Tuesday, July 22, 2025

माझ्या "चाफ्याच्या झाडा"

 24 जुलै 2020 ला आईचा पहिला स्मृतीदिन होता. तिच्यासाठी ही शब्दरूपी आदरांजली

🙏
-----------------------------------------
माझ्या "चाफ्याच्या झाडा"
चाफा या फुलाचं आणि माझं लहानपणापासुन काय नातं होतं कोण जाणे पण बाकी सगळ्या फुलात तो सोनचाफा एकदम राजस फुल वाटायचं.मी लहान असताना आमच्या एका नातेवाईकांकडे कसल्यातरी द्रवपदार्थात काचेच्या बाटलीत ठेवलेली चाफ्याची फुलं होती. ती बारा महिते तशीच ताजी टवतवीत दिसायची. मी जेव्हा जेव्हा आईसोबत त्यांच्याकडे जायचे तेव्हा तेव्हा पुर्ण वेळ ती फुलच बघत बसायचे. आई च्या गप्पा संपेपर्यंत हा कार्यक्रम चालु असायचा. थोडं मोठं झाल्यावर असं लक्षात आलं की त्या बाटलीत चाफ्याची नुसती सुंदर फुलच जपुन ठेवता येतात पण बाहेरुन बघणार्याला त्याचा वास येत नाही.
मग काय फायदा ना..?
उलट सुकलेलं आणि पुस्तकात जपुन ठेवलेलं चाफ्याचं फुल सुद्धा , पुस्तकाचं ते पान उघडलं की सुंदर दरवळ आजुबाजुला पसरवत असतं. मग त्या बाटलीतल्या फुलाचं कौतुक तिथेच संपुन गेलं.
आई नेहेमी सांगायची की चाफ्याचं एक फुल देवाला वाहिलं की सोन्याचं फुल वाहिल्यासारखं असतं म्हणे.मग कधी कोणाकडे श्रावणात सत्यनारायणाला बोलवलं की देवाला नमस्कार करताना फुलाच्या परडीत तुळस, झेंडु,तगर ईत्यादी सोबत चाफा दिसला तर मी आवर्जुन तेच उचलुन देवावर वाहायचे. माझ्या परीने देवाला एक सोन्याचं फुल 🙂
मोगरा,सायली,जुई,सोनचाफा या सगळ्या फुलांचं माझ्या आईला अतोनात वेड. तिच्या फुलाच्या वेडाचे किस्से अगदी लहानपणापासुन आम्ही ऐकत आलो आहोत. आईच्या सगळ्या मावशा, मामा , भाउ, बहिणी कुठल्याही निमित्ताने एकत्र जमले की एकदातरी हा विषय निघायचाच आणि आम्ही सगळे जण हे किस्से ऐकुन पोट धरुन हसायचो.
गेल्या वर्षी चाफ्याची फुलं तोडायचं निमित्त झालं आणि एका क्षणात आई अचानक आम्हाला सोडुन निघुनच गेली....कायमची....
इतके वर्ष ज्या वेडाची हसुन हसुन चर्चा केली ते वेड असं रुप घेउन समोर येइल असा कधी विचारच केला नव्हता.
त्या दिवसापासुन ,त्या क्षणापासुन चाफ्याचा एकदम रागच यायला लागला.आई गेली तेव्हा तिने आदल्या दिवशीच तोडलेली डबाभर चाफ्याची फुलं फ्रीज मधे पडुन होती.तरीपण तिला अजुन नवीन ताज्या फुलांनी खुणावलं म्हणजे ही चाफ्याची फुलं किती कपटी,मायावी असतील असा मी माझ्यापुरता समज करुन घेतला.
त्या दिवसापासुन चाफा काही कारणाने समोर आला तरी मनात राग आणि डोळ्यात झरकन पाणी उभं रहायचं ते अगदी आता आता पर्यंत...
मग मी ठरवुन चाफ्याकडे बघणच टाळायचे. फुलवाल्याकडे फुलं घेताना, सिग्नल वर चाफ्याच्या माळा विकणारी मुलं दिसली तरी मान दुसरीकडेच वळवायची...मुद्दाम..ठरवुन...
माझ्यासाठी चाफा नावचं फुलं या पृथ्वीवर अस्तित्वातच नव्हतं.
लॉकडाउन च्या काळात आमच्या कराड च्या घरात दोन महिने रहायला होतो आम्ही. रोज संध्याकाळ झाली की गच्चीवर चक्कर मारायला जायचे.असेच एकदा गच्चीवर चक्कर मारताना गच्चीच्या दुसर्या टोकाकडे गेले तेव्हा गेली अनेक महिने न घेतलेला पण तरीही खुप परिचित असा सुवास आलाच...
