कुठल्यातरी घरगुती कार्यक्रमातला आदला किंवा दुसरा दिवस, रात्रीची वेळ, सगळीकडे किरर अंधार, पांघरूण अंगावर घट्ट ओढून आणि गरज पडली तर एकमेकांचे हात धरून आम्ही सगळे जण जिवाचे कान करून ऐकत असायचो. मतकरींची "जेवणावळ" कथा रंगात आलेली असायची. Climax चं वाक्य इतक्या जोशात यायचं की आम्ही किंकाळ्या फोडायचो. इतक्यात कुणीतरी एकदम लाईट चालू करायचे आणि किंकाळ्या चं रूपांतर हसण्यात व्हायचं..
**प्रभाकर आजोबांची** ही गोष्टीची मैफल आणि हे चित्र माझ्या मनात पक्के कोरले गेले आहे.
लहानांसोबत लहान आणि मोठ्यात मोठं होण्याची कला खूप कमी लोकांना अवगत असते. प्रभाकर आजोबा त्यातलेच एक.अगदी दोन वर्षांच्या बाळापासून ते अगदी घरातल्या सर्वात जेष्ठ व्यक्तीपर्यंत सर्वांशी ते अतिशय सहजपणे संवाद साधू शकत होते.
प्रभाकर आजोबा म्हणजे माझ्या आईचे मधले मामा. लहानपणी आई आणि सगळ्या मावश्या मामांकडून गप्पांमध्ये प्रभाकर आजोबांचे खूप किस्से ऐकले. आजोबा कसे सायकलवर सगळ्या पोरांना बसवून नदीतून पलीकडे न्यायचे, सगळ्या भाच्यांच्या वेण्या घालायचे, लहानपणी शेंगा फोडायची कशी स्पर्धा लावायचे या गोष्टी खूप वेळा ऐकल्या आहेत आम्ही.
माझे बाबा त्यांच्या लग्नाच्या वेळचा एक गमतीशीर किस्सा अजून सांगतात. आई आणि बाबांचं लग्न ठरलं तेव्हा बाबा बँक ऑफ इंडिया, फलटण येथे कॅशिअर होते.बाबांना बघायला आमच्या तात्या आजोबांसोबत प्रभाकर आजोबा पण गेले होते.मुलगा बँकेत आहे तो नक्की कॅशिअर आहे का शिपाई हे पडताळून पहायला.हा हा हा.....बाबा कॅश काउंटर ला दिसले तेव्हा खात्री पटली आणि मग लग्न लागले. अजूनही हे सांगताना बाबा मनापासून हसत असतात.
प्रभाकर आजोबा म्हणजे माझ्या सासर्यांचे मोठे भाऊ आणि माझ्या आईचे दोन नंबरचे मामा. माझं लग्न नात्यातलं असल्यामुळे नात्यांची सगळी मस्तपैकी भेळ आहे.
माझ्या आईच्या लग्नाच्या बैठकीत आईचे मामा म्हणून आणि पुढे माझं आणि श्रीपाद चं लग्न ठरलं तेव्हा आमच्या बैठकीत माझे मोठे चुलत सासरे म्हणून प्रभाकर आजोबा उपस्थित होते असा दुर्मिळ प्रसंग आम्ही अनुभवला.
आमच्या साखरपुड्यात फॅमिली ग्रुप फोटो चालू होता तेव्हा लांब कुठेतरी हॉल च्या टोकाला उभे असलेले प्रभाकर आजोबा पळत पळत आले आणि शम्मी कपूर स्टाईल झेप घेऊन सगळ्यांच्या पुढ्यात अक्षरशः आडवे झाले होते. तो त्यांच्या तसाच फोटो अजूनही माझ्याकडे आहे.
मला मामा आजोबा म्हणून आणि चुलत सासरे म्हणून त्यांचं प्रेम, कौतुक दोन्ही अनुभवायला मिळालं.
आमच्या कुटुंबातील सर्वात समतोल व्यक्तीमत्व.शांत डोक्याने आणि सर्व बाजूनी विचार करून एखाद्या प्रसंगात योग्य सल्ला देणारी व्यक्ती असे आमचे प्रभाकर आजोबा होते आणि त्यामुळेच आमच्या कालवडेकर कुटुंबात कोणाकडे ही काहीही कार्य असो किंवा काही बिकट प्रसंग, पहिली आठवण प्रभाकर आजोबांची आणि पहिली हाक त्यांना मारली जायची.
लहानपणी घरात होणाऱ्या लहान मोठया कार्यात आजोबा नेहेमी लीडर + स्वयंसेवक अशा दुहेरी भूमिकेत असायचे. सर्वांना कामं वाटून देणे आणि दुसऱ्या बाजूला खुर्चा सतरंजी उचलण्यापासून ते पंगतीत आग्रह करकरून लोकांना वाढण्यापर्यंत ते काहीही करू शकायचे.
एरव्ही शांत असणारे प्रभाकर अजोबा यावेळी एकदम जोशात असायचे आणि पोराटोरांबरोबर भरपुर दंगा पण करायचे.
