कुमाउंच्या प्रदेशात - २.......तालों मे नैनिताल
तालोंमे नैनिताल, बाकी सब तलैया
आजा मोहोब्बत मे नाचे ता ता थैया
खरतर नैनिताल उत्तराखंड मधलं खुप प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे आणि तिथे नैनिताल सोबतच भीमताल, तल्लीताल, सातताल, नौकुचियाताल असे अनेक तलाव आहेत. असं म्हणतात की इथे साठ पेक्षा जास्त तलाव होते. काल हलद्वानी मार्गे भवाली ला येताना आम्ही वाटेत भीमताल पाहिला होता. आज आम्ही खुद्द नैनिताल बघणार होतो.
सकाळी उठुन आवरुन नाष्टा करायला आलो तेव्हा बाहेर पावसाळी हवा होती पण पाउस नव्हता. उलट कोवळं उन्ह च दिसत होतं. पण हवा अतिशय थंड होती. पावसाने आमची प्रार्थना ऐकली असं वाटलं आणि मंडळी उत्साहानं बाहेर पडली.आज आम्हाला टुटा पहाड या ठिकाणापर्यंत बस ने जायचं होतं आणि तिथुन पुढे नैनिताल मॉल
रोड वर बसला परवानगी नसल्यामुळे लहान गाड्यांमधुन नेणार होते.छत्री, स्वेटर असं सगळं सामान एका छोट्या बॅग मधे पॅक करुन बसमधे जाउन बसलो. मनात पावसाला साकडं घालणं चालुच होतं की बाबा रे जरा ४ दिवस थांब. हा पुर्ण पहाडी भाग असल्यामुळे एकदम अरुंद आणि वळणावळणाचे रस्ते होते. आज गाडीत बसल्याबसल्या अभिषेक ने एक खाऊ चा पुडा आणि एक प्लॅस्टीक ची पिशवी (घाट लागला तर असावी म्हणुन) हातात ठेवली. त्यावर घाटात लागणाऱ्या उलटया या विषयावर बसमध्ये एक छोटंसं चर्चासत्र पार पडलं.आमचा ड्रायव्हर काल एकदम शांतपणे गाडी चालवत होता पण रात्री काय 'जादु' झालेली देव जाणे. त्याच्या अंगात एकदम मायकेल शुमाकर संचारला. हॉटेल पासुन टुटा पहाड म्हणजे फारतर २०-२५ मिनिटांचा रस्ता पण तिथे जाईपर्यंत ड्रायव्हर साहेबांनी अशी काही झलक दाखवली की बस. एकंदरीतच चर्चेचा परिणाम म्हणा किंवा ड्राइवर साहेबांची करामत म्हणा, नाष्टा करुन बस मधे बसलेल्या लोकांना त्रास सुरु झाला.अभिषेक ला बहुतेक सवय असावी म्हणुन त्यांनी आधीच व्यवस्था करुन ठेवली होती.पण नशीबाने तो टुटा पहाड लवकर आला आणि आम्ही सुटलो.तिथे उतरलो तर मस्त उन्ह पडलेलं दिसलं आणि आमच्या गोटात एकदम आनंद पसरला. त्या उत्साहाच्या भरात सोबत घेतलेली छत्री, गरम कपडे असलेली बॅग बस मद्धे ठेवुन(विसरुन), तवेरा वगैरे अशा लहान गाड्यांनी आम्ही पुढे निघालो. १० मिनिटे गेली आणि डावीकडे नैनी लेक चं पहिलं दर्शन घडलं. डावीकडे पसरलेला विस्तीर्ण नैनीताल आणि उजवीकडे अप्पर मॉल रोड. तो संपुर्ण तलाव पार करुन मॉल रोड च्या दुसर्या टोकाला आम्ही उतरलो.आम्ही उतरलो तिथे लाकडी खांबांचा एक सुंदर बसस्टॉप होता आणि तिथे मॉल रोड वर फिरायला मस्त ईलेक्ट्रीक रिक्षा होत्या.