शेजारचं चाफ्याचं झाड आमच्या गच्चीपर्यंत पोचलं होतं आणि भरभरुन फुललं होतं.तडक तिकडे पाठ फिरवुन मी घरी निघुन आले.दुसर्या दिवशी उठले तर देवासमोर ताटभरुन फुलं दिसली. आमच्या अंगणातली जास्वंदी, शेजारच्या काकुंकडचा मोगरा आणि त्याच्या मध्यभागी चाफा. माझ्या सासुबाईंनी एकदम सुरेख रचुन ठेवली होती ती फुलं.चाफा बघुन परत एकदा जखमेची खपली निघाली. ज्या गोष्टीपासुन पळायचा प्रयत्न करतेय तीच का सारखी पुढे येते आहे कळेना.ते दोन-तीन दिवस एकदम अस्वस्थ होते मी.
आणि मग एक दिवस सोशल साईट्स बघताना अचानक
सुनीताबाई देशपांडे नी वाचलेली कवयित्री पद्मा गोळे यांची कविता सापडली
"चाफ्याच्या झाडा".
आधी तर धो धो रडले. यावेळी खपली पडुन जखम भळाभळा वाहायला लागली होती.गेल्या दोन तीन दिवसांची अस्वस्थता सगळी वाहुन गेली डोळ्यावाटे. आणि मग एकदा, दोनदा, दहादा...अक्षरश: शंभरदा ऐकली ती कविता मी...प्रत्येक वेळी नवा अर्थ लागत गेला....
इतके दिवस मनात जो राग होता तो फक्त चाफ्यासाठी नव्हता, त्यातला थोडा आईसाठी पण होता हे त्या दिवशी नव्याने कळलं मला.काय नडलं होतं तिला, हे असं वेडं धाडस करायचं असं हज्जारदा म्हणालो होतो...मी आणि श्वेतु ...
त्या दिवशी ती कविता ऐकताना तो सगळा राग वाहुन गेला.मन एकदम स्वच्छ झालं. आई गेली त्या दिवशी तिला शेवटचा निरोप देताना माझ्या मनात पराकोटीचं दु:ख आणि राग पण होता.पण ही कविता ऐकली आणि मी एकदम शांत होउन गेले आत कुठेतरी. आता शांत मनाने सगळ्या घटनांचा तटस्थपणे विचार करता येतोय.
आई गेली तेव्हा मला भेटायला माझ्या मैत्रिणी येत होत्या. त्यातलीच एक सायली, माझी मैत्रिण, मला म्हणाली होती,
"स्मिता तुझी आई तिचं सगळ्यात आवडतं काम करताना गेली.सगळ्यांच्या नशिबी हे सुख येत नाही......"
खरच असेल का हे ? जे घडलं ते आता घडुन गेलं. त्यात उगीचअडकुन पडण्यापेक्षा पुढे जाण्यासाठी असा काहीतरी दिलासा मनाला देणं आवश्यक असत बहुतेक.
ही कविता सादर करताना सुनीताबाई म्हणतात की ही कविता पद्माबाईं गोळे नी लिहिली आहे..पण तरी ती माझी कविता आहे
ज्या दिवशी ही कविता ऐकली त्या दिवशी मला पण हेच वाटलं सेम...की ही माझी कविता आहे...माझी आणि श्वेतु ची.....
चाफ्याच्या झाडा ….चाफ्याच्या झाडा,
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु: ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….चाफ्याच्या झाडा
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर तुझ्याच
फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय …. कळतंय ना ….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना
आई आमची ओंजळ किती काठोकाठ भरुन गेली आहे ते ती गेल्यावर कळलं.तिच्या कृतीतुन तिनं कितीतरी गोष्टी आम्हाला शिकवल्या ते आत्ता जाणवतय.
वाचनाची आवड आणि सवय तिच्यामुळे आम्हाला लागली. ती स्वतः प्रचंड वाचन करायची तिचं बघुन बघुनच आम्ही वाचायला शिकलो. टाउन हॉल ला वेळोवेळी लगणार्या पुस्तक प्रदर्शनात ती आवर्जुन आम्हाला घेउन जायची आणि हवं ते पुस्तक घेउन द्यायची.पेपर मद्धे येणारे सुंदर लेख आवर्जुन वाचायला सांगायची ती.
तिनं आम्हाला छान नीटनेटकं रहायला शिकवलं.मला अजुनही आठवतय ती जेव्हा ऑफिस साठी साडी नेसत असायची तेव्हा मी रोज तिचं निरीक्षण करत असायचे.सुरेख नीट्नेटक्या निर्या आणि पिनअप करुन छान तयार व्हायची ती. केसात एखादं फुल किंवा गजरा ठरलेला. ते रोजचं साडी नेसण बघुन मग मी आणि श्वेतु "घरघर" खेळताना साड्या नेसायचा प्रयत्न करायचो. आम्हा दोघीनाही शाळेत असतानाच खुप लवकर साडी नेसता यायला लागली होती.
