Tuesday, July 22, 2025

कुमाऊंच्या प्रदेशात - 5....वाघोबा वाघोबा काय म्हणता

 कुमाऊंच्या प्रदेशात - 5....वाघोबा वाघोबा काय म्हणता

आज एकदम निवांत वेळ होता पण तरीसुद्धा 6 लाच जाग आली. बाहेर बाल्कनी मध्ये येऊन बसले. मोराच्या ओरडण्याचा कुठेतरी आसपास आवाज येत होता.असंख्य वेगवेगळ्या पक्षांचे आवाज येत होते. खरंतर हे हॉटेल अगदी ऐन जंगलात नव्हतं तरीसुद्धा खूप खूप शांतता होती.काल मुख्य रस्ता सोडून आत वळलो तेव्हा उंचच उंच झाडांचं जंगल वाटेत लागलं होतं. आत शिरल्या शिरल्या उजवी कडे मोराने दर्शन दिलं होतं आणि त्यानंतर लगेच एक हरीण सुद्धा. 'या या ,जंगलात स्वागत आहे' असंच जणू म्हणत असावेत दोघे.आता आज कोण कोण भेटतंय बघूयात असा विचार आला डोक्यात.
हळूहळू आजूबाजूला हालचाल सुरु झाली. निवांत गप्पा मारत नाश्ता केला. आज मनुची तब्बेत जरा नरम वाटत होती. तिला पहाटे थोडा पित्ताचा त्रास झाला होता.त्यामुळे औषध खाऊन ती परत झोपून गेली.मी, मंजिरी आणि शुभांगी खालीच लॉन वर गप्पा मारत बसलो. आवरून जेवण करून 2 ला तयार राहायला सांगितलं. आम्हाला घ्यायला जिप्सी इथेच येणार होत्या.
ठरल्याप्रमाणे आवरून जेवायला गेलो तोवर गेट बाहेर जिप्सी येऊन थांबल्या होत्या. जिप्सी बुकिंग चे काटेकोर नियम आहेत. जसे स्लॉट्स मिळाले आहेत तसेच आणि त्याच जिप्सी मध्ये बसावं लागतं. आपले आयडी वगैरे व्यवस्थित तपासून च आत सोडतात. एका जिप्सी मध्ये 6 च लोक बसू शकतात. जंगलाच्या गेट जवळ गाईड भेटतो.
हॉटेल पासून आम्हाला मिळालेल्या गर्जिया गेट चं अंतर 10-12 किलोमीटर असेल. जिप्सी सोबत जोरदार फोटोसेशन केलं.'गणपती बाप्पा मोरया' सोबतच आज 'वाघोबा महाराज कि जय' अशा आरोळ्या देत आमच्या चार जीप्स सफारी साठी बाहेर पडल्या. वाघोबा महाराज प्रसन्न व्हावेत अशी सगळ्यांचीच इच्छा होती. ओपन जीप राईड मस्तच होती.
जंगलात गेलं कि तिथली एक भाषा असते. जी आपोआप यायला लागते. वाघ दिसला नाही म्हणायचं 'वाघाचं सायटींग झालं' म्हणायचं. माकडं किंवा सांबर ओरडले असं नाही म्हणायचं तर 'माकडाने कॉल दिला' असं म्हणायचं.सुळेवाल्या हत्तीला टस्कर म्हणायचं, हरणाला स्पॉटेड डिअर असं म्हणायचं. आणि सगळ्यात महत्वाचं.वाघाला वाघ नाही म्हणायचं 'बिग कॅट' म्हणायचं 😂. जसजसं जंगलात जाऊ तसं हि भाषा कळायला लागते 😜
मग परत घरी येऊन मित्रमंडळींना जंगलच्या गमती जमती सांगताना असे शब्द वापरले कि आपण आपलं सगळं आयुष्य मोगली सारखं जंगलात काढलंय कि काय असं त्यांना वाटलं पाहिजे 😜. (माझा शत्रुपक्ष: शिकारी आठवलाच पाहिजे ऐकणाऱ्याला. माफ करा पु.ल.)
असो. मुद्द्यावर येते.
अर्ध्या तासात गेटवर पोचलो. तिथे तपासण्या होऊन आम्हाला एक गाईड मिळाला. हे ड्राइवर आणि गाईड गेली अनेक वर्ष जंगलाचे सोबती असतात. त्यांना प्रत्येक वळण, प्रत्येक झाड पाठ असतं. जीप दाट जंगलात शिरली. आजूबाजूला उंचच उंच सागवानाची झाड दिसायला लागली.