Tuesday, July 22, 2025

वरणफळं पार्टी

 वरणफळं पार्टी

माझ्या लहानपणी वरणफळं करणे आणि खाणे हा एक सोहळा असायचा.
सोहळा अशासाठी म्हटलं कारण हा पदार्थ करायचा म्हणजे त्याची तयारी २-३ दिवस चालायची.आता तुम्ही म्हणाल की हा इतका सोपा पदार्थ आहे तर त्याची काय तयारी करायची ? तर तयारी पदार्थ करण्यासाठी नसुन तो कधी करायचा हा "बेत" करण्यासाठी असायची.
त्याचं काय होतं की माझ्या आई आणि बाबांना हा प्रकार अजिबात म्हणजे अजिबात आवडायचा नाही."आमटी आणि पोळीचा काला काय खायचा नुसता.त्यापेक्षा भाज्या खाव्यात भरपुर." ईति आमच्या मातोश्री.
चकोल्या भुरकण्यातलं सुख हिला कधी कळणार,म्हणुन मी हळहळायचे.मुळात आईला डाळ, आमटी हे प्रकार फारसे करायला पण आवडायचे नाहीत. कोरडी पालेभाजी किंवा फळभाजी आणि एखादी ओलसर उसळ किंवा सार्/कढी/गोळ्याचं सार्/चाकवत असा आमच्याकडे रोजचा स्वयंपाक असायचा. आम्ही दोघी बहिणी आमटी प्रेमी असलो तरीही अगदी आठवड्यातुन एक दिवस आमटी असायची. वरणफळं वगैरे लांबची गोष्ट.
मग एखाद्या दिवशी आमची लाडकी आज्जी हा बेत ठरवायची ( आजोळ गावात असल्याचे बरेच फायदे होतात.त्यातलाच हा एक) मग परत आज्जीकडे जायचं म्हटल्यावर लगेच वरणफळं खाऊन हातावर पाणी पडल्यावर लगेच कोण घरी परत जातंय.त्यामुळे शाळेची सुट्टी विचारात घेउन २-४ दिवस तिथेच राहायच्या बेताने ( आणि अजुन २-३ चविष्ट बेत जोडीला ठरवुन.) चकोल्या/वरणफळं चा प्रोग्रॅम ठरायचा.
वरणफळं म्हणजे आमटी आणि पोळी यांचा काला नसतो हे तु आईला पूर्वी का शिकवले नाहीस असं आज्जीला विचारलं की ती म्हणायची, जाउदेत ग.तुझ्या आईला सगळ शिकवलं असतं तर आपल्या या चकोल्या पार्ट्या कशा झाल्या असत्या? हे ही खरंच होतं बरं का.आज्जी,आजोबा,मी आणि माझी धाकटी बहीण आमची मस्त पार्टी असायची. (मामा पुरता वेगळा स्वयंपाक व्हायचा. तो पण आईच्याच लाईन मधे.चकोल्या न आवडणारा..बिचारा )
झणझणीत आज्जीस्टाईल चकोल्या,त्यावर भरपूर साजुक तूप,दाण्याची किंवा लसणीची चटणी,पापड-कुर्डया,आणि ताजं ताक असा मेन्यु असायचा.कोण किती मोठयांदा भुरका मारुन चकोल्या हाणु शकतो अशी जणु चढाओढच असायची.चकोल्यांचं भलं मोठं पातेलं बघता बघता खाली जायचं आणि या सगळ्या सरंजामाला बाहेर धो धो पडणार्या पावसाचं बॅगराउंड म्युझिक मिळालं तर आहाहा.
दरवेळी आजीचं चकुल्याचं ( चकुल्या..आजीचा शब्द ) पातेलं बघितलं की आजोबा म्हणायचे," विजु इतकं सगळं कोणं ग संपवणार?" त्यावर आजी म्हणायची "तुम्ही काळजी करु नका.आम्ही बघतो कसं संपवायचं ते" आणि मग जेवताना पातेलं संपत आलं की मिस्कील हसुन म्हणायचे,
"संपलं की ग.मला काळजीच पडली होती"😂
