दक्षिणवारी - जंगलातले रस्ते आणि उटीचा पाऊस
मैसुर चा दुसरा दिवस उजाडला तो पावसासोबत. उन्हाळा आहे की पावसाळा कळु नये अशा पद्धतीने मस्त जोरदार पाउस पडत होता. नाही म्हणलं तरी पुढच्या प्रवासाची चिंता वाटायला लागली. पण काही वेळातच पाऊस उघडला. मैसुर चा मुक्काम आवरता घेउन हॉटेल मधुन बाहेर पडलो. आज नाष्टा करण्यासाठी मैसुर मधल्या एका लोकप्रिय अशा "विनायका मयलारी डोसा" अशा नावाच्या हॉटेल मधे जाणार होतो.
अनेक वर्षांपुर्वी आई बाबांसोबत इथे आलेले असताना आम्हाला त्यावेळच्या ड्रायव्हर काकांनी एका गल्लीबोळातल्या टपरीवजा हॉटेल मधे नेलेलं आठवत होतं. उलथण्यावर डोशांची चळत घेउन येणारे वेटर आणि टेबलवरच ठेवलेलं पांढर्याशुभ्र नारळाच्या चटणीचं भांडं असं अंधुक चित्र डोळ्यासमोर होतं. केळीच्या पानावर लुसलुशीत ईडल्या आणि डोसे मनसोक्त खाल्लेले मला नीटच आठवत होते ( खवय्या असे तपशील सहसा विसरत नाहीत ).काल पॅलेस वरुन परत येताना आमच्या वसंत कुमार ला हे वर्णन सांगताच त्याने ताबडतोब त्या लोकप्रिय हॉटेल चं नाव सांगितलं आणि आज तिथेच चाललो होतो.
त्या हॉटेल समोर येताच एकदम लख्ख आठवलं की हेच ते. एका लहानशा गल्लीत अगदी एखाद्या दुकान गाळ्यासारखं दिसणारं ते हॉटेल आता सोशल मिडीयामुळे लोकप्रिय झालेलं दिसलं. शेजारीच त्याचीच नवीन मोठी ब्रांच उघडलेली दिसली.आम्ही लवकर पोचलो त्यामुळे गर्दी कमी होती. पण तरी वेटींग होतं. वेटींग लिस्ट मधे नाव लिहिणे वगैरे काही भानगड दिसली नाही. आपली आपण जागा शोधा, बसा, खा आणि जा असा साधा मामला.एसटी मधे रुमाल टाकुन जागा पकड्णे किंवा भयंकर गर्दी असलेल्या लग्नात जेवणाच्या पंगतीत खुर्ची मिळवणे ही कला ज्यांना जमते त्यांनाच इथे जागा मिळवता येइल. आम्हाला दोन्हींचा अनुभव असल्याने जागा मिळवली. बसल्या बसल्या, केळीचं पान असलेल्या स्टील च्या मोकळ्या ताटल्या आमच्यासमोर ठेवण्यात आल्या. मग एक जण घरी लोकांना आपण वाढतो तसं एका कॅसरोल मधे वाफाळत्या ईडल्या घेउन आला. एक की दोन किती हव्यात तशा वाढुन निघुन गेला. एक आण्णा अखंड चटणी चं भांडं घेउन फिरतच होता. संपली चटणी की वाढ. "चटणी वाटी जादा पैसे" असली काही भानगडच नाही. मग आली डोशांची चळत. १-२ हवे तितके डोसे पानात येउन पडले. (बिल करताना आपण किती इडल्या आणि डोसे ते स्वतः च सांगायचं. वेटर मोजत नाहीत बहुतेक. सगळा विश्वासाचा मामला) डोसा वर बटर चा गोळा आणि आत सागु. सागु म्हणजे कांदा आणि कोबीची भाजी होती. बटाटा नावालाही नव्हता. वरुन कुरकुरीत पण आतुन मऊ असा खमंग डोसा, चटणी आणि सागु... आहाहा... अजुन लिहिण्यासारखं पुढे काही नाहीच. कधी मैसुर ला गेलात तर नक्की खाउन या. असा भरपेट नाष्टा करुन उटीच्या रस्त्याला लागलो.