कराड सोडुन इथे पुण्यात आल्यावर सुद्धा साडी शिवाय सलवार कुर्ता, लेग इनटॉप आणि मग जीन्स असे बदल सुद्धा सहज आत्मसात केले तिने. देश तसा वेश.
अजुन एक हाताला धरुन न शिकवता पण तिनं कृतीतुन शिकवलेली गोष्ट म्हणजे स्वयंपाक. चांगलं चुंगलं करणं आणि खाणं हे दोन्ही तिला आवडायचं.अनेक नवे नवे पदार्थ आम्ही घरी करायचो.पुढे मी स्वयंपाकात पडल्यावर दहावी आणि बारावी च्या सुट्टी मधे मी रोज संध्याकाळी एक मस्त पदार्थ आई ऑफिस मधुन यायच्या वेळी करायचे. १०० पाककृती असं काहीतरी एक पुस्तक आम्ही आणलं होतं त्यात बघुन मी रोज काहीबाही करायचे आणि आई ऑफिसमधुन घरी आली की तिला तो पदार्थ खाउ घालायचा असा नियमच ठरुन गेला होता.
आई बाबांनी आम्हाला खुप फिरवलं. आमच्या सगळ्या सुट्ट्यांमधे ट्रीप ठरलेलीच असायची.त्या ट्रीपची आखणी आई स्वतः करायची. अगदी नकाशा समोर मांडुन, अंतरं पाहुन त्याची आताच्या भाषेत आयटेनेरेरी प्लॅन केलेली असायची. गुगल नसताना ठरवलेली ती ट्रीप नेहेमीच मस्त व्हायची.
बाबा नोकरी निमित्तानं परगावी असल्यामुळे घरच्या सगळ्या जबाबदार्या आई च एकाहाती पार पाडायची. बॅकेची कामं, किराणा भाजी आणणं, अगदी सायकल वरुन सिलिंडर आणणे अशी सगळी कामं अगदी शाळेत असतानाच तिला बघत अगदी सहजगत्या शिकलो आम्ही.
अत्यंक चौकस स्वभाव आणि दूरदृष्टी असलेल्या आमच्या आई ने एकदा बाजारातुन मेथी ची भाजी आणावी इतक्या सहजतेने आमच्या शेजारच्या गल्लीतला नवीन कंस्ट्र्क्शन मधला एक छोटासा फ्लॅट पण बुक केला होता आमच्या आज्जी आजोबांसाठी. बाबा यायची वाट बघत बसले तर तोवर फ्लॅट हातचा जाईल तसे नको व्हायला हा त्यामागे विचार होता. बाबा शनिवारी घरी आल्यावर त्याना तिने नेउन दाखवला फ्लॅट. बाबा ना पण तिच्या निर्णायावर पुर्ण विश्वास असायचाच आणि तो सार्थ पण असायचा.
तिनं आम्हाला सर्वर्थानं सक्षम बनवलं.
आमच्यावर आमच्या संदर्भातले कुठलेही निर्णय तिनं कधीही लादले नाहीत.मग तो आमच्या शिक्षणाचा असो की लग्नाचा.
सावध राहुन माणसं ओळखायला तिनं शिकवलं. कोणतीही जबाबदारी अंगावर घेतली की कितीही अडचणी आल्या तरी तडीस न्यायला शिकवलं. माणसं जपायला शिकवलं पण त्याचवेळी कोणी आपला गैरफायदा घेउ नये यासाठी सावध रहायलाशिकवलं.
निर्णयक्षमता शिकवली. आणि त्या निर्णयाची जबाबदारी सुद्धा घ्यायला शिकवलं.
कोणत्याही गोष्टीसाठी कोणावरही अवलंबुन राहायचं नाही हे शिकवलं.
कोणतीही पुर्वसुचना न देता असं अचानक नाहिसं होउन
शिकवायच्या राहिलेल्या उरलेल्या गोष्टीसुद्धा शिकवल्या तिनं गेल्या वर्षभरात....
कितीही संकटं आली तरी आपले पाय घट्ट रोवुन उभं रहायला शिकतोय सद्ध्या...
काही नाती नव्याने समजली, काही माणसं आणि काही स्वभावनव्याने कळले.
ती होती तोवर फक्त स्वतः पुरताच विचार करायचो.स्वतः चे खुप छोटे त्रास आभाळाएवढे मोठी वाटायचे.आता सगळ्या प्रसंगांकडे तटस्थपणे बघायला शिकतोय आम्ही...हे ही दिवस जातील इतकच पक्क ठावुन आहे....
आईच्या अनेक सुंदर आठवणी, तिचं प्रेम, तिचा आशीर्वाद कायम आहेच आमच्या सोबत....
आमची ओंजळ अशी फुलांनी काठोकाठ भरलेली आहे.....
कधीही न कोमेजणारी कायम सुवास देणारी फुलं....
आईने दिलेली ही शिदोरी कधीच संपणार नाहिये....
आता चाफ्याबद्दल कसला राग.... 😊
माझं प्रिय चाफ्याचं झाड...माझी आई.....🤗😘
( सुनीताबाई नी वाचलेली हीच ती कविता https://youtu.be/i5_jgK1ggkM )

No comments:

Post a Comment