दक्षिणवारी - सुरुवात, चला फिरायला
सालाबादप्रमाणे याही वर्षी आमचे येथे उन्हाळी सहल संपन्न झाली हो.मागील दोन वर्षी उत्तर काबीज केल्यामुळे यंदा जरा दक्षिणेकडे मोर्चा वळवू असं संपूर्ण बहुमताने ठरलं. त्यातच आणि सारखं ऑफिस च्या कामामुळे दिल्ली वाऱ्या करून नवरा कंटाळला असल्याने जरा दक्षिणेकडे फेरफटका मारायचा बेत केला.
सगळं इतकं साधं, सरळ, सोप्पं असेल तर मग ट्रिप ला काय मजा ? हो कि नई... या दरम्यान लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि पुण्याच्या ( खडकवासला मतदारसंघ) मतदानाची तारीख आणि आमच्या ट्रिप ची तारीख बरोब्बर जुळली... आहे कि नाई टेलिपथी
…

मग सुरु झाला एक संवाद..
मन 1 - पाच वर्षातून एकदा निवडणूक येते. अजिबात चुकवायची नाही. सगळी बुकिंग बदलूयात.
मन 2 - बावळट आहेस का ? हॉटेल चं ठीक. बदलून मिळेल. फार नुकसान नाही व्हायचं. पण विमानाच्या तिकिटांचं काय ? इतका दंड बसेल कि नवीन पैठणी येईल त्यात.
मन 1 - नाही नाही. हे योग्य नाही. आणि पैठणीचं काय मधेच. मत द्यायला पैठणी नेसून जायचंय का ? आपण जबाबदार मतदार आहोत. आत्ता मत दिलं नाही तर पुढची 5 वर्ष वाईट वाटेल.
मन 2 - बघा बुवा. तुम्ही मारे खिशाला भुर्दंड देऊन मतदान करणार पण त्या ताई किंवा वहिनींना फरक पडणारे का ?
मन 1 - ताई आणि वहिनीचं जाऊदेत. आम्हाला फरक पडणारे. तू आता शांत बस. शटाप.
अशा रीतीने लोकशाही च्या भक्कम आधारस्तंभांनी खिशाला कात्री लावून बुकिंग बदलून घेतली आणि निवडणूक पार पडली. (आता हे वाचताना आमचं मत वाया गेलं का वसूल झालं विचारू नये. मतदान गुप्त असतं.)
तर अशाप्रकारे 18 मे संध्याकाळी 5:15 वाजता बंगळूर च्या दिशेने कूच केले.कधी नव्हे ते विमान वेळेच्या आधीच 10 मिनिटे सुटले आणि आम्ही बंगळूर मध्ये उतरलो.
आमचा ड्रायवर वसंत कुमार आम्हाला न्यायला विमानतळावर हजर होता. गाडीत बसण्याआधी फिल्टर कापी घेऊन (शास्त्र असतं ते ) ताजेतवाने होऊन लगेच मैसुरु कडे प्रस्थान केले. आम्ही पोचल्यामुळे बंगळूर ला फार फार आनंद झाला आणि तो त्याने धो धो पावसाच्या रूपाने व्यक्त केला. आम्ही होतो तेथून फक्त 8 किलोमीटर वर असलेल्या चेन्नास्वामी स्टेडियम वर कोहली विरुद्ध धोनी मध्ये IPL सामना जोरदार रंगला होता आणि आम्ही गाडीत बसून मुसळधार पाऊस बघत होतो.
या प्रकारची एकंदर सवय इथल्या लोकांना असावी कारण ड्रायवर निवांत होता. मैसुरु haighway ला पोचेपर्यंत पाऊस जाईल असं म्हणाला आणि खरंच तसं झालं.
वाटेत जेवण करून मैसूर ला पोचलो आणि उद्यापासून फिरायला सज्ज झालो....
क्रमश:
-
स्मिता श्रीपाद

No comments:
Post a Comment