मैसूर ते उटी हा रस्ता जगातल्या सर्वात सुंदर रस्त्यांपैकी एक असेल. हा सगळाच रस्ता अतिशय सुंदर आहे कारण वाटेत बंदीपुर आणि मदुमलाई अशी दोन अभयारण्य लागतात. नीलगिरी पर्वतरांगांमधलं विस्तीर्ण जंगल कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ राज्यांमध्ये पसरलं आहे. कर्नाटक सीमाभागातल्या जंगलाला बंदीपूर, तामिळनाडू मध्ये मदुमलाई आणि केरळ भागात वायनाड असे म्हणतात.या संपूर्ण जंगलाला एकत्रित मिळून नीलगिरी बायोस्फियर रिझर्व्ह असं पण म्हणतात.
काही वर्षांपूर्वी, कृष्णमेघ कुंटे ( श्री जगन्नाथ कुंटे यांचे सुपुत्र ) यांचं एक पुस्तक हाती लागलं होतं. कृष्णमेघ कुंटे निसर्गअभ्यासक, evolutionary biologist आहेत. त्यांच्या कॉलेज च्या पहिल्या वर्षी मदुमलाईच्या जंगलात हत्तींच्या संदर्भातील एका संशोधनाच्या निमित्ताने ते एक वर्ष राहिले होते. त्या दिवसातल्या त्यांच्या नजरेने पाहिलेल्या जंगलाच्या आठवणी त्यांनी "एका रानवेड्याची शोधयात्रा" या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. मदुमलाई जंगल, तिथले प्राणी, संशोधकांना मदत करणारे वाटाडे याचं खूप सुंदर वर्णन या पुस्तकात आहे. या पुस्तकामुळे एकंदरीतच मदुमलाई आणि नीलगिरी पर्वतरांगांबद्दल उत्सुकता होतीच.'नीलगिरी' नावाची एक गम्मत या पुस्तकात लिहिलेली आहे पण ती पुढच्या भागात सांगेन
.

मैसूर सोडलं कि वाटेत आम्हाला एका पेट्रोल पंपासमोर सूर्यफुलाचं शेत दिसलं. तिथं एक फोटो ब्रेक घेऊन पुढे निघालो. तासाभरात बंदीपूर जंगल सुरु होतं. बंदीपूर ची हद्द जिथे संपते तिथून लगेच मदुमलाई चा भाग सुरु होतो. संपूर्ण जंगलातून जाणारा हा रस्ता अतिशय नयनरम्य आहे. दोन्ही बाजूने दाट हिरवीगार झाडं आणि मधून जाणारा देखणा खड्डेविरहित रस्ता. जंगलात शिरताना चेकपोस्ट जवळ तपासणी होते. इथून पुढे थेट उटीपर्यंत आणि उटीमध्येसुद्धा प्लास्टिक बंदी आहे त्यामुळे चेकपोस्ट वर गाडीतल्या सगळ्या प्लास्टिक बॉटल्स जमा कराव्या लागतात. जंगलातून जाताना प्राणी रस्त्यांवर येऊ शकतात त्यामुळे वाहतुकीचे नियम काटेकोर पाळावे लागतात.जंगलातून जाताना तुमच्या नशिबात असेल तर आजूबाजूला भरपूर प्राणी दिसतात असं कळलं होतं त्यामुळे या प्रवासाची अजूनच उत्सुकता होती.आजूबाजूला बघत राहा. प्राणी दिसतात असं एकमेकांशी बोलत बोलत बंदीपूर च्या हद्दीतून आत शिरलो आणि.....
