Wednesday, July 23, 2025

*प्रयागराज महाकुंभ 2025...अनुभव*

 *प्रयागराज महाकुंभ 2025...अनुभव*



प्रयागराज महाकुंभ ला जायचं ठरलं तेव्हा खरंतर मनात संमिश्र भावना होत्या. कशाला जायचंय एवढ्या गर्दीत ? आधीच इतके लोक येतायत, प्रशासनावर ताण आहे, आपण त्यांचा भार का बनायचं ?
पण कसं असतं की Eveything is Planned... आपल्या बाबतीत कधी काय घडणार हे ठरलेलं असतं आणि ते कोणीच बदलू शकत नाही.अशी अनपेक्षित पणे ही संधी आली आणि पोचलो.प्रत्येकवेळी व्यावहारिक होऊन चालत नाही.. Just go with the flow...
प्रयागराज बद्दल आणि कुंभ च्या अनुभवांबद्दल आधी बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल पण माझे अनुभव नोंद करून ठेवावेसे वाटले म्हणून हा तिसरा लेख. अजूनही जायची इच्छा असलेल्याना काही मदत झाली तर बरंच होईल.
प्रयागराज पर्यंत प्रवास कसा केला ? -
आम्ही मुंबई ते प्रयागराज थेट विमानसेवा घेतली होती.विमानाने साधारण दोन तास लागतात. प्रयागराज विमानतळ शहराच्या बाहेर आहे. तिथून गावात जाण्यासाठी उबर टॅक्सी बुकिंग विमानतळावर मिळू शकते किंवा बाहेर ऑटो रिक्षा वाले उभे असतात त्यांच्यासोबत भाव ठरवून जाता येते. सध्या कोणताच फिक्स रेट नाही पण साधारण 500-800 रुपयात शहरात जाता येईल.
विमानाशिवाय, बस, रेल्वे, खाजगी गाड्या असे अनेक पर्याय आहेत.
राहण्याची व्यवस्था -
सध्या संपूर्ण शहरच जणू हाऊसफुल बुक झालेले आहे. अगदी होम स्टे पासून मोठ्या हॉटेल्स पर्यंत. आम्ही बुकिंग डॉट कॉम वरून सुपर कलेक्शन ओयो रूम बुक केली होती. मीरपूर अटला भागात हे हॉटेल होते. अतिशय बेसिक रूम होती पण पर्याय नसल्याने आणि दिवसभर फिरून झोपण्यापुरते इथे यायचे म्हणून जास्त चिकित्सा केली नाही. दुसरे म्हणजे इथून किडगंज बोट क्लब जवळ होता.या प्रवासात कंफर्ट हा मुद्दा नसल्याने काही गैरसोयी चालवून घेतल्या.
सिव्हिल लाईन परिसरात जास्तीत जास्त हॉटेल्स आहेत पण तिथे कधीही वाहनांसाठी रस्ते बंद केले जातात त्यामुळे जास्त चालावे लागते. ते बघता आम्ही घेतलेली रूम लगेच रिक्षा मिळण्याच्या दृष्टीने अतिशय सोयीची निघाली.
शहरात कसे फिरलो -
प्रयागराज मध्ये सगळीकडे e-रिक्षा आहेत.काही अतिशय सज्जन रिक्षावाले भेटले तर काही मनाला येईल तो दर सांगणारे भेटले. या रिक्षावाल्याना सगळे गल्ली बोळ अत्यंत व्यवस्थित माहिती असतात त्यामुळे मुख्य रस्ते बंद झाले तरी गल्ली बोळातून मार्ग काढत त्यातल्या त्यात आपल्याला जिथे जायचंय तिथे जवळ ते नेऊन सोडतात.त्यांच्याशी दर ठरवताना जरा घासाघीस करावी लागली.काहींनी खूप मदत केली तर काहींनी लहान अंतरासाठी अव्वाच्या सव्वा दर घेऊन फसवलं. अशा लोकांशी परक्या गावात आपण जास्त वाद न घालणे उत्तम हे तत्व आम्ही पाळलं. एकटे असाल तर फिरण्यासाठी उबर बाईक असा पण पर्याय आहे. हे बाईक वाले लोक पण सध्या खूप पैसे मागत आहेत असे कळले. आम्ही तिघे असल्याने हा पर्याय आम्हाला शक्य नव्हता.शेवटचा पर्याय म्हणजे सरळ चालत सुटणे 😃
