Wednesday, July 23, 2025

*प्रयागराज महाकुंभ 2025...अनुभूती*

 *प्रयागराज महाकुंभ 2025...अनुभूती*



प्रयागराज त्रिवेणी संगमावर जायचे बरेच पर्याय आहेत. त्यापैकी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे किडगंज बोट क्लब वरून बोट पकडणे आणि पाण्यातून थेट संगमावर जाणे असा अभ्यास आम्ही करून गेलो होतो. त्यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 9 वाजता e-रिक्षा ने बोट क्लब च्या दिशेने निघालो.आज कालच्या पेक्षा जास्त गर्दी जाणवत होती. जागोजागी पोलीस बॅरिकेडींग मधून मार्ग काढत गल्ली बोळ फिरवत रिक्षा काकांनी एका जागी उतरवलं. रस्ता जाम होता त्यामुळे आता पुढे चालत.तिथून बोट क्लब 1.5-2 किमी वर होता म्हणे.
आता भूक पण लागली होती.त्यामुळे उतरून आधी थोडी फळं घेतली.नाश्ता काय ते शोधतोय तोवर एका गाडीवर कचौडी सब्जी असा बोर्ड दिसला.आजूबाजूला भरपूर गर्दी. लगेच जाऊन एक प्लेट ऑर्डर केली.5 कचौडी म्हणजे (बहुतेक उडदाच्या) खुसखुशीत पुऱ्या, बटाटा रस्सा भाजी, पनीर सब्जी, बुंदी रायता अशी भक्कम थाळी हातात आली. गरमगरम खुसखुशीत पुऱ्या, चवदार भाज्या तिथल्या थंडीत मस्तच लागल्या. पोटभर नाश्ता/जेवण झालं.
आजूबाजूला चर्चा चालू होती की बोट क्लब कसा फुल आहे, तीन तास वेटिंग आहे, त्रिवेणी संगम वर बोटी सोडणं थांबवलंय, आम्ही दीड तास थांबून आत्ता परत आलो वगैरे वगैरे. हे सगळं ऐकून शांतपणे बोट क्लब चा रस्ता धरला. जे होईल ते पाहू. महादेव बघून घेतील. ज्याने इथवर यायची बुद्धी दिली त्यावर भार टाकून बोट क्लब गाठला. तिथे प्रचंड गर्दी होती. बऱ्याच बोटींमध्ये लोकांना बसवून ठेवलं होतं पण बोटी जागेवरच.
गर्दीमध्ये शिरून बोट वाल्यांशी वाटाघाटी सुरु केल्या. काहींनी थेट नाही असं सांगितलं. 10 मिनिटे थांबलो आणि तेवढ्यात दोन तरुण त्यांची लहानशी होडी घेऊन काठाला लागले. थोडं पुढे होऊन त्यांच्याशी बोलायला लागलो. बोलून भाव ठरवला. पुढच्या मिनिटाला आम्ही होडीत होतो. हर हर महादेव 🙏🏻. तीव्र इच्छाशक्ती आणि परमेश्वरी कृपा एवढं एकच उत्तर असू शकतं. बोट क्लब ते संगम अंतर 3-4 किलोमीटर आणि परत येताना तेवढंच म्हणजे एकूण 6-7 किलोमीटर होडीतून जायचं होतं. ही मोटार बोट नसून साधी वल्हवायची होडी होती. तरुणांची किती मेहेनत होती ते दिसत होतं. त्यामुळे पैशासाठी जास्त घासाघीस केली नाही.
यमुनेच्या शांत थंड प्रवाहातून होडी सुरु झाली. सोबतचे तरुण मस्त गप्पा मारायला लागले.त्यांनी जाता जाता मनकामेश्वर मंदिर आणि घाट, सरस्वती घाट, अकबराचा किल्ला अशी ठिकाणं दाखवली आणि सोबत सगळी माहिती मिळत होती. मोदीजी आणि योगी सरकारने केलेल्या व्यवस्थेवर दोघे खुश होते.सरकारने प्रचंड सोयी केल्यात पण अपेक्षेपेक्षा खूप जास्त लोक आलेत.त्यामुळे गैरसोय होते आहे असे त्यांनी बोलून दाखवले.