ऐन उन्हाळ्यात दुपारी 2:30-3 वाजता तिथे उन्हाचा पत्ता नव्हताच उलट मस्त गारवा होता. आणि सोबत होती जंगलातली सुंदर शांतता. आमची जंगलात जायची हि पहिलीच वेळ. पहिल्या साडेतीन मिनिटात मी या जंगलाच्या प्रेमात पडले. तिथे येणारा सुक्या पानांचा, झाडांचा, जंगलाचा तो खास वास, पक्षांचे आवाज, हलकं वारं आलं कि झाडाच्या पानांची सळसळ. आत्ता याक्षणी सगळं जग फ्रीज व्हावं असं वाटत होतं. आमच्या गाड्यांचे आवाज होते पण त्या धुळ-मातीच्या रस्त्यावर ते कर्कश्श वाटत नव्हते. आमचे गाईड कैलास एकदम हळूहळू आवाजात काहीकाही माहिती सांगत होते. पण खरंतर मला त्या क्षणी कोणी काहीच सांगू नये आणि कोणी काहीच बोलू नये असं वाटत होतं.मी आपली (कधी नव्हे ती) शांत बसून जमेल तितकं जंगल अनुभवायचा प्रयत्न करत होते.
थोडं पुढे गेल्यावर एका अर्धवट तुटलेल्या झाडाच्या खोबणीत एक घुबड दिसलं. हातात दुर्बीण नव्हती त्यामुळे खूप स्पष्ट दिसलं नाही पण तरी थेट डोळ्यांनी नीट दिसत होतं. पुढे जाऊन एका पाणवठ्याजवळ सगळ्या जीप्स थांबलेल्या दिसल्या. उन्हाळा असल्यामुळे तिकडे वाघ साहेब नेहेमी येतात म्हणे. सुमारे 10-15 मिनिट थांबल्यावर पुढे निघालो. असंख्य नवीन नवीन प्रकारचे पक्षी आजूबाजूला दिसत होते. एका ठिकाणी गाडी थांबवून एका झाडावर ओरखडे काढलेले गाईड नि दाखवले. कोणा वाघानं आपली टेरिटरी ठरवण्यासाठी या खुणा केल्या होत्या.थोडक्यात या भागाच्या सात-बारा वर वाघानं आपलं नाव चढवलं होतं.त्या खुणा इतक्या उंचीवर होत्या म्हणजे वाघ किती मोठा असेल असं वाटून गेलं. वाघाचा तो सात-बारा बघून पुढे झालो.
एका वळणावर गाईड ने गाडी थांबवायला सांगितली. त्याला सांबरचा कॉल ऐकू आला होता म्हणे. आम्हाला काहीच लक्षात आलं नाही. गाईड पुढच्या सीट वर उभं राहून पूर्ण एकाग्र होऊन ऐकत होता. परत एकदा एक वेगळाच आवाज आला तसं ड्रायवर आणि गाईड न गाडी एका रस्त्याला घातली. शुभांगी आणि मंजिरी ची जिप्सी तिथे होती आणि त्यांनी दबक्या आवाजात 'वाघ' असं म्हणून एका दिशेला बोट दाखवलं. (मघाशी आलेला वेगळा आवाज त्यांच्या जिप्सी च्या गाईड ने बाकीच्यांसाठी दिलेला कॉल होता हे नंतर कळलं ) समोर गवतात एक वाकडं वाढलेलं झाड होतं. त्याच्या बुंध्याखाली वाघोबा होते(म्हणे). गाईड ने दिशा दाखवून सुदधा मला तिथे पिवळ्या गवताशिवाय काहीच दिसेना. जिप्सी च्या सीटवर उभं राहून सुद्धा. कैलास कडे असलेली दुर्बीण त्याने हातात दिली आणि परत बघायला सांगितलं. आता अर्जुनाप्रमाणे झाडाच्या तिरक्या बुंध्याकडे लक्ष केंद्रित केलं आणि तेवढ्यात काहीतरी हाललं. बाब्बो. वाघाचे कान होते ते. आत्ता मला तो बसलेली जागा नीटच कळली. त्या पिवळ्या जर्द गवतात तो वाघ इतका बेमालूमपणे एकरूप झाला होता कि कोणी सांगितलं नसतं तर कळलं पण नसतं कि तिथे वाघ आहे.
एव्हाना तिथे अजून 7-8 जिप्सी पोचल्या. वाघ आमच्या पासून मोजून 10-12 फुटांवर होता आणि निवांत बसला होता. इतके लांबून लांबून आलेले बिचारे लोक त्याला बघायला जीवाचं रान करतायत तर याला काही पडलेली नव्हती. गाईड म्हणाला कि वाघ खूप आळशी असतात आणि खाऊ पिऊ झालं असेल तर एका जागेवरून 8-10 तास सुद्धा उठत नाहीत. झालं. मनात म्हणलं कि बहुतेक फक्त कान बघून समाधान मानावं लागणार. अजून 5-7 मिनिटे अशीच गेली. पण आमचं नशीब बहुदा जोरावर होतं. गवतात काहीतरी हललं आणि एक पिवळा पट्टा उठून उभा राहिला. व्यवस्थित स्पष्ट अख्खा वाघ दिसला.