Tuesday, July 22, 2025

पितळी बंबाच्या पाण्याची दिवाळी

 पितळी बंबाच्या पाण्याची दिवाळी

नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी बटाणे गल्लीतल्या देशपांडे वाड्याच्या दगडी पायर्यांवर मी आणि आमचे दादा ( बाबांचे वडील) गप्पा मारत बसलेलो असायचो.
कराडच्या प्रसिद्ध मनोऱ्याजवळ असलेल्या देशपांडे वाड्यात माझे आजी आजोबा म्हणजे वडिलांचे आई बाबा राहायचे.जुन्या पद्धतीचा भव्य असा सुंदर असा वाडा होता तो. मध्यभागी बाग, त्यात बकुळीचं खूप जुनं झाड होतं.त्याचा कायम सडा पडलेला असायचा.बकुळीचं फुल कधीही उचललं कि त्यातून एखादी तरी मुंगी तुरुतुरु बाहेर पळायची.गोड वासाच्या या फुलात कायम मुंग्या असणारच.आजी आजोबा या वाड्यात राहायचे आणि जवळच एका अपार्टमेंट मध्ये आमचं घर होतं.शनिवार रविवार किंवा मोठ्या सुट्टया लागल्या कि माझा मुक्काम दोन्ही पैकी एका आजी आजोबांकडे ठरलेला असायचा.
दिवाळीच्या थंडीत वाड्याच्या पायऱ्यांवर कुडकुडत आजोबांशी गप्पा मारत बसायला फार मजा यायची. नुकतच चावडी चौकातुन फेरफटका मारुन उटणं, तेल, मोती साबण अशी खरेदी झालेली असायची. आजोबा मला सात शेपटीच्या उंदराची गोष्ट सांगायचे. कितीही वेळा ऐकली तरी ती गोष्ट परत परत ऐकायला मला फार आवडायचं. कारण तो उंदीर 'नुतन मराठी शाळेत' (माझी प्राथमिक शाळा ) जाउन खेर बाईंच्या खुर्ची खालुन फिरुन यायचा, आजी बरोबर पिच्चर(हाच शब्द बरोबर आहे ) बघायला रॉयल टॉकिज मधे जायचा आणि घाटावर जाउन रॉयल च्या गाड्यावर पावभाजी पण खायचा.( आमच्या कराड मधे सगळा "रॉयल कारभार" असतो). थोडक्यात काय तर मला आवडणार्या सगळ्या गोष्टी तो उंदीर करायचा.मित्रं चिडवतात म्हणुन त्या उंदराची आई रोज रात्री त्याची एक-एक शेपटी कापायची आणि शेवटी चुकुन उरलेली एक शेपटी पण कापुन टाकायची. तरी बिचारा उंदीर हसत असायचा. गोष्टीचा शेवट आठवत नाही कारण तोवर आजी जेवायला हाक मारायची.
गरम-गरम म्हणजे तव्यावरची थेट ताटात अशी भाकरी खाउन झाली की आजी चं सुरु व्हायचं. झोपा आता, पहाटे सुनील काका येइल बघ.मग उठायला लागेल लवकर वगैरे वगैरे.उद्या पहाटे उठायचं या उचक्याने आज्जी रात्रभर बहुतेक जागीच असायची. शेजारी तिची सततची वळवळ मला पण अधुन मधुन जाणवायची.
इकडे पुण्यात सुनील काका कंपनी मधली त्याची रात्रपाळी संपली की गाडीत बसायचा आणि पहाटे ४-४:३० ला वाड्यात पोचायचा. वाड्याला भलामोठा लाकडी दरवाजा होता. आणि त्याच्या आतल्या बाजुला दोन्ही कडे दोन आरामात बसता येतील असे दगडी कट्टे होते. राजु काका आणि अन्नी काकाने सतत तिथे बसुन बसुन ते कट्टे झिजवलेत असं आमची आजी म्हणायची.सुनील काका आला की आजी ला हाक मारायचा, पहिला दारात आणि दुसरा आत वाड्यात येउन हौदाजवळ असे दोन लक्ष्मी तोटे
लावायचा आणि आमची दिवाळी सुरु व्हायची.