एकदा मी आणि माझी मैत्रिण 'अभ्यासाला' म्हणुन आजीकडे गेलो होतो. आजीच्या घरातली वरची मामाची खोली किंवा गच्ची दुपारी मोकळीच असायची. तिथे छान अभ्यास व्हायचा. आम्ही येणार म्हणुन आजीनं वरणफळं केली. गेल्या गेल्या थोडाफार अभ्यास केला आणि मग गरमागरम वरणफळांवर आडवा हात मारला. त्यावर आणि ताजं ताक पिलं. आता १५-२० मिनिटं डुलकी काढतो आणि मग अभ्यासाला बसतो असं ठरवुन वरच्या खोलीत गेलो. आणि काय चमत्कार.. १५ मिनिटांचे २ तास झाले अपोआप 😉. अशा त्या आजीच्या जादुई चकुल्या.
आजी कडुन ज्या अनेक रेसिपी शिकले त्यातली ही अगदी जिव्हाळ्याची. थोडक्यात कृती पण लिहुन ठेवते इथेच.
चकुल्यांसाठी कणीक भिजवताना त्यात मीठ,हळद आणि थोडं गुळाचे पाणी घालायचं आणि तेलाचा हात लावुन कणीक भिजवायची.
गुळाचं पाणी घालुन कणीक भिजवल्यामुळे चकोल्यांना स्वत: ची अशी एक सुरेख गोडुस चव येते.
आमटीसाठी १/२ छोटा कांदा,१/२ टोमॅटो,१-२ काळी मिरी,१ तुकडा दालचिनी,१-२ चमचे ओलं खोबरं,जिरे,भरपूर लसूण,कोथिंबीर हे सगळं छान बारीक वाटुन घ्यायचं.मग थोड्या तेलात मोहरी,जिरे,मेथ्या,हिंग,हळद,कढिपत्ता याची फोडणी करुन त्यात हे वाटण नीट परतून घ्यायचं.त्यात शिजवलेली तूरडाळ घालायची.भरपूर पाणी घालायचं ( वरणफळांना पोहता आलं पाहिजे).गुळ,चिंच कोळ,मीठ,तिखट,आणि गोडा मसाला घालायचा आणि मस्त खळखळुन उकळी येउ द्यायची.
आता भिजवुन ठेवलेल्या कणकीची तेल लावुन पोळी लाटायची.पीठी अजिबात लावायची नाही नाहीतर सगळी पिठी आमटीत उतरते आणि चकोल्या फारच गिजगोळा होतात.त्यामुळे तेलावरच लाटायची पोळी. मग छोट्या नैवेद्याच्या वाटीने गोल गोल फळं करुन घ्यायची.बरेचजण कातण्याने मोठ्या शंकरपाळ्या कापतात पण आजी कायम गोल आकारात फळं करुन घ्यायची. चव बदलते म्हणायची. काय कोण जाणे खरच चव बदलते का एकदा प्रयोग करुन पाहिला पाहिजे.ही गोल गोल फळं उकळणार्या आमटीत टाकायची आणि मस्त शिजु द्यायची.व्यवस्थित शिजली की गॅस बंद करुन हे सगळं प्रकरण थोडावेळ मुरु द्यायचं.
जेवताना या चकोल्या मस्तपैकी ताटात वाढुन घ्यायच्या. वर मनसोक्त तुप घालायचं.ताटाला गरज असल्यास टेकण वगैरे लावायचं आणि हाताने भुरकायचं.मग कोपरापर्यंत ओघळ आला तरी चालेल.
आम्हा बहिणींचं हे वरणफळं/चकोल्या प्रेम आमच्या लेकींपर्यंत पोचलंय.त्यामुळे आमच्या चकोल्या पार्ट्या होत असतात नेहेमीच.धोधो कोसळणार्या पावसात किंवा मस्त गुलाबी थंडीत अशा गरमागरम वाफाळत्या चकोल्या करायच्या आणि आजीची आठवण काढत खायच्या. तिकडे वरती बसुन आमच्याकडे बघुन ती पण तृप्तीचा ढेकर नक्की देत असणार.
तळटीप:- बहिणाबाईंचं approval न घेता हा लेख गडबडीत पोस्ट केला आणि त्यातली सगळ्यात मोठी चूक मॅडम नि शोधून काढली😜.
"आपल्या दुसऱ्या आजीच्या चकोल्यांचा उल्लेख पण करायला हवा होतास" असे कान उपटले गेले आहेत. दुसऱ्या आजीबद्दल लिहिण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्यामुळे तिथल्या चकोल्या पार्टी चा उल्लेख नवीन लेखात करेन आता😀 Shweta Kulkarni Kanade दुसऱ्या आजीवर लेख लिहायला घेतला आहे ग 🤗🤗.प्रूफ रीडिंग ला पाठवते.
-©️स्मिता श्रीपाद

No comments:

Post a Comment