वरती लहान टेकडीच्या दिशेने त्याला जाताना याची देही याची डोळा पाहिलं. आता परत सगळ्या जिप्सी घाई करून टेकडीच्या विरुद्ध दिशेला जायला निघाल्या. तिकडून उतरताना वाघ परत दिसेल म्हणून. आम्ही सुद्धा तिकडे जाऊन थांबलो. 10 मिनिटे झाली तरी काही हालचाल दिसेना. गाईड म्हणाला आपण इथे असे अजून कितीही थांबू पण वाघाचा भरोसा नाही. तुम्हाला चालणार असेल तर आपण अजून दुसरी वाट पकडू आणि मी तुम्हाला अजून काही दाखवू शकेन. खरंतर एका सफरीत वाघ दिसेल अशी अजिबात अपेक्षा केली नसताना तो दिसला होता. त्यामुळे आता अजून मोह न करता जंगल बघू म्हणून पुढे निघालो.
हा वाघ कोणा 'नाककटी' नावाच्या वाघिणीचा बच्चा होता अशी माहिती ड्राइवर ने पुरवली.बच्चा एवढा मोठा तर वाघ अजून किती मोठा असेल.पुढच्या एका वळणावर सांबर दिसलं. मघाशी यानेच कॉल दिला असावा असं गाईड म्हणाले. अजून थोडं पुढे गेलो तर कान टवकारून आमच्या कडे एकटक बघणारी हरणं दिसली. रानडुक्कर फॅमिली रस्ता क्रॉस करताना दिसली. अनेक सुंदर पक्षी बघितले. तेंदू पत्ता ची पानं आणि फळं पाहिली.वडाच्या पारंब्यांनी केलेली कमान, मधमाशांच्या पोळ्यांनी भरलेलं झाड अशा खूप गमतीजमती पाहिल्या. आता गाडी एका सपाट गवताळ जागेवर पोचली. तिथं अक्षरश: शेकडो हरणं दिसली.(तिथेच हत्तीचं कुटुंब पण होतं असं आम्हाला हॉटेल वर पोचल्यावर कळलं. आम्हाला ते दिसलं नाही पण त्यांनी आम्हाला नक्की पाहिलं असणार आहे. कोणीतरी कोणालातरी पाहिलं हे महत्वाचं नाही का 😀) एव्हाना सफारी संपत आली होती. निसर्गानं भरभरून आनंद दिला होता. आणि वाघ दिसल्यामुळे तो द्विगुणित झाला होता.
या दोन तासात इतकंच कळलं कि जंगल म्हणजे खरंतर फक्त वाघ नसतोच. झाडांचे हिरवे वास, पक्षांचे आवाज, पानांची सळसळ, धुळीचे रस्ते, रोज प्राण्यांची तहान भागवणारे पाणवठे, हिरवाईच्या हजारो छटा, झाडं, झुडुपं, वेली, मुंगीपासून ते हत्तीपर्यंत एकमेकांवर अवलंबून असणारे प्राणी हे सगळं म्हणजे जंगल. "जीवो जीवस्य जीवनम्" हे नुसतं इतके वर्ष पुस्तकात वाचलं होतं पण या ओळींचं जिवंत रूप म्हणजे जंगल. वाघ हा त्यातला महत्वाचा भाग असं कसं म्हणायचं ? कारण या साखळीतले बाकी काही प्राणी नसतील तर वाघाचं काय होईल ? जंगलातले दोन तास भुर्रकन उडून गेले. परत नक्की भेटायचंच असं मनाशी पक्कं केलं आणि तृप्त मनानं तिथून बाहेर पडलो.
कालचा दिवस वैतागाचा होता तर आजचा समाधानाचा.नित्य नवा दिवस नित्य नवा अनुभव. आज ट्रिप ची शेवटची रात्र. उद्या निरोप घ्यायचा होता.आज केसरी तर्फे “गिटार शो” होता. बुद्ध पौर्णिमेचा चंद्र, जंगलाचा सुरेख अनुभव आणि समोर कराओके वर एक स्थानिक कलाकार जुनी हिंदी गाणी गात होते. कराओके वर आम्ही सुद्धा जरा घसे मोकळे करून घेतले. शेवटी आपल्या महाराष्ट्र राज्याचं नृत्यगीत सैराट वर नाचून घेतलं. 10 वाजता कार्यक्रम संपवावा लागला तेव्हा लक्षात आलं कि त्या माणसाने गिटार आणून नुसतीच बाजूला 'शो' म्हणून उभी केली होती. गाणी तर सगळी कराओके वर गायली.(त्यातली अर्धी आम्हीच गायली 😜). पण एकंदरीत मजा आली. जेवण करून रूम वर जाऊन सामान बांधलं. उद्या परतीचा प्रवास असणार होता.
-©️स्मिता श्रीपाद

No comments:

Post a Comment