आजूबाजूला विहरणाऱ्या बोटी, नदीतून उडणारे पांढरेशुभ्र पक्षी, सुंदर स्वच्छ पाणी असा प्रवास करत सुमारे दिड तासाने संगमावर पोचलो. नदीच्या मध्यात एक लष्कराचं केंद्र आणि शस्त्रसज्ज सैनिक सुद्धा आहेत. लाईफ गार्डस च्या बोटी सतत आजूबाजूला फिरत होत्या.
संगमावर बोटींचा एक प्रचंड जथ्था होता. आमच्या नावाडीदादांनी त्यातून सावकाश वाट काढत आम्हाला संगमावर वाळूत नेलं. नदीच्या प्रचंड पात्राच्या मध्यभागी जिथे गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम होतो तिथे एक वाळूचे बेट वर आलेले आहे त्यामुळे या संगमाच्या ठिकाणी पात्र उथळ आहे आणि साधारण कमरेएवढे पाणी आहे.इथेच स्नानाची सोय आहे. कपडे बदलायला आडोसे केलेलं आहेत.
आमच्या नावडीदादाने सामान सांभाळायची तयारी दाखवली आणि आम्ही पाण्यात उतरलो तेव्हा सुमारे 11:30-11:45 वाजले होते.हवा थंड होती पण डोक्यावर सूर्यमहाराज असल्याने आता पाण्यापेक्षा हवा उबदार वाटत होती. पाणी थंड असले तरी छानच वाटत होतं.आजूबाजूला भाबड्या श्रद्धाळू भाविकांचं गंगास्नान, कोणी पाण्यात अर्ध्य देतंय, कोणी आचमन करतंय, कोणी नुसतंच डोळे मिटून हात जोडून उभे, कोणी मोठ्यांदा जयजयकार करतंय असं भारलेलं वातावरण होतं.
पाण्यात जाऊन शांतपणे उभं राहिलो. आपण फार जास्त कष्ट न करता इथवर पोचलो आहोत यामागे आपल्या आजी, आजोबा, आई, वडिलांचा आशीर्वाद आणि आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे हा भाव त्याक्षणी मनात दाटून आला. "आम्ही स्वतःहून इथे पोचलो नाही तर कोणत्यातरी अज्ञात शक्तीने हे घडवून आणलं" याची प्रकर्षानं जाणीव झाली आणि आपोआप त्या अज्ञात शक्तीपुढे हात जोडले गेले.
आजूबाजूला लोकांची प्रचंड गर्दी होती तरीसुद्धा निरंतर वाहणारा तो गंगेचा प्रचंड प्रवाह सगळ्या गर्दीला पुरून उरला होता.पुढच्या महाकुंभ ला म्हणजे अजून 144 वर्षांनी आज इथे असलेल्या लोकांपैकी कोणीच नसेल पण या नद्या तरीही इथेच असतील.144 वर्षांपूर्वी देखील त्या होत्या आणि पुढेही अनंतकाळ त्याच असतील हेच एकमेव सत्य आहे.
हेच अमरत्व..हेच अमृत.. हेच अमृतस्नान..
अमृतस्नान चा अर्थ त्याक्षणी समजल्यासारखा झाला. खरं अमृत अस्तित्वात असेल नसेल पण गेली हजारो वर्ष अविरत वाहणाऱ्या, आपल्या आजुबाजुची जमीन आणि त्याचबरोबर समस्त मानवजातीला पोसणाऱ्या या जीवनदायिनी, अमृतवाहिनी नद्या हेच अंतिम सत्य.
