दक्षिणवारी - टॉय ट्रेन आणि धुक्यात बुडालेलं कुन्नूर
युनेस्को वर्ल्ड हेरिटेज म्हणून मान्यता मिळालेली उटीची टॉय ट्रेन ची सफर हे आजचं मुख्य आकर्षण होतं. या ट्रेन च आरक्षण सुमारे दोन महिने आधीपासूनच मी करून ठेवलं होतं. IRCTC च्या वेबसाईट वरून बुकिंग करता येतं.लवकर बुकिंग केलं तरच सीटस मिळतात.
उटी ते कुन्नूर असं आज आम्ही टॉय ट्रेन ने प्रवास करणार होतो. झटपट नाष्टा करून ट्रेन स्टेशन गाठलं. छोटंसं चिमुकलं स्टेशन आणि समोर उभी असलेली वाफेच्या इंजिनाची गाडी दिसली. पुलं देशपांडेंनी वर्णन केलेलं छोट्या गावातलं चिमुकलं रेल्वे स्टेशन आठवलं.आमची ट्रेन अजून यायची होती. मेट्टूपलायम स्टेशन वरून आलेली दुसरी टॉय ट्रेन समोर उभी होती आणि तिथे लोकांचं जोरदार फोटोसेशन चालू होतं. 10 मिनिटात अगदी वेळेवर आमची ट्रेन आली. उटी ते कुन्नूर आणि परत उटी अशा दिवसभरात चार ट्रेन्स धावतात. कोईम्बतूर जवळचं मेटुपलायम स्टेशन ते उटी अशी सुद्धा हि ट्रेन धावते. तो प्रवास साधारण 3.5 तासांचा आहे. आणि उटी कुन्नूर जेमतेम 1 तासाचा प्रवास. आमच्या आरक्षित जागांवर बसलो आणि प्रवास सुरु झाला. उटी आणि कुन्नूर ची हिरवाई, वाटेत लागणारे चहाचे मळे, निलगिरीची उंचच उंच झाडं असा सुंदर नजारा दाखवत ही ट्रेन जाते. वाटेत बरीच लहान लहान गावं लागतात. बोगदे लागतात. उटी ते कुन्नूर असा एक तासाचा प्रवास संपला आणि आम्ही कुन्नूर ला पोचलो.वसंत कुमार आधीच इथे येऊन आमची वाट बघत बसला होता.
कुन्नूर उटीपेक्षा एकदम छोटंसं आणि कमी गर्दीचं ठिकाण वाटलं. डॉल्फिन्स नोज नावाच्या पॉईंट कडे जायला निघालो आणि कुन्नूर ची जादू दिसायला लागली. तिथे जाणारा रस्ता संपूर्ण जंगलातून आणि चहाच्या मळ्यांमधून जातो. डोंगर उतारावर पसरलेले हिरवेगार चहाचे मळे आणि त्यातून जाणारा वळणावळणाचा रस्ता. पावसाचे ढग डोंगरावर उतरले होते. पाऊस नव्हता पण त्या ढगातला ओलावा अगदी जाणवत होता.बंदीपूर च्या जंगलापासूनच आम्ही गाडीच्या AC ला आराम दिला होता कारण एकूणच इथली हवा इतकी रिफ्रेशिंग होती कि गाडीच्या काचा बंद ठेवूच शकत नाही. अगदी 'मंजीलसे बेहेतर रास्ते' वाटावेत इतका सुंदर रस्ता. पॉईंटच्या थोडं अलिकडे गाडी थांबवावी लागली आणि चहाच्या मळ्यांमधून चालत चालत आम्ही पॉईंट पाशी पोचलो. प्रचंड धुकं असल्यामुळं खरंतर काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे डॉल्फिन चं नाक वगैरे काही दिसलं नाही. पण तिथे रेंगाळायला खूप मस्त वाटलं.
तिथे लहान लहान टपऱ्या होत्या बऱ्याच. खाण्याच्या वस्तू, फ्रिज मॅग्नेटस, खेळणी, सोवेनिअर्स, चहा, कॉफी, मसाले ई विकणारे लोक होते. थोडीफार खरेदी केली. रस्त्यात चहाच्या मळ्यात फोटो काढून देणारे लोक दिसले. लगेच हातोहात फोटो पण काढून घेतले.आणि परत फिरलो.
हे सगळं होईतो जेवायची वेळ झाली. परत जाताना वाटेत खूप जास्त ट्राफिक लागलं. पॉईंट कडे जाणारे लोक आता कधी पोचणार आणि कधी परत फिरणार अशी चिंता वाटायला लागली. जेवायला क्वालिटी नावाच्या हॉटेल मध्ये गेलो. फार वर्षांपूर्वी मिसळपाव.कॉम वर एका फेसबुक मैत्रिणीने लिहिलेलं कुन्नूर चं प्रवासवर्णन वाचलं होतं. त्यात या हॉटेल चा उल्लेख केलेला लक्षात होतं.मस्त साऊथ इंडियन बुफे होता. रस्सम, सांबर, 2 भाज्या, पेपर मुशरूमस, बिर्याणी, भात, गुलाबजाम पायसम आणि अजून बरंच काही. त्या थंड हवेत तो बुफे फारच आवडला. जेवण झाल्यावर एकदम गुंगायला झालं.
आता टी फॅक्टरी मध्ये जायचा प्लॅन होता पण लेकीला त्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. उटी मध्ये आमच्या हॉटेल च्या रस्त्यावर एक ऍडव्हेंचर पार्क होतं. तिथं जाऊ म्हणून पहिल्या दिवसापासून ती मागे लागली होती. पाऊसही सुरु झाला त्यामुळे इकडे तिकडे फिरण्यापेक्षा परत उटी मध्ये जाऊन 'थंडर वर्ल्ड' नावाच्या थीम पार्क मध्ये गेलो. तिथे हॉंटेड हाऊस, illumination room, 3D paintings, 5D थिएटर, डायनोसॉर पार्क आणि चक्क स्नो वर्ल्ड पण होतं. उटीत जाऊन बर्फ पण पाहिला
. 3D paintings मस्त होते. हॉंटेड हाऊस मी बाहेरूनच पाहिलं
. दोन तास लेकीनं तिथं खूप मज्जा केली. इथेच शेजारी एक वॅक्स म्युझियम पण होतं. तिथे लेकीच्या बाबांनी खूप मज्जा केली
. समोरच एक चॉकलेट फॅक्टरी आउटलेट होतं तिथं भरपूर शॉपिंग केली.



हॉटेल वर येऊन बॅग्स पॅक केल्या. उटीचा मुक्काम संपला होता. उद्या जाताना परत एकदा बंदीपूर आणि मदुमलाई भेट होतीच आणि कूर्ग आमची वाट बघत होतं.
-
स्मिता श्रीपाद

No comments:
Post a Comment