कृष्ण, द्रौपदी, सुभद्रा आणि चिन्धी
( पुढील लेख सहज गंमत म्हणुन लिहिला आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा वगैरे हेतु अजिबात नाही.कृपया निषेध वगैरे व्यक्त करु नये. तो गंमत म्हणुन वाचावा ही विनंती.गीतकार, संगीतकार,गायक यांच्याबद्दल अत्यंत आदर आहेच.
)
त्यानिमित्ताने माझ्या ७ वर्षांच्या पुतणीने "भरजरी ग पितांबर दिला फाडुन" हे गाणं पाठ केलं होतं. माझे सगळे मामे,मावस दीर, नणंदा असे एकत्र जमुन यंदाची राखी साजरी केली. (हो..हो... कोवीड आहे हे माहिती आहे...आम्ही सर्व नियम पाळुन एकत्र आलो होतो..लगेच भुवया उंवावु नका
..)
तर त्या दिवशी राखी बांधताना मृदुला हे गाणं गात होती...आम्ही सगळ्यांनी हे गाणं खुप मज्जा करत तिच्यासोबत गायलं आणि त्या दिवसांपासुन हे गाणं जे काही तोंडात बसलंय की बस रे बस...
येताजाता जो तो घरात हेच गाणं गातोय.. कपड्यांच्या घड्या करताना, स्वयंपाक करताना, झाडांना पाणी घालताना,अंघोळ करताना जिकडे तिकडे चिंध्याच चिंध्या... 
परवा रात्री ११ वाजता बेडशीट नीट करता करता नवरा हे गाणं गायला लागला आणि मग घरात फुटल्यासारखे हासलो आम्ही.
आज सकाळी राखी चे व्हिडीओ पाहाताना परत एकदा हे गाणं कानावर पडलं..म्हटलं आता काही खरच नाही....या गाण्यासाठी आता लेखाची एक चिंधी फाडलीच पाहिजे ...
आज गूगल उघडुन या गाण्याचे शब्द पाहिले आणि एकदम बेसिक प्रश्ण पडले.
ज्यांना हे गाणं अजिबात च माहिती नाही त्यांच्यासाठी एकदम थोडक्यात सारांश...
कृष्णाने सुभद्रा आणि द्रौपदीच्या भक्तीची परीक्षा बघण्यासाठी स्वतः चं बोट कापल्याचं सांगितलं म्हणे नारदमुनींना.मग काय आपले नारदमुनी गेले आधी सुभद्रेकडे की बाई ग तुझ्या भावाचं बोट कापलंय तर त्याला बांधायला एखादी चिंधी देतेस का ?
तिने सरळ सांगितलं की नाही बुवा. माझ्याकडे फक्त भरजरी साड्या आहेत शालु पैठण्या ई ई..याची कशी चिंधी देउ.मग नारद गेले द्रौपदी कडे तर तिने म्हणे अंगावरचा भरजरी पितांबर काहीही विचार न करता टरकन फाडला आणि दिला. तर त्यावरुन कवीने असे ठरवले आहे की कृष्णा ची स्वतःची पाठची बहीण वैरिणी सारखी वागली आणि मानलेली बहीण हाकेला धावुन गेली..हुश्श..
कृष्णदेवांना तरी काय अगदी बोट कापलय वगैरे खोडी काढायची गरज ना......बर राजमहालात इतके एक्सपर्ट राज वैद्य असताना काही दुखलं, खुपल,पड्लं,झडलं, कापलं की आधी ते लोक येतील ना...म्हणजे यायचे म्हणे....(हे म्हणजे ...चार चार घरं, घरात २४ तासाचे डॉक्टर असताना आणि मिनी आय सी यु पण असताना बच्चन लोक कोविड झाला म्हणुन नानावटी मधे दाखलं झाले म्हणतात...तसचं काहीसं...तर ते असो..loackdown कृपा..अशीच उदाहरणं सुचणार..) असं असताना काहितरी दुसरी युक्ती करायची ना..हे म्हणजे अगदीच कल्पनादारिद्रं...
आधी च खोड्या काढायची हौस त्यात आणि बहिणीची खोडी काढणे हा सगळ्या भावांचा लाडका विषय..म्हणुन काढली खोडी असं म्हणु आपण...
बरं आता महाभारत आणि रामायण बघुन (परत एकदा loackdown कृपा) आपल्या सर्वांना एव्हाना कळलेच असेल की त्या काळच्या बायांकडे नुसत्या भरजरी साड्याच असायच्या की नाई...शालु,पैठण्या,कांजीवरम्,नारायणपेठ ई ई....जेव्हा बघावं तेव्हा सगळ्या जणी आपल्या भरजरी साड्या, दागदागिने आणि फुल मेकअप मद्धे...सुभद्रा आणि द्रौपदी बाईंकडे काय हो नुस्त्या कपाट भरुन भरजरी साड्या च असणार...
मलमल कॉटन किंवा गेला बजार मउसुत इचलकरंजी कॉटन साड्या तेव्हा कुठुन असणार...?
आणि जखम बांधायची म्हणजे कसं मऊसुत कापड हवं, रेशमी जरी असलं तरी ते टोचणार च ना... सुभद्रेचा मुद्दा एकदम बरोबर आहे....जखम बांधायला रेशमाची चिंधी कशी काय उपयोगी पडेल ? तिच्या लहानपणी औषधशास्त्रा चा अभ्यास तिने नीट केलेला असणार नक्की...
आणि मला तर वाटतंय नारदांना सुभद्रेने सुचवलं पण असणारे हे सगळं आणि राज वैद्यांकडे जायचा सल्ला पण दिला असणारे..पण आपले नारद कसे आहेत माहिती आहे ना....मुद्दाम त्यांनी हा तपशील गाळला ..उगीच नाही त्यांना कळीचे नारद म्हणत...
द्रौपदी ने दिला आपला भरजरी पितांबर फाडुन कारण तिला हे सगळं औषधशास्त्र वगैरे लक्षात नसेल इतकं ( किंवा लहानपणी ऑपश ला टाकलं असेल...)...पाच पाच नवर्यांना सांभाळायचं म्हणजे काय खाउ आहे का....? ..आले नारद...लागलय म्हणाले असतील कृष्णाला...दिली आपली एक चिंधी फाडुन..घरात इतकी कामं आहेत...कुठे शोधाशोध करायची....हाय काय नाय काय...
नारदांनी आपलं एकाचं दोन करुन सांगितलं देवांना.....
आधी भावा बहिणींत तु तु मी मी चालु असतेच..त्यात परत आणि भांडणं लावायचं काही कारण आहे का...?
मृदुलाच्या त्या एका गाण्याने डोक्यातली चक्र अशी गरागरा फिरली आणि हे सगळं कागदावर उतरलं.
आता पुढच्या राखीपर्यंत या मजेशीर आठवणी राहतील इतकच.
बाकी असे कितीही नारद येवोत, भावाबहिणींचं गोड नातं अशा छोट्या चिंध्यांना भिक घालत नाही हे नक्की..

-
स्मिता श्रीपाद
No comments:
Post a Comment