सुनील काका आला की उठा उठा करुन ओरडायचा पण आजी, झोपुदेत रे अजुन जरावेळ पोरींना करुन त्याला दामटायची. एवढा दंगा चालु असताना कसली काय झोप. श्वेता लगेच उठुन बसायची त्याला कारण सुनील काका. तो न चुकता तिला दिवाळीला सुंदर ड्रेस आणायचा आणि मला कधीच आणायचा नाही. मला आपलं कायतरी पर्स बाहुली अशी वस्तु असायची. याला आपलं माप इतकं कसं कळत नाही असं मला नेहेमी वाटायचं. मी आईकडे पण भुणभुण करायची की, तिलाच नेहेमी आणतो हा फ्रॉक आणि मला नाही. त्यामागे काय लॉजिक होतं ते मला कधीच कळलं नाही. मग एके वर्षी माझ्या भुणभुणीला घाबरून त्याने दोन ड्रेस आणले एक मला आणि एक श्वेतु ला. आणि ते दोन्ही पण तिच्याच मापाचे निघाले तेव्हा मग मी विषय सोडून दिला. दरवर्षी दिवाळीला माझ्या पेक्षा तिला एक ड्रेस जास्त मिळायचं दुःख त्या वर्षी दुप्पट झालं. पण मग पुढे मुग्धा काकु - राजु काका चं लग्न झाल्यावर काकु मात्र मला आवर्जुन फ्रॉक आणायची. तिला माझं माप बरोब्बर कळायचं.
सगळे उठले की आजी गॅसवर चहा चढवायची आणि आजोबा बंब पेटवायला घ्यायचे. एकदम देखणा, घाटदार पितळी बंब होता तो.स्वयंपाकघराच्या कोपर्यात छोटसं बाथरुम, त्यातला काळाभोर धुणी धुण्याचा दगड आणि तो बंब असं चित्र अजुनही दिसतं मला. आदल्या दिवशी घासल्यामुळे तो एकदम चकाकत असायचा. गार पाणी भरण्यासाठी त्याला वरच्या बाजुला झाकण असलेली खिडकी होती. आणि गरम पाणी सोडायला खाली नळ,बंब चांगला तापला की सगळ्या बाथरुम मधे धूर भरायचा. चहा पिऊन झाला की आजी तेल लावायला घ्यायची. तिच्या समोर बसवुन जोरजोरात चोळुन ती मनसोक्त तेल लावायची. आणि मोरीत ( आजीचा शब्द) नेऊन त्या दगडावर बसवायची. बंबाचं पाणी ईतकं गरम असायचं की बटाटे शिजतील. आधीच त्या बाथरुन मधे भरलेला धूर, कढत खरपूस वासाचं पाणी , त्यात आणि शिवाय 'पाठीला लावते गं,किती काळवंडलीय' असं म्हणुन खसाखसा उटणं चोळणं असं एकदम साग्रसंगीत अभ्यंगस्नान घडायचं. त्या सगळ्या वातावरणात मला गुंगी च यायला लागायची.मग छान नवीन कपडे करुन पहिले काम म्हणजे देवदर्शन. कोटातल्या गणपतीला पहिला नमस्कार ( खरतर याला पंतांचा गोट असं नाव आहे पण माझ्या लहानपणापासुन आम्ही कोट असंच म्हणतो . असो ) आणि मग घाटावर आमच्या ग्रामदेवता कृष्णाबाई चे दर्शन.घाटावर म्हणजे आमच्या कराड मध्ये कृष्णा आणि कोयना नदीचा सुंदर संगम आहे आणि तिथे कृष्णा नदीवर सुंदर दगडी घाट बांधला आहे. त्या घाटाच्या पायऱ्यांवर बसून नदीकडे बघत बसायला फार मजा येते. भल्या सकाळी नदीवर मस्त धुकं असायचं.ते बघायला मजा यायची.समस्त कराडकर मंडळी नवीन कपडे घालुन एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला तिथेच भेटायचे.
मग घरी येउन आजी आजोबा काका काकु आई बाबा सगळ्यांसोबत फराळ विथ कांदेपोहे चहा. आणि मग पुढचं काही आठवत नाही 😉
त्यानंतर थेट मी 6वी-7वी मधे असतानाची दिवाळी आठवते. आमच्या सरस्वती अपार्टमेंट उर्फ वाटेगावकर बिल्डींग मधली.
