बाईपण भारी ?
चिक्कार हाइप केलेला "बाईपण..." चित्रपट आज बघून आले. माझी जुनी कॉलेज मैत्रीण मिनल सोबत गेले होते. तिला आम्ही कॉलेज मध्ये असताना मिनल"भाई" म्हणायचो कारण ती एकदम टॉमबॉय होती. (अजूनही भाईसारखीच वागते जराजरा ) त्यामुळे तिच्यासोबत हा चित्रपट बघणं म्हणजे जरा गंमतच होती
. जाऊदे मुद्द्यावर येते.

एवढी तयारी करून गेलो पण चित्रपट ठीकठाक च निघाला. म्हणजे पठाण सारखा पिसं काढण्याएवढा वाईट नाही (इच्छुकांनी पठाण ची जुनी पोस्ट शोधून लाभ घ्यावा). खूप काही क्रांतिकारी असायला पाहिजे होता अशीपण माझी अपेक्षा नाही पण मला वैयक्तिक पातळीवर हा चित्रपट रिलेट करताच नाही आला. माझं बाईपण कुठे सापडलंच नाही. वर्षानुवर्षे गैरसमज आणि इगो कुरवाळत बसणाऱ्या बहिणी माझ्या आजूबाजूला नाहीत म्हणून असेल कदाचित. चित्रपट प्रत्येक वेळी रिलेट व्हायलाच हवा असं नसतं खरंतर पण त्यातला एखादा मुद्दा तरी पटायला हवा. माझ्यासाठी यातलं सगळ्यात पटलेलं आणि आवडलेलं कॅरॅक्टर म्हणजे रोहिणी हट्टंगडी चा नवरा. बायको ला मानसिक त्रास आहे हे समजून उमजून, तिला न दुखावता, तिची मदत करायचा प्रयत्न करणारा, तिला कौन्सेलर कडे घेऊन जाणारा, तिची दुखरी नस म्हणजे तिची बहीण आहे हे बरोब्बर ओळखलेला. दुसरं त्यातल्या त्यात सहज आजूबाजूला दिसणारं पात्र म्हणजे पल्लवी. नवऱ्याने केलेली प्रतारणा तिला मान्य नाहीये, अजूनही धडपड चालू आहे तिची जुन्या गोष्टी सुरळीत व्हाव्यात म्हणून. केतकी आणि पल्लवी मधला या संदर्भातला प्रसंग मस्त. 'किती दिवस हात धरून ठेवशील सोडून दे' असं केतकी सांगते तेव्हा पल्लवी मधला बदल तिचं मोकळं होणं छान दाखवलंय.
बाकी चारू च 8-10 वर्षांच्या पोरांच्या वाढदिवसांमधलं भाषण, शशी चं स्टेशन वर बहिणीचा गळा धरणं असे प्रसंग म्हणजे अ आणि अ (अतर्क्य आणि अतिशयोक्ती).
सुकन्या चा अभिनय अप्रतिम. काय भाव बदलतात या बाईच्या चेहेऱ्यावरचे. मस्त. पण तिच्या घरातलं वातावरण आजकाल च्या काळात मी तरी बघितलं नाहीये.अजूनही असं घडत असेल तर हे भयंकर आहे.
कदाचित 20-25 वर्षांपूर्वी असं चित्र होतं का माहित नाही. कारण एका घरात अशा 6-7 बहिणी तेव्हा असायच्या. आता नसतात. असतील त्या 2-3 च आणि अगदी जिवाभावाच्या असतात. आपल्या बहिणीसाठी हळव्या असतात. भांडल्या तरी लगेच गळ्यात पडणाऱ्या असतात. निदान परमेश्वराच्या कृपेने मी तरी नशीबवान आहे या बाबतीत. माझी सख्खी बहीण तर माझा जीव आहेच पण माझ्या चुलत, मावस, आत्ये बहिणी सुद्धा अगदीच प्रेमळ आणि जीव लावणाऱ्या आहेत
.

बाकी चित्रपटातली मंगळागौर, जुनी आणि नवी मस्त घेतली आहे.आवडली. 'उघड्या पुन्हा जहाल्या' अप्रतिम गायलंय. वंदना गुप्ते च्या साड्या आणि दीपा परब चे कुर्ते आवडले. चित्रपटाचा लूक फ्रेश आहे.
चित्रपट बघून बाहेर पडले तेव्हा दोन चित्रं दिसली. नऊवारी साडी नेसून अगदी वाकून चाललेल्या आजीबाई आपल्या जीन्स घातलेल्या नातीसोबत चित्रपटाला आलेली होती आणि तिथल्या एका लॉन वर वय वर्षे साधारण 20 ते 60 असा एक आजूबाजूची पर्वा न करता रील बनवणारा बायकांचा ग्रुप. मला आतल्या पेक्षा हे बाहेर दिसलेलं बाईपण जास्त आवडलं. माझ्या आणि प्रत्येकीच्या आयुष्यात असा मोकळेपणा असावा ही मनापासून प्रार्थना.
तर सांगायचा मुद्दा हा कि मला हा चित्रपट रिलेट करता आला नाही म्हणून विशेष आवडला नाही. तुमचं तुम्ही बघा आणि ठरवा.
-
स्मिता श्रीपाद

No comments:
Post a Comment