कुमाऊंच्या प्रदेशात - 4...कॉर्बेट च्या दिशेने
आज नैनिताल ला निरोप द्यायचा होता. सामान बांधाबांध करून हॉटेलचा आणि शेफ साहेबांचा निरोप घेतला.आज नैनिताल मधले उरलेले काही तलाव आणि मंदिरे बघत संध्याकाळ पर्यंत कॉर्बेट मध्ये पोचायचे होते.आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आज खरेदी चा दिवस होता.त्यामुळे समस्त महिला मंडळ जरा जास्तच उत्साहात होतं.
सकाळी बाहेर पडल्या पडल्या पहिल्यांदा घोडाकाल उर्फ गोलू बाबा मंदिरात गेलो. एक उंच डोंगरावर थोड्या पायऱ्या चढून गेलं कि हे मंदिर होतं.वरून आजूबाजूला विस्तीर्ण पसरलेली पर्वतरांग दिसत होती. घोडकाल म्हणजे शंकराचा अवतार असलेलं हे मंदिर होतं.पण इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे बांधलेल्या अक्षरश: लाखो लहान मोठ्या घंटा.परवा नैना देवी मंदिरात एका कोपऱ्यात लहान मोठ्या घंटा बांधलेल्या दिसल्या. इथली नवस मागायची/ फेडायची पद्धत असेल असं वाटलं होतं. इथे गोलू बाबा मंदिर तर आख्ख घंटांनी भरलं होतं. अगदी चिमुकल्या घंटेपासून ते कित्येक टन वजनाच्या महाकाय घंटेपर्यंत विविध आकाराच्या घंटा मंदिर परिसरात बांधलेल्या दिसल्या.खाली पार्किंग जवळ दुकानात या घंटा विकायला होत्या.
इथे येऊन देवाकडं मागणं मागायचं आणि मग ती इच्छा पूर्ण झाली कि येऊन घंटा बांधायची अशी इथली रीत आहे म्हणे. देवावर भरोसा ठेवून मनातली इच्छा पूर्ण होणारच असा विश्वास ठेवून घंटा बांधली तरी चालते असं पण कळलं.दुसरा पर्याय निवडायला सोपा होता.इथे अजून एक गंमत म्हणजे लोकांनी देवासाठी पत्रं लिहून घंटेसोबत बांधली होती.आपली सगळी गाऱ्हाणी थेट देवाला लिहून पाठवायची पद्धत किती गोड आहे. खरंतर ती खूप वैयक्तिक पत्रं होती पण तरी रांगेतून जाताना काही ओळी नजरेस पडल्या. "भावाचं लग्न लवकर होऊदेत" पासून ते "कर्ज फिटूदेत" पर्यंत असा काहीबाही मजकूर नजरेस पडला. काही घंटांसोबत चक्क स्टॅम्प पेपर अडकवले होते. बँकेच्या पैसे भरलेल्या/काढलेल्या पावत्या पण होत्या.या भाबड्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊदेत अशी देवाला प्रार्थना केली. परमेश्वरानं आधीच उदंड दिलंय त्याबद्दल कृतज्ञता म्हणून आम्ही पण आमच्या तर्फे काही घंटा बांधल्या.
तिथून बाहेर पडून आता सर्वात महत्वाचं काम करायचं होतं ते म्हणजे खरेदी. उत्तराखंड एम्पोरियम च्या दुकानात गाडी शिरली. "अर्ध्या तासात खरेदी करून बाहेर या" असं अभिषेक ने सांगितलं त्यातला पहिला शब्द या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिला
. दुकानात खास त्या भागात मिळणाऱ्या विविध साड्यांचे प्रकार होते. या सगळ्या ऑरगॅनिक साड्या होत्या म्हणे.(आजकाल सगळं ऑरगॅनिक मिळतं) बांबू, बिच्छू काटा नावाची वनस्पती अजून बरीच नावं घेतली पण आता लक्षात नाहीत. तिथे आम्ही 10 बायकांनी मोजून 45 मिनिटात साड्या, चपला, ओढण्या, रजया, मेणबत्त्या अशी खरेदी उरकण्याचा विक्रम प्रस्थापित केला. लिम्का किंवा गिनीज बुक मध्ये कोणाची ओळख असेल तर मला कळवा
.