त्या आजूबाजूच्या प्रचंड गर्दीत आणि कोलाहलात सुद्धा आम्हाला आमच्यापुरती स्नान आणि प्रार्थना करण्यासाठी निवांत जागा मिळाली. शांतपणे आचमन करून गंगामाई च्या प्रवाहात डुबकी मारली. पाण्याचा थंडपणा आणि शांतपणा शरीरभर पसरला.सगळे विचार क्षणभर का होईना थांबले.
नमामि गंगे 🙏🏻 हर हर महादेव 🙏🏻
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 🙏🏻
असा जोरदार जयजयकार केला.
गेली अनेक वर्ष अशी कोणती शक्ती असेल जी या सगळ्या परंपरा पुढे नेत असेल ? कोण कुठले ते साधू, दर वेळी कुंभ मध्ये कुठून येतात ? नंतर कुठे जातात ? सगळंच बुद्धीच्या पलीकडचं.
पुढची 10-15 मिनिटे तिथे मनसोक्त वेळ घालवला. भरपूर फोटो काढले. आठवणी साठवून घेतल्या आणि मग बाहेर पडलो. कपडे बदलून परत एकदा होडीतून प्रवास करून परत किनाऱ्यावर आलो.
आता गर्दीचा ओघ अजूनच वाढलेला जाणवला. तिथून बाहेर पडलो तर आजूबाजूचे सगळे रस्ते वाहनांसाठी बंद झालेले दिसले.जमेल तेवढं चालत आणि जमेल तिथून रिक्षा मिळवून वाटेत एका ठिकाणी जेवण केलं तेव्हा 4 वाजले होते. आता यापुढे आखाडे बघायला जायचं तर किमान 8-10 किलोमीटर चालत जावं लागलं असतं आणि रूमवर परत यायचं तर परत तेवढंच अंतर. प्रचंड वाढणारी गर्दी आणि लोकांचे लोंढे बघून तो विचार सोडून दिला. सगळ्या गोष्टींचा अट्टाहास नको कारण आपण सुरक्षित राहणं पण महत्वाचं आहे, त्यासाठी काही गोष्टींवर पाणी सोडावं लागलं तरी चालेल असं आधीच ठरवलं होतं. 6 च्या आसपास रूम वर परत आलो.
थोडावेळ आराम करून आमच्या हॉटेल जवळ असलेल्या इस्कॉन मंदिराला भेट दिली. तिथं भजन आणि सत्संग चालू होता.थोडावेळ तिथला उत्साह बघून परत फिरलो. वाटेत आलू टिक्की चाट चा आस्वाद घेतला. रात्री जवळच असलेल्या एका टपरीवजा ढाब्यात जेवण केलं. फारसा त्रास न होता ज्यासाठी आलो होतो ते गंगास्नान अविस्मरणीय अनुभूती देऊन गेलं.रात्री अतिशय शांत झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 चं परतीचं विमान होतं पण गर्दीचा अनुभव बघता आम्ही 6:30 ला रूम सोडायचं ठरवलं. हा निर्णय अतिशय योग्य ठरला कारण भरपूर गर्दीतून आणि ट्राफिक जाम मधून विमानतळावर पोचायला जवळजवळ 8:45 वाजले. ठरल्याप्रमाणे वेळेत विमान सुटलं आणि दुपारी 2 वाजता मुंबई मध्ये पोचून संध्याकाळी 6 वाजता पुण्यात घरी सुखरूप पोचलो.
त्रिवेणी संगम स्नान ही एक अनुभूती होती. जमेल तसं शब्दात मांडायचा प्रयत्न केला.प्रयागराज कुंभमेळा अनुभवताना आलेले काही अनुभव (चांगले वाईट दोन्ही) पुढच्या शेवटच्या भागात मांडायचा प्रयत्न करेन.
हर हर महादेव 🙏🏻
नमामि गंगे 🙏🏻
क्रमश:
-©️स्मिता श्रीपाद
11 फेब्रुवारी 2025

No comments:

Post a Comment