शाळेच्या परीक्षा संपल्या कि सगळे मित्र मौत्रिणी मिळून बिल्डिंग च्या सगळ्यात खालच्या मजल्यावर किल्ला करायचे.त्यासाठी कुठून कुठून दगड, विटा, जुनी पोती, माती असं सगळं गोळा करायचो आम्ही.म्हणजे मोठी मुलं त्यात पुढाकार घ्यायची. आम्ही पोरी आणि लहान मुलं जमेल तसा हातभार लावायचो.सगळे कपडे मातीमय करून घरी येऊन आई चा खोटा खोटा ओरडा खायचा.एके वर्षी मी आणि श्वेतु ने आमचा दोघींचा स्वतंत्र छोटुसा किल्ला आमच्या गॅलरी मध्ये केला होता.माझ्या दृष्टीने तो त्या वर्षीचा सर्वात देखणा किल्ला होता.सगळ्या मित्रमंडळींना घरी बोलावून आवर्जून तो किल्ला दाखवून कौतुक करून घेतलं होतं.
त्यावेळची अजून एक मोट्ठी आठवण म्हणजे फटाके.
मी नवीन नवीन फटाके उडवायला शिकले होते तेव्हा. मला लहानपणापासुन फटाके अजिबात आवडायचे नाहीत. लक्ष्मीपुजना दिवशी तर कानावर दोन्ही हात ठेवुन माझ्या कित्येक दिवाळ्या गेल्या.माझ्या दोन्ही काकांना आणि बाबांना फटाके उडवणे फार प्रिय. मी तर लहानपणी भितीने रडायचे पण म्हणे. दर दिवाळीत आजोबा कसे तीनही भावांना आणि आत्या ला फटाके समसमान वाटुन द्यायचे, मग सुनील काका कसा स्वतः चे सगळे फटाके संपवुन मग आत्याचे फटाके ढापायचा, मग ती कशी रडायची आणि मग आजोबा कसे त्याला ओरडायचे ही गोष्ट पण ऐकायला लागायची.
तर मी काय सांगत होते...
हा.. तर मी 6वी-7वी मधे नवीन नवीन फटाके उडवायला शिकले होते. ते पण लवंगी फटाका. आई बाबांसोबत गावाबाहेर कुठेतरी खरेदी विक्री संघात जाऊन खास फटाके आणायचो आम्ही.पहाटे उठुन आई बाबांच्या आधी आवरुन आम्ही सगळी पोरं गच्ची वर फटाके उडवायला पळायचो. बिल्डींग मधले माझे सगळे मित्र मैत्रिणी फटाके उडवण्यात सराईत होते. मी आपली गच्ची च्या कठड्यावर एक एक लवंगी फटाका ठेवुन उदबत्तीने लावु का नको करत कशीबशी लावायचे. त्यात आणि उजाडलं की ती मेली वाट पेटली आहे की नाही ते पण दिसायचं नाही. डोळ्यांना चांगलाच व्यायाम व्हायचा. काही शूर(आगाऊ) पोरं हातात लवंगी पेटवून हवेत उडवायचे. एके वर्षी अशाच एका शूर पोराने उडवलेली लवंगी माझ्या केसात पडली होती आणि केस फरफर जळायला लागले. सुदैवाने ती विझवली लगेच. जळक्या केसांचा फार घाण वास येतो असं एक नवीन ज्ञान त्या दिवशी मिळालं आणि फटाके हा आपला प्रांत नाही हे मान्य करुन मी कायमची त्यावर फुली मारली. त्या दिवसानंतर आजपर्यंत मी फक्त आणि फक्त फुलबाज्या उडवते. नागगोळी नावाचा एक दिव्य वासाचा फटाक्याचा प्रकार पण लहानपणी मिळायचा.घरोघरीच्या चकलीच्या आणि तळणीच्या वासामुळे डोकं चढलं की त्यावर उपाय म्हणुन फटाके उत्पादकांनी तो काढला असावा. त्याच्या भयंकर वासात जगातले कुठलेच वास येऊ शकणार नाहीत.
आजकाल हा प्रकार लुप्त झालाय. आमच्यावेळी असं नव्हतं 😂हा हा हा
पुढे मग वाडा सोडुन आजी आजोबा आमच्या घराच्या अगदी जवळ रहायला आले आणि मला पण नंतर सात शेपटीच्या उंदराच्या गोष्टीची गंमत वाटेनाशी झाली म्हणुन मग आदल्या दिवशी आजीकडे जाउन रहायची परंपरा थांबली. पण सकाळचे देवदर्शन आणि एकत्र फराळ चालु राहिला. पुढे माझ्या चुलत बहिणींचा आणि आत्ये भावंडांचा जन्म झाला तसे फराळाचे मेंबर वाढत गेले. फटाक्याच्या आवाजासाठीचे माझ्या कानावरचे हात आता लहानग्या तनु च्या कानावर जाउन बसले 😀
मग मी पुण्यात शिकायला आले तोवर राजुकाका-काकु कराड ला शिफ्ट झाले होते.मग पहिला फराळ पुढचे काही वर्ष काकु च्या घरी सुरु झाला ते पार माझ्या लग्नापर्यंत.