आज आम्ही पहिल्यांदा जाणार होतो स्नो व्ह्यु पॉईंट ला. तिथे जाण्यासाठी एक चिमुकली केबल कार आहे. भर वस्तीतुन, हॉटेल आणि घरांच्या दाटिवाटीतुन ही केबल कार नैनी तलावाचं संपूर्ण दर्शन घडवत आपल्याला अजुन उंचीवर घेउन जाते. या कार मधुन जाताना नैनीताल चा अंब्याच्या कोयीसारखा आकार व्यवस्थित दिसतो. केबल कार मधुन वर वर जाताना परत सुर्य देव गायब झाले आणि पावसाचे ढग दिसायला लागले.पण एकंदरच हवा इतकी मस्त होती की त्या वातावरणात पाऊस आला तर काय असला काही विचार डोक्यात आलाच नाही.केबल कार मधुन उतरुन अजुन थोडं पायी चढत स्नो व्ह्यु पॉईंट साठी वरती जायचं होतं.५-१० मिनिटात पॉईंट वर पोचलो. एकंदर ढगाळ वातावरणामुळे बर्फाचे डोंगर दिसणार नाहीत याची खात्री होती. इथे एक सिमेंट चा चौथरा उभा करुन वरती पत्र्याची शेड घातली होती. शेजारीच एक दुर्बीण वाले बाबा पण होते पण सध्याचं हवामान लक्षात घेता त्यांनी त्यांचं सगळं सामान गुंडाळुन ठेवलं होतं. आम्ही सगळेजण वरती पोचलो आणि.....
अचानक धो धो पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरु झाला.अगदी अनपेक्षित पणे १-२ मिनिटात पावसाचा जोर प्रचंड वाढला. प्रचंड थंडी वाजायला लागली. त्याक्षणी स्वेटर आणि छत्री ची बॅग आपण बसमधे कशी विसरलो हे आठवलं. आता थांबेल मग थांबेल म्हणणारा पाऊस १०-१५ मिनिटं झाली तरी थांबायचं नाव घेइना. आता कुठे काय डोंगर आणि बर्फ दिसतोय असं कोणीतरी म्हणालं आणि तेवढ्यात... ताड ताड गारा सुरु झाल्या.
दिसला की बर्फ
या ना त्या प्रकारे बर्फ दिसलाच
त्या पावसामुळे आम्हा सगळ्या अनोळखी लोकांना कालपासुन पहिलांदाच निवांत बोलायला वेळ मिळाला आणि तिथंच एक "ice breaking session" पार पडलं. पुण्यातुन आमच्यासोबत आलेलं देशमुख आणि झगडे कुटूंब, मुंबई मधुन आलेले भट, नामजोशी, तोरस्कर, महाडीक या सगळ्यांशी ओळख झाली. ग्रुप तर मस्तच होता. सगळेजण समवयस्क आणि उत्साही होते. अशावेळी कसलीही परिस्थिती येवो.मज्जाच येते. त्यामुळे या अचानक आलेल्या पावसाचा पण आनंद घेता आला.


त्या गोंधळात सुद्धा शक्य त्या सगळ्या अँगल ने सेल्फ्या आणि ग्रुप फोटो काढुन वेळ सार्थकी लावला.तोवर पावसाचा जोर कमी झाला होता.
आमचा पॉईंट पाहुन झाल्यावर केबल कार स्टेशन जवळ चहा आणि भेळ खायला या असं अभिषेक ने मघाशीच सांगुन ठेवलं होतं. खाली उतरुन त्या हॉटेल मधे पोचलो. खरतर या पावसात आता गरम भजी ची ईच्छा होती पण तिथे पोचल्या पोचल्या भेळीचे द्रोण समोर आले. त्याचा खमंग वास नाकात शिरल्यावर खायला सुरुवार केली. आहाहा काय मस्त भेळ होती. बाहेर धुवांधार पाऊस आणि प्लास्टीक ताडपत्री लावलेल्या हॉटेल च्या आडोशाला बसुन आम्ही भेळ आणि चहा वर ताव मारला. पावसात भजी एवढीच भेळ सुद्धा चवदार लागते हे ज्ञान घेण्यासाठी लाखभर रुपये खर्च करुन नैनिताल गाठलं होतं. त्या हॉटेल च्या काउंटर वर जन्मसावित्री मॅगी ची पाकिटं दिसताच सगळ्या बच्चे कंपनीने भेळीसोबत गरमागरम मॅगी वर सुद्धा ताव मारला.
आता पाऊस थांबला होता पण "अ ती प्र चं ड" कुडकुडवणारी थंडी सुरु झाली होती. आणि आमचे सगळे स्वेटर बस मद्धे.
मग आता काय केलं असेल बरं आम्ही ?
बरोब्बर ओळखलंत... खरेदी...
शेजारीच गरम शाली,स्वेटर्,पोंचो अशी गरम कपड्यांची दुकानं होतीच. आणि ते लोक आमची वाटच बघत होते.मग त्यांना नाराज कसं करणार ना. लगेच मस्तपैकी खरेदी करुन थंडी पळवली. तिथेच घावुक प्रमाणात सगळ्यांनीच छत्री खरेदी केली.आता पाऊस थांबला होता आणि केबल कार परत सुरु झाली होती. कार मधे बसुन खाली यायला निघालो. माघाशी यातुन दिसणारा नैनी तलाव आता पुर्णपणे ढग आणि धुक्यात हरवुन गेला होता. जणु काही ढग आणि धुक्यातुनच आम्ही खाली निघालो होतो.
