठवड्यातली नियोजित सहल मतदानासाठी पुढे ढकलली त्यामुळे बुकिंग बदलायला 10k चा फटका बसला. मी मत दिलेली व्यक्ती जिंकली तर त्यांना न विसरता बिल पाठवणार आहे.) नोंदवले आहे. बीप चा आवाज ऐकला, शेजारच्या यंत्रातुन मी दिलेल्या मताचीच पावती दिसते का हे नीट पाहिले आहे.
अशा रीतीने मतदान राष्ट्रकर्तव्य सुफळ संपूर्ण
( सुफळ आहे कि नाही ते 4 जून ला कळेल पण मनात आशा धरायला काय हरकत आहे )
भारत माता की जय !!!
त.टी. - नवऱ्याचं आणि माझं नाव वेगवेगळ्या बूथ मध्ये आलं होतं. तो पंधरा मिनिटात बाहेर आला आणि मग माझी लाईन बघून बिचारा एकट्याचा फोटो काढून निघून गेला. नवराबायकोला मुद्दाम वेगळे बूथ दिले म्हणजे नवर्यांना निर्धास्तपणे 'स्वतःचं' मत देता यावं हा यामागे छुपा हेतु असू शकतो काय ? असो. देशासाठी कायपण 

-
स्मिता श्रीपाद

7 मे 2024
No comments:
Post a Comment