खरेदी झाल्यावर नौकुचियाताल इथं बोटिंग साठी पोचलो. या तलावाला 9 कोन आहेत म्हणे. 9 राण्या असणाऱ्या कोणा राजानं हा तलाव बांधला. इथे फिरताना ज्याला 9 कोन मोजता येतील त्याला 9 राण्या मिळू शकतात. बघा बुवा कोण शोधून दाखवतं असं आव्हान अभिषेक ने केलं. एकुलत्या एक बायकोने नुकताच इतका खिसा रिकामा केलाय. 9 बायकांना कोण सांभाळेल ? असं म्हणत समस्त पुरुषवर्गाने लढाईच्या आधीच तालावर टाकली. तलावात फिरताना आजूबाजूला सुंदर हिरवेगार डोंगर दिसत होते. उन्ह असलं तरी हवा गार होती. नैनिताल पेक्षा इथे बोटिंग ला जास्त मजा आली. ते कोन वगैरे मोजायचं राहूनच गेलं
. किनाऱ्याकडे परत येताना काही लोक कायाकिंग करताना दिसले. मधुजा आणि श्री परत एकदा बोटी घेऊन कायाकिंग करायला पाण्यात शिरले. बोटिंगचा मनसोक्त आनंद घेऊन आता जेवायला पोचलो.
जेवण करून आता थेट कॉर्बेट गाठायचं होतं.जेवायला थांबलो तिथे नीलमोहोराची खूप झाडं दिसली. आपल्याकडे गुलमोहोर दिसतो पण नीलमोहोर दुर्मिळ. उन्हात फुललेला तो निळा जांभळा मोहोर सुंदर दिसत होता. आता जेवण करून गाडीत मस्त ताणून देणे असा पुढचा प्लॅन होता. पण सगळंच प्लॅन के मुताबिक होत नसता ना राव.जेवण होता होता केसरी च्या व्हाट्स अप ग्रुप वर एक बॉम्ब येऊन पडला होता.
आमची परतीची तिकिटं गो एअर ची होती आणि त्यांची काही भानगड झाल्यामुळे ती सगळी तिकिटं रद्द झाली होती. त्यामुळे आता पुण्याला परत जातानाची तिकिट्स आमची आम्ही काढावी किंवा केसरी कडून काढून घेण्यासाठी त्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागतील असं केसरी ने कळवलं होतं. आमचं केसरी बुकिंग विमान तिकीटासह होतं म्हणजे खरंतर आम्ही सगळे पैसे खूप आधीच त्यांना दिलेले होते. आता हा वरचा अजून खर्च करणं म्हणजे खिशाला चांगलाच मोठा फटका होता. GoAir कडून रिफंड मिळेल तेव्हा आम्हाला ते तिकिटांचे पैसे परत मिळतील असं सांगण्यात आलं. पण ती रक्कम आत्ता भराव्या लागणाऱ्या रकमेपेक्षा कमी होती त्यामुळे असं ना तसं आर्थिक नुकसान होतंच. हि सगळी चर्चा गाडीत सुरु झाली आणि सगळ्यांची झोप उडाली. केसरी ऑफिस ला फोनाफोनी करूनही त्यातून फार काही साध्य झालं नाही. स्वतः तिकीट काढायला गेलो तर ती रक्कम खूपच मोठी होती. त्यामानाने केसरी ने आधीच ब्लॉक करून ठेवलेली तिकिट्स खरेदी करून 'तुका म्हणे त्यातल्या त्यात' खिशाला थोडा कमी खड्डा पडून नवीन तिकिटं बुक केली.(केसरी कडून मिळणाऱ्या रिफंड ची अजून वाट पाहत आहोत) इतके दिवस सुंदर सर्व्हिस मिळाली म्हणून आम्ही खुश होतो पण यामुळे नाण्याची दुसरी बाजू पण कळली.आता जे झालं ते झालं. उरलेली ट्रिप तरी एन्जॉय करू असं ठरवलं.
या सगळ्या गोंधळात पुणेकरांच्या दुपारच्या झोपा बुडाल्या. मुंबईकर दुपारी झोपत नसल्यामुळे त्यांना बहुदा फार फरक पडला नसावा. जिम कॉर्बेट जंगलातल्या आमच्या हॉटेल मध्ये पोचलो तेव्हा 6 वाजले होते. जंगलाच्या outer zone मध्ये हे हॉटेल होते. आमची सफारी उद्या दुपारी 2 ला असणार होती त्यामुळे आज जागरण आणि उद्या उशिरा उठायला फुल परमिशन मिळाली. शिवाय तिथे एक मस्त स्विमिन्ग पूल होता त्यामुळे समस्त बच्चे कंपनी पाण्यात शिरली. उद्या पौर्णिमा असल्याने आकाशात सुरेख चंद्र दिसत होता. त्यामुळे जेवण करून निवांत गप्पा मारत बसलो. चर्चेला खमंग विषय होताच
. झोप आल्यावर शेवटी रूममध्ये येऊन झोपून गेलो.आजचा दिवस वादळी होता. आता उद्या काय? वाघ दिसणार का ?
No comments:
Post a Comment