खाली उतरुन लगेच बोटींग पॉईंट कडे गेलो. पाऊस थांबलाय तोवर बोटींग करुन घ्यायचं होतं. थंड हवा, बोचरं वारं अशा वातावरणात नैनिताल मधे बोटींग करायला गेलो.
आता आमच्या हातात छ्त्री दिसल्यामुळे पाऊस शहाण्यासारखा थांबला होता. त्यामुळे आम्ही निवांतपणे बोटींग करत तलावात एक फेरी मारली. चारी बाजुंनी डोंगरानी वेढलेला हा नैनी तलाव खरतर फार फार सुंदर आहे. ज्यावेळी इथे बेसुमार पसरलेली बांधकामं नसतील तेव्हा हा अजुनच सुंदर दिसत असेल. लख्ख उन्ह असताना इथे बोटींग करायला अजुनच मजा येत असणार.तर आमची फेरी तलावाच्या एका टोकाला सुरु होऊन नैना देवी मंदीर असलेल्या बाजुला संपली.इथे मस्त फोटो पॉईंट होता. त्यामुळे सगळ्यांच्या बोटी पोचेपर्यंत भरपुर फोटोसेशन झाले. फोटो काढता काढता अचानक समजलं की पुण्यातुन आलेले झगडे दादा स्वत: प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत.मग काय मंडळी सोडतात की काय त्यांना. पूर्ण ट्रीप संपेपर्यंत त्यांच्याकडुन भरपुर फोटो काढुन घेतले.नैनी देवीची पौराणिक कथा अभिषेक कडुन ऐकली आणि मग देवीच्या दर्शनाला गेलो.
पौराणिक कथेनुसार, राजा दक्ष ने एक मोठा यज्ञ करायचे ठरवले होते.त्यासाठी स्वतःचा जावई शिवशंकर आणि लेक उमा सोडुन सगळ्या देवांना आमंत्रण दिले होते. दक्षाला त्याचा जावई आवडायचा नाही म्हणे. कसा आवडणार ? हिमालयात बसणारा, अंगाला राख फासणारा, राग आला की तांडव करणारा नवरा मुलीला मिळावा असं कुठल्या बापाला वाटेल
. तर ते असो. बापाने बोलावले नाही तरी पार्वती हट्टाने गेली आणि तिथे नवर्याचा अपमान सहन न होउन तिने यज्ञात उडी मारली. हे कळल्यावर भगवान शंकरांनी तिथे धाव घेतली आणि उमा(सती) चे जळते शरीर यज्ञातुन काढुन आकाशमार्गे फिरु लागले. त्यावेळी तिच्या शरीराचे अवषेश जिथे पडले तिथे शक्तीपीठे तयार झाली. तिचा उजवा डोळा जिथे पडला तिथले ठिकाण म्हणजेच हे नैनिताल आणि म्हणुनच या देवी ला नयना देवी म्हणतात. तिच्या डोळ्यातुन वाहाणार्या अश्रुंमुळे तलाव बनला असं मानतात.

ही गोष्ट ऐकुन मग दर्शन घेण्यासाठी मंदीरात शिरलो.नुकताच पडुन गेलेल्या पावसामुळे आणि थंड हवेमुळे मंदीराची संगमरवरी फरशी बर्फापेक्षा गार झाली होती. तलावाच्या काठावर असलेलं हे मंदीर सुंदर आणि स्वच्छ आहे. इथुन तलावाचं आणि आजुबाजुच्या हिरवाई चं सुंदर दर्शन होतं. मंदीरात गाभार्यापाशी फोटो/व्हिडिओ ला मनाई चे बोर्ड आहेत तरी काही महान लोक फोटो काढत होतेच. एक भक्तीण तर थेट व्हिडिओ शुटींग करत होती बहुतेक.
"दीदी यहा फोटो निकालना मना है."
"पुजारीजी मै फोटो नही निकाल रही. व्हिडिओ कॉल लगाके घर पर मां का दर्शन करवां रही हुं"
ताई एकदम बरोबर होत्या
.

या सगळ्या गमतीजमती बघत दर्शन घेउन बाहेर आलो तर आज आम्हाला केसरी तर्फे मोमो ट्रीट मिळणार होती असं कळलं. मंदीरा शेजारी एका दुकानात गरमागरम चवदार मोमोज वर ताव मारला.आता काही वेळ तिथल्या तिबेटियन मार्केट मधे फिरुन मग थोडं उशीरा जेवण असणार होतं.सकाळपासुन भेळ, मोमो असं काय काय खाल्ल्यामुळे भुक विशेष नव्हतीच.