काय खाल्ले-
या शहरातले लोक खूप कमी हॉटेलिंग करतात असे एकंदर वाटले. मनकामेश्वर घाट, बोट क्लब या ठिकाणी अतिशय कमी खाण्याच्या जागा होत्या. एखादं बरं, शांतपणे बसून जेवता येईल असं उपहारगृह नव्हतंच. पण रस्त्यांवर चाट चे ठेले प्रचंड प्रमाणात होते. कचौडी सब्जी, आलू टिक्की, टमाटर चाट, पाणीपुरी याचे भरपूर गाडे. लिट्टी चोखा चे पण काही गाडे दिसले. विशेष म्हणजे डोसा आणि चायनीज विकणारे पण बरेच स्टॉल होते. तब्बेतीचा विचार करत करत सुरुवातीला हे खायला आम्हाला भीती वाटली पण तरी मोह न आवरल्याने कचोरी, आलू टिक्की चाट, सुखी भेळ, पाणीपुरी, सब्जी कचौडी एवढ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. सगळेच चाट पदार्थ चवदार होते. विशेषतः बोट क्लब जवळ रगडा आणि मिठी चटणी घातलेली कचोरी आणि सकाळी नाश्ता म्हणून खाल्लेली सब्जी कचौडी अफलातून होती.बोट क्लब वर लेझर शो बघताना पिलेला चहा गोड, आंबट, जराश्या खारट अशा वेगळीच चवीचा काळा चहा होता. त्या थंड वातावरणात मस्त रिफ्रेशिंग लागला.
रस्त्यांवर ठिकठिकाणी लोखंडी कढया ठेवून दूध घोटून खवा बनवणारी दुकानं, लोणी, पनीर विकणारी दुकानं पण भरपूर होती. इस्कॉन मंदिरात अप्रतिम पेढे आणि कलाकंद मिळाला. उत्तर प्रदेश चे लोक चाट आणि दूधदुभत्यावर जगतात असं वाटलं.
एके ठिकाणी जाताना MG रोड असा एक रस्ता लागला तिथे KFC, मॅकडॉनल्ड्स , BBQ नेशन्स पण दिसले.
पण साधी राईस प्लेट मिळणारी दुकानं आम्ही फिरलो त्या भागात कमीच होती.त्यामुळे तिथे जाताना सोबत फळं, बिस्किटं, थोडा कोरडा खाऊ सोबत असलेला उत्तम.
त्रिवेणी संगमावर कसं जायचं -
संगमावर जाण्यासाठी बरेच मार्ग आहेत. संगम रोडवरून चालत सुटलं कि संगम घाट मार्गे पोचता येतं पण हा रस्ता प्रचंड गर्दीचा आहे आणि संपूर्ण चालत पार करावा लागतो.
अरेल घाटावरून संगमावर जाण्यासाठी बोटी सुटतात असे पण कळले.
आम्ही किडगंज भागातल्या बोट क्लब चा पर्याय निवडला. बोटीचा सरकारने ठरवलेला दर माणशी 450-500 आहे पण मी आधी लिहिलं तसं संगमावर जाऊन यायला 3 तास लागतात. 3 तास नाव वल्हवत आपल्याला संगमावर नेऊन आणायचे 500 रुपये ही खूप कमी रक्कम आहे.त्यांची शारीरिक मेहेनत बघता त्याने जास्त रक्कम मागणं स्वाभाविक वाटलं.त्यामुळे त्याने मागितलेली रक्कम आम्ही फारशी घासाघीस न करता दिली. किती दिली हे इथे सांगणं योग्य वाटत नाही. वैयक्तिक संपर्क साधावा.
या पॉईंटवरून मोटार बोट पण दिसत होत्या पण त्यांची संख्या कमी होती. एक अतिशय आवडलेली गोष्ट म्हणजे लाईफ जॅकेट्स घालणे बंधनकारक होते आणि सर्वजण हा नियम पाळत होते. चुकून माकून जॅकेट काढून फोटो काढायला बोट वर उभे राहणाऱ्या हौशी कलाकारांना नावाडी दादा जोरदार ओरडत होते. नदीतून फिरणाऱ्या पेट्रोलिंग करणाऱ्या लाईफ गार्डस च्या बोटी सुद्धा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होत्या.