पहिल्याच वळणावर डावीकडे एक हत्तीण आणि तिचं पिल्लू डुलत डुलत येताना दिसले.प्राणी दिसतात म्हणजे माकडं, हरणं वगैरे दिसतील असं वाटलं होतं. थेट हत्ती ? काल प्राणिसंग्रहालयात हत्ती पाहिले होते पण ते बघणं आणि असा रानात मोकळा फिरताना हत्ती बघणं यात काय फरक आहे ते अनुभवल्याशिवाय कळणार नाही. हत्ती आणि पिल्लू सावकाश डावीकडून डुलत डुलत आले ( खरीखुरी गजगामिनी चाल पाहिली ) आणि रस्ता पार करून उजवीकडच्या जंगलात शिरले. सुरुवातच अशी भारी झाली. जसजसं पुढे गेलो तसं हरणांचे कळप दिसायला सुरुवात झाली. गाड्या बघून बावरत नव्हती. त्यांना सवय असावी. माकडं पण अधून मधून दिसत होतीच.
बंदीपूर संपून मदुमलाई ची हद्द सुरु झाली आणि अचानक जोरदार पाऊस सुरु झाला. पावसाचा जोर इतका जास्त होता कि काही मिनिटांसाठी रस्ता अजिबात दिसेनासा झाला. इतका धुवांधार पाउस तो पण असा जंगलात बघायची पहिलीच वेळ. काही वेळासाठी मला भिती वाटायला लागली.वसंत कुमार मात्र निवांत गाडी चालवत होता. अखेर तो पावसाचा पट्टा संपला आणि एकदम स्वच्छ उन्हं आली. नुकत्याच पडुन गेलेल्या पावसामुळे धुवुन निघालेलं जंगल अजुनच सुंदर दिसायला लागलं. परत एकदा हरणांचा एक मोठा कळप दिसला. सोनेरी रंगाची, तुकतुकीत कांती असलेली आणि पावसामुळे अजुनच चमकणारी ती सुरेख हरणं बघुन "मज आणुनि द्या तो हरिण अयोध्यानाथा" असं सीता रामाला का म्हणाली असेल ते नीटच कळलं.
उटीचे सुप्रसिद्ध ३६ हेअरपिन टर्न्स सुरु झाले. जसंजसं वर जायला लागलो तसं ढगांमधे बुडालेले डोंगर दिसायला लागले.हवा मस्त गार होतीच. उटी मद्धे पोचुन जेवायला हॉटेल मधे गेलो तसा जोरदार पाउस सुरु झाला. सकाळपासुन प्रवास पण झाला होता त्यामुळे झोप आली होती त्यामुळे जेवल्यानंतर उटीमधल्या आमच्या ठरलेल्या 'हॉटेल दर्शन' मधे चेक इन केलं आणि पांघरुणात गुडुप झालो.
संध्याकाळी जाग आली तरी पाउस सुरुच होता आणि सोबतीला जोरदार थंडी. ७ च्या सुमारास पाऊस थोडा कमी झाल्यावर उटी मार्केट मधे एक फेरफटका मारला. स्वेटर, जॅकेट्स अशी काही किरकोळ खरेदी केली आणि पावसात चालत चालत उटी मेन मार्केट मधे वुडफायर पिझ्झा मिळणार्या "नाहर'स कॅफे" मधे जेवायला गेलो. बाहेर मस्त थंडी आणि आत गरमागरम पिझ्झा, पास्ता असं लेकीच्या आवडीचं जेवण केलं.
भर मे महिन्यात इथे पुण्यात घामाच्या धारा लागलेल्या असताना तिकडे उटी मधे रुम मधे हीटर लावायची वेळ आली होती इतकी थंडी होती.उद्या उटी फिरायचं होतं त्यामुळे पावसाने कृपा करावी अशी मनोमन प्रार्थना करत पांघरुणात गुडुप झालो
No comments:
Post a Comment