मला आठवतं , एकदा श्रावणात भाउ आजोबांच्या "ओंकार" बंगल्यावर सत्यनारायण होता आणि पंगत बसली होती. पंगतीत शेवटचा भात वाढून झाला आणि एकमेकांना आग्रह सुरु झाले. तू घे मी घे करत आग्रह करण्यात आणि दंगा करण्यात भाऊ आजोबा आणि प्रभाकर आजोबा सगळ्यात पुढे. सुमारे 1.5 तास पहिलीच पंगत , हसण्याचा गडगडाट आणि दंगा चालू होता. शेवटी माझी विजू आजी पदर खोचून बाहेर आली आणि "प्रभाकर,भावड्या आवरा आता पुढचे लोक खोळंबलेत जेवायचे" असे म्हणून परिस्थितीवर ताबा मिळवला. पुढे बायकांची पंगत बसली तेव्हा सगळ्या बायकांच्या पानात भराभर वाढायला आणि वर सगळ्यांना आग्रह करायला पण हे सर्वात पुढे.
आम्ही भाग्यवान म्हणून आम्हाला अशा भरल्या घरातल्या देखण्या पंगती बघता आल्या आणि कायम मनावर कोरल्या गेल्यात.
कराड जवळ कालवड्याला आमचं विठ्ठल रखुमाईचं मन्दीर आहे. दरवर्षी आषाढी कार्तिकी ला आम्ही सगळे आवर्जुन फराळाचे डबे घेउन तिथे जायचो. तिथे आमच्या पोरांबरोबर बाहेरच्या अंगणात, कबड्डी किंवा डाँकी-मंकी चे डाव खेळायला पण ते पुढे असायचे
कुठल्याही ट्रिप ला जाताना त्यांचं "ट्रेन मे झननन झननन होय रे" किंवा "राम नारायण बाजा बाजाता" असणारच. आणि संपूर्ण उत्साहात, जोशात स्वतः नाचत गात ते सादर करायचे.त्यांना बघून आम्ही पोरं कधी नाचायला सुरुवात करायचो आमचं आम्हाला पण कळायचं नाही.
ते स्वतः उत्तम कलाकार होते.नटसम्राट मधला त्यांनी सादर केलेला प्रवेश, त्यांचं उत्तम पाठांतर अजूनही लक्षात आहेत.
त्यांचे विद्यार्थी आणि भाचे त्यांच्या शिस्त आणि कडकपणा बद्दल सांगतात पण आम्ही नातवंडे म्हणून त्यांचा फक्त प्रेमळपणा च पाहिला.
प्रभाकर आजोबा कराड च्या टिळक हायस्कूल शाळेत शिक्षक होते.मुलांमद्धे शिस्तप्रिय पण तरी मिस्कील असे सर म्हणून ते प्रसिद्ध होते.
त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त होता. गोष्टी रंगवून सांगायची उत्तम हातोटी त्यांच्याजवळ होती. कराडमद्धे त्यांच्यासोबत कुठेही गेलं तरी पावलापावला वर त्यांचे विद्यार्थी भेटायचे आणि या वयात सुद्धा अजोबा सर्वांना नावानिशी ओळखायचे आणि बॅच कोणती ते पण सांगायचे.
माझी आई सांगायची त्याप्रमाणे अतिशय कष्टात काटकसरीत दिवस काढून त्यांनी आपल्या सर्व भावंडांना आधार दिला. सर्व कुटुंबाला सक्षमपणे आपल्या पायावर उभे केले. गरज पडेल तसा सर्वांना आधार सल्ला दिला. आणि त्यांच्या या सर्व सत्कर्माचं पुण्य म्हणूनच मुलं,जावई,सुना, नातवंडं ते अगदी परतवंडाचं सुख त्यांना अनुभवायला मिळालं. कुटुंबाचं आणि आर्थिक अशा दोन्ही बाजुंनी अतिशय समृद्ध वैभव त्यांनी अनुभवलं. त्यांनी जितकं निरपेक्ष भावनेनं सर्वांवर प्रेम केलं आणि सर्वांना मदत केली त्याचं संपूर्ण दान परमेश्वराने त्यांच्या झोळीत टाकलं.
३० सप्टेंबर २०२२ ला ललितापंचमी दिवशी ते आम्हा सर्वांना सोडुन गेले.
त्यांची पोकळी आम्हा सर्वांना पदोपदी जाणवेल पण त्यातही समाधान इतकंच आहे की, सुंदर आयुष्य व्यतीत करून कमीत कमी क्लेश होऊन त्यांचा शेवटचा दिस गोड झाला.
हा अखंड उत्साहाचा झरा काल शांत झाला पण त्यांना शेवटचा निरोप देताना त्यांचा हा शांतपणा नकोसा वाटला.
आजपासुन रोज तिकडे स्वर्गात आजोबांच्या गोष्टींची आणि गप्पांची मैफल रंगेल आणि समस्त मंडळी जिवाचे कान करून त्यांच्या गप्पागोष्टी ऐकत असतील.
ति. प्रभाकर आजोबा यांना शतशः वंदन

-
स्मिता श्रीपाद

1 ऑक्टोबर 2022
No comments:
Post a Comment