माझं लग्नं झाल्यावर पहिल्या एक-दोन दिवाळ्या पुण्यात साजर्या झाल्या आणि कराड च्या दिवाळीत खंड पडला. पण मग परत कराड च्या माझ्या सासरच्या घरात दिवाळी ची परंपरा चालु झाली. लग्नानंतर कराड ला पहिल्यांदा दिवाळी होती तेव्हा पहिली अंघोळ झाल्यावर मी घरच्या सगळ्यांना म्हणलं की चला आता घाटावर जाऊयात. तेव्हाचे त्यांचे चेहेरे मला अजुन आठवतात. मला सकाळी ७ ला कशाला जायचंय घाटावर असं प्रश्णचिन्ह दिसलं मला. मग कळलं की सगळेच कराड्कर दिवाळी दिवशी उठुन घाटावर जात नाहीत. नदीच्या पलिकडचे तर नाहीच. आम्ही नदीच्या अलिकडचे च जातो. एक छोटासा सांस्कृतिक धक्का बसला. मग नवरा आणि दीर म्हणाले, संध्याकाळी जाऊ हं घाटावर तुझी पावभाजी खायला. आता मस्त कांदेपोहे खाऊन गप्पा टाकु. कराडच्या आमच्या घराजवळच माझ्या मामा-मावशांची ( दीर-नणंदांची - माझं लग्न नात्यातलं आहे त्यामुळे माझ्या सगळ्या मामा मावशा माझ्या सासर्यांची भाचवंडं आहेत ) घरं आहेत आणि पहिला फराळ आम्ही सगळे १५-२० जण एकत्र करतो. मग दर दिवाळीला एकत्र पहिला फराळ आणि मग पार जेवणापर्यंत गप्पा आणि मग मस्त दुपारची झोप असं गेली अनेक वर्षे चालु आहे.
दिवाळी म्हणजे कराड हे डोक्यात इतकं बसलंय की मला पुण्यातल्या दिवाळीची फारशी कल्पनाच करता येत नाही. अधे मध्ये काही कारणाने काही काही दिवाळ्या पुण्यात झाल्या पण पुण्याच्या दिवाळीला कराड सारखा वास आणि चव येत नाही हे नक्की.आता माझ्या लेकीला पण दिवाळीला कराडलाच जायचं असतं. कराड मध्ये जाण्यासाठी 'अंगण असलेलं जमिनीवरचं घर' हा तिचा मुख्य निकष आहे.
लहानपणीचा पितळी बंब कधीच गायब झाला.मग आधी गॅसवर तपेलीत तापलेलं पाणी, मग गॅस गिझर ते मग ईलेक्ट्रीक गिझर च्या पाण्यावर आमच्या पहिल्या अंघोळी पोचल्या.प्रत्येक बदलासोबत काही जुनं सुटत गेलं पण त्याचबरोबर काहीतरी नवं सुंदर भेटत गेलं.त्यामुळे उगीच त्यावेळीच भारी होतं वगैरे मला म्हणायचं नाहिये. पण आजकाल कसं जुन्या गोष्टींना अचानक फार महत्व आलंय. जसं की कल्हई लावलेली भांडी, मातीची भांडी, बिडाचे तवे, लोखंडी कढया पार अमेझॉन वर मिळतात. चुलीवरचा स्वयंपाक करून वाढणारी हॉटेलं जिकडे तिकडे दिसतात. चुलीवर कढवलेलं तुप यापासुन ते पार चुलीवर आटवलेल्या दुधाचं आईस्क्रीम असं काय वाट्टेल ते मिळतं. तसंच जर का कुठे
"खास दिवाळी निमित्त आमच्या येथे पितळी बंबात तापवलेल्या पाण्याची पहिली अंघोळ करायला मिळेल" अशी जाहिरात दिसली तर मला नक्की सांगा.😊
🪔तुम्हा सर्वाना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.🪔
-©️स्मिता श्रीपाद
दिवाळी 2022

No comments:

Post a Comment