तिबेटीयन मार्केट मधे हाताने विणलेले लोकरीचे सॉक्स, टोप्या, नैनिताल च्या प्रसिद्ध मेणबत्त्या अशी किरकोळ खरेदी केली.रमत गमत चालत चालत परत एकदा मॉल रोड वर पोचलो आणि गाड्यांमद्धे बसुन जेवणासाठी "रॉयल हेरिटेज" हॉटेल ला पोचलो. नैनिताल च्या मॉल रोड जवळच ही एकदम सुंदर जुन्या पद्धतीचं बांधकाम असलेली प्रीमियम प्रॉपर्टी होती. आजची दुपारच्या जेवणाची सोय केसरीतर्फे इथं केलेली होती.उभ्या आयुष्यात माझ्या आई, आज्जी, सासुला सुद्धा जे जमलं नाही ते केसरी नं करुन दाखवलं. आजच्या जेवणात 'काजु करेला' अशा नावाची भाजी होती. पाहिल्यांदा पाहिलं तेव्हा वाटलं, काय राव किती काजु वाया घालवले यांनी कारल्यासोबत. पण अभिषेक ने आग्रह केला आणि शुभांगी ने शिक्कामोर्तब केलं म्हणुन घाबरत घाबरत थोडी भाजी खाल्ली. आहाहा.. कारलं चक्क मस्त लागत होतं. पहिल्यांदाच मी कारल्याची भाजी मनसोक्त खाल्ली. चक्क बाजुला ठेवलेल्या आमरसाकडे दुर्लक्ष करुन. केसरीच्या जेवणाचे वारंवार उल्लेख येणारच आहेत त्याला इलाज नाही 

जेवण झाल्यावरचा वेळ आमच्यासाठी मोकळा होता. आता आमचं फिरुन झाल्यामुळे शहाणा पाऊस परत पडायला लागला होता. जेवल्यावर त्या हॉटेल च्या व्हरांड्यात टाकलेल्या आरामखुर्च्यांवर मस्त पसरुन एक डुलकी काढली.नंतर मॉल रोड वर त्या ईलेक्ट्रीक रिक्षा मधुन एक चक्कर मारली. मॉल रोड वर फारसं काही शॉपिंग करायची ईच्छाच झाली नाही कारण तिथे सगळी ब्रँडेड दुकानच होती. लोकल शॉपिंग आम्ही मघाशी करुन घेतलंच होतं.६ नंतर मॉल रोड गाड्यांसाठी बंद होतो त्याच्या आधी आम्हाला टुटा पहाड जवळ जिथे आमची बस होती पोचायचं होतं. त्यामुळे ५:३०-५:४५ ला परत निघालो आणि आमच्या बस पाशी पोचलो.
आजचा दिवस पाऊस आणि थंडीमुळे थोडा दमवणारा गेला होता पण खुप मजा पण आली होती. हॉटेल वर पोचुन थोडा आराम करुन डायनिंग रुम मधे आलो. काल राहिलेली ओळख परेड आज चालु होती.सगळ्या मंडळींची अजुन थोडी ओळख झाली. शेफ साहेबांनी केलेलं सुग्रास भोजन घेतलं. उद्या चा प्लॅन समजुन घेतला आणि रुम मधे येउन झोपुन गेलो.
-
स्मिता श्रीपाद

तळटीपः नैनिताल खरतर पुर्वी खूप सुंदर असणार आहे असं खेदानं म्हणावं लागतंय कारण आता नैनिताल मधे जिथे आणि जशी जागा मिळेल तशी बेसुमार बांधकामं केलेली दिसली. डोंगर फोडुन वाट्टेल तशी घरं आणि हॉटेल्स बांधली आहेत.
इतकं सगळं असलं तरीसुद्धा तलावाच्या परिसरात गेलं की अप्रतिम नजारा दिसतो.माणसानं निसर्गाला कितीही ओरबाडून घेतलं तरी तो माणसाला भरभरून आनंद देतोच.
पाऊस नसताना मॉल रोड वर तलावाच्या काठाने फिरायला खूप मजा आली असती.
केसरी चं हॉटेल नैनिताल मधे असायला हवं होतं असं एका क्षणी वाटलं. पण असो. एकदा ग्रुप टुर ने जायचं मान्य केलं तेव्हाच जास्त चिकित्सा करत बसायचं नाही असं आधीच ठरवलं होतं. काही फायदे काही तोटे असणारंच.
-
स्मिता श्रीपाद

No comments:
Post a Comment