गर्दी आणि इतर व्यवस्थापन -
गर्दी बद्दल उदंड बातम्या आणि रील येत आहेत आणि ते सगळे अगदी खरे आहेत. विशेषतः प्रयागराज मधलं प्रयागराज_ऑफिशिअल असं हॅन्डल असलेलं इंस्टाग्राम अकाउंट ज्या बातम्या देतं त्या जास्त रिलायबल वाटल्या.महाकुंभ चं जोरदार ब्रॅण्डिंग आणि सोशल मीडिया कृपेने तिथे भरपूर भाविक सध्या येत आहेत. स्वतः च्या गाड्या घेऊन बाहेरून आलेल्या लोकांनी जमेल तिथे जमेल तसं पार्किंग केलं कि रस्ते ब्लॉक होतात. शहराबाहेर स्वतंत्र पार्किंग स्लॉट्स आहेत तिथं गाड्या लावून मग पब्लिक ट्रान्सपोर्ट ने आत येणं अपेक्षित आहे पण हा नियम पाळला गेलेला दिसला नाही.
गर्दी आणि ट्राफिक जॅम चं दुसरं कारण म्हणजे VIP मंडळींचे लाड. देशासाठी महत्वाच्या व्यक्तींना VIP म्हणणं समजू शकतं पण तिथं VIP म्हणजे नक्की कोण हे ठरवण्यात गल्लत झालेली असावी.
म्हणजे एखादा रस्ता चालू असतो. गर्दी असली तरी गाड्यांची ये जा सुरळीत सुरु असते आणि अचानक पॉ पॉ करत पोलीस एस्कॉर्ट वॅन, त्याच्या मागे पुढे गाड्यांचा ताफा आणि मध्ये VIP लिहिलेली गाडी असा ताफा येतो आणि सगळ्या गाडयांना ओव्हरटेक करत रॉंग साईड ने पुढे घुसतो. झालं सगळं ठप्प, लगेच ट्राफिक पोलीस पुढे येतात, VIP ला जागा देतात आणि मग रस्ता बंद करून टाकतात. दोन दिवसात सगळ्यात जास्त राग आला तो या VIP management चा. यावर काही उपाय काढला तरी अंतर्गत वाहतुकीत बराच फरक पडेल असं वाटलं.असो. प्रशासनाचे प्रॉब्लेम्स त्यांना माहिती. हे फक्त माझं निरीक्षण झालं.
साधूंचे आखाडे:-
साधूंचे आखाडे असलेल्या जागी आम्ही जाऊ शकलो नाही. एकतर ते संगमाच्या पलीकडे होते. संगम घाट मार्गे जायचं असेल तर तिथे जाण्यासाठी 8-10 किलोमीटर तरी चालत जावं लागत होतं. दुसऱ्या कुठल्या बाजूने तिथे थेट गाडी जात असेल तर माहिती नाही.
एकंदर या दोन दिवसात अनेक अनुभव आले.
कुंभ हे एक वेगळंच जग होतं. हे जग सर्वांना सामावून घेतं.
8-9 महिन्याच्या बाळापासून ते पार 80 वर्षांच्या आज्जीपर्यंत सर्वांना गंगास्नानासाठी घेऊन आलेलं श्रद्धाळू कुटुंब, उत्तर प्रदेशच्या खेड्यापाड्यातून काम मिळवायला आलेले आणि इथे येऊन होड्या चालवणारे तरुण, कुठल्याशा खेड्यातून गंगाजलाचे मोकळे कॅन विकायला आलेली तरुणी, रुद्राक्ष, कस्तुरी विकणाऱ्या मुली, थेट इटलीहून भारतात कुंभमेळा बघायला आलेले पर्यटक सर्वांना तिथे काही ना काही सापडतच.
गंगा आहे तिथेच आहे.. अविरत वाहते आहे.. तिच्या काठावर चाललेली हि सगळी उलाढाल ..भावनांची, पैशाची, परंपरेची, धर्माची .. हे सगळं तटस्थपणे बघत या सगळ्यांना सामावून घेत पुढे वाहते आहे...तिच्याकडून शांतपणा शिकायचा..प्रवाहीपणा शिकायचा..अविरत पुढे जात राहणे एवढंच शिकायचं...
हेच या महाकुंभ चं फलित...
नमामि गंगे 🙏🏻
हर हर महादेव 🙏🏻
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 🙏🏻
समाप्त
-©️स्मिता श्रीपाद
12 फेब्रुवारी 2025


No comments:

Post a Comment