दक्षिणवारी - राजेशाही मैसूर
रात्री नुकताच पाऊस पडून गेला होता त्यामुळे हवा मस्त गार होती. उन्हाचा विशेष त्रास जाणवत नव्हता. इडली डोसा सांबर असा मस्त आणि मस्ट नाष्टा करून पहिल्यांदा पोचलो मैसूर पॅलेस ला. अनेक वर्षांपूर्वी आई बाबांसोबत मी हे पाहिले होते त्याच्या अंधुक आठवणी मनात होत्या. पॅलेस च्या आवारात पोचलो तेव्हा रविवार असल्याने भरपूर गर्दी झाली होती. इथे आवर्जून गाईड घ्या म्हणजे नीट माहिती मिळते असं गुगल review वर वाचलं होतं. त्यानुसार वसंत कुमार कडे गाईड ची चौकशी केली. त्याचा कोणी मित्र सरकारी गाईड आहे असं त्याने सांगितलं आणि लगेच फोन करून बुकिंग सुद्धा करून टाकलं.
पॅलेस पार्किंग मधेच आम्हाला गाईड आणि त्याचा माणूस भेटला. आमचं तिकीट सुद्धा त्यानेच काढून दिलं आणि आम्हाला सरकारी गाईड सोबत पॅलेस मध्ये प्रवेश मिळाला.
गाईड मस्त उत्साही होता, राजवाड्यावर आणि मैसूर च्या राजावर मनापासून प्रेम असणारा होता. वडियार राजघराण्याचा हा राजवाडा आहे. वडियार घराण्याचे जे अनेक राजे होऊन गेले त्यातले 24 वे राजे कृष्णराज वाडियार यांना लोक खूप मानतात. मैसूर पॅलेस चं भव्य सुंदर रूप जे आज दिसतंय ते याच कृष्णराज वडियार राजांमुळे. त्यांनी या पॅलेस ची भव्य पुनर्बांधणी केली. फक्त पॅलेस नव्हे तर त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. शाळा, कोलॅजेस, हॉस्पिटल्स, रस्ते बांधले. मैसूर शहराचा विकास केला.
सध्या या पॅलेस मध्ये वडियार घराण्याचे 27 वे वंशज राहतात. पॅलेस चा सुमारे 60% भाग सरकार च्या ताब्यात आहे जिथे पर्यटक जाऊ शकतात. उरलेल्या भागात राजघराण्याचे सदस्य अजूनही रहातात.
भव्य तैलचित्रे, कलाकुसर केलेले सुंदर खांब, अप्रतिम रंगवलेले छत, भव्य दरबार, विजयादशमी सोहळा जिथे होतो ते पटांगण आणि हा सोहळा बघण्यासाठी असलेली शाही बैठक, विजयादशमी सोहोळ्यात वापरली जाणारी शुद्ध सोन्याची अंबारी, चांदीची कलाकुसर केलेले दरवाजे अशा सामान्य माणसाला अगदीच अप्रूप वाटणाऱ्या जागा आणि वस्तू आम्हाला गाईड ने दाखवल्या. (भन्साळीच्या चित्रपटात दिसतात तसे महाल खरंच असतात हे पॅलेस बघून पटतं) अजूनही तिथल्या लग्नमंडपात शाही लग्ने पार पडतात. विजयादशमी सोहोळ्याला दरबार भरतो. सध्याचे राजे आणि राजघराण्यातल्या इतर व्यक्ती पारंपारिक पोशाखात तिथे हजेरी लावतात. परिकथेतल्या गोष्टी आणि व्यक्तिरेखा प्रत्यक्ष असतात हे तिथं जाऊन जाणवतं.
तरी माझ्या लेकीला पॅलेस मधल्या राजे लोकांच्या बेडरूम कशा असतात ते बघायचं होतं आणि मला खरंतर स्वयंपाकघर बघायचं होतं (कुणाचं काय तर कुणाचं काय ) पण ते सगळं राजाच्या खाजगी जागेत आहे म्हणे. पब्लिक ला अलाऊड नाही.
मग आम्ही आपलं 200 रुपयात जिवाचा पॅलेस करून जमेल तिथे फोटो काढून ठेवले
.

