*हरवलेली(?) कविता*
पुस्तकांचं कपाट आवरताना
जुनी वह्या-पुस्तके चाळता चाळता
गुलाबी वहीतून बाहेर डोकावली
कवितेलाच मग विचारलं
कुठे गायब असतेस गं अशी ?
बरेच दिवसात भेटली नाहीस
उंबराचं फुलच जशी
गेल्या आठवड्यात म्हणे
होता 'जागतिक कविता दिवस'
सापडली असतीस तेव्हा तर
लावले तरी असते फेसबुकला 'स्टेटस'
आताशा नवं काही सुचत नाही
कागद राहतो तसाच कोरा
दिवस रात्र आपले पळतायत
जिवाला उसंत नाही जरा
छंद, यमक, वृत्त, मात्रा
ठेवलंय सगळं गोळा करून
पण उमलण्याची ओढ मात्र
यावी लागते गं आतून
खुद्कन हसून कविता म्हणाली
हवी कशाला जुळवाजुळवी ?
थोडंस खत-पाणी घातलं की
रोपाला सुद्धा फुटते पालवी
छंद, यमक, मात्रा दिसल्या की
मी मुळी फिरकतच नाही
मराठीच्या व्याकरणाची
मला अजुनही भीती वाटते बाई
कधीतरी डोळे मिटून शांत बैस
आणि थोडं डोकावून बघ मनात
फक्त एक दीर्घ श्वास
एवढंच अंतर तुझ्या माझ्यात

No comments:
Post a Comment