आज रविवार असल्याने अख्ख मैसूर तिथे आवतरलंय कि काय असं वाटावं इतकी प्रचंड गर्दी होती.
या पॅलेस ला बाहेरच्या बाजूनं 98000 बल्ब लावलेले आहेत आणि दर रविवारी संध्याकाळी 7 ते 8 मध्ये ते लावले जातात आणि पॅलेस ला रोषणाई केली जाते. आज रविवार असल्याने संध्याकाळी परत इथे येणं होणारच होतं.
पॅलेस मधून बाहेर पडून फिलोमिनो चर्च ला एक चक्कर मारली. चर्च ची इमारत पण कृष्णराज वाडियार यांनीच बांधली असं आमच्या ड्राइवर चं म्हणणं होतं. पण तसा काही उल्लेख तिथं दिसला नाही. असो. मग तिथून चामुंडी हिल्स view पॉईंट ला गेलो. वरून मैसूर शहराचं सुंदर दृश्य दिसतं. आता जोरदार भूक लागली होती त्यामुळे जेवण उरकलं आणि थेट झू मध्ये पोचलो.
पॅलेस ची गर्दी कमी वाटावी इतकी जास्त गर्दी इथे लोकांनी केली होती. झू खूप मोठा आहे त्यामुळे इलेक्ट्रिक गाडीने फिरायचं ठरवलं होतं पण तिथली लाईन बघून गपचूप चालायला सुरुवात केली. मैसूर चं प्राणिसंग्रहालय मस्त हिरवंगार राखलेलं आहे. मोराचा पहिलाच पिंजरा लागला आणि गम्मत म्हणून मी म्हणाले
"मोरा रे मोरा, जरा तुझा पिसारा फुलव ना मस्त"
आणि पुढच्या क्षणी मोराने खरंच पिसारा फुलवला
. आपल्या आईला वेड लागलंय का मोराला हे न कळल्याने लेक नुसतीच माझ्याकडे बघत राहिली आणि मी जोरदार कॉलर ताठ करून डोळ्याला गॉगल लावून उगीच नाक उडवलं
. पुढे वाघाच्या पिंजऱ्यापाशी गेलो तेव्हा तो दूर गवतात पसरून लोळताना दिसला. "वाघा रे वाघा,


जरा प्लीज उठून इकडे ये ना म्हणजे नीट दिसशील" असं 2-3 वेळा मोठ्यांदा म्हणून पाहिलं पण मघाशी मोरावर केलेली जादू इथे चालली नाही. 

भरपूर पक्षी, वाघ, सिंह, हत्ती, गेंडा, हरीण, सांबर असे भरपूर प्राणी बघत बघत बरंच फिरलो.
इथे फिरायला येण्यापूर्वी नोकरीनिमित्त गेली अनेक वर्षे बंगळूर मध्ये राहिलेल्या माझ्या मैत्रिणीला फोन केला होता. मैसूर मध्ये आम्ही एकच दिवस असल्याने must visit जागा कोणत्या ते तिला विचारायचं होतं. त्यावेळी.
"मैसूर मध्ये जाते आहेस ना ? मग जिराफ बघायला जा" असं उत्तर मिळालं. पॅलेस वगैरे सोडून जिराफांचं काय हिला कौतुक असं त्यावेळी वाटलं ( असेल तिची उंची कमी, पण म्हणून काय झालं, बौद्धिक उंची अफाट आहे ) पण झू मध्ये आत शिरल्या शिरल्या समोर मस्त जिराफ बघून खरंच भारी वाटलं मला (मैत्रिणीला बरोबर कळलंय मला नक्की काय आवडू शकतं ते 
). एकतर आधी मला ते पुतळे वाटले पण नंतर ते हलायला लागले. मस्त तुकतुकीत कांतीचे उंचच उंच जिराफ बघायला मज्जा आली.आता पाय दुखायला लागले आणि पाऊस पण सुरु झाला. मग थेट हॉटेल वर येऊन आराम केला.


संध्याकाळी पॅलेस लायटिंग बघायला वेळेत निघायची ड्राइवर ने सूचना केलीच होती.तासभर मस्त झोप काढली, चहा पिऊन फ्रेश झालो आणि परत पॅलेस ला निघालो.
दर रविवारी संध्याकाळी 7 ते 8 आणि सर्व सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी हे लाईट्स सुरु करतात. आम्ही ठीक 6:50 ला तिथे पोचलो होतो. 1 लाख बल्ब हळूहळू उजळतील असं आम्हाला वाटलं होतं. लाईट्स सुरु होताना व्हिडिओ घेऊ म्हणून मोक्याची जागा शोधली आणि कॅमेरा आता सुरु करणार इतक्यात एका क्षणात एका बटनावर सगळे लाखभर बल्ब सुरु झाले आणि आमच्या डोळ्यासमोर तो संपूर्ण पॅलेस सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघाला. हे इतक्या सेकंदात झालं कि त्या एका क्षणी संपूर्ण पॅलेस च्या प्रांगणात जमलेल्या हजारो लोकांनी एकत्रच आनंदाने जल्लोष केला. हा प्रसंग कॅमेऱ्यात साठवता आला नाही पण मनात इतका लख्ख कोरला गेलाय कि आता व्हिडिओ ची गरजच नाही.मग काय परत वेगवेगळ्या अँगल ने फोटो सेशन सुरु. सकाळच्या फोटोग्राफर ला परत पकडलं आणि उजळलेल्या पॅलेस समोर परत एकदा फोटो काढून घेतले. कुठूनतरी मस्त संगीताचे सूर ऐकू येऊ लागले तेव्हा लक्षात आलं कि पॅलेस च्या आवारात लाईव्ह संगीत सुरु केलं होतं.सोनेरी रंगात उजळलेला तो परिसर, पावसाची बारीक भुरभुर आणि ते सुंदर राजेशाही संगीत... अहाहा ... ती संध्याकाळ मी कधीच विसरणार नाही. इथल्या इलेक्ट्रिक गाडीतून संपूर्ण पॅलेस ला एक मस्त फेरफटका मारला. परत एकदा तो उजळलेला पॅलेस डोळेभरून पाहिला आणि lights बंद व्हायच्या आत तिथून बाहेर पडलो कारण हे असं सोनेरी चित्र अंधारात गेलेलं बघायला नको वाटलं असतं.
बाहेर आलो तर दुसरी मजा समोर उभी होती. सुंदर उमदे घोडे जोडलेली सजवलेली बग्गी ( टांगा म्हटलं कि टग्या सारखं वाटतं त्यापेक्षा बग्गी मस्त आहे ना )समोर उभी होती. बग्गीवाले दादा हाक मारायला लागले आणि आम्ही लगेच पहिल्याच बग्गीत स्वार झालो. छान सजवलेली, चहुबाजुने लाइटिंग केलेली ती बग्गी मस्तच होती. 15-20 मिनिटांचा लांब फेरफटका मारला. आजच्या दिवसाची मस्त सांगता झाली होती.
हॉटेल वर जाऊन गरमागरम रुचकर जेवण केलं. आजचा दिवस थकवणारा होता. लक्ष लक्ष दिव्यांनी तेजाळलेलं मैसूर पॅलेस डोळ्यासमोरून जात नव्हतं.उद्या उटीकडे जायला निघायचं होतं. बंदीपूर आणि मदुमलाईचा रस्ता साद घालत होता....
-
स्मिता श्रीपाद